आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल.
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
सध्या फेबू, इनस्टा, एक्स वगैरे समाजमाध्यमांवर
स्वयंघोषित हेल्थ एक्स्पर्टसनी नुसता उच्छाद मांडला आहे. नुकतीच ‘धडधाकट लोकहो, आमच्याकडे या आणि सलाईनमधून मल्टीविटामिन घ्या. तुमचे शरीर डिटॉक्स होईल. व्हिटामिन
बॅलन्स साधला जाईल. तुमचे
केस काळे कुळकुळीत होतील, त्वचा तुकतुकीत होईल, आरोग्य आणखी सुधारेल’; अशा आशयाची
जाहिरात वाचली आणि मी थक्क झालो. हा
मुद्दा उगाळायला काही क्रिकेटर्स आणि बॉलीवूड तारे-तारका तिथे हजर होत्या. आता
त्यांनीच सांगितलंय म्हटल्यावर चॅलेंजच
नाही.
डीटॉक्सीफिकेशनचं डिटॉक्स हे लाडकं लघुरूप.
म्हणजे त्याचं काय आहे, तुमचं शरीर असतं की नै,
त्यात निरनिराळी विषारी द्रव्ये म्हणजे टॉक्सीन्स साठत जातात की नै, मग ती काढायला
हवीत की नै, ते ह्या सलाईनमुळे आणि त्यातील व्हिटामिन्समुळे होतं.
ही सुविधा सप्ततारांकित होती. त्या जाहिरातीवरून
हे स्पष्टच होतं. त्यातल्या ललना खूपच सुंदर आणि उच्चभ्रू होत्या. पुरुषही जणू मदनाचे
पुतळेच होते. सल्ला देणाऱ्या ‘काउन्सेलर्स’ आणि सलाईन लावणाऱ्या नर्सेस थेट
हॉलीवूडमधून मागवलेल्या असाव्यात, इतक्या त्या उंच आणि टंच होत्या. असोत बापड्या.
गिऱ्हाइक बायका कॉफी पीत, पुस्तक वाचत,
टिवल्याबावल्या करत मजेत सलाईन लावून बसल्या होत्या. पुस्तक म्हणजे सुद्धा, ‘बटाट्याची
चाळ’ किंवा ‘रिंगाण’ असलं ऐरंगैरं पुस्तक नाही बरं. एकीच्या हातात गॅब्रीअल गारशिया मार्क्वेझचं ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्यूड’ होतं
आणि दुसरीच्या हातात सलमान रश्दीचं कुठलंतरी.
मला आपलं गावांकडचं सलाईन, म्हणजे दुर्मुखलेला
चेहरा,
गंभीर नातेवाईक हे कॉम्बिनेशन परिचयाचं. आरोग्याचा
हा डिटॉक्स मार्ग मला पेशंटला कंगाल आणि कंपनीला मालामाल करणारा वाटला. खेडेगावात
माणसे येतात, ती आजारानं, पैशानं, परिस्थितीनं गांजलेली असतात. हौसेने
डॉक्टरांच्या मागे लागून सुई टोचून घेतात, सलाईन लावून घेतात, ह्या ‘सेवांसाठी’
जास्त पैसे मोजतात. ते लाल किंवा पिवळे द्रावण थेंबेथेंबे शरीरात उतरतं, शरीरात
पसरतं. हतबलतेत त्यांना बल मिळतं, निराशेत
आशा. अशा पेशंटची टवाळी होते, डॉक्टरांची निंदा होते, अज्ञान, अंधश्रद्धा, पिळवणूक वगैरे चर्चा होते. इथे
तर लय धडधाकट, बक्कळ पैसा गाठीशी बांधून असलेल्या, उच्चशिक्षित मंडळींनी या तथाकथित वेलनेस क्लीनिकमध्ये जाणं
अपेक्षित आहे. तिथले दरही तसे
आणि दराराही तसा आहे.
