Saturday, 22 February 2020

मी एक 'चहा 'ता


मी एक 'चहा'ता
डॉ. शंतनू अभ्यंकर

आमच्या एका मित्राकडे येणाऱ्याजाणाऱ्यांचं स्वागत करण्याची त्रिसूत्री होती,
पहिल्यांदा आलात तर पोहे आणि चहा,
दुसऱ्यांदा आलात तर नुसताच चहा
आणि तिसऱ्यांदा आलात तर फक्त  अहा!!                                                 
                                              
अर्थात हा प्रकार मला मात्र आवडत नाही. आल्यागेल्याला निव्वळ चहासुद्धा देण्याची माणुसकी असू नये म्हणजे फार झालं.
कल्पना करा, तुम्ही या मित्राकडे   चालला आहात. चांगली टळटळीत दुपार आहे. घड्याळात चहा वाजले आहेत. आम्हां चहाबाजांच्या घड्याळात चार वाजत नाहीत, चहाच वाजतात. याच्याकडे होईलच या भरवशावर, तुम्ही घरचा चहा धुडकावून लावता आणि हा तुम्हाला नुसतंच 'अहा' म्हणून  कटवतो!! कसं वाटतं? चहा आणि अहा असं यमक जुळत असलं तरी चहाची जागा काही अहा घेऊ शकत नाही. चहा तो चहाच!
  आणि फक्त तोच चहा, की जो साग्रसंगीत तयार केला जातो आणि तितकाच तन्मयतेने प्यायला जातो. अशी रससिद्धी साधून जाणे हे साधं काम नाही. यासाठी आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. अशा  आनंदाच्या उकळ्या फुटल्यावर साखर टाकली पाहिजे. साखरही कशी? वर कणभर जरी टाकली तरी जास्त होईल अशी. त्याच वेळी दुसऱ्या शेगडीवर दूध तापत असलं पाहिजे. चहा उकळल्यावर नंतर  दूध तापवलं तर दूध तापेपर्यंत चहा गार होतो. साखर विरघळली की मगच  चहापावडर टाकायची. त्या फेसाळत्या पाण्यात त्या चहाचा अर्क छानपैकी उतरतो. तात्काळ गॅस बंद करून चहावर झाकण ठेऊन तो मुरू द्यावा. लोणचं मुरतं तसा चहा सुद्धा मुरतो बरं. आणि अट्टल चहाबाजांना चहा मुरला किंवा  नाही हे लगेच कळते. असो. आता दूध तापलं असेल. आता चहा गाळावा आणि त्यात दूधही गाळून घालावे. चहात साय घालणं हा फौजदारी गुन्हा ठरवला पाहिजे. चहा म्हणजे लस्सी नाही. सायीमुळे चहाची सगळी रयाच जाते. साय  नावाचा तो गिळगिळीत पदार्थ घुटक्यासरशी गिळणारी मंडळी पाहिली की पट्टीच्या चहाबाजांच्या अंगावर काटा येतो.  असो. तर अशा   रीतीने सिद्ध झालेला चहा आता गार होण्याच्या आत घुटके घेत घेत  संपवायचा आहे.
टी टाईम ही पंचेंद्रीयांनी अनुभवायची वेळ आहे.  चहाचा वास वातावरणात दरवळ्यापासूनच खरंतर तुम्ही चहा प्यायला सुरुवात करता. मग कपबशांचा मंजूळ किणकीणाट कानी येतो. मग तो वाफाळता कप किंवा गिलास कलीजा  खलास करून जातो.   चहा समोर आल्यावर तुम्ही आधी नजरेने चहा पिता आणि मग जिभेनं. पहिल्याच घोटात ओठ आणि जीभ किंचित पोळायला हवी!  चहा बशीत ओतून, फुंकून, फुंकून, फुंकून, गार करून पिणं म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून शहाण्णवाव्या वर्षी संभोग करण्यासारखं आहे! चहा गरम नाही प्यायचा म्हणजे काय? तोंड भाजतं म्हणे.  भाजलं तर भाजू देत. काही वेदना या सुखकर असतात हे या वया तरी   तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
एकदा चहाचे तुम्ही रसिक चहाते बनलात की  मग तुम्हाला, 'घाईचा  चहा लागणं' म्हणजे काय हे कळेल, आणि नुसतंच "अहा" वर कटवणाऱ्या मित्राबद्दल मला एवढा राग का तेही कळेल.
बाकी या चहाची खुमारी काही औरच आहे. अगदी तस्साच केलेला चहा स्थलकालप्रसंगानुरूप वेगवेगळा लागतो हे मी अनुभवलं  आहे.
सकाळच्या पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्राच्या कागदाचा वास हवा. शिवाय रविवार असेल तर चांगली जाडजूड पुरवणी हवी. या शिवाय त्या चहाला पूर्तता नाही. संध्याकाळच्या चहाआधी चांगली लांबलचक जबडाफाड जांभई हवी आणि आळोखेपिळोखे देत संपूर्ण शरीरावर्तनी आळस हवा.  पावसाळ्यात जर तुम्ही चहा पिणार असाल तर पाऊस धुवांधार बरसत असताना प्या. उगाच नळ गळावा तसा पाऊस गळत असेल तर ती चहाची वेळच नाही.  धुवांधार पावसाबरोबर थंडी आणि धुकं असेल तर मग चहा प्यायल्यावर आभाळ ठेंगणं होतं. थंडीतही चहाची खास वेळ आहे. हात पाय चांगले गार पडले, की  मग चहाकडे वळावं चहाच्याच कपानं  हात शेकत शेकत चहा प्यावा. थंडीत चहा कपानं पिता चांगले मोठे मग घ्यावेत. उन्हाळ्यात मात्र चहा थोडा थोडा आणि बऱ्याचदा प्यावा. अगदी बोळक्यानं किंवा बोडल्यानं चहा प्यायलाही हरकत नाही.असा तीर्थासारखा वारंवार घेतलेला चहा उन्हाळ्यात शीतकारक असतो, असे चरकमुनी (जर चहा पीत असते तर) म्हणाले असते. अर्थात पट्टीचे चहाबाज असतात त्यांना चहा कोणत्याही वेळी वर्ज्य नसतो. फक्त काही वेळा तो अधिक प्रिय असतो एवढंच. सवाष्ण बायका जसं कुंकवाला नाही म्हणत नाहीत तसं हे कधी चहाला नाही म्हणत नाहीत.  
 शिवाय चहात्यांचे जेवढे रंगढंग तेवढेच चहाचेसुद्धा. साधा चहा, स्पेशल चहा, ‘पेशल’ चहा, कटींग, मारामारी असे अनेक प्रकार.  शुद्ध दुधाचा चहा आहे, बिनदुधाचा चहा आहे, साखरेचा आहे, बिन साखरेचा आहे, गुळाचा आहे. कसले कसले मसाले घातलेला चहा आहे  इतकंच काय  मुळात दुसरीच  कुठली तरी  ‘कीस झाड की पत्ती’  घातलेला, असा बिनचहापत्तीचाही  चहा आहे.   गोरा, काळा, हिरवा असा विविधरंगी आहे.  खारट, आंबट, तिखट, तुरट  अशा अनवट चवीचा आहे.  करपलेला, धुरकटलेला अशा नकोशा वासाचा आहे. शंभर पासून शून्यापर्यंत वेगवेगळ्या तापमानचा चहा आहे. त्यामुळे   ओट्यावरून टेबलावर येईपर्यंत  ‘गार झाला’ म्हणणारे आहेत. ‘आता तोंडात गाळू का?’ विचारणारे आहेत आणि बर्फयुक्त, थंडगार चहा घुटकणारेही आहेत. बर्फ घालून चहाचं लाल पाणी पिणाऱ्या व्यक्ती बहुधा स्त्रिया असतात. त्या तोकडे कपडे घालून पोहण्याच्या तलावाजवळ किंवा समुद्रकाठी बसून हे कृत्य करतात आणि त्यांच्या चहाच्या ग्लासात नळी  आणि ग्लासच्या कडेवर लिंबाचा काप खोचलेला असतो; एवढेच मला ठाऊक आहे.
बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर येणारा थरथरता चहा आहे, किटलीतून गिलासात झेपावणारा हापिसातला ‘च्या’ आहे, ‘वामांगी कॉफीबाई दिसे दिव्य शोभा’, असा  रेल्वेतला ‘च्याय ग्रेम’ आहे, नेमकं या द्रावणात आहे तरी काय असा  बुचकळ्यात पाडणारा पंचतारांकित ‘टी’ आहे, मैत्रिणीबरोबरचा पहिलावाहिला,  नवथर, मितभाषी,  चहा आहे आणि मित्रांच्या मैफिलीतला चहाटळ चहा आहे. शिवाय या सर्वांहुनी निराळा असा इराण्याचा चहा आहे. घोटभर चहा बरोबर इराण्याकडे पोटभर गप्पा फ्री मिळतात.      
अमृततुल्य चहा ही  मात्र वेगळीच संस्था आहे. मराठी भाषा आणि इये मराठीचीये  नगरीतील चहा वगळता दुसऱ्या कशाची अमृताशी तुलना झाल्याचं मला आठवत नाही. बाकी अमृत नावाचं एक अंजन आणि अमृत नावाची एक दारू मात्र आहे.    