Friday, 27 March 2020

उरोनलिका

स्थेथोस्कोप 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

स्थेथोस्कोप (उरोनलिका)! काय तर निव्वळ पोकळ रबरी नळी. एका टोकाला एक डबी आणि दुसरीकडे कानात अडकवायला दोन बोंडं. किती सोपी आयडिया आहे. पण ही एवढी गोष्ट मान्य होण्यापूर्वी केवढे तरी वादंग माजले होते. १८१९ वर्ष होतं ते... 

याच वर्षी रेने थिओकाईल लेनेक या तरुण फ्रेंच डॉक्टरने  'मिडिएट ऑस्कल्टेशन' हा ग्रंथ प्रकाशित केला. कित्येक वर्षांच्या खडतर अभ्यासानंतर त्यानं हा ग्रंथ सिद्ध केला होता. उरोनलिकेतून ऐकू येणाऱ्या आवाजाचं आणि छातीतील रोगांचं नातं त्यानं उलगडून दाखवलं होत. 
 पेशंट जे म्हणेल ते ऐकण्याच्या कलेला डॉक्टरी व्यवसायात अनन्यसाधारण  महत्व आहे. त्या काळी तर निव्वळ पेशंटच्या 'स्टोरी'वर सारं  काही अवलंबून होतं. फार फार तर पेशंटच्या शरीरावर हात फिरवून पोट वगैरे चाचपून पाहिलं जाई. लेनेकाच्या उरोनलिकेमुळे तपासणीच्या तंत्रात भलतीच क्रांती झाली.

पेशंटच्या  उराला आणि उदराला कान लावून आतील आवाज शांतपणे ऐकण्याची कल्पना काही नवीन नव्हती. पाश्चिमात्य वैद्यकीचे पितामह हिप्पोक्रेटेस यांनीही  याचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात, ‘छातीतून उकळत्या व्हिनेगारसारखा आवाज येत असेल तर छातीत पू नसून पाणी झाले आहे हे जाणावे!’ विल्यम हार्वे ('रक्ताभिसरण' फेम) आणि   १८ व्या शतकातील अनेक डॉक्टरांनी पेशंटच्या निव्वळ पुढ्यात उभे राहून हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकल्याचं लिहिलं आहे. (काही रोगात असं खरंच घडतं.) रॉबर्ट हूकने तर असंही म्हटलं, की ‘हे आतले आवाज आपल्याला रोगाबद्दल निश्चित मार्गदर्शन करू शकतील, पण यासाठी आपली श्रवणशक्ती तरी वाढविली पाहिजे किंवा अवयवांचा आवाज तरी!’ पण या कल्पनांचा आणि निरीक्षणांचा लेनेकसारखा पाठपुरावा कोणीच केला नाही.

लेनेकलादेखील अपघातानेच ही उरोनलिकेची कल्पना सुचली. त्या काळच्या प्रथेप्रमाणे लेनेकही छातीला कान  लावून आजाराचा कानोसा घ्यायचा. एके दिवशी कसलासा अगम्य हृदरोग जडलेली एक यौवना त्याच्याकडे आली. हीची तब्बेत नाजूक, पण आकार साजूक असल्यामुळे लेनेकची भलतीच पंचाईत झाली. निदानाच्या साऱ्या सभ्य पद्धती निरूपयोगी ठरल्याने शेवटी छातीला कान लावण्याची वेळ आली. स्त्रीदाक्षिण्यामुळे लेनेकने कागदाची चांगली जाड आणि घट्ट फुंकणी बनविली आणि तिचं एक टोक पेशंटच्या छातीवर आणि दुसरं आपल्या कानाला लावून तो हृदयाची धडधड ऐकू लागला! या फुंकणीमुळे त्याला सारे आवाज, अगदी सुस्पष्टपणे आणि सभ्यपणे ऐकता आले. बऱ्याच प्रयोगानंतर लेनेकने लाकडाची फुटभर फुंकणी वापरायला सुरुवात केली. आपल्या प्रत्येक निरीक्षणाची तो काळजीपूर्वक नोंद ठेऊ लागला. हळू हळू आवाजाचे प्रकार आणि संबंधित विकार यांचं कोष्टक त्याच्या मनात तयार होऊ लागलं. कधी शवविच्छिेदनाची संधी मिळताच त्याला आपले निष्कर्ष ताडून पाहता येत होते. त्याच्या सूक्ष्म निरीक्षणाला आता प्रत्यक्ष पुराव्याची जोड मिळाल्याने त्याचे निष्कर्ष उपयुक्त  ठरू लागले. 

