Monday, 30 March 2020

भाषा डॉक्टरांची

भाषा डॉक्टरांची.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

भाषा मोठी अजब चीज आहे खरंच. मुळात माणूस जगला, तगला, फोफावला आणि या घडीला  ‘होमो’या जातीतील एकमेव प्रजाती म्हणून  शिल्लक  उरला तो फक्त भाषेमुळे. होमो ह्या जातीत निअॅनडर्थल आणि  सेपिअन अशा प्रजाती होत्या. पैकी आपल्याला म्हणजे होमो सेपिअनना भाषेचा शोध लागला आणि आपण सुफला ठरलो, दुसरी   प्रजाती विफला ठरली आणि  फार, फार पूर्वीच लयास गेली. 
आपली रोजची भाषा असते तशी प्रत्येक धंद्याचीही  काही खास भाषा असते. खास शब्द असतात. ही संपदा सहसा शब्दकोशातही न सापडणारी. ही भाषा फक्त त्या व्यवसायातल्या लोकांनाच कळते. दोन डॉक्टर एकमेकांत ज्या अगम्य भाषेत बोलतात ते ऐकून इतरांना आश्चर्य, अचंबा, राग, असूया असं काहीही किंवा हे सगळच्या सगळं एकत्र वाटू शकतं.    
मनुष्यप्राण्याला संपर्क, सहकार आणि ज्ञानसंचय शक्य झाला तो भाषेमुळे. यातील संपर्क आणि तो देखील समोरच्याला पत्ता लागणार नाही अशा तऱ्हेचा संपर्क, कधीकधी जरुरीचा असतो. फक्त निवडक लोकांनाच कळावेत असे संवाद कधी कधी चार लोकांत  आवश्यक असतात. मग सांकेतिक भाषा निपजतात. लहान असताना मला कळू नये म्हणून आई आणि मावशी ‘च’च्या भाषेत बोलायच्या. आगावू आतेभाऊ आणि बहीण  चक्क इंग्लिशमधे बोलायचे, म्हणजे निदान आपण इंग्लिशमधे बोलत आहोत असं सांगायचे तरी. पण गुप्त भाषेत शब्दच असायला हवेत असे नाही. गोंधळी मंडळी तर समोरच्यानी तिसऱ्याला सांगितलेली गोष्ट केवळ खाणाखुणांनी झटदिशी ओळखतात. बैल विकणाऱ्या आडत्यांचीही अशीच एक खास भाषा असते. हाताला हात  लावून, वरून रुमाल टाकून, केवळ स्पर्शाने ते आधी आपापसात किंमत ठरवतात आणि मग अलगदपणे बैल विकणाऱ्याला आणि तो घेणाऱ्याला रस्त्याला लावतात.
दोन डॉक्टर आपापसात बोलताना, कधी पेशंटचं भविष्य पेशंटपासून लपवायचं असतं.  कधी आपल्या मनातल्या शंका, कुशंका, अज्ञान लपवायचं असतं. सुरवातीला ही निकड इंग्लिशनी उत्तमरीत्या   भागवली. डॉक्टर आपापसात काय बोलतात हे पेशंटना कळण्याची शक्यताच नव्हती. चेहरा गंभीर आहे, हातात केसपेपर आहे आणि भाषा इंग्लिश आहे एवढ्याच्या बळावर एकमेकांना नव्या हिचकॉक-पटाची कथा सांगितली तरी पेशंटना वाटणार डॉक्टर आपल्या (मूळ)व्याधीबद्दलच बोलत असणार!! 
आता ही सोय बऱ्याच प्रमाणात नष्ट झाली आहे. आता पेशंटनाही इंग्लिश येतं. बरेचदा डॉक्टरपेक्षा बरं येतं. पण तरीही डॉक्टरी व्यवसायाची म्हणून काही शब्दावली शिल्लक रहातेच आणि ती इंग्लिश येणारेच काय पण इंग्रज पेशंट आले तरी त्यांना उलगडणार नसते. पण तज्ञ परिभाषेतल्या बऱ्याच तांत्रिक संज्ञांनी आणि त्यांच्या बहुविध रूपांनी डॉक्टरांच्या बोली भाषेत प्रवेश केला आहे. बोली भाषेतले हे शब्द; ह्यांना कदाचित शब्दकोशातले मानाचे पान कधीच मिळणार नाही, पण हे आहेत अर्थवाही.  हे शब्द सामान्यांना अपरिचित असले तरी आहेत मजेदार. 
