Thursday 2 March 2017

पार्थ

पार्थ

पार्थ ही एक खास जमात आहे. राहणार, शक्यतो पुणे किंवा महाराष्ट्रातील कोणतेही शहर. कोणतेही नको, पुणेच धरूया. उमर वर्षे दहा ते बारा. पार्थपिता इंजिनियर असतो आणि पार्थमाता प्रोफेशनल. पार्थचे पप्पा सडपातळ असतात. फक्त पोट सोडून. ते कमी करायचे त्यांचे निकराचे प्रयत्न सतत चालू असतात पण सद्ध्या ऑफिसात स्ट्रेस खूप असल्यानी चार दिवस हे प्रयत्न खुंटीला, म्हणजे हँगरला टांगलेले असतात. पार्थची मम्मी मात्र जिगर टिकवून असते. त्या ऋजुता दिवेकरबाईंचं पुस्तक तिनी वाचलेलं असतं, आणि भिशीमधल्या अघोषित डायेट कॉम्पिटीशनमधली ती अघोषित विनर असते. हिचा बांधा सडपातळ असून बुद्धीमत्तेत ही पप्पाच्या चांगली ब्रेसलेटभर सरस असते.
 पार्थ, हे एकुलते एक असतात. त्यामुळे पार्थची आई, मुलीची तहान पार्थवर भागवत असते. त्याला तो कळत्या वयाचा होईपर्यंत फ्रॉकच घाल, वेण्या आणि रिबिनी बांध, त्याला पार्थुली आली, पार्थुली गेली असं स्त्रीलिंगी नाम आणि  क्रियापद वापर, फॅन्सीड्रेसमधे त्याची झाशीची राणीच बनव; हे असले प्रताप या आया करत रहातात. पार्थांना एकुलती एक कझीन ब्रो अँण्ड/ऑर सीस् असतात.  ह्यांचीही नावं शर्व, तक्षिल, चित्रांगद, किंवा गार्गी, दाक्षायणी, लीलावती अशी थेट पुराणकालीन असतात. नावं प्राचीन, पण हे  वगळता बाकी सगळं सगळं अर्वाचीन असतं या साऱ्यांचं.
सगळे पार्थ बर्म्युडा आणि टी शर्ट घालतात. हाफ शर्ट घालत नाहीत. फुल शर्ट घालतात. सगळी बटणं असलेलाच, इस्त्रीचाच आणि नेमक्या मापाचाच. लांडा किंवा ढगळ कपडा पार्थकडे नाहीच. विटकाचिटका तर नाहीच नाही. हां, पण आता फॅशनच मुळी लांड्यालुटक्या आणि विटक्या चीटक्या कपड्यांची आली, तर पार्थचा नाईलाज असतो. मग तसे कपडे आपोआपच येतात. कारण पार्थचा वॉर्डरोब हा वेळोवेळी अपडेट होत असतो. पार्थचे कपडे हे ब्रँण्डेड असतात. त्यासाठी आईबापानी अव्वाच्या सव्वा किंमत मोजलेली असते. पप्पाची खरेदी जिथून होणार तिथूनच पार्थची, हे अगदी ठरलेलंच आहे. त्याचा पार्थच्या पप्पाला आणि मम्मीला सार्थ अभिमान आहे.
सगळे पार्थ चष्मे घालतात. काहींचे मोठ्या नंबरचे असतात काहींचे बारीक नंबरचे. मोठया नंबरचा चष्मा पार्थला विशेष शोभून दिसतो. पण हे अंडरस्टेटमेंट झालं. खरंतर पार्थामुळे मोठया नंबरच्या चष्म्याला शोभा येते, असं म्हटलं पाहिजे. पण बिनचष्म्याचा पार्थ ही कन्सेप्टच चुकीची आहे. एखादा असलाच बिनचष्म्याचा तर तो मनातून आपण स्कॉलर नसल्याबद्दल खंतावलेला असतो. आपण आपल्या अद्वितीय  डीएनएद्वारे, आपल्या मुलात साधा चष्मा लागण्याइतकीही बुद्धीमत्ता संक्रमित करू शकलो नाही, याचं त्याच्या मम्मी पप्पालाही भयंकर वैषम्य वाटतं. सगळी अतिबुद्धीमान, शहाणी, कसली कसली पटू वगैरे मुलं आपल्याला व्हायची सोडून, पटापट इतरांनाच कशी होतात हे त्यांना न सुटलेलं कोडं आहे.
