एका हात पंपाची गोष्ट.
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई.
कॉलरा शब्द ऐकलाय तुम्ही, पण कॉलऱ्याचा पेशंट काही ज्येष्ठ मंडळी वगळता नक्कीच नसेल पहिला. पंढरपूरला, आषाढी कार्तिकी भक्तजन येऊन चंद्रभागेमध्ये स्नान आणि इतरही नित्यकर्म उरकत असत. त्यामुळे वारी बरोबर तिथे कॉलऱ्याची फेरी ठरलेली. अनेक विष्णूदास भूवैकुंठीच थेट वैकुंठवासी व्हायचे.
लाखोंनी माणसं दगावायची कॉलऱ्याने त्याकाळची गोष्ट आहे ही. इये मायदेशीची नाही पण खुद्द इंग्लंडातील, लंडनमधील. लंडनला कॉलरा फार. दर काही दिवसांनी साथी येणार, माणसं जाणार, हा क्रम ठरलेला. आजही जगात कॉलराग्रस्त आहेत. आपल्यापासून दूर आहेत, पण आहेत.
गोष्ट आहे जॉन स्नो या इंग्लंडातील डॉक्टरची. १८३१, १८४८ आणि १८५३ अशा तीन महाभयंकर साथी आल्या लंडनला तेंव्हाची. म्हणजे आपल्याकडे १८१८ला पेशवाई बुडाली आणि १८५७ला ‘बंड’ झालं त्या दरम्यानची. कॉलरा कशामुळे होतो हे माहितच नव्हतं तेंव्हाची. काही म्हणायचे हा ‘कोंटेजिऑन’चा प्रताप, काही म्हणायचे ‘ह्युमर्स’चा प्रताप, काही म्हणायचे हा ‘मायाझम’चा प्रताप किंवा रोग्याशी थेट संपर्काचा प्रताप. पण मायाझम म्हणजे नेमके काय हे कोणालाच नीट सांगता येत नव्हतं. मायाझम म्हणजे आजारकारक घटक, मग यात मानसिक, शारीरिक, अनुवंशिक घटकांपासून ते अशुद्ध हवापाण्यापर्यंत असे काहीही येत असे.
पण स्नो साहेबांचं म्हणणं असं की जर हा अशुद्ध हवेमुळे असेल तर आधी खोकला, धाप अशी लक्षणे दिसायला हवीत. पण आजार तर सुरु होतो, उलट्या, जुलाब अशा त्रासानी. तेंव्हा अशुद्ध हवेचं काही खरं नाही गड्या.
बराच अभ्यास करून त्यांनी कॉलरा बहुधा पाण्यातून पसरत असावा असा कयास बांधला. विशेष कोणी मनावर घेतलं नाही पण ह्यांनी नेटानी अभ्यास जारी ठेवला.
लंडनच्या पाणी पुरवठ्याचा त्यांनी अभ्यास केला. पाणी पुरवठा कंपन्या थेट थेम्स मधून पाणी उचलून नळांनी पुरवत होत्या. त्यांची क्षेत्रे ठरलेली होती. त्यातही प्रवाहाच्या खालच्या भागातून पाणी उचलणाऱ्या कंपनीचे ग्राहक जास्त आजारी पडत होते. डॉ. स्नोंचा अंदाज असा की याचे कारण त्यांचे पाणी वरच्यांच्या सांडपाण्यांमुळे अधिक दूषित होत होते.
पाणीपुरवठ्याची आणखीही एक तऱ्हा होती. अख्या लंडनभर सार्वजनिक विहिरींवर हातपंप बसवलेले होते आणि त्या त्या भागाला त्या त्या विहिरीतून पाणी पुरवले जात होते.
१८५३ साली ब्रॉड स्ट्रीटवर कॉलराचा उद्रेक झाला. तिथल्या हातपंपाचं पाणी डॉ. स्नोंनी तपासलं पण अर्थातच काहीही शोध लागला नाही. मग त्यांनी घरोघरी जाऊन माहिती गोळा केली. आठवड्याभरात ८३ लोकं दगावली होती आणि त्या सर्व घरी ब्रॉडस्ट्रीटच्या पंपावरून पाणी भरलं जात होतं. नगरपित्यांसमोर त्यांनी हा विषय लावून धरला. हातपंप बंद करणे म्हणजे लोकक्षोभ ओढवून घेणे. हे कोणालाच नको होतं. शेवटी जरा नाखुशीनेच त्यांनी तो पंप बंद ठेवायचा निर्णय घेतला... आणि कॉलरा झपाट्यानी ओसरला.
