Wednesday, 31 July 2024

क्युटरस मनोगत

 

लेखकाचे मनोगत

मुमूर्षू मराठी आणि क्यूटरस

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

‘क्यूटरस’चं भाषांतर करायला मी होकार दिला आणि मराठीच्या मरणाला आता आपणच कारणीभूत ठरतो की काय असं मला वाटू लागलं. बहुत दिन जाहले मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे असे ऐकतो. मात्र अजून काही म्हातारी मेलेली नाही. दिसामासांनी तिला मांस चढत आहे असेही नाही आणि दिसामासांनी तिचे मांस झडत आहे असेही नाही.  मी आपला गरीब बिचारा, माझ्यापुरता मराठी प्रेमी होतो आणि आहेही. मी लिहितो  सहसा वैद्यकीय विषयांवर आणि मग न चुकता मराठी प्रतिशब्दांचा वापर करत लिहितो.  तेवढीच आपली माय मराठीची सेवा. मात्र क्यूटेरसच्या घुटक्याने माय  मराठीने शेवटचा आचका दिला तर? हे पातक माझ्या माथी कशाला? मी आपला ‘क्यूटेरस’ची प्रत अनिमिष का काय म्हणतात तसल्या नेत्रांनी पुन्हा पुन्हा पहात राहिलो.

‘क्यूटरस’ हे डॉ. तनया नरेंद्र उर्फ डॉ. क्युटेरस हीचं गाजत असलेलं पुस्तक.   पुस्तकातली भाषा ही कॉलेजमधली, थेट कॉलेजकट्ट्यावरची; त्याहीपेक्षा  बॉईज हॉस्टेलच्या खोल्यांमधली ही भाषा.  कदाचित लेडीज होस्टेलच्या खोल्यांमधीलही असेल. स्त्री पुरुष समानता जशी जीव धरू लागली आहे तशी मुलांची आणि मुलींची भाषा एकजीव होऊ लागली आहे.   त्यामुळे मुली काही वेगळ्या भाषेत आणि वेगळं बोलत असतील असं मला वाटत नाही.  ही भाषा अतिशय थेट, मोकळीढाकळी, शिव्या आणि कमरेखालच्या अवयवांच्या उल्लेखाने भरलेली.

अर्थात हे सगळे इंग्लिशमध्ये होतं. त्यामुळे ते चालून जात होतं, उलट  वाचायला गोड वाटत होतं.  मनातल्या मनात यातील काही वाक्यांचा मी अनुवाद केला. मराठीत ते वाक्-प्रयोग इतके खटकत होते की विचारायची सोय नाही. फक्, शीट, बॉलस्  यासारखे शब्द भाषांतरीत  करायचे   म्हटलं तर मामला तितका सीधा राहात नाही. एक तर यांचे मराठी प्रतिशब्द आपल्या बोलण्यात नाहीत आणि वैद्यक-विज्ञान  लिहिण्यात तर नाहीतच नाहीत.   

त्यात ठिकठिकाणी व्याकरणाचे पार बारा  वाजले होते. ‘मी सांगितलं त्याला, खुद का बिझनेस माइंड कर ना!’ अशा सारखी वचने होती. त्याच बरोबर हिन्दी शब्दांची मुक्त सरमिसळ इथे होती. मराठीची प्रमुख मारेकरी इंग्रजी नव्हे तर हिन्दी असणार आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे हिन्दीबद्दल मला विशेष राग. आता ह्या भाषांतराच्या निमित्ताने ह्या साऱ्या शब्दांचं, व्याकरणाचं भरताड मराठीत आणून मी काय साधणार होतो? आधीच मराठीवर चहूबाजूने आक्रमणे होत असताना हे असलं काही करून आपण नेमकी भाषेची सेवा करतो आहोत की घात करतो आहोत, असा प्रामाणिक प्रश्न मला पडला. ही भाषा फार शुद्ध करून, सोवळी करून घेण्यातही अजिबात अर्थ नव्हता. असं करणं म्हणजे ‘चंपा’ची ‘सिंधू’ केल्यासारखं झालं असतं. (आणि भाषा वेगळ्या अर्थानी सोवळी झालीच असती!)

मग मी विचार केला, असली भाषा वापरुन डॉ. तनयानी इंग्रजीचं नुकसान केलंय का? जगभरातील बोलीतील शब्द रिचवून  आज इंग्रजीची १५-२० रुपे जगभर प्रचलित आहेत. हे  चांगले का वाईट? मग हॉस्टेलमधल्या खोल्यांतील मराठीचे एक रूप  कागदावर उतरवले तर बिघडलं  कुठे? मग अशी भाषा वापरणाऱ्यांसाठी त्याच भाषेत विज्ञान सांगितलं तर बिघडलं कुठे?  याने मराठी भाषा झाली तर पुष्टच होईल.

भाषा प्रवाही असते.  गाहा सत्तसईतील भाषा किंवा ज्ञानेश्वरीतील भाषा  ही मराठीच आहे पण ती समजावून घ्यावी लागते.  आपल्या आसपासची भाषा आपल्याला आपलीशी वाटते. वाचवायची तर ती वाचवायची अशी आपली धारणा असते. आपलं आयुष्य किती?, भाषेचं किती?; फार तर या भाषा वाचवण्याच्या भानगडीत  आपल्या आसपासची भाषा आहे तशी ठेवण्याचे प्रयत्न आपण करू; पण त्याला अर्थ किती? तुम्ही कितीही आपटा, उद्याची भाषा तर वेगळीच असणार आहे. शब्द वेगळे, वाक्प्रचार वेगळे, आजच्या शब्दांचेही अर्थ वेगळे, व्याकरण वेगळे; हे तर होणारच. तेंव्हा भाषा वाचवण्याचं ओझं मी जरा खाली ठेवलं आणि मला हुश्श झालं.

भाषा ही विषयाला न्याय  देणारी असावी लागते. इथली भाषा ही एखाद्या डॉक्टरच्या लेखणीत अजिबातच  शोभेशी नाही.  शीलवंत, मर्यादशील अशी ती नाही.  डॉ. विठ्ठल प्रभू, डॉ. लीना मोहाडीकर, डॉ. शशांक सामक प्रभृतींनी लैंगिकतेबद्दलच लिहिले आहे, पण असे नाही.  पण जो संदेश या लिखाणातून पोहोचतो तो या भाषेमुळे थेट तरुणाईच्या हृदयाला भिडतो. लेखिकेचे इंस्टाग्रामवर १.८ कोटी फॉलोअर्स आहेत आणि त्यापेक्षा कितीतरी पट व्ह्यूज आहेत.  एका आधुनिक माध्यमाचा अतिशय चपखल वापर करत आपल्याला जो हवा तो मुद्दा हृदयापर्यंत पोहोचवण्याची किमया डॉ. क्युटरसला साधलेली आहे.  मग निव्वळ भाषेमुळे आपण याकडे पाहून ‘नाक मुरडोफाय’ करायचं काय?

ती जे सांगते ते वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय बिनचुक  आहे. त्याच वेळी कॉलेजच्या पुस्तकांमध्ये नसते आणि कदाचित कदापी  असणार नाही अशी अतिशय प्रॅक्टिकल माहिती ती देत जाते. कंडोमचे प्रकार किती?, बाह्यांगावरचे केस म्हणजे, झ्याटं  काढायची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे  पाठ्यपुस्तकातही नसतात. पण हेच तर प्रश्न आजच्या मुलामुलींच्या मनात असतात. सहनही होत नाही, सांगताही येत नाही आणि विचारताही येत नाही अशा सामाजिक माहोलमधे या थेट प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं तरुणाईच्याच  खट्याळ आणि  नाठाळ भाषेत इथे दिली आहेत.

लेखिकेची वृत्ती आक्रमक आहे.  तुम्ही स्त्रियांच्या बाह्यांगाला ‘पुसी’ आणि स्तनांना ‘बॉल्स’  म्हणता ना? मग मीच तसं म्हणते, म्हणजे प्रश्नच मिटला; असं म्हणून डोळा घालत, वरती चावट विनोद करत ज्ञान आणि रंजन एकाच वेळी पोचवण्याचा हा खेळ चालतो. अधोभाषेतले हे शब्द स्वत: आणि स्वतःबद्दलही वापरून लेखिका ती भाषा वापरणाऱ्यांना जणू प्रत्युत्तर देते, आव्हान देते. तुम्ही ‘पुसी’, ‘बॉल्स’ म्हणताय ना मग मीही म्हणते, मी लाजत नाही. ओशाळत नाही. मी का लाजावं? आता मी तीच भाषा वापरली म्हणून तुम्ही संकोचू नका. नंगे को खुदा भी डरता है, असा हा  अॅटीट्यूड आहे. काही वेळेला ही रांगडी भाषा उगाचच पांघरलेले संकोचाचे बुरखे फाडायला उपयुक्त ठरते. आपल्याकडचा लैंगिकतेबद्दलचा आचार म्हणजे ढोंगाचे एकावर एक  सात बुरखे पांघरल्यासारखे आहे. ही भाषा वापरुन ती मेसेज मात्र अत्यंत पुरोगामी, आधुनिक देते. हायमेन ही कौमार्य-खूण नाही, असं ठासून सांगते. स्त्रियांच्या अवयवयांना धर्माने पापाचे आगर ठरवलंय, याबद्दल त्वेषाने बोलते,   पुरुषप्रधान संस्कृती विरोधात एल्गार पुकारते. तिचं म्हणणं पटतं, तेंव्हा भाषा दुर्लक्षित होते. 

असल्या भाषेतलं हे मूळ  इंग्रजी पुस्तक तडाखेबंद खपते आहे. पेंग्वीनसारख्या मातबर प्रकाशनसंस्थेनं काढलेलं आहे.

भाषांतर करायचं ठरल्यावर रीतसर इतर अडचणी लक्षात येऊ लागल्या. काही श्लेष हे भाषांतर न करता येणार येण्यासारखे असतात. ते तर सोडून द्यावे लागणार हे उघडच होतं. काही वाक्प्रचार मराठीत नाहीत तर  काही वाक्प्रचार इंग्रजीत नाहीत. उदाहरणार्थ इंग्रजांच्या गोट्या कधी कपाळात जात नाहीत! त्यामुळे हा वाक्प्रचार  इंग्रजी बुकात नाही. डॉ. तनया ह्या वाक्प्रचारापासून वंचित राहिलेली आहे. पण भाषांतरकाराला अशा जागा दिसतात. आता काय करावे?  समर्पक स्थळी तो वापरावा की मुळात नाही म्हणून सोडून द्यावा?

अशी सारी प्रश्नपत्रिका तयार करून मी सरळ डॉ. तनयाला फोन लावला.  मी कोण काय वगैरे सांगितल्यावर मी पहिला प्रश्न केला, ‘या भाषांतराच्या बाबतीत तुझी माझ्याकडून किमान अपेक्षा काय आहे?’ आणि झटक्यात उत्तर आलं, ‘भाषेतली गंमत घालवू नका!’ मग ‘गोट्या कपाळात’चाही प्रश्न विचारला. त्यालाही खुली परवानगी मिळाली. हे बरं झालं. तो तो लेखक/लेखिका महाराष्ट्रात जन्माला येऊन इथेच लहानाची मोठी झाली, तर त्यांनी हेच पुस्तक कसं लिहिलं असतं, असा विचार करून मी भाषांतर करत असतो. हे त्याला साजेसच झालं.

मग मात्र मी सुटलोच.

‘यानंतर मीझोप्रोस्टॉल हे लिंबू (पण टिंबू नाही असे) औषध दिले जाते यांनी युटेरस लिंबासारखे पिळले जाते.’  अशी वाक्यं  मी बेलाशक रचू लागलो. मग ‘Dont get excited’चं, ‘उगाच उडू नका’ झालं. ‘A new kind of light sabre if you will’चं ‘लिंगशलाका जिंदाबाद’ झालं. ‘Hormonal roller coaster’चं   झोपाळ्यावाचून झुलणे झाले. ‘You will be walking around like an inflamed angry asshole’चं, ‘त्या टेरी शेकलेल्या कोल्होबासारखे तुम्ही चालू लागाल’ झालं. ‘Questionable research says’ला, ‘जावईशोध आहे’ असा खास मराठी शब्द मी वापरला. मराठी भाषेचा लहेजा आपोआपच डोकावू लागला.  काही ठिकाणी पर्याय सापडलेच  नाहीत ‘a fuckton of spinach’ला, ‘गाडाभर पालक’ म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. ‘बेस्ट, बिगेस्ट आणि हुशारेस्ट विद्यार्थी’ असं लिहिण्यात मला काही वावगं वाटेनसं झालं. सॅली राइड आणि काही  दिवसांच्या  अंतराळ सफरीसाठी तीला नासाने पुरवलेले शंभर टॅंपून, ‘फ्रेंडस्’ मालिका  असले संदर्भ मराठी वाचकांना लागणार नाहीत. त्याबद्दल तिथेच खुलासेवार लिहिले. लेखिकेने वाचकांचे लिंग कधी स्त्री तर कधी पुरूष गृहीत धरले आहे.  इंग्रजीमध्ये याने फारसा फरक पडत नाही मात्र मराठीत पडतो.  बहुतेक ठिकाणी वाचक ही एक स्त्री आहे असं गृहीत धरून मी लिखाण केलं आहे. मराठीतील उभयलिंगी शब्दांचा अभाव हीही एक अडचण जाणवली.  ‘पार्टनर’म्हणजे तो किंवा ती.  या शब्दाचे ‘जोडीदार’ असं भाषांतर करावं तर तो फक्त ‘तो’ होतो, जोडीदारीण असं करावं तर मग ती  फक्त ‘ती’ होते, जोडीदार किंवा जोडीदारीण  असं म्हणावं तर ते वकिलांनी केलेलं भाषांतर वाटतं.  

अशा अडचणींचा सामना करत हे भाषांतर पूर्ण केले आहे. हे करताना माझे मराठी प्रेम मधूनच उसळी मारून वर यायचे. मग अगदी तावातावाने अवघड, अनवट असे अस्सल मराठी शब्दप्रयोग मी पेरलेले आहेत. कमरेखालचे चटकदार साहित्य वाचताय ना, मग मानेवरचा भागही वापरा.

असो, अशा रीतीने सिद्ध झालेली ही कलाकृती वाचकांच्या हाती सुपूर्द करताना मला आनंद होतो आहे. मधुश्री प्रकाशनचा सर्वेसर्वा, माझा मित्र शरद अष्टेकर, संपादक प्रणव सखदेव आणि सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.

Friday, 26 July 2024

इरा चालायला शिकते...

चांदण्याचे हात तिचे

खडीसाखरेचे पाय


कळी बकुळीची, अंग;

प्राजक्ताची गाली साय


वर्षाचीच शैशवी ही 

हिचे हसूं पुरे अर्धे


हात जोडोनिया उभी 

सारी सुखे, सारी सुखे


कधी अडखळे पाऊल 

कधी हात येतो मधे 


कधी मान वळविता 

मन भिन्न दिशा धरे 


तिचा हसरा वावर 

त्याला खोडीची झालर 


लुटूलुटू चालताना 

कधी मोडते की लय 


क्षणभरसा विस्मय

इरा चालते झोकात


क्षणभरसा विस्मय

इरा चालते झोकात






Thursday, 18 July 2024

इराची आई हरवते तेंव्हा...


कधीकधी आई अचानक 
गायब होते पार 
नाही चाहूल, नाही आवाज, 
सारे शांत फार 

एका क्षणात खळाखळा 
डोळ्यात येते पाणी 
उंच उंच रड्याची तान 
गळ्यात दुसऱ्या क्षणी

असा काही लागतो सूर 
आ वासतो मोठ्ठा
एकच हट्ट वारंवार 
आईला आणा आत्ता

डोळे होतात बारीक, बारीक, 
गाल लाल, लाल 
नाकाची ती टिकली फुगते, 
टम्म लालेलाल

लाथा झाडून झाडून मी,
फतकल मारून बसते, 
झिंज्या ओढून घेत घेत,
आणखी भोकाड काढते

'पेटली वाटतं इरेला!' 
म्हणतात सगळे घरचे
हीला नेमकं कसं कळतं 
आईचे येणे जाणे?

कुठून तरी येतेच आई, 
म्हणते, उगी, उगी, इरे 
शिरताच तिच्या कुशीत 
जग पुन्हा होते हसरे!

इराचा मोठ्यांना सल्ला

चैन करा, अजून मला बोलता येत नाही 

चैन करा, अजून मला चालता येत नाही

माझ्यावरती करा प्रयोग, हरकत काही नाही 

पण मी सुध्दा तुमचं, गिनीडूक्कर नाही 


सगळं सगळं पाहतेय मी, 

करताय काय काय तुम्ही 

मी मोठं होण्याची

तुम्हालाच जास्त घाई 


पळण्याआधीच बूट पायात, 

चालण्याआधीच चप्पल 

वाचण्या आधीच बुक हातात

शिकवत मला अक्कल


कसले मला कपडे घालताय 

आणि कसल्या घालताय क्लिपा 

कसली पावडर फासताय 

आणी लावताय लीपश्टिका


काही फ्रॉक एवढे मोठे, 

खांद्यावरून खाली 

काही टोप्या डोळ्यावर 

दिशा कळत नाही 


तुमची होते हौस 

इथे माला वैताग येतो 

कपड्यात कोंबून कोंबून 

माझा जीव कोंडून जातो


कशाला ते मॅचींग हवं, 

क्लिपपासून बुटापर्यंत 

कशाला ते नवीन ड्रेस, 

नाईटसूट ते, बड्डे पर्यंत 



लवकरच मी लागेन चालू, 

लागेन बोलू, बोबडं

‘लवकलच मी ऐकनाल नाही, 

तुझं, तुझं आनी छगल्यांचं’


माझ्यासारखे लंगोटीवर 

फिरता येत नाही

तुमच्यासारखं व्हावं मी 

म्हणून घालता काहीबाही 


चैन करा आई बाबा 

दादा दादी नाना

एकच पुरे वस्त्र जगात 

माना वा ना माना 



एक दिवस माझ ऐका

मारून दुनिया को गोली 

मोकळेढाकळे फिरून बघा

फारतर ठेवा लंगोटी 


मॅचिंग नको, साईझ नको 

नको कपटावरून तंटा 

दिगंबराला देव भितो तर 

बाकीच्यांची काय कथा?










Saturday, 29 June 2024

आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल.

 

आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल.

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

 

 

सध्या फेबू, इनस्टा, एक्स वगैरे समाजमाध्यमांवर स्वयंघोषित हेल्थ एक्स्पर्टसनी नुसता उच्छाद मांडला आहे.  नुकतीच ‘धडधाकट लोकहो, आमच्याकडे या आणि  सलाईनमधून मल्टीविटामिन घ्या.  तुमचे शरीर डिटॉक्स होईल.  व्हिटामिन बॅलन्स साधला जाईल.  तुमचे केस काळे कुळकुळीत होतील, त्वचा तुकतुकीत होईल, आरोग्य आणखी सुधारेल’; अशा आशयाची जाहिरात वाचली आणि मी थक्क झालो.  हा मुद्दा उगाळायला काही क्रिकेटर्स आणि बॉलीवूड तारे-तारका तिथे हजर होत्या. आता त्यांनीच सांगितलंय म्हटल्यावर  चॅलेंजच नाही.

 

डीटॉक्सीफिकेशनचं डिटॉक्स हे लाडकं लघुरूप. म्हणजे त्याचं काय आहे, तुमचं शरीर असतं की नै, त्यात निरनिराळी विषारी द्रव्ये म्हणजे टॉक्सीन्स साठत जातात की नै, मग ती काढायला हवीत की नै, ते ह्या सलाईनमुळे आणि त्यातील व्हिटामिन्समुळे होतं.

 

ही सुविधा सप्ततारांकित होती. त्या जाहिरातीवरून हे स्पष्टच होतं. त्यातल्या ललना खूपच सुंदर आणि उच्चभ्रू होत्या. पुरुषही जणू मदनाचे पुतळेच होते. सल्ला देणाऱ्या ‘काउन्सेलर्स’ आणि सलाईन लावणाऱ्या नर्सेस थेट हॉलीवूडमधून मागवलेल्या असाव्यात, इतक्या त्या उंच आणि टंच होत्या. असोत बापड्या. गिऱ्हाइक बायका  कॉफी पीत, पुस्तक वाचत, टिवल्याबावल्या करत मजेत सलाईन लावून बसल्या होत्या. पुस्तक म्हणजे सुद्धा, ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘रिंगाण’ असलं ऐरंगैरं पुस्तक नाही बरं. एकीच्या हातात  गॅब्रीअल गारशिया मार्क्वेझचं ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्यूड’ होतं आणि दुसरीच्या हातात सलमान रश्दीचं कुठलंतरी.

 

मला आपलं गावांकडचं सलाईन, म्हणजे दुर्मुखलेला चेहरा, गंभीर नातेवाईक  हे कॉम्बिनेशन परिचयाचं. आरोग्याचा हा डिटॉक्स मार्ग मला पेशंटला कंगाल आणि कंपनीला मालामाल करणारा वाटला. खेडेगावात माणसे येतात, ती आजारानं, पैशानं, परिस्थितीनं गांजलेली असतात.   हौसेने डॉक्टरांच्या मागे लागून सुई टोचून घेतात, सलाईन लावून घेतात, ह्या ‘सेवांसाठी’ जास्त पैसे मोजतात. ते लाल किंवा पिवळे द्रावण थेंबेथेंबे शरीरात उतरतं, शरीरात पसरतं.  हतबलतेत त्यांना बल मिळतं, निराशेत आशा.  अशा पेशंटची टवाळी होते, डॉक्टरांची  निंदा होते,  अज्ञान, अंधश्रद्धा, पिळवणूक वगैरे चर्चा होते. इथे तर लय धडधाकट, बक्कळ पैसा गाठीशी बांधून असलेल्या, उच्चशिक्षित  मंडळींनी या तथाकथित वेलनेस क्लीनिकमध्ये जाणं अपेक्षित आहे. तिथले दरही तसे आणि दराराही तसा आहे.

 

 लक्षात घ्या हे वेलनेस क्लीनिक आहे, इलनेस क्लिनिक नाही.  तुम्ही मुळात आरोग्यपूर्ण असणंच  अपेक्षित आहे. रोगजर्जर, कण्हण्या कुंथणाऱ्या, रडक्या चेहऱ्याच्या माणसांसाठी हे नाहीच. इथे आहे त्या आरोग्याला सुपर-आरोग्याचा सरताज घालून मिळणार आहे. मुळातल्या सुदृढ बाळाला आणखी सुदृढ होण्याचं  टॉनिक द्या म्हणून मागे लागणाऱ्या आया आणि या जाहिरातीतल्या गिऱ्हाइक बाया, या एकाच माळेच्या  मणी आहेत.  शेवटी एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही हेल्दीचे सुपर-हेल्दी होऊ शकत नाही. पण यांना आरोग्याची खा खा सुटलेली  असावी. आरोग्य म्हणजे काय खायची चीज आहे?  

 

ह्या डीटॉक्स नावाच्या धंद्यातून शरीराचा एकही अवयव सुटलेला नाही. स्त्रियांचे शरीरस्त्राव म्हणजे पाळी आणि यौनस्त्राव,  हे मुळातच वाईट्ट मानलेले आहेत. योनी हे तर पापाचं उगमस्थान. त्यामुळे व्हजायना डिटॉक्सला चांगली मागणी आहे. हे म्हणजे व्ह्जायना विसळायचे खास साबण, शांपू, डूश वगैरे.  योनीला  अशी बाह्य सहाय्याची  काही गरज नसते. स्व-स्वच्छतेचे कार्य सिद्धीस नेण्यास योनी समर्थ आहे. इन्फेक्शन झालं तर गोष्ट वेगळी. वेगळी म्हणजे औषधे घ्यावी लागतात; डिटॉक्स नाही. कुठलेच इन्फेक्शन योनी विसळून, धुवून किंवा अगदी  ड्रायक्लीन करूनही  जात नाही.      

 

लिव्हर हा  शरीर नॅच्युरली  डीटॉक्स करणारा  सगळ्यात मोठा अवयव, पण ‘नॅच्युरल लिव्हर डिटॉक्स’ हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. ज्यांना लिव्हर कशाशी खातात हे माहीत नाही, किंवा ते तंदूर रोटीशी खातात एवढंच माहीत आहे, असली मंडळी ह्या पंथाला लागतात. लिव्हरला डिटॉक्स करण्याच्या बाता मारणं म्हणजे सूर्या निरांजन, असा प्रकार आहे.  ग्राम्य भाषेत सांगायचं तर बापाला ***ला शिकवण्यासारखं आहे.

 

मग किडनी डिटॉक्स आहे, होल बॉडी डिटॉक्स आहे, नॅच्युरल, हर्बल, होलिस्टिक  वगैरे विपणन विशेषणे चिकटवलेले तऱ्हेतऱ्हेचे डिटॉक्स आहेत. सोमवारी नवा ‘वीक किकस्टार्ट’ करायला खास मंडे डिटॉक्स आहे. याच बरोबर रातोरात पोट आत घालवणारी, टकलावर रान माजवणारी, वजन घटवणारी अशीही डिटॉक्स आहेत.  ज्याची मुळात व्याख्या वा मोजमापच शक्य नाही अशी ‘ब्रेन हेल्थ’ सुधारणारी आहेत.  मोजमाप काही अगदीच अशक्य आहे असं नाही. कुठलेतरी मशीन हाताच्या तळव्याला लावून शरीरातील ‘मेटल्स’ मोजणारी यंत्रे  आहेत, हातातल्या खुंट्याची बटणे दाबताच ‘फॅट’ मोजणारी आहेत आणि  लिंगाला वायरी जोडून म्युझिकल दिव्यांची उघडझाप करत ‘सेक्स पॉवर’ मोजणारीही  आहेत. शेवटी ‘मागण्याला (की कल्पनेला) अंत नाही आणि देणारा मुरारी.’ हे सगळे प्रकार बेंबीत थर्मामीटर खुपसून पचनशक्ती किंवा  डोक्याला स्थेथोस्कोप लावून बुद्ध्यांक मोजण्याइतके निर्बुद्ध आहेत.

 

या सलाईनमधून जी काय मल्टीव्हिटामिनस्  वगैरे शरीरात घुसडली जातात ती काय तिथेच थांबत नाहीत. तुम्ही कितीही पैसे मोजले असले तरी, शरीराला गरज नसेल तर ती दुसऱ्या दिवशी मूत्र विसर्जनाबरोबर विसर्जित होतात;  तुम्ही सह्याद्रीच्या पश्चिमेला रहात असाल तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि पूर्वेला राहात असाल तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. बरोब्बर घाट माथ्यावर रहातात त्यांचे काय?, असले  खट्याळ प्रश्न जरा बाजूला ठेऊन पुढे वाचा. अशा प्रकारे मल्टीव्हिटामिनचे  ज्यादाचे डोस घेतल्यामुळे उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याची शक्यताही आहे. कारण साऱ्याच व्हिटामिनांचा  असा निचरा होत नाही. व्हिटामीन ए किंवा डी सारखी काही शरीरात साठून रहातात आणि त्यांच्या चढत्या पातळीमुळे विकार होतात.

 

आणि हे सलाईनमधून घेण्याची आवश्यकता का?  तोंडाला टाके  घातले आहेत  काय?  केवळ मालदार मंडळींच्या खिशात हात घालून आपण मालामाल होणे एवढाच उद्देश यामागे आहे.  ही श्रीमंतांची लूट असल्यामुळे त्यातल्या फसवणुकीबद्दल कोणाला काही फारसे वाईट वाटणार नाही.  कदाचित एका गबरू गिऱ्हाईकाकडून गरीब बिचाऱ्या सेंटर चालकाला चार पैसे मिळाल्याचा आनंदच  होईल.  श्रीमंतांना लुटून गरिबांना वाटण्याची रॉबिनहूडगिरी केल्याचं समाधान मिळेल.

 

यातली चापलूसी आपण लक्षात घ्यायला पाहिजे.  हे दावे कोणीही डॉक्टर करत नाही, ‘कंपनी’ करते आहे.  त्यामुळे शपथभंग वगैरे प्रकार तिथे घडतच नाही. हे इस्पितळ नाही, हे तर धडधाकट-तळ. ह्यांना नर्सिंग होम कायदा लागू नसावा.  यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत पण हे ‘उपचार’ नाहीत. तेंव्हा पुराव्यांको मारो गोली. निष्काळजीपणाचा आरोप नाही, कोर्टकचेरीचा धोका नाही.  कुणाला काही त्रास  होण्याची शक्यता अगदी कमी. पैसा मात्र बक्कळ आहे.  अशा रीतीने सरस्वतीला टांग मारून लक्ष्मीला कवेत घेण्याचा हा प्रकार आहे.

 

 

पण फक्त पैसा लुटला जातो असं थोडंच आहे? विचारशक्ती, बुद्धी वापरण्याची कुवत, सारासार विवेक असं सगळंच लुटलं  जातं. स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या आरोग्याकडे बघण्याचा निरामय दृष्टीकोन हिरावून घेतला जातो. हा तर मोठाच तोटा आहे.

 

आरोग्य रातोरात दुप्पट करून देण्याचा हा उद्योग, पैसे रातोरात दुप्पट करून देणाऱ्या उद्योगाइतकाच बनवेगीरीचा आहे. 

 

 

 

 

प्रथम प्रसिद्धी

लोकसत्ता, लोकरंग पुरवणी

३०.०६.२०२४

 

 

 

Friday, 28 June 2024

लेखांक १३ वा आता करायचं काय?

 लेखांक १३ वा

आता करायचं काय?
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई
(हा अखेरचा लेखांक आहे. दर शुक्रवारी असे हे सदर १३ शुक्रवार प्रसिद्ध झाले. आधीचे लेखांक वाचण्यासाठी ५ एप्रिल पासून पुढे दर शुक्रवारची पोस्ट पहावी.)
प्रगती म्हणजे भौतिक समृद्धी ही कल्पना पाश्चिमात्य संस्कृतीने ठळक केली. जागतिक व्यापार उदीम, संपर्क साधने आणि परस्परावलंबीत्वामुळे ती सर्वदूर संक्रमित झाली. बाजारशाही आणि भांडवलशाहीच्या मिषाने सुस्थापित झाली. पण याचे दुष्परिणाम आता प्रतीत होत आहेत. अधिकाधिक उत्पादन, चैनबाजी, उधळपट्टी आणि प्रचंड कचरानिर्मिती याने होणारे पर्यावरणीय आणि सामाजिक नुकसान दुर्लक्षित रहिलं होतं ते आता लक्षात घ्यायला हवं. सध्याची व्यवस्था ग्रीनहाऊस वायूंची निर्मिती, समुद्राचे अॅसिडिफिकेशन आणि कित्येक प्रजातींचा लय वगैरेंची किंमत उत्पादन खर्चात गणतच नाही. ही तर शहामृगी वृत्ती झाली. उत्पादनातून निव्वळ नफा किती झाला यावर प्रगती न मोजता, जर उत्पादनाचा दर्जा, उपयोग मूल्य आणि टिकावूपणा लक्षात घेतला तर? संसाधनांचा तारतम्याने वापर करणारा, पुनर्वापर करणारा, आपला कार्बन ठसा पुसट होत जाईल असं वागणारा समाज निर्माण झाला तर? जीडीपी पेक्षाही हे सारे लक्षात घेणारा ‘खरखुरा’ (जेन्यूइन) प्रगती निर्देशांक काढला तर? जीडीपीचा आलेख उंचावत असताना हा निर्देशांक ढासळत असल्याचं आपल्याला दिसेल. कारण सतत ‘प्रगती’च कशी होईल? एक वेळ अशी येईल की माणसाची अमर्याद भूक आणि पृथ्वीची मर्यादित क्षमता आमने सामने ठाकतीलच.
पार्थ दासगुप्तांसारख्या अनेक अर्थतज्ञांनी उत्पादन, पायाभूत सुविधांबरोबरच समाजाची खरी संपत्ती नैसर्गिक आणि पर्यावरणीय श्रीमंतीत आहे हे मांडलेले आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) आकडा हा प्रगतीचा निदर्शक मानला जातो. वास्तविक वैयक्तिक स्वातंत्र्य, उत्तम नातेसंबंध, स्वतःचा स्वीकार आणि वैयक्तिक परिपूर्तीची संधी हीच माणूस नावाच्या समाज-प्राण्याची मानसिक निकड आहे. सतत पैसा आणि मालमत्तेची हाव धरायला लावणारी व्यवस्था माणसाच्या मानसिक निकडीकडे दुर्लक्ष करते.
पण हवामान बदल हे एक नकोसे, अप्रियसे सत्य आहे. भविष्य अंधकारमय आहे, विद्यमान अर्थव्यवस्था आणि त्यामागील मूल्य भान हाच प्रश्न आहे. हे लक्षात घेऊन कडक उपाय करणे म्हणजे सध्यातरी राजकीय हाराकिरी आहे. ह्यात सचैल नहालेल्यांना हवामान अवधान मानवणारे नाही. स्थिती जैसे थे राखण्यात प्रचंड आर्थिक, सैद्धांतिक, राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत. तेंव्हा ह्याला सरळ नाकारता येत नसेल तर निदान त्याबद्दल संशय निर्माण करणे हा विरोधकांच्या रणनीतीचा भाग आहे. हवामान शास्त्रात असं म्हणतात की एखाद्या फुलपाखराच्या फडफडण्याने पृथ्वीच्या विरुद्ध टोकाला अगदी वादळेही घडू शकतात. हवामान आणि त्याचे परिणाम हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. यामुळेच याबद्दल संशय पेरणे तसे सोपे आहे.
हवामान बदल हा एक मोठा ज्ञान द्रोह आहे. कोपर्निकस आणि डार्विन नंतरचा हा तिसरा मोठा ज्ञान द्रोह. कोपर्नीकस आणि डार्विनने माणसाने माणसाला बहाल केलेल्या खास स्थानावरून हुसकावून लावले. कोण्या टीचभर ताऱ्यावर, अपघाताने उद्भवलेल्या उत्क्रांती नामक जैव-पर्यावरणीय प्रक्रियेचं एक रूप म्हणजे मानव, हे सिद्ध केले. आता हा माणूसच गुन्हेगार आहे हा विद्रोही विचार हवामान शास्त्रज्ञ मांडत आहेत. विश्वाच्या पसाऱ्यात ह्या अगदीच नगण्य जीवाने, अकल्पित सामर्थ्य प्राप्त करून, हे संकट ओढवून घेतलेलं आहे.
वर्षामागून वर्षे सरत आहेत आणि आपल्याच नाकर्तेपणामुळे आदर्शवत कार्बन उत्सर्जनाची टारगेट्स आवाक्याबाहेर जात आहेत. प्रश्न जागेपुरता न रहाता केंव्हाच जगाचा झाला आहे. ‘लोकल’चा ‘ग्लोबल’ झाला आहे. मात्र राजकारणाचा केंद्रबिंदु असा सरकलेला नाही. तशी जाणीव अजून नाही. जागतिक प्रश्नांचा साकल्याने विचार करणारे नेतृत्व अजून नाही. युरोपात ‘३० वर्षाच्या युद्धा’नंतर १६४८ साली वेस्टफालीयाचा करार झाला. प्रत्येक सार्वभौम राष्ट्राला आपल्या हिताचे निर्णय घेण्याचा अधिकार मान्य केला गेला. सहाजिकच युरोपात आणि त्यावर आधारित राष्ट्रवाद जोपासणाऱ्या साऱ्याच जगात असा ‘राष्ट्र(ल)पोटेपणा’ आवश्यक, स्वाभाविक आणि क्षम्य ठरला. यावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना उभारण्यात आली पण तिचेही प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. ‘मानव प्रथम’पेक्षा ‘देशबांधव प्रथम’ हीच भावना प्रबळ दिसते.
इतकी सारी प्रजा जगवायची, तगवायची, म्हणजे शेती, कारखानदारी हवी. म्हणजे गोल्डीलॉक्स झोनची नैसर्गिक लक्ष्मण रेषा ओलांडायलाच हवी. ही ओलांडायची तर ऊर्जा हवी आणि ती निर्माण करायची तर पर्यावरणाचा काही ना काही ऱ्हास अटळ आहे. ह्या ऱ्हाससत्रात माणसाचीच आहुती पडू शकते. कशी ते आपण या लेखमालेत पाहिलं. पूर, दुष्काळ असे निसर्ग रोष, समाजिक असंतोष, राजकीय उलथापालथ, साथी, कुपोषण, आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था आणि या साऱ्याचा अन्योन्य संबंध आपण लेखमालेत पाहीला. हवामान आणि आरोग्यमान हा किती गुंतागुंतीचा प्रश्न आहे तेही आपण पाहिले.
म्हणूनच निव्वळ औषधाने सुटणारा हा प्रश्न नाही. निव्वळ डॉक्टरने उपाय योजावेत असा हा विकार नाही. हा जगाचा प्रश्न आहे. हा जनांचा प्रश्न आहे. आपापल्या परीने हा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांचा आग्रह धरणे आणि अशा प्रयत्नांना बळ देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हवामान अवधान ते हेच.
पूर्व प्रसिद्धी
दैनिक सकाळ
२८.०६.२०२४
हवामान अवधान

