Monday, 1 May 2017

एन.एस.व्ही.कीर्तन

एन.एस.व्ही. कीर्तन
डॉ. शंतनू अभ्यंकर

एन.एस.व्ही. म्हणजे नॉन स्काल्पेल व्हॅसेक्टॉमी, पुरुषांची बिनटाका शस्त्रक्रिया. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेशी तुलना करता ही कितीतरी चांगली आहे. पण अजिबातच लोकप्रिय नाही. उलट जरा बदनामच आहे.
कीर्तन हे लोकशिक्षणाचं पूर्वापार माध्यम. एनएसव्हीची माहिती देणारं आणि महती गाणारं हे कीर्तन; मी केलं, मजा आली, मलाही आणि श्रोत्यांनाही. तुम्हीही करून पहा.  
यातील काळ्या टायपातील भाग हा गद्य आहे, लाल टायपातील गायचा आहे आणि हिरव्या टायपातील भाग हा पद्यमय गद्यात, थोडा ताला सुरात म्हणायचा आहे. काही अभंग, आर्या, गाणी यांच्यातल्या शब्दांची मोडतोड करून ते इथे वापरले आहेत; कीर्तनाचा ‘कीर्तन’पणा शाबूत रहावा म्हणून. तेवढा गुन्हा पोटात घालावा ही नम्र विनंती.

(पेटी, तबला, टाळ, चिपळ्या असा मेळ जमला आहे. पेटी तबल्याच्या एखाद्या झोकदार सुरावटीनंतर भजन सुरु होते. सर्व श्रोत्यांना भजनात सहभागी करून घेतले जाते.)

राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
बोला पुंडलिक वरदा, हाsssरी विठ्ठल
श्री ज्ञानदेsssव तुकाsssराम, पंढरीनाथ महाराज की जय

नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
(ह्या चरणात योग्य तो बदल करून बुवा आपलं नाव उघड करतात)
तेंव्हा मंडळी हे असं आहे, आम्हाला ना गाता येतं ना अभिनय करता येतो, पण...
‘परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू’
अहो कीर्तन करणं म्हणजे महाकर्मकठीण काम. एक वेळ चित्र काढणं सोपं, रंगाचे चारदोन फटकारे इकडून तिकडे ओढले की काम झालं, एक वेळ नृत्य करणं सोप, तबल्याच्या ठेक्यावर जरा हात, पाय,  मान, कंबर हलवली की काम झालं.
नाटक करणंही सोप आहे बरं, अहो दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्य घडाघडा पाठ म्हणून दाखवली की काम झालं.
आणि चित्रपट काढणं तर सर्वात सोपं...
तिथे कपडे सांभाळायला वेगळा माणूस आहे, तोंड रंगवायला वेगळा माणूस आहे, गाणारा भलताच आहे, फोटो काढणारा आणखी वेगळा आहे, तुमच्याऐवजी साहसे साकारणारा वेगळा आहे, दिग्दर्शक आहे, कला दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक आहे, नृत्य दिग्दर्शक आहे, इतकच काय मारामारीसाठीही वेगळा दिग्दर्शक आहे.
पण किर्तनाच तसं नाही. अहो कीर्तन करायचं म्हणजे
वाणी शुद्ध हवी, विचार उत्तम हवेत, शब्दोच्चार स्पष्ट हवेत, भाषा ओघवती हवी आणि वक्तृत्व अमोघ हवं, अवांतर वाचन हवं आणि पाठांतर दांडगं हवं. तुम्हाला गाता यायला हवं, तुम्हाला बजावता यायला हवं (चिपळ्या वाजवून दाखवतो) थोड नृत्यही आलं तरी चालेल.(बुवा नाचुनही दाखवतात)
नामदेवानी म्हटलेलंच आहे,
‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
सर्व सांडुनी माघारी, वाटे विठ्ठल रखुमाई,  
परेहून परते घर, तेथे राहू निरंतर’
पण आम्ही तर सुरवातीलाच सांगून टाकलंय...
नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
मग आता तुम्ही असं विचाराल मंडळी, की हे भलतं धाडस आम्ही केलंच कसं? याचं कारण आजच्या आख्यानाचा विषय. अहो मोरोपंतांनी म्हटलेलं आहे....
‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.’
पण आम्ही म्हणतो,
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तुम्ही म्हणाल, ही एनएसव्ही काय भानगड आहे? आणि ‘विषय सर्वथा नावडो’चा आम्ही ‘आवडो’ कसा काय केला? कोणत्या अधिकारात केला? मायबाप हो, एवढा अपराध पोटात घालावा. हे आम्ही का केलं ते सविस्तरपणे उत्तररंगात सांगणारच आहे पण उत्तररंगात चंचूप्रवेश करण्यापूर्वी, विषयप्रवेश करण्यापूर्वी, पूर्वरंगाची अखेर नामस्मरणाने व्हायला हवी, अहो परंपराच आहे तशी.
तेंव्हा म्हणा...
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम   
बोला पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
(बुवा हार घालून घेतात, बुक्का लावला जातो, तबक फिरवलं जातं)
खरंतर उत्तररंगात परंपरा मोडण्याबद्दल मी बरंच काही सांगणार आहे. तेंव्हा नामस्मरणापेक्षा थोड्या वेगळ्याच ढंगात उत्तररंगाचे सुरवात करुया... म्हणा...
(बुवा राम राम सीताराम सुरु करतात आणि मधूनच पुढील ओळी गातात)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(पुन्हा राम राम सीताराम... अगदी पुंडलिक वरदा पर्यंत होतं आणि पुन्हा)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
ट्युबेक्टॉमी म्हणजे बायकांचे नसबंदीचे ऑपरेशन. जसं मघाशी मी  सांगितलं की एनएसव्ही हे पुरुषांचे तसे हे बायकांचे. तर माझं म्हणण असं की....
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको

(... आणि आता पुंडलिक वरदाच्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsssरे मित्रांनो
साधे-सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.
आलं का लक्षात मित्रांनो, आज आख्यान लावलंय ते पुरुष नसबंदीचं...आणि या आख्यानासाठी कथा निवडली आहे भारतमातेची.
फारफार वर्षापासून, नव्हे शतकानुशतकापासून भारतमाता नामेकरून एक मोठी देवता या भूतलावर वास करून आहे. कशी आहे ही?
(वंदे मातरम् गाऊन त्यातील वर्णन विषद करून सांगतात.)
मोठी जगन्मान्य देवता आहे ही. अहो हजारो वर्षाच्या हिच्या इतिहासात हजारो दैत्यांनी हिच्यावर घाला घातला पण ही बधली नाही. उलट यातल्या बऱ्याचश्या हल्लेखोरांना हिनी आपलसं केलं. इक्बालनी म्हणूनच ठेवलंय,
कुछ बात है के हस्ती, मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-जमाँ हमारा
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा
तर अशी ही भारतमाता, हिच्यावर एकदा लोकसंख्यासूर नावाच्या राक्षसानी जोरदार हल्ला केला. आधी व्हायचं काय की भरपूर संतती जन्मायची आणि त्यातली  भरपूर मरायची.  पण पुढे पुढे अन्न पाणी सुधारलं, साथी कमी झाल्या, आणि माणसं चांगली म्हातारी होईपर्यंत जगू लागली. पण इथेच अडचण आली. या लोकसंख्यासुराची भूक भयंकर, इतक्या सगळ्या प्रजेच्या पोटाला काय घालायचं हा प्रश्न पडला, इतक्या सगळ्यांनी खायचं काय, ल्यायचं काय, इतक्या सगळ्या हातांना काम काय, इतक्या सगळ्या डोक्यांना शिक्षण कस द्यायचं, एक ना अनेक प्रश्न... हा लोकसंख्यासूर आता भारतमातेचेच लचके तोडायला लागला... कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते हे असं.
भारतमातेच्या पोटी, लेकरे कोटी कोटी.... अशी अवस्था झाली आणि
समर्थांनी म्हटलेलंच आहे,
लेकुरे उदंड झाली, ते तो लक्ष्मी निघोनी गेली;
बापुडी भिकेस लागली, काही खाया मिळेना.
लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी,
ऐसी घरभरी झाली दाटी, कन्यापुत्रांची.
पण भारतमाता हरली नाही, ती डरली नाही, ती लढायला सिद्ध झाली. रघुनाथ धोंडो कर्वे, म्हणजे आपल्या भारतरत्न धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव बरं, हे तिचं लेकरू, तिच्या मदतीला धावलं. इतरही अनेक होते. (काही नावे घालायला हवीत) मग भारतमातेची लेकरं, लोकसंख्या नियंत्रणाच्या मागे लागली. पण तिथेही तऱ्हेतऱ्हेच्या लोकांचे तऱ्हेतऱ्हेचे सल्ले...
संत म्हणाले संयम पाळा,
महंत म्हणाले मोजके दिवस टाळा
सज्जन म्हणाले बाहेरच गाळा,
धर्ममार्तंड म्हणाले, चूप, अहो बोलता काय, तुमच्या जिभेला काही हाड?
जाउ दे, हा विषयच टाळा
सामान्यजन सगळ्यात हुशार, ते म्हणाले,
तुमचं ठरलं की सांगा तोवर, आमचा चालूदे कामुक चाळा
मग डॉक्टर आले, संशोधक आले, समाजसेवक आले, मायबाप सरकारही मदतीला धावले...
कुणी म्हणाले निरोध वापरा, कुणी म्हणाले तांबी बसवा, कुणी म्हणाले गोळ्या खा किंवा इंजेक्शने घ्या, आणि कुणी म्हणाले
आधी प्रपंच करावा नेटका,
व्हावी इप्सित संतती बरंका
पण मग साधता आकडा नेमका
मार्ग आप्रेशनचा धरावा
 पण हे करायचं कुणी??
यातला निरोध वापरायचा... बाप्यांनी
पण...
तांबी??? बायांनी वापरायची
गोळ्या??? बायांनी खायच्या
इंजेक्शने??? बायांना टोचायची...
आणि आप्रेशने???... तीही बायांचीच करायची.
का म्हणून?  सांगा ना, का म्हणून??? अहो निसर्गानी मूल होऊ द्यायची जबाबदारी स्त्रियांवर टाकलेलीच आहे, त्यात आपण काही बदल करू शकत नाही मग मूल न होण्याची तरी जबाबदारी पुरुषांनी घ्यायला नको का?
विश्व रागे झाले वन्ही, पुरुष सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पुरुषी मानावा उपदेश
या पुरुषप्रधान संस्कृतीनी बायकांवर फार फार अत्याचार केले आहेत, काही कळत, काही नकळत, बायकांसाठी हे विश्व जणू वणवा झालं आहे...
विश्व रागे झाले वन्ही,
मग अशा वेळी पतींनी काय केल पाहिजे?
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
या वणव्यात पतीनी पाणी व्हायचं आहे. मूलं न होऊ द्यायची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आहे. लोक म्हणतील, आलाय मोठा बायकोवर प्रेम करणारा! पाडगावकरांना भेटला होता असा एक माणूस, म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही,
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही
आमचं काही आडलं का? प्रेमाशिवाय नडलं का?”
तेंव्हा पाडगावकर त्याला एवढंच म्हणाले,      
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं!
तेंव्हा कुणीही काहीही म्हणू द्या, जर तुमचं तुमच्या बायकोवर खर्रखुर्र प्रेम असेल तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, उलटून बोलू नका, उलट लोकांचे हे शब्द, हे शस्त्र झालेले शब्द, हे बोल ही संधी माना, त्यातून बोध घ्या,
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पती मानावा उपदेश
...आणि हे निव्वळ भावनिक आवाहन नाही बरं... मी म्हणतो त्याला वैद्यकनीतीचा, वैद्यकरीतीचा, वैद्यकशास्त्राचा आणि वैद्यकविवेकाचा भरभक्कम आधार आहे.
पुरुषांचं हे ऑपरेशन सोपं आहे... बायकांचं ऑपरेशन, महाकर्मकठीण... बायकांचं एकूणच सगळं अवघडच असतं म्हणा... पुरुषांच्या या ऑप्रेशनमध्ये आता बिनटाक्याची पद्धत आली आहे. नॉनस्काल्पेल व्हॅसेक्टॉमी म्हणजेच एन.एस.व्ही. म्हणतात त्याला.
म्हणूनच तर मी म्हणालो,