सर्व पार्थांचे वय सुमारे दहा ते बारा वर्ष असते. या वयाहून ते मोठे होतच नाहीत. म्हणजे त्यांचे आईबाबा अशी खास काळजी घेतात की ते याहून मोठे होऊच नयेत. सगळ्या पार्थांना त्यांचे त्यांचे  मम्मी पप्पा ‘पिल्लू’ म्हणतात. हे पिल्लू मोठं व्हायला लागलं की ह्यांना अत्यंत अस्वस्थ वाटायला लागतं. मग ते त्याला सारखं जवळ घेतात, ओढून ओढून मांडीवर बसवतात, त्याच्या पप्या घेतात, त्याच्याशी बोबडं बोलतात, त्याच्या ‘टायगर’नावाच्या महाकाय अल्सेशिअनला भूभू किंवा डॉगी म्हणतात आणि एकूणच त्याला लहान ठेवायचे प्रयत्न निकरानी जारी ठेवतात.
उठल्या उठल्या  मम्मी विचारते, ‘ब्लश झाला का पिलूचा?’
कपाळावर आठी चढवत पार्थ उत्तरतो, ‘ब्लश काय म्हणतेस, ब्रश म्हण की!’
दाढी घोटता घोटता पप्पा पचकतो, ‘उद्या तो कॉलेजला निघाला तरी विचारशील, ‘ओ, गं माझ्यं पिल्लू, आज् दॉडी नै केली?’’
असे वाद संवाद झडत रहातात.
यातलाच ‘मी त्याला शिस्त लावतोय तर तू त्याला पक्का लाडोबा बनवत्येस’ विरुद्ध ‘मी.त्या.शि. लावत्येय त.तू.त्या.प.ला. बनवतोयस’; असाही एक धगधगता वाद आहे. अर्थात वादात कशाला पडा? पप्पा मम्मी दोघंही समजूतदार आहेत. त्यामुळे  मम्मी पप्पा एकमेकांच्या अपरोक्ष पार्थावर प्रेमाचा, लाडाचा, वात्सल्याचा, प्रींग्ल्सचा आणि कॅडबरीचा वर्षाव करतात. पार्थ खूषच की, दोन्ही घरचा पाहुणा तुपाशी! मुळाशी भरपूर खत, पाणी, ड्रीप इरिगेशन आणि त्याच वेळी वरून छाटून छाटून बोन्साय करण्याचे प्रयत्न, असा दुहेरी हल्ला असतो हा. पार्थ ह्या ह्ल्ल्यानी गलितगात्र न झाला तरच नवल. पण पार्थ हार जात नाही, चष्मा सांभाळत, बर्म्युडा सावरत, खिशातला मोबाईल चाचपत तो क्लास, हॉबी क्लास, शाळा, स्पर्धा, सिनेमा, कॅम्प, बड्डे, गिफ्ट्स, रिटर्न गिफ्ट्स, मॅक्डी, पार्टी, स्कूल बस टायमिंग, शॉपिंग, गेमिंग, मॉलिंग, सायकलींग, जीमिंग, स्विमिंग अशा अनेक आघाड्या सांभाळत असतो.
एकूणच पार्थानी जन्मतःच अनेक वादांना तोंड फोडलं होतं. मराठी का इंग्लिश मिडीयम शाळा असाही एक वाद खेळण्यात आला. अर्थात विजय ब्रिटीशांचा होणार हे ठरलेलंच होतं. पण ह्या वादामुळे, मुलाला आपण विचारपूर्वक इंग्लिश शाळेत घातल्याचं स्वर्गीय समाधान पप्पाला प्राप्त झालं; आपले डीबेटिंग स्किल्स शाबूत असल्याचं मम्मीला कळलं आणि पार्थ शाळेत जाण्याऐवजी स्कूलला जाऊ लागला.
