Wednesday 28 February 2024

उद्बोधक

 उद्बोधक

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
मासिक पाळीमध्ये पेनकिलरचे सेवन ठरू शकते धोकादायक; ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल आराम अशा मथळ्याखाली, एका प्रख्यात मराठी दैनिकाच्या दोन वर्षापूर्वीच्या ऑनलाइन आवृत्तीत, खालील मजकूर आहे.
महिलांमधील मासिक पाळी ही एक अशी प्रक्रिया आहे जी वयाच्या १२व्या वर्षांपासून साधारण ५० वर्षांपर्यंत चालते. दर महिन्याला ३ ते ७ दिवसांसाठी मासिक पाळी येते. प्रत्येक मुलीला या दिवसांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला ओटीपोटी होणाऱ्या वेदनेमुळे त्रास होतो. अशावेळी जर तुम्ही पेनकिलरचे सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात असते. परंतु ओटोपोटी होणारी वेदना अत्यंत त्रासदायक असते. अशावेळी बहुतेक महिला पेनकिलरची मदत घेतात. परंतु त्यांच्या सेवनामुळे भविष्यात शारीरिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच आज आपण या वेदनेपासून सुटका करून घेण्यासंबंधी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
मनुके आणि केसर
मासिक पाळीदरम्यान चार ते ५ मनुके आणि १ ते २ केसर यांचे सेवन केल्याने मासिक पाळीत होणाऱ्या वेदना आणि ब्लॉटिंग सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि लोहाची कमतरता पूर्ण करण्यास देखील मदत करू शकते.
गरम पाण्याची पिशवी
गरम पाण्याच्या पिशवीत, हीटिंग पॅडमध्ये किंवा काचेच्या बाटलीत गरम पाणी भरा आणि पोट आणि पाठीचा भागला सुमारे १०ते १५ मिनिटे शेक द्या. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांप्रमाणेच गरम पाण्याने घेतलेला शेकही परिणामकारक ठरतो.
हिंगाचे सेवन
जर तुम्हीही मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे हैराण असाल तर तुम्ही हिंगाचे सेवन करावे. हे फक्त मासिक पाळीदरम्यान नाही तर संपूर्ण महिनाभर करावे. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे जो आपल्या ओटीपोटी असलेल्या मांसपेशींना मजबूत करण्यासाठी, त्यांच्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी आणि मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम देण्यास फायदेशीर आहे.
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे १२ तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर हे दाणे चाळून घेऊन ते पाणी प्यावे. मासिक पाळीदरम्यान यामुळे आराम मिळू शकतो.
भरपूर पाणी प्यावे
पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. पोट फुगण्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अधिकाधिक पाणी पिणे. याशिवाय चहा किंवा कॉफीचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे.
हिरव्या भाज्या खा
जेवणात केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालक खा. या पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. या गोष्टी लोहाचे मुख्य स्त्रोत आहेत.
वरील मजकूर अत्यंत उद्बोधक आहे. कारण वैद्यकीय विषयावर कसे लिहू नये याचा हा आदर्श वास्तूपाठ आहे. या लेखाचा आता आपण प्रत्येक वाक्य घेऊन फडशा पाडू या. यातील पहिली दोन वाक्य सामान्यज्ञानाची विधाने असून त्यावर कोणताही आक्षेप घ्यायचे कारण नाही.