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

 एन.एस.व्ही वरच्यावर करता येतं, ‘ये बाहर की बात है...’ बायकांच्या ऑपरेशनसाठी पोट उघडावं लागतं, ‘ये अंदरकी बात है...’ यामुळे पोटात इन्फेक्शन; आतडी, मूत्राशय वगैरेला इजा असे धोके टळतात. स्त्री नसबंदीच्या प्रत्येक केसमध्ये  ती स्त्री, हे दोन्ही धोके पत्करत असते. बायकांचं अगदी बिनटाक्याचं ऑपरेशनही, पुरुष नसबंदीपेक्षा कितीतरीपट गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे. पण लक्षात कोण घेतो? संसाराच्या रामरगाड्यात वैतागलेल्या बायकोचा विचार कोण करतो? तेंव्हा माझं सांगणं एवढंच आहे की...

अनुदिन अनुतापे तापल्या बायका ह्या
परमदिनदयाळा निरसी मोह माया  
अचपळ मन तूझे नावरे आवरीता
एन.एस.व्ही.त शीण नाही धाव रे धाव आता
एन.एस.व्हीत शीण नाही, एन.एस.व्ही बाबतच्या शंकाकुशंकांनी अचपळ झालेलं तुझं मन आवर आणि एन.एस.व्ही सेंटरकडे धाव. बायकोला ऑपरेशन करून घ्यायला, ट्युबेक्टॉमी करून घ्यायला भाग पाडू नकोस, ती करते म्हणाली तर तू नको म्हण...

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

तर अशी ही बहुगुणी एन.एस.व्ही....  लिंगाच्या थोडं खाली अर्ध्या सेंटीमीटर छेदातून करता येते. अहो हा छेद घ्यायला पातं, म्हणजे ब्लेडसुद्धा लागत नाही. इतका छोटा छेद की हा बंद करायला टाका घ्यायला लागत नाही. थेंबभरसुद्धा रक्त वहात नाही आणि कोणतीही खूण रहात नाही.
बुंद ना गिरा एक लहू का, कछु ना रही निसानी
नाsss लागी, ‘नस’पे कटार
सगळी भूल द्यायची गरज नसते... जागेवर भूल देऊन काम भागतं, हे फारच महत्वाचं आहे. भूलीत नाही म्हटलं तरी धोके फार.
शिवाय हे झटपट किती...तपासणीपासून ते ऑपरेशनपर्यंत सारा मामला, दोन एक तासाची बात. पण तरीही हे कोणी करून घ्यायला पुढे येत नाही. पेशंट विचारत नाहीत, डॉक्टर बोलत नाहीत... अहो एखादा नरशार्दुल, एखादा नरपुंगव, एखादा नरसिंह, एखादा नरोत्तम झालाच तयार तर त्याची  बायको, त्याची  स्त्री, सखी, सचिव, भार्या, सौभाग्यवती, ती सती-सावित्री, पतिव्रता, म्हणते, ‘नको बाई माझंच करा, आमच्या ह्यांना फार काम असतं.’
कारण काय तर...
ह्यांनी म्हणे अशक्तपणा येतो...
कष्ट करता येत नाहीत...
सेक्स पॉवर कमी होते...
या ऑपरेशनमुळे पौरुषाला बाधा येते, तो कष्ट करू शकत नाही, तो माणूस एकदम कंडम बनतो, कंडोम नाही हं, कं ड म. दोन्हीत फरक आहे.... असे अनेक गैरसमज आहेत.
पण असं ज्या लोकांना वाटतं, त्याबद्दल निव्वळ त्यांना मूर्ख म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांच्या या गैरसमजामागे त्यांचाही काही युक्तिवाद असतो. तो समजावून घेणं आणि दुरुस्त करणं महत्वाचं आहे. पारंपारिकरीत्या आपल्याकडे पुरुषत्वाचा संबंध शक्तीशी आणि स्त्रीत्वाचा सहनशक्तीशी जोडला आहे.

शारीरिक कष्ट करणं, मूल होणं आणि संभोगसूख देता-घेता येणं या वास्तविक तीन स्वतंत्र क्रिया आहेत आणि एकमेकांशी फारशा संबंधित नाहीत!!!!
शारीरिक कष्टासाठी शरीर सुदृढ हवं पण पुरुष बीजाची किंवा लिंगाला ताठरता येण्याची अजिबातच आवश्यकता नाही.
 मुलं होण्यासाठी पुरुष बीज तयार होणं आणि शरीरसंबंध जमणं हे आवश्यक आहे, पण यासाठी तुम्ही बॉडी-बिल्डर असायची गरज नाही. अहो इथेच पहा ना, इथले बरेचसे पुरुष बॉडी-बिल्डर नाहीत आणि बऱ्याचशा पुरुषांना मुलंही आहेत. उलट अगदी धडधाकट असलेल्या, सैन्यात अधिकारीपदी असलेल्या, बॉडीबिल्डींग किंवा इतर खेळात चॅम्पियन असलेल्या व्यक्तींनाही मूल होण्यात अडचण असू शकते. पुरुष बीज निर्माण करणारी यंत्रणा आणि शारीरिक शक्ती यांचा थेट संबंध नसतो.
आणि कामसुखासाठी? लिंगाला ताठरता येण्यासाठी? पुरूषबीज तयार होण्याची गरज नाही. शरीरसंपदाही यथा तथा असली तरी चालते. उलट कामसौख्यासाठी, दांपत्यसुखासाठी मन सदासतेज असावं लागतं. कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवणारे गडी, पलंगावर सखीला चांदसितारे दाखवतीलंच असं नाही. कारण पलंग म्हणजे आखाडा नाही. कामसौख्य हे शारीरिक शक्तीचं प्रदर्शन नाही.
म्हणूनच नसबंदी केल्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती, कामेच्छा, कामशक्ती  संपतबिंपत नाही. संभोगसूखवीर्यपतन वगैरे जैसे थे रहातं. वीर्य हे पुरूषबीज आणि इतर अनेक स्त्रावांचं मिश्रण असतं. ऑपरेशननंतर त्यात पुरूषबीज मिसळत नाही एवढंच.  वीर्यातले बाकी घटक तयार होतच असतात. लैगिक भावना, लिंगाला होणाऱ्या संवेदना वगैरे कशावरच या ऑपरेशनचा दुष्परिणाम होत नाही.
म्हणून म्हणतो...
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
ना लागी ‘नस’पे कटार
उलट नको असलेल्या गर्भारपणाची भीती दूर झाल्यामुळे आता सुखेनैव संभोगसुखाचा अनुभव घेता आणि देता येतो.
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
नाsss लागी ‘नस’पे कटार
मोरोपंतांच्या काव्यात ढवळाढवळ करण्याची धिटाई मी का केली ते आता तुमच्या लक्षात आलं असेल.
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तेंव्हा म्हणा...
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