हे तर काहीच नाही, पार्थ चिमखडे बोल बोलायच्या आतच इकडे ‘आई-बाबा’ का ‘मम्मी-पप्पा’ यावर परिसंवाद झडले होते. शिवाय ‘अहो पप्पा’ का ‘ए पप्पा’ हाही एक सखोल चर्चेचा मुद्दा होता.  पार्थ आता पप्पाला ‘ए पप्पाच’ म्हणतो. पप्पानीच तसं त्याला स्पष्ट बजावलेलं आहे. त्याशिवाय स्त्री-पुरुष समानता ती कसली? ‘अहो पप्पा’ म्हटलं की पप्पा लांबचा वाटतो, म्हणजे अॅज कंम्पेर्ड टू, ‘ए मम्मी’. ‘ए मम्मी’ मुळे मम्मी जवळची वाटते. धिस इस ऑबव्हीयसली स्त्री-पुरुष असमानता. त्यामुळे ‘ए पप्पा’च चांगलं.
पण ‘ए पप्पा’ आणि ‘अहो पप्पा’च्या रस्सीखेचीत मम्मीनी हळूच स्वतःची ‘आई’ करून घेतली आहे. त्यामुळे आता ‘ए आई’ आणि ‘ए पप्पा’ असं ईक्वेशन आहे. म्हणजे पुन्हा स्त्री-पुरुष असमानता आलीच. ‘अहो पप्पा’ पेक्षा ‘ए मम्मी’ जवळची आणि ‘ए मम्मी’ पेक्षा ‘ए आई’ जवळची. येणेप्रमाणे स्त्री-पुरुष समानतेचा पप्पापुरस्कृत पहिलावहिला आणि एकमेव प्रयत्न मम्मीनी उधळून लावला आहे. समाजातली स्त्रीप्रधान संस्कृती काही केल्या हटत नाही हेच खरं.
  खरंतर पार्थची वागणूक आणि गुणवत्ता ही पप्पानीच त्याला ‘अहो पार्थ’ अशी हाक मारावी, एवढी आहे. पण लोकलज्जेस्तव पप्पा तसं करत नाही एवढंच. कारण पप्पा पार्थच्या वयाचा होता तेंव्हा त्याच्या नावावर तीन दगडात तीन चिंचा लागोपाठ पाडण्याचा एक विक्रम वगळता दुसरा कोणताही विक्रम नोंदलेला नव्हता. पार्थचं तसं नाही. तो गणितात पक्का आहे, गीता पठणात पक्का आहे, अॅबॅकसमधे दुसरा आणि डान्समधे दुसरा आहे. क्रिकेट आणि चित्रकलेतही तो पक्का असून, पळण्यात आणि स्पेलिंग-बीमधे दुसरा आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्यात पार्थ दुसरा नसतो त्यात तो पक्का असतोच असतो आणि ज्यात तो पक्का नसतो त्यात तो दुसरा असतो! असा हा पार्थ. शिवाय टीचरचाही तो  फेवरेट आहेच. शिवाय कॅम्पला एकटा जाऊन तब्बल एक रात्र घराबाहेर घालवल्याचाही एक विक्रम त्याच्या नावे आहे.
शिवाय प्रोजेक्ट मधे तो फारच परफेक्ट आहे. मुख्य म्हणजे शाळेतून प्रोजेक्टाईल सुटल्याची कल्पना तो मम्मी-पप्पाला वेळेवर देतो. त्यामुळे त्यांची ऐनवेळी धावपळ होत नाही. त्यामुळे ते आधीच सगळं डाऊनलोड वगैरे करून ठेवतात. त्यामुळे पार्थला सगळं कॉपी करणं सोपं जातं. त्यामुळे त्याचा बरेचदा दुसरा आणि कधी कधी तिसरा नंबर येतो. बाकीच्याचं तसं नाही. पार्थचा  हा गुण अगदी दुर्मिळ आणि इतर मुलांनी घेण्यासारखा आहे. ती मुलं अगदी आदल्या रात्री झोपताना उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचं असल्याचं सांगतात. त्या भानगडीत मम्मी-पप्पाची झोप उडते. कधीकधी तर हे प्रोजेक्टाईल गृहकलहास कारणीभूत ठरतात.
