लेखांक १३ वा
आता करायचं काय?
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई
(हा अखेरचा लेखांक आहे. दर शुक्रवारी असे हे सदर १३ शुक्रवार प्रसिद्ध झाले. आधीचे लेखांक वाचण्यासाठी ५ एप्रिल पासून पुढे दर शुक्रवारची पोस्ट पहावी.)
प्रगती म्हणजे भौतिक समृद्धी ही कल्पना पाश्चिमात्य संस्कृतीने ठळक केली. जागतिक व्यापार उदीम, संपर्क साधने आणि परस्परावलंबीत्वामुळे ती सर्वदूर संक्रमित झाली. बाजारशाही आणि भांडवलशाहीच्या मिषाने सुस्थापित झाली. पण याचे दुष्परिणाम आता प्रतीत होत आहेत. अधिकाधिक उत्पादन, चैनबाजी, उधळपट्टी आणि प्रचंड कचरानिर्मिती याने होणारे पर्यावरणीय आणि सामाजिक नुकसान दुर्लक्षित रहिलं होतं ते आता लक्षात घ्यायला हवं. सध्याची व्यवस्था ग्रीनहाऊस वायूंची निर्मिती, समुद्राचे अॅसिडिफिकेशन आणि कित्येक प्रजातींचा लय वगैरेंची किंमत उत्पादन खर्चात गणतच नाही. ही तर शहामृगी वृत्ती झाली. उत्पादनातून निव्वळ नफा किती झाला यावर प्रगती न मोजता, जर उत्पादनाचा दर्जा, उपयोग मूल्य आणि टिकावूपणा लक्षात घेतला तर? संसाधनांचा तारतम्याने वापर करणारा, पुनर्वापर करणारा, आपला कार्बन ठसा पुसट होत जाईल असं वागणारा समाज निर्माण झाला तर? जीडीपी पेक्षाही हे सारे लक्षात घेणारा ‘खरखुरा’ (जेन्यूइन) प्रगती निर्देशांक काढला तर? जीडीपीचा आलेख उंचावत असताना हा निर्देशांक ढासळत असल्याचं आपल्याला दिसेल. कारण सतत ‘प्रगती’च कशी होईल? एक वेळ अशी येईल की माणसाची अमर्याद भूक आणि पृथ्वीची मर्यादित क्षमता आमने सामने ठाकतीलच.
पार्थ दासगुप्तांसारख्या अनेक अर्थतज्ञांनी उत्पादन, पायाभूत सुविधांबरोबरच समाजाची खरी संपत्ती नैसर्गिक आणि पर्यावरणीय श्रीमंतीत आहे हे मांडलेले आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) आकडा हा प्रगतीचा निदर्शक मानला जातो. वास्तविक वैयक्तिक स्वातंत्र्य, उत्तम नातेसंबंध, स्वतःचा स्वीकार आणि वैयक्तिक परिपूर्तीची संधी हीच माणूस नावाच्या समाज-प्राण्याची मानसिक निकड आहे. सतत पैसा आणि मालमत्तेची हाव धरायला लावणारी व्यवस्था माणसाच्या मानसिक निकडीकडे दुर्लक्ष करते.
पण हवामान बदल हे एक नकोसे, अप्रियसे सत्य आहे. भविष्य अंधकारमय आहे, विद्यमान अर्थव्यवस्था आणि त्यामागील मूल्य भान हाच प्रश्न आहे. हे लक्षात घेऊन कडक उपाय करणे म्हणजे सध्यातरी राजकीय हाराकिरी आहे. ह्यात सचैल नहालेल्यांना हवामान अवधान मानवणारे नाही. स्थिती जैसे थे राखण्यात प्रचंड आर्थिक, सैद्धांतिक, राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत. तेंव्हा ह्याला सरळ नाकारता येत नसेल तर निदान त्याबद्दल संशय निर्माण करणे हा विरोधकांच्या रणनीतीचा भाग आहे. हवामान शास्त्रात असं म्हणतात की एखाद्या फुलपाखराच्या फडफडण्याने पृथ्वीच्या विरुद्ध टोकाला अगदी वादळेही घडू शकतात. हवामान आणि त्याचे परिणाम हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. यामुळेच याबद्दल संशय पेरणे तसे सोपे आहे.
