Sunday 1 March 2020

हे एड्सासूरा अगाध आहे तुझी कृपा!

हे एड्सासूरा, अगाध आहे तुझी कृपा! 
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई.

एच.आय.व्ही.हा एड्सचा जंतू. ह्याचा मानवघातक हल्ला, त्याचा अभ्यास, जंतूचा आणि औषधांचा शोध, त्यांचा प्रभावी, सर्वदूर वापर आणि यातून अंतिमतः मिळालेला एच.आय.व्ही. विजय ही सगळी अगदी अफलातून कथा आहे. अतिशय नाट्यमय असा दिग्विजय हा.  त्याचेच हे आख्यान.
 
२४ एप्रिल १९८०, सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये केन हॉर्नचा मृत्यू झाला. हा एड्सनी मेला असं पुढे लक्षात आलं. एका अज्ञात व्हायरसने घेतलेला, आणि आपल्या लक्षात आलेला, हा पहिला बळी. हा आजार आणि विशेषतः त्याच्या प्रसाराची कारणे माहित होताच हलकल्लोळ माजला. ऐंशीच्या दशकात एड्स अक्राळविक्राळ रुपात सामोरा ठाकला. आजवर ३५ कोटीहून अधिक बळी आणि ह्याच्या दुप्पट जणांना लागण अशी ह्याची  हवस आहे. फक्त समलैंगिककांनाच हा आजार होतो अशी सुरवातीची समजूत होती. नावही गे रिलेटेड इम्यून डीफीशीअन्सी असे होते. समलैंगिकांचे उच्छृंखल लैंगिक व्यवहार, गुद-संभोगात होणारी इजा आणि एकूणच होणाऱ्या कुचंबणेमुळे यथातथा मिळणारी वैद्यकीय मदत; हे सारे कळीचे मुद्दे हळूहळू पुढे आले. पण लवकरच ‘अन्य’लैंगिकांनाही तो होतो आणि उच्छृंखल लैंगिक व्यवहार, गुद-संभोगात होणारी इजा हे मुद्दे त्यांनाही लागू आहेत, हे स्पष्ट झालं. मग ड्रग्स घेणारे  व्यसनीही याला बळी पडतात,  आईकडून बाळालाही (गर्भात किंवा दुधातून) हा होतो, दूषित रक्त दिल्याने, दूषित सुया वापरल्यानेही होतो हे लक्षात आलं. मग एड्स (अक्वायर्ड इम्यून डीफीशीअन्सी सिंड्रोम) हे नाव ठरले.  

हरएक संकटाच्या वेळी पिकतात तशा कंड्या याही वेळी पिकल्या. हा आजार नाराज, कोपलेल्या देवाने मानवाच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून पाठवला आहे. आता मानव-वंश-विच्छेद होणार, आता प्रार्थनेला पर्याय नाही आणि देवाला शरण येण्याशिवाय तरणोपाय नाही. कयामत कयामत म्हणतात ती हीच...! पण शांतपणे, अव्याहतपणे, चिकाटीने काम करणाऱ्या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी नाउमेद न होता, विचलित न होता, आपले काम चालूच ठेवले...आणि अखेरीस ह्या आजाराला नामोहरम करण्यात यश मिळवले. ह्या कामगिरीबद्दल आपण सण साजरा करायला हवा. 

१९८० साली या आजाराच्या पहिल्यावहिल्या रुग्णाची नोंद झाली. आणि जंतू शोधता आला १९८३ साली. मग ह्या जंतूचे प्रकार, प्रसार, जीवनचक्र असा सगळा तपशील गोळा होत गेला. जंतूची लागण आणि आजाराची लक्षणे यांचे नातेसंबंध तपासले गेले. होता होता आज ह्या आजारावर वीसहून अधिक औषधे उपलब्ध आहेत. ती प्रभावी आहेत. म्हणूनच की काय ह्यावर रामबाण इलाज असण्याचा दावा करणारे, केरळपासून कॅलीफोर्निया पर्यंत उगवलेले, भोंदू, आपापला गाशा गुंडाळून, गुल् झाले आहेत. टाळूवरचे लोणी खायला नव्या औषधोपचारांनी त्यांना मढंच शिल्लक ठेवलं नाहीये! पण सुरवातीला एड्सच्या भयगंगेत अनेकांनी आपले हात धुवून घेतले. सर्वसंहारक संकट, भयभीत, हतबल जनता, या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे भोंदू आणि शास्त्रीय औषधांचा उदय होताच त्यांचा होत जाणारा अस्त; हासुद्धा अभ्यासाचा विषय आहे. 