आणखीही एक गृहकलह सतत तेवत असतो. त्याचं काय असतं, पार्थपिता एका खेड्यात लहानाचा मोठा झालेला असतो. त्याचं घर असतं शेणाचं. पार्थमाता असते अगदी मेट्रोकिड. तीचं घर असतं मेणाचं. तिला या शेणाच्या घराशी काहीसुद्धा देणंघेणं नसतं. पण पार्थपप्पाला असतं. दर दोन चार वर्षानी आपलं घर, आपला गाव, आपली शाळा, त्या बाहेरचा तो पार, तो आठवड्याचा बाजार, तो घाणेरडा वासमारू मासळी बाजार असं सगळं सगळं पार्थला दाखवायची, पप्पाला खाज येते. मग पार्थला आणि पार्थमातेला घोड्यावर घालून तो गाडीत बसवतो आणि स्वतः पार्थसारथी होऊन त्यांना  गावी आणतो. पप्पा जेंव्हा पार्थला शाळा दाखवतो तेंव्हा पार्थ मोबाईलवर गेम खेळतो. पप्पा जेंव्हा पार्थला पार दाखवतो, तेंव्हा पार्थ टॅबवर चॅट करत असतो. पप्पा जेंव्हा  पार्थला बाजार दाखवतो तेंव्हा नेमका पार्थला सातासमुद्रपलिकडच्या मित्राचा व्हॉट्सअप कॉल येतो. पप्पा जेंव्हा पार्थला  मासळी बाजार दाखवतो तेंव्हा तर पार्थला प्ले स्टेशनवर नेक्स्ट लेव्हल पार केल्याचं दिसतं आणि पार्थचा आनंद गगनात मावत नाही. पप्पाचं दुखःही गगनात मावत नाही. पप्पा खट्टू होतो. पार्थही पप्पानी सारखं डिस्टर्ब केल्यामुळे खट्टू होतो.
दोन्ही खट्टू तसेच पुढे जातात. पुढच्या वळणावर तर आजोबांची शाळा येते. दर सुट्टीनंतर, आजोबांच्या शाळेतला  पहिल्या दिवशीचा कार्यक्रम, म्हणजे गावातून शेण गोळा करून शाळा सारवणे. हे ऐकून पार्थचा आजोबांबद्दलचा आदर संपतो, पप्पाबद्दलचा उणावतो आणि स्वतःबद्दलचा दुणावतो. काऊडंगच्या जमिनीवर आपले फीट ठेवायच्या कल्पनेनीच पार्थला कसंनुसं होतं. खरंतर एक सोशल रिस्पॉन्सीबिलीटी म्हणून, एक ब्रॉड परस्पेक्टिव्ह यावा म्हणून, ही माहिती पप्पानी शेअर केलेली असते. पण पार्थ हा शेवटी पार्थ आहे. पण सारवणामुळे त्याला आजोबांचं वैषम्य वाटतं. तसंच त्याला पप्पाच्या स्कूलमेटचं, शेतीपंपाच्या स्क्रू-नट-बोल्टचं दुकान आहे, हे पाहून पप्पाचं वैषम्य वाटतं. मग बऱ्याच प्रयत्नानी पप्पा त्याला पटवतो की असं दुकान असणंही रेस्पेक्टेबल आहे. येणेप्रमाणे पप्पा, पार्थच्या डोक्यातला रिस्पेक्टेबलीटीचा जुना स्क्रू काढून नवा फिट्ट बसवतो.
