Thursday, 6 June 2024

लेखांक १० वा कॉलरा

 

लेखांक १० वा

 

कॉलरा

 

कॉलराच्या साथी हवामानाच्या हेलकाव्यावर अवलंबून नसतात. पण पूर, वादळे, दुष्काळ अशा अरिष्टांत आणखी भर घालणारे जे अनेक साथीचे आजार आहेत त्या पैकी हा प्रमुख.

कॉलराची पहिली ज्ञात साथ १८१७ ते १८२५ अशी टिकली. कॉलरा होतो व्हिब्रियो कॉलरा या जंतुंमुळे आणि  पसरतो दूषित अन्न पाण्यातून. ह्याचा उद्गम गंगेच्या पठारी प्रदेशात असावा, विशेषत: पूर्वेकडील पठारी भागात. ह्या आजाराच्या अशा खास, ओला देवी, ओला बीबी अशा देवता आढळतात त्या भागात. कोलकाता ब्रिटिश प्रदेशाची राजधानी होती.  इथून व्यापाराबरोबर कॉलराही निर्यात झाला. कॅन्टन, कोरीया, जपान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान मार्गे मध्यपूर्वेतही हा जंतु पोहोचला. आजवर कॉलराच्या सहा साथी येऊन गेल्या आहेत (१८१७, १८२६, १८४५, १८६२, १८८१ आणि १८९९) आणि इंडोनेशियातून १९६१ साली  सुरू झालेली साथ अजूनही जारी आहे. बाकीच्या साथी ५ ते २० वर्षात बऱ्याचशा आपोआपच आटोपल्या तरी ही सुरूच आहे. कॉलराच्या एल टोर   ह्या उपजातीचा हा प्रताप.

ह्या साथींचा छडा लावतालावताच  एल निनोने दक्षिणेला  झोका घेतल्याचे आणि हे नियमित घडत असल्याचे आढळले. कॉलरा आणि हवामान संशोधन हे असं निगडीत आहे. कॉलराचे जंतू खाडीतील तवंगात, शैवालात (अल्गी) घर करून असतात. एल निनोच्या प्रभावाने पाणी उबदार होताच हे झपाट्याने वाढतात. तिथल्या अन्न साखळीत प्रविष्ट होतात, शेवटी माणसाच्या पोटात शिरतात आणि हाहाकार माजतो.

आर राघवेंद्रराव नावाच्या निजामाच्या सेवेतील सरकारी  डॉक्टरने, १९४१ सालच्या नाथांच्या पालखीच्या निजाम हद्दीतील  प्रवासाचं वर्णन लिहून ठेवले आहे. पैठण नगरीत मुळातच कॉलरा होता. ४९ केसेसपैकी १८ रुग्ण दगावले होते. पोटॅशियम परमँगनेट, ब्लीचींग पावडर आणि लस ही आयुधे होती. वाटेत मुंगी गावाने या साऱ्याला असहकार पुकारला, कुंडल पारगावला सारे करूनही कॉलऱ्याची केस झालीच आणि बीड जिल्ह्यातील दहिवंडीची बातमी ऐकून तर सारेच भांबावले. १२५ लोकवस्तीच्या त्या गावात ३० केसेस होऊन १४ बळी गेले होते. गावातर्फे पालखीला जेवण घालायची प्रथा होती.  शिधा द्या आम्ही रांधून घेतो पण घरोघरच्या  भांड्यातून अन्न आणू नका; असा निरोप दिला गेला. पण गावकऱ्यांना हे मान्य नव्हतं, मग गावातील अन्न न घेता पालखी गावाबाहेरून नेण्यात आली.  अडाणी स्थानिक फूसलाव्यांचा जाच जागोजागी होताच.  लसीची सर्टिफिकिटे वारंवार तपासली जात होती. तरीही लोकं लस न घेता वारीत घुसत होती. चुकार लोकं सापडतंच होती. परिणामी  वारकऱ्यांत काही केसेस झाल्याच. एक मुलगाही गेला. अखेर सीना नदी ओलांडून पालखी ब्रिटिश इंडियात पोहोचली आणि डॉ. रावांनी हुश्श केलं. पंढरपुरहून परतीचा प्रवासही साधारण तसाच घडला.  दहिवंडीसारखाच अनुभव आता  साऊथंड्याला आला. अखेर काही वैष्णवजनांना वैकुंठास पोहोचवून का होईना, त्या काळाच्या मानाने,  पालखी सुखरूपच पैठण मुक्कामी पोहोचली म्हणायची.    

अडाणी स्थानिक फूसलाव्यांचा बंदोबस्त करावा, लसीकरणाची सक्तीच असायला हवी आणि अॅम्ब्युलेन्स म्हणून बैलगाड्या मिळाव्यात अशी विनंती डॉ. राव करतात. 

जगात आज बहुतेक भागात कॉलरा नाही कारण स्वच्छ पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट. सांडपाण्याचं आणि कॉलराचं काही नातं आहे हे सर्वप्रथम दाखवून दिलं ते डॉ. जॉन स्नो ने. लंडनच्या साथीचा अभ्यास करताना त्याला असं आढळलं की एका  विशिष्ट हातपंपातून पाणी वापरणाऱ्या घरांतच  मृत्यूने मुक्काम ठोकला होता. नगरपित्यांचा विरोध मोडून काढत आणि लोकक्षोभाची तमा न बाळगता त्याने हा पंप बंद करवीला. म्हणजे त्याचे हँडलच काढून टाकले. कॉलरा तात्काळ ओसरला. कॉलराच्या जंतुंचा शोध नंतर लागला. त्याच्या संक्रमणाचे मार्ग आधी रोखता आले. जॉन स्नोचा हा शोध अनेक कारणांनी  क्रांतिकारी ठरला. त्याने लंडनच्या नकाशावर मृत्यू घडलेली घरे ठिपक्यांनी दर्शवली. ब्रॉड स्ट्रीटच्या पंपाभोवती सारे ठिपके एकवटले होते. ही पद्धतही नवलाची होती. 

परंपराप्रिय ब्रिटिशांनी ब्रॉड स्ट्रीटवरचा हा हातपंप आजही जपला आहे. आता त्याला पाणी येत नाही पण  आजही दरवर्षी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कुणाला स्नोच्या स्मृतिव्याख्यानासाठी आमंत्रित केलं जातं. व्याख्यानाच्या सुरवातीला पंपाचं हँडल काढलं जातं आणि या क्षेत्रातील नवीन काही ऐकून झाल्यावर ते पुन्हा बसवण्यात येतं.

जिथे कॉलरा आहे तिथेही मृत्यूदर कमी आहे कारण ‘जलसंजीवनी’. जलसंजीवनीचा शोध हा भारतातला (आणि बांगलादेशातला). ‘साखर, मीठ, पाणी; जुलाबावर गुणकारी’ हा मंत्र दिला तो डॉ. दिलीप महालनोबीस यांनी. वरवर साधा, अगदी घरगुती   वाटणारा हा फॉर्म्युला निश्चित करणे म्हणजे अडथळ्याची शर्यत होती. अगदी अश्रुंइतक्याच खारट असलेल्या ह्या पाण्याने  जगभर अनेकांचे जीव वाचवले आहेत, अनेक घरचे अश्रु रोखलेले आहेत.

 

प्रथम प्रसिद्धी

हवामान अवधान

दैनिक सकाळ

७.६.२०२४

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment