Wednesday, 28 February 2024

उद्बोधक

 उद्बोधक

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
मासिक पाळीमध्ये पेनकिलरचे सेवन ठरू शकते धोकादायक; ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल आराम अशा मथळ्याखाली, एका प्रख्यात मराठी दैनिकाच्या दोन वर्षापूर्वीच्या ऑनलाइन आवृत्तीत, खालील मजकूर आहे.
महिलांमधील मासिक पाळी ही एक अशी प्रक्रिया आहे जी वयाच्या १२व्या वर्षांपासून साधारण ५० वर्षांपर्यंत चालते. दर महिन्याला ३ ते ७ दिवसांसाठी मासिक पाळी येते. प्रत्येक मुलीला या दिवसांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला ओटीपोटी होणाऱ्या वेदनेमुळे त्रास होतो. अशावेळी जर तुम्ही पेनकिलरचे सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात असते. परंतु ओटोपोटी होणारी वेदना अत्यंत त्रासदायक असते. अशावेळी बहुतेक महिला पेनकिलरची मदत घेतात. परंतु त्यांच्या सेवनामुळे भविष्यात शारीरिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच आज आपण या वेदनेपासून सुटका करून घेण्यासंबंधी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
मनुके आणि केसर
मासिक पाळीदरम्यान चार ते ५ मनुके आणि १ ते २ केसर यांचे सेवन केल्याने मासिक पाळीत होणाऱ्या वेदना आणि ब्लॉटिंग सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि लोहाची कमतरता पूर्ण करण्यास देखील मदत करू शकते.
गरम पाण्याची पिशवी
गरम पाण्याच्या पिशवीत, हीटिंग पॅडमध्ये किंवा काचेच्या बाटलीत गरम पाणी भरा आणि पोट आणि पाठीचा भागला सुमारे १०ते १५ मिनिटे शेक द्या. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांप्रमाणेच गरम पाण्याने घेतलेला शेकही परिणामकारक ठरतो.
हिंगाचे सेवन
जर तुम्हीही मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे हैराण असाल तर तुम्ही हिंगाचे सेवन करावे. हे फक्त मासिक पाळीदरम्यान नाही तर संपूर्ण महिनाभर करावे. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे जो आपल्या ओटीपोटी असलेल्या मांसपेशींना मजबूत करण्यासाठी, त्यांच्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी आणि मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम देण्यास फायदेशीर आहे.
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे १२ तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर हे दाणे चाळून घेऊन ते पाणी प्यावे. मासिक पाळीदरम्यान यामुळे आराम मिळू शकतो.
भरपूर पाणी प्यावे
पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. पोट फुगण्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अधिकाधिक पाणी पिणे. याशिवाय चहा किंवा कॉफीचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे.
हिरव्या भाज्या खा
जेवणात केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालक खा. या पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. या गोष्टी लोहाचे मुख्य स्त्रोत आहेत.
वरील मजकूर अत्यंत उद्बोधक आहे. कारण वैद्यकीय विषयावर कसे लिहू नये याचा हा आदर्श वास्तूपाठ आहे. या लेखाचा आता आपण प्रत्येक वाक्य घेऊन फडशा पाडू या. यातील पहिली दोन वाक्य सामान्यज्ञानाची विधाने असून त्यावर कोणताही आक्षेप घ्यायचे कारण नाही.
तिसरे वाक्य महान डेंजरस आहे. ‘मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला ओटीपोटी होणाऱ्या वेदनेमुळे त्रास होतो’ मुळात मासिक पाळीच्या दरम्यान क्वचितच असह्य त्रास होतो. बहुतेकींचा त्रास बहुतेकदा सुसह्यच असतो. औषध लागत नाही. म्हणजेच एका सामान्य, नैसर्गिक आणि किंचितच त्रासदायक असणाऱ्या क्रियेचे वैद्यकीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ‘प्रत्येकच’ मुलीला त्रास होतो हे ठसवण्याचा मागे सर्वांनाच उपचाराची गरज असते हे सांगायचे आहे. उपचार खपवायचे आहेत, सर्वांना गिऱ्हाइक बनवायचे आहे.
‘प्रत्येक मुलीला या दिवसांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.’ सुरुवातीला वयाची जी काय मर्यादा सांगितली आहे ती पाहता या वाक्यातील ‘मुली’ हा शब्द खटकतो. ‘समस्यांना तोंड द्यावे लागणे’ हा वाक्प्रचार देखील मोठं काहीतरी संकट असल्याचं सुचवतो. साधारणपणे संकटाला ‘तोंड दिले’ जाते आणि समस्यांना आपण ‘सामोरे जात’ असतो. मात्र भाषेचा भडक वापर हे छद्म वैज्ञानिक लिखाणाचा प्रधान अवगुण आहे.
‘अशावेळी जर तुम्ही पेनकिलरचे सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.’ वाचकांच्या मनामध्ये न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड असं एकाच वेळी निर्माण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या वाक्यामध्ये आहे. पेनकिलरचे सेवन ‘अत्यंत हानिकारक’ आहे असं म्हंटलं आहे. मुळात पाळीच्या वेळेला पोटात दुखू नये म्हणून हे महिन्यातून चार दिवसच घेतले जाईल. वर्षानुवर्षे, खूप जास्त डोसमध्ये ज्यांना अशी औषधे घ्यावी लागतात अशांच्या ( उदा: संधीवात) बाबतीत हानी संभवते. पाळीसाठीच्या वापराने त्रास होण्याची शक्यता नाही. ‘पेनकीलर’ या शब्दाची भीती घालून, या औषधाने उत्साही आणि कार्यरत राहणाऱ्या महिलांना स्वतःविषयी इथे उगीचच साशंक केले आहे.