हवामान बदल हा एक मोठा ज्ञान द्रोह आहे. कोपर्निकस आणि डार्विन नंतरचा हा तिसरा मोठा ज्ञान द्रोह. कोपर्नीकस आणि डार्विनने माणसाने माणसाला बहाल केलेल्या खास स्थानावरून हुसकावून लावले. कोण्या टीचभर ताऱ्यावर, अपघाताने उद्भवलेल्या उत्क्रांती नामक जैव-पर्यावरणीय प्रक्रियेचं एक रूप म्हणजे मानव, हे सिद्ध केले. आता हा माणूसच गुन्हेगार आहे हा विद्रोही विचार हवामान शास्त्रज्ञ मांडत आहेत. विश्वाच्या पसाऱ्यात ह्या अगदीच नगण्य जीवाने, अकल्पित सामर्थ्य प्राप्त करून, हे संकट ओढवून घेतलेलं आहे.
वर्षामागून वर्षे सरत आहेत आणि आपल्याच नाकर्तेपणामुळे आदर्शवत कार्बन उत्सर्जनाची टारगेट्स आवाक्याबाहेर जात आहेत. प्रश्न जागेपुरता न रहाता केंव्हाच जगाचा झाला आहे. ‘लोकल’चा ‘ग्लोबल’ झाला आहे. मात्र राजकारणाचा केंद्रबिंदु असा सरकलेला नाही. तशी जाणीव अजून नाही. जागतिक प्रश्नांचा साकल्याने विचार करणारे नेतृत्व अजून नाही. युरोपात ‘३० वर्षाच्या युद्धा’नंतर १६४८ साली वेस्टफालीयाचा करार झाला. प्रत्येक सार्वभौम राष्ट्राला आपल्या हिताचे निर्णय घेण्याचा अधिकार मान्य केला गेला. सहाजिकच युरोपात आणि त्यावर आधारित राष्ट्रवाद जोपासणाऱ्या साऱ्याच जगात असा ‘राष्ट्र(ल)पोटेपणा’ आवश्यक, स्वाभाविक आणि क्षम्य ठरला. यावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना उभारण्यात आली पण तिचेही प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. ‘मानव प्रथम’पेक्षा ‘देशबांधव प्रथम’ हीच भावना प्रबळ दिसते.
इतकी सारी प्रजा जगवायची, तगवायची, म्हणजे शेती, कारखानदारी हवी. म्हणजे गोल्डीलॉक्स झोनची नैसर्गिक लक्ष्मण रेषा ओलांडायलाच हवी. ही ओलांडायची तर ऊर्जा हवी आणि ती निर्माण करायची तर पर्यावरणाचा काही ना काही ऱ्हास अटळ आहे. ह्या ऱ्हाससत्रात माणसाचीच आहुती पडू शकते. कशी ते आपण या लेखमालेत पाहिलं. पूर, दुष्काळ असे निसर्ग रोष, समाजिक असंतोष, राजकीय उलथापालथ, साथी, कुपोषण, आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था आणि या साऱ्याचा अन्योन्य संबंध आपण लेखमालेत पाहीला. हवामान आणि आरोग्यमान हा किती गुंतागुंतीचा प्रश्न आहे तेही आपण पाहिले.
म्हणूनच निव्वळ औषधाने सुटणारा हा प्रश्न नाही. निव्वळ डॉक्टरने उपाय योजावेत असा हा विकार नाही. हा जगाचा प्रश्न आहे. हा जनांचा प्रश्न आहे. आपापल्या परीने हा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांचा आग्रह धरणे आणि अशा प्रयत्नांना बळ देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हवामान अवधान ते हेच.
पूर्व प्रसिद्धी
दैनिक सकाळ
२८.०६.२०२४
हवामान अवधान
No comments:
Post a Comment