या यशाने तो हरखून गेला. उरोनलिकेच्या साहाय्याने केलेल्या उरोश्रवणाचे निष्कर्ष त्याने हिरीरीने मांडायला सुरुवात केली.  पेशंटच्या तक्रारी, डॉक्टरांनी डोळ्याने पाहिलेले काही,  स्पर्शाने जाणलेले काही आणि टिचक्या मारून केलेली तपासणी अशा तपासणीच्या तीन पारंपरिक पायऱ्या होत्या. या तिन्हींतील त्रुटीही त्याने दाखवून दिल्या. 
पोटाला/छातीला टिचकी मारून किंवा टकटक करून, त्या आवाजावरून आतल्या पाण्याची पातळी पहिली जात असे. (अर्धवट भरलेल्या बाटलीला बाहेरून टिचक्या मारून तुम्ही पाण्याची पातळी ओळखू शकता. करून पहा.)

मुळातच श्वसनसंस्थेच्या आजारात तक्रारींचे प्रकार  फारच कमी आढळतात. आजार कोणताही असला तरी पेशंट खोकला, बेडका आणि धाप याच तक्रारी घेऊन येतात. आता एवढ्यावरून निदान काय करणार कप्पाळ! स्पर्शानेही फारशी माहिती मिळत नसे.  टकटक करून काही धागेदोरे हाती येत, पण पेशंट जाड असेल तर याचा फारसा उपयोग नव्हता. शिवाय छातीच्या आजारी बाजूकडील टकटक निरोगी बाजूशी ताडून पहिली जाई; यामुळे दोन्ही फुफुसात आजार असेल तर पंचाईत होत असे. तपासणीने छातीत द्रव पदार्थ असल्याचं कळत असे, पण हा द्रव म्हणजे पाणी आहे का  पू हे समजत नसे.  हृदयरोगाबाबतीतही टकटक करून खूप अपुरी माहिती आणि तीही  खूप उशिरा मिळे. शिवाय असं ठोकून ठोकून तपासणं हे डॉक्टरला आणि पेशंटला फारसं  सुखावह नसे. याबद्दल लेनेकने अत्यंत कडवट मत व्यक्त केलं आहे. नाडीपरीक्षेचंही काहीसं  स्तोम होतं  पण त्यानेही फारशी विश्वसनीय माहिती मिळत नाही, असं लेनेकच म्हणणं. त्यामुळे ऐकण्याने काही उजेड पडेल अशी आशा होती. पेशंटच्या शरीराला थेट कान लावण्यातील अडचणी तर उघडच होत्या. म्हणून उरोनलिका. 
वरील प्रत्येक पद्धतीतील त्रुटी लेनेकने  अचूकपणे दाखविल्या असल्या तरी यातील कोणतीही पद्धत त्यानं बाद  केली नाही. उलट या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती आणि आपली 'उरोनलिकेने तपासणी' यांची सांगड घालून अधिक नेमके निदान होऊ शकते, असा त्याचा आग्रह.