आता ‘खॅक्स’ हाच शब्द बघा ना. हा खास अभ्यासनीय शब्द आहे.  खॅकडू असंही ह्याचं एक रूप आहे. अत्यंत बारीक आणि बहुदा मरणपंथाला लागलेल्या पेशंटचं वर्णन खॅक्स असं केलं जातं. खरंतर हे सांगायचीही गरज लागू नये इतका या शब्दाचा उच्चार सेल्फ एक्स्प्लेनेटरी आहे. काही शब्द असतात खरं असे. त्यांचा अर्थ परभाषिकालाही आपोआप समजावा असे. उडाणटप्पू हा असाच एक शब्द. उद्या एखाद्या जपान्याला जरी आपण ‘उडाणटप्पू’ म्हणालो तरी त्याला आपण काय म्हणालो हे  कळेल. ते असो, आपण ‘खॅक्स’बद्दल बोलत होतो.  बहुतेक ‘cachexia’ या शब्दाचं अपभ्रष्ट रूप म्हणून हा शब्द आला असावा. Cachexic म्हणजे आजारामुळे खंगलेलं, अतिशय अशक्तपणा आलेलं, हातापायाच्या काडया झालेलं कोणी. 
‘नॉन स्पेसिफिक’ हा असा आणखी एक शब्द. एखादा नॉन स्पेसिफिक आहे ह्याचा अर्थ त्याच्याबद्दल विशेष लक्षात यावं किंवा घ्यावं असं, काही, क्काही, क्क्काही नाही! हा मूळ  पॅथॉलॉजीतला शब्द. सूज आहे पण नेमकी ‘किम् कारणे’ ते समजत नसेल तर ‘नॉन स्पेसिफिक’ असा रिपोर्ट देतात. म्हणजे टीबी किंवा मलेरिया अशा  कोणत्याही ज्ञात रोगाच्या  वैशिष्ठ्यपूर्ण खाणाखुणा तिथे नाहीत, नुसतीच आपली सूज आहे! 
त्यामुळे दिसणे, वागणे, बोलणे किंवा खेळ, अभ्यास, कला अशा कोणत्याच क्षेत्रात लक्षणीय नसणाऱ्या मुलां/मुलींसाठी हा शब्द होता. आजही गप्पात सहज कोणी विचारतो, 
‘तो अमकाअमका  आपल्या कॉलेजला होता, तो रे...’ 
‘मला नाही आठवत.’
‘अरे नाहीच आठवणार, तो एकदम नॉन स्पेसिफिक होता.’
नॉन स्पेसिफिकला समानार्थी ‘बेनाईन’ असाही शब्द आहे. पण अर्थछटा भिन्न आहे बरं.  बेनाईन म्हणजे ‘कँन्सर नाही’, अशी साधी गाठ. त्यामुळे एखाद्या साध्याश्या, सभ्य, पापभिरू माणसाला बेनाईन म्हटलं जातं. याविरुद्ध ‘मॅलीग्नंट’. मॅलीग्नंट म्हणजे वैद्यकीय परिभाषेत कँन्सर आणि डॉक्टरांच्या बोलीत त्रासदायक, वैतागवाणा असा कोणीही. मग हा कोणी पेशंट असेल, पेशंटचा नातेवाईक असेल,  दुसरा डॉक्टर असेल अथवा कोणीही असेल. 
मॅलीग्नंटला समधर्मी दुसरा शब्द आहे  टॉक्सिक.  टॉक्सिक म्हणजे विषारी. मग हा शब्द कधी कुठे कामाला येईल सांगता येणार नाही. एखादा बोअर मारणारा नकोसा  मित्र टॉक्सिक असू शकतो, लेक्चर टॉक्सिक असू शकते, एक्झॅमिनर तर नक्कीच टॉक्सिक असू शकतो.  
असे अनेक पारिभाषिक शब्द आमच्या बोलण्यात मुरलेले असतात. कॉलेजमधे तीन कँटीन होती. ती तीन दिशांना होती. त्यांचा मालकांनी भले त्यांना नित्यानंद, सर्वानंद आणि धूतपापेश्वर  अशी इष्ट देवतांची नावे दिली होती पण आमच्यासाठी ती अँटीरिअर (पुढील),  पोस्टीरिअर (मागील) आणि लॅटरल (बाजूचे) कँटीनच होती. 
ही नावे थेट अॅनॅटॉमीतून घेतली होती. अशी प्रत्येक विषयातून उधारउसनवारी असते. शेवटी भाषाच ही, इतस्ततः पडलेली शब्दसुमने माळल्याशिवाय नटायची, सजायची आणि मुरडायची कशी? 