पप्पा इंजीनिअर आहे हे एक बरं आहे. पार्थाच्या मेंदूतले स्क्रू तो भराभरा बदलतो. मध्यंतरी पार्थला शाळेत ज्यूलीअस सीझरचा प्रवेश होता गॅदरिंगला. मार्क अॅन्टोनीची सोलीलोक्वी काय बोलला तो! त्या वेळी पप्पानी त्याच्या डोक्यात मार्क अॅन्टोनीचा स्क्रू बसवला होता. शिवाय कास्काची स्प्रिंग आणि ब्रुटसचा वॉशरही घातला होता. पुढे एकदा शनिवार वाडा पहायला गेला तेंव्हा हा वॉशर काढून आनंदीबाईचा बसवला. त्याच वेळी पूर्वी कधीतरी बसवलेला मॅकीआवेलीचा स्क्रू काढून नाना फडणविसांचा घातला होता. पण पुढे न वापरल्यामुळे हा गंजून गेला. तो काढून मग इंडोनेशियाच्या हिस्टरीचा बसवला; त्यावर्षी शाळेत ती हिस्टरी होती ना. मग सुट्टीत शांतीनिकेतन पहायला गेला तेंव्हा पप्पानी आधीचे सगळे स्पेअर पार्ट काढले आणि रविंद्र संगीत, सत्यजित रे, बंगाली क्रांतिकारक आणि वंगभंगाची चळवळ असे सगळे नवे पार्ट कोलकत्यातच घेऊन बसवले. शेवटी पप्पा तरी काय करणार, तो इंजीनीअर असला तरी पार्थचं डोकं तर फिक्स साईझचं आहे. त्यात कोंबणार तरी काय काय, आणि किती किती? मग असंच आधीचं काढून नवीन घालायला लागतं. काय ठेवायचं अन काय काढायचं ते  काळजीपूर्वक ठरवावं लागतं.  पप्पा होणं आणि विशेषतः पार्थचा पप्पा होणं अवघड आहे खरंच. कारण पार्थ हुशार आहे. पप्पा हुशार नाही. बेसावध गाठून नेहमीच पार्थ पप्पाची विकेट घेतो.
मधे एकदा पार्थ म्हणाला, ‘पप्पा फॉरेन टूरला जाऊ.’
पप्पा म्हणला, ‘जाऊ, चला नेपाळला जाऊ.’
पार्थ म्हणे, ‘नेपाळ इस नॉट फॉरेन इनफ्? इंडियाला बॉर्डर टच नाय व्हायला पाईजे.’
‘...मग श्रीलंकेला जाऊ.’
पण पार्थ हुशार. तो म्हणाला, ‘...पाण्यात आपल्या बौन्ड्रीज टच होतातच की.’
मग पप्पा म्हणाला, ‘मुंबईला जाऊ, वन्स  अपॉन अ टाईम मुंबई वॉज नॉट अंडर मराठा रूल. इट वॉज अ ब्रिटीश टेरिटरी.’
पण पार्थ म्हणे, ‘पप्पा, कम ऑफ इट. वन्स  अपॉन अ टाईम इव्हन सिंहगड वॉझंट अंडर मराठा रूल. सो तू मला सिंहगडला नेणार का? आय अम टॉकींग ऑफ द करंट बौन्ड्रीज ऑफ द इंडियन युनियन.’
पार्थच्या चमकदार उत्तरानी पप्पा प्लेझंटली शॉक मग नाईलाजानी सगळे हाँगकाँगला जाऊन आले. अस्सा स्मार्ट आहे पार्थ. तिथल्या सायन्स म्युझियममधे तर तो लागोपाठ तीन दिवस गेला. त्याला पप्पानी मागच्याच वर्षी सांगितलंय की सायन्स हे हुशार मुलांसाठी असतं आणि सोशल सायन्स अँण्ड  लॅंग्वेजेस्, हे निव्वळ पासिंग पुरतं.