Thursday, 20 June 2024

लेखांक १२ उद्याची भ्रांत असलेला परवाचा विचार करत नाही.

 

लेखांक १२  

 

उद्याची भ्रांत असलेला परवाचा विचार करत नाही.

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

हवामानाचा आरोग्यमानावर प्रत्यक्ष  आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. ध्रुवीय, समशीतोष्ण वा उष्ण काटिबंधातील प्रदेश असोत, माणसाला मानवेल अशा तापमानाचा एक छोटासा पट्टा आहे. नेमके जेवढे हवे तेवढे असे हे   ‘गोल्डीलॉक्स झोन’.  ह्याच्या  अल्याडपल्याड अन्न, पाणी, परिसंस्था अशा साऱ्यावर ताण येतो आणि पुढे हे सारेच कोलमडून पडते.  मानव बुद्धी आणि संसाधनांच्या बळावर सुरवातीला ह्या पडझडीला तोंड देईलही पण ज्या जैव साखळीवर, जैव जाळ्यावर आपण तगून आहोत त्याला हा ताण सोसणार नाही हे नक्की. यातून उद्भवणाऱ्या पूर, दुष्काळ वगैरेंमुळे अनेक कुटुंबे विस्थापित होतात.

उदाहरणार्थ धरा-ज्वराच्या परिणामी ध्रुवीय बर्फ  वितळेल, हे सारे पाणी जाईल कुठे? अर्थात समुद्रात. याने पाणीपातळी वाढली की किनारपट्टीचे प्रदेश, बंदरं समुद्रमुखी पडतील. किरीबाटी  किंवा मालदीवसारखी सखल बेटं जलमय होतील. हे देशच्या देश देशोधडीला लागतील. ही माणसं जातील  कुठे? करतील काय? खातील काय? राहतील कुठे? ह्या निर्वासितांना कुपोषण, साथीचे रोग, व्यसने, गुन्हेगारी, मानसिक आजार असे दैन्य-मित्र गाठणारच. ज्या देशांत ती जातील तिथेही समुद्र पातळी वाढल्याने  किनाऱ्यावरून वरती, ‘देशाकडे’, सरकलेली प्रजा असेलच. त्यात ही भर. घरचंच थोडं  झालेलं  असताना हे जावयानं  धाडलेलं घोडं कोण आणि कसं सांभाळणार?

कितीही काळजी घेतली, कितीही काटेरी कुंपणे घातली, कितीही चौक्या पहारे बसवले तरी आभाळ फाटल्यावर ठिगळ कसं लावणार? आजही हवामानाची एखादी लहर सुसज्य व्यवस्थेचाही फज्जा उडवू शकते. ऑगस्ट २००३ सालची युरोपातली उष्णतेची लाट आठवा. त्या दिवसांत तिथे मृतांची संख्या नेहमीपेक्षा ५०,०००ने वाढली.  मुळातच जनांचे सरासरी वय वाढलेले, त्यामुळे घरोघरी वृद्ध, बहुतेक घरी एकेकटे वृद्ध, ज्या घरी आधार देणारी पिढी होती त्यातील अनेकजण  लांब ट्रीपला गेलेले, बहुतेक डॉक्टरही सुट्टीवर; अशात ही लाट आली आणि अनेकांचा काळ ठरली. अगदी प्रगत आणि पुढारलेल्या फ्रान्समध्येही लक्षणीय मृत्यू घडले. कारण गरमी वाढली की घुसमट वाढते. सिमेंट, कॉंक्रीट आणि डांबराच्या  जगात उष्मा अडकून रहातो. ही तप्त भू रात्रीही निवणे अवघड होते. साऱ्या शहराचीच काहील होते. शरीराचे तापमान ३७ राखायला घाम येणे आणि तो उडून जाणे आवश्यक असते. गरम आणि पर्यायाने दमट जगात हे अवघड. याने हृदयावर प्रचंड ताण येतो. अशा वातावरणात दमे-खोकले, हृदयविकार, रक्तदाब, अर्धांगवायूची जणू साथ येते. बेघर, वयस्क, गलितगात्र, रोगजर्जर अशी माणसं एरवीही जवळजवळ पैलतीराशी पोहोचलेलीच असतात. ती आधी पैलतीर गाठतात. सुविद्य, समृद्ध, सुव्यवस्थित युरोपातील ही स्थिती तर गरीब देशात काय हाहाकार उडेल, विचार करा.   

या साऱ्या प्रश्नातील नैतिक दुविधा इथेच आहे. तिसऱ्या जगाचे शोषण करून पहिले जग गबर झाले आहे आणि आता त्यांच्या गाड्यांच्या, कारखान्यांच्या धुरामुळे येणाऱ्या  अरिष्टांचा सगळ्यात जबरदस्त फटका  पुन्हा तिसऱ्या जगानेच सहन करायचा आहे.

हाहाकार उडाला तरी  ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’ अशीही शक्यता आहे. शहरे, महानगरे आणि पुढारलेल्या देशातील बऱ्याच व्यवस्था वीज, इंटरनेट, उपग्रह वगैरेंशिवाय चालूच शकणार नाहीत. निसर्ग तांडवात यांची वाताहत होताच हे समाज त्याचे सहज बळी ठरतील. त्या मानानी मुळातच अभावात आणि आसपासच्या परिसराबरहुकूम जगणारी, भटकी, जंगलवासी  माणसं लव्हाळ्यासारखी तगून जातील.  

माणसाचा तल्लख मेंदू या साऱ्यावर उपाय शोधेल अशी आशा आहे. मात्र काही गृहीतके त्यागावी लागतील. आर्थिक समृद्धीचे विद्यमान प्रतिमान अचल नाही हे स्वीकारावे लागेल. आजची सामाजिक आणि सांस्कृतिक रचनाही निर्दोष नाही हे स्वीकारावे लागेल. धरा ज्वर हा भावी धोका नसून आजच आपण त्यात होरपळत आहोत हे जनांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या जगण्यातील  उदाहरणासह समजावावे लागेल. जागतिक ध्येये, उद्दिष्टे, आकडेवारी, आलेख आणि तक्त्यांशी सामान्यांना देणेघेणं नसतं. त्यांना पोरांची, पिकाची, शुद्ध पाण्याची काळजी असते. उद्याची भ्रांत असलेला माणूस परवाचा विचार करत नाही.

हे सारं लक्षात घेऊन उपाय योजावे लागतील. कोणते आणि कसे ते पुढील आणि अखेरच्या लेखांकात पाहू.

