Saturday, 4 April 2020

अमल्या


अमल्या
डॉ. शंतनू अभ्यंकर

तुमच्याशी कोणतेही साम्य नसलेला असा कोणी मित्र आहे तुमचा? माझा आहे. अमल्या त्याचं  नाव. म्हणजे अर्थात नाव अमोल आहे पण आता मित्र म्हटल्यावर अमल्या! कुठल्याशा नाटकाच्या प्रॅक्टिसला हे  तरतरीत, तरणंताठं,  पोरगं  आलं; रंगमंचावर काही फार उजेड पडला नाही त्याचा, पण दोस्ती होऊन गेली. ती अगदी घट्ट झाली ती त्याच्या हॉटेलातल्या  मिसळीचा पहिला  घास घेतला तेंव्हा. दीर्घकाळ जिभेवर  रेंगळणारी चव आणि  व्यसन लागेल असा झटका.  मिसळ कसली अंमली पदार्थच तो. मिसळही अंमली आणि अमल्याही अंमली. सक्काळच्या पहिल्याच गिऱ्हाइकाला फडका मारून बसायचा इशारा करता करता अमल्या म्हणणार, ‘जरा गाडीची किल्ली द्या  की, कोपऱ्यावर जाऊन पाव घेऊन आलोच.’ हे गिऱ्हाइक म्हणजे अमल्याचाच कोणी मित्र असणार. पाव,  फरसाण,  कांदा,   चहा पावडर, दूध  अशा याच्या फेऱ्या चालू. अमल्याला गाड्यांचा तोटा  नाही. सगळ्या जगाशी याची मैत्री. तशी ती माझ्याशीही झाली.  का झाली, का टिकली, हे आता फारसं आठवतही नाही.   
मी  कुठेही परगावी  जाणार असलो, मग ते  भाषणाला  असो वा  ऑपरेशनला, बरोबर अमल्या हवाच. रोज संध्याकाळी निवांत कॉफी प्यायला सोबत अमल्या हवाच. नवीन हॉटेल ट्राय करायला किंवा नुसत्याच चकाट्या पिटायला बरोबर अमल्या हवाच.
तो माझ्यापेक्षा वयानी खूप लहान आहे.   मी पदव्युत्तर पदवी प्राप्त आणि काय काय; हा दहावी नापास. लक्ष्मी आणि सरस्वतीचा माझ्यावर वरदहस्त तर  या सवतींनी अमल्याला सावत्रपणाची वागणूक दिलेली. दोघीही  अमल्याघरी रिक्तहस्ते पोहोचलेल्या. मी दिवसरात्र दवाखान्यात. हा आठच्या ठोक्याला उठणार आणी कसंबसं नऊला हॉटेल उघडणार.  जेमतेम दोन तीन  तासात ह्याची मिसळ संपणार मग ‘मिसळ  संपली’ अशी पाटी, हार घालून लावणार आणि दुकानाच्या फळ्या लावून आत  अमल्या डाराडूर. 
अमल्या म्हणजे भारी काम. हॉटेलचं  नाव ‘मिसळ सम्राट’, त्यामुळे अमल्या अर्थात प्रिन्स. त्यातून पूर्वी कधीतरी घराण्यात सरदारकी होती म्हणे. त्यामुळे रक्तात सळसळ फार.   पण प्रिन्स साहेबांच्या हॉटेलात प्रिन्सच मालक, प्रिन्सच पोऱ्या, प्रिन्सच वेटर आणि प्रिन्सच स्वयंपाकी. गिऱ्हाइक आलं की टेबल पुसत बनियन-बरम्युडाधारी, प्रिन्स विचारणार,
‘काय पाहिजे साहेब?’
‘काय काय आहे?’
हा प्रश्न गैरलागू आहे, हे नेहमीच्या गिऱ्हाईकांना माहीत आहे. पण साहेब नवीन.
हा, ‘आजचे ताजे पदार्थ’ लिहिलेल्या गंजक्या बोर्डाकडे  बोट दाखवणार. आपणच उत्तर देणं, अमल्याच्या खानदानी शिष्टाचारात बसत नाही. शिवाय मिसळीच्या तर्रीचा घमघमाट आसमंतात भरून  असताना, असला प्रश्नच बावळट आहे, असं अमल्याचं ठाम मत आहे.  बोर्डावर  चहा, कॉफीपासून सुरु होणारी यादी, शेव, चिवडा, फरसाण,  मिसळ, ब. वडा च., ब. वडा सां., मे. वडा च., मे. वडा सां., सा. वडा च.,  अशी वळणे घेत घेत  पेढे, बुं. लाडू, बे. लाडू, र. लाडू करत  डिं.  लाडूला संपणार. हॉटेल, त्याची अवस्था; अमल्या, त्याची अवस्था;  काउंटरवरच्या बरण्यातील अनुपस्थित पदार्थ आणि जे हजर असतील त्यांची अवस्था बघता गिऱ्हाइक अर्थात मिसळच निवडणार. माझ्यासारखा चौकस बुद्धीचा कुणी विचारणार,
‘अमल्या, फक्त मिसळ सोडता तुझ्याकडे जर काही नाहीच्चे तर  एवढी लांबलचक पाटी कशाला?’