पुनरुत्पादनाच्या प्रत्येक पायरीचा आपल्या समाजानी उत्सव केला आहे. पाळी आली की नहाण विधी आहे, लग्न ठरलं की साखरपुडा आहे. लग्न म्हणजे तर दोन्ही घरचा अगदी प्रतिष्ठेचा प्रश्न, ती चमक-दमक, तो माहोल, व्वा, भाई वा! पुढे पहिल्या रात्रीसाठी खास चिडवाचीडवी आहे, धार्मिक विधीही आहे. दिवस राहिल्यावर डोहाळे जेवण आहे, बागेतलं आहे, झोपाळ्यावरचं आहे, अगदी चंद्रावरचं सुद्धा आहे. मूल झाल्यावर पेढे-बर्फीचं उत्साही वाटप आहे आणि ध्वनीक्षेपकांची भिंत उभारून गाव दणाणून टाकणारं बारसं सुद्धा आहे. पण पुनरुत्पादनाची  क्षमता संपवणं, म्हणजे नसबंदी करून घेण्याचा काही उत्सव अजून निघाला नाहीये. तेंव्हा ज्यादिवशी, ‘नुकतच आमच्या मोठ्या दिरांचं एनएसव्हीच ऑपरेशन झालं; उद्या पूजेला या बरंका अशी नसबंदी नारायणाची निमंत्रण येतील तो सुदिन.’
बोला...
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.



Thursday, 2 March 2017

पार्थ

पार्थ

पार्थ ही एक खास जमात आहे. राहणार, शक्यतो पुणे किंवा महाराष्ट्रातील कोणतेही शहर. कोणतेही नको, पुणेच धरूया. उमर वर्षे दहा ते बारा. पार्थपिता इंजिनियर असतो आणि पार्थमाता प्रोफेशनल. पार्थचे पप्पा सडपातळ असतात. फक्त पोट सोडून. ते कमी करायचे त्यांचे निकराचे प्रयत्न सतत चालू असतात पण सद्ध्या ऑफिसात स्ट्रेस खूप असल्यानी चार दिवस हे प्रयत्न खुंटीला, म्हणजे हँगरला टांगलेले असतात. पार्थची मम्मी मात्र जिगर टिकवून असते. त्या ऋजुता दिवेकरबाईंचं पुस्तक तिनी वाचलेलं असतं, आणि भिशीमधल्या अघोषित डायेट कॉम्पिटीशनमधली ती अघोषित विनर असते. हिचा बांधा सडपातळ असून बुद्धीमत्तेत ही पप्पाच्या चांगली ब्रेसलेटभर सरस असते.
 पार्थ, हे एकुलते एक असतात. त्यामुळे पार्थची आई, मुलीची तहान पार्थवर भागवत असते. त्याला तो कळत्या वयाचा होईपर्यंत फ्रॉकच घाल, वेण्या आणि रिबिनी बांध, त्याला पार्थुली आली, पार्थुली गेली असं स्त्रीलिंगी नाम आणि  क्रियापद वापर, फॅन्सीड्रेसमधे त्याची झाशीची राणीच बनव; हे असले प्रताप या आया करत रहातात. पार्थांना एकुलती एक कझीन ब्रो अँण्ड/ऑर सीस् असतात.  ह्यांचीही नावं शर्व, तक्षिल, चित्रांगद, किंवा गार्गी, दाक्षायणी, लीलावती अशी थेट पुराणकालीन असतात. नावं प्राचीन, पण हे  वगळता बाकी सगळं सगळं अर्वाचीन असतं या साऱ्यांचं.
सगळे पार्थ बर्म्युडा आणि टी शर्ट घालतात. हाफ शर्ट घालत नाहीत. फुल शर्ट घालतात. सगळी बटणं असलेलाच, इस्त्रीचाच आणि नेमक्या मापाचाच. लांडा किंवा ढगळ कपडा पार्थकडे नाहीच. विटकाचिटका तर नाहीच नाही. हां, पण आता फॅशनच मुळी लांड्यालुटक्या आणि विटक्या चीटक्या कपड्यांची आली, तर पार्थचा नाईलाज असतो. मग तसे कपडे आपोआपच येतात. कारण पार्थचा वॉर्डरोब हा वेळोवेळी अपडेट होत असतो. पार्थचे कपडे हे ब्रँण्डेड असतात. त्यासाठी आईबापानी अव्वाच्या सव्वा किंमत मोजलेली असते. पप्पाची खरेदी जिथून होणार तिथूनच पार्थची, हे अगदी ठरलेलंच आहे. त्याचा पार्थच्या पप्पाला आणि मम्मीला सार्थ अभिमान आहे.
सगळे पार्थ चष्मे घालतात. काहींचे मोठ्या नंबरचे असतात काहींचे बारीक नंबरचे. मोठया नंबरचा चष्मा पार्थला विशेष शोभून दिसतो. पण हे अंडरस्टेटमेंट झालं. खरंतर पार्थामुळे मोठया नंबरच्या चष्म्याला शोभा येते, असं म्हटलं पाहिजे. पण बिनचष्म्याचा पार्थ ही कन्सेप्टच चुकीची आहे. एखादा असलाच बिनचष्म्याचा तर तो मनातून आपण स्कॉलर नसल्याबद्दल खंतावलेला असतो. आपण आपल्या अद्वितीय  डीएनएद्वारे, आपल्या मुलात साधा चष्मा लागण्याइतकीही बुद्धीमत्ता संक्रमित करू शकलो नाही, याचं त्याच्या मम्मी पप्पालाही भयंकर वैषम्य वाटतं. सगळी अतिबुद्धीमान, शहाणी, कसली कसली पटू वगैरे मुलं आपल्याला व्हायची सोडून, पटापट इतरांनाच कशी होतात हे त्यांना न सुटलेलं कोडं आहे.
सर्व पार्थांचे वय सुमारे दहा ते बारा वर्ष असते. या वयाहून ते मोठे होतच नाहीत. म्हणजे त्यांचे आईबाबा अशी खास काळजी घेतात की ते याहून मोठे होऊच नयेत. सगळ्या पार्थांना त्यांचे त्यांचे  मम्मी पप्पा ‘पिल्लू’ म्हणतात. हे पिल्लू मोठं व्हायला लागलं की ह्यांना अत्यंत अस्वस्थ वाटायला लागतं. मग ते त्याला सारखं जवळ घेतात, ओढून ओढून मांडीवर बसवतात, त्याच्या पप्या घेतात, त्याच्याशी बोबडं बोलतात, त्याच्या ‘टायगर’नावाच्या महाकाय अल्सेशिअनला भूभू किंवा डॉगी म्हणतात आणि एकूणच त्याला लहान ठेवायचे प्रयत्न निकरानी जारी ठेवतात.
उठल्या उठल्या  मम्मी विचारते, ‘ब्लश झाला का पिलूचा?’
कपाळावर आठी चढवत पार्थ उत्तरतो, ‘ब्लश काय म्हणतेस, ब्रश म्हण की!’
दाढी घोटता घोटता पप्पा पचकतो, ‘उद्या तो कॉलेजला निघाला तरी विचारशील, ‘ओ, गं माझ्यं पिल्लू, आज् दॉडी नै केली?’’
असे वाद संवाद झडत रहातात.
यातलाच ‘मी त्याला शिस्त लावतोय तर तू त्याला पक्का लाडोबा बनवत्येस’ विरुद्ध ‘मी.त्या.शि. लावत्येय त.तू.त्या.प.ला. बनवतोयस’; असाही एक धगधगता वाद आहे. अर्थात वादात कशाला पडा? पप्पा मम्मी दोघंही समजूतदार आहेत. त्यामुळे  मम्मी पप्पा एकमेकांच्या अपरोक्ष पार्थावर प्रेमाचा, लाडाचा, वात्सल्याचा, प्रींग्ल्सचा आणि कॅडबरीचा वर्षाव करतात. पार्थ खूषच की, दोन्ही घरचा पाहुणा तुपाशी! मुळाशी भरपूर खत, पाणी, ड्रीप इरिगेशन आणि त्याच वेळी वरून छाटून छाटून बोन्साय करण्याचे प्रयत्न, असा दुहेरी हल्ला असतो हा. पार्थ ह्या ह्ल्ल्यानी गलितगात्र न झाला तरच नवल. पण पार्थ हार जात नाही, चष्मा सांभाळत, बर्म्युडा सावरत, खिशातला मोबाईल चाचपत तो क्लास, हॉबी क्लास, शाळा, स्पर्धा, सिनेमा, कॅम्प, बड्डे, गिफ्ट्स, रिटर्न गिफ्ट्स, मॅक्डी, पार्टी, स्कूल बस टायमिंग, शॉपिंग, गेमिंग, मॉलिंग, सायकलींग, जीमिंग, स्विमिंग अशा अनेक आघाड्या सांभाळत असतो.
एकूणच पार्थानी जन्मतःच अनेक वादांना तोंड फोडलं होतं. मराठी का इंग्लिश मिडीयम शाळा असाही एक वाद खेळण्यात आला. अर्थात विजय ब्रिटीशांचा होणार हे ठरलेलंच होतं. पण ह्या वादामुळे, मुलाला आपण विचारपूर्वक इंग्लिश शाळेत घातल्याचं स्वर्गीय समाधान पप्पाला प्राप्त झालं; आपले डीबेटिंग स्किल्स शाबूत असल्याचं मम्मीला कळलं आणि पार्थ शाळेत जाण्याऐवजी स्कूलला जाऊ लागला.
हे तर काहीच नाही, पार्थ चिमखडे बोल बोलायच्या आतच इकडे ‘आई-बाबा’ का ‘मम्मी-पप्पा’ यावर परिसंवाद झडले होते. शिवाय ‘अहो पप्पा’ का ‘ए पप्पा’ हाही एक सखोल चर्चेचा मुद्दा होता.  पार्थ आता पप्पाला ‘ए पप्पाच’ म्हणतो. पप्पानीच तसं त्याला स्पष्ट बजावलेलं आहे. त्याशिवाय स्त्री-पुरुष समानता ती कसली? ‘अहो पप्पा’ म्हटलं की पप्पा लांबचा वाटतो, म्हणजे अॅज कंम्पेर्ड टू, ‘ए मम्मी’. ‘ए मम्मी’ मुळे मम्मी जवळची वाटते. धिस इस ऑबव्हीयसली स्त्री-पुरुष असमानता. त्यामुळे ‘ए पप्पा’च चांगलं.
पण ‘ए पप्पा’ आणि ‘अहो पप्पा’च्या रस्सीखेचीत मम्मीनी हळूच स्वतःची ‘आई’ करून घेतली आहे. त्यामुळे आता ‘ए आई’ आणि ‘ए पप्पा’ असं ईक्वेशन आहे. म्हणजे पुन्हा स्त्री-पुरुष असमानता आलीच. ‘अहो पप्पा’ पेक्षा ‘ए मम्मी’ जवळची आणि ‘ए मम्मी’ पेक्षा ‘ए आई’ जवळची. येणेप्रमाणे स्त्री-पुरुष समानतेचा पप्पापुरस्कृत पहिलावहिला आणि एकमेव प्रयत्न मम्मीनी उधळून लावला आहे. समाजातली स्त्रीप्रधान संस्कृती काही केल्या हटत नाही हेच खरं.
  खरंतर पार्थची वागणूक आणि गुणवत्ता ही पप्पानीच त्याला ‘अहो पार्थ’ अशी हाक मारावी, एवढी आहे. पण लोकलज्जेस्तव पप्पा तसं करत नाही एवढंच. कारण पप्पा पार्थच्या वयाचा होता तेंव्हा त्याच्या नावावर तीन दगडात तीन चिंचा लागोपाठ पाडण्याचा एक विक्रम वगळता दुसरा कोणताही विक्रम नोंदलेला नव्हता. पार्थचं तसं नाही. तो गणितात पक्का आहे, गीता पठणात पक्का आहे, अॅबॅकसमधे दुसरा आणि डान्समधे दुसरा आहे. क्रिकेट आणि चित्रकलेतही तो पक्का असून, पळण्यात आणि स्पेलिंग-बीमधे दुसरा आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्यात पार्थ दुसरा नसतो त्यात तो पक्का असतोच असतो आणि ज्यात तो पक्का नसतो त्यात तो दुसरा असतो! असा हा पार्थ. शिवाय टीचरचाही तो  फेवरेट आहेच. शिवाय कॅम्पला एकटा जाऊन तब्बल एक रात्र घराबाहेर घालवल्याचाही एक विक्रम त्याच्या नावे आहे.
शिवाय प्रोजेक्ट मधे तो फारच परफेक्ट आहे. मुख्य म्हणजे शाळेतून प्रोजेक्टाईल सुटल्याची कल्पना तो मम्मी-पप्पाला वेळेवर देतो. त्यामुळे त्यांची ऐनवेळी धावपळ होत नाही. त्यामुळे ते आधीच सगळं डाऊनलोड वगैरे करून ठेवतात. त्यामुळे पार्थला सगळं कॉपी करणं सोपं जातं. त्यामुळे त्याचा बरेचदा दुसरा आणि कधी कधी तिसरा नंबर येतो. बाकीच्याचं तसं नाही. पार्थचा  हा गुण अगदी दुर्मिळ आणि इतर मुलांनी घेण्यासारखा आहे. ती मुलं अगदी आदल्या रात्री झोपताना उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचं असल्याचं सांगतात. त्या भानगडीत मम्मी-पप्पाची झोप उडते. कधीकधी तर हे प्रोजेक्टाईल गृहकलहास कारणीभूत ठरतात.
आणखीही एक गृहकलह सतत तेवत असतो. त्याचं काय असतं, पार्थपिता एका खेड्यात लहानाचा मोठा झालेला असतो. त्याचं घर असतं शेणाचं. पार्थमाता असते अगदी मेट्रोकिड. तीचं घर असतं मेणाचं. तिला या शेणाच्या घराशी काहीसुद्धा देणंघेणं नसतं. पण पार्थपप्पाला असतं. दर दोन चार वर्षानी आपलं घर, आपला गाव, आपली शाळा, त्या बाहेरचा तो पार, तो आठवड्याचा बाजार, तो घाणेरडा वासमारू मासळी बाजार असं सगळं सगळं पार्थला दाखवायची, पप्पाला खाज येते. मग पार्थला आणि पार्थमातेला घोड्यावर घालून तो गाडीत बसवतो आणि स्वतः पार्थसारथी होऊन त्यांना  गावी आणतो. पप्पा जेंव्हा पार्थला शाळा दाखवतो तेंव्हा पार्थ मोबाईलवर गेम खेळतो. पप्पा जेंव्हा पार्थला पार दाखवतो, तेंव्हा पार्थ टॅबवर चॅट करत असतो. पप्पा जेंव्हा  पार्थला बाजार दाखवतो तेंव्हा नेमका पार्थला सातासमुद्रपलिकडच्या मित्राचा व्हॉट्सअप कॉल येतो. पप्पा जेंव्हा पार्थला  मासळी बाजार दाखवतो तेंव्हा तर पार्थला प्ले स्टेशनवर नेक्स्ट लेव्हल पार केल्याचं दिसतं आणि पार्थचा आनंद गगनात मावत नाही. पप्पाचं दुखःही गगनात मावत नाही. पप्पा खट्टू होतो. पार्थही पप्पानी सारखं डिस्टर्ब केल्यामुळे खट्टू होतो.
दोन्ही खट्टू तसेच पुढे जातात. पुढच्या वळणावर तर आजोबांची शाळा येते. दर सुट्टीनंतर, आजोबांच्या शाळेतला  पहिल्या दिवशीचा कार्यक्रम, म्हणजे गावातून शेण गोळा करून शाळा सारवणे. हे ऐकून पार्थचा आजोबांबद्दलचा आदर संपतो, पप्पाबद्दलचा उणावतो आणि स्वतःबद्दलचा दुणावतो. काऊडंगच्या जमिनीवर आपले फीट ठेवायच्या कल्पनेनीच पार्थला कसंनुसं होतं. खरंतर एक सोशल रिस्पॉन्सीबिलीटी म्हणून, एक ब्रॉड परस्पेक्टिव्ह यावा म्हणून, ही माहिती पप्पानी शेअर केलेली असते. पण पार्थ हा शेवटी पार्थ आहे. पण सारवणामुळे त्याला आजोबांचं वैषम्य वाटतं. तसंच त्याला पप्पाच्या स्कूलमेटचं, शेतीपंपाच्या स्क्रू-नट-बोल्टचं दुकान आहे, हे पाहून पप्पाचं वैषम्य वाटतं. मग बऱ्याच प्रयत्नानी पप्पा त्याला पटवतो की असं दुकान असणंही रेस्पेक्टेबल आहे. येणेप्रमाणे पप्पा, पार्थच्या डोक्यातला रिस्पेक्टेबलीटीचा जुना स्क्रू काढून नवा फिट्ट बसवतो.
पप्पा इंजीनिअर आहे हे एक बरं आहे. पार्थाच्या मेंदूतले स्क्रू तो भराभरा बदलतो. मध्यंतरी पार्थला शाळेत ज्यूलीअस सीझरचा प्रवेश होता गॅदरिंगला. मार्क अॅन्टोनीची सोलीलोक्वी काय बोलला तो! त्या वेळी पप्पानी त्याच्या डोक्यात मार्क अॅन्टोनीचा स्क्रू बसवला होता. शिवाय कास्काची स्प्रिंग आणि ब्रुटसचा वॉशरही घातला होता. पुढे एकदा शनिवार वाडा पहायला गेला तेंव्हा हा वॉशर काढून आनंदीबाईचा बसवला. त्याच वेळी पूर्वी कधीतरी बसवलेला मॅकीआवेलीचा स्क्रू काढून नाना फडणविसांचा घातला होता. पण पुढे न वापरल्यामुळे हा गंजून गेला. तो काढून मग इंडोनेशियाच्या हिस्टरीचा बसवला; त्यावर्षी शाळेत ती हिस्टरी होती ना. मग सुट्टीत शांतीनिकेतन पहायला गेला तेंव्हा पप्पानी आधीचे सगळे स्पेअर पार्ट काढले आणि रविंद्र संगीत, सत्यजित रे, बंगाली क्रांतिकारक आणि वंगभंगाची चळवळ असे सगळे नवे पार्ट कोलकत्यातच घेऊन बसवले. शेवटी पप्पा तरी काय करणार, तो इंजीनीअर असला तरी पार्थचं डोकं तर फिक्स साईझचं आहे. त्यात कोंबणार तरी काय काय, आणि किती किती? मग असंच आधीचं काढून नवीन घालायला लागतं. काय ठेवायचं अन काय काढायचं ते  काळजीपूर्वक ठरवावं लागतं.  पप्पा होणं आणि विशेषतः पार्थचा पप्पा होणं अवघड आहे खरंच. कारण पार्थ हुशार आहे. पप्पा हुशार नाही. बेसावध गाठून नेहमीच पार्थ पप्पाची विकेट घेतो.
मधे एकदा पार्थ म्हणाला, ‘पप्पा फॉरेन टूरला जाऊ.’
पप्पा म्हणला, ‘जाऊ, चला नेपाळला जाऊ.’
पार्थ म्हणे, ‘नेपाळ इस नॉट फॉरेन इनफ्? इंडियाला बॉर्डर टच नाय व्हायला पाईजे.’
‘...मग श्रीलंकेला जाऊ.’
पण पार्थ हुशार. तो म्हणाला, ‘...पाण्यात आपल्या बौन्ड्रीज टच होतातच की.’
मग पप्पा म्हणाला, ‘मुंबईला जाऊ, वन्स  अपॉन अ टाईम मुंबई वॉज नॉट अंडर मराठा रूल. इट वॉज अ ब्रिटीश टेरिटरी.’
पण पार्थ म्हणे, ‘पप्पा, कम ऑफ इट. वन्स  अपॉन अ टाईम इव्हन सिंहगड वॉझंट अंडर मराठा रूल. सो तू मला सिंहगडला नेणार का? आय अम टॉकींग ऑफ द करंट बौन्ड्रीज ऑफ द इंडियन युनियन.’
पार्थच्या चमकदार उत्तरानी पप्पा प्लेझंटली शॉक मग नाईलाजानी सगळे हाँगकाँगला जाऊन आले. अस्सा स्मार्ट आहे पार्थ. तिथल्या सायन्स म्युझियममधे तर तो लागोपाठ तीन दिवस गेला. त्याला पप्पानी मागच्याच वर्षी सांगितलंय की सायन्स हे हुशार मुलांसाठी असतं आणि सोशल सायन्स अँण्ड  लॅंग्वेजेस्, हे निव्वळ पासिंग पुरतं.
इंग्रजी इज अत्यावश्यक, नॉट ओन्ली दॅट, इट इज जीवनावश्यक. जर्मन इस स्कोरिंग, अॅज कमपेअर्ड टू मराठी, तर नक्कीच. पण मराठी इज ऑल्सो आवश्यक! असा तो पेच आहे. बट मराठी वी कॅन टीच अॅट होम नो? नॉट सो विथ इंग्लिश ऑर जर्मन. सो पार्थ लर्नस् इंग्लिश अँण्ड जर्मन अँण्ड हिंदी इन स्कूल. मराठी इस जस्ट अ स्पोकन लँग्वेज फॉर पार्थ. मग तो ती राईटत नाही की रीडत नाही, तो ती फक्त स्पीकतो. अगदी प्युअर मराठी स्पीकतो तो.
पार्थ ‘च्यायला’ म्हणाला त्याची कथा तर फारच उद्बोधक आहे. खरंतर घरीदारी, पप्पाच्या तोंडात च्यायला होतच. तेंव्हा आज ना उद्या पार्थ हा शब्द, उद्धारवाचक ते उद्गारवाचक असे त्याचे अनेकानेक वापर, त्या मागची भावना, त्याचा हेल, त्याचं वजन, त्याचा जोरकस उच्चार, त्या बरोबरची हाताची हालचाल, उचलणार हे अपेक्षितच होत. जेंव्हा तो पहिल्यांदा च्यायला म्हणाला तेंव्हा पप्पाच्या अंगावर रोमांच आले आणि मम्मीच्या अंगावर काटा आला. यावर बरच रणकंदन माजलं. हे सारं अत्यंत गावरान, अनावश्यक आणि असभ्य असल्याचं मम्मीच म्हणणं होतं, तर हे स्ट्रीट स्मार्ट, इसेन्शिअली अत्यावश्यक आणि रुटीन असल्याचं पप्पाच प्रतिपादन. भरीस भर म्हणजे, ‘माय पेरेंट्स केप्ट मी फ्रॉम चिल्ड्रेन हू वेअर रफ’ अशी एक विंग्रजी कविताही पप्पानी कोsट केली. ह्यामुळे मम्मी वरमली पण नरमली नाही. भांडण जारीच राहीलं. शेवटी पार्थनीच ‘स्टॉप धिस बुल्शीट अँण्ड फकॉफ’, असं म्हणून दोन्ही पक्षांना एकाच दगडात गारद केलं.
याच दरम्यान पार्थला एकदा शेत दाखवायला म्हणून मुद्दाम एका अॅग्रीटुरीझम फार्मवर नेलं. खरंतर साध्या फार्मवरच न्यायचं होतं. पण मग मम्मीला तिथे बोअर होईल असं मम्मीनी आधीच डिक्लेअर केलं. मग हे ठरलं. तर तिथे काय मजा... तिथली मुलं किल्ला करत होती. खूप लहान होता पार्थ त्या वेळी. त्याच्या प्लेस्कूलमधे सुद्धा मुलांना मडमधे खेळायला देत असत. कारण काँटॅक्ट विथ मदर अर्थ हा स्पिरिच्युअली एनरीचींग आहे, असं स्कूलटीचरच्या आदरणीय अध्यात्मिक  मदरचं मत होतं. पण प्लेस्कूलमधे ती माती सुद्धा स्टरलाईज केलेली असे. शिवाय चिखल करायला पाणी सुद्धा आरओ फिल्टरचं. त्यामुळे ते सगळं कसं, सेफ होतं. इथे झालं काय की, ममी पप्पानी आसपासच्या सृष्टीसौंदर्याकडे, खाण्याच्या स्टॉलकडे, हँडीक्राफ्टच्या दुकानाकडे तोंड केलं आणि अर्थात पार्थकडे पाठ. थोड्यावेळानी वळून पहातात तो काय. त्या मुलांच्यात शिरून पार्थ पूर्णपणे चिखलानी माखलेला. तत्काळ त्याला बाहेर काढून नखशिखांत धुवून, नव्या कोऱ्या कपड्यात कोंबल्यावरच मम्मी शांत झाली. पप्पाचीच आयडीया होती ही. त्यामुळे पप्पा गप्प. मम्मीला मात्र पप्पाला झोडायला हा बरा चान्स घावला!
बाजार आणि त्यातून मासळी बाजार बघताना तर फारच त्रेधा उडाली. हुशार पार्थनी गुगलीच प्रश्न केला;
‘फिश विकणारे फिश कुठून आणतात?’
‘नदीतून.’ पप्पा.
‘मग त्यांना फिश फ्री मिळतात ना?’
‘हो’ पप्पा.
‘मग ते आपल्याकडून पैसे का घेतात?’ इति पार्थ. पप्पा गप्प.
असंच एकदा नव्या स्कोडातून पार्थ महाबळेश्वरला चालला होता. पप्पाला सारखं बडबड करायची लय सवय. पप्पा म्हणे ही बघ कृष्णा नदी. पार्थ बावचळून इकडे तिकडे बघायला लागला. तेंव्हा पप्पाने नदी ही पुलाखालून वहात असल्याचा खुलासा केला.
पार्थ पृच्छा करी, ‘पप्पा म्हणजे माझ्या जीओग्राफीच्या पुस्तकात जी रिव्हर कृष्णा आहे, ती हीsss?’
‘हो रे.’ पप्पा
‘होsss आssई?’ पार्थ.
‘हो रे.’ मम्मी
‘... आणि मग हा सगळा सह्याद्री माउंटन आहे का?’ पार्थ.
‘हो रे.’ पप्पा.
‘होsss  आssई?’ पार्थ.
‘हो रे.’ मम्मी.
‘... आणि मग हा सगळा डेक्कन प्लाटो आहे?’
‘हो रे.’ पप्पा.
‘होsss  आssई?’ पार्थ.
‘हो रे.’ मम्मी.
‘होsss आssई?’ हे पार्थचं धृवपद आहे. कुणीही काहीही सांगू दे, म्हणू दे. हा आईला विचारतो, ‘होsss आssई?’
आईनी रुकार दिला तरच ती गोष्ट तो मानतो. कारण पप्पा मधून मधून बाता मारतो, पण मम्मी? उं हुं, कारण मुलाशी खोटं बोलणं हे त्याच्या इड किंवा इगो किंवा सुपरइगोला हानिकारक आहे, असं तिनी पूर्वीच एका पेरेंटींग सेमिनारमधे ऐकलं आहे. ही असली सगळी सुपरडुपर पूर्वतयारी असल्याने मम्मी पॉलीश्ड आहे.
पप्पाही पॉलीश्ड आहे, पण जरा पॉलिश खरवडलं की आत अगदी गावरान. मुलाला गावाकडे न्यायचा हट्ट दरवेळी पप्पाचाच. यात दरवेळी काहीतरी गोच्या होतातच. मम्मी मात्र थरली पॉलीश्ड आहे. कितीही खरवडलं तरी आत पॉलिश शाबूत.  कॉन्व्हेंट स्कूल, कॉस्मॉपॉलीटन बॅकग्राउंड, मग काय विचारता? मम्मी म्हणते, ‘कशाला पाहिजे हे गावाकडे जाणं? इट्स बोथ, शियर वेस्ट ऑफ टाईम अँण्ड हाय रिस्क बिहेविअर.’
पप्पा म्हणे, ‘त्या शिवाय सोशल जाण कशी डेव्हलप होणार?’
मम्मी म्हणे, ‘कशाला हवी ती जाण? ईट विल डेव्हेलप इन कॉलेज, व्हेन पार्थ अॅक्चुअली टेक्स् अप सम व्हिलेज व्हिजीट ऑर ट्रेक ऑर टूर ऑर समथिंग. एन्.एस.एस. एक्सेट्रा तर कंम्पलसरीच असतं कॉलेजमधे. तिथे सोशल सगळं समजतंच की. तंवर सोसेल एवढंच सोशल पुरे. अगदी आत्ता पासून कशाला?’ मम्मीची सुरवातच मेणाच्या घरापासून झालेय त्यामुळे तिला तसं वाटतं. पप्पाचं तसं नाही. खरंतर कालचा धो धो पाऊस पप्पाच्या गावात आलाच होता. कालचं पीक त्यानी पावसाच्या पाण्यावरच घेतलंय; आसवांवर नाही. त्याचं वाहून गेलेलं शेणाचं घर त्यानी आता विटा सिमेंटनी बांधलंय. पण पप्पाला आपल्या शेणाच्या घरात अजूनही इंट्रेस्ट आहे.
गावी पंचायतीत कोण निवडून आलं  इथपासून ते जत्रेतल्या तलवारीचा मान ‘खाल्ल्या’आळीतल्या घरात गेला का ‘वर्ल्या’आळीतल्या ह्यात त्याला रस आहे. मम्मीचं तसं नाही. कॉलनी हेच तीचं गाव. हेच तिचं विश्व. एका कॉलनीत ती लहानाची मोठी झाली. आता दुसऱ्या कॉलनीत मोठ्याची म्हातारी होईल. पार्थचं तर आणखी वेगळं. त्याचं घर मेणाचं नाही चांगलं सिमेंट कॉन्क्रीटचं आहे. शेणाच्याच काय पण कॉन्क्रीटच्या घराचं ओझंही त्यानी केंव्हाच भिरकावून दिलंय.  पण ह्याचा मम्मीपप्पाला पत्ताच नाहीये. ‘पार्थ तसा हॅपी गो लकी, इझी गोइंग आहे. त्याला रमतगमत, आरामात जमलं तर मोठं व्हायचंय...’ असं मम्मीपप्पाला वाटत रहातं. पार्थ डायरेक्ट मोठाच होऊन दाखवतो. पप्पामम्मीला घाई असते. त्यामुळे फास्ट फॉरवर्डचं बटण त्यांनी घट्ट दाबून ठेवलेलं असतं. गर्भसंस्कारापासून आजपर्यंत त्यांनी कसली म्हणजे कसली कसूर ठेवलेली नसते. पण बटण दाबण्याच्या नादात स्क्रीनकडे लक्षच नसतं त्याचं.
कधीतरी पप्पाच्या मागे उभा राहून आरशात भांग पाडता पाडता  पार्थ म्हणतो, ‘पप्पा तुझे केस बघ, मधून मधून पांढरे झालेत की!’
पप्पा म्हणतो, ‘म्हणजे बघ ना पार्थ, ‘तू’ आता किती मोठा झालास!!’
... आणि झटकन पप्पाच्या लक्षात येतं, अरेच्चा, पार्थ(ही) चक्क मोठा झाला की!!!
सगळे पार्थ असेच असतात. आईबाबांचा डोळा चुकवून अचानक मोठे होतात. अचानक जबाबदारी वगैरे  कळायला लागते त्यांना. मम्मीपप्पानी, लहान आहे असं समजून, कधीच न शिकवलेल्या गोष्टी अचानक येऊ लागतात त्यांना. मम्मीपप्पाला न दिसणारे भरभक्कम पंख फुटलेले असतात त्यांना. शेणाचं, मेणाचं, कॉन्क्रीटचं अशी सगळी घरं अपुरी असतात पार्थांना.

पार्थ जेमतेम मोठा होईपर्यंत ही कॉलनी आहे. मग लगेच कुठेतरी परदेशी. मग मोठ्याचा मध्यमवयीन पुन्हा वेगळ्याच देशी. मध्यमवयीनचा म्हातारा व्ह्यायला आणखी कुठेतरी. म्हाताऱ्याचा पिकला म्हातारा होताना कदाचित पुन्हा आणखी कुठल्यातरी भलत्याच  देशी... एखाद्या अल्ट्रापॉश ओल्ड एज होममध्ये... आणि पान गळताना पुन्हा आपल्याच देशी, कुठल्यातरी इच्छामरण-गृही... कारण तोपर्यंत अगदी मुहूर्तसाधून, नियोजित, वेदनारहित मृत्यू ही कल्पना व्यवहारात उतरली असेल. शेवटी पार्थ इज पार्थ. त्याला विश्वरूपदर्शन हे घडणारच.

Monday, 20 February 2017

मला फशिवलं वं फशिवलं!!


 मला फशिवलं वं फशिवलं!!
डॉ. शंतनू अभ्यंकर
वाई

डोळ्यातून टचकन पाणी काढणारे प्रसंग आता विरळाच. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे निबरही होत जातो. पूर्वी पायाला खडा बोचला तरी पाणी यायचं डोळ्यात, आता पावलांची कातडी चांगली जाड झाली आहे. अनवाणी चालता येतं आता. वय वाढलं, काटेही बोथट झाले आणि त्वचाही निबर. डॉक्टर माणसाला तर सुख थोडं, दुखः फार अशाच अवस्थेत वावरावं लागतं. जो येतो तो आपली दुःखाची गाठोडी सोडायला लागतो.
पण रोज त्याच तिकिटावर तोच खेळ कुणाला रुचेल? हळू हळू खेळातली गंमत संपते, नाट्य हरवतं. आला पेशंट तपासायचा आणि मार्गी लावायचा एवढंच काम उरतं. पण तशातही कधीतरी मनाला चटका लावून जाणारं कुणीतरी भेटतं आणि कायम स्मरणात रहातं.
अशीच एक म्हातारी भेटली होती मला, सुरकुतलेला चेहरा, डोईवर रुंद काठाचा पदर, ठसठशीत कुंकू, नजर कौतूकानं ओथंबलेली आणि हसरा चेहरा. ती आली, ती काहीतरी फुटकळ तक्रारी घेऊन. औषधांनी बरं वाटलं म्हणून पुन्हा आली, ‘बरं वाटलं बरं का?’ हे सांगायला! गरज सरो आणि वैद्य मरोच्या जमान्यात, हे आक्रीतच. मग अशीच येत राहिली. कधी शेजारणीला घेऊन कधी लेकीला, कधी सुनेला, कधी सहजच. पुढे संसार वाढला, लेकी आपआपल्या संसारात रमल्या आणि सुना त्यांच्या त्यांच्या संसारात. प्रेमानी होणारी लेकींची लांबलचक माहेरपणंही आखूड झाली. म्हातारीच्याच शब्दात सांगायचं तर, ‘नातवंडं इंग्लिश शाळेत घातल्यामुळे लेकींना अभ्यास फार’. सुना तर शेवटी सुनाच. नवऱ्याचे हातरूमाल कमरेला खोचून त्याही आपापल्या संसारात रमल्या.
म्हातारा होता, पण भारी अबोल. त्यामुळे सगळा गोतावळा असूनही म्हातारी पडली एकटी. पण होती मात्र हसतमुख.
‘मला फशिवलं ग फशिवलं’, हाच तिचा मंत्र होता. मग नातवाला खेळवत असो की आणखी काही. ‘रांडेच्या, फशीवलस मला, फळाफळा मुतलास की माज्या लुगड्यात..!’ असं म्हणत नातवापेक्षाही जास्त आरडाओरडा करत हिचं काम चालायचं. हिला फशिवणाऱ्यांची लांबलचक यादीच होती तिच्याकडे. तिच्या यादीत टॉपला होता, तिचा नवरा. त्यानी किती तऱ्हांनी फसवलं याची गणतीच नाही.
‘मला त्यानी फशिवलं वं फशिवलं, अगदी दिवाळीच्या पाडव्याला फशिवलं. कसंss, म्हंजे आसं बगा, मालकान् घेतला जिमीनीचा तुकडा, त्या सालच्या दिवाळीला. होss.’
मला म्हनला, ‘हाच तुजा पाडवा.’
मी म्हणत व्हते, ‘...गळसरी हवी होती.’
त्यावरून रुसले की मी. ‘त्याला काय सुद्रेना, मी का रुसले ते. लेडीज लोकांचं समदं काय समजत न्हाई जेन्ट्स माणसाला. हेss भांडान पेटलं आमचं.’
माला म्हणतो कसा, ‘एवडी जिमीन घेतली, गळसरी परीस म्हागाची, तरीबी तुला कवतिक न्हाय.’
मंग मी म्हनाले, ‘बाबा घेतलीस जिमीन, घेतलीस. पण आता जिमिनीचा तुकडा गळ्यात घालून थोडाच मिरवता येतो? गळसरी कसं, घातली की चार बायका विचारणार, कधी केली, कुठे केली, कितीचा डाग? जिन्नस मिरवण्यातली सगळी जंमत जिमीनीत हाय व्ह्य?’ तवा मी म्हन्ते, फशिवलं पार मला!’ एवढं बोलून म्हातारी खुदुखुदू हसायला लागली.
एवढ्या मोठया वयाची आजी चक्क आपल्या नवऱ्याला अरे तुरे करते हे नवलच. एकदा मी विचारलंच तिला...
‘आमचा पिरेम विवाह हाय. माज्या शेजारीच होता. चांगला धिप्पाड गडी होता. आवडला. धरला हात आणि नरसोबाच्या वाडीला पाट लावूनच घरी आलो आम्ही. मग कशाला आओ नी जाओ म्हन्ते मी? पण चार लोकात बरं दिसंना, तवा सवय केली आणि ‘आहोss’ अशी बाकीच्या बायांसारकी हाक मारायला लागले. पण तवा बी, मोठ्यानी जरी अवो म्हन्ल का, की लग्येच मनात मी ‘अरे विज्या’ म्हणून टाकायची. फिट्टम फाट. मी बी अशी फसवायची त्याला...’ पुन्हा एकदा खुदुखुदू हसू सुरु.
‘पण लाडात आले, आपलं आपलंच घरी आसलं की विज्याच म्हणायची मी. फुड पाच प्वोरं झाली का... की लाडात यायला टायमच न्हाय. लाडापरीस भांडानच जास्त. मग रागावले की अरे तुरे करायची त्याला. लाडाचं नाव रागाचं झालं बगा. आता लाड कमी आणि राग जास्त, त्यामुळे परत अरेतुरेच आहे तोंडात.’
कोण तिच्या मते कधी आणि कसं फसवेल याचा नेम नसायचा. तिचं मोतीबिंदूच ऑपरेशन झालं. आलीच सांगत... ‘अवं फशिवलं मला, साप फशिवलं. घरात कोपऱ्यात पडून होते. पावलावरून आलं गेलं वळखीत होते. पण आता लख्ख दिसायला लागलन् काय! म्या काय म्हणलंवतं, त्या डोळेवाल्या डागदरला... आपलं-आपलं झाड्याला जाता येईल एवढंच आप्रेशन कर. या वयात जास्त न दिसलेलंच चांगलं. त्ये नात्वंडास्नी म्हणायचं, ‘परसाकडंला न्ये’, म्हणजे त्ये वंगाळ वाटतंय बगा. पर त्यांनी फशिवलं मला म्हातारीला. चांगलं सपष्ट दिसाया लागलं की. सुईत दोरा ओव्ते, लांबून माणूस वळखाय यीतो... प्येप्रातले शरद पवार वळीखते म्या! पण इतकं कशाला दिसावं म्हणते मी? बरं दिसलं की बघावं लागतंय, बघितलं की बोलावं लागतंय... आन समदा घोटाळा आन गोन्दुळ... आता केर दिसतो, पसारा दिसतो, खरकटं, सांडमांड सगळं दिसतं. मग मी बोलते, मग सूना बोलतात, मग बोलाचाली सुरु. म्हणून म्हणते त्या डोळेवाल्यान् फशिवलं मला!’
स्पष्ट दिसणं हे डॉक्टरचं यश नसून अपयश आहे हे ऐकून मला हसूच आलं. निव्वळ संडासला आपापलं जाता यावं एवढीच तिची अपेक्षा होती आणि अपेक्षेबाहेर यश हे नकोसं होतं तिला. तीही फसवणूकच होती. या वयात जास्त न दिसलेलंच बरं, हे तीचं व्यावहारिक शहाणपण. इतक्या वर्षाच्या अनुभवाचं संचित.
जगाचा जरा जास्तच अनुभव होता आजीला. खेड्यात लहानाची मोठी झालेली, मोठी होताच लग्न होऊन मुंबईला सासरी गेलेली. तिथे राहून चांगली स्मार्ट झाली होती आजी. शिवाय संसाराला हातभार म्हणून वीस वर्षात दहा प्रकारचे उद्योग केलेले. एका अनाथाश्रमात आया होती. मग तिथले कपडे शिवून द्यायच्या मिषानी टेलरिंग काम करायला लागली. मग काही दिवस मेस चालवलीन. हे होईना तेंव्हा भेळेची गाडी काढली. घरगुती मसाले विकले. रिक्षा घेऊन ती भाड्यानी दिली. शिवसेनेची शाखाप्रमुखसुद्धा झाली.
ह्या सगळ्या धंद्यांची आणि त्यातल्या फसगतीची रसभरीत वर्णन चालायची.
‘म्येसचा धंदा ब्येस आसं आपलं म्हनायचं. काय खरं नाय. बारा म्येम्बर होते बगा माझ्याकडं. कितीss? बारा. पर एक येणार धाला तर एक उगवणार तीनला. मन्जे मला उसंतच न्हाई की. सकाळची चूल विझेपोत्तर संध्याकाळचं रांधायला सुरु. शिवाय आला का प्रत्येकाची घाई. जो तो आपला घोड्यावर. चुलीच्या ढुंगणातून बाहेर पडे पर्यंतबी दम न्हाय. पण फशिवलं हो मला. लय जीव लावायची पोरं. सगळे लहान लहान हुते. मी बी धाकल्या दिरासारखी माया करायची. योक होता बंडू. लई जीवाचा माझ्या. दोन वर्षानी लगीन झालं तवा म्हणतो कसा, ‘मावशी, बायकोसंगट तुज्या मेशीलाच येणार मी. घरी वायली चूल करून काय करू?’ पण आला का? लग्न झालं, कुटे लांब रूम मिळाली, झाला की पसार. चिठ्ठी नाय का निरोप नाय. मी वाट बघत्येय, आज येईल उद्या येईल.. पत्त्या नाही.. त्याच्या पाठोपाठ आणखी तिघांची लग्न झाली बघा. आले नंतर भेटीला, दोघं तर बायकूला म्येस दावायलाss, मावशी दावायलाss, घेऊन आले! मला अगदी उलघाल हो, नवी मुलगी बघायची, सूनच की माजी... माला लाख त्याची बायकू बघायची होती पण तिला काय म्येसवाली मावशी बघायचीच नव्हती. मुंडी खाली, नजर पायाला, च्या घेतला का, की योकच शबूद, ‘चला!’ असल्या पोरी हो ह्या.  मग कशाला हो माया लावून यायाचं? ...असे बघा मेम्बर तुटत गेले... फशिवलं हो समद्यानी मला. आता कोण कुठे आहेत, आहेत का नाहीत, काही ठावूक न्हाय.’
‘एक कावळा बी पाळला होता म्या. म्हणजे मी कशाला पाळत्येय, तोच रोज खरकटं चीवडायला यायचा. पण मी ओळखायला लागले त्याला. सगळे काळेच, पण हा जरा एका पंखाखाली भुरा होता. मान जरा लांब होती. आवाज पण मी वळखायची. मग मीच त्याला काय काय ठेवायची. कदी माशाची डोकी, कदी काई कदी काई. एके दिवशी दुपारी जरा लवंडले होते, तो हेss कावळ्यांचा कलकलाट झाला बाहेर. खिडकीतून बघते तो काय, हा लटकलेला लाईटच्या तारेला. तडफडून गेला हो जीव. इतकं गलबललं मला. त्या दिवशी म्येसला खाडा केला मी. घरातच न्हाई थांबले. गाववाल्याकडे मयत झालं कांजुरमार्गला असं निरोप ठेऊन समोरच्या हिराबाईकडे जाऊन बसले. त्यानी बी फशीवलंच की मला. आसं माज्या देखत तडफडून कशाला मरायचं म्हणते मी. लांब जायाचं ते यायाचंच न्हाई. मी काय ते समाजले आसते. आता ह्यो मला डोळ्यापुढे दिसणार का न्हाई सतत? रोज माजा घास खायचा. पोशिंदी मी होते, होते ना? तर माजा इचार घेतल्याबिगार हा असा कसा मरतो बापा? फशिवलं का नाय त्यानं मला?’
कावळ्याची ही गोष्ट ऐकून कालवलंच काळजात माझ्या. ही त्याची पोशिंदी, तेंव्हा कावळ्याचं अपघाती मरण हेही तिला अमान्य होतं. तो काय हिचंच खरकटं चिवडत होता असं थोडंच आहे. तो जिथे मिळेल तिथे चोच मारतच असेल की. ऋणानुबंध आजीनी जोडला होता. एकतर्फी. पण एकदा माया केली की न फसवणं ही प्रतिपक्षाची जबाबदारी होती. कावळा तो कावळाच. पण पोटच्या पोरानीही अशीच फसगत केली होती तिची. त्याच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा चूक नव्हतीच.
‘थोरला लई मायेचा. शिकला पण नोकरी नव्हती तर घरात यायला बी शरमायचा. चोरासारखं रहायचा. खाल मानेनं जेवायचा. मी समजावलं त्येस्नी, ‘आरे, आसं नवऱ्यानी टाकलेली बाय म्हाहेरला रहाती, तसा कानकोंडा कशापायी रहातुस?’ असा मी म्हणाले का, का चार दिवस कसा राजासारका ऱ्हाणार. आन् मग कुटं इंटरवू का कशाला गेला, कोण काय बोललं असल तिथे; आला, अचानक घराबाहेर गेला, गेला तो रेल्वे खाली जीवच दिलान बघा. आसं घर आन आशी रेल्वे. काय बोलनं नाय सांगनं नाय, आस्स फशिवलं बघा मला.’
हा धक्का जबरदस्त होता. म्हातारीनं संभाळलं स्वतःला लवकर. पण म्हातारा? तेंव्हा तो फारसा म्हातारा नसूनही, जो गप्प गप्प झाला तो काही बोलेना, काही करेना, नुसता घरात. मग म्हतारीनीच कंबर कसली. त्याला नायर हॉस्पिटलला नेला, बरा केला आणि संसार रूळावर आणला. पण नैराश्याची ही आळी मिळी गुप चिळी मधून मधून डोकं वर काढतंच रहायची. सगळं काही मनासारखं  असूनही, कधीकधी महीनोंमहिने म्हातारा गप्प असायचा. वय वाढलं तसं हे मौन पण वाढलं. म्हातारी पुन्हा एकदा फसगत झाल्याचं गाऱ्हाणं घालायला आली.
तिची एकच तक्रार, ‘बोलत तर न्हाईच पण भांडततंडत सुद्धा न्हाई हो बला!’
‘म्हणजे भांडायला कशाला हवं?’
‘वेळ जातो. पिर्माच्या माणसानी भांडण टाकणं बरं न्हाई. नुसतंच मी त्याच्या तोंडाकडे आनि त्यानी माझ्या तोंडाकडे किती वेळ बघत बसायचं? खरंतर मीच ही घूम्म रहायची सवय लावली. पूर्वी जास्त तणतण करायला लागला की म्हणायची मी सारखी, तुमी गप ऱ्हावा! तुमी गप ऱ्हावा!! पर त्येची भरपाई अशी करावी लागेल असं न्हाय बाय ध्यानात आलं. ही शिक्षाच झाली की.’
‘म्या म्हणते, जा बसा जा वाळवणाला राखण बसा. की निघालं गपगुमान. म्या म्हणते, च्या न्हाय करीत आता, की म्हणणार बरं, आन पुना गपचीप रहाणार. मी म्हणणार माहेरी जाते जरा, की निगाले घालवायला स्टांडापोत्तुर!!!’
‘असला कठपुतळी नवरा हाय माझा. ह्ये काय कामाचं. ती शेजारची तांबटाची आवा हाय का? आन् तिचा दादला, त्यो बापू म्हणत्यात तो; सक्काळ सक्काळ जी झकाझकी सुरु होतीय, ती त्यो दुपारच्या वक्ताला झोपला कीच बंद. ह्येला म्हणतात सोन्सार. न्हाय तर आमचं म्हतारं... गपचीप उठतंय, चीडीचीप गीळतंय आणि निपचित पडतंय. अजगर हाय जनू, आन मी अजगरीन.’ ह्या आपल्याच ‘इनोदा’वर खुदुखुदू हसूची फोडणी आहेच.
एकूणच सर्पकुळाचं आजीला प्रेम फार. तिला ‘दुतोंडी’ लोकं भेटायची, ‘डूख धरणारी’ भेटायची, ‘दुध पाजलं तरीबी विष ओकणारी’ भेटायची, जावयाची पोरं, तर ‘सापापेक्षा हरामखोर’ होती. नवऱ्याखालोखाल डामरट म्हणजे ही नातवंडं. ही ही बरीच होती. त्यांची लाडाची नावंही भोंग्या, राक्षस, बुक्कड अशी वरकरणी ओबडधोबड होती. पण नातवंडांच्या आठवणीनीही आजीच्या अंतरी अपार उमाळा दाटून यायचा. त्यांच्या खोड्यांच्या लटक्या, लाडिक तक्रारी करण्यात आजी रंगून जायची. दरवेळी यांच्या खोड्यांनी आजी बेजार झालेली असायची. अर्थात बेजार हे नुसतं सांगायला. मनातनं गुदगुल्याच होत असायच्या तिला. नातवंडाचं हिला कौतुक भारी, पण इतकी शहाणीसुरती आजी नातवंडांच्या हिशोबी बावळट होती. तिला इंग्लिश येत नाही हा तर मोठाच बावळटपणा होता.
‘बयाss इंग्लिश शिकीवत्यात मला. कम हियर म्हणजे म्हणे हिक्ड य्ये. आणि गो द्येअर म्हणजे जा मेल्या. अप म्हंजे वर आणि डाऊन म्हंजे खाली. येस् फेस् बोलतात आपापसात आणि मी बोलले की फिसिफिसी हासतात. फशीवतात हो मला फशीवतात. मला काय कळत न्हाय. परवा घरात दंगा घातला सगळ्यांनी, नुसता हैदोस केला. खाटेवरचे लोड आन तक्के खाली आणि खालची चटई खाटेवर, अशी तऱ्हा. मी चालता चालता लोडाला अडखळले बघा. मी इचारलं, ‘ह्यो लोड इथे डाउनलोड कुनी केला?’ मला कशाला कोन सांगतंय. सगळे मिळून हसून हसून गडबडा लोळायला लागले. मला काही समाजलं न्हाई. फशीवत्यात हो मला फशीवत्यात...’
सगळ्यांनीच हिला फशिवलं होतं म्हणताना तीचं स्वतःचं शरीर मागे राहील थोडंच? त्या शरीरानंही हिला फशिवलं. तिच्याही नकळत मृत्युनी मोठा आ वासला होता. तिच्या मुलामुलींना मी पुसटशी कल्पना दिली. उपचार महाग होते, बेभरवशाचे होते. आता शारीरिक दुःखामागे आर्थिक आणि कौटुंबिक ओढाताणीचं नेपथ्य दिसायला लागलं मला. या नेपथ्याच्या तलम कापडाआड मुखदुर्बळ म्हातारा नवरा, अगतिक लेकी आणि गतानुगतिक लेक ह्या पुढच्या प्रवेशातल्या पात्रांच्या हालचालीही दिसायला लागल्या मला. यांना स्वतःचे संसार होते. नव्या पिढीच्या जबाबदाऱ्या होत्या. म्हातारी मेल्याचं दुःख नव्हतंच. विंगेमागे मग जबाबदारी ढकलण्याचं नाट्य रंगात आलं. स्टेजवरचं नाटक पहाता पहाता, त्याहीपलीकडे, चुकून विंगेत सांडलेल्या प्रकाशात, न वापरलेल्या नेपथ्याचे तुकडे, जीर्ण दिवे, कोळीष्टकं दिसावीत; तसं तिच्या आणि मुलामुलींच्या संसारातील कुतरओढ, जुने हिशेब, जीर्ण हेवेदावे, भाऊबंदकी, बहीणबंदकी हे सगळं दिसायला लागलं मला.
दोन तीन महिने गेले आणि पडदा पाडणारा हातही दिसायला लागला!
अशातच ती आली एकदिवस. त्या दिवशीचा नूर काही निराळाच होता. ओढलेला, रया गेलेला चेहरा, खोल डोळे, हसू मावळलेलं. खूप खूप वेगळी दिसत होती ती आज. आली आणि म्हणते कशी, ‘सपष्टच सांगते तुला, मला म्हाताऱ्यानं फशीवली, पार ठकवली म्हणा ना. हात धरून ग्येला निघून.’ मी चमकलो म्हातारीच्या संसारातली सारी दुखः ‘घरोघरी मातीच्या चुली’ छापाची होती. पण हा पदर मला नवीनच होता. आता हा कुणाचा हात धरून गेला असेल? तमासगीर कोणी का कोणी शेजारीण? म्हातारपणात देखील देखणी दिसणाऱ्या ह्या म्हातारीत तिच्या मालकाला काय बरं न्यून दिसलं असेल? पण शेवटी मालक म्हटल्यावर चाकराठायी त्याला काहीतरी न्यून दिसणारच.
खरंतर मी, ‘कसं काय फशिवलं?’ असं विचारावं, म्हणून म्हातारी जीवाचा कान करून बसली होती. पण म्हातारीच्या फसवणूकीची चविष्ट कथा मला अजिबातच ऐकावीशी वाटेना. तिच्या ‘आये’ इमेजमध्ये हे असलं काही बसत नव्हतं. पण माझ्या ‘कसं?’साठी आतुर म्हातारी पुढे काही बोलेच ना. तिच्या आग्रही मौनापुढे शेवटी मी हरलो.
तिला विचारलं, ‘कसं’?
‘माज्या आधीच की हो म्हातारं निघून गेलं फुडं! यमदूताचा हात धरून ग्येलं बगा!!’
या वाक्याचा अर्थ लक्षात येताच मी गलबललो. टचकन पाणीच आलं डोळ्यात. म्हातारा जग सोडून गेला ही तिला फसवणूक वाटत होती. जे व्हायचं ते दोघांचं एकसाथ व्हावं ही तिची इच्छा. इच्छा कसली, तस्संच होणार अशी खात्रीच म्हणाना. म्हातारीनं आवंढा गिळला आणि माझ्याआधी तीच सावरली. उठली, एकदा चांगली रुंद हसली. सगळा तणाव निवळला होता आता. आपले थरथरते, सुरकुतलेले, कृश हात माझ्याभोवती फिरवून डोक्यावर बोटं मोडत, ती काहीतरी आशीर्वाद पुटपुटत राहिली. तिचे भुंडे हात आणि उघडं गोंदण आत्ता माझ्या नजरेत भरलं. मी काही विचारायच्या, बोलायच्या आत, ‘मला म्हाताऱ्यानं फशीवली, माज्या आधीच की हो निघून गेलं फुडं!’ असं बडबडत तडक निघुनसुद्धा गेली ती.