सामान्यतः अत्यंत बेभरवशाच्या, कधी येईल, कधी जाईल हे सांगता येणार नाही, अशा माणसाला धुमकेतू म्हणतात. डॉक्टर लोकं अशा वागणुकीला ‘ईरेग्युलरली ईरेग्युलर’ म्हणतात. रेग्युलर (नियमित), रेग्युलरली ईरेग्युलर (नियमितपणे अनियमित) आणि ईरेग्युलरली ईरेग्युलर (अनियमितपणे अनियमित) हे नाडीच्या लयीचे तीन प्रकार आहेत. भलत्या वेळी, भलत्या काळी, कुणी आढळला तर त्याला एक्टोपिक म्हणतात. एक्टोपिक म्हणजे खरंतर गर्भपिशवीबाहेर  (उदाः बीज नलिकेत) असा  भलतीकडेच रुजलेला गर्भ!! 
आता प्रुरायटस अॅनाय हा शब्द पहा. याचा अर्थ जरा असभ्य आहे पण मी अगदी सभ्य शब्दात सांगू शकतो. म्हणजे असं बघा माय लॅटिन मध्ये  प्रुरायटस म्हणजे खाज, आणि  अॅनस म्हणजे गुदद्वार! (आणि रेक्टम म्हणजे गुदाशय) आलं लक्षात? अर्थात नुसतं प्रुरायटस म्हटलं तरी पुरतं. ठिकाण सांगायची गरजच नसते. मराठी भाषेची ही खासियतच आहे. ‘गेला गाढवाच्या...’ एवढंच  पुरतं, ठिकाण सांगायची गरजच नसते. अर्थातच ही खाज स्थलकालप्रसंगोपात कशाचीही असू शकते. म्हणजे, ‘इतका प्रुरायटस आहे ना त्याला, स्वतःहून  जाऊन सरांना लेक्चर कधी असं विचारतो.’ किंवा ‘तुलाच लेका प्रुरायटस, म्हणून इलेक्शनला उभा राहिलास!’  
पदव्युत्तर शिक्षणादरम्यान ज्युनिअर रेसिडेंट, सिनिअर रेसिडेंट आणि चीफ रेसिडेंट अशी तीन वर्ष काढावी लागतात. सर्जरी शिकत असाल तर बरेचदा तुमच्या हाती रिट्रॅक्टर धरण्याशिवाय (सर्जरी दरम्यान बाकी अवयव बाजूला धरण्याचे उपकरण)  काही पडत नसे. त्यामुळे ही  पदनामावली ज्युनिअर रिट्रॅक्टर, सिनिअर रिट्रॅक्टर आणि चीफ रिट्रॅक्टर अशीच सार्थ ठरे. इतकंच काय, यातल्या प्रत्येकालाच वरच्यांच्या इतक्या लाथा आणि शिव्या खाव्या लागत की विचारायची सोय नाही. ह्या वेदना गुदसंभोगाच्या तोडीसतोड. त्यामुळेच ज्युनिअर रेक्टम, सिनिअर रेक्टम आणि चीफ रेक्टम अशीही बदनामावली  होतीच.
नर्सिंग क्षेत्रातूनही आम्ही शब्द उसने घेतले आहेत. स्टॅट (STAT) म्हणजे लगेच, आत्ताच्या आत्ता. तातडीने करायच्या उपचारादरम्यान ऑर्डर देताना हा शब्द वारंवार वापरला जातो. ‘इंजेक्शन अमुकअमुक स्टॅट!’ ‘ऑक्सिजन स्टॅट!!’ पण डॉक्टर मंडळी तो एरवीही वापरू शकतात, उदाः ‘बायकोचा फोन होता, स्टॅट फोन करायला सांगितलंय’ किंवा  ‘बिडी मारायला चल रे’,  ‘स्टॅट आलो.’ ‘सिटी ऑल’ हाही नर्सिंग ऑर्डर मधला शब्द. सिटी ऑल म्हणजे  ‘कंटीन्यू ऑल’.  जे आहेत तेच औषधोपचार  चालू ठेवा असा त्याचा अर्थ. पण ‘काय कसं चाललंय?’, ‘काही नाही, बस्स, सिटी ऑल’, असे संवाद झडत असतात. 
काही शब्द मेडिकलबरोबरच  इतरही विद्यार्थी वापरतात. पण इतिहासात का कशात म्हणतात, त्यात नोंद व्हावी म्हणून सांगतो. ‘नाईट मारणे’ म्हणजे रात्रभर अभ्यासासाठी जागणे; पण रात्रभर अभ्यासच करणे असे नाही! ‘व्हेग’ म्हणजे विषयाची  अस्पष्ट, धूसर समज. बीएमआर म्हणजे आमच्या भाषेत ‘बेसल मेटाबॉलिक रेट’, पण विद्यार्थीवाणीत   ‘बेसिक में राडा’. याउलट  ‘फंडा क्लीअर’ म्हणजे फंडामेंटलस् स्पष्ट असणे. ‘किडा करणे’ म्हणजे गोच्या करणे. ‘पॅरॅसाईट’ म्हणजे आमच्या भाषेत परोपजीवी. म्हणजे उवा, खरुज, जंत वगैरे मंडळी. हॉस्टेलवर अनाहूतपणे आणि अनधिकृतपणे रहाणाऱ्या जीवाभावाच्या मित्रांना पॅरॅसाईट ही संज्ञा होती. ‘झगा लागणे’ हा पुणेरी वाक्प्रचार. झगा लागणे म्हणजे पेशंटमध्ये  काहीतरी अगम्य गुंतागुंत होणे, खूप वेळ, अगदी दिवसरात्र पेशंटसाठी झगडावं लागणे.  