 

 

प्रथम प्रसिद्धी

दैनिक सकाळ

हवामान अवधान

२१.०६.२०२४

 

 

 

Thursday, 13 June 2024

लेखांक ११ वा म्हणे अँथ्रोपोसीन!

लेखांक ११ वा 

म्हणे अँथ्रोपोसीन!
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

सद्य युगाला अँथ्रोपोसीन, म्हणजे मानव युग म्हणावे, असं म्हणतात. कारण सृष्टीत  आजवर कोणत्याही एक प्राण्याला शक्य झाली नाही अशी लुडबूड माणसाने केली आहे. 

आता पृथ्वीचा पारा चढेल तसं  हवामानही अधिकाधिक लहरी होईल. हे हेलकावे तीव्र होतील. ‘ये गं ये गं सरी’ म्हणताच कधी घरदार, शेतीवाडीसकट  मडकंही  वाहून जाईल तर कधी मडकं कोरडं ठाक राहील.  पूर्वी तर हवा आणि तिच्या माना पुढे मान  तुकवणे एवढेच शक्य होते. सर्व संस्कृतींत उन्हा-पावसा-वाऱ्याच्या, आबादाणीच्या देवता आहेत. साऱ्यांनी त्यांना भजलं-पूजलं आहे. 

दुष्काळाइतकंच कीटकजन्य आजारांचंही उकाड्याशी थेट नातं आहे.  हवेच्या मानाप्रमाणे सहजी वरखाली होणारे  आजार म्हणजे कीटकजन्य आजार. मलेरिया, डेंग्यू, वेस्ट नाईल ताप, झिका, लाईम  वगैरे. डासांमार्फत पसरणारे मलेरिया, डेंग्यू इत्यादी हे आपल्याला परिचित. डासांचे प्रजो‍त्पादन सांडपाण्याशी आणि तापमानाशी  निगडीत असते. थंडीने डास गारद होतात.  म्हणूनच  उत्तरेकडे सरकताच हे आजार उत्तरोत्तर कमी होत जातात. आर्क्टिक प्रदेशात मलेरिया नाहीच, कारण  डासही नाहीत. (पण धरा ज्वराचा प्रताप असा की नुकताच तिथेही पक्ष्यांत मलेरिया आढळला!)

 तेंव्हा उष्म्याचं राज्य वाढलं की डासांनी  आणि त्यासोबतच्या आजारांनी थैमान घातलंच म्हणून समजा. फिलाडेल्फियातील पिवळ्या तापाची कहाणी आपण पूर्वी एका लेखांकात वाचलीच आहे. आत्ताचा गेला मार्च हा जागतिक सरासरी पहाता सर्वाधिक उष्म्याचा होता. त्यामुळे डासांचे राज्यही वाढलं. ते दक्षिणोत्तर तर वाढलंच पण उंचही वाढलं. म्हणजे महाबळेश्वरलाच उकडायला लागलं तर  तिथेही डासोपंत मुक्कामी येणारच. कोलंबिया आणि इथिओपियातील अभ्यासही हेच सांगतात.  म्हणजे आता या ऊंचीवरची, जगभरची, इतकी सारी अधिकची प्रजा डासोपंतांच्या  डंखाने दुखावली जाऊ शकते, जाते. 

उन्हाळ्यात डास जगतातही जास्त आणि त्यांचं प्रजो‍त्पादनही  वेगानी होतं. ‘चांद मातला  मातला’ ऐवजी ते ‘सूर्य मातला मातला, अंगी वणवा चेतला’ असं गुणगुणत असतात.  अशावेळी त्यांना सस्तन प्राण्यांच्या रक्ताची वखवख सुटते.  आपल्या नाकांच्या चिमण्यातून कार्बन डाय ऑक्साइडचा धूर येतच असतो. ह्याचा गंधवेध घेत घेत डास आपल्याला गाठतात. उन्हाळ्यात  कामाग्नीने पेटलेले डास अधिक त्वेषानी चावतात. त्यांच्या पोटातले जंतूंही उन्हाळ्यात झटपट वाढतात. एखाद्या डिग्रीने जारी तापमान वाढलं तरी डासाच्या पोटातील प्लाझमोडियम (मलेरियाचे जंतू) निम्या वेळातच वयात येतात.   डासांचे (आणि कीटकांचे) वाढते क्षेत्र, डास आणि अन्य कीटकजन्य आजारांचे वाढते रुग्ण आणि दर काही वर्षांनी निष्प्रभ ठरणारी मलेरियारोधक औषधे ही जगाची डोकेदुखी आहे. एक साला मच्छर आदमी को हिजडा बना देता है, हेच खरं. 

पण ते निव्वळ मलेरियामुळे नाही. साथीला डेंग्यू आहे.  लोकंही वाढली आहेत, त्यांचा संचारही वाढला आहे आणि उष्माही वाढला आहे तेंव्हा १९६०शी तुलना करता डेंग्यूच्या केसेस ३० पट वाढल्या आहेत. डेंग्यू-चिकनगुन्यावाल्या एडिस डासांमार्फत झीकाही पसरतो. झीका हा देखील एक खतरनाक व्हायरस आहे. दक्षिण अमेरिकेत २०१६ साली आणि तेंव्हापासून तिथेच  याच्या साथी येतात. आपल्याकडे एडिस डास आहेत पण झीका नाही. पण उद्भवू शकतो, अगदी कधीही.

डासांसारख्या माशाही उपद्रवी. ‘अयि नरांग मल शोणित भक्षिके, जनुविनाशक जंतुसुरक्षिके!’ असं मुळी केशवकुमारांनी वर्णनच करून ठेवलं आहे. अन्न पाणी दूषित करण्यात त्यांचा वाटा मोठा. उन्हाळ्यात यांचेही प्रजाप्राबल्य वाढते. जसे तापमान वाढेल तसा यांचाही फैलाव वाढेल. तऱ्हेतऱ्हेचे जुलाब पसरतील. 

हरणे, वालाबी, कांगारू वगैरेंच्या अंगावर काही गोचिडी वाढतात. यांच्यामार्फत  काही आजार माणसांत होतात. उष्म्याने हरणे, वालाबी, कांगारू यांनाही नवी नवी कुरणे मिळतील. साहजिकच  गोचीडीनी पसरणारे आजारही नव्या प्रदेशात दिसू लागतील.  

काही आजार कमीही होतील. रोटा व्हायरस, नोरो व्हायरसने होणारे जुलाब, थंडीत उद्भवणारा फ्ल्यू ही काही उदाहरणे.  

तापमानवाढीने कदाचित नवे कोणतेही आजार येणार नाहीत पण उष्मा वाढला की कीटकांचा फैलाव वाढतो आणि अधिकाधिक लोकसंख्या त्यांच्या चाव्याच्या टप्यात येते. 

साथीच्या फैलावाची जशी माणसाला भीती आहे तशी ती अन्य संजीवांनाही आहे. गाई, म्हशी, कोंबड्या ह्यांच्यात जर साथी आल्या तर आपण अन्नाला मोताद होऊ. 

हे अँथ्रोपोसीन, म्हणजे मानव युग आहे असं आपणच जर ठरवलं आहे तर त्यातील भल्याबुऱ्याची जिम्मेदारी ‘अँथ्रोपो’ची म्हणजे  आपलीच नव्हे काय? 