पुढे पेनकीलरला पर्याय म्हणून घरगुती उपाय सुचवलेले आहेत. मात्र हे उपाय प्रस्थापित औषधांपेक्षा प्रभावी, सरस आणि सुरक्षित असल्याचे कोणतेही अभ्यास मला तरी आढळले नाहीत. मेथीचे पाणी, मनुके आणि केशर खाल्याने वेदना कमी होत असल्याचे लिहिले आहे, मात्र याबद्दलचे संदर्भ मला सापडले नाहीत. केशराचे तर रंग आणि गंध या पलीकडचे कार्यही मला आढळले नाही.
‘(मनुके) बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि लोहाची कमतरता पूर्ण करण्यास देखील मदत करू शकते.’ हे अर्धसत्य आहे. बद्धकोष्ठ हा कायमस्वरूपी त्रास असेल तर मनुकाही रोज खायला हव्यात. फक्त पाळीच्या दरम्यान मनुका खाऊन बद्धकोष्टता साफ कशी होणार? ॲनिमियाबद्दलचे विधानही चुकीचे आहे. मनुकांमध्ये लोह असते हे खरेच, पण ॲनिमिया वर ‘उपचार’ होण्यासाठी आवश्यक त्या मात्रेमध्ये ते नसते. तेवढं लोह मिळवण्यासाठी रोज डबाभर मनुका खाव्या लागतील. मात्र अशा पद्धतीने तथाकथित ‘शास्त्रीय’ माहिती पेरून आपले लिखाण सजवण्याचा सोस छद्म वैद्यकीय लिखाणात असतोच असतो.
पुढे सबंध महिनाभर हिंगाचे सेवन, ‘ओटीपोटी असलेल्या मांसपेशींना मजबूत करण्यासाठी, त्यांच्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी आणि मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम देण्यास फायदेशीर’ ठरते असं म्हटलं आहे. ‘ओटीपोटातील मांसपेशींची लवचिकता वाढते’ हे देखील तद्दन भंपक वाक्य आहे. मुळात ओटीपोटामधील अनेक अवयवांत स्नायू असतात. गर्भपिशवी, योनीमार्ग, बीजवाहक नलिका, मुत्राशय, मलाशय याच बरोबर पोट, पाठ आणि मांड्यांचे स्नायूही ओटीपोटात एकत्र येतात. पैकी कोणत्या स्नायूंची लवचिकता वाढते, याचा उल्लेख नाही. भोंगळपणा हे छद्म वैज्ञानिक लिखाणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याचे मनोहारी दर्शन इथे घडते. तूर्तास आरोपीला संशयाचा फायदा देऊ या. या लेखाची उत्सवमूर्ती की जी गर्भपिशवी, तिचे स्नायू लवचिक होतात असं आपण गृहीत धरू या. मात्र या स्नायूंची लवचिकता मोजण्याचे यंत्र, तंत्र आणि एकक (युनिट) कोणते याबद्दल मला विलक्षण उत्सुकता आहे. या स्नायूंची लवचिकता आणि मजबूती गेल्यामुळे पाळी दरम्यान त्रास होतो आणि ती पुनर्स्थापित झाल्यामुळे तो त्रास जातो, असा घटनाक्रम येथे सुचवला गेलेला आहे. अशा प्रकारची माहिती स्त्रीआरोग्य विषयक आधुनिक ग्रंथांमध्ये आढळत नाही. गर्भपिशवीचे मुख अरुंद असल्यामुळे वेदना होतात, पुढे मुले झाल्यावर हे थोडे रुंद होते आणि वेदना कमी होतात असा एक सिद्धांत मात्र आहे. पण गर्भपिशवीच्या मुखामध्ये स्नायू अभावानेच असतात.
हिंग खाल्ल्याने गर्भपिशवीच्या मांस पेशी या मजबूत कशा होतात हे काही लक्षात आलं नाही. साधारणपणे फार कष्ट करावे लागले, की ती ती मांस पेशी जरा मोठी होते असे निरीक्षण आहे. म्हणजे पोळ्या लाटणाऱ्या किंवा टेनिस खेळणाऱ्या बायकांचे दंड मजबूत होतात वगैरे. हिंग खाल्ल्याने गर्भपिशवीच्या बाबतीत असे का व्हावे बरे?
वरवर पाहता शास्त्रीय वाटणारे हे विधान वाचकांची छाती दडपून टाकते. ओटीपोटीच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी, आणि त्यांच्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी नेमके काय करावे याचे हे नेमके मार्गदर्शन वाचून आपण थक्क होतो. लेखकाच्या सखोल ज्ञानाबद्दल आपल्या मनात नकळत आदरभाव निर्माण होतो. विज्ञान आणि अज्ञान यांची ही बेमालूम सरमिसळ वाचकांना अचंबित करते आणि त्या अचंब्यात बुद्धी बाजूला ठेवून अ(र्ध)सत्य स्वीकारायला भाग पाडते.
पुढे ‘पोट फुगण्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अधिकाधिक पाणी पिणे.’; हे ही आहे. म्हणजे गंमतच आहे. पोट फुगतं ते गॅसमुळे, आतडयाच्या मंद हालचालींमुळे. पाणी, आणि ते देखील अधिकाधिक पिण्याने ह्यात काय सुधारणा होणार? ‘चहा किंवा कॉफीचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे.’ असेही लिहिले आहे. प्रत्यक्ष अभ्यास दर्शवतात की जेमतेमच फरक पडतो तोही पडला तर.
‘जेवणात केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालक खा. या पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. या गोष्टी लोहाचे मुख्य स्त्रोत आहेत.’ असे एक असंबद्ध विधान शेवटी केले आहे. यावर आक्षेप एवढाच की विषय काय चाललाय, तुम्ही लिहीताय काय याचे तारतम्य सुटलेले दिसते.
पण कितीही कचरा असलं तरी यातून शिकण्यासारखं खूप आहे. सामान्य शरीरक्रियांचे वैद्यकीकरण, वाचकांचे गिर्हाइक बनवणे, त्यांत विविध गंड निर्माण करणे, अ(र्ध)सत्य कथन, भोंगळ, असंबद्ध विधाने ही छद्म वैद्यकीय लिखाणाची लक्षणे आहेत. वाचक संभ्रमित व्हावेत, त्यांचा दृष्टीकोन कलुषित व्हावा, अशा विकारविलसित हेतूनेच हे लिखाण केलेलं असतं.
विज्ञान लिहिण्याच्या ह्या शैलीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आपण शहाणे आणि सावध होण्यासाठी हा मजकूर अतिशय उपयुक्त आहे.

