Monday, 21 May 2018

'केगेल'ने होत आहे रे...


'केगेल'ने होत आहे रे...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

वय वाढले; की हसले, खोकले की कपड्यात थोडीशी लघवीवर निसटण्याचा त्रास बऱ्याच बायकांना असतो. पण सहसा याबद्दल फारशी वाच्यता कोणी करत नाही. ‘आईला होत होतं, ताईलाही होतंय, म्हणजे हे असंच चालायचं’, अशी काहीतरी मनाची समजूत घातली जाते. याला म्हणतात स्ट्रेस युरिनरी इनकोंटीनन्स (SUI). शुद्ध मराठीत सांगायचे तर दाबजन्य मूत्र विसर्जन.
‘लघवीवर नियंत्रण नसणे’यात अनेक प्रकार आहेत, त्यांची प्रकारपरत्वे अनेक कारणे आहेत. आपण सध्या स्ट्रेस युरिनरी इनकोंटीनन्स (SUI) या प्रकाराबद्दलच बोलू. इथे थोडेसे हसले, खोकले, काही वजन उचलले (उदाः पाण्याने भरलेली बदली उचलली किंवा नातवंडाला कडेवर घेतले) की पोटातला दाब वाढतो आणि थोडीशी लघवी निसटते. एरवी काही त्रास होत नाही.
या त्रासासाठी वयच वाढायला पाहिजे असे काही नाही. प्रसूतीनंतर बऱ्याच जणींना हा अनुभव आलेला असतो. बरेचदा हा तात्कालिक असतो. नॉर्मल डिलिव्हरीचे वेळी कटी भागाचे स्नायू, खूप आणि खूप वेळ ताणले जातात. त्यांच्यातला नैसर्गिक ताण (Tone) मार खातो. इतक्या प्रमाणात आणि इतक्या वेळ ताणले गेल्यामुळे, तिथल्या नसा निकामी होतात. याचा स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो. त्यांची लवचिकता जाते, ते काहीसे लुळे पडतात. ‘कटीकाठावर स्नायू आता पहिले उरले नाहीत’ असे काहीसे होते. दीडदोन महिन्यात पुन्हा सारे स्थिरस्थावर होते. अर्थातच वारंवार आणि पाठोपाठ बाळंतपणे झाली तर हा त्रास आणखी वाढतो. खूप कष्टाची कामं करणाऱ्या किंवा अंग बाहेर येत असलेल्या किंवा अति जाड महिलांमधेसुद्धा ही तक्रार विशेष आढळते.
आता आयुर्मान वाढल्यामुळे बऱ्याच मदर इंडिया चांगल्या ग्रँडमदर इंडिया होईपर्यंत जगतात. भारतात म्हाताऱ्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे असे प्रश्न आता वाढत आहेत.
वयही वाढले आहे आणि त्रासही होतो आहे, म्हणजे तो वय वाढल्याचाच परिणाम आहे असे समजणे अगदीच बाळबोध ठरेल. जंतूबाधा, मधुमेह, बद्धकोष्ठता, काही औषधे, अशीही कारणे असू शकतात. इतकेच काय, सांधेदुखी वा पक्षाघाताने, हालचाली संथावल्यामुळे बाथरूमपर्यंत पोहोचायलाच खूप वेळ लागतो हेही कारण असू शकते. अशी सारी नीट चिकित्सा करूनच आजाराला लेबल लावलेले बरे.
या साऱ्यावर केगेलचे व्यायाम हा उत्तम उपाय आहे. अगदी प्राथमिक पण बराचसा प्रभावी असा हा उपाय. डॉ. आर्नोल्ड केगेल याचे जनक. व्यायामाने स्नायू पूर्ववत काम करू लागतात हा याचा पाया. आता या आजारासाठी काही औषधेही निघाली आहेत पण तो दुसरा पर्याय. व्यायाम अजूनही बेस्ट. ऑपरेशन हा तिसरा पर्याय. आदर्श ऑपरेशन अजूनही सापडलेले नाही. तऱ्हेतऱ्हेची शंभरावर ऑपरेशने आहेत, म्हणजे बघा. ऑपरेशन करूनही कायम स्वरूपी फरक पडेल असे नाही.
योनीमार्गाभोवतीच्या स्नायूंसाठी हा खास व्यायाम आहे. कटीतळाचे हे स्नायू अशक्त असतील तर ओटीपोटात कसतरीच वाटणे, अंग बाहेर आल्यासारखं वाटणे, कंबरदुखी अशा बारीकसारीक अनेक तक्रारी उद्भवतात. प्रसूतीनंतर योनीमार्ग सैल पडलेला असतो. यात हवा साठते आणि ती काही वेळा बाहेर पडताना आवाजही येतो. चार लोकांत असे झाले तर खूप ओशाळवाणे वाटते. या व्यायामामुळे अशा तक्रारीही नियंत्रणात येतात. निव्वळ अनियंत्रित मूत्र विसर्जनावरच नाही तर मल विसर्जनावरही ताबा प्राप्त होतो.
इतकेच काय कटीतळाचे स्नायू आवळ आणि बलवान झाल्यामुळे कामसौख्यात भर पडते. संभोगाच्या वेळी योनीचा बाह्य भाग, लघु आणि गुरु ओष्ठ मिळून एक काम-मंचक (Orgasmic Platform) तयार होतो. कामतृप्तीसाठी या मंचकाचे मर्दन होणे अतिशय आवश्यक असते. कामरंगी रंगले असता कटीतळाचे हे स्नायू विविध प्रकारे आकुंचन आणि प्रसरण पावतात. हे कामसौख्यासाठी आवश्यक आहे. ही किमया ह्या व्यायामांनी पुन्हा साध्य होते. पण जर कटीतळाचे स्नायू ढिले असतील तर कुठला काम-मंचक,  कुठले मर्दन आणि  कुठली तृप्ती!
यशाची पहिली पायरी म्हणजे व्यायाम नीट समजून उमजून करणे आणि काही विशिष्ठ वेळ त्यासाठी खास राखून ठेवणे. या व्यायामात कटीतळाचे स्नायू आवळून धरणे शिकवले जाते. या ऐवजी पोटाचे, मांडीचे व कुल्ल्यांचे स्नायू आवळण्याची चूक बरेचदा घडते. हे टाळणे अतिशय महत्वाचे. यासाठी मुळात व्यायाम नीट शिकून घेणे आणि जे केले जात आहे ते बरोबर आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. हे करायला अंगी चिकाटी हवी. हे न केल्यास बिघाड हळूहळू पण निश्चितपणे वाढत जाणार हे ठरलेले.
या स्नायूंच्या पेशीपेशीतही फरक असतो. काही पेशी संथगतीने काम करतात. कटीभागातील अवयवांना आधार देणे हे ह्यांचे मुख्य काम. काही पेशी तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या असतात. हसले, खोकले की पोटातला दाब अचानक वाढतो. अशावेळी ह्या पेशी झटकन मूत्रमार्ग आवळून टाकतात. लघवी निसटू देत नाहीत. या दोन्ही पेशीसमुहासाठी वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. संथ पेशींसाठी कटीतळाचे स्नायू आवळून मनातल्या मनात दहा अंक मोजेपर्यंत तसेच  धरून ठेवायचे. चपलगती स्नायूंसाठी आवळणे-सोडणे अशी कृती जलद गतीने करायची. बसणे, उठणे, चालणे, झोपणे वगैरे अवस्थांत स्नायूचे वेगवेगळे अंश कार्यरत असतात. त्यामुळे व्यायामही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये करावा लागतो. काही आठवड्यातच सुमारे ७०% पेशंटना लक्षणीय फरक पडतो.
सुरवातीला तर नेमके काय करायचे याबाबत बराच गोंधळ होतो. दंडाच्या स्नायूंचा व्यायाम असेल तर दंडात बेटकुळी काढून दाखवता येते, इथे बेटकुळी कशी दाखवणार? यावर युक्ती म्हणून सुरवातीला लघवीला होताना लघवीची धार थांबवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले जाते. हे ज्या स्नायूसमुच्चयाने साध्य होते, ‘त्या’ स्नायूंची हालचाल करायची आहे हे मग कळायला लागते. काही वेळा हे शिकवण्यासाठी योनीमार्गात विशिष्ठ आकाराची वजने धरायला देतात. ही वजने सांभाळत चालायला, बसायला वगैरे सांगितले जाते. यामुळेही कोणते स्नायू आकुंचित करायचे हे सहज समजते. सुरवातीला एका पेशंटसाठी मी चौकशी केली तेंव्हा ही वजने आठ हजार रुपयांना मिळतात असे कळले. मी हबकलोच. हे असले काही आमच्या ग्रामीण पेशंटना परवडत नाही. त्या म्हणतात, ‘ह्याच्यापरीस एखादा डाग केला तर गळ्यात घालून मिरवता तरी येईल. चार लोकात दाखवता तरी येईल. हा आपला फुकाचा खर्च!’
हे उत्तर ऐकून मी भंगारातून चक्क ट्रॅक्टरची बॉलबेअरिंग आणून  वजन म्हणून वापरायला दिली. झकास उपयोग झाला!! गरजवंताला अक्कल असते तर!!