डॉ. स्नोंनी शोध चालूच ठेवला. त्यांना एकूण १९७ कॉलराग्रस्त आढळले. सगळे हाच पंप वापरणारे. पंपाच्या विहिरीत शेजारची गटारगंगा झिरपत असल्याचेही आढळले. त्याहून महत्वाचं म्हणजे शेजारील स्वतंत्र पाणीपुरवठा असलेले, कॉलरापासून बचावलेलेही आढळले. ही सगळी माहिती त्यांनी लंडनच्या नकाशावर भरली; आणि कारण आणि परिणाम यांचे अटळ नाते ठळकपणे दिसून आले. ब्रॉड स्ट्रीटच्या पंपक्षेत्रात कॉलराग्रस्त लाल ठिपके आणि आजूबाजूचा नकाशा मोकळा.
ह्या नकाशाने आरोग्याकडे, विशेषतः सार्वजनिक आरोग्याकडे बघण्याची नवी दिशा दाखवली. मुळात आरोग्याला, ‘वैयक्तिक आरोग्य’ आणि ‘सार्वजनिक आरोग्य’ असे भिन्न आयाम आहेत हे दाखवून दिलं. कॉलराचे संक्रमण कसं होत असावं याचा एक वेगळाच मार्ग ह्या नकाशात दिसला. ब्रॉड स्ट्रीट पंप विरुद्ध इतर पंपाचे पाणी पिणाऱ्या गल्ल्या, असा भिन्न परिस्थितीतील समूहांचा तौलनिक अभ्यास नकाशात होता. जलप्रदूषणाने कॉलरा होतो याची खात्रीच तो नकाशा देत होता.
पुढे बरीच उलथापालथ झाली. लुई पाश्चरने जंतूबाधेचा सिद्धांत मांडला (१८७३), टीबी (१८८२), टायफॉईड (१८८०), कॉलरा (१८८३) असे अनेक जंतू एकामागोमाग एक शोधले गेले. हळूहळू एपीडेमिओलॉजी असे नवे शास्त्र उदयाला आले. करोंना वगैरे साथी आल्या की ह्या शास्त्राची जरा चर्चा होते. एरवी अडगळीत गेलेल्या ह्या विषयाला जरा झळाळी येते. खरंतर हा ही विषय अतिशय आव्हानात्मक आणि सगळ्या समाजावर अनेकांगी परिणाम करणारा. पण सर्जरी किंवा मेडिसीनचा थेट रुग्णसेवेचा सुवर्णस्पर्श ह्या विषयाला नाही. एखाद्या गुंतागुंतीच्या कॅंन्सरवर शस्त्रक्रिया जितकी कठीण तितकेच जगभर फोफावणाऱ्या, करोनासारख्या साथीचा, सार्वजनिक मुकाबलाही कठीण. जगभरातून देवी निर्मुलन करणे, पोलिओ हद्दपार करणे, ही असली जटील कामं ह्या शास्त्राच्या मदतीनी केली जातात. इतकच काय पण स्थूलपणा, डायबेटीस, रक्तदाब, रस्ते अपघात हे देखील ‘साथीचे’ आजार आहेत आणि हे प्रश्न सोडवायलाही हे शास्त्र मदत करतं. मलेरियाची साथ यायला माणशी किती डास लागतात ते कॉलराच्या साथीत किती सार्वजनिक संडास लागतात असे अनेक अनेक गद्य, रुक्ष, वरवर पहाता बिनमहत्वाचे वाटणारे प्रश्न हे शास्त्र सोडवते.
कॉलऱ्याची साथ आली. लंडन मनपाने पंपाचे हॅंडल काढून टाकले. पंप बंद झाला आणि पंप बंद करताच खरोखरच कॉलरा ओसरला. इतिहास आणि परंपराप्रेमी ब्रिटननी आजही जॉन स्नो आणि त्या पंपाच्या आठवणी जपल्या आहेत. आजही तो पंप आपल्याला बघायला मिळतो. दरवर्षी जॉन स्नो स्मृत्यर्थ या क्षेत्रातल्या दिग्गजांची व्याख्याने होतात. ह्या व्याख्यानमालेचे नावच मुळी पंप हॅंडल लेक्चर्स. या व्याख्यानाची सुरवात पंपाचे हॅंडल काढून होते आणि शेवटी पुनः एकदा ते हॅंडल जागच्या जागी बसवण्यात येतं. सार्वजनिक आरोग्यातील काही आव्हानांवर आम्ही मात केली असली तरी अजूनही बरीच शिल्लक आहेत, नवी सामोरी येत आहेत याची ही प्रतीकात्मक जाणीव.
No comments:
Post a Comment