एच.आय.व्ही. कसा होतो  वगैरे सामान्यज्ञान सरकारनी यष्टी स्टांडावरसुद्धा लावले आहे. तेंव्हा त्यात कशाला शिरा? रक्तातील पांढऱ्या पेशी म्हणजे साक्षात आपली प्रतिकारशक्ती.  शरीरात शिरल्या शिरल्या हा विषाणू काही प्रकारच्या पांढऱ्या पेशींत (सीडी४ लीम्फोसाईट) बस्तान बसवतो आणि प्रसवतो. प्रसवतो आणि शरीरात अन्यत्र पसरतो. ही साऱ्याच  विषाणूंची खासियत. जिवंत पेशींत घर केल्याशिवाय हे पिल्लावू शकत नाहीत. एच.आय.व्ही.ला पांढऱ्या पेशी (लीम्फोसाईट) प्याऱ्या.  त्यातल्या त्यात सीडी ४ प्रकारच्या विशेष प्याऱ्या.  हळूहळू सर्व शरीरभर ही लागण पसरते. आजाराची अशी सुरवात होत असताना ताप, अंगदुखी, घसादुखी, जुलाब अशी काही ना काही लक्षणे दिसतात, पण ती इतकी किरकोळ आणि एरवीही आढळणारी असतात की एवढ्याश्या सुतावरून एच.आय.व्ही.चे निदान गाठणे शक्य होत नाही. अगदीच कोणा कुशंकेखोराने या दरम्यान तपासण्या केल्या (एच.आय.व्ही. आर.एन.ए. इत्यादी) तर हा शोध लागू शकतो. पण चोरपावलाने होणारी  ही सुरवात पेशंट आणि इतरांनाही धोकादायक ठरते. पेशंटला सुरवातीला काहीच होत नसल्याने लागण  झाल्याचे कळतच नाही. निदानच  न झाल्यामुळे उपचाराचा, सावधगिरीचा  प्रश्नच येत नाही. पेशंटचा आजार  बळावत जातो आणि दरम्यान तो/ती इतरांना नकळत, सुखेनैव, जंतू-प्रसाद वाटत रहातात. अशी कित्येक वर्ष निघून जातात. अगदी दहा-पंधरा सुद्धा. दरम्यान पेशंटला एच.आय.व्ही.ची लागण  झाली असेल, असे सुचवणारा कोणताही त्रास होत नाही. हळूहळू हा आजार प्रतिकारशक्ती पोखरत रहातो आणि जेंव्हा प्रतिकारशक्तीचा ऱ्हास टिपेला पोहोचतो तेंव्हा पुन्हा एकदा पेशंटला काही ना काही व्हायला लागतं. खास एच.आय.व्ही.चेच असे कोणतेच लक्षण नसते. वारंवार जुलाब, वारंवार न्युमोनिया, वारंवार नागीण, कावीळ, फंगल इन्फेक्शन, क्षय; असं काही उद्भवलं की, प्रतिकारशक्तीच क्षय पावल्याची, म्हणजेच एच.आय.व्ही.ची  कुशंका येते डॉक्टरना.   इतके दिवस निव्वळ एच.आय.व्ही.ची ‘लागण’ झालेल्या व्यक्तीला, आता ‘एड्स’ हा आजार झाल्याचं निदान केलं जातं. खरेतर ‘लागण’ आणि ‘आजार’ हा भेद आता मानला जात नाही. सरसकट सगळ्यांनाच औषधे दिली जातात. त्यामुळे ‘एड्स’ऐवजी एच.आय.व्ही.डिसीज असा शब्द आता वापरला जातो. (पण वाचकांना परिचित असणारा शब्द म्हणून एड्स असा उल्लेख कायम ठेवला आहे.) 

इथून पुढे मात्र परिस्थिती झपाट्यानी बिघडत जाते. उपचार घेतले नाहीत तर लवकरच मृत्यू झडप घालतो. अपवादात्मक परिस्थितीत काही महाभाग मात्र उपचार न घेताही वर्षानुवर्ष धडधाकट रहातात. जंतूही यांना काही करत नाहीत आणि हेही जंतूंचा पूर्ण पाडाव करू शकत नाहीत. जंतू आणि प्रतिकारशक्ती यांच्यात काही अदृश्य तह घडू येत असावा. ह्या तहाची कलमे समजावून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. ज्या दिवशी ही कलमे आपल्याला वाचता येतील त्या दिवशी लसीचा शोध आणि रोगाचे निर्मूलन सोप्प होईल. 
औषधे ही जंतूंच्या आयुष्यात निरनिराळ्या टप्यावर अडथळे निर्माण करतात. ह्यानुसारच त्यांचे वर्गीकरण केलं आहे. मुळात जंतूंना पेशीत प्रवेश बंद करणारी ती एन्ट्री इन्हीबीटर(EI), जंतुना पेशीच्या डीएनएत प्रवेश बंद करणारी ती इंटीग्रेज इन्हीबिटर (II), एच.आय.व्ही.ला पिल्लावण्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रीप्टेज हे विकर (Enzyme) आवश्यक असतं. ह्याला निष्प्रभ करणारी ती एनआरटीआय तसेच एनएनआरटीआय (NRTI/NNRTI). नवजात एच.आय.व्ही.शी लढणारी ती प्रोटीएज इन्हीबिटर (PI); हे मुख्य प्रकार आहेत. एकच एक औषध देऊन भागत नाही, तेंव्हा अनेक औषधे एकाच वेळी द्यावी लागतात. पण त्याचवेळी औषधांमुळे काही अपाय होऊ नये अशीही काळजी घ्यावी लागते. अशी ही सगळी तारेवरची कसरत आहे. 

१९८७ मध्ये एड्स विरूद्धचे हे पहिलेवाहिले औषध, झायडोव्हुडीन आलं. हे एकटेदुकटे ह्या राक्षसापुढे तसे कुचकामी. मग यासम, (एनआरटीआय गटातली) इतरही औषधे आली. पण फार काही उजेड पडला नाही. तेंव्हा उपचार म्हणजे गोळीबारच असायचा. दिवसाला २८ गोळ्या! काही भरपूर पाण्याबरोबर, काही तशाच, काही  उपाशीपोटी, काही जेवणाआधी, काही नंतर, काही रात्री, काही मध्यरात्री...असं वेळापत्रक. हे करण्यात थोडं जरी इकडे तिकडे झालं, की घटलीच सीडी४ची  संख्या, वाढलीच व्हायरसची प्रजा आणि त्यातून लेकाचे लगेच त्या त्या औषधाला रेझीस्टंट होणार. म्हणजे आफतच. सीडी४ या प्रतिकारशक्ती निदर्शक पेशी. या  कमी झाल्याने विविध आजार होतात. या पेशींची संख्या उपचाराचे यशापयश मोजण्यासही उपयुक्त ठरते.  आजकाल व्हायरसचा हा परिणाम मोजून अप्रत्यक्ष चाचणीपेक्षा थेट व्हायरसची संख्याच मोजता येते (व्हायरल लोड). ह्यामुळे उपचारात खूपच नेमकेपणा आला आहे. 

पुढे पीआय आणि एनएनआरटीआय गटातली औषधे आली आणि प्रथमच एच.आय.व्ही.विरुद्ध तीन औषधांचे त्रिशूळ वापरण्याची युक्ती योजता आली. ही औषधे एच.आय.व्ही.ला त्रिविध ठिकाणी निकामी करायची आणि त्यामुळे एकत्रित परिणाम त्रिगुणित नाही तर शतगुणित व्हायचा. ही त्रिशूळ उपचार पद्धती आली आणि एड्सचा मृत्यूदर निम्यानी घटला. ‘लवकर हाणा आणि जोरदार हाणा’ (Hit early, hit hard) हे धोरण होतं. डॉ. डेव्हिड हो ह्या घोषणेचे कर्ते. त्रिशूळ पद्धतीचे हे जनक. ‘टाईम’चे १९९६चे मॅन ऑफ द इयर.  लवकर उपचार आणि त्रिशूळ मात्रा यामुळे एच.आय.व्ही. छान आटोक्यात येऊ लागला. 