Saturday, 12 May 2018

प्रेग्नन्सी आणि विमानप्रवास

प्रेग्नन्सी आणि विमान प्रवास

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

कोणे एके काळी निव्वळ श्रीमंतांची मक्तेदारी असलेला विमान प्रवास हा आता नित्याचा झाला. त्यामुळे कोणे एके काळी निव्वळ गुळगुळीत कागदाच्या मासीकातच छापला जाईल असा हा लेख आज न्यूजप्रिंटवर छापला जातो आहे. बदलत्या भारताची ही एक हलकीशी खूण.

गर्भावस्थेत विमान प्रवासाने काही त्रास होतो का?

सारे काही यथास्थित आणि साधे सरळ असेल तर विमानप्रवासासारखा सुरक्षित प्रवास नाही. यात होणारे हवेच्या दाबातील आणि आर्द्रतेचे बदल काहीही दुष्परिणाम घडवत नाहीत. विमान प्रवासाने गर्भपात, कमी दिवसांची प्रसूती, पाणमोट फुटणे वगैरे प्रकार होत नाहीत. अर्थात शहाणी पोटुशी बाई दिवस भरायच्या आत कुठे ती भरारी घेऊन टाकेल. जुळेबिळे असेल तर ३२ आठवड्याच्या आत विमानोड्डाण उरकावे हे उत्तम. दिवस भरलेल्या, अवघडलेल्या, बाईला बहुतेक विमानकंपन्याच प्रवासी म्हणून घेत नाहीत. शिवाय इतक्या अवघडलेल्या बाईची जोखीम इन्सुरन्स कंपन्याही, कचकावून पैसे घेतल्याशिवाय, स्वीकारत नाहीत.

सदतीस आठवडे झाले की कायद्याने दिवस भरतात. त्यापुढे केंव्हाही कळा सुरु होऊ शकतात. प्रत्यक्षात तारीख दिलेली असते ४० आठवडे पूर्ण झाल्याची. ही तारीख म्हणजे त्याच दिवशी प्रसूती होईल ह्याची भविष्यवाणी म्हणून दिलेली नसते. प्रसूती नेमकी कधी होणार हे डॉक्टरनाच काय, ब्रम्हदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही, असे म्हणतात, ते खरे आहे. प्रसूतीची तारीख म्हणजे बाळ पोटात सुरक्षित असण्याचा शेवटचा दिवस. तिथून पुढे वार म्हातारी होते, तिच्याच्याने बाळाचे सगळे ‘होत नाही’. त्यामुळे वाट पहायची वा नाही, आणि पहायची तर किती, हे तपासून ठरवावे लागते.

लांबच्या प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागते पण तीन ते चार तासांच्या प्रवासात काही विशेष फरक पडत नाही. प्रवासाने किरकोळ त्रास होतो. जो एरवीही होतो, तो गरोदरपणात जास्त होतो. पाय सुजतात, नाक चोंदते, कानाला दडे बसतात. आधीच उलट्यांनी जेरीस आलेली कोणी असेल तर ती अधिक जेरीस येते.