प्रथम प्रसिद्धी 
दैनिक सकाळ 
हवामान अवधान 
१४.०६.२०२४

Thursday, 6 June 2024

लेखांक १० वा कॉलरा

 

लेखांक १० वा

 

कॉलरा

 

कॉलराच्या साथी हवामानाच्या हेलकाव्यावर अवलंबून नसतात. पण पूर, वादळे, दुष्काळ अशा अरिष्टांत आणखी भर घालणारे जे अनेक साथीचे आजार आहेत त्या पैकी हा प्रमुख.

कॉलराची पहिली ज्ञात साथ १८१७ ते १८२५ अशी टिकली. कॉलरा होतो व्हिब्रियो कॉलरा या जंतुंमुळे आणि  पसरतो दूषित अन्न पाण्यातून. ह्याचा उद्गम गंगेच्या पठारी प्रदेशात असावा, विशेषत: पूर्वेकडील पठारी भागात. ह्या आजाराच्या अशा खास, ओला देवी, ओला बीबी अशा देवता आढळतात त्या भागात. कोलकाता ब्रिटिश प्रदेशाची राजधानी होती.  इथून व्यापाराबरोबर कॉलराही निर्यात झाला. कॅन्टन, कोरीया, जपान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान मार्गे मध्यपूर्वेतही हा जंतु पोहोचला. आजवर कॉलराच्या सहा साथी येऊन गेल्या आहेत (१८१७, १८२६, १८४५, १८६२, १८८१ आणि १८९९) आणि इंडोनेशियातून १९६१ साली  सुरू झालेली साथ अजूनही जारी आहे. बाकीच्या साथी ५ ते २० वर्षात बऱ्याचशा आपोआपच आटोपल्या तरी ही सुरूच आहे. कॉलराच्या एल टोर   ह्या उपजातीचा हा प्रताप.

ह्या साथींचा छडा लावतालावताच  एल निनोने दक्षिणेला  झोका घेतल्याचे आणि हे नियमित घडत असल्याचे आढळले. कॉलरा आणि हवामान संशोधन हे असं निगडीत आहे. कॉलराचे जंतू खाडीतील तवंगात, शैवालात (अल्गी) घर करून असतात. एल निनोच्या प्रभावाने पाणी उबदार होताच हे झपाट्याने वाढतात. तिथल्या अन्न साखळीत प्रविष्ट होतात, शेवटी माणसाच्या पोटात शिरतात आणि हाहाकार माजतो.

आर राघवेंद्रराव नावाच्या निजामाच्या सेवेतील सरकारी  डॉक्टरने, १९४१ सालच्या नाथांच्या पालखीच्या निजाम हद्दीतील  प्रवासाचं वर्णन लिहून ठेवले आहे. पैठण नगरीत मुळातच कॉलरा होता. ४९ केसेसपैकी १८ रुग्ण दगावले होते. पोटॅशियम परमँगनेट, ब्लीचींग पावडर आणि लस ही आयुधे होती. वाटेत मुंगी गावाने या साऱ्याला असहकार पुकारला, कुंडल पारगावला सारे करूनही कॉलऱ्याची केस झालीच आणि बीड जिल्ह्यातील दहिवंडीची बातमी ऐकून तर सारेच भांबावले. १२५ लोकवस्तीच्या त्या गावात ३० केसेस होऊन १४ बळी गेले होते. गावातर्फे पालखीला जेवण घालायची प्रथा होती.  शिधा द्या आम्ही रांधून घेतो पण घरोघरच्या  भांड्यातून अन्न आणू नका; असा निरोप दिला गेला. पण गावकऱ्यांना हे मान्य नव्हतं, मग गावातील अन्न न घेता पालखी गावाबाहेरून नेण्यात आली.  अडाणी स्थानिक फूसलाव्यांचा जाच जागोजागी होताच.  लसीची सर्टिफिकिटे वारंवार तपासली जात होती. तरीही लोकं लस न घेता वारीत घुसत होती. चुकार लोकं सापडतंच होती. परिणामी  वारकऱ्यांत काही केसेस झाल्याच. एक मुलगाही गेला. अखेर सीना नदी ओलांडून पालखी ब्रिटिश इंडियात पोहोचली आणि डॉ. रावांनी हुश्श केलं. पंढरपुरहून परतीचा प्रवासही साधारण तसाच घडला.  दहिवंडीसारखाच अनुभव आता  साऊथंड्याला आला. अखेर काही वैष्णवजनांना वैकुंठास पोहोचवून का होईना, त्या काळाच्या मानाने,  पालखी सुखरूपच पैठण मुक्कामी पोहोचली म्हणायची.    

अडाणी स्थानिक फूसलाव्यांचा बंदोबस्त करावा, लसीकरणाची सक्तीच असायला हवी आणि अॅम्ब्युलेन्स म्हणून बैलगाड्या मिळाव्यात अशी विनंती डॉ. राव करतात. 

जगात आज बहुतेक भागात कॉलरा नाही कारण स्वच्छ पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट. सांडपाण्याचं आणि कॉलराचं काही नातं आहे हे सर्वप्रथम दाखवून दिलं ते डॉ. जॉन स्नो ने. लंडनच्या साथीचा अभ्यास करताना त्याला असं आढळलं की एका  विशिष्ट हातपंपातून पाणी वापरणाऱ्या घरांतच  मृत्यूने मुक्काम ठोकला होता. नगरपित्यांचा विरोध मोडून काढत आणि लोकक्षोभाची तमा न बाळगता त्याने हा पंप बंद करवीला. म्हणजे त्याचे हँडलच काढून टाकले. कॉलरा तात्काळ ओसरला. कॉलराच्या जंतुंचा शोध नंतर लागला. त्याच्या संक्रमणाचे मार्ग आधी रोखता आले. जॉन स्नोचा हा शोध अनेक कारणांनी  क्रांतिकारी ठरला. त्याने लंडनच्या नकाशावर मृत्यू घडलेली घरे ठिपक्यांनी दर्शवली. ब्रॉड स्ट्रीटच्या पंपाभोवती सारे ठिपके एकवटले होते. ही पद्धतही नवलाची होती. 

परंपराप्रिय ब्रिटिशांनी ब्रॉड स्ट्रीटवरचा हा हातपंप आजही जपला आहे. आता त्याला पाणी येत नाही पण  आजही दरवर्षी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कुणाला स्नोच्या स्मृतिव्याख्यानासाठी आमंत्रित केलं जातं. व्याख्यानाच्या सुरवातीला पंपाचं हँडल काढलं जातं आणि या क्षेत्रातील नवीन काही ऐकून झाल्यावर ते पुन्हा बसवण्यात येतं.

जिथे कॉलरा आहे तिथेही मृत्यूदर कमी आहे कारण ‘जलसंजीवनी’. जलसंजीवनीचा शोध हा भारतातला (आणि बांगलादेशातला). ‘साखर, मीठ, पाणी; जुलाबावर गुणकारी’ हा मंत्र दिला तो डॉ. दिलीप महालनोबीस यांनी. वरवर साधा, अगदी घरगुती   वाटणारा हा फॉर्म्युला निश्चित करणे म्हणजे अडथळ्याची शर्यत होती. अगदी अश्रुंइतक्याच खारट असलेल्या ह्या पाण्याने  जगभर अनेकांचे जीव वाचवले आहेत, अनेक घरचे अश्रु रोखलेले आहेत.

 

प्रथम प्रसिद्धी

हवामान अवधान

दैनिक सकाळ

७.६.२०२४