इंग्रजी इज अत्यावश्यक, नॉट ओन्ली दॅट, इट इज जीवनावश्यक. जर्मन इस स्कोरिंग, अॅज कमपेअर्ड टू मराठी, तर नक्कीच. पण मराठी इज ऑल्सो आवश्यक! असा तो पेच आहे. बट मराठी वी कॅन टीच अॅट होम नो? नॉट सो विथ इंग्लिश ऑर जर्मन. सो पार्थ लर्नस् इंग्लिश अँण्ड जर्मन अँण्ड हिंदी इन स्कूल. मराठी इस जस्ट अ स्पोकन लँग्वेज फॉर पार्थ. मग तो ती राईटत नाही की रीडत नाही, तो ती फक्त स्पीकतो. अगदी प्युअर मराठी स्पीकतो तो.
पार्थ ‘च्यायला’ म्हणाला त्याची कथा तर फारच उद्बोधक आहे. खरंतर घरीदारी, पप्पाच्या तोंडात च्यायला होतच. तेंव्हा आज ना उद्या पार्थ हा शब्द, उद्धारवाचक ते उद्गारवाचक असे त्याचे अनेकानेक वापर, त्या मागची भावना, त्याचा हेल, त्याचं वजन, त्याचा जोरकस उच्चार, त्या बरोबरची हाताची हालचाल, उचलणार हे अपेक्षितच होत. जेंव्हा तो पहिल्यांदा च्यायला म्हणाला तेंव्हा पप्पाच्या अंगावर रोमांच आले आणि मम्मीच्या अंगावर काटा आला. यावर बरच रणकंदन माजलं. हे सारं अत्यंत गावरान, अनावश्यक आणि असभ्य असल्याचं मम्मीच म्हणणं होतं, तर हे स्ट्रीट स्मार्ट, इसेन्शिअली अत्यावश्यक आणि रुटीन असल्याचं पप्पाच प्रतिपादन. भरीस भर म्हणजे, ‘माय पेरेंट्स केप्ट मी फ्रॉम चिल्ड्रेन हू वेअर रफ’ अशी एक विंग्रजी कविताही पप्पानी कोsट केली. ह्यामुळे मम्मी वरमली पण नरमली नाही. भांडण जारीच राहीलं. शेवटी पार्थनीच ‘स्टॉप धिस बुल्शीट अँण्ड फकॉफ’, असं म्हणून दोन्ही पक्षांना एकाच दगडात गारद केलं.
याच दरम्यान पार्थला एकदा शेत दाखवायला म्हणून मुद्दाम एका अॅग्रीटुरीझम फार्मवर नेलं. खरंतर साध्या फार्मवरच न्यायचं होतं. पण मग मम्मीला तिथे बोअर होईल असं मम्मीनी आधीच डिक्लेअर केलं. मग हे ठरलं. तर तिथे काय मजा... तिथली मुलं किल्ला करत होती. खूप लहान होता पार्थ त्या वेळी. त्याच्या प्लेस्कूलमधे सुद्धा मुलांना मडमधे खेळायला देत असत. कारण काँटॅक्ट विथ मदर अर्थ हा स्पिरिच्युअली एनरीचींग आहे, असं स्कूलटीचरच्या आदरणीय अध्यात्मिक  मदरचं मत होतं. पण प्लेस्कूलमधे ती माती सुद्धा स्टरलाईज केलेली असे. शिवाय चिखल करायला पाणी सुद्धा आरओ फिल्टरचं. त्यामुळे ते सगळं कसं, सेफ होतं. इथे झालं काय की, ममी पप्पानी आसपासच्या सृष्टीसौंदर्याकडे, खाण्याच्या स्टॉलकडे, हँडीक्राफ्टच्या दुकानाकडे तोंड केलं आणि अर्थात पार्थकडे पाठ. थोड्यावेळानी वळून पहातात तो काय. त्या मुलांच्यात शिरून पार्थ पूर्णपणे चिखलानी माखलेला. तत्काळ त्याला बाहेर काढून नखशिखांत धुवून, नव्या कोऱ्या कपड्यात कोंबल्यावरच मम्मी शांत झाली. पप्पाचीच आयडीया होती ही. त्यामुळे पप्पा गप्प. मम्मीला मात्र पप्पाला झोडायला हा बरा चान्स घावला!