तिसरे वाक्य महान डेंजरस आहे. ‘मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला ओटीपोटी होणाऱ्या वेदनेमुळे त्रास होतो’ मुळात मासिक पाळीच्या दरम्यान क्वचितच असह्य त्रास होतो. बहुतेकींचा त्रास बहुतेकदा सुसह्यच असतो. औषध लागत नाही. म्हणजेच एका सामान्य, नैसर्गिक आणि किंचितच त्रासदायक असणाऱ्या क्रियेचे वैद्यकीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ‘प्रत्येकच’ मुलीला त्रास होतो हे ठसवण्याचा मागे सर्वांनाच उपचाराची गरज असते हे सांगायचे आहे. उपचार खपवायचे आहेत, सर्वांना गिऱ्हाइक बनवायचे आहे.
‘प्रत्येक मुलीला या दिवसांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.’ सुरुवातीला वयाची जी काय मर्यादा सांगितली आहे ती पाहता या वाक्यातील ‘मुली’ हा शब्द खटकतो. ‘समस्यांना तोंड द्यावे लागणे’ हा वाक्प्रचार देखील मोठं काहीतरी संकट असल्याचं सुचवतो. साधारणपणे संकटाला ‘तोंड दिले’ जाते आणि समस्यांना आपण ‘सामोरे जात’ असतो. मात्र भाषेचा भडक वापर हे छद्म वैज्ञानिक लिखाणाचा प्रधान अवगुण आहे.
‘अशावेळी जर तुम्ही पेनकिलरचे सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.’ वाचकांच्या मनामध्ये न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड असं एकाच वेळी निर्माण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या वाक्यामध्ये आहे. पेनकिलरचे सेवन ‘अत्यंत हानिकारक’ आहे असं म्हंटलं आहे. मुळात पाळीच्या वेळेला पोटात दुखू नये म्हणून हे महिन्यातून चार दिवसच घेतले जाईल. वर्षानुवर्षे, खूप जास्त डोसमध्ये ज्यांना अशी औषधे घ्यावी लागतात अशांच्या ( उदा: संधीवात) बाबतीत हानी संभवते. पाळीसाठीच्या वापराने त्रास होण्याची शक्यता नाही. ‘पेनकीलर’ या शब्दाची भीती घालून, या औषधाने उत्साही आणि कार्यरत राहणाऱ्या महिलांना स्वतःविषयी इथे उगीचच साशंक केले आहे.
पुढे पेनकीलरला पर्याय म्हणून घरगुती उपाय सुचवलेले आहेत. मात्र हे उपाय प्रस्थापित औषधांपेक्षा प्रभावी, सरस आणि सुरक्षित असल्याचे कोणतेही अभ्यास मला तरी आढळले नाहीत. मेथीचे पाणी, मनुके आणि केशर खाल्याने वेदना कमी होत असल्याचे लिहिले आहे, मात्र याबद्दलचे संदर्भ मला सापडले नाहीत. केशराचे तर रंग आणि गंध या पलीकडचे कार्यही मला आढळले नाही.
‘(मनुके) बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि लोहाची कमतरता पूर्ण करण्यास देखील मदत करू शकते.’ हे अर्धसत्य आहे. बद्धकोष्ठ हा कायमस्वरूपी त्रास असेल तर मनुकाही रोज खायला हव्यात. फक्त पाळीच्या दरम्यान मनुका खाऊन बद्धकोष्टता साफ कशी होणार? ॲनिमियाबद्दलचे विधानही चुकीचे आहे. मनुकांमध्ये लोह असते हे खरेच, पण ॲनिमिया वर ‘उपचार’ होण्यासाठी आवश्यक त्या मात्रेमध्ये ते नसते. तेवढं लोह मिळवण्यासाठी रोज डबाभर मनुका खाव्या लागतील. मात्र अशा पद्धतीने तथाकथित ‘शास्त्रीय’ माहिती पेरून आपले लिखाण सजवण्याचा सोस छद्म वैद्यकीय लिखाणात असतोच असतो.