लक्षात
घ्या हे वेलनेस क्लीनिक आहे, इलनेस क्लिनिक नाही. तुम्ही मुळात आरोग्यपूर्ण असणंच अपेक्षित आहे. रोगजर्जर, कण्हण्या कुंथणाऱ्या, रडक्या
चेहऱ्याच्या माणसांसाठी हे नाहीच. इथे आहे त्या आरोग्याला सुपर-आरोग्याचा सरताज
घालून मिळणार आहे. मुळातल्या सुदृढ बाळाला आणखी सुदृढ होण्याचं टॉनिक द्या म्हणून मागे लागणाऱ्या आया आणि या
जाहिरातीतल्या गिऱ्हाइक बाया, या एकाच माळेच्या मणी आहेत. शेवटी एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही हेल्दीचे
सुपर-हेल्दी होऊ शकत नाही. पण यांना आरोग्याची खा खा सुटलेली असावी. आरोग्य म्हणजे काय खायची चीज आहे?
ह्या डीटॉक्स नावाच्या धंद्यातून शरीराचा एकही
अवयव सुटलेला नाही. स्त्रियांचे शरीरस्त्राव म्हणजे पाळी आणि यौनस्त्राव, हे मुळातच वाईट्ट मानलेले आहेत. योनी हे तर पापाचं उगमस्थान. त्यामुळे व्हजायना
डिटॉक्सला चांगली मागणी आहे. हे म्हणजे व्ह्जायना विसळायचे खास साबण, शांपू, डूश वगैरे. योनीला अशी बाह्य सहाय्याची काही गरज नसते. स्व-स्वच्छतेचे कार्य सिद्धीस
नेण्यास योनी समर्थ आहे. इन्फेक्शन झालं तर गोष्ट वेगळी. वेगळी म्हणजे औषधे घ्यावी
लागतात; डिटॉक्स नाही. कुठलेच इन्फेक्शन योनी विसळून, धुवून किंवा अगदी ड्रायक्लीन करूनही जात नाही.
लिव्हर हा
शरीर नॅच्युरली डीटॉक्स करणारा सगळ्यात मोठा अवयव, पण ‘नॅच्युरल लिव्हर
डिटॉक्स’ हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. ज्यांना लिव्हर कशाशी खातात हे माहीत
नाही, किंवा ते तंदूर रोटीशी खातात एवढंच माहीत आहे, असली मंडळी ह्या पंथाला लागतात. लिव्हरला डिटॉक्स करण्याच्या बाता
मारणं म्हणजे सूर्या निरांजन, असा प्रकार आहे. ग्राम्य भाषेत सांगायचं तर बापाला ***ला
शिकवण्यासारखं आहे.
मग किडनी डिटॉक्स आहे, होल बॉडी डिटॉक्स आहे,
नॅच्युरल, हर्बल, होलिस्टिक वगैरे विपणन
विशेषणे चिकटवलेले तऱ्हेतऱ्हेचे डिटॉक्स आहेत. सोमवारी नवा ‘वीक किकस्टार्ट’
करायला खास मंडे डिटॉक्स आहे. याच बरोबर रातोरात पोट आत घालवणारी, टकलावर रान माजवणारी, वजन घटवणारी अशीही डिटॉक्स आहेत. ज्याची मुळात व्याख्या वा मोजमापच शक्य नाही अशी
‘ब्रेन हेल्थ’ सुधारणारी आहेत. मोजमाप
काही अगदीच अशक्य आहे असं नाही. कुठलेतरी मशीन हाताच्या तळव्याला लावून शरीरातील ‘मेटल्स’
मोजणारी यंत्रे आहेत, हातातल्या खुंट्याची
बटणे दाबताच ‘फॅट’ मोजणारी आहेत आणि
लिंगाला वायरी जोडून म्युझिकल दिव्यांची उघडझाप करत ‘सेक्स पॉवर’ मोजणारीही
आहेत. शेवटी
‘मागण्याला (की कल्पनेला) अंत नाही आणि देणारा मुरारी.’ हे सगळे प्रकार बेंबीत
थर्मामीटर खुपसून पचनशक्ती किंवा डोक्याला
स्थेथोस्कोप लावून बुद्ध्यांक मोजण्याइतके निर्बुद्ध आहेत.