स्थेथोस्कोप अवतरला आणि 'श्रवणतपासचं' नवं  युग सुरु झालं. स्थेथोस्कोपच्या या यशाला अनेक कारणं  होती. लेनेकची अचूक आणि आग्रही मांडणी हे प्रमुख कारण. शिकायला सोप्या आणि रोगाची फुफ्फुसातील नेमकी जागा सुचविणाऱ्या या पद्धतीत डॉक्टरांना रोगी फारसा ‘हाताळावा’ही लागत नसे. आजार आणि डॉक्टरांमध्ये उरोश्रवणाने जणू निःशब्ध संवाद सुरु झाला! आजवरच्या वैद्यकीय लिखाणात पेशंटच्या शब्दबंबाळ वर्णनाला बिनीचे स्थान होते, ते आता डॉक्टरांच्या  तपासणीच्या निष्कर्षाला मिळू लागले. 

सुरवातीला या उरोनलिकेबाबत आणि उरोश्रवणाबाबत भरपूर वादविवाद झाले. या भांडणांतील अनेक मुद्दे आज आपल्याला हास्यास्पद वाटतात. पण उपलब्ध ज्ञानाच्या आणि शास्त्रविचाराच्या मर्यादा लक्षात घेतल्या, की ही सारी चर्चा मोठी रोचक होऊन जाते. 

लेनेकवाद्यांचं  म्हणणं असं, की  प्रत्यक्ष तपासणी ही पेशंटचे निरूपण  आणि तुमच्या  निरीक्षणापेक्षा सरस होय. 'श्वसनाच्या रोगात उरोश्रवण जणू ध्रुवताऱ्यासारखे मार्गदर्शक ठरते.’  यासाठी लेनेकनं उरोश्रवणातील अनेक ठोकताळे पेश केले. उदा:  'उरोनलिकेतून पेशंटची कुजबूजही जर सुस्पष्टपणे ऐकू आली तर फुफ्फुसाच्या त्या भागात (टी.बी.मुळे?) एखादी गुहा तयार झाली असल्याचे जाणावे.’ लेनेकवाद्यांनी आपलं म्हणणं अगदी प्रयोगशाळेतही सिद्ध करून दाखविलं. केवळ या शोधामुळे 'श्वसनाचे आजार' नावाचा गुंता आता उलगडला जात होता. समान लक्षणे असलेल्या पेशन्टमध्येही भिन्न रोग असल्याचं उरोश्रवणानं दाखवून दिलं. पेशंटचे सांगणे कधी पूर्वगृहदूषित असु शकते, पण आता उरोनलिकेमुळे पेशंटच्या 'स्टोरी'ची सत्यता पडताळून पाहता येत होती.

यावर विरुद्ध बाजूची प्रतिक्रिया अगदी मासलेवाईक होती. उरोनलिकेचे फायदे अगदी उघड असूनही कित्येक बुजुर्ग वाळूत मान खुपसून बसले होते! एकदा उरोनलिकेचं श्रेष्ठत्व स्वीकारलं की पारंपरिक पद्धती शिकण्याच्या तपश्चर्येवर पाणी फिरवल्यासारखं झालं असतं. इतक्या वर्षांची सवय सोडून पुन्हा विद्यार्थीदशा कुणाला आवडेल? काहींना हे नवं तंत्र आपल्याला झेपणार नाही, ही भीती होती. श्रवणदोष असलेल्या डॉक्टरांनी तर  या उरोणश्रवणाला आवाजी विरोध केला.

उरोश्रवणानं झटपट निदान शक्य होत होतं. पण हाच उरोश्रवणाचा मोठा दोष आहे, असं विरोधकांचं म्हणणं! निदान झालं तरी बहुतेक रोग 'असाध्य' असल्यामुळे लवकर अथवा उशिरा निदान होण्यानं काय फरक पडणार? यावर उरोश्रवणवाल्यांचं म्हणणं असं, की लवकर निदान झाल्यानं काहीतरी उपचार शक्य असतात आणि जरी रोग असाध्य असल्याचं समजलं, तरीही हे उपयोगीच आहे. पेशंटला निरवानिरव करण्याची तेवढीच संधी!
पण कटू सत्याचा हा झटपट मारा प्रसंगी डॉक्टरांनाच असह्य व्हायचा. एका तरुण डॉक्टरांनी आपल्या डॉ. तीर्थरुपांना लिहिलं आहे, ‘उरोश्रवण मोठी विदारक चीज आहे! नव्यानंच सिद्ध झालेल्या या ठोकताळ्यांमुळे आमच्या कुशंकांना लगेच उत्तर मिळू लागलंय. आधी खोटी का होईना, आशा असायची. आता मात्र निदान झालं की हातावर हात ठेऊन बसावं लागतं!’

