लेखांक ११ वा
म्हणे अँथ्रोपोसीन!
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
सद्य युगाला अँथ्रोपोसीन, म्हणजे मानव युग म्हणावे, असं म्हणतात. कारण सृष्टीत आजवर कोणत्याही एक प्राण्याला शक्य झाली नाही अशी लुडबूड माणसाने केली आहे.
आता पृथ्वीचा पारा चढेल तसं हवामानही अधिकाधिक लहरी होईल. हे हेलकावे तीव्र होतील. ‘ये गं ये गं सरी’ म्हणताच कधी घरदार, शेतीवाडीसकट मडकंही वाहून जाईल तर कधी मडकं कोरडं ठाक राहील. पूर्वी तर हवा आणि तिच्या माना पुढे मान तुकवणे एवढेच शक्य होते. सर्व संस्कृतींत उन्हा-पावसा-वाऱ्याच्या, आबादाणीच्या देवता आहेत. साऱ्यांनी त्यांना भजलं-पूजलं आहे.
दुष्काळाइतकंच कीटकजन्य आजारांचंही उकाड्याशी थेट नातं आहे. हवेच्या मानाप्रमाणे सहजी वरखाली होणारे आजार म्हणजे कीटकजन्य आजार. मलेरिया, डेंग्यू, वेस्ट नाईल ताप, झिका, लाईम वगैरे. डासांमार्फत पसरणारे मलेरिया, डेंग्यू इत्यादी हे आपल्याला परिचित. डासांचे प्रजोत्पादन सांडपाण्याशी आणि तापमानाशी निगडीत असते. थंडीने डास गारद होतात. म्हणूनच उत्तरेकडे सरकताच हे आजार उत्तरोत्तर कमी होत जातात. आर्क्टिक प्रदेशात मलेरिया नाहीच, कारण डासही नाहीत. (पण धरा ज्वराचा प्रताप असा की नुकताच तिथेही पक्ष्यांत मलेरिया आढळला!)
तेंव्हा उष्म्याचं राज्य वाढलं की डासांनी आणि त्यासोबतच्या आजारांनी थैमान घातलंच म्हणून समजा. फिलाडेल्फियातील पिवळ्या तापाची कहाणी आपण पूर्वी एका लेखांकात वाचलीच आहे. आत्ताचा गेला मार्च हा जागतिक सरासरी पहाता सर्वाधिक उष्म्याचा होता. त्यामुळे डासांचे राज्यही वाढलं. ते दक्षिणोत्तर तर वाढलंच पण उंचही वाढलं. म्हणजे महाबळेश्वरलाच उकडायला लागलं तर तिथेही डासोपंत मुक्कामी येणारच. कोलंबिया आणि इथिओपियातील अभ्यासही हेच सांगतात. म्हणजे आता या ऊंचीवरची, जगभरची, इतकी सारी अधिकची प्रजा डासोपंतांच्या डंखाने दुखावली जाऊ शकते, जाते.
उन्हाळ्यात डास जगतातही जास्त आणि त्यांचं प्रजोत्पादनही वेगानी होतं. ‘चांद मातला मातला’ ऐवजी ते ‘सूर्य मातला मातला, अंगी वणवा चेतला’ असं गुणगुणत असतात. अशावेळी त्यांना सस्तन प्राण्यांच्या रक्ताची वखवख सुटते. आपल्या नाकांच्या चिमण्यातून कार्बन डाय ऑक्साइडचा धूर येतच असतो. ह्याचा गंधवेध घेत घेत डास आपल्याला गाठतात. उन्हाळ्यात कामाग्नीने पेटलेले डास अधिक त्वेषानी चावतात. त्यांच्या पोटातले जंतूंही उन्हाळ्यात झटपट वाढतात. एखाद्या डिग्रीने जारी तापमान वाढलं तरी डासाच्या पोटातील प्लाझमोडियम (मलेरियाचे जंतू) निम्या वेळातच वयात येतात. डासांचे (आणि कीटकांचे) वाढते क्षेत्र, डास आणि अन्य कीटकजन्य आजारांचे वाढते रुग्ण आणि दर काही वर्षांनी निष्प्रभ ठरणारी मलेरियारोधक औषधे ही जगाची डोकेदुखी आहे. एक साला मच्छर आदमी को हिजडा बना देता है, हेच खरं.
पण ते निव्वळ मलेरियामुळे नाही. साथीला डेंग्यू आहे. लोकंही वाढली आहेत, त्यांचा संचारही वाढला आहे आणि उष्माही वाढला आहे तेंव्हा १९६०शी तुलना करता डेंग्यूच्या केसेस ३० पट वाढल्या आहेत. डेंग्यू-चिकनगुन्यावाल्या एडिस डासांमार्फत झीकाही पसरतो. झीका हा देखील एक खतरनाक व्हायरस आहे. दक्षिण अमेरिकेत २०१६ साली आणि तेंव्हापासून तिथेच याच्या साथी येतात. आपल्याकडे एडिस डास आहेत पण झीका नाही. पण उद्भवू शकतो, अगदी कधीही.
डासांसारख्या माशाही उपद्रवी. ‘अयि नरांग मल शोणित भक्षिके, जनुविनाशक जंतुसुरक्षिके!’ असं मुळी केशवकुमारांनी वर्णनच करून ठेवलं आहे. अन्न पाणी दूषित करण्यात त्यांचा वाटा मोठा. उन्हाळ्यात यांचेही प्रजाप्राबल्य वाढते. जसे तापमान वाढेल तसा यांचाही फैलाव वाढेल. तऱ्हेतऱ्हेचे जुलाब पसरतील.
हरणे, वालाबी, कांगारू वगैरेंच्या अंगावर काही गोचिडी वाढतात. यांच्यामार्फत काही आजार माणसांत होतात. उष्म्याने हरणे, वालाबी, कांगारू यांनाही नवी नवी कुरणे मिळतील. साहजिकच गोचीडीनी पसरणारे आजारही नव्या प्रदेशात दिसू लागतील.
काही आजार कमीही होतील. रोटा व्हायरस, नोरो व्हायरसने होणारे जुलाब, थंडीत उद्भवणारा फ्ल्यू ही काही उदाहरणे.
तापमानवाढीने कदाचित नवे कोणतेही आजार येणार नाहीत पण उष्मा वाढला की कीटकांचा फैलाव वाढतो आणि अधिकाधिक लोकसंख्या त्यांच्या चाव्याच्या टप्यात येते.
साथीच्या फैलावाची जशी माणसाला भीती आहे तशी ती अन्य संजीवांनाही आहे. गाई, म्हशी, कोंबड्या ह्यांच्यात जर साथी आल्या तर आपण अन्नाला मोताद होऊ.
हे अँथ्रोपोसीन, म्हणजे मानव युग आहे असं आपणच जर ठरवलं आहे तर त्यातील भल्याबुऱ्याची जिम्मेदारी ‘अँथ्रोपो’ची म्हणजे आपलीच नव्हे काय?
प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
हवामान अवधान
१४.०६.२०२४
No comments:
Post a Comment