बाजार आणि त्यातून मासळी बाजार बघताना तर फारच त्रेधा उडाली. हुशार पार्थनी गुगलीच प्रश्न केला;
‘फिश विकणारे फिश कुठून आणतात?’
‘नदीतून.’ पप्पा.
‘मग त्यांना फिश फ्री मिळतात ना?’
‘हो’ पप्पा.
‘मग ते आपल्याकडून पैसे का घेतात?’ इति पार्थ. पप्पा गप्प.
असंच एकदा नव्या स्कोडातून पार्थ महाबळेश्वरला चालला होता. पप्पाला सारखं बडबड करायची लय सवय. पप्पा म्हणे ही बघ कृष्णा नदी. पार्थ बावचळून इकडे तिकडे बघायला लागला. तेंव्हा पप्पाने नदी ही पुलाखालून वहात असल्याचा खुलासा केला.
पार्थ पृच्छा करी, ‘पप्पा म्हणजे माझ्या जीओग्राफीच्या पुस्तकात जी रिव्हर कृष्णा आहे, ती हीsss?’
‘हो रे.’ पप्पा
‘होsss आssई?’ पार्थ.
‘हो रे.’ मम्मी
‘... आणि मग हा सगळा सह्याद्री माउंटन आहे का?’ पार्थ.
‘हो रे.’ पप्पा.
‘होsss  आssई?’ पार्थ.
‘हो रे.’ मम्मी.
‘... आणि मग हा सगळा डेक्कन प्लाटो आहे?’
‘हो रे.’ पप्पा.
‘होsss  आssई?’ पार्थ.
‘हो रे.’ मम्मी.
‘होsss आssई?’ हे पार्थचं धृवपद आहे. कुणीही काहीही सांगू दे, म्हणू दे. हा आईला विचारतो, ‘होsss आssई?’
आईनी रुकार दिला तरच ती गोष्ट तो मानतो. कारण पप्पा मधून मधून बाता मारतो, पण मम्मी? उं हुं, कारण मुलाशी खोटं बोलणं हे त्याच्या इड किंवा इगो किंवा सुपरइगोला हानिकारक आहे, असं तिनी पूर्वीच एका पेरेंटींग सेमिनारमधे ऐकलं आहे. ही असली सगळी सुपरडुपर पूर्वतयारी असल्याने मम्मी पॉलीश्ड आहे.
पप्पाही पॉलीश्ड आहे, पण जरा पॉलिश खरवडलं की आत अगदी गावरान. मुलाला गावाकडे न्यायचा हट्ट दरवेळी पप्पाचाच. यात दरवेळी काहीतरी गोच्या होतातच. मम्मी मात्र थरली पॉलीश्ड आहे. कितीही खरवडलं तरी आत पॉलिश शाबूत.  कॉन्व्हेंट स्कूल, कॉस्मॉपॉलीटन बॅकग्राउंड, मग काय विचारता? मम्मी म्हणते, ‘कशाला पाहिजे हे गावाकडे जाणं? इट्स बोथ, शियर वेस्ट ऑफ टाईम अँण्ड हाय रिस्क बिहेविअर.’
पप्पा म्हणे, ‘त्या शिवाय सोशल जाण कशी डेव्हलप होणार?’
मम्मी म्हणे, ‘कशाला हवी ती जाण? ईट विल डेव्हेलप इन कॉलेज, व्हेन पार्थ अॅक्चुअली टेक्स् अप सम व्हिलेज व्हिजीट ऑर ट्रेक ऑर टूर ऑर समथिंग. एन्.एस.एस. एक्सेट्रा तर कंम्पलसरीच असतं कॉलेजमधे. तिथे सोशल सगळं समजतंच की. तंवर सोसेल एवढंच सोशल पुरे. अगदी आत्ता पासून कशाला?’ मम्मीची सुरवातच मेणाच्या घरापासून झालेय त्यामुळे तिला तसं वाटतं. पप्पाचं तसं नाही. खरंतर कालचा धो धो पाऊस पप्पाच्या गावात आलाच होता. कालचं पीक त्यानी पावसाच्या पाण्यावरच घेतलंय; आसवांवर नाही. त्याचं वाहून गेलेलं शेणाचं घर त्यानी आता विटा सिमेंटनी बांधलंय. पण पप्पाला आपल्या शेणाच्या घरात अजूनही इंट्रेस्ट आहे.