या सलाईनमधून जी काय मल्टीव्हिटामिनस् वगैरे शरीरात घुसडली जातात ती काय तिथेच थांबत
नाहीत. तुम्ही कितीही पैसे मोजले असले तरी, शरीराला गरज नसेल तर ती दुसऱ्या दिवशी मूत्र
विसर्जनाबरोबर विसर्जित होतात;
तुम्ही सह्याद्रीच्या पश्चिमेला रहात असाल
तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि पूर्वेला राहात असाल तर बंगालच्या उपसागराला
जाऊन मिळतात. बरोब्बर घाट माथ्यावर रहातात त्यांचे
काय?, असले खट्याळ प्रश्न जरा बाजूला ठेऊन
पुढे वाचा. अशा प्रकारे मल्टीव्हिटामिनचे ज्यादाचे डोस घेतल्यामुळे उपाय होण्यापेक्षा
अपाय होण्याची शक्यताही आहे. कारण साऱ्याच व्हिटामिनांचा असा निचरा होत नाही. व्हिटामीन ए किंवा डी
सारखी काही शरीरात साठून रहातात आणि त्यांच्या चढत्या पातळीमुळे विकार होतात.
आणि हे सलाईनमधून घेण्याची आवश्यकता का? तोंडाला टाके घातले आहेत काय? केवळ मालदार मंडळींच्या खिशात हात घालून आपण
मालामाल होणे एवढाच उद्देश यामागे आहे. ही
श्रीमंतांची लूट असल्यामुळे त्यातल्या फसवणुकीबद्दल कोणाला काही फारसे वाईट वाटणार
नाही. कदाचित एका गबरू गिऱ्हाईकाकडून गरीब
बिचाऱ्या सेंटर चालकाला चार पैसे मिळाल्याचा आनंदच होईल. श्रीमंतांना लुटून गरिबांना वाटण्याची रॉबिनहूडगिरी
केल्याचं समाधान मिळेल.
यातली चापलूसी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे दावे कोणीही डॉक्टर करत नाही, ‘कंपनी’ करते
आहे. त्यामुळे शपथभंग वगैरे प्रकार तिथे
घडतच नाही. हे इस्पितळ नाही, हे तर धडधाकट-तळ. ह्यांना नर्सिंग होम कायदा लागू
नसावा. यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत पण
हे ‘उपचार’ नाहीत. तेंव्हा पुराव्यांको मारो गोली. निष्काळजीपणाचा आरोप नाही, कोर्टकचेरीचा
धोका नाही. कुणाला काही त्रास होण्याची शक्यता अगदी कमी. पैसा मात्र बक्कळ आहे.
अशा रीतीने सरस्वतीला टांग मारून
लक्ष्मीला कवेत घेण्याचा हा प्रकार आहे.
पण फक्त पैसा लुटला जातो असं थोडंच आहे?
विचारशक्ती, बुद्धी वापरण्याची कुवत, सारासार विवेक असं सगळंच लुटलं जातं. स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या
आरोग्याकडे बघण्याचा निरामय दृष्टीकोन हिरावून घेतला जातो. हा तर मोठाच तोटा आहे.
आरोग्य रातोरात दुप्पट करून देण्याचा हा उद्योग,
पैसे रातोरात दुप्पट करून देणाऱ्या उद्योगाइतकाच बनवेगीरीचा आहे.
प्रथम प्रसिद्धी
लोकसत्ता, लोकरंग पुरवणी
३०.०६.२०२४
No comments:
Post a Comment