पुढे सबंध महिनाभर हिंगाचे सेवन, ‘ओटीपोटी असलेल्या मांसपेशींना मजबूत करण्यासाठी, त्यांच्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी आणि मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम देण्यास फायदेशीर’ ठरते असं म्हटलं आहे. ‘ओटीपोटातील मांसपेशींची लवचिकता वाढते’ हे देखील तद्दन भंपक वाक्य आहे. मुळात ओटीपोटामधील अनेक अवयवांत स्नायू असतात. गर्भपिशवी, योनीमार्ग, बीजवाहक नलिका, मुत्राशय, मलाशय याच बरोबर पोट, पाठ आणि मांड्यांचे स्नायूही ओटीपोटात एकत्र येतात. पैकी कोणत्या स्नायूंची लवचिकता वाढते, याचा उल्लेख नाही. भोंगळपणा हे छद्म वैज्ञानिक लिखाणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याचे मनोहारी दर्शन इथे घडते. तूर्तास आरोपीला संशयाचा फायदा देऊ या. या लेखाची उत्सवमूर्ती की जी गर्भपिशवी, तिचे स्नायू लवचिक होतात असं आपण गृहीत धरू या. मात्र या स्नायूंची लवचिकता मोजण्याचे यंत्र, तंत्र आणि एकक (युनिट) कोणते याबद्दल मला विलक्षण उत्सुकता आहे. या स्नायूंची लवचिकता आणि मजबूती गेल्यामुळे पाळी दरम्यान त्रास होतो आणि ती पुनर्स्थापित झाल्यामुळे तो त्रास जातो, असा घटनाक्रम येथे सुचवला गेलेला आहे. अशा प्रकारची माहिती स्त्रीआरोग्य विषयक आधुनिक ग्रंथांमध्ये आढळत नाही. गर्भपिशवीचे मुख अरुंद असल्यामुळे वेदना होतात, पुढे मुले झाल्यावर हे थोडे रुंद होते आणि वेदना कमी होतात असा एक सिद्धांत मात्र आहे. पण गर्भपिशवीच्या मुखामध्ये स्नायू अभावानेच असतात.
हिंग खाल्ल्याने गर्भपिशवीच्या मांस पेशी या मजबूत कशा होतात हे काही लक्षात आलं नाही. साधारणपणे फार कष्ट करावे लागले, की ती ती मांस पेशी जरा मोठी होते असे निरीक्षण आहे. म्हणजे पोळ्या लाटणाऱ्या किंवा टेनिस खेळणाऱ्या बायकांचे दंड मजबूत होतात वगैरे. हिंग खाल्ल्याने गर्भपिशवीच्या बाबतीत असे का व्हावे बरे?
वरवर पाहता शास्त्रीय वाटणारे हे विधान वाचकांची छाती दडपून टाकते. ओटीपोटीच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी, आणि त्यांच्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी नेमके काय करावे याचे हे नेमके मार्गदर्शन वाचून आपण थक्क होतो. लेखकाच्या सखोल ज्ञानाबद्दल आपल्या मनात नकळत आदरभाव निर्माण होतो. विज्ञान आणि अज्ञान यांची ही बेमालूम सरमिसळ वाचकांना अचंबित करते आणि त्या अचंब्यात बुद्धी बाजूला ठेवून अ(र्ध)सत्य स्वीकारायला भाग पाडते.
पुढे ‘पोट फुगण्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अधिकाधिक पाणी पिणे.’; हे ही आहे. म्हणजे गंमतच आहे. पोट फुगतं ते गॅसमुळे, आतडयाच्या मंद हालचालींमुळे. पाणी, आणि ते देखील अधिकाधिक पिण्याने ह्यात काय सुधारणा होणार? ‘चहा किंवा कॉफीचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे.’ असेही लिहिले आहे. प्रत्यक्ष अभ्यास दर्शवतात की जेमतेमच फरक पडतो तोही पडला तर.
‘जेवणात केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालक खा. या पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. या गोष्टी लोहाचे मुख्य स्त्रोत आहेत.’ असे एक असंबद्ध विधान शेवटी केले आहे. यावर आक्षेप एवढाच की विषय काय चाललाय, तुम्ही लिहीताय काय याचे तारतम्य सुटलेले दिसते.
पण कितीही कचरा असलं तरी यातून शिकण्यासारखं खूप आहे. सामान्य शरीरक्रियांचे वैद्यकीकरण, वाचकांचे गिर्हाइक बनवणे, त्यांत विविध गंड निर्माण करणे, अ(र्ध)सत्य कथन, भोंगळ, असंबद्ध विधाने ही छद्म वैद्यकीय लिखाणाची लक्षणे आहेत. वाचक संभ्रमित व्हावेत, त्यांचा दृष्टीकोन कलुषित व्हावा, अशा विकारविलसित हेतूनेच हे लिखाण केलेलं असतं.
विज्ञान लिहिण्याच्या ह्या शैलीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आपण शहाणे आणि सावध होण्यासाठी हा मजकूर अतिशय उपयुक्त आहे.

No comments:

Post a Comment