स्वर्गातही सध्या 'चहातुल्य अमृत मिळेल' अशा पाट्या आहेत म्हणे! तो अल्युमिनियमचा चबुतरा, ती  शेगडी, पैशाच्या ड्रॉव्हरवर बसलेला पायजमा आणि  बनियन घातलेला चहाकर्ता; त्याच्यामागे  असंख्य देवांच्या तसबिरी आणि "मैने उधार में बेचा", "गीता-सार" वगैरेचे स्टिकर, पाण्याच्या ग्लासात, तरंगत, तेवणारी ज्योत,  हे सारं प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं असतंच. शिवाय गिर्हाइकांसाठी 'प्रभात' आणि 'संध्यानंद' घेणंही यांना कायद्यानं बंधनकारक असावं. चहाकर्ता स्वतः पेपर कधीच वाचत नाही. चहा करण्यात तो अगदी गढलेला असतो. आधीच्या गिऱ्हाईकाचे पैसेही तो निव्वळ  कर्तव्यभावनेनं घेतो. चहा पकवण्यात जे सुख आहे ते चहा खपवण्यात नाही, हे त्याला  उमजलेलं असतं.   इकडे आधण आलेले आहे आणि त्यानं त्यात चहा पावडर टाकलीसुद्धा. आता चहा उतू जायच्या आत मघाशीच खलून ठेवलेला मसाला तो किती चापल्यानं  घालतो ते  पहा. त्याच्या  हालचालीत एखाद्या सर्जनचा आत्मविश्वास आहे. ते पहा, चहा ऊतू जातोय म्हटल्यावर त्यानं ओगराळं  पातेल्यात फिरवून चहा ढवळला सुद्धा. हाच तो क्षण जेंव्हा शेजारच्या पातेल्यातलं गरम दूध बरोब्बर मापानं चहात पडणार आहे, जादूगाराने छू मंतर करावे  तसं पुनः ओगराळं फिरणार आहे आणि ते मंतरलेलं पाणी सिद्ध होणार आहे.  इकडे किटल्या आणि त्यावर फडकी तयार आहेत. आता तो चहा गाळला आणि फडका चिमटयाने पिळला की बस्स. अशा तामसतीर्थाचा अमृतानुभव ज्यानं घेतला नाही तो चहाबाजच  नाही.
 काही मंडळी निव्वळ चहा पिण्याऐवजी त्यात काही ना काही बुचकळून बुचकळून खातात. हेही निषिद्ध समजायला हवं. खारी, मारी, केक, पोळी, क्रीमरोल वगैरे चहाच्या चवीला मारक आहेत. तुम्ही हे सारं आधी खा आणि वर नुसता चहा प्या. पण  वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दोन्ही एकदम करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मात्र या शिफारसीला एक अपवाद आहे. पहाटेपासूनची ड्यूटी असावी, श्वास घ्यायलाही उसंत नसावी, नाष्टा,  जेवणाचे मुळी  भानच नसावे. पोटातले कावळे देखील उपाशी ओरडून ओरडून  गप्प झालेले असावेत.  मग कधीतरी, उतरत्या कातरवेळी जरा वेळ मिळावा. तहान, भूक, थकवा याची एकत्रित जाणीव व्हावी.   अशावेळी झक्कपैकी कपभर चहा आणि ग्लुकोज बिस्किटांचा अख्खा पुडा  घेऊन बसावे. मांडी ठोकावी. आपोआप पाय चेपले गेल्यानेच ते दुखत होते याची जाणीव व्हावी.  आता  चार बिस्किटे घेऊन  एकाच वेळी चहात बुडवावीत आणि चारीही एकदम खावीत. कषायपेयपात्रपतित बिस्किटाचा तुकडाही मखमाली चिमटीने तोंडात टाकावा.   डोळे मिटावेत.  जीभ आणि टाळूमध्ये तो लगदा अलगद  दाबावा. मोक्ष मिळेल.
चहा हे फार महत्वाचं पेय आहे. त्याचा आदर करा. चहा आणि पोहे घेता लोकांची लग्नं  कशी ठरली असती? चहा नसता तर किरिस्तावांच्या घरी चहा आणि भिस्कुटे खाण्याबद्दल लोकमान्यांना माफी मागावी लागली नसती. चहा नसता तर   फिल्मवाल्यांना  सगळी चहाच्या मळ्यातली गाणी उसाच्या मळ्यात चित्रित करावी लागली असती. चहा नसता तर  सरकारी सेवकांनी चहापाण्यासाठी चिरीमिरी कशी बरं मागितली असती? चहा नसता तर लांबून नुसतं बोट वर करताच कँटीनवाल्यानं आपल्याला काय आणून दिलं असतं बरं?  जाऊ दे. नकोच ते.  बिनचहाच्या जगाची कल्पनाही करवत नाही.
कुणीतरी म्हंटलंच आहे                                                 
आहे चहा तंवर प्या चहा,                                                 नाही चहा तर नुसत अहा,                                                 हा हा हा; हा हा हा!!!
(शेवटचं हा हा हा हे हास्य माझे आहे. ही फालतू कविता वाचण्याबद्दल मी तुम्हाला हसतोय.) 



No comments:

Post a Comment