प्रवासात पायात रक्त साठून रहाते, याच्या गुठळ्या होतात आणि एखादी गुठळी तिथून सटकली की थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते. हे जीवावर बेतू शकते. मुळातच गरोदरपणात आणि पुढे प्रसूती पश्चात दीड महिन्यापर्यंत रक्त गोठण्याची क्रिया जलद होत असते. त्यात प्रवासात एका जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो आणि  आणखी प्रॉब्लेम येतात. लांबचा प्रवास असेल, वजन जास्त असेल, आधी कधी असला काही प्रकार झाला असेल, तर आणखी प्रॉब्लेम येतात. तेंव्हा सैल पेहराव असणे, बूटही योग्य मापाचे असणे, शक्यतो पॅसजकडची सीट घेऊन पाय जवळ-लांब करणे, सतत पाय हलवण्याचे बसल्या जागीही करता येतील असे व्यायाम करणे, शक्य तितक्या फेऱ्या मारणे, भरपूर पाणी पिणे आणि दारू, कोला, कॉफी अशी अपेय  पेये न पिणे, हे आवश्यक आहे. प्रवासात वापरण्यासाठी पायाच्या बोटापासून जांघेपर्यंत येणारे खास मोजे मिळतात. हे पावलाला आवळून बसतात आणि जसजसे वर जाऊ तसतसा आवळपणा कमी होतो. जांघेशी हे त्यामानाने सैलसर बसतात. ह्यामुळे पाउल, पोटरी, मांडीत, रक्त साठून रहात नाही. हे ही वापरता येतील. पण ह्यांचे माप परफेक्ट असायला हवे. प्रत्यक्ष घालून बघूनच खरेदी केलेले चांगले. ऑनलाईन मागवण्यात काही अर्थ नाही.

काहींना, काही आजारामुळे, ही गुठळ्या होण्याची शक्यता फारच असते. अशांसाठी  हिपॅरीनचे इंजेक्शन आहे. ह्यानी रक्त सहज गोठत नाही. (पेशंटच्या भाषेत, ‘रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन’.) हे उड्डाणावेळी आणि नंतर काही दिवस घ्यावे लागते. इंजेक्शन सोबत न्यायचे तर त्याचे प्रिस्क्रिप्श्नही सोबत हवे हे लक्षात असो द्यावे. ‘रक्त पातळ’ होण्यासाठी अॅस्पिरींच्या गोळ्याही दिल्या जातात. प्रवासात जो त्रास होतो तो अॅस्पिरीननी टळत नाही. तेंव्हा हिपॅरीन सांगितले तर घ्यावेच घ्यावे, पण अॅस्पिरीन चालू असतील तर त्याही चालूच ठेवाव्यात.

कमी दिवसाची प्रसूती होईल असे वाटत असेल, रक्त खूपच  कमी असेल, सिकलसेल आजारामुळे नुकताच काही त्रास झाला असेल (याला सिकलसेल क्राईसिस म्हणतात. आपल्याकडे विदर्भात सिकलसेलचे प्रमाण फार), वार खाली असेल (Placenta Previa) तर विमानप्रवास टाळणे उत्तम. काही कंपन्या नुकतेच हाड मोडलेले, नुकतेच कान फुटलेले किंवा नुकतीच पोटाची शस्त्रक्रिया झालेले प्रवासी घेत नाहीत. असे काही असेल तर आधीच विचारणा केलेली बरी. पहिल्या तीन महिन्यात सुमारे १५ ते २०% गर्भ ‘खाली होतात’. म्हणजे गर्भपात होतात. हे केंव्हाही होऊ शकते. त्यामुळे या दरम्यान आत्यावश्यक असेल तेंव्हाच प्रवास करावा.

निघण्यापूर्वी आणि पोहोचल्यानंतर, सारे काही जिथल्या तिथे आहे याची खात्री करण्यासाठी सोनोग्राफी केलेलीही बरी. कारण प्रवासानंतर काही बिघडले की ते प्रवासाआधीचे की नंतरचे यावरून सासर वि. माहेर असे यादवी युद्ध पेटू शकते.

विमानतळावरील नेहमीची सुरक्षाचाचणी बाळासाठी निर्धोक असते, त्यात एक्सरे वापरात असले तरीही. सीटबेल्ट लावणेही आवश्यक आहे. पुरेसा घट्ट आणि पोटाच्या खाली बसेल असा तो लावावा.

शेवटी प्रवास आवश्यकच आहे का?, प्रवासाने काही बिघडणार आहे का?, इन्सुरन्सवाले काय म्हणतात?, हे प्रश्न महत्वाचे. बरोबर आपले सर्व केसपेपर, औषधे, प्रिस्क्रीप्शने, फिटनेस सर्टिफिकेट, ड्यू डेट सर्टिफिकेट, इन्स्यूरन्स वगैरे असावे.

शुभास्ते पंथान: सन्तुII

उरोज कुंभापरी

उरोज कुंभापरी...!

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

साहित्य, नाट्य, शिल्प, चित्र आणि चित्रपटात उन्नत उरोजांचा उठाव काय वर्णावा.

यात, ‘घट्ट बसत्येय, हा दोष तुझ्या कंचुकीचा नाही’, असं शकुंतलेला खट्याळपणे बजावणाऱ्या कालिदासाच्या ‘शाकुंतला’तील मैत्रिणी आहेत. ‘सांगते उमर कंचुकी, बिचारी मुकी, सोसते भार...’ असे इंद्र्पुरीतून खाली आलेल्या अप्सरेचे  बहारदार वर्णन आहे. खजुराहोची विवस्त्र, उत्तान, कामशिल्पे आहेत आणि कमनीय मिस वर्ल्डची, तोऱ्यात उभी असलेली, टॉपलेस, छबीदार छबी आहे.

हे सारे  पहाता ज्यांना उरोजांच्या उन्नत उभाराची देणगी नाही, त्या स्त्रियांना ‘कसेसेच’ वाटले तर त्यात नवल ते काय?

‘मला स्तन-वर्धक शस्त्रक्रीया करून घ्यायची आहे कारण... माझी जाऊ मला सारखी हिणवते, तिचा साईझ खूप मोठा आहे!’, असे सांगणारी कुणी गावरान पेशंट, मग माझ्या सारख्या खेड्यातल्या डॉक्टरलाही भेटते. मग मला आठवतात, ते अमुक एका मापाची छाती असलीच पाहिजे, या ‘पुरुषी’ आग्रहाचा निषेध म्हणून अमेरिकेत झालेले कंचुकी दहनाचे जाहीर कार्यक्रम. हे सारे तिच्या गावी नसते आणि तिच्या गावीही नसते.

मग मला आठवते याच अमेरिकेतल्या एका नवऱ्याची भारतीय बायको. ती म्हणाली होती, ‘सक्काळी मी येईन. ऑपरेशन करून दुपारपर्यंत मला घरी जाता येईल ना?’

‘येईल की.’

‘त्याच काय आहे, रात्री माझा नवरा अमेरिकेहून यायचाय; त्याला मला सरप्राईज द्यायचय!’  