अमल्याच्या थिअरीप्रमाणे, हॉटेल आणि पाटी दोन्ही वडीलोपार्जित आहे. त्यामुळे त्यात बदल अशक्य.  शिवाय जरी फक्त मिसळच मिळत असली तरी गिऱ्हाइकाला इतके सारे पदार्थ ‘न निवडण्याचे सुख’ मिळत असतं. आपण आपल्याला जे हवे ते  खाल्ले, हा भाव महत्वाचा. जोपर्यंत तुम्ही मिसळीशिवाय दुसरे काही मागत नाही तोपर्यंत तुम्हाला निवडीचे भरपूर स्वातंत्र्य आहे! हेन्री फोर्ड तरी दुसरं काय म्हणाला होता म्हणा? ‘जोपर्यन्त गिऱ्हाइकाला काळी  गाडी हवी आहे तोपर्यंत  त्याने कोणताही रंग निवडावा.’
आमल्याच्या हॉटेलात सतत एकपात्री प्रयोग चालू आसतो. खणखणीत आवाजात अमल्या विचारणार,
‘काय पाहिजे साहेब?’
मग साहेब म्हणणार, ‘दोन मिसळ’.   
मग हा आत बघत ओरडणार, ‘ए दोन मिसळ भर  सायबांना, कांदा बारीक, तर्री अलग, लिंबू दोन फाकया दे  रे, आणि सायबांना पाव साईडचा देऊ नको.’
मग स्वतःच पार्टिशनआड जाऊन दोन मिसळ भरणार, कांदा  बारीक टाकणार, तर्री वेगळी घेणार, लिंबू दोन फाकया आणि पाव घेणार आणि सायबापुढे ठेवणार. इतक्यात आधीच्या गिऱ्हाइकाचं बिल घ्यायची वेळ झालेली असणार. मग तिथूनच अमल्या ओरडणार, ‘दोन आदमी, पंच्याहत्तर घे रे, त्यांच्या पिच्छू तीन आदमी, एकशे तेवीस घ्यायचे.’ मग स्वतःच जाऊन पैसे घेऊन सायबाकडे गोड हसत, ‘काय साहेब, आवडली ना मिसळ?’, अशी सलगी साधत अमल्या एकशे तेवीसवाल्यांकडे वळणार.
आपली पसंद इतकी ओळखून असणारा टपरीवाला बघून सायबांना भरून  येतं. त्यांना  वाटतं की आपली ही खास खातीरदारी आहे. पण अमल्याला ओळखून असणाऱ्या आम्हां  मित्रांना यातली मेख ठाऊक आहे. मुळात अमल्याकडे कांदा बारीकच चिरलेला असतो, तर्री अलगच दिली जाते, तो तिखट जाळ  रस्सा असा काही भाजतो की  दोन फाकया लिंबू तरी लागतेच लागते.  आणि पावाचे म्हणाल तर  साइडचे पाव अमल्यांनी आधीच बाजूला ठेवलेले असतात, ब्रम्हयोगिनीला   द्यायला. ब्रम्हयोगिनी ही अमल्याची कुत्री आहे. कोणी कितीही  हाड्  केलं तरी ही उलटून भू सुद्धा करत नाही. सदैव मौन व्रत असल्याने अमल्याने तिचं नाव ब्रम्हयोगिनी ठेवलं आहे.  इतकी मितभाषी कुत्री मी तरी  कधीच पहिली नाहीये. ह्यानी ब्रम्हयोगिनीला पाळली बिळली नाहीये.  तिनीच स्वतःला पाळून घेतलं आहे. ती  आपली तिथे असते. अमल्या देईल ते मुकाट  खाते.  त्याच्याच पायाशी बसते. सतत तिच्या चेहऱ्यावर  ‘चिंता करिते विश्वाची’ असे भाव असतात. अमल्याच्या चेहऱ्यावर बरोब्बर विरुद्ध;  ‘विश्व चिंता करी माझी!’ 
