डॉ. शंतनू अभ्यंकर
वाई
डोळ्यातून टचकन पाणी काढणारे प्रसंग आता विरळाच.
आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे निबरही होत जातो. पूर्वी पायाला खडा बोचला तरी पाणी
यायचं डोळ्यात, आता पावलांची कातडी चांगली जाड झाली आहे. अनवाणी चालता येतं आता. वय
वाढलं, काटेही बोथट झाले आणि त्वचाही निबर. डॉक्टर माणसाला तर सुख थोडं, दुखः फार
अशाच अवस्थेत वावरावं लागतं. जो येतो तो आपली दुःखाची गाठोडी सोडायला लागतो.
पण रोज त्याच तिकिटावर तोच खेळ कुणाला रुचेल?
हळू हळू खेळातली गंमत संपते, नाट्य हरवतं. आला पेशंट तपासायचा आणि मार्गी लावायचा
एवढंच काम उरतं. पण तशातही कधीतरी मनाला चटका लावून जाणारं कुणीतरी भेटतं आणि कायम
स्मरणात रहातं.
अशीच एक म्हातारी भेटली होती मला, सुरकुतलेला
चेहरा, डोईवर रुंद काठाचा पदर, ठसठशीत कुंकू, नजर कौतूकानं ओथंबलेली आणि हसरा चेहरा.
ती आली, ती काहीतरी फुटकळ तक्रारी घेऊन. औषधांनी बरं वाटलं म्हणून पुन्हा आली, ‘बरं
वाटलं बरं का?’ हे सांगायला! गरज सरो आणि वैद्य मरोच्या जमान्यात, हे आक्रीतच. मग
अशीच येत राहिली. कधी शेजारणीला घेऊन कधी लेकीला, कधी सुनेला, कधी सहजच. पुढे
संसार वाढला, लेकी आपआपल्या संसारात रमल्या आणि सुना त्यांच्या त्यांच्या संसारात.
प्रेमानी होणारी लेकींची लांबलचक माहेरपणंही आखूड झाली. म्हातारीच्याच शब्दात
सांगायचं तर, ‘नातवंडं इंग्लिश शाळेत घातल्यामुळे लेकींना अभ्यास फार’. सुना तर
शेवटी सुनाच. नवऱ्याचे हातरूमाल कमरेला खोचून त्याही आपापल्या संसारात रमल्या.
म्हातारा होता, पण भारी अबोल. त्यामुळे सगळा
गोतावळा असूनही म्हातारी पडली एकटी. पण होती मात्र हसतमुख.
‘मला फशिवलं ग फशिवलं’, हाच तिचा मंत्र होता. मग
नातवाला खेळवत असो की आणखी काही. ‘रांडेच्या, फशीवलस मला, फळाफळा मुतलास की माज्या
लुगड्यात..!’ असं म्हणत नातवापेक्षाही जास्त आरडाओरडा करत हिचं काम चालायचं. हिला
फशिवणाऱ्यांची लांबलचक यादीच होती तिच्याकडे. तिच्या यादीत टॉपला होता, तिचा नवरा.
त्यानी किती तऱ्हांनी फसवलं याची गणतीच नाही.
‘मला त्यानी फशिवलं वं फशिवलं, अगदी दिवाळीच्या
पाडव्याला फशिवलं. कसंss, म्हंजे आसं बगा, मालकान् घेतला जिमीनीचा तुकडा, त्या
सालच्या दिवाळीला. होss.’
मला म्हनला, ‘हाच तुजा पाडवा.’
मी म्हणत व्हते, ‘...गळसरी हवी होती.’
त्यावरून रुसले की मी. ‘त्याला काय सुद्रेना, मी
का रुसले ते. लेडीज लोकांचं समदं काय समजत न्हाई जेन्ट्स माणसाला. हेss भांडान
पेटलं आमचं.’
माला म्हणतो कसा, ‘एवडी जिमीन घेतली, गळसरी परीस
म्हागाची, तरीबी तुला कवतिक न्हाय.’