Thursday, 22 February 2024

इराचे मोठ्ठे मोठ्ठे डोळे आणि हसू पाहून...

इराचे मोठ्या डोळ्यांचे, हसरे फोटो रोजच पाहत असतो. कधी कधी वाटतं की ही सगळी मंडळी आपल्यावर फिदा आहेत, हे इराला सुद्धा कळतंय.

त्यावर ही कविता.




एवढे मोठ्ठे डोळे करून, 

एवढं भलंs थोरलं हसून,

इतकं गोsड, गोsड दिसून, 

काळजात खोल, खोल घुसून,


करायचं काय असतं, बाई?

कुठ्ठे जायची इतकी घाई?

समजत तर काहीच नाही,

खाऊन, खेळून, झोपी जाई!


डोळ्यामध्ये जग सारे

हास्यामध्ये चांद तारे

सारा ऐवज, धन सारे

हिच्या ताब्यात, मन सारे


ही इवलिशी टिंबक टिल्लू 

अदा हिची आणि आम्ही उल्लू

दिसे निरागससे हे पिल्लू

पक्की खोडकर इरू पिल्लू 















Wednesday, 14 February 2024

आजोबाच्या लहानपणी

आजोबाच्या लहानपणी,
त्याच्या घरी नव्हते पाणी
येता पोहून, नदीवरून,
यायचा करून, भांडी धुणी

आजोबाच्या लहानपणी
टीव्हीच नव्हता मुळी घरी
खेळत मित्राघरी कधी हा 
कधी ते सगळे आमच्या घरी 

आजोबाच्या लहानपणी
फोन घट्ट एके ठिकाणी 
वायर नामे शेपूट त्याला
ऐकवायाचा निव्वळ वाणी  

आजोबाच्या लहानपणी
कॉम्पुटरही नव्हता म्हणे
अवघड असणार,
भलतेच अवघड,
लहानपणीच असले जिणे 

आजोबाच्या लहानपणी
विमान नव्हतं पाहिलं त्यानी
ओळखलं तरी कस्सं म्हणते; 
पहिल्यांदा मग मोठेपणी?

आजोबाच्या लहानपणी
जिपीएस आणि गूगल नाही
इंटरनेटचा नव्हता पत्ता
पत्ता विचारत विचारत जाई

आजोबाच्या लहानपणी
नाही 4जी, नाही 5जी,
लहान तरीही असते झाले, 
पण तेंव्हा म्हणे नव्हती आज्जी!!

Friday, 9 February 2024

प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं..

 

प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.


१४ फेब्रुवारी, म्हणजे संतश्रेष्ठ व्हॅलेंटाईन यांच्या नावाचा प्रेमाच्या गावी जाण्याचा दिवस. आपल्या सखीला किंवा सख्याहरीला आपले प्रेम जाहीरपणे सांगण्याची संधी देणारा दिवस आणि अर्थात काही सडक सख्याहरींना आपली जागा दाखवून द्यायचा दिवस. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे अगदी आगळावेगळा दिवस.  नेहमीच्या दिवसासारखा हा नाही उजाडत. सूर्यही जरा लाजत, दबकत  उगवतो, उषेचा रक्तिमा अधिक गडद भासतो आणि हवाही पॅरिसच्या हवेसारखी धुंद नशीली बनून जाते. त्यातून आज वसंत पंचमी, म्हणजे भारतीय कामदेवाचा उत्सव आणि अभारतीय लव्ह डे असे एकत्र आले आहेत. म्हणतात ना आधीच हा, त्यातून हा! सध्या भारतीयत्वाची चलती आहे. पूर्वी अभारतीयत्वाची होती. परंतु प्रेमाचा हा झरा, आहे मूळचाची खरा. प्रेमभावना इकडे तिकडे चोहीकडे आहेच आहे आणि सारखीच आहे.

 

आजही कित्येक प्रेमवीर आणि विरांगनांनी आदली रात्र तळमळत  काढली असेल. सिंहाच्या काळजाचे असतील त्यांनी स्वरचित प्रेमकवितेची रिस्क घेतली असेल. बाकी ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कुसुमाग्रज, नलेश पाटील, पाडगाव अथवा बोर कर, गुलजार, गालिब मौजूद आहेतच.    घेतलेली भेटवस्तू, ती गुलाबी रिबीन, लाल, लाल टपोर गुलाब, कचकड्याची हृदयं, कार्ड्स, केक्स, (ते अव्वाच्यासव्वा महाग) गिफ्ट, आपले कपडे, आपला लुक; प्रेमयाचनेचे ठरलेले संकेत आणि अव्हेर झाला तर? ही चिंता. आणि तीव्र शारीरिक ओढीसह, प्रचंड भावनिक गुंतवणूक असलेले हे नातं पुढे आयुष्यभराच्या लाभावीण प्रीतीचा लाभांश देणारे ठरेल ना? ही लॉन्गटर्म चिंता.

 

खरंच काय असतो हा प्रेम नावाचा केमिकल लोच्या? काळीज धडधडतं, कानशीलं तापतात, सर्वांग मोहरून जातं,  हुरहूर लागते, जग अर्थशून्य भासतं, कोण्या जनूचा मजनू बनून जातो.  आशिक कधी जग उध्वस्त करू पहातात तर कधी कधी स्वत:लाच  ध्वस्त करून घेतात. पण हे सगळं होतं कसं?

 

इम्यूनो-न्यूरो-एंडोक्राईन सिस्टिम अशा भयसूचक नावाची काही कार्यप्रणाली आपल्या सर्वांत असते. आपली प्रतिकार शक्ती, मेंदू, नसा आणि अंत:स्त्रावी  ग्रंथी यांचे प्रगाढ नाते असते. हे नातेसंबंध म्हणजेज ही कार्यप्रणाली. आपले प्रेमपात्र दिसताच बरंsss वाटणं ते नकार येताच नैराश्याने अंथरूण धरणे, हे सगळं सगळं ह्या सदरात घालता येईल. ह्या साऱ्याच्या मर्मस्थानी असतात, हायपोथॅलॅमस  आणि पिटयूटरी ग्रंथी. ही मंडळी साऱ्या अंत:स्त्रावी (एंडोक्राईन) ग्रंथींचा कारभार नियंत्रित करीत असतात.  म्हणजेच साऱ्या शरीरसृष्टीचे हे नियंते. ह्या नियंत्यांकडे डोपामीन, ऑक्सीटोसीन, टेस्टोस्टेरोन अशी अनेक आयुधे आणि अंकुश.

 

ह्यातील डोपामीन हा सुख रस.     डोळ्याला डोळा भिडला, एकांताचा वास घडला की हा  मेंदूभर पसरतो. अंगी अगदी वसंत फुललेला. मग आनंदाचे डोही आनंद तरंग. प्रेमात पडलेली माणसं तारतम्य आणि ताळतंत्र गमावून बसतात ते ह्या डोपामीनमुळे.  म्हणजे हा स्त्रवत असला की मनाला शांत, आनंदी, प्रसन्न  वाटतं, शरीरही त्या आनंदात सहजच सामील झालेलं असतं आणि हा अनुभव वारंवार मिळवा अशी आस लागते. पण ह्याच डोपामीनचा  हाच परिणाम माणसाला व्यसनाधीन बनवू शकतो. व्यसन कसलेही असू शकतं. प्रेमिकाचे, दारू-जुगाराचं किंवा लेखन-व्यासंगाचं. सर्वत्र डोपामीन कार्यरत असतो. 

 

ह्याचाच एक मित्र. त्याचं नाव ऑक्सीटोसीन. हा ममता रस. एकमेकांच्या कुशीत अगदी खुषीत, निश्चिंतपणे विसावताना जो विश्वास, जी जवळीक, जे भावनिक तादात्म्य जाणवतं ना; ते ह्या ऑक्सीटोसीनमुळे.