पण एच.आय.व्ही.ला दिलेला हा दणका पेशंटचीही परीक्षा पाही. सतत मळमळ, भूक मेलेली, अंगदुखी, थकवा हे तर निश्चित. शिवाय इतर दुष्परिणाम असणारच.  हातापायाची जळजळ (पेरीफेरल न्युरोपॅथी), जुलाब, कावीळ, डायबेटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्टेरॉल वाढणे, लकवा, हृदयविकार...चेहऱ्यावरून, हातापायावरुन, चरबी व्हायची गायब आणि मानगुटीवर येऊन साचायची. लांबूनच कोणीही डॉक्टरनी ओळखावं, हा एच.आय.व्ही.चा पेशंट बरं. माणसं जगायची पण मृतवत आयुष्य. औषधांचे दुष्परिणाम इतके होते की सीडी४ अगदी रसातळाला गेल्यावरच ती देणं शहाणपणाचं ठरत होतं. इतकच काय मधूनमधून औषधांना सुट्टी देता येते का या दिशेनेही संशोधन झालं पण व्यर्थ. थोडीही ढील दिली की एच.आय.व्ही.चा वारू मोकाट सुटलाच म्हणायचा. 

मग आली एन्ट्री इन्हीबीटर्स गटातील नवी औषधे (एनफ्युव्हीरटाइड). पुन्हा एकदा आशा आणि औषधे सोडून दिलेल्या अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. नवी औषधे क्षमाशील होती, थोडी चूकभूल चालून जात होती. औषधांची कार्यक्षमता आणि दीर्घकालीन सुरक्षितता, दोन्ही आज अशा अवस्थेला आहेत की आज सीडी४ काउंट कितीही असो, एच.आय.व्ही.चे निदान होताच औषधे सुरु केली जातात आणि ती जन्मभर सुरु ठेवली जातात. एच.आय.व्ही.ची बरोबरी आपण आता ब्लडप्रेशर किंवा डायबिटीसशी करू शकतो. आजार बरा होत नाही पण आटोक्यात रहातो.

 एच.आय.व्ही.च्या कित्येक कमकुवत जागा आता माहिती झाल्या आहेत. पेशीत शिरकाव केल्याशिवाय ह्याची प्रजा वाढत नाही. पेशीत शिरकाव करायचा तर विशिष्ठ प्रथिने दाराशी असतील तरच प्रवेश मिळतो. सीसीआर५ हे असे एक प्रथिन. ज्या लोकांत एच.आय.व्ही.विरुद्ध निसर्गतः प्रतिकारशक्ती असते ती ह्या प्रथिनातील रचना वेगळी असल्यामुळे. अशी वेगळी रचना असणारे प्रथिन घडते ते तशा सूचना डीएनएकडून येतात म्हणून. मग ह्या सूचना कॉपी करून आजाऱ्याच्या पेशीत डालल्या तर? हे अवघड आहे पण शक्य आहे. याला म्हणतात जीन थेरपी. असेही प्रयोग चालू आहेत. एच.आय.व्ही.हा अनेक दशके पेशीत खोलखोल घर करून रहातो आणि म्हणून तो औषधांचा मारा चुकवू शकतो. अशा लपलेल्या गनिमाला आवाज देऊन जागे करणारी आणि वेळीच टिपणारी औषधे आता प्रयोगात आहेत. औषधांमुळे एच.आय.व्ही.च्या जंतूंचे प्रमाण इतके नगण्य होतं की आईकडून गर्भाला किंवा बाईकडून  बुवाला किंवा बुवाकडून बाईला किंवा एकाकडून दुसऱ्याला किंवा एकीकडून दुसरीला, जंतूबाधा होत नाही. औषधांमुळे एच.आय.व्ही.चा प्रसार रोखला जातो. एच.आय.व्ही.च्या बाबतीत उपचार हाच प्रतिबंध ठरतो. ह्याच विचारांनी, एच.आय.व्ही.ची लागण होण्यासारखी ज्यांची वागणूक आहे, अशांना आधीच औषधे दिली तर? तर त्यांना लागण होणार नाही. म्हणजे लस दिल्यासारखेच झाले की हे. असे (प्रेप Pre-Exposure Prophylaxis)  उपचार आता सर्रास वापरले जातात.  

