लेखांक १२
उद्याची भ्रांत असलेला परवाचा विचार करत नाही.
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई
हवामानाचा आरोग्यमानावर प्रत्यक्ष
आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. ध्रुवीय, समशीतोष्ण वा उष्ण काटिबंधातील
प्रदेश असोत, माणसाला मानवेल अशा तापमानाचा एक छोटासा पट्टा आहे. नेमके जेवढे हवे
तेवढे असे हे ‘गोल्डीलॉक्स झोन’. ह्याच्या अल्याडपल्याड अन्न, पाणी, परिसंस्था अशा
साऱ्यावर ताण येतो आणि पुढे हे सारेच कोलमडून पडते. मानव बुद्धी आणि संसाधनांच्या बळावर सुरवातीला
ह्या पडझडीला तोंड देईलही पण ज्या जैव साखळीवर, जैव जाळ्यावर आपण तगून आहोत त्याला
हा ताण सोसणार नाही हे नक्की. यातून उद्भवणाऱ्या पूर, दुष्काळ वगैरेंमुळे अनेक
कुटुंबे विस्थापित होतात.
उदाहरणार्थ धरा-ज्वराच्या परिणामी ध्रुवीय बर्फ वितळेल, हे सारे पाणी जाईल कुठे? अर्थात
समुद्रात. याने पाणीपातळी वाढली की किनारपट्टीचे प्रदेश, बंदरं समुद्रमुखी पडतील.
किरीबाटी किंवा मालदीवसारखी सखल बेटं जलमय
होतील. हे देशच्या देश देशोधडीला लागतील. ही माणसं जातील कुठे? करतील काय? खातील काय? राहतील कुठे? ह्या
निर्वासितांना कुपोषण, साथीचे रोग, व्यसने, गुन्हेगारी, मानसिक आजार असे
दैन्य-मित्र गाठणारच. ज्या देशांत ती जातील तिथेही समुद्र पातळी वाढल्याने किनाऱ्यावरून वरती, ‘देशाकडे’, सरकलेली प्रजा
असेलच. त्यात ही भर. घरचंच थोडं
झालेलं असताना हे जावयानं धाडलेलं घोडं कोण आणि कसं सांभाळणार?
कितीही काळजी घेतली, कितीही काटेरी कुंपणे घातली, कितीही चौक्या पहारे
बसवले तरी आभाळ फाटल्यावर ठिगळ कसं लावणार? आजही हवामानाची एखादी लहर सुसज्य
व्यवस्थेचाही फज्जा उडवू शकते. ऑगस्ट २००३ सालची युरोपातली उष्णतेची लाट आठवा.
त्या दिवसांत तिथे मृतांची संख्या नेहमीपेक्षा ५०,०००ने वाढली. मुळातच जनांचे सरासरी वय वाढलेले,
त्यामुळे घरोघरी वृद्ध, बहुतेक घरी एकेकटे वृद्ध, ज्या घरी आधार देणारी पिढी होती
त्यातील अनेकजण लांब ट्रीपला गेलेले,
बहुतेक डॉक्टरही सुट्टीवर; अशात ही लाट आली आणि अनेकांचा काळ ठरली. अगदी प्रगत आणि
पुढारलेल्या फ्रान्समध्येही लक्षणीय मृत्यू घडले. कारण गरमी वाढली की घुसमट वाढते. सिमेंट, कॉंक्रीट आणि डांबराच्या जगात
उष्मा अडकून रहातो. ही तप्त भू रात्रीही निवणे अवघड होते. साऱ्या शहराचीच काहील
होते. शरीराचे तापमान ३७० राखायला घाम येणे आणि तो उडून जाणे आवश्यक
असते. गरम आणि पर्यायाने दमट जगात हे अवघड. याने हृदयावर प्रचंड ताण येतो. अशा वातावरणात दमे-खोकले, हृदयविकार, रक्तदाब, अर्धांगवायूची जणू साथ येते.
बेघर, वयस्क, गलितगात्र, रोगजर्जर अशी माणसं एरवीही जवळजवळ पैलतीराशी पोहोचलेलीच
असतात. ती आधी पैलतीर गाठतात. सुविद्य, समृद्ध, सुव्यवस्थित युरोपातील ही स्थिती
तर गरीब देशात काय हाहाकार उडेल, विचार करा.
या साऱ्या प्रश्नातील नैतिक दुविधा इथेच आहे.
तिसऱ्या जगाचे शोषण करून पहिले जग गबर झाले आहे आणि आता त्यांच्या गाड्यांच्या,
कारखान्यांच्या धुरामुळे येणाऱ्या
अरिष्टांचा सगळ्यात जबरदस्त फटका
पुन्हा तिसऱ्या जगानेच सहन करायचा आहे.
हाहाकार उडाला तरी ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’ अशीही
शक्यता आहे. शहरे, महानगरे आणि पुढारलेल्या देशातील बऱ्याच व्यवस्था वीज, इंटरनेट,
उपग्रह वगैरेंशिवाय चालूच शकणार नाहीत. निसर्ग तांडवात यांची वाताहत होताच हे समाज
त्याचे सहज बळी ठरतील. त्या मानानी मुळातच अभावात आणि आसपासच्या परिसराबरहुकूम
जगणारी, भटकी, जंगलवासी माणसं
लव्हाळ्यासारखी तगून जातील.
माणसाचा तल्लख मेंदू या साऱ्यावर उपाय शोधेल अशी
आशा आहे. मात्र काही गृहीतके त्यागावी लागतील. आर्थिक समृद्धीचे विद्यमान प्रतिमान
अचल नाही हे स्वीकारावे लागेल. आजची सामाजिक आणि सांस्कृतिक रचनाही निर्दोष नाही
हे स्वीकारावे लागेल. धरा ज्वर हा भावी धोका नसून आजच आपण त्यात होरपळत आहोत हे
जनांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या जगण्यातील
उदाहरणासह समजावावे लागेल. जागतिक ध्येये, उद्दिष्टे, आकडेवारी, आलेख आणि
तक्त्यांशी सामान्यांना देणेघेणं नसतं. त्यांना पोरांची, पिकाची, शुद्ध पाण्याची
काळजी असते. उद्याची भ्रांत असलेला माणूस परवाचा विचार
करत नाही.
हे सारं लक्षात घेऊन उपाय योजावे लागतील. कोणते
आणि कसे ते पुढील आणि अखेरच्या लेखांकात पाहू.
प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
हवामान अवधान
२१.०६.२०२४
No comments:
Post a Comment