‘जन्मोजन्मी मी तुला…’,

‘दुनिया गेली तेल लावत…’,

‘तुला चंद्रावर नेऊन…’

अशा शब्दांनी सुरू होणारी वाक्यं आणि त्यामागचा दुर्दम्य, आणि बहुतेकदा फाजील, आत्मविश्वास ही ऑक्सीटोसीनची देन आहे. हाती हात धरताना, घट्ट मिठीत  मुरताना ह्याची मदत होते, तसेच सामाजिक ओळखीपाळखी आणि नाती सांभाळण्यातही ह्याचा हात असतो. 

 

असाच एक व्हासोप्रेसिन नावाचा गडी आहे. हाही पिट्यूटरी ग्रंथीतून झरत असतो.  वारंवार ब्रेकअप होणाऱ्या, आणि हे धक्के वारंवार पचवून हृदयाला पोचे आलेल्या प्रेमवीरांनी पुढील मजकूर अगदी काळजीपूर्वक वाचावा.  व्हासोप्रेसिनला म्हणतात एकगमनी रेणू. थोडक्यात एक पत्नीव्रती किंवा एक पतीव्रती राहण्यासाठी हा सहाय्यभूत ठरतो. हा जितका अधिक तितके नाते घट्ट. बाहेर भानगडी करू नयेत, जोडीदार/दारीण एकनिष्ठ राहावा/वी म्हणून गंडेदोरे करण्यापेक्षा, व्हासोप्रेसिनची मात्रा निश्चित लागू पडणारी आहे.  व्हासोप्रेसिन उपलब्ध आहे! त्याचे इंजेक्शन प्रसंगोपात वापरले जाते. पण नवऱ्याला गोळी घालावी म्हणजे त्याचे ‘बाहेरचे’ खयाल बंद होतील  अशी निष्ठावर्धक वटी अजून बाजारात आलेली नाही. 

 

पहिल्या भेटीतच काही वेगळंच वाटायला लागलं की समजावं हायपोथॅलॅमसही आता चांगलंच तापलं  आहे. आता डोपामीनचा पूर येतो माणूस प्रेमात गटांगळ्या खाऊ लागतो, सारं जग विसरायला होतं, फक्त आणि फक्त प्रेमपात्राचं स्मरण होत रहातं. मनात फक्त तेवढाच विचार.. ती/तो आत्ता काय करत असेल?  पण शरीरात मात्र ऑक्सीटोसीन आणि व्हासोप्रेसिन पुढच्या तयारीला लागलेले असतात. या नाजुक नात्याला काही संदर्भ द्यायला, अधिक सखोल करायला, काही भविष्य द्यायला सरसावलेले असतात. जसं नातं रुजत जातं, जसं ते फुलत जातं; मनं मिळून मिळून जातात, तारा जुळून येत जातात; तसं ही भारदस्त इम्यूनोन्यूरोएंडोक्राईन सिस्टिम आपली साथसंगत करत  राहते. दाद, जवाब देत रहाते, लाजवाब! म्हणत रहाते. होर्मोन्सच्या लाटा  येतात, जातात; आस, आसक्ती, सक्ती, मर्यादा, मालकीभावही येत जात रहातात. शरीर, शरीरसुखाची मागणी करतं. ही असते  टेस्टोस्टेरोनची करामत. हा एक नर-रस. म्हणजे दाढी मिशांशी आणि पुंबीज निर्मितीशी ह्याचं नातं.  मात्र नराला आणि नारीलाही  कामेच्छा निर्माण होते ती ह्याच्यामुळे. 

 

 

कोणताही नातं म्हटलं की त्यात ताण तणाव  आलेच. ब्रेकअपही आले आणि पॅचअपही.   मग विरह आला. अस्वस्थता आली. तगमग आली.  पाण्याविना मासोळीसम तळमळणे आले. आता स्ट्रेस-हॉरमोन, कोर्टीसॉल, उसळी मारतो. एखाद्या दारुड्याला दारू मिळाली नाही की माणूस अतिशय अस्वस्थ होतो. तशीच, अगदी उपचार लागावेत अशी टोकाची अस्वस्थता अनुभवास येते. पण बरेचदा सारे स्थिरस्थावर होते. नव्याने संतुलन साधले जाते. कोणत्यातरी नव्या बिंदुपाशी पुन्हा सारे होर्मोन्स तोलून रहातात. ह्या ‘न्यू नॉर्मल’प्रमाणे आयुष्य पुढे जात राहते. 

 

व्हॅलेंटाईन डे ला जे घाऊक प्रमाणात ओसंडून वहातं  ते ‘प्रेम’ आहे का ‘आकर्षण’ हे प्रत्येकाने तपासून घ्यायला हवे. आकर्षण अगदी तीव्र, तात्काळ आणि आवेगी असतं. आपला जोडीदार तिथे आदर्शाचा  पुतळा होऊन जातो. त्याच्या/तीच्या दोषांकडे दुर्लक्ष किंवा  प्रसंगी त्यांचं समर्थन वा उदात्तीकरणही केलं जातं. अनेक प्रेमविवाह फसतात कारण ते मुळी प्रेमविवाहच नसतात. ते असतात ‘आकर्षण विवाह’. निव्वळ डोपामीनवर आधारलेले.  प्रेम अधिक खोल, अधिक गंभीर असतं. परस्परांना समजावून घेणं, सहवासातून, सह-अनुभूतीतून जाणून घेऊन मग दीर्घकालीन साथीचे वचन देणे घेणे, हे अभिप्रेत असतं. त्यात समाज आणि संस्कृती, अनेक फासे फेकत असतात. स्त्री आणि पुरुषाकडून विशिष्ट अपेक्षा बाळगून असतात. त्यांचे दबाव निर्माण होतात.  त्यांना सामोरे जावेच लागते. संवाद कौशल्ये, उत्तम भावनिक बुद्ध्यांक, दुसऱ्याचा दृष्टीकोनातून आसपास पहाणं असेल; समान मूल्य, समान आवडी, समान ध्येय असेल तर असल्या दाबावातूनही प्रेमाला उत्तम अधिष्ठान लाभते.

ज्यांना हे साधलेले नाही ते मात्र व्हॅलेंटाईन डे ला नेटफ्लीक्स बघणे किंवा  स्वतःवरच प्रेम करणे एवढंच करू शकतात. खोलीत एकटेच काय बसतात, आईस्क्रीमचा अख्खा फॅमिली पॅक काय संपवतात आणि सोशल मिडियावर डे ची उणीदुणी काढणाऱ्या पोस्ट टाकत रहातात.

 

प्रेम; एक सुखद भावना, एक  दिव्य अनुभूती  पण ती चक्क इम्यूनोन्यूरोएंडोक्राईन सिस्टिमच्या भाषेत मांडता येते. पण ह्यात वावगं काय? पचनसंस्थेचं, श्वसनसंस्थेचं कार्य आपण अशाच भाषेत, अगदी शाळेत शिकतो. पण एकूणच भावना, विचार, कलांचा प्रदेश आपल्याला अस्पर्श, अतीत परामानवी वाटत असतो. पण असं काही नाही. आधुनिक तंत्र-विज्ञानाने आता ह्याही क्षेत्रात अनेक नावे शोध लावले आहेत. प्रेमाचा थर्मामीटर, वशीकरण गुटिका आणि ब्रेकअपसाठी गुणकारी पॅचअप  मलम लवकरच मिळू लागेल.  तोवर ह्या गुलाबी दिवसाच्या गुलूगुलू शुभेच्छा.

 

 

प्रथम प्रसिद्धी

‘तुमचं आणि आमचं सेम केमिकल असतं’ या शीर्षकाने

लोकसत्ता,  चतुरंग पुरवणी, १०.२.२०२४

 

 

Monday, 8 January 2024

माझी नात 'इरा'साठी खास अंगाई गीत



नीज नीज गे सानुले 
नीज आईच्या कुशीत
नीज इरे गे चंचले 
वीज विसावे खुषीत

काय पाहतात डोळे?
बाळ मूठ चाचपडे 
काय शोधिते ग मन?
काय सोडवी ते कोडे?

जग सुखावले झोपी
तुला का चिंता विश्वाची?
तू ग इवलीशी किती
मोठी हो ग मोठेपणी

ससा आणि खारुताई
तुझी इवली बाहुली
सारे गाढ गेले झोपी
सामसूम सारी घरी 

उद्या दूर भूर जाऊ 
उद्या गोड खाऊ खाऊ
चिऊ काऊ भूभू माऊ
सारे खेळायला घेऊ

माझ्या सोन्या माझ्या बाळा
हाती पायी वाजे वाळा
काय चाललासे चाळा
गोजिऱ्या रे माझ्या बाळा

बोलले का तुला कोणी
आणिले का डोळा पाणी
नको रूसू माझे राणी
मीट पापणी पापणी

😴

Sunday, 31 December 2023

ऋग्वेदातील नाट्यसंहिता :- एक परिचय


ऋग्वेदातील नाट्यसंहिता :- एक परिचय 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

‘ऋग्वेदातील नाट्यसंहिता’ हे श्री. लक्ष्मीकांत धोंड यांनी लिहिलेले पुस्तक नाटकवाल्यांना तर आवडेलच पण रसिक वाचकांनाही आवडल्यावाचून राहणार नाही. हा माणूसही स्वतः अतिशय रसिक आहे. त्याच्या औरंगाबादेतील आतिथ्यशील बंगल्याचं नावही ‘रसिक’ आहे. 

श्री. धोंड हे आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावर बरीच वर्ष कार्यरत होते. त्यामुळे अनेक क्षेत्रातील अनेक मंडळींशी त्यांचा दांडगा संपर्क  आहे.  नाटक हा त्यांचा लाडाचा आणि अभ्यासाचा विषय. आकाशवाणीवर सादर करण्यापुरता त्यांनी तो ठेवला नाही. उलट नाट्यशास्त्राचं यथास्थित शिक्षण घेऊन आपल्या नाट्यजाणीवा  अधिक टोकदार केल्या.  हौशी रंगमंच, नाट्य शिबिरे, ‘गाहासत्तसई’बाबत  (गाथा सप्तशती हे आपल्याला परिचित रूप)  संशोधन आणि मंचीय  सादरीकरण यात ते गुरफटून असतात. 

 नाट्यशास्त्र शिकताना भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा पंचमवेद आहे, चारही वर्णाच्या लोकांसाठी ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गायन, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस घेऊन हा पाचवा वेद ब्रह्मदेवाने निर्माण केला, वगैरे संदर्भ त्यांनी अभ्यासले होते. हे कुठेतरी मनात होतं त्यामुळे निवृत्तीनंतर धोंडांनी याचा माग काढायचं ठरवलं आणि सविस्तर अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं. ऋग्वेदात एकूण 28 कथा सूक्ते, 22 संवाद सूक्ते आणि 31 दानस्तुती सूक्ते आहेत की ज्यामध्ये कथा, नाट्य, संवाद, स्वगत अशी नाटकाची बीजे आढळतात. 

ऋग्वेदातील पाठ्य, नाट्य, संवाद सूक्ते ही नाट्यसंहिताच आहेत, नाट्य संहितेचे प्राचीनत्व, निवडक संवाद सूक्तांचा भावानुवाद; अशा  प्रकरणात हे पुस्तक विभागलेले आहे.  शेवटी काही संवादांचा, मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच भावानुवाद देऊन, ते  प्राथमिक रुपातले नाट्यांशच  कसे आहेत हे दाखवून दिलेले आहे. 

सर्व संबंधित सूक्तांच्या जंत्रीनंतर, त्या साऱ्या कथा आपल्याला संक्षिप्त स्वरूपात वाचायला मिळतात.  बहुतेक संवादात देव, देवता, राजा, ऋषी हीच पात्र प्रामुख्याने दिसतात. कठोपनिषदात  नचिकेताने यमाकडून ज्ञान प्राप्त करून घेतल्याची आख्यायिका आहे, त्या कथेचे मूळ सूत्र ऋग्वेदात आढळते. विवाह, जन्म, पुरुषत्व प्राप्ती, वध, युद्ध, मृत्यू  अशा अनेक घटना या कथांत येतात. आपल्या पूर्वजांच्या कुंडलीत संघर्ष स्थानी, चिंता स्थानी, आनंद स्थानी कोणकोणते ग्रह होते, ते कळतं.  ऋग्वेदातील साऱ्या ऋचा छंदोबद्ध आहेत म्हणजे वाङमयनिर्मिती आधी चिंतनाची, छंद-व्याकरणाची एक दीर्घ परंपरा होती हे स्पष्ट आहे

ऋग्वेदातून पाठ्य घेतले याचा अर्थ तिथे संवाद किंवा प्रवेशरूपात काही नाट्यसंहिता आहेत असा नाही, मात्र पुढे नाटक म्हणून जे सादर केले गेले, आजही नाटक म्हणून जे सादर केलं जातं, ते बीज रुपात ऋग्वेदात आढळतं  एवढं  मात्र नक्की. अरिस्टॉटलच्या ‘पोएटिक्स’ या नाट्यशास्त्रावरच्या आद्य म्हणवल्या जाणाऱ्या ग्रंथापेक्षा भारतीय नाट्य परंपरा प्राचीन आहे असं लेखकाचं प्रतिपादन आहे. 