पण जनमनातले आणि माध्यमांतले, हे लक्षवेधी आणि लक्ष्यवेधी वक्षस्थळ, म्हणजे डॉक्टरांच्या लेखी निव्वळ रूप बदललेल्या घामाच्या ग्रंथी! ‘उत्क्रांती दरम्यान घर्मग्रंथींचे काही पुंजके दुग्धग्रंथी म्हणून विकास पावले आणि नंतर त्यांना लैंगिक आयामही प्राप्त झाले’, असल्या तद्दन गद्य वाक्याने अॅनॅटॉमिच्या पुस्तकातला ब्रेस्टवरचा धडा सुरु होतो. अर्थात माझ्या पेशंटनी काही अॅनॅटॉमीचे पुस्तक वाचलेले नाही. त्यांचे प्रश्न थेट असतात. स्तनवृद्धी कशी करतात?

स्तनवृद्धी शस्त्रक्रियेत स्तनामागे प्लास्टिकची जेली भरलेल्या  पिशव्या (Implant) सरकवल्या जातात. ह्या पिशव्या स्तनाच्या थेट खाली तरी सरकवल्या जातात किंवा त्याच्याही खाली स्नायू असतो (Pectoralis), त्याच्याखाली तरी सरकवल्या जातात किंवा दोन्ही थोडे थोडे केले जाते. ते असो आपण अधिक खोलात नको शिरायला.

यांनी स्तनाला योग्य तो आकार, उभार आणि दिशा देता येते. एकूण परिणाम पहाताक्षणी छाप पडणारा असतो. नंतर आरशात पहाताच पेशंटचा उर भरून येतो (म्हणे). शल्यक्रिया तशी छोटी आहे, सोपी आहे, साधी आहे, पण कौशल्याची आहे, महाग आहे. बिलाचे हे शल्य जन्मभर उरी बाळगावे लागू नये म्हणून हे स्पष्टीकरण. किंमत आहे ती त्या पिशव्यांची आणि शल्यकौशल्याची. पण हौसेला मोल नसते. पण हौसेला जरी मोल नसले तरी ह्याच्या मर्यादा, सामर्थ्ये आणि दूरगामी परिणाम, लक्षात घ्यायलाच हवेत.

यात मुळातले पिटुकले स्तन, धिटुकले करता येतात किंवा आता वयपरत्वे आणि प्रसूतीपरत्वे ओघळलेले स्तन उठावदार करता येतात.  कधीकधी दोन स्तनांच्या आकारात मुळातच लाज वाटावी इतका फरक असतो, किंवा कॅन्सर वगैरेच्या शस्त्रक्रियेने निर्माण होतो; हेही दुरुस्त करता येतं. स्तनाखालच्या घडीखाली, दिसणार नाही अशा बेताने छेद घेतला जातो आणि या पिशव्या सरकवल्या जातात. टाकेही आतल्या आत घातले जातात. त्यामुळे वरून दिसायला हे सारे अदृष्य. कधी कधी काखेतून किंवा निपल झाकणासारखे उघडूनही ही कसरत करता येते.

म्हणायचे प्लास्टिकच्या पिशव्या पण ह्या असतात सिलिकॉनच्या. आत असते सिलिकॉनची जेली किंवा क्वचित सलाईन. पण सलाईनपेक्षा सिलिकॉन जेलीमुळे मिळणारा ‘फील’ हा अधिक ‘न्याच्यूरsssल’ असतो. शिवाय हे अधिक टिकावू आणि अधिक ‘दिखाऊ’ असतात; म्हणजे सिलिकॉनने अधिक ‘न्याच्यूरsssल’ आकार येतो. देताना उत्पादक दहा वर्षाची ग्यारंटी देतात पण पुढे ते बरीच वर्ष टिकतात.

कोणाला किती मोठा इम्प्लांट बसवायचे याचे काही ठोकताळे आहेत. आले बाईजींच्या मना तेथे कोणाचे चालेना, असा प्रकार नसतो. मुळातल्या स्तनाचा आकार, उकार, ताणायला उपलब्ध त्वचा, त्या स्त्रीची इतर शरीरमापे, प्रमाणबद्धता ई. गोष्टी लक्षात घेऊन, योग्य माप (Size) निवडले जाते. एकुणात अत्यंत किरकोळ स्त्रीला जर अत्यंत उभार उरोज करून दिले तर दिसायला ते ‘काहीतरीच’ आणि ‘कृत्रिम’ दिसते. म्हणजे मूळ हेतूच बाद.

आकाराची (Shape) निवड मात्र बरीचशी पेशंटच्या इच्छा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे असे की ‘घुम्मट गोल’ इम्प्लांटमुळे, कंचुकीच्या गवाक्षातून बाहेर डोकावणारे  वक्षस्थळ बहाल करता येतात. इथे गोलाई बरोबर ‘खोलाई’ (Cleavage) दिसण्यासाठी वायरचा आधार असलेली ब्रा वापरणे उत्तम. फिल्म्स किंवा मॉडेलिंग सारख्या क्षेत्रात करीयर करायची महत्वाकांक्षा असेल, तर हे नुसते आवश्यकच नाही तर जीवनावश्यक. ‘लंबोदर’ आकाराच्या (थेंबाच्या आकाराच्या) इम्प्लांटमुळे अधिक नैसर्गिक परिणाम साधला जातो. ‘घरेलू’ पेशंटसाठी हे उत्तम.

सिलिकॉन शरीरात वर्षानुवर्षे विनातक्रार रहाते. कालांतराने या सिलिकॉनच्या इम्प्लांट भोवती एक घट्ट कवच निर्माण होते आणि आकार आणि मऊपणा मार खायला लागतो. मग हे कवच ऑपरेशन करून काढावे लागू शकते. बऱ्याच वर्षाने ही सिलिकॉनची पिशवी आतल्या आत फुटू शकते, आणि ऑपरेशन करून काढावी लागू शकते. पण ब्रेस्ट कॅन्सर, किंवा अन्य कुठलाही कॅन्सर, होण्याचा (किंवा न होण्याचा) आणि या इम्प्लांटचा अर्थअर्थी काही संबंध नाही.

मुळात ही दिखाऊ शस्त्रक्रिया आहे हे लक्षात ठेवावे. शांतपणे, सर्व बाबींचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. पुढे होणाऱ्या परिणामांची आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य उपचारांसाठीची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी असावी. कोणी कसं दिसावं हा खरं तर जिचा तिचा प्रश्न. तेंव्हा हे असले निर्णय हे सर्वस्वी स्वेच्छेने घेतलेले असावेत. ‘स्व’ची इच्छा ही खरोखरच ‘स्व’ची आहे ही खुणगाठ महत्वाची. कुणाच्या अवास्तव अपेक्षांचे, मर्दानी मताचे किंवा मिडिया प्रमाणित मापाचे गारुड आपल्या मनावर नाही ना हे आपल्याच मनाला विचारून पहाणे उत्तम.