मात्र उरोश्रवणाला खरा धोका उरोश्रवणाच्या काही अतिउत्साही पुरस्कर्त्यांमुळेच होता. यांचे उरोश्रवणाबाबतचे ग्रंथ म्हणजे जणू उरोनलिकेची स्तुतिस्तोत्रच. उत्साहाच्या भरात त्यांनी या फुंकणीला नको नको  ते गुण चिकटवले. 

प्रो. डॉ. ऑलिव्हर होम्सने तर यावर चक्क एक विनोदी कविता रचली होती. एका  नवशिक्या उरोनलिकावाल्याचा उत्साह त्याच्याच कसा अंगाशी येतो याचा किस्सा यात वर्णिलेला आहे.  पेश आहे त्याचा हा (अगदी) स्वैर अनुवाद.
    
तरुण कोणी अमेरिकी; 
आला हिंडून पॅरिस नगरी;
सोबत आणिली  नळी वेगळी; 
उरोनलिका II१II
नलिकेमध्ये शिरला कोळी; 
कोळ्याने त्या विणली जाळी;
जाळीत अडके  माशी काळी; 
आणि एक पिसू II२II
सुटण्याच्या मग तऱ्हा नाना; 
दोघी मारीत सुटल्या ताना;
पण आले देवाजीच्या मना; 
तेथे कोणाचे चालेना II३II
मारण्यास मग फुशारकी; 
सरसावली नलिका एकेदिशी;
तरुण तपासू लागे कोणी; 
जख्ख म्हातारी II४II
उरोनलिका लावता त्यानी; 
येती काही ताना कानी;
म्हणे, ‘वाटते महारोहिणी*; 
फुगली आहे’ II५II
ऐकता ही निदानवाणी;
पंचक्रोशी धावून येई;
जो तो उरोनलिका लावी;
म्हातारीला II६II
वैतागून तपासणीला; 
म्हातारीने देह ठेविला;
पण तरीही नाही जाहला;
उत्साहभंग  II७II
पुढे सहा आल्या नारी;
प्रत्येकीची तऱ्हाच न्यारी;
हा उरोनलिका सरसावी;
तपासले सर्वां II८II
पुन्हा ऐकू येई काही;
पिसू-माशी यांची लढाई;
हा मात्र सांगून देई; 
‘व्याधी असाध्य’ II९II
ऐकता ही निदानवाणी;
मोडून पडल्या सहाही जणी;
रडू लागल्या तार सप्तकी;
हलकल्लोळ माजला II१०II
पाहोनी यांचे रडे; 
सहा तरुण झाले वेडे;
म्हणती 'रडू नका गडे'; 
आमची शपथ II११II
प्रत्येकीला मिळता मित्र; 
घडे काहीसे विचित्र;
व्याधी नाहीच ऐसे चित्र; 
दिसो लागले II१२II
उरोनलिकावाला डॉक्टर; 
अखेर आवरून गेला दप्तर;
आता  लोंबे  त्याचे लक्तर;
वेशीवरी II१३II
कान उघडा, उघडा डोळे;
नाहीतर कोळी विणील जाळे;
माशांचे अन पिसवांचे चाळे;
बालंट तुम्हावर II१४II
(*शरीरातील सगळ्यात मोठी रक्तवाहिनी)

थोडक्यात,  या नव्या उरोनलिकेने साऱ्या दवाखान्यातून नुसती धमाल उडवून दिली. काही पेशंट डॉक्टरने उरोनलिका परजताच पळून जायचे. डॉक्टरच्या हातात हे शस्त्र पाहून आता शस्त्रक्रियाच होणार असल्याचा समज व्हायचा. स्थेथोस्कोपवाला डॉक्टर हा कितीही म्हंटलं तरी 'हत्यारबंद' डॉक्टर! आणि हत्यारे वापरणं हे त्या काळी डॉक्टरांचं काम नव्हतं! हे नीचकर्म  हलकट 'सर्जन'च करू जाणे. स्थेथोस्कोप  वापरला तर आपण नाहक 'सर्जन' समजले जाऊ अशी भीती डॉक्टरांनाही होती.

या साऱ्या वादविवादाच्या आणि लोकापवादाच्या अग्निपरीक्षेतून स्थेथोस्कोप तावूनसुलाखून बाहेर पडला आणि त्याच्या आजच्या स्थानावर दाखल झाला. वितंडवाद संपल्यावर त्याची शास्त्रीय मीमांसा सुरु झाली. स्थेथोस्कोपमध्ये अंगभूत विशेष गुण असे नाहीत. स्थेथोस्कोप म्हणजे केवळ तुमच्या कानापर्यंत आवाज पोहोचवणारी पोकळ नळी.  योग्य निदान हे नळीमुळे होत नसून, नळी वापरणाऱ्यामुळे होत असतं. स्थेथोस्कोप सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दोन कानगुंड्यांच्या मधला भाग होय! म्हणजे डॉक्टरचे डोके!! 
छपाईमुळे माणूस जसा पुस्तकांबरोबर एकांत भोगू लागला, तसंच काहीस स्थेथोस्कोपमुळे झालं. क्षणभर साऱ्या जगापासून तुटून एकाग्रचित्तानं पेशंट तपासता येऊ लागला. आजारात, पेशंटनं आणि नातेवाईकांनी भरलेले पूर्वग्रह स्थेथोस्कोपमुळे नाहीसे झाले. पेशंटच्या शरीरातून अनाहूतपणे येणाऱ्या या पूर्वग्रहविरहित नादाशी सुरु झालेला हा निःशब्द संवाद डॉक्टरांना खूप काही शिकवून गेला.

श्रवणशास्त्राप्रमाणे उरोनलिकेनेही काळानुरुप रूप बदलले. बऱ्याच बदलानंतर सध्याच्या रूपातील उरोनलिका उदयास आली. होता होता ही उरोनलिका डॉक्टरांच्या गळ्यातील ताईत बनली. डॉक्टरी व्यवसायाचं चिन्ह म्हणून स्वीकारली गेली. खरं तर महातज्ञांच्या या युगात स्थेथोस्कोप वापरणारे डॉक्टर तसे कमीच! कित्येक डॉक्टरांनी तर वर्षानुवर्षे ‘स्थेथो’ (स्थेथोस्कोपचे  लाडके नाव) हातातही धरलेला नसतो. जेनेटिक्सवाले, त्वचातज्ञ, पॅथोलोजीस्ट असे कितीतरी.   पण तरीही स्थेथो काही डॉक्टरांची मानगुट सोडायला तयार  नाही. जाहिराती असोत की  नाटक-शिणुमा; कुणालाही पांढरा डगला  घालून हाती 'स्थेथो' दिला की  झालं डॉक्टरचं सोंग तयार! खरं तर स्थेथोस्कोपनंतर कितीतरी शोध लागले. वैद्यकीत केवढी तरी उलथापालथ झाली. पण तरीही लेनेकची ही फुंकणी डॉक्टरांचे कान  फुंकतेच आहे. पेशंटच्या रोगाबद्दल चहाड्या सांगतेच आहे. सांगतेच आहे..!

No comments:

Post a Comment