भरतमुनींनी अगदी बारकाईने विचार केलेला दिसतो. त्यांच्या मते कथेमध्ये आरंभ (काही कल्पना मांडली जाते), यत्न (कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे), प्राप्त्याशा (येणारे दैवी वा मानवी अडथळे), नियताप्ती (अडथळे नाहीसे होतात) आणि फलप्राप्ती  अशा अवस्था असतात. उदाहरणार्थ ऋग्वेदाच्या तृतीय मंडलातील विश्वामित्र नदी संवादात या पाचही अवस्था दिसतात. आरंभी म्हणजे नद्यांचा खराळता प्रवाह आडवा आल्याने विश्वामित्राचा तांडा अडतो. विश्वामित्र या नद्यांना प्रवाहाचा वेग कमी करण्याची विनंती करतो. या प्रसंगातही त्या ऋषींनी काही काव्य नाट्य गुंफलेले आहे.  विश्वामित्र आपला कार्यभाग साध्य होण्यासाठी नदयांची स्तुती करतो. या नद्यांनाही ऋषींनी मानव रूप दिले आहे. त्यांना मन, भावना आणि स्वभाव आहे. स्तुतीमुळे त्या सुखावतात. मात्र ‘आम्ही इंद्रदेवाच्या आज्ञेने प्रवाहित आहोत’, असे म्हणून हटायला नकार देतात. त्यांच्यातील श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी स्वभाव ही वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. नाटक आणखी उंचीवर जाते.  इंद्राबद्दल नद्यांच्या मनात असलेला पूज्यभाव बघून विश्वामित्र इंद्राची स्तुती करणारे स्तोत्र गातो. नद्या प्रसन्न होतात. विश्वामित्राला आपले काम होईल याची खात्री वाटू लागते आणि शेवटी फलप्राप्ती, म्हणजे नद्या आपला प्रवाह विश्वामित्राच्या ताफ्यातील रथांच्या चाकाच्या खालीपर्यंत आणतात.  त्यामुळे विश्वामित्र नद्या  पार करून सुखरूप जाऊ शकतो. यातील विपास आणि शुतद्री  या दोन नद्या म्हणजे आत्ताच्या बियास आणि सतलज.

आशा साऱ्या नाट्यमय सूक्तांचा अभ्यास करूनच भरतमुनींनी सिद्धांत मांडला असणार असा लेखकाचा कयास आहे. म्हणूनच ऋग्वेदातील संवाद सूक्त म्हणजे नाट्य संहिताच आहेत असा विचार लेखकाने ठासून मांडला आहे. 

जरी आज आपण नाटक वाचतो तसे, पात्राचे नाव, कंसातील सूचना आणि संवाद अशा पद्धतीने या संहिता लिहिल्या नसल्या, तरी ऋचांचा अर्थ लक्षात घेतला तर पात्रांची आपल्याला कल्पना येतेच. त्यांच्या बोलण्यातून, त्यांचं नाव, स्थान, स्वभावविशेष, अधिकार, नातेसंबंधही समजतात. या संवादातून भावनांचं प्रकटीकरण, मतैक्य, मतभेद, संघर्ष, तत्कालीन परिस्थितीवर भाष्य, अशाही गोष्टी आपल्यासमोर येतात. विविध पातळ्यांवर संघर्षाची कमी अधिक बोचणीही जाणवते.  त्यातून लहानसे का होईना नाट्य निर्माण होते. 

पुरूवस्  उर्वशी संवादात, पुरुवसापासून गर्भवती उर्वशी, त्याच्या शरीर संबंधांच्या मागणीला नकार देते!  अगस्ती लोपामुद्रा संवाद सूक्तातील प्रश्न आजही आपल्याला सुटलेला नाही. अगस्ती ऋषी विदर्भ राजाच्या कन्येशी लोपामुद्राशी विवाह करतात मात्र वृद्ध आणि विरक्त अगस्ती तिच्याशी समागम करण्यास उत्सुक नसतात. ती मात्र त्यांच्याकडे समागमाची मागणी करते. तो आपला हक्क असल्याचं सांगते. विवाह बंधनात असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांपैकी काम कर्तव्य तुम्ही पार पाडत नाही, असा अगस्तींवर आरोप करते आणि हे पटल्यानंतर अगस्ती समागमाला तयार होतात.  शेवटच्या ऋचा या अगस्ती ऋषींच्या शिष्याच्या आहेत.  जो त्यांच्यातील समागम पाहतो आणि अपराधी भावनेने काही वक्तव्य करतो.  या पात्रामध्ये लेखकाला, नाटकाबाहेर राहून नाटकावर बोलणारा, भावी रंगभूमीवरील सूत्रधार दिसतो. 

‘नाट्यसंहितेचे प्राचीनत्व’  या प्रकरणात लेखक, अन्य प्राचीन नाट्य ग्रंथांचा आणि ऋग्वेदाच्या वयाचा विस्तृत आढावा घेऊन, ऋग्वेद हा नाट्यविषयी असे काही मांडणारा जगातील आद्य  ग्रंथ असल्याचे प्रतिपादन करतो. यज्ञाच्या वेळी ऋत्विज ऋचा म्हणताना, काही मरुताच्या आणि काही इंद्राच्या वेषात येऊन म्हणत असावेत असा लेखकाचा कयास आहे. यातून तत्कालीन नाटकाचे स्वरूप विधीनाट्य स्वरूपाचे (काही विधी करताना खेळले जाणारे नाटक, उदा: गोंधळ) असावे असा निष्कर्ष लेखक काढतो. आपली आजची रंगभूमी ही विधीनाट्यातूनच उगम पावलेली आहे हे तर सर्वमान्य आहे. पुढे यजुर्वेदात बहुरूपी या अर्थी विश्वरूप असा शब्द आहे, अथर्व वेदात वाद्यांसाह नृत्य गायनाचे उल्लेख आहेत, रामायणात बालकांडात रंगशाळेचा आणि अयोध्याकांडांत भरतासाठी नाटय प्रयोग झाल्याचे उल्लेख आहेत. कामसूत्रात  आणि ‘अष्टाध्यायी’तही नाटकाचे उल्लेख आहेत.  अशा धूसर, अस्पष्ट वाटा धुंडाळत लेखक एक अखंड नाट्य परंपरा उभी करू पहातो. 

भारतीय नाटक संस्कृत रंगभूमीच्या आधीपासून सुरू होते. उपलब्ध संदर्भांनुसार ऋग्वेदातील तिसऱ्या मंडलातले विश्वामित्र नदी संवाद सूक्त हे आद्य  नाटक आणि त्याचा रचयिता, विश्वामित्र हा आद्य नाटककार असल्याचा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. 