Monday, 23 April 2018

ते दिवस त्या रात्री


ते दिवस, त्या रात्री...!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि. सातारा. पिन ४१२८०३


पाळी यायच्या आधी सुमारे दोन आठवडे, काहींना, काहीना काही तरी होत रहाते. ह्या सगळ्या लक्षणांना म्हणतात ‘प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम’, पीएमएस, (PMS). नाव भारदस्त असले तरी अर्थ मी सुरवातीला मराठीत सांगितलाय तोच आहे.  अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे उद्भवतात आणि पाळी येताच ओसरतात. बहुतेकींना काहीना काही तरी त्रास जाणवतोच. मूड जाणे, चिडचिड होणे, निराश वाटणे, डोकेदुखी, भूक विझणे, जड जड वाटणे, अंगावर सूज येणे, स्तन हुळहुळे होणे अशा अनेक तक्रारी असू शकतात. सगळ्यांनाच सगळे होत नाही. वेगवेगळ्या जणींना वेगवेगळा अनुभव येतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. इतकेच काय वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या तक्रारी देखील आढळतात. पाच दहा टक्के बायकांना रोजचे कामही करता येऊ नये इतका त्रास होतो.
कारण नेमके माहित नाही. बदलते होर्मोन्स हे एक संभाव्य कारण. गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या बायकांत हे बदल इतके तीव्र नसतात आणि ह्यांच्यात पीएमएस ही नसतो. अती खारट पदार्थ, कॉफी, मानसिक ताणतणाव हे नेहमीचे यशस्वी कलाकार इथेही कल्ला करण्यास टपलेले आहेतच. योग्य वजन आणि व्यायामानेही फरक पडतो. BMI तीसच्या आत तरी हवा.
BMI = वजन (किलो)/उंचीचा वर्ग (मिटरमध्ये)
पीएमएस च्या निदानासाठी कोणतीही विशिष्ठ तपासणी नाही. तुमच्या तक्रारींचा पाढा तुम्हीच एखाद्या डायरीत लिहून ठेवायचा. दोनेक महिन्यात तक्रारींचा आणि पाळीचा अन्योन्य संबंध लक्षात आला की झाले निदान.

उपचार
नेमके कारण माहित नाही तेंव्हा नेमके उपचारही माहित नाहीत. कुणाला कशाने बरे वाटेल तर कुणाला अगदीच विरुद्ध धर्मी औषधाने. सगळाच सावळा गोंधळ. त्यामुळे अमुक पॅथी, तमुक जडीबुटी वगैरे खेळाडूंना भरपूर वाव आहे.
उपचारांनी किती फरक पडला हे पडताळण्यासाठी डायरीचा छान उपयोग होतो. कधी कधी, काय काय आणि किती प्रमाणात झाले याचा लेखाजोखा ठेवल्याशिवाय हे निट समजत नाही. आपल्याला ‘आत्ता’ जे होतंय तेच सर्वात वाईट दुखणे असे आपण सहजच धरून चालतो.
व्यायाम, पौष्टिक आहार, तणावरहित जीवन  पद्धती अनुसरली तर तीन चार महिन्यात बऱ्यापैकी फरक पडतो. हे करूनही त्रास होतच असेल तर औषधे देता येतात.
गर्भनिरोध गोळ्या, कॅल्शियम, व्हिटामिन डी, व्हिटामिन ई वगैरे परिणामकारक ठरतात. तीन ते चार महिने देऊन गोळ्या बंद केल्या तरी बहुतेकदा पुढे बराच काळ आराम मिळतो. इस्ट्रोजेनचे पॅच मिळतात, तेही वापरता येतील. पण या बरोबर प्रोजेस्टेरॉनचा डोसही घ्यावा लागतो. अगदी क्वचित डॅनेझॉल जी.एन.आर.एच. गटातील औषधे लागतात. पण ती इतकी क्वचित की इथे त्यांचा एवढाच उल्लेख पुरे.
अनेक प्रकारची ‘हर्बल’ औषधे उपयोगी ठरू शकतात. यांच्या उपयुक्ततेबद्दल आणि निर्धोकपणाबद्दल  निश्चित माहिती घेऊनच ही वापरावीत. ‘जे जे हर्बल अथवा नॅच्युरल अथवा बिन-अॅलोपॅथिक ते ते परिणामकारक अथवा सुरक्षित अथवा सुलक्षणी’, असले खुळचट सुभाषित मेंदूत सुवर्णाक्षरांनी वगैरे कोरून ठेऊ नये. 
काही वेळा मानसतज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. तो बेलाशक घ्यावा. मानसोपचार म्हणजे ‘वेड्यांचे डॉक्टर’ आणि त्यांच्याकडे जाणारे सगळे वेडे असतात, असल्या वेडगळ कल्पना उराशी बाळगू नयेत. सर्दी खोकला झाला की शरीराला आधाराची गरज असते म्हणून आपण औषधे घेतो. अशीच कधी कधी मनाला आधाराची गरज पडू शकते. सर्दीची औषधे घेण्यात तुम्हाला वैषम्य वाटत नाही तर मग मानसोपचार घेण्यातही कमीपणा नाही. नैराश्य-नाशक औषधे उपयोगी ठरतात. कोणत्याही ‘इफेक्ट’ असलेल्या औषधांचे  असतात तसे ह्यांचेही काही ‘साईड इफेक्ट’ असतात. ते समजावून घ्यावेत. बंद करताना ती अचानक बंद करून चालत नाहीत.
टोकाच्या परिस्थितीत गर्भपिशवी आणि बीजग्रंथी काढणे हाही उपाय योजावा लागतो.
खरे तर या आजारासाठी डॉक्टर गाठण्याइतकी तीव्रता कमी बायकांच्यात दिसते. पण ते म्हणजे हिमनगाचे टोक आहे. किरकोळ तक्रारी आणि ‘आजारपण’ हे नेहेमीचेच. ह्या दिवसांमध्ये स्त्रीला घरातल्यांनी समजावून घेतले, असे काही होऊ शकते आणि त्याला सहानुभूती आणि शक्य ती मदत, हे महत्वाचे आहे अशी जाणीव बाळगली तरी निम्याहून अधिक काम भागते. पण स्त्रियांच्या मनातच पाळीबद्दल नकारात्मक भावना असतात. पुरुषांना तर पीएमएस या प्रकाराचा थांगपत्ता नसतो. या दिवसात बायकोचे डोके फिरते एवढेच त्यांना कळते. तेंव्हा पुरुष (आणि कुटुंब) शिक्षण हे ही महत्वाचे. माझ्या परिचयाच्या एक ऑफिसर मॅडम आहेत. त्यांना पीएमएसचा प्रचंड त्रास. त्यांच्या मुलाला वर्गात मासिक पाळीबद्दल शिकवताना, ‘असा असा प्रकार तुमच्या आईत होत असतो’ अशा सुरात त्याच्या सायन्स टीचरनी शिकवला. ते सगळे शिकून त्या मुलाच्या वागणुकीत इतका फरक पडला की शालेय वयातला तो मुलगा, आपल्या आईला ‘त्या’ दिवसात काही मदत करू का? पाय चेपून देऊ का? असे आपण होऊन विचारू लागला... आणि त्या बाईंचा पीएमएस पळाला.