जसे शब्द आहेत तसे म्हणी आणि वाक्प्रचारही आहेत. सर विचारायचे, डॉक्टर होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा अवयव कुठला? उत्तर अर्थात असायचं डोकं/मेंदू. सर सांगायचे चुकलं! सगळ्यात महत्वाचा अवयव आहे कोपर!! ‘The elbow helps you learn medicine’; कारण तुम्हाला काही शिकायचं असेल तर गर्दीतून दुसऱ्याला कोपरानी बाजूला ढकलत ढकलत तुमचं तुम्हाला पुढे यावं लागेल. या क्षेत्रातल्या तीव्र स्पर्धेची जाणीव अशी शिक्षणादरम्यानच  धारदार केली जाई. 
‘Your eye doesn't see what your mind doesn’t know’, हेही असेच एक जीवनदर्शी सुभाषित. मुळात अभ्यास कच्चा असेल, काय खाणाखुणा शोधायच्या हेच माहित नसेल, तर ढळढळीतपणे समोर दिसणारा आजारही ओळखू येणार नाही, हा त्याचा मतितार्थ. याचा प्रत्यय दारी आणि घरीही येतो. कुठे काय ठेवलंय हे बायकोला माहित असतं आणि मला नसतं. त्यामुळे कपाटातली वस्तू तिला दुसऱ्या खोलीतुनही दिसते आणि मला ‘तिथ्थेच, सम्मोर’ असूनही अजिबात दिसत नाही.  
अशी म्हणी-वाक्प्रचारांनी मढलेली भाषा देखणी खरीच पण काही वेळा अगदी कमी वेळात, अगदी नेमकी, बिनचूक माहिती द्यायची-घ्यायची असते. कामाच्या भाऊगर्दीत दोन डॉक्टर जेंव्हा एकमेकाला फोन करतात, तेंव्हाची भाषा आणि संवाद तर अभ्यासण्यासारखा आहे. अगदी कमीतकमी शब्दात नेमका प्रश्न विचारला जातो आणि तितक्याच मोजक्या शब्दात त्याचं उत्तरही दिलं जातं. उत्तम कविता अल्पाक्षरी आणि अनेकार्थी असते. हे संवाद अल्पाक्षरी पण नेमक्या अर्थाचे असतात. अर्थाचा द्व्यर्थ अथवा अनर्थ होणे परवडणारे नसते. शिक्षणातला बराच वेळ ही आशयघन, गोळीबंद,  परिभाषा घटवण्यात घालवावा लागतो तो काही  उगीच नाही. 
एकूणच भाषा या प्रकारावर जगभर सतत संशोधन चालू आहे पण अशा खास भाषांचा अभ्यास झालाय का नाही, मला माहित नाही. खरंतर भाषेइतकी अजब चीज माणसांनी पुन्हा शोधलेलीच नाही. तुमच्या माझ्या पणजोबांच्या, पणजोबांच्या,...पणजोबांनी  ध्वनी-संकेतांना अर्थ चिकटवला. तुमच्या माझ्या आजोबांच्या, आजोबांच्या,....आजोबांनी लिपी नावाच्या रेघोट्यांना ध्वनी चिकटवला आणि आज मी हे लिहितोय आणि तुम्ही ते वाचताय.  
भाषा मोठी अजब चीज आहे खरंच.

2 comments:

  1. खमंग आणि खुसखुशीत ...
    हे वाचताना कॉलेजचे दिवस आठवले ... तेंव्हा कट्ट्यावर मी आणि माझा एक साहित्य प्रेमी (😜) मित्र अवतीभोवतीच्या हिरवळीचे वर्णन समिक्षकी भाषेत करायचो ---- कथेचा घाट उठावदार आहे .. कथेवर परकीय सावली आहे .. कथा फारच लक्षवेधी आहे .. वगैरे वगैरे.. 😜

    ReplyDelete
  2. आमच्या veterianary world मध्येही असे खूप शब्द आहेत. काही कॉमन आहेत. मस्त लिहिलंय. प्रथम प्रेम करावं तर भाषेवर , ती शिकवणाऱ्या आईवर, प्राथमिक शिक्षकांवर आणि मग कुणावरही 😀

    ReplyDelete