हे मात्र अगदी खरं आहे. अमल्याला कशाशीच पडलेली नसते.  वयाचा फायदा घेत मी  अमल्याला आणखी पैसे मिळवण्याचे, हॉटेल सुधारण्याचे,  मार्ग सुचवत असतो. पदार्थ वाढव, जास्त वेळ हॉटेल उघड, बशा, चमचे नवीन आण, बेसिन बांधून घे, वेटर ठेव, अशा  कित्येक क्रांतिकारी कल्पना. पण इतक्या वर्षात अमल्यानी यातील एकही अंमलात आणलेली नाही.  आपलं  इतकं उत्तम चाललेलं असताना हा आपला सन्मित्र इतक्या वेडगळ आणि आत्मघातकी कल्पना का सुचवतोय? असा त्याचा रिस्पॉन्स असतो.
या गल्लीपासून त्या गल्लीपर्यंत   असा अमल्याचा वडीलोपार्जित वाडा, मागे आड, चिंचेचं झाड आणि रस्त्यापर्यंत जाणारी अडनेडी वाट. ह्या चिंचेखाली आमल्याच्या हॉटेलचं खोपट. रस्त्यावरून आत हॉटेल असल्याचा कसलाही सुगावा लागत नाही. रस्त्यापासून हॉटेलपर्यंत  येण्यासाठी दुस्तर मार्ग पार करायचा. गटारावरची लपकती  फळी, मग कुंपणाची   तुटलेली काटेरी तार, मग चिंचेच्या पाचोळयाचे ढीग आणि  मग निद्रिस्त ब्रम्हयोगिनी; इतके अडथळे पार केल्यावर हॉटेल लागतं.   अमल्याच्या हॉटेलला  दारेखिडक्या नाहीत. दोन फळ्या आहेत, पण त्याही नावालाच. अमल्या जागेवर आणि जागा असला तर  हॉटेल चालू.  तो जागेवर आणि/किंवा जागा नसला तर  हॉटेल बंद.  त्याच्या मैत्रीसारखेच त्याचे हॉटेलही मनमोकळे आणि तनमोकळेही आहे. कारण काउंटर, बाके, टेबलं  इत्यादीही  जेमतेमच आहे, नाही.
हॉटेलच्या बाकड्यावर बसताच मुख्य दृश्य म्हणजे कांद्याची चाळ आणि चिरलेला पुदिना. कांदा  हा आमल्याच्या मिसळीतील अविभाज्य भाग. कांद्याच्या भावाप्रमाणे कमीजास्त न होणारा. एकदा ‘कांदा  चार्ज अलग पडेल’ अशी पाटी लावली त्यानी, पण मग दुपारपर्यंत ओशाळवाणे होऊन स्वतःची स्वतःच काढून टाकली. कांदा आणि त्याबरोबर पुदिना. अमल्याच्या मिसळीला अजोड स्वाद देणारी ही जोडी.   
पण मिसळीला खरा रंग चढतो तो अमल्याच्या गप्पांनी. हा ‘सरदार’ त्यामुळे सगळ्या गप्पा ऐतिहासिक भाषेत. ह्याच्या हॉटेलात ‘मावळे’ जमतात, हा पाव आणायला ‘कूच’ करतो, ‘तलवारीने’ कांद्याची ‘खांडोळी’ होते, मिसळ ‘तबकातून’ पुढ्यात येते आणि ‘अग्निवेदी’वर रस्सा उकळत असतो. पण      ह्यापेक्षा जास्त रंग चढतो तो अमल्याच्या आणि  त्याच्या बायकोच्या वादावादीनी. अमल्या कडक हिंदुत्वनिष्ठ, कट्टर शिवसैनिक आणि बायको कट्टर भाजपवासी. बॉर्न इन रा.स्व.सं.  अँड ब्रॉट अप इन भाजप म्हणाना. त्यामुळे राजकारणातील हेलकाव्यानुसार यांची संसारनौका हेलकावे खाणार. तिकडे सेनेत आणि कमळाबाईत धुसफूस सुरू  झाली की इकडे अमल्याच्या हॉटेलमध्ये भांड्यांचे आवाज येतात. तिकडे दिल्लीश्वर ‘मातोश्री’च्या पायऱ्या चढले की इकडे अमल्याला, सासऱ्याचा इन्सल्ट केल्याचा प्लेटोनिक आनंद मिळतो. कधी ‘सामना’तील टोकदार अग्रलेख कमळाबाईंच्या जिव्हारी लागतो, मग त्यादिवशी अमल्याच्या हातात नवटाक दारुसाठीसुद्धा पैसे पडणं मुश्किल. कोणत्याही फुटकळ निवडणुकीत सेनेचा विजय झाला की अमल्या रातोरात गलमिश्या फुटल्यासारखा फुरफुरू लागतो आणि पराजय झाला की खांदे पाडून सपासप गनीम कापावा तसा कांदे कापतो. तिकडे  युती तुटली की इकडेही अबोला असतो आणि तिकडे  युतीची घोषणा झाली की इकडेही दिलजमाई होते. त्याला मुलगा झाला, तोसुद्धा युतीच्या काळात. त्याचं  नावही जहाल हिंदुत्ववादी आहे, रुद्र. हे कार्टंही अमल्याइतकंच लाघवी आहे.  पण इतकं  खोडसाळ आहे की   याचं नाव रौद्रभीषण असायला हवं होतं.  पण गोंडस आहे पोरगं. बापावर गेलंय.