Thursday, 12 April 2018

फेनमनचे फँटास्टीक फंडे


फेनमनचे फँटास्टीक फंडे
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि. सातारा. मो.क्र. ९८२२०१०३४९

शास्त्रज्ञ कसलाही विचार अगदी काटेकोरपणे, डोके चालवूनच करतात. आता थापा मारण्याचेच बघा ना. आपण सगळे कधी ना कधी थापा मारतो. मस्त लोणकढी थाप मारल्याने, मस्त मज्जा येते. कधी त्या पचतात, कधी आपण पकडले जातो.
रिचर्ड फेनमन हा जगप्रसिद्ध नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ. मोठ्या गमत्या आणि खोडसाळ. थापा मारण्याचे सुद्धा एक शास्त्र आहे, असे त्याचे प्रतिपादन. थापा मारण्यासाठी आणि त्या पचण्यासाठी मानवी मनाचा सूक्ष्म विचार करावा लागतो. त्याचे म्हणणे उत्तम थाप ही खरेतर थाप नसतेच. तुम्ही खरेतर खरेच सांगितले पाहिजे, पण अशा खुबीने की समोरच्याला ती लोणकढी थाप वाटायला हवी.
आपल्या कॉलेज जीवनातील अशा अनेक गंमती तो सांगतो.
होस्टेलवर शेजारच्या खोलीत दोन अतिशय अभ्यासू, स्कॉलर, अगदी पुस्तकातील किडे, अशी मुले रहायची. कोणीही आला-गेला तरी यांची एकच सूचना, ‘दार लावून घे रे.’ म्हणजे यांचा अभ्यास निर्विघ्नपणे चालू. बाहेरच्या गोंगाटाचा जरासुद्धा त्रास नको. अर्थातच इतकी स्कॉलर मुले होस्टेलच्या संस्कृतीस अनुसरून, अतिशय लोक-अप्रीय होती.
एके दिवशी पहाटे फेनमन उठला आणि बघतो तर काय कोणीतरी वात्रट पोरांनी, त्या मित्रांच्या खोलीचे एक दारच गायब केले होते. वर पाटी खरडून ठेवली होती, ‘दार लावू घे रे’.
फेनमनने मग दुसरे दारही अलगद बिजागरीतून सोडवले आणि पार गच्चीत पाण्याच्या टाकीमागे लपवून ठेवले. सकाळी उशीरा, खोलीतून आपण त्या गावचेच नाही अशा अविर्भावात, फेनमन बाहेर आला. एव्हाना दार गायब झाल्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली होती. त्या पाटीवरच्या अक्षरावरून दार कोणी चोरले हे लगेचच लक्षात आले. पण तो मुलगा म्हणायला लागला की, ‘मी फक्त एकच दार चोरले आहे. दुसऱ्या दाराचा मला काहीही पत्ता नाही.’ हा लबाड मुलगा एकच दार चोरल्याची बतावणी करतो आहे ह्याची साऱ्यांनाच बालंबाल खात्री होती. दोन्ही दारे गायब असताना आपण निव्वळ एकच चोरले अशी कबुली देणारा, थापच मारत असणार, नाही का? फेनमन पुढे येऊन साळसूदपणे सांगायला लागला की, ‘दुसरे दार मी काढले आहे! हे काय माझ्या हाताला इथे खरचटले आहे. जिन्यातून दार नेताना हाताला इथे थोडा रंग लागला आहे.’ अर्थातच यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. पहिले दार चोरले त्यानेच दुसरेही चोरले असणार असेच सर्वजण गृहीत धरून चालले. सर्व जण पहिले दार काढणाऱ्या मुलाच्याच मागे लागले. अशाच तंग वातावरणात आठवडा गेला. दुसरे दार काही सापडले नाही. शेवटी रेक्टरने सभा बोलावली. मुलांकडून सूचना मागवल्या.
फेनमन बोलायला उभा राहिला आणि म्हणाला, ‘हे दार चोरा, हे महान शर्विलका, तू जो कोणी असशील तो इथे प्रकट हो. तुझी बुद्धिमत्ता आगाध आहे. तुझी प्रज्ञा सूर्याहून तेजस्वी आहे. आम्ही तुझ्यापुढे काजवे आहोत काजवे. तू आमच्या साऱ्याहून अतिशय हुशार असून, तुला मानला. आम्ही सारे जण तुझ्या चरणासी लोळण घ्यायला तयार आहोत, तुझ्या अंगठ्याचे तीर्थ घ्यायला तयार आहोत, पण तू इथे स्वतःला प्रकट कर. जर ते शक्य नसेल तर निदान दार कुठे लपवले आहेस, ते एखाद्या  चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठीतरी गुपचूप कुणालातरी  सापडेल अशी ठेव. तुझी अफाट प्रतिभा, तुझे ज्ञान, तुझे कौशल्य...’ असे करत करत फेनमनने त्या अज्ञात चोराची तोंड फाटेस्तोवर अशी काही स्तुती केली, की लवकरच सर्व मंडळी ह्या नाटकीपणाला वैतागली आणि सर्वांनी मिळून त्याला गप्प केला.