प्रेप उपचारांचा हा सर्वात उन्नत उपयोग म्हणजे अर्भकांना होणारी लागण टाळणे. गर्भावस्थेतील बाळ हे एड्सचे सर्वात निरागस बळी. आईच्या गर्भात उद्याचा असे अंतःकाल, अशी अवस्था. पण आजाराची छाया बाळावर पडण्याआतच जर औषधांची छत्रछाया बाळावर धरली तर?  तर काय? तर बचावतं ना ते मूल. आईला औषधे दिल्याने असा प्रसार रोखता येतो हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेनी शून्य संक्रमण असा संकल्पच सोडला आणि आज कित्येक ठिकाणी हा संकल्प सिद्धीस गेलेला आहे. 
उपचाराला सुरवात कधी करावी? कोणती औषधे निवडावीत? किती दिवस औषधे द्यावीत? हे तर यक्ष प्रश्न. कोणत्याही आजाराबद्दल ह्यांची उत्तरे माहित हवीतच. ह्यांची उत्तरे आता माहित झाली असली  तरी ती अंतिम नाहीत. नव्या औषधांनुसार, शोधानुसार, आजारातील वळणवाटांनुसार नवी नवी उत्तरे शोधावी लागतात. आजारांनी कमी झालेली सीडी४ पेशींची संख्या औषधांनी वाढते पण बऱ्याच पेशंटमध्ये अगदी नॉर्मल होत नाही. असं का? यावर उपाय काय? याचाही शोध जारी आहे. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीत ‘जरा’, म्हणजे म्हातारपण आणि पर्यायाने मरण लवकर येतं. पुन्हा एकदा या अकाली वृद्धत्वाचे कारण अजूनही स्पष्ट नाही. यावरही संशोधन चालू आहे. 

२००७ साली टिमोथी रे ब्राऊन हा एड्स मुक्त झालेला जगातला पहिला आसामी ठरला. बर्लिनमध्ये त्याला बोन मॅरो ट्रान्स्पप्लांट केलं होतं. हाडाच्या मगजात रक्तपेशी तयार होतात. त्याचा रोगिष्ट  मगज काढून त्याजागी दुसऱ्याचा, एड्सला निसर्गतः प्रतिकार करू शकणारा मगज रोपण करण्यात आला. जगात सुमारे १% लोकांत एड्सविरुद्ध अशी नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते. उपचाराची एक वेगळीच दिशा सापडली आहे. यशापयशाचा ताळा अजून मांडायचा आहे. पण आशा आहे हे निश्चित. 

अक्षरशः दमछाक व्हावी अशा वेगाने एच.आय.व्ही.ची औषध योजना उत्क्रांत झाली आहे. उत्क्रांती नव्हे ही तर क्रांतीच आहे. पण सहसा दुर्दैव हे बातमीचा विषय बनतं आणि सकारात्मक बदल सहज  दुर्लक्षिले जातात. सकारात्मक बदल फक्त औषध योजनेत झाले असं नाही, पेशंटच्या, डॉक्टरांच्या आणि समाजाच्या मानसिकतेतही झाले. 

अंगावर एड्स आदळला आणि भारतीय समाज अचानक वयात आला. वरून फतवे निघाले. लैंगिक शिक्षणाचे वादळवारे सुटले. एन.एस.एस. आणि शाळा कॉलेजकडून अचानक ‘असल्या’ विषयावर बोलण्यासाठी डॉक्टरची मागणी वाढली. विषय काय तर एड्स आणि त्याचा  प्रतिबंध. पण कॉलेजमधली असली तरी या मुलामुलींना मुळात मानवी लैंगिकतेबद्दल ओ का ठो माहिती नव्हते. अनुभव होते पण ज्ञान नव्हते, जैविक, शारीरिक उर्मी होती पण ह्याबद्दल समजावून घेण्याची मानसिक पूर्वतयारी नव्हती. त्यांना डायरेक्ट एड्स प्रतिबंधाचे प्रवचन सुनावणे म्हणजे त्यांना आणि सुनावणाऱ्यांना  दोघांनाही शिक्षा होती. बोलणारे चाचरत बोलायचे. ऐकणारे खाली मान घालून ऐकायचे. मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. 

