Monday 23 April 2018

ते दिवस त्या रात्री


ते दिवस, त्या रात्री...!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि. सातारा. पिन ४१२८०३


पाळी यायच्या आधी सुमारे दोन आठवडे, काहींना, काहीना काही तरी होत रहाते. ह्या सगळ्या लक्षणांना म्हणतात ‘प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम’, पीएमएस, (PMS). नाव भारदस्त असले तरी अर्थ मी सुरवातीला मराठीत सांगितलाय तोच आहे.  अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे उद्भवतात आणि पाळी येताच ओसरतात. बहुतेकींना काहीना काही तरी त्रास जाणवतोच. मूड जाणे, चिडचिड होणे, निराश वाटणे, डोकेदुखी, भूक विझणे, जड जड वाटणे, अंगावर सूज येणे, स्तन हुळहुळे होणे अशा अनेक तक्रारी असू शकतात. सगळ्यांनाच सगळे होत नाही. वेगवेगळ्या जणींना वेगवेगळा अनुभव येतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. इतकेच काय वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या तक्रारी देखील आढळतात. पाच दहा टक्के बायकांना रोजचे कामही करता येऊ नये इतका त्रास होतो.
कारण नेमके माहित नाही. बदलते होर्मोन्स हे एक संभाव्य कारण. गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या बायकांत हे बदल इतके तीव्र नसतात आणि ह्यांच्यात पीएमएस ही नसतो. अती खारट पदार्थ, कॉफी, मानसिक ताणतणाव हे नेहमीचे यशस्वी कलाकार इथेही कल्ला करण्यास टपलेले आहेतच. योग्य वजन आणि व्यायामानेही फरक पडतो. BMI तीसच्या आत तरी हवा.
BMI = वजन (किलो)/उंचीचा वर्ग (मिटरमध्ये)
पीएमएस च्या निदानासाठी कोणतीही विशिष्ठ तपासणी नाही. तुमच्या तक्रारींचा पाढा तुम्हीच एखाद्या डायरीत लिहून ठेवायचा. दोनेक महिन्यात तक्रारींचा आणि पाळीचा अन्योन्य संबंध लक्षात आला की झाले निदान.

उपचार
नेमके कारण माहित नाही तेंव्हा नेमके उपचारही माहित नाहीत. कुणाला कशाने बरे वाटेल तर कुणाला अगदीच विरुद्ध धर्मी औषधाने. सगळाच सावळा गोंधळ. त्यामुळे अमुक पॅथी, तमुक जडीबुटी वगैरे खेळाडूंना भरपूर वाव आहे.
उपचारांनी किती फरक पडला हे पडताळण्यासाठी डायरीचा छान उपयोग होतो. कधी कधी, काय काय आणि किती प्रमाणात झाले याचा लेखाजोखा ठेवल्याशिवाय हे निट समजत नाही. आपल्याला ‘आत्ता’ जे होतंय तेच सर्वात वाईट दुखणे असे आपण सहजच धरून चालतो.
व्यायाम, पौष्टिक आहार, तणावरहित जीवन  पद्धती अनुसरली तर तीन चार महिन्यात बऱ्यापैकी फरक पडतो. हे करूनही त्रास होतच असेल तर औषधे देता येतात.
गर्भनिरोध गोळ्या, कॅल्शियम, व्हिटामिन डी, व्हिटामिन ई वगैरे परिणामकारक ठरतात. तीन ते चार महिने देऊन गोळ्या बंद केल्या तरी बहुतेकदा पुढे बराच काळ आराम मिळतो. इस्ट्रोजेनचे पॅच मिळतात, तेही वापरता येतील. पण या बरोबर प्रोजेस्टेरॉनचा डोसही घ्यावा लागतो. अगदी क्वचित डॅनेझॉल जी.एन.आर.एच. गटातील औषधे लागतात. पण ती इतकी क्वचित की इथे त्यांचा एवढाच उल्लेख पुरे.
अनेक प्रकारची ‘हर्बल’ औषधे उपयोगी ठरू शकतात. यांच्या उपयुक्ततेबद्दल आणि निर्धोकपणाबद्दल  निश्चित माहिती घेऊनच ही वापरावीत. ‘जे जे हर्बल अथवा नॅच्युरल अथवा बिन-अॅलोपॅथिक ते ते परिणामकारक अथवा सुरक्षित अथवा सुलक्षणी’, असले खुळचट सुभाषित मेंदूत सुवर्णाक्षरांनी वगैरे कोरून ठेऊ नये. 
काही वेळा मानसतज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. तो बेलाशक घ्यावा. मानसोपचार म्हणजे ‘वेड्यांचे डॉक्टर’ आणि त्यांच्याकडे जाणारे सगळे वेडे असतात, असल्या वेडगळ कल्पना उराशी बाळगू नयेत. सर्दी खोकला झाला की शरीराला आधाराची गरज असते म्हणून आपण औषधे घेतो. अशीच कधी कधी मनाला आधाराची गरज पडू शकते. सर्दीची औषधे घेण्यात तुम्हाला वैषम्य वाटत नाही तर मग मानसोपचार घेण्यातही कमीपणा नाही. नैराश्य-नाशक औषधे उपयोगी ठरतात. कोणत्याही ‘इफेक्ट’ असलेल्या औषधांचे  असतात तसे ह्यांचेही काही ‘साईड इफेक्ट’ असतात. ते समजावून घ्यावेत. बंद करताना ती अचानक बंद करून चालत नाहीत.
टोकाच्या परिस्थितीत गर्भपिशवी आणि बीजग्रंथी काढणे हाही उपाय योजावा लागतो.
खरे तर या आजारासाठी डॉक्टर गाठण्याइतकी तीव्रता कमी बायकांच्यात दिसते. पण ते म्हणजे हिमनगाचे टोक आहे. किरकोळ तक्रारी आणि ‘आजारपण’ हे नेहेमीचेच. ह्या दिवसांमध्ये स्त्रीला घरातल्यांनी समजावून घेतले, असे काही होऊ शकते आणि त्याला सहानुभूती आणि शक्य ती मदत, हे महत्वाचे आहे अशी जाणीव बाळगली तरी निम्याहून अधिक काम भागते. पण स्त्रियांच्या मनातच पाळीबद्दल नकारात्मक भावना असतात. पुरुषांना तर पीएमएस या प्रकाराचा थांगपत्ता नसतो. या दिवसात बायकोचे डोके फिरते एवढेच त्यांना कळते. तेंव्हा पुरुष (आणि कुटुंब) शिक्षण हे ही महत्वाचे. माझ्या परिचयाच्या एक ऑफिसर मॅडम आहेत. त्यांना पीएमएसचा प्रचंड त्रास. त्यांच्या मुलाला वर्गात मासिक पाळीबद्दल शिकवताना, ‘असा असा प्रकार तुमच्या आईत होत असतो’ अशा सुरात त्याच्या सायन्स टीचरनी शिकवला. ते सगळे शिकून त्या मुलाच्या वागणुकीत इतका फरक पडला की शालेय वयातला तो मुलगा, आपल्या आईला ‘त्या’ दिवसात काही मदत करू का? पाय चेपून देऊ का? असे आपण होऊन विचारू लागला... आणि त्या बाईंचा पीएमएस पळाला.

No comments:

Post a Comment