पुढच्या मुलाने असे सुचवले की अगदी शपथपूर्वक सर्वांनी दार घेतले नसल्याचे सांगावे. ही सूचना लगेचच अंमलात आणली गेली. रेक्टर एकेका मुलापाशी जाऊन, ‘तू दार घेतले आहेस का?’, असे विचारू लागले. सगळे अगदी शपथघेऊन नाही म्हणाले. फेनमन म्हणाला, ‘हो, मी घेतले आहे!’ पण अर्थातच फेनमनवर कोणीच विश्वास ठेवला नाही. स्वतः अतिशय हुशार असल्याचे दाखवण्यासाठीच, तो दार घेतले असल्याची बतावणी करतोय असेच सगळ्यांना वाटले. खोटे न बोलता त्यानी सगळ्यांना बनवले होते.
दुसऱ्या दिवशी फेनमनने दाराचा पत्ता सांगणारी  चिठ्ठी स्वतःच्या सहीसकट, नोटीस बोर्डवर लावली. फेनमनने आपल्याला मामा बनवल्याचे लक्षात येताच सगळेच खो खो हसू लागले.
अशीच दुसरी एक फेनमन गंमत.
कॉलेज जवळच्या ठराविक हॉटेलमधले ठराविक टेबल फेनमनचे ठरलेले. तिथेच तो बसणार, कॉफी पिणार आणि जाणार. तिथली वेट्रेसही त्याला आता ओळखू लागली होती. अगदी चटपटीतपणे कामे उरकणारी ही चुणचुणीत मुलगी. पण फेनमनच्या एक लक्षात आले, की शेवटी तिचे सारे लक्ष त्याने ग्लासखाली ठेवलेल्या टीपवर असे. टिप ठेवताच ती झर्रकन पुढे येऊन आधी टिप खिशात घाली. अर्थात यात काही जगावेगळे नव्हतेच, सर्वच वेटर सारखेच.
एकेदिवशी फेनमनला तिची खोडी काढायची लहर आली. त्याने टिपसाठीचे नाणे  ग्लासात टाकले, तो ग्लास पाण्याने काठोकाठ भरला, त्यावर कागद ठेऊन तो उपडा ठेवला आणि अलगद कागद घेतला काढून. उपड्या ग्लासात पाणी आणि टेबलावर लखलखीत नाणे. आणखीही एका ग्लासाखाली असेच नाणे ठेऊन हा गेला निघून. त्या पाणी भरल्या ग्लासातले नाणे आता पाणी न सांडता काढायचे कसे? ग्लास उचलला की पाणी सांडणार!
दोन दिवसांनी फेनमनची स्वारी रमत गमत टेबलाशी येऊन बसली. सगळे वातावरण लगेचच बदलले. ती नेहमीची वेट्रेस तिथे फिरकली देखील नाही. ती फुरंगटून वेगळ्याच टेबलला सर्व्हिस देऊ लागली. नव्या वेट्रेसकडे याने चौकशी केली तेंव्हा उडालेला सगळा गोंधळ त्याला समजला.
टिप घेण्यासाठी ग्लास उचलणार एवढ्यात काय  गोची आहे हे आधीच्या वेट्रेसच्या लक्षात आले होते. मग तिनी बराच वेळ विचार करून मॅनेजरला बोलावले. त्यानेही खूप विचार केला, पण पाण्याने भरलेल्या उपड्या ग्लासमधील नाणे, पाणी न सांडता कसे घ्यावे हे त्यालाही उमगेना. आसपासची इतर गिर्हाईकेही मग स्वतःहून ह्या बुचकळ्यात पडली. अखेर त्याने, एक प्रयत्न म्हणून, ग्लास जरा वर केला आणि क्षणात टेबलावर आणि टेबलाखाली पाण्याचे थारोळे साठले. ते पुसून घेता घेता तिच्या हातून दुसऱ्या ग्लासलाही धक्का लागला आणि पुन्हा एकदा पाणीच पाणी झाले. त्यातच ती पाय घसरून पडली. साऱ्या हॉटेलला फुकटची करमणूक आणि साऱ्या कॉलेजभर नाही ती चर्चा. या फजितीमुळेच ती आधीची वेट्रेस फुरंगटून बसली होती.
शेवटी ती नवीन वेट्रेस फेनमनला म्हणते कशी, ‘तू तरी सांग बरे, तू नाणे कसे काढले असतेस ते?’ फेनमनने पुन्हा तोच प्रयोग केला आणि तिला म्हणाला, ‘एखादे पातेलं आण बरे.’ मग त्याने पातेले टेबलाच्या कडेला धरले, तो ग्लास अलगद टेबलाच्या कडेबाहेर सरकवला, सगळे पाणी पातेल्यात गोळा झाले आणि ह्याने अलगद ग्लास खालचे नाणे घेतले. सगळे अवाक झाले. आपल्याला हे आधी कसे सुचले नाही, असा विचार करत, हसू लागले.
पण फेनमनची खुमखुमी अजूनही जिरली नव्हती. जाता जाता त्याने कॉफीच्या मग उपडा ठेवला आणि त्याखाली टीप ठेवली.
दुसऱ्या दिवशी स्वारी अवतरली तेंव्हा दुसरी वेट्रेसही घुश्यात होती.
‘काय झाले गं? मिळाली ना टीप काल?’
‘मिळाली की’
‘मग?’
‘मग काय?’
‘नीट घेतलीस ना?’
‘हो, घेतली अन काय! आत जाऊन पातेले आणले. ते खाली धरले, अलगदपणे तो मग टेबलाच्या कडेला आणला आणि पाणी पातेल्यात पडेल अशा बेताने सरकवला.’
‘मग?’
‘मग काय, त्यातले नाणे पडले पातेल्यात, पण इतक्या काळजीपूर्वक मी टेबलाच्या कडेशी आणलेल्या त्या मगमध्ये पाणी नव्हतेच!!!’
****************************************