मंग मी म्हनाले, ‘बाबा घेतलीस जिमीन, घेतलीस. पण
आता जिमिनीचा तुकडा गळ्यात घालून थोडाच मिरवता येतो? गळसरी कसं, घातली की चार
बायका विचारणार, कधी केली, कुठे केली, कितीचा डाग? जिन्नस मिरवण्यातली सगळी जंमत
जिमीनीत हाय व्ह्य?’ तवा मी म्हन्ते, फशिवलं पार मला!’ एवढं बोलून म्हातारी खुदुखुदू
हसायला लागली.
एवढ्या मोठया वयाची आजी चक्क आपल्या नवऱ्याला
अरे तुरे करते हे नवलच. एकदा मी विचारलंच तिला...
‘आमचा पिरेम विवाह हाय. माज्या शेजारीच होता.
चांगला धिप्पाड गडी होता. आवडला. धरला हात आणि नरसोबाच्या वाडीला पाट लावूनच घरी
आलो आम्ही. मग कशाला आओ नी जाओ म्हन्ते मी? पण चार लोकात बरं दिसंना, तवा सवय केली
आणि ‘आहोss’ अशी बाकीच्या बायांसारकी हाक मारायला लागले. पण तवा बी, मोठ्यानी जरी
अवो म्हन्ल का, की लग्येच मनात मी ‘अरे विज्या’ म्हणून टाकायची. फिट्टम फाट. मी बी
अशी फसवायची त्याला...’ पुन्हा एकदा खुदुखुदू हसू सुरु.
‘पण लाडात आले, आपलं आपलंच घरी आसलं की विज्याच
म्हणायची मी. फुड पाच प्वोरं झाली का... की लाडात यायला टायमच न्हाय. लाडापरीस
भांडानच जास्त. मग रागावले की अरे तुरे करायची त्याला. लाडाचं नाव रागाचं झालं
बगा. आता लाड कमी आणि राग जास्त, त्यामुळे परत अरेतुरेच आहे तोंडात.’
कोण तिच्या मते कधी आणि कसं फसवेल याचा नेम
नसायचा. तिचं मोतीबिंदूच ऑपरेशन झालं. आलीच सांगत... ‘अवं फशिवलं मला, साप फशिवलं.
घरात कोपऱ्यात पडून होते. पावलावरून आलं गेलं वळखीत होते. पण आता लख्ख दिसायला
लागलन् काय! म्या काय म्हणलंवतं, त्या डोळेवाल्या डागदरला... आपलं-आपलं झाड्याला जाता
येईल एवढंच आप्रेशन कर. या वयात जास्त न दिसलेलंच चांगलं. त्ये नात्वंडास्नी
म्हणायचं, ‘परसाकडंला न्ये’, म्हणजे त्ये वंगाळ वाटतंय बगा. पर त्यांनी फशिवलं मला
म्हातारीला. चांगलं सपष्ट दिसाया लागलं की. सुईत दोरा ओव्ते, लांबून माणूस वळखाय
यीतो... प्येप्रातले शरद पवार वळीखते म्या! पण इतकं कशाला दिसावं म्हणते मी? बरं दिसलं
की बघावं लागतंय, बघितलं की बोलावं लागतंय... आन समदा घोटाळा आन गोन्दुळ... आता
केर दिसतो, पसारा दिसतो, खरकटं, सांडमांड सगळं दिसतं. मग मी बोलते, मग सूना बोलतात,
मग बोलाचाली सुरु. म्हणून म्हणते त्या डोळेवाल्यान् फशिवलं मला!’
स्पष्ट दिसणं हे डॉक्टरचं यश नसून अपयश आहे हे
ऐकून मला हसूच आलं. निव्वळ संडासला आपापलं जाता यावं एवढीच तिची अपेक्षा होती आणि
अपेक्षेबाहेर यश हे नकोसं होतं तिला. तीही फसवणूकच होती. या वयात जास्त न दिसलेलंच
बरं, हे तीचं व्यावहारिक शहाणपण. इतक्या वर्षाच्या अनुभवाचं संचित.
जगाचा जरा जास्तच अनुभव होता आजीला. खेड्यात
लहानाची मोठी झालेली, मोठी होताच लग्न होऊन मुंबईला सासरी गेलेली. तिथे राहून
चांगली स्मार्ट झाली होती आजी. शिवाय संसाराला हातभार म्हणून वीस वर्षात दहा
प्रकारचे उद्योग केलेले. एका अनाथाश्रमात आया होती. मग तिथले कपडे शिवून द्यायच्या
मिषानी टेलरिंग काम करायला लागली. मग काही दिवस मेस चालवलीन. हे होईना तेंव्हा
भेळेची गाडी काढली. घरगुती मसाले विकले. रिक्षा घेऊन ती भाड्यानी दिली. शिवसेनेची
शाखाप्रमुखसुद्धा झाली.
ह्या सगळ्या धंद्यांची आणि त्यातल्या फसगतीची
रसभरीत वर्णन चालायची.
‘म्येसचा धंदा ब्येस आसं आपलं म्हनायचं. काय खरं
नाय. बारा म्येम्बर होते बगा माझ्याकडं. कितीss? बारा. पर एक येणार धाला तर एक
उगवणार तीनला. मन्जे मला उसंतच न्हाई की. सकाळची चूल विझेपोत्तर संध्याकाळचं
रांधायला सुरु. शिवाय आला का प्रत्येकाची घाई. जो तो आपला घोड्यावर. चुलीच्या
ढुंगणातून बाहेर पडे पर्यंतबी दम न्हाय. पण फशिवलं हो मला. लय जीव लावायची पोरं.
सगळे लहान लहान हुते. मी बी धाकल्या दिरासारखी माया करायची. योक होता बंडू. लई
जीवाचा माझ्या. दोन वर्षानी लगीन झालं तवा म्हणतो कसा, ‘मावशी, बायकोसंगट तुज्या
मेशीलाच येणार मी. घरी वायली चूल करून काय करू?’ पण आला का? लग्न झालं, कुटे लांब
रूम मिळाली, झाला की पसार. चिठ्ठी नाय का निरोप नाय. मी वाट बघत्येय, आज येईल
उद्या येईल.. पत्त्या नाही.. त्याच्या पाठोपाठ आणखी तिघांची लग्न झाली बघा. आले
नंतर भेटीला, दोघं तर बायकूला म्येस दावायलाss, मावशी दावायलाss, घेऊन आले! मला
अगदी उलघाल हो, नवी मुलगी बघायची, सूनच की माजी... माला लाख त्याची बायकू बघायची
होती पण तिला काय म्येसवाली मावशी बघायचीच नव्हती. मुंडी खाली, नजर पायाला, च्या
घेतला का, की योकच शबूद, ‘चला!’ असल्या पोरी हो ह्या. मग कशाला हो माया लावून यायाचं? ...असे बघा मेम्बर
तुटत गेले... फशिवलं हो समद्यानी मला. आता कोण कुठे आहेत, आहेत का नाहीत, काही
ठावूक न्हाय.’
‘एक कावळा बी पाळला होता म्या. म्हणजे मी कशाला
पाळत्येय, तोच रोज खरकटं चीवडायला यायचा. पण मी ओळखायला लागले त्याला. सगळे काळेच,
पण हा जरा एका पंखाखाली भुरा होता. मान जरा लांब होती. आवाज पण मी वळखायची. मग मीच
त्याला काय काय ठेवायची. कदी माशाची डोकी, कदी काई कदी काई. एके दिवशी दुपारी जरा
लवंडले होते, तो हेss कावळ्यांचा कलकलाट झाला बाहेर. खिडकीतून बघते तो काय, हा
लटकलेला लाईटच्या तारेला. तडफडून गेला हो जीव. इतकं गलबललं मला. त्या दिवशी
म्येसला खाडा केला मी. घरातच न्हाई थांबले. गाववाल्याकडे मयत झालं कांजुरमार्गला
असं निरोप ठेऊन समोरच्या हिराबाईकडे जाऊन बसले. त्यानी बी फशीवलंच की मला. आसं
माज्या देखत तडफडून कशाला मरायचं म्हणते मी. लांब जायाचं ते यायाचंच न्हाई. मी काय
ते समाजले आसते. आता ह्यो मला डोळ्यापुढे दिसणार का न्हाई सतत? रोज माजा घास
खायचा. पोशिंदी मी होते, होते ना? तर माजा इचार घेतल्याबिगार हा असा कसा मरतो
बापा? फशिवलं का नाय त्यानं मला?’
कावळ्याची ही गोष्ट ऐकून कालवलंच काळजात माझ्या.
ही त्याची पोशिंदी, तेंव्हा कावळ्याचं अपघाती मरण हेही तिला अमान्य होतं. तो काय
हिचंच खरकटं चिवडत होता असं थोडंच आहे. तो जिथे मिळेल तिथे चोच मारतच असेल की.
ऋणानुबंध आजीनी जोडला होता. एकतर्फी. पण एकदा माया केली की न फसवणं ही
प्रतिपक्षाची जबाबदारी होती. कावळा तो कावळाच. पण पोटच्या पोरानीही अशीच फसगत केली
होती तिची. त्याच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा चूक नव्हतीच.
‘थोरला लई मायेचा. शिकला पण नोकरी नव्हती तर
घरात यायला बी शरमायचा. चोरासारखं रहायचा. खाल मानेनं जेवायचा. मी समजावलं
त्येस्नी, ‘आरे, आसं नवऱ्यानी टाकलेली बाय म्हाहेरला रहाती, तसा कानकोंडा कशापायी
रहातुस?’ असा मी म्हणाले का, का चार दिवस कसा राजासारका ऱ्हाणार. आन् मग कुटं
इंटरवू का कशाला गेला, कोण काय बोललं असल तिथे; आला, अचानक घराबाहेर गेला, गेला तो
रेल्वे खाली जीवच दिलान बघा. आसं घर आन आशी रेल्वे. काय बोलनं नाय सांगनं नाय,
आस्स फशिवलं बघा मला.’
हा धक्का जबरदस्त होता. म्हातारीनं संभाळलं
स्वतःला लवकर. पण म्हातारा? तेंव्हा तो फारसा म्हातारा नसूनही, जो गप्प गप्प झाला
तो काही बोलेना, काही करेना, नुसता घरात. मग म्हतारीनीच कंबर कसली. त्याला नायर
हॉस्पिटलला नेला, बरा केला आणि संसार रूळावर आणला. पण नैराश्याची ही आळी मिळी गुप
चिळी मधून मधून डोकं वर काढतंच रहायची. सगळं काही मनासारखं असूनही, कधीकधी महीनोंमहिने म्हातारा गप्प
असायचा. वय वाढलं तसं हे मौन पण वाढलं. म्हातारी पुन्हा एकदा फसगत झाल्याचं
गाऱ्हाणं घालायला आली.
तिची एकच तक्रार, ‘बोलत तर न्हाईच पण भांडततंडत
सुद्धा न्हाई हो बला!’
‘म्हणजे भांडायला कशाला हवं?’
‘वेळ जातो. पिर्माच्या माणसानी भांडण टाकणं बरं
न्हाई. नुसतंच मी त्याच्या तोंडाकडे आनि त्यानी माझ्या तोंडाकडे किती वेळ बघत
बसायचं? खरंतर मीच ही घूम्म रहायची सवय लावली. पूर्वी जास्त तणतण करायला लागला की
म्हणायची मी सारखी, तुमी गप ऱ्हावा! तुमी गप ऱ्हावा!! पर त्येची भरपाई अशी करावी
लागेल असं न्हाय बाय ध्यानात आलं. ही शिक्षाच झाली की.’
‘म्या म्हणते, जा बसा जा वाळवणाला राखण बसा. की
निघालं गपगुमान. म्या म्हणते, च्या न्हाय करीत आता, की म्हणणार बरं, आन पुना गपचीप
रहाणार. मी म्हणणार माहेरी जाते जरा, की निगाले घालवायला स्टांडापोत्तुर!!!’
‘असला कठपुतळी नवरा हाय माझा. ह्ये काय कामाचं.
ती शेजारची तांबटाची आवा हाय का? आन् तिचा दादला, त्यो बापू म्हणत्यात तो; सक्काळ
सक्काळ जी झकाझकी सुरु होतीय, ती त्यो दुपारच्या वक्ताला झोपला कीच बंद. ह्येला
म्हणतात सोन्सार. न्हाय तर आमचं म्हतारं... गपचीप उठतंय, चीडीचीप गीळतंय आणि
निपचित पडतंय. अजगर हाय जनू, आन मी अजगरीन.’ ह्या आपल्याच ‘इनोदा’वर खुदुखुदू हसूची
फोडणी आहेच.
एकूणच सर्पकुळाचं आजीला प्रेम फार. तिला
‘दुतोंडी’ लोकं भेटायची, ‘डूख धरणारी’ भेटायची, ‘दुध पाजलं तरीबी विष ओकणारी’
भेटायची, जावयाची पोरं, तर ‘सापापेक्षा हरामखोर’ होती. नवऱ्याखालोखाल डामरट म्हणजे
ही नातवंडं. ही ही बरीच होती. त्यांची लाडाची नावंही भोंग्या, राक्षस, बुक्कड अशी
वरकरणी ओबडधोबड होती. पण नातवंडांच्या आठवणीनीही आजीच्या अंतरी अपार उमाळा दाटून
यायचा. त्यांच्या खोड्यांच्या लटक्या, लाडिक तक्रारी करण्यात आजी रंगून जायची. दरवेळी
यांच्या खोड्यांनी आजी बेजार झालेली असायची. अर्थात बेजार हे नुसतं सांगायला. मनातनं
गुदगुल्याच होत असायच्या तिला. नातवंडाचं हिला कौतुक भारी, पण इतकी शहाणीसुरती आजी
नातवंडांच्या हिशोबी बावळट होती. तिला इंग्लिश येत नाही हा तर मोठाच बावळटपणा
होता.
‘बयाss इंग्लिश शिकीवत्यात मला. कम हियर म्हणजे
म्हणे हिक्ड य्ये. आणि गो द्येअर म्हणजे जा मेल्या. अप म्हंजे वर आणि डाऊन म्हंजे
खाली. येस् फेस् बोलतात आपापसात आणि मी बोलले की फिसिफिसी हासतात. फशीवतात हो मला फशीवतात.
मला काय कळत न्हाय. परवा घरात दंगा घातला सगळ्यांनी, नुसता हैदोस केला. खाटेवरचे
लोड आन तक्के खाली आणि खालची चटई खाटेवर, अशी तऱ्हा. मी चालता चालता लोडाला अडखळले
बघा. मी इचारलं, ‘ह्यो लोड इथे डाउनलोड कुनी केला?’ मला कशाला कोन सांगतंय. सगळे
मिळून हसून हसून गडबडा लोळायला लागले. मला काही समाजलं न्हाई. फशीवत्यात हो मला फशीवत्यात...’
सगळ्यांनीच हिला फशिवलं होतं म्हणताना तीचं
स्वतःचं शरीर मागे राहील थोडंच? त्या शरीरानंही हिला फशिवलं. तिच्याही नकळत
मृत्युनी मोठा आ वासला होता. तिच्या मुलामुलींना मी पुसटशी कल्पना दिली. उपचार
महाग होते, बेभरवशाचे होते. आता शारीरिक दुःखामागे आर्थिक आणि कौटुंबिक ओढाताणीचं
नेपथ्य दिसायला लागलं मला. या नेपथ्याच्या तलम कापडाआड मुखदुर्बळ म्हातारा नवरा,
अगतिक लेकी आणि गतानुगतिक लेक ह्या पुढच्या प्रवेशातल्या पात्रांच्या हालचालीही
दिसायला लागल्या मला. यांना स्वतःचे संसार होते. नव्या पिढीच्या जबाबदाऱ्या
होत्या. म्हातारी मेल्याचं दुःख नव्हतंच. विंगेमागे मग जबाबदारी ढकलण्याचं नाट्य
रंगात आलं. स्टेजवरचं नाटक पहाता पहाता, त्याहीपलीकडे, चुकून विंगेत सांडलेल्या
प्रकाशात, न वापरलेल्या नेपथ्याचे तुकडे, जीर्ण दिवे, कोळीष्टकं दिसावीत; तसं
तिच्या आणि मुलामुलींच्या संसारातील कुतरओढ, जुने हिशेब, जीर्ण हेवेदावे, भाऊबंदकी,
बहीणबंदकी हे सगळं दिसायला लागलं मला.
दोन तीन महिने गेले आणि पडदा पाडणारा हातही
दिसायला लागला!
अशातच ती आली एकदिवस. त्या दिवशीचा नूर काही
निराळाच होता. ओढलेला, रया गेलेला चेहरा, खोल डोळे, हसू मावळलेलं. खूप खूप वेगळी
दिसत होती ती आज. आली आणि म्हणते कशी, ‘सपष्टच सांगते तुला, मला म्हाताऱ्यानं
फशीवली, पार ठकवली म्हणा ना. हात धरून ग्येला निघून.’ मी चमकलो म्हातारीच्या
संसारातली सारी दुखः ‘घरोघरी मातीच्या चुली’ छापाची होती. पण हा पदर मला नवीनच
होता. आता हा कुणाचा हात धरून गेला असेल? तमासगीर कोणी का कोणी शेजारीण? म्हातारपणात
देखील देखणी दिसणाऱ्या ह्या म्हातारीत तिच्या मालकाला काय बरं न्यून दिसलं असेल?
पण शेवटी मालक म्हटल्यावर चाकराठायी त्याला काहीतरी न्यून दिसणारच.
खरंतर मी, ‘कसं काय फशिवलं?’ असं विचारावं,
म्हणून म्हातारी जीवाचा कान करून बसली होती. पण म्हातारीच्या फसवणूकीची चविष्ट कथा
मला अजिबातच ऐकावीशी वाटेना. तिच्या ‘आये’ इमेजमध्ये हे असलं काही बसत नव्हतं. पण
माझ्या ‘कसं?’साठी आतुर म्हातारी पुढे काही बोलेच ना. तिच्या आग्रही मौनापुढे
शेवटी मी हरलो.
तिला विचारलं, ‘कसं’?
‘माज्या आधीच की हो म्हातारं निघून गेलं फुडं!
यमदूताचा हात धरून ग्येलं बगा!!’
या वाक्याचा अर्थ लक्षात येताच मी गलबललो. टचकन
पाणीच आलं डोळ्यात. म्हातारा जग सोडून गेला ही तिला फसवणूक वाटत होती. जे व्हायचं
ते दोघांचं एकसाथ व्हावं ही तिची इच्छा. इच्छा कसली, तस्संच होणार अशी खात्रीच
म्हणाना. म्हातारीनं आवंढा गिळला आणि माझ्याआधी तीच सावरली. उठली, एकदा चांगली
रुंद हसली. सगळा तणाव निवळला होता आता. आपले थरथरते, सुरकुतलेले, कृश हात माझ्याभोवती
फिरवून डोक्यावर बोटं मोडत, ती काहीतरी आशीर्वाद पुटपुटत राहिली. तिचे भुंडे हात
आणि उघडं गोंदण आत्ता माझ्या नजरेत भरलं. मी काही विचारायच्या, बोलायच्या आत, ‘मला
म्हाताऱ्यानं फशीवली, माज्या आधीच की हो निघून गेलं फुडं!’ असं बडबडत तडक
निघुनसुद्धा गेली ती.
No comments:
Post a Comment