गावी पंचायतीत कोण निवडून आलं  इथपासून ते जत्रेतल्या तलवारीचा मान ‘खाल्ल्या’आळीतल्या घरात गेला का ‘वर्ल्या’आळीतल्या ह्यात त्याला रस आहे. मम्मीचं तसं नाही. कॉलनी हेच तीचं गाव. हेच तिचं विश्व. एका कॉलनीत ती लहानाची मोठी झाली. आता दुसऱ्या कॉलनीत मोठ्याची म्हातारी होईल. पार्थचं तर आणखी वेगळं. त्याचं घर मेणाचं नाही चांगलं सिमेंट कॉन्क्रीटचं आहे. शेणाच्याच काय पण कॉन्क्रीटच्या घराचं ओझंही त्यानी केंव्हाच भिरकावून दिलंय.  पण ह्याचा मम्मीपप्पाला पत्ताच नाहीये. ‘पार्थ तसा हॅपी गो लकी, इझी गोइंग आहे. त्याला रमतगमत, आरामात जमलं तर मोठं व्हायचंय...’ असं मम्मीपप्पाला वाटत रहातं. पार्थ डायरेक्ट मोठाच होऊन दाखवतो. पप्पामम्मीला घाई असते. त्यामुळे फास्ट फॉरवर्डचं बटण त्यांनी घट्ट दाबून ठेवलेलं असतं. गर्भसंस्कारापासून आजपर्यंत त्यांनी कसली म्हणजे कसली कसूर ठेवलेली नसते. पण बटण दाबण्याच्या नादात स्क्रीनकडे लक्षच नसतं त्याचं.
कधीतरी पप्पाच्या मागे उभा राहून आरशात भांग पाडता पाडता  पार्थ म्हणतो, ‘पप्पा तुझे केस बघ, मधून मधून पांढरे झालेत की!’
पप्पा म्हणतो, ‘म्हणजे बघ ना पार्थ, ‘तू’ आता किती मोठा झालास!!’
... आणि झटकन पप्पाच्या लक्षात येतं, अरेच्चा, पार्थ(ही) चक्क मोठा झाला की!!!
सगळे पार्थ असेच असतात. आईबाबांचा डोळा चुकवून अचानक मोठे होतात. अचानक जबाबदारी वगैरे  कळायला लागते त्यांना. मम्मीपप्पानी, लहान आहे असं समजून, कधीच न शिकवलेल्या गोष्टी अचानक येऊ लागतात त्यांना. मम्मीपप्पाला न दिसणारे भरभक्कम पंख फुटलेले असतात त्यांना. शेणाचं, मेणाचं, कॉन्क्रीटचं अशी सगळी घरं अपुरी असतात पार्थांना.

पार्थ जेमतेम मोठा होईपर्यंत ही कॉलनी आहे. मग लगेच कुठेतरी परदेशी. मग मोठ्याचा मध्यमवयीन पुन्हा वेगळ्याच देशी. मध्यमवयीनचा म्हातारा व्ह्यायला आणखी कुठेतरी. म्हाताऱ्याचा पिकला म्हातारा होताना कदाचित पुन्हा आणखी कुठल्यातरी भलत्याच  देशी... एखाद्या अल्ट्रापॉश ओल्ड एज होममध्ये... आणि पान गळताना पुन्हा आपल्याच देशी, कुठल्यातरी इच्छामरण-गृही... कारण तोपर्यंत अगदी मुहूर्तसाधून, नियोजित, वेदनारहित मृत्यू ही कल्पना व्यवहारात उतरली असेल. शेवटी पार्थ इज पार्थ. त्याला विश्वरूपदर्शन हे घडणारच.

No comments:

Post a Comment