Tuesday, 10 April 2018

टाका रुते कुणाला...


टाका रुते कुणाला...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
ऑपरेशनबद्दल चर्चा चालू असते. मधूनच बाणासारखा प्रश्न येतो, ‘किती टाके पडतील डॉक्टर?’ विचारते बहुधा ती पेशंट स्वतः.
जितके टाके जास्त तितकं ऑपरेशन मोठं हा घट्ट समज. एके काळी हे सार्वत्रिक सत्य होतं. मोठ्ठ ऑपरेशन करायला, मोठ्ठ पोट फाडावंच लागायचं. जेवढी  मोठी जखम तेवढी ऑपरेशनची किंमत वाढायची. सर्व अर्थानी. मोठ्ठ्या ऑपरेशनवालीची सहनशक्ती मोठी. तिची शान मोठी. तिचा मान मोठा. सन्मान मोठा. ऑपरेशनचा खर्च मोठा. हा खर्च पेलणारा कारभारी मोठा. कौतुक मोठं. अचंबा मोठा. भेटायला येणार लवाजमा मोठा.
कॉलेजमधेही हेच शिकवलं जायचं. पुरेसं लांब इंसिजन (छेद) ही पहिली पायरी. यालाच अडखळला तर मग तो सर्जन कसला? सर्जनला सिंहाची छाती हवी (हे असं इंसिजन घ्यायला), हत्तीचे पाय हवे (बराच वेळ उभं रहायला), गरुडा सारखी नजर हवी आणि स्त्रीचे कोमल हात हवेत; असं वैद्यकीय सुभाषित आहे एक. त्यावेळची परिस्थिती होती खरंच तशी.
आता जग बदललं. भुलीच तंत्र बदललं. नवी नवी औषधं आली. प्रकाश वळवता येतो असा शोध लागला. मग तो वळवून कुठेही नेता यायला लागला. पोटात, गर्भपिशवीत, कानात, नाकात, गुडघ्यात, कवटीत, पाठीच्या मणक्यात... कुठेही. छोटे कॅमेरे, छोटी छोटी इंस्ट्रूमेंट्स निघाली. पोट फाडून जे करावं लागायचं ते आता छोट्याच्या भोकातून शक्य झालं. पोटात काय दडलंय; आत भानगड काय आहे, हे बघायला आता ‘दार उघडण्याची’ गरज नाही. जणू ‘किल्लीच्या भोकातून’ आतली सगळी मज्जा दिसायला लागली.
पण या भानगडीत ते टाक्यांचं कौतुक लोपलं. टाक्यांची असोशी असलेल्या बायका अगदी मनात हिरमुसून जातात. टाके नाहीत म्हणजे भलतंच. टाके नाहीत? मग काय मज्जा?  
सीझर सुद्धा बिन टाक्याचं करता येतं. म्हणजे पोट पूर्वीइतकंच उघडावं लागतं. त्याशिवाय बाळ कसं काढणार? पण शिवताना टाके आतल्या आत रहातील असे घातले जातात. वरून म्हणाल तर दिसायला टाके शून्य! खरंतर ही शिंप्यांची पिढ्यांपिढ्यांची ट्रिक आहे. डॉक्टरांनी ती त्यांच्याकडूनच उचलेली आहे. धावदोरा, कशिदा असे टाके ऑपरेशनमधेही वापरले जातातच. असं काय काय, कुठून कुठून उचललंय डॉक्टरनी. न्हाव्याची कात्री धरायची पद्धत..  गुरख्यांच्या गाठी... लोहाराचं रिबीट... चांभाराची आरी... सुताराची करवत ही आमचीही शस्त्र आहेत. कोणत्याही ऑपरेशनमध्ये पेशंट मोजते ते वरुन दिसणारे टाके. आत बरेच टाके असतात. सीझर झालं तर आत निदान पन्नास टाके तरी असतात, विविध स्तरांना सांधण्यासाठी. वर मात्र दहा पंधरा पासून, शून्य पर्यंत टाके घालून त्वचा शिवता येते. काही वेळा चक्क स्टेपलर आणि पिनाही वापरल्या जातात.
पूर्वी सीझर म्हटलं की हे भलं थोरलं इंसिजन, बेंबीपासून ओटीपोटापर्यंत. मोठ्ठा उभा व्रण. मग त्यावर आडव्या रेघांची नक्षी. त्या बाईला मनात आलं तरी बेंबी खाली साडी घालणं अवघड. आता इंसिजन असतं ते आडवं, अगदी खाली, अगदी ओटीपोटावर. बिकिनी घातली तरी दिसणार नाय! ह्याला म्हणतातच ‘बिकिनी इंसीजन’. हे अधिक चांगलं. अनेक अर्थानी. दुखतं कमी. भरून येतं झटपट. नंतर हार्नियाची शक्यता कमी. टाकेही आतल्या आत असतात, आपले आपण विरघळणारे असतात. काढायची भानगड नाही. व्रण अगदी दिसेल न दिसेलसा उमटतो. शिवाय शरीराच्या (सहसा) न दिसणाऱ्या भागावर असतो. त्यामुळे जास्त टाके म्हणजे जास्त मोठ ऑपरेशन असं आता राहिलेलं नाही. बरीच मोठी आणि अत्यंत गुंतागुंतीची ऑपरेशन आता दुर्बिणीतून (टाक्याविना) करता येतात. शक्य असेल तर कोणतही ऑपरेशन बिनटाक्याचंच करणं योग्य. अर्थात त्यासाठी डॉक्टर तशा तयारीचा हवा आणि इतर साधन सामुग्रीही उत्तम प्रतीची हवी. ‘परंतु तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!’ ऑपरेशन टाक्याचं की बिन टाक्याचं हा चॉइस बराचसा डॉक्टरवर सोडायला हवा.
सगळ्यात कॉमनली केलं जाणारं बिनटाक्याचं ऑपरेशन म्हणजे स्त्री-नसबंदी. ‘लाईटीवरचं’, ‘फिरकीचं’, अशी अनेक लाडाची नावं त्याला पेशंटनी ठेवली आहेत. हे ‘फेल जातं’ अशी वदंता आहे. पण अभ्यासात असं दिसून आलेलं नाही. तुलना करता, टाक्याच्या आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ‘फेल जाण्याचं’ प्रमाण सारखंच आहे.
टाके न भिजवण, हे ही एक कर्मकांड आहे. अंघोळीचं पाणी टाक्यात जाऊन त्यात पाणी होत नाही. टाके नीट जुळले नाहीत, इन्फेक्शन झाले, आतल्या आत चरबीचं पाणी होत राहीलं, तर जखमेत ‘पाणी’ होतं. अंघोळीचं पाणी जखमेत ‘शिरून’ साठूनबिठून रहात नाही. जखम शिवल्यावर काही तासात तिथे एक सीलबंद पापुद्रा तयार होतो. मग फारसं काही आत-बाहेर जाऊ शकत नाही. ड्रेसिंग हे रोगजंतूंचा जखमेशी सहज संपर्क येऊ नये म्हणून असतं. ड्रेसिंगमुळे जखमेला कमालीची सुरक्षा वगैरे मिळत नाही. अशी सुरक्षा आपल्या प्रतिकारशक्तीमुळे मिळते.
भात, बटाटा, पावटा आणि वांगं हे नाहक बदनाम पदार्थ आहेत. यांच्यामुळे म्हणे टाके बिघडतात. असं काही होत नाही. भात आणि बटाटा हे रोजच्या आहारात असणारे जगात कित्येक देश आहेत. आख्खी कोकणपट्टी भातावर जगते... आणि तिथली ऑपरेशने निर्विघ्नपणे पार पडत असतात. भात, बटाटा, पावटा, आणि वांगं एकत्र करून खाल्लं तरी टाक्यांना काsssही फरक पडत नाही. (इथे या व्यक्तीला डायबेटीस वगैरे नाही हे गृहीत आहे हं.)
थोडक्यात टाक्यावरून ऑपरेशनची परीक्षा करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत.