व्हिएटनामची ‘मदर’
डॉ. शंतनू अभ्यंकर
अश्रू म्हटलं की मराठी माणसाला आई आठवते. साने गुरुजींच्या शामच्या आईनं काही पिढ्यांवर गारुड केलं आहे. आई म्हटलं की कसली सोज्वळ आणि भावुक होतात माणसं. पण ‘आई’ नावाच्या शिल्पाने अंतर्बाह्य ढवळून निघल्याचा अनुभव मला आला तो व्हिएतनाममध्ये. तिथल्या युद्ध-संग्रहालयात.
तब्बल वीस वर्ष चाललेलं हे युद्ध (१९५५-७५). शेवटी इथे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. व्हिएतनामचा विजय झाला, पण व्हिएतनामलाही काही कमी भोगावं लागलं नाही. युद्ध हरण्या खालोखाल काही वाईट असेल, तर ते युद्ध जिंकणे होय. व्हिएतनामला याचा पुरेपूर प्रत्यय आला.
युद्धाचं उघडंवाघडं, भीषण वास्तव, खुलेआम मांडणारं हे युद्ध संग्रहालय. छिन्न चेहरे, विच्छिन्न शरीरे, छिन्नमनस्क जनता आणि नापाम बॉम्बने विद्रूप झालेल्या पिढ्याचपिढ्या. ‘एजंट ऑरेंज’ने (एक रासायनिक अस्त्र) उजाड केलेली शेती, वैराण भातखाचरे, केळीचे सुकलेले बाग, उघडे ताड आणि बोडके माड. एकेक दालन पार करता करता किती वेळा अंगावर सरसरून काटा येतो. उभ्याउभ्या दरदरून घाम फुटतो. डोळे गप्पकन् मिटून आपण जिथल्यातिथे थिजून जातो. हे क्रौर्य आपल्याला पहावत सुद्धा नाही तर ज्यांना भोगवं लागलं, त्यांना काय यातना झाल्या असतील; या विचारानी आपण अस्वस्थ होतो. कोणीही सहृदय माणूस हे संग्रहालय एका झटक्यात पाहुच शकत नाही. थोडा वेळ दालनाबाहेर बसायचं पुन्हा हिम्मत गोल करायची आणि आत शिरायचं असं करावं लागतं. युद्धस्य फक्त कथाच रम्या, वास्तव किती हादरवून सोडणारं असतं ह्याचं यथार्थ दर्शन इथे घडतं.
तिथे एक ओबडधोबड पुतळा आहे. ‘मदर’ नावाचा. सात आठ फुट उंचीचा. नाव ‘आई’ असलं तरी मुळात तो बाईचा पुतळा आहे हेही सांगावं लागतं. बाईपणाचं आणि आईपणाचं कोणतंच लेणं तिच्या अंगाखांद्यावर नाही. ना आसपास खेळणारी चार दोन गोजिरवाणी पोरं, ना थानाला लुचलेलं एखादं पदराआडचं पिल्लू. मुळात तिला थानंच नाहीत. छातीच्या फासळ्याच तेवढ्या दिसताहेत. अस्थिपंजर झालेलं शरीर, त्याला कसलीही गोलाई नाही. तोंड खप्पड, त्यावर ना वात्सल्य, ना प्रेम, ना करूणा, ना काही. आईपणाशी निगडित कोणतीही भावना नाही त्या चेहऱ्यावर. चेहरा कसला जवळजवळ कवटीच, म्हणायची इतका भेसूर. ही कसली ‘आई’ ही तर बाई सुद्धा नाही. शिवाय ही उभी आहे जमिनीतून निवडुंगासारख्या फुटलेल्या काही पोलादी पट्यांमध्ये. कमळात वगैरे उभी असल्यासारखी. पण हिच्या हातातून मोहरा वगैरे काही पडत नाहीयेत. हिचे हात तर नुसते दोन्ही बाजूला लोंबताहेत, जीव नसल्यासारखे. काही देणं तर सोडाच पण काही मागायचंही त्राण त्यांच्यात नाही.
ज्ञूएंग होयांग हुय अशा काही तरी नावाच्या कलाकाराची ही कृती. नाव ‘मदर’ दिलंय म्हणून, नाहीतर मम्मी ऐवजी इजिप्त्शियन ‘ममी’ म्हणून खपलं असतं हे शिल्प. पण ह्या कलाकृतीची पार्श्वभूमी लक्षात येताच हे शिल्प आपल्याला हादरवून सोडतं.
युद्धग्रस्त, उद्ध्वस्त, व्हिएतनाममधील ही ‘मदर’ आहे. हीचं सर्वस्वं लुटलं गेलं आहे. बेघर, निराधार, निरापत्य अशी ही आई आहे. म्हणजे कधीतरी ती आई होती. आता तिची मुलं नाहीत. ती बहुधा युद्धात मारली गेली. आता हिला घर नाही ते बहुधा युद्धात ध्वस्त झालं. आता हिला शेतीवाडी नाही, म्हणजे असेलही जमिनीचा तुकडा, पण नापाम बॉम्बच्या रासायनिक माऱ्यात तिथलं पीक झालंय निष्प्राण आणि जमीन आता कायमची नापीक.
हे आर्त साकार करण्यासाठी मग कलाकाराने बॉम्बच्याच कपच्या वापरल्या आहेत. ह्या कपच्यांच्याच कमळ-पसाऱ्यात ती उभी आहे, ह्या कपच्यांनीच ती बनली आहे. ज्यामुळे ती उद्ध्वस्त झाली त्या बॉम्बच्या तुकड्या तुकड्यांनीच ती आता घडली आहे. आपल्या रयाहीन, पोकळ, वठल्या शरीरातून पहाणाऱ्याचा अंत पहाते आहे.
No comments:
Post a Comment