मात्र या प्रतिपादनातील अडचणींची, त्रुटींची त्याला जाणीव आहे. म्हणूनच स्वत:च्याच संस्कृतीबद्दलच्या भारतीयांच्या अनास्थेबद्दल तो कोरडेही  ओढतो. प्रस्तुत पुस्तक लिहितानाही लेखकाला हा विदारक अनुभव आला. अनेक वेद पाठशाळांतून, ‘ऋचांचा अर्थ असा कुणालाही सांगता येत नाही, त्यातील शक्ती कमी होते’, असं म्हणत लेखकाची बोळवण करण्यात आली. प्राज्ञ पाठशाळेच्या विद्यमान अध्यक्षा, ज्येष्ठ संस्कृत विदुषी श्रीमती सरोजा भाटे, यांनी मात्र संहिता वाचून मांडणीच्या  शिस्तीचे   कौतुक केले. वेदशास्त्र, नाट्यशास्त्र आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे असा अभिप्राय दिला. 

पडदा

Thursday, 21 December 2023

दोन शिल्पं आणि एक रसिक मन

 

दोन शिल्पं आणि एक रसिक मन

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

ती दोन शिल्पं माझा पिच्छा पुरवत असतात. मधूनच  मनात तरळून जातात. मला भावुक, अंतर्मुख करून जातात. हे असं होण्यात त्या शिल्पकाराची सारी प्रतिभाच कारण आहे. पण कधी कधी मला वाटतं की रसिकमनही तेवढेच कारण आहे.  

अश्रू म्हटलं की मराठी माणसाला आई आठवते. साने गुरुजींच्या शामच्या आईनं काही पिढ्यांवर गारुड केलं आहे. आई म्हटलं की कसली सोज्वळ आणि भावुक होतात माणसं. पण ‘आई’ नावाच्या शिल्पाने अंतर्बाह्य ढवळून निघल्याचा अनुभव  मला आला तो व्हिएतनाममध्ये. तिथल्या युद्ध-संग्रहालयात.

तब्बल वीस वर्ष चाललेलं हे युद्ध (१९५५-७५). एकीकडे बलाढ्य अमेरिका तर दुसरीकडे, दुबळा व्हिएतनाम.  शेवटी इथे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. व्हिएतनामचा विजय झाला, पण व्हिएतनामलाही काही कमी भोगावं लागलं नाही. युद्ध हरण्या खालोखाल  काही वाईट असेल, तर ते युद्ध जिंकणे होय. व्हिएतनामला याचा पुरेपूर प्रत्यय आला.

अशा या युद्धाचं  उघडंवाघडं,  भीषण वास्तव, खुलेआम मांडणारं हे युद्ध संग्रहालय. छिन्न चेहरे, विच्छिन्न  शरीरे, छिन्नमनस्क  जनता आणि नापाम बॉम्बने विद्रूप झालेल्या पिढ्याचपिढ्या. ‘एजंट ऑरेंज’ने (एक रासायनिक अस्त्र) उजाड केलेली शेती, वैराण भातखाचरे,  केळीचे सुकलेले बाग, उघडे ताड  आणि बोडके माड. एकेक दालन पार करता करता किती वेळा अंगावर सरसरून काटा येतो. उभ्याउभ्या दरदरून  घाम फुटतो. डोळे गप्पकन्  मिटून आपण जिथल्यातिथे थिजून जातो. हे क्रौर्य आपल्याला  पहावत सुद्धा नाही तर  ज्यांना भोगवं लागलं, त्यांना काय यातना झाल्या असतील; या विचारानी आपण अस्वस्थ होतो.  कोणीही सहृदय माणूस हे संग्रहालय एका झटक्यात पाहुच शकत नाही. थोडा वेळ दालनाबाहेर बसायचं पुन्हा हिम्मत गोळा करायची आणि आत  शिरायचं असं करावं लागतं. युद्धस्य फक्त  कथाच  रम्या, वास्तव किती हादरवून सोडणारं असतं ह्याचं यथार्थ दर्शन इथे घडतं.

तिथे  एक ओबडधोबड पुतळा आहे. ‘मदर’ नावाचा.  सात आठ फुट उंचीचा. नाव ‘आई’ असलं तरी मुळात तो बाईचा पुतळा आहे हेही  सांगावं  लागतं. बाईपणाचं आणि त्याहूनही आईपणाचं कोणतंच लेणं तिच्या अंगाखांद्यावर नाही. ना आसपास खेळणारी चार दोन गोजिरवाणी पोरं, ना थानाला  लुचलेलं एखादं  पदराआडचं पिल्लू. मुळात तिला थानंच नाहीत. छातीच्या फासळ्याच  तेवढ्या दिसताहेत.  अस्थिपंजर   झालेलं शरीर, त्याला कसलीही गोलाई नाही. तोंड




खप्पड, त्यावर ना वात्सल्य, ना प्रेम, ना करूणा,  ना काही. आईपणाशी निगडित कोणतीही भावना नाही त्या चेहऱ्यावर. चेहरा कसला जवळजवळ कवटीच, म्हणायची इतका भेसूर. ही कसली ‘आई’ ही तर बाई सुद्धा नाही. शिवाय ही उभी आहे जमिनीतून निवडुंगासारख्या फुटलेल्या काही पोलादी पट्यांमध्ये. कमळात वगैरे उभी असल्यासारखी. पण हिच्या हातातून मोहरा वगैरे काही पडत नाहीयेत. हिचे हात तर नुसते दोन्ही बाजूला लोंबताहेत, जीव नसल्यासारखे. काही देणं तर सोडाच पण काही मागायचंही त्राण त्यांच्यात


नाही.

ज्ञूएंग होयांग हुय अशा काही तरी नावाच्या कलाकाराची ही कृती. नाव ‘मदर’ दिलंय म्हणून, नाहीतर मम्मी ऐवजी इजिप्त्शियन ‘ममी’ म्हणून खपलं  असतं  हे शिल्प. पण ह्या कलाकृतीची पार्श्वभूमी लक्षात येताच हे शिल्प आपल्याला हादरवून सोडतं.

युद्धग्रस्त, उद्ध्वस्त, व्हिएतनाममधील ही ‘मदर’ आहे. हीचं  सर्वस्वं  लुटलं गेलं आहे. बेघर, निराधार, निरापत्य अशी ही आई आहे. म्हणजे कधीतरी ती  आई होती. आता तिची मुलं नाहीत. ती बहुधा युद्धात मारली गेली. तेंव्हा आता ती निरापत्य.  आता हिला घर नाही ते बहुधा युद्धात ध्वस्त झालं. आता हिला शेतीवाडी नाही, म्हणजे असेलही जमिनीचा तुकडा, पण नापाम बॉम्बच्या रासायनिक माऱ्यात तिथलं पीक झालंय निष्प्राण  आणि जमीन झालीय आता कायमची नापीक.