सुरवातीला मी ही जायचो असा, अगदी उत्साहानी. दणकावून भाषण ठोकायचो. अनिर्बंध लैंगिक संबंध आणि त्यातून जडणारा हा जीवघेणा आजार, माणूस कसा झिजत झिजत, समाजाकडून कुटुंबियांकडून झिडकारला जावून, कुत्र्याच्या मौतीने, टाचा घासत मरतो... असं अगदी भय आणि बीभत्सरसाने ओतप्रोत भाषण. हे असलं बोलणं गैर होतं असं आता मला वाटतं. निव्वळ भीतीमुळे तरुणांची नीती सुधारेल असं समजणं भाबडेपणाचं होतं.  पण त्याकाळी औषधेच नसल्यामुळे दुसरा काही पर्यायच  नव्हता.  ह्या भानगडीत मी अख्ख्या तालुक्यात भलताच पॉप्युलर झालो. इतका, की एका कॉलेज-कुमारीने माझी ओळख करून देताना सांगितलं की, ‘डॉक्टर अभ्यंकर हे एड्समधले इतके एक्स्पर्ट  आहेत, इतके एक्स्पर्ट  आहेत की वाई तालुक्यात जिथे जिथे एड्स आहे, तिथे तिथे डॉक्टर अभ्यंकर आहेत आणि जिथे जिथे डॉक्टर अभ्यंकर आहेत, तिथे तिथे एड्स आहे!!’ मी तेंव्हापासून हा नाद सोडला. 

भयंकर भीतीचे गारुड साऱ्या समाजमनावर पसरले होते. नुसती एड्सची शंका दर्शवणारा रिपोर्ट आला म्हणून काही जणांनी आत्महत्या केल्या. काहींनी जोडीनी आत्महत्या केल्या, काहींनी मुलाबाळांसकट आत्महत्या केल्या. अत्यंत टोकाचे असे हे निर्णय समाजाच्या अत्यंत टोकाच्या प्रतिक्रियेचा परिणाम होते. कुणी एड्सनी आजारी आहे म्हटलं की सुश्रुषेला माणसं ठाम नकार देत. त्या पेशंटची आई बिचारी बरेचदा अखेरपर्यंत साथ देई. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती, असं म्हटलंय ते काही उगीच नाही. 

या भयगंडातून डॉक्टरही सुटले नाहीत. कोणीही पेशंट आला की आधी एड्सची  चौकशी व्हायची. कित्येक पेशंटची गुपचूप एड्स चाचणी केली जायची आणि तो/ती पॉसिटिव्ह आहे हे लक्षात येताच तात्काळ कटर मारला जायचा. डॉक्टर घाबरायचे, नर्सेस वगैरे कर्मचारी असहकार पुकारायचे आणि इतर पेशंट, एड्सवाला  बरोबर आहे म्हटल्यावर पोबारा करायचे. त्यामुळे जिकडेतिकडे एड्सवाल्यांवर अघोषित प्रवेशबंदी होती. एड्सवालेही टक्केटोणपे खाऊन हळूहळू हुशार झाले. ते रिपोर्ट लपवू लागले. मग डॉक्टर  चाचणीशिवाय उपचार नाही, असे धोरण अवलंबू लागले. मग काही रुग्णांनी  तपासणी नाकारण्याच्या हक्क उपस्थित केला. आम्हाला एखादी तपासणी कराच असं सांगणारे तुम्ही कोण? मग डॉक्टरनी स्वतःचा, इतर पेशंटचा, संसर्गापासून बचाव करण्याचा अधिकार पुढे केला. एड्सची दहशत होतीच तशी. 

मग हळूहळू सगळेच जरा शहाणपण शिकले. एड्सचा पेशंट टाळून विशेष उपयोग नाही, तर सगळेच पेशंट एड्सचे आहेत असे गृहीत धरूनच काम करणे योग्य आहे, हे हळूहळू डॉक्टरांच्या मनावर ठसलं. (Universal precautions). मुळात पॉसिटिव्ह म्हणजे शंभरटक्के धोका, असं नाही आणि  निगेटिव्ह म्हणजे शंभर टक्के सुरक्षा, असंही नाही. ज्यांची मुळी तपासणीच केलेली नाही असे इतर कितीतरी आजार डॉक्टरना पेशंटपासून होऊ शकतात (उदा: बी व सी प्रकारची कावीळ). तेंव्हा अखंडपणे सावधपण हेच धोरण हवं. 
  
