Sunday 12 May 2024

लेखांक ६ वा हॅन्सल, ग्रेटल, दुर्गादेवी आणि शिराळ शेठ

 

लेखांक ६ वा

हॅन्सल, ग्रेटल, दुर्गादेवी आणि शिराळ शेठ

 

इंडोनेशियात, १२५७ साली, एक ज्वालामुखी धडाडला. त्याची काय ताकद असेल बघा; त्याच्या राखेने उद्भवलेल्या झाकोळाने पश्चिम युरोपातील तापमान घटलं. याने लघु हिमयुग (लिटल आईस एज) अवतरलं.  युरोपात भीषण दुष्काळ पडले. दैन्य, दारिद्र्य आणि उपासमारीने आईबापांनी पोरं सोडून देण्याच्या इतकेच काय नरमांस भक्षणाच्याही कथा आहेत. ग्रिम बंधूंनी सांगितलेल्या  ‘हॅन्सल आणि ग्रेटल’ ह्या भावंडांच्या  ‘परिकथेत’, त्यांना आईबापानी जंगलात सोडून दिलेलं असतं, आणि तिथली चेटकी हॅन्सलला खायला प्यायला घालून, धष्टपुष्ट करून मग खाणार असते.  ह्या कथानकाला वास्तवाचे संदर्भ आहेत म्हणतात.

सात वर्षाच्या ह्या महादुष्काळात (१३१५ ते १३२२) तेरावा महिना म्हणून की काय पाठोपाठ (१३४६) ‘ब्लॅक डेथ’ म्हणून ओळखली जाणारी प्लेगची साथ आली.  हिने तर  निम्मा युरोप गारद  केला. कल्पना करा उद्या सिग्नलशी तुम्हाला निम्मीच गर्दी लागली; सुट्टी म्हणून नाही तर भवतालचे निम्मे  स्वर्गवासी झाले आहेत  म्हणून, तर कसं वाटेल? ब्लॅक डेथनं युरोपवर ही वेळ आणली. 

युरोपने अनुभवलेला हा सगळ्यात खतरनाक प्लेग. यासाठी कित्येक घटक जबाबदार असू शकतात. त्याच वेळी मध्य आशियात अतिवृष्टी झाल्याने  तिथली उंदरांची प्रजा वाढली असेल,  नव्या व्यापारी  मार्गांनी  नवे उंदीरही आले असतील.  थंडीत, माणूस ते माणूस आणि उष्मा वाढताच उंदीर-पिसू-माणूस असं प्लेगचं लागण चक्र अव्याहत फिरत राहिलं असेल. साथीला नैसर्गिक ब्रेकच  लागला नसेल.

डोक्यात होणाऱ्या उवा असतात (आठवा, ते रविवार, ते तेल, ती फणी आणि ते नखाने चिरडणे) तशा अंगावर होणाऱ्याही असतात. अंगावर वावरणाऱ्या असतात तशा निव्वळ जननेंद्रियांवरील केसांत बागडणाऱ्याही असतात. ह्याच उ-बाईसाहेब पापण्या आणि भुवयांमधेही वस्ती करतात! आता मुळात त्या तिथे कशा पोहोचतात ते विचारू नका!!  ते असो, आपला मतलब अंगावरच्या उवांशी (पेडीक्युलस ह्युमनीस कॉर्पोरिस) आहे. ह्या फक्त रक्त पिण्यासाठी अंगावर येतात एरवी रहातात अस्वच्छ अंथरूणात, पांघरूणात किंवा कपड्यात. टायफस, ट्रेंच फिव्हर, रिलॅप्सींग फिव्हर यांच्या या वाहक. ह्या साऱ्याच्या साथी यांनी सारीकडे वाहून नेल्या. पण काही परिस्थितीत, पिसवा नसल्या तर, ह्या प्लेगच्याही वाहक ठरू शकतात. मानव-उ-मानव असं लागण चक्र घुमायला लागतं. लोकरीचे कपडे सहसा न धुता वापरले जातात. इथे उवांची बजबजपुरी माजते. ब्लॅक डेथ पसरायला, अस्वच्छ लोकरी कपड्यांचा वापर हाही एक घटक होता. करणार काय, लघु हिमयुग सुरू होतं. थंडी तर होतीच. लोकरीचे कपडे नुकतेच सामान्यांच्या आवाक्यात आले होते.

आज आपण ज्याला ‘ब्युबोनिक प्लेग’ म्हणतो तोच हा होता का?, अशी शंका आहेच. त्या काळच्या वर्णनांवरून नेमका अंदाज येत नाही. ‘उंदीर पडल्या’ची वर्णने अभावानेच आढळतात. फारच वेगाने पसरलेला आणि फारच बळी घेणारा हा आजार; अॅन्थ्रॅक्स, इबोला अथवा इंफ्लुएंझा असावा असाही कयास आहे. जंतू तर वेगाने उत्क्रांत होत असतात त्यामुळे त्यांचे आजचे आणि तेंव्हाचे रूप भिन्नच असणार. त्या काळातली मढी उकरून, त्यांचे नमुने घेऊन, त्यावरील जंतूंचे डीएनए तपासून, त्यांची आजच्या जंतुंशी तुलना करून, लढवलेले हे तर्क आहेत. अधिक संशोधनाने अधिक स्पष्टता येत जाईल.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातून प्लेग हटला तो जवळपास आजवर. ह्याचेही श्रेय तिथला रॅटस रॅटस, हा पिसू-प्लेग वाहक उंदीर जाऊन त्याची जागा रॅटस नोरवेजिकसने घेतली हे असावे. ह्या रॅटस नोरवेजिकसच्या अंगावर पिसवा होत नाहीत. म्हणजे वैद्यकीपेक्षाही प्राकृतिक कारणांनी ही ब्याद गेली.

त्याचवेळी भारतातही उष्मा वाढून दुष्काळ पडले होते. दख्खनच्या पठारावर १३९६-१४०७ असा तब्बल बारा वर्ष ठाण मांडून बसलेला दुष्काळ, हा दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून प्रसिद्ध आहे. याची भयाण भेसूर वर्णने आपल्या ऐतिहासिक साधनांत आहेतच पण जनमानसांत शिल्लक आहेत त्या दोन कृतज्ञ स्मृती. हा ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’, कारण दुर्गादेवी नावाच्या वंजारणीने गंगातीरावरून इथे धान्य आणून लोकांचे प्राण वाचवले. तसेच श्रियाळ श्रेष्ठ (बोली भाषेत शिराळ शेठ) ह्या व्यापाऱ्यानेही आपली गोदामे जनतेसाठी खुली केली. राजाने ह्या दातृत्वाची तारीफ करत त्याला  काही मागायला सांगितलं, तर याने औट घटकेचे राज्य मागून घेतलं. औट म्हणजे साडेतीन घटिका. म्हणजे ८४ मिनिटे. एवढ्या वेळात त्याने जनहिताची  अनेक फर्मानं काढली. आजही नागपंचमीनंतर येणाऱ्या षष्ठीला, मातीच्या राजवाड्यावर ‘शिराळ शेठ’  विराजमान होतो. सारीकडे आनंदीआनंद होतो. औट घटकेचे राज्य दिवेलागणीला संपते. उत्सव संपतो. शिराळ शेठ आता विसर्जित केला जातो. असेल का कोणी असा श्रियाळ श्रेष्ठ? का त्या पिचलेल्या प्रजेनी,  आपल्या सुप्त इच्छा-आकांक्षा अशा कथांतून पुरवून, स्वत:ला पुलकित करून घेतलं असेल? असेलही पण दुसरीच शक्यता जास्त.

पूर्व प्रसिद्धी

दैनिक सकाळ

हवामान भान ह्या सदरात

१०.०५.२०२४

 

 

No comments:

Post a Comment