हे आर्त साकार करण्यासाठी मग कलाकाराने बॉम्बच्याच कपच्या वापरल्या आहेत. त्या युद्धध्वस्त देशातल्या त्याा शिल्पकाराला अन्य काही साधन सामुग्री नाही मिळाली बहुतेक.  ह्या कपच्यांच्याच  कमळ-पसाऱ्यात ती उभी आहे, ह्या कपच्यांनीच ती बनली आहे. ज्यामुळे ती उद्ध्वस्त झाली त्या बॉम्बच्या तुकड्या तुकड्यांनीच ती आता घडली आहे. आपल्या रयाहीन, पोकळ, वठल्या शरीरातून पहाणाऱ्याचा अंत पहाते  आहे.

 

 

व्हिएतनाममध्ये सर्वस्व गमावलेल्या  आईचं शिल्प होतं. मुले गमावलेली आई  जितकी करुण तितकेच आई गमावलेले मूलही केविलवाणे.

आई विना मुलीचं काळीज पिळवटून टाकणारं शिल्प मी पहिलं स्कॉटलंडमध्ये,  एडिनबरोला, केल्विनग्रोव्ह म्युझीयममध्ये. मूर्त कारुण्य जणू  अशी ती कारुण्यमूर्ती! ह्या शिल्पाचे   नावच मुळी  मदरलेस,  ‘आईविना’! शिल्पकार जॉर्ज लॉसन हा याचा कर्ता. याची इतरही अनेक शिल्प आहेत पण हे सर्वात गाजलेलं. सर्वात लोकप्रीय. पत्थराला पाझर फोडेल असं हे  पाषाण सौंदर्य  पहायला लोकं लांबलांबहून येतात.

 


पांढऱ्या दगडातील हे रेखीव शिल्प. एका  खुर्चीत आपल्या आपल्या सहा  सात वर्षाच्या लेकीला पोटाशी घेऊन एक बाप बसला आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचे विमनस्क भाव अगदी गडद आहेत. बऱ्यापैकी देखणा, सुखवस्तू असा हा मध्यमवयीन गृहस्थ आहे. त्याचे आणि त्याच्या लेकीचे कपडे छानच आहेत.

त्याचा गाल त्यानी तिच्या डोक्यावर टेकला आहे. डाव्या हातावर  त्या चिमुरडीचं ओझं पेललं आहे आणि  उजवा हातानी  इतक्या नजकातीनं तिच्या पायाला आधार दिला आहे की लेकीबद्दलचे सारे प्रेम, आपुलकी, जवळीक, सहवेदना त्या हलक्याशा  स्पर्शातून प्रतीत होते आहे. एका हाताने आधार तर  दुसऱ्या हाताने सांत्वन आणि विश्वास देत तो बाप स्वतःचं  दुख: लपवतो आहे. ती सुद्धा पपाला अगदी बिलगून बसली आहे. तिला बहुदा आता जगात दुसरे कोणीही नाही. त्याच्या कुशीत तीला  ऊब आणि  आसरा सापडला आहे. खूप खूप रडून तिचा चेहरा अगदी म्लान झाला  आहे. बाप कुठेतरी शून्यात नजर लावून बसला आहे तर  मुलीने डोळे मिटलेले आहेत. अगदी निर्जीव असल्यासारखा तिचा डावा हात बापाच्या हातावरून ओघळला आहे.

तिचे बूट त्याच्या पायाशी लोळताहेत. हे बूट पहाणाऱ्याच्या मनात काहूर उठवतात.  कदाचित बाहेरून कुठून तरी खेळत असताना ती अचानक घरात आली असावी. कोणी काही बोललं असेल किंवा काही निमित्तानी तिला तिची नसलेली आई आठवली असेल आणि मग गडबडीने ती डॅडीच्या कुशीत झेपावली असेल. तिची समजूत काढता काढता मग त्याने हलकेच बूट उतरवले असतील...?  किंवा बाहेर जायला म्हणून तयार होता होता, पप्पाकडून  वेण्या घालून घेता  घेता,  तिला ममाची सय आली असेल आणि मग हमसून हमसून रडण्याच्या भरात बूट तसेच राहीले असतील...?

ह्या मुलीची आई कशानी वारली असावी हाही एक अनुत्तरित प्रश्न. संग्रहालयाच्या संचालकांच्या मते आजाराने अथवा अपघातात तिचे निधन झाले असावे. पण काहींच्या मते ज्या  काळातला पुतळा आहे, त्या काळी (१८७०च्या आसपास) इंग्लंडातसुद्धा,   बायका सहसा मारायच्या त्या बाळंतपणात. 

आपण अशा कितीतरी कल्पना करू शकतो. आणि आपण कितीही कल्पना केल्या तरी प्रत्यक्ष शिल्पकाराच्या मनात काय होतं, ते समजण अवघडच. 




हलकेच स्पर्शणारा पण तरीही  आधाराचा,  आश्वासक बापाचा  हात; दुखा:त होरपळणाऱ्या लेकीचा,   निर्जीव, लुळा  हात, हे सगळं कसं साकार करत असतील शिल्पकार?  त्या घट्टमुट्ट दगडाला तासून तासून त्यात जीव ओतायचा म्हणजे काही साधंसुधं काम नाही. आपल्याला जिथे संगमरवराची  ओबडधोबड शिळा दिसते तिथे मायकल एंजेलोला म्हणे थेट शिल्पाकृतीच दिसायची. ‘मी मूर्ती घडवतच नाही, ती  तिथे असतेच, मी फक्त तिच्या आजूबाजूचा  नको असलेला दगड बाजूला करतो’, असं तो सांगायचा.

अमूर्त दगडात   मूर्ती पहाणारी, कोऱ्या कागदावरचे  चित्र टिपणारी, शांततेच्या अनाहत नादात संगीत ऐकू येणारी माणसं दिव्येंद्रधारी खरी; पण त्या बॉम्ब-कपच्यांच्या ओबडधोबड मनोऱ्याने काळजात कालवाकालव होणारी, कधीकाळी, कोण्या देशी, छिन्नीने  विषण्णता कोरलेल्या त्या दगडापुढे विषण्ण होणारी, स्वर-संवादातल्या शांततेतला  अर्थ ओळखणारी, तुम्ही-आम्ही रसिक माणसंही दिव्येंद्रधारीच की. नाही का?