एड्सची चाचणी करण्यापूर्वी पेशंटशी सविस्तर बोललं पाहिजे, साधकबाधक चर्चा केली पाहिजे, रिपोर्टचा अर्थ नीट समजावून सांगितला पाहिजे, हेही हळूहळू लक्षात आलं. एकूणच आजार आणि रुग्ण यांचे नाते औषधापल्याडही खूप खोल असतं. एड्ससारख्या जीवघेण्या आणि समाज-बहिष्कृत आजारात तर हे अधिक गहिरं होतं.  प्रिस्क्रिप्शनची कागदी नाव पेशंटला मानसिक गटांगळ्यांपासून वाचवू शकत नाही.  डॉक्टरच्या गडबडीतल्या बडबडीमुळे आभाळभर दुखः अचानक सुसह्य होत नाही. गळी स्थेथोस्कोपची नळी आणि अंगी शुभ्र डगला असला तरीही. समुपदेशन हे एक वेगळेच कौशल्य आहे आणि ते, डॉक्टर असूनही, आपल्याला फारसे अवगत नाही अशीही जाण आली. मग ठिकठिकाणी खास समुपदेशक (काऊन्सेलर) नेमले गेले.

एड्सच्या साथीमुळे इतरही काही सुपरिणाम झाले. सुयांचा आणि सिरींजेसचा पुनर्वापर बंदच झाला. चार पैसे जास्त घ्या पण नवीन सुईच वापरा असं पेशंटच बजावू लागले. कॅप, मास्क, गॉगल, ग्लोव्हज्, गाऊनचा वापर कित्येक पटींनी वाढला. दवाखान्यातल्या मावश्या आणि मामांच्या हातातही आता ग्लोव्हज आले. 

समाज आणि कुटुंबांनी वाऱ्यावर सोडलेल्या पेशंटनी एकमेकां सहाय्य करून सुपंथ धरले. अशीच एक प्रसववेणांनी तळमळणारी एड्स असणारी बाई एका अपरात्री माझ्या दवाखान्यात आली. ठिकठीकाणी नकारघंटा ऐकून वहात वहात ती माझ्याकडे आली होती. तीची सोडवणूक करून बाळाला आजार होऊ नये म्हणून मी औषध वगैरे दिलं. तिची रडकथा तर चिरपरिचित होती. शाळा सोडलेली,  लहान वयातच उजवलेली. नवरा मुंबईला, ही गावी. तो बाहेरख्याली, ही प्रेग्नंट. मग तपासणीत एच.आय.व्ही.पॉसिटिव्ह, मग त्रागा, वैताग, हतबलता...ठिकठिकाणी दवाखान्यात टक्केटोणपे. पण कथा तीच असली तरी ही वेगळी होती. तिचा नवरा लवकरच एड्सनी वारला. सासरच्यांनी हिलाच बोल लावून माहेरी हाकलून दिली. पण रिटायर्ड पोस्टमन बापाने तिला आधार दिला. तिला कॉलेजात घातली. औषधे सुरु केली. पुढे दवाखान्यातल्या सोशलवर्कर आणि इतर पेशंटसोबत हिनी चक्क एच.आय.व्ही.ग्रस्तांची संघटना उभी केली. त्यांच्या मिटिंग घेऊ लागली. कुणाला कामावरून काढलं, कुणाला शुश्रुषेला माणूस मिळत नाहीये...असे प्रश्न ही मंडळी आपापसात सोडवू लागली. या तिच्या कामाबद्दल आमच्या संस्थेमार्फत तिला चक्क वैद्यकभूषण पुरस्कार दिला आम्ही. वैद्यकीला ललामभूत असंच काम उभं केलं होतं तिनी. जे पोळले होते त्यांनीच इतरांच्या वेदनेवर फुंकर घातली. हे एड्सच्या बाबतीत विशेष घडलं. रॉक हडसन हा अमेरिकन सुपरस्टार एड्सने गेला तो अडीच लाख डॉलरचा निधी संशोधनाला ठेऊन. अशी कित्येक उदाहरणे आहेत. 

लोकशिक्षणाची केवढी तरी  मोठ्ठी मोहीम उभारावी लागली. १९८८ पासून १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन झाला. शेवटी एड्सचा संबंध माणसाच्या वागणुकीशी होता आणि वागणुकीला औषध नसतं. पण शिक्षणानी समाज बदलतो. आता ‘यौन संबंध जब जब, कंडोम तब तब’ अशा जाहिराती वाचून पोरं आई बापांना भंडावून सोडू लागली. बलबीर पाशा तर फारच गाजला. जगभरातल्या अनेकानेक तारेतारकांनी आपले वलय एड्स जागृतीसाठी वापरले. अमिताभ बच्चनपासून ते लेडी डायनापर्यंत जगभरचे नामवंत  ह्यात उतरले. हळूहळू पण निश्चितपणे फरक पडत गेला. वेश्यावस्तीतील गल्लीबोळात पथनाट्य होऊ लागली. ‘कंडोम लावल्या बिगार कष्टंबर घेणार नाय’, असली आरोळी घुमू लागली. ह्या मंथनातून, स्वस्त कंडोम, मोफत कंडोम, कंडोम व्हेंडिंग मशीन्स असं काय काय बाहेर पडलं! आपण अगदी सोवळा समजत होतो तो आपला भारतीय समाज किती ओवळा आहे हे ठसठशीतपणे दिसून आलं.  

एच.आय.व्ही.मुळे जगभर भीतीची लाट आली तशी करुणेचीही लाट आली. मानवतावादी भूमिकेतून एड्सग्रस्तांना मदतीचा ओघ वाहू लागला. हे प्रमाण इतकं वाढलं की एच.आय.व्ही.वाल्यांचं लालन-पालन-पोषणच काय चक्क कोडकौतुक व्हायला लागलं! लोकं म्हणायला लागली, ‘अमेरिकन सरकारचा कृपावर्षाव चाहत असाल तर तुम्ही गरीब असायला हवे, बेघर असाल तर त्याहून बरे, रंगानी  काळेठिक्कर असाल तर फारच छान, गे (समलैंगिक) असाल तर आणखी  उत्तम आणि त्यातून तुम्हाला जर एड्स झाला असेल तर तुमच्या सुखाला पारावार रहाणार नाही!!’ फंडींग मिळतंय म्हणताच रातोरात स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्या. यातल्या काही स्वयंसेवी कमी आणि स्व-सेवी जास्त होत्या. एड्ससाठीचा मदतीचा ओघ इतका वाढला की एड्सने मरणाऱ्यांपेक्षा एड्सच्या फंडिंगवर जगणाऱ्यांची संख्या जास्त होईल की काय असं वाटायला लागलं!!! विनोद अलाहिदा, पण खरोखरच पेशंट आणि मानवतावादी संघटनांच्या दबावामुळे स्वस्त/फुकट उपचार सर्वदूर उपलब्ध झाले. कारण औषधे शोधून लढाई संपत नाही. ती सुरु होते. ही औषधे परवडतील अशा किमतीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हे एक मोठेच आव्हान असते. सर्वांनाच स्वस्त आणि उत्तम उपचार मिळावेत म्हणून आजाऱ्यांचा एवढा दबाव आधी कोणत्याच आजाराबाबतीत नव्हता. जर लागण झालेल्यांपैकी नव्वद टक्के लोकांचे निदान झाले; त्यातल्या नव्वद टक्क्यांपर्यंत उपचार पोहोचले; आणि त्यातल्या नव्वद टक्यांचा व्हायरल लोड शून्य झाला तर बाजी जिंकलीच असं गणित आहे. हे गणित आवाक्यात आलं आहे. स्वस्त आणि सर्वदूर उपचार पोहोचावेत म्हणून काही भारतीय औषधकंपन्यांनी अत्यंत  स्तुत्य पुढाकार घेतला आहे. 

आम्ही कॉलेजात शिरलो त्या सुमारास या आजाराचा बोलबाला सुरु झाला. दर परिक्षेला आम्ही आपले एच.आय.व्ही. घोटून तयार. हे ओळखून असलेल्या परीक्षकांनी एच.आय.व्ही.बद्दल एकही प्रश्न, एकदाही  विचारला नाही. पण आमची तयारी काही वाया गेली नाही. केलेला अभ्यास कामी आलाच. प्रबोधन, प्रतिबंध आणि शास्त्रीय उपचार याच्या साखळीचे शेवटचे टोक म्हणून का होईना, पण एका विश्वव्यापी प्रयत्नात आमचाही हातभार लागला. एका आजाराची उत्पत्ती, स्थिती, गती आणि लय; हे सारं, सारं आमच्या डोळ्यादेखत घडलंय. यातून किती तरी शिकायला मिळालंय. 

हे एड्स राक्षसा, हे एड्सासूरा, अगाध आहे तुझी कृपा.

प्रथम प्रसिद्धी अनुभव मार्च 2020

No comments:

Post a Comment