अमल्याही  देखणा आहे. उंच, गोरापान, घारे डोळे, कानात भिकबाळी, गालावर चक्क  खळी पडते त्याच्या. हे वर्णन तो  दारूत अडकायच्या पूर्वीचं आहे.  अमल्याला दोन व्यसनं. दारू आणि ढोल. पैकी ढोल हे अमल्याचं पहिलं  व्यसन.  आसपासच्या यात्रा, जत्रा उत्सव असं काहीही असलं तरी ढोल पथकात अमल्या हवाच.
रिंगणात मधोमध उभा राहून तालात ढोल वाजवत तो इतरांना खाणाखुणा करत तासंतास वाजवू शकतो. दोन तीन ‘रुमाली’ (राऊंड) तर  तो सहज पिटतो. सगळं वादन झाल्यावर ‘झाडणी’ (सर्व तालचक्रांची दहा मिनिटात वाजवलेली समरी) वाजवायचा मानही अमल्याचा.   पण काहीही म्हणा अमल्याला रंगात येऊन ढोल वाजवताना पहाणं हा एक सुंदर अनुभव आहे. फेटा, गळ्यात उपरणे, गुलालात रंगलेला सुरवार झब्बा, घामाने निथळलेला चेहरा, मान  वर  करून, तो प्रचंड ढोल पेलत त्यानी एकदा ठेका धरला की ब्रम्हानंदी टाळी लागलेली असते.  अर्थात या शक्तीमागे गुटख्याची गोळी आणि तीर्थोदकाची पुण्याई असते हे काय वेगळं सांगायला हवं?
अमल्या आणि त्याच्या दारूबद्दल मी काय सांगू? आधी माणूस दारू संपवतो, मग दारू माणसाला संपवते; दुर्दैवाचे दशावतार; संसाराची धूळधाण; आयुष्याची राखरांगोळी असे सगळे वाक्प्रचार वापरुन तुम्हीच मनातल्या मनात चित्र रंगवा. एक तर  हे चित्र सर्वपरिचित आहे आणि अमल्याबद्दल हे असं लिहिणंही मला क्लेशदायक आहे. 
मी  डॉक्टर, त्यातून जवळचा  मित्र. त्यामुळे ह्यातून मार्ग काढायला मीच. पण ह्यातून मार्ग काढणे किती अवघड आहे ते मला माहीतच होते. हरतऱ्हेने प्रयत्न  करूनही काही फरक पडेना. दारू प्यायल्याने त्रास.  मग त्याची औषधे.  दारू सोडणे. मग दारू  सोडल्याने त्रास.  मग त्याची औषधे. मग तो त्रास सोसवत नाही म्हणून पुनः दारू; असं दुष्टचक्र चालू झाले. अमल्याची सारी रयाच गेली. आधीच यथातथा असलेली परिस्थिति रसातळाला गेली. त्याची परिस्थिती  मला माहीत होतीच. मग मिसळीचे पैसे मी त्याच्या हातात ठेवायचो नाही. पाकीटच त्याच्या हातात द्यायचो. तो पैसे काढून घ्यायचा पाकीट परत करायचा. त्यांनी किती घेतले ह्याचा  मी हिशोब ठेवला नाही, त्यांनीही नाही. हा सगळा मैत्रीचा मामला होता.  
पण दारुनी त्याला पूर्ण पोखरला. मग कमळाबाई पदर खोचून घट्ट उभ्या राहील्या. हॉटेल चालूच राहील हे पाहिलं. नवऱ्याची खंगणारी तब्बेत सावरली. पण हरप्रकारे प्रयत्न करूनही हे नतद्रष्ट व्यसन काही सुटेना. एकेदिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून कट रचला. त्याला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचा चंग बांधला. गाडी आली.  पण अमल्या बधेना.  गाडीत चढेना.  कसंतरी दादापूता  करून, बरंच इमोशनल ब्लॅकमेलिंग करून, त्याला  मी गाडीत घातला. मैत्रीच्या इतक्या शपथा, बॉलीवूडच्या अख्या इतिहासात कोणी घातल्या नसतील.  पण गाडी स्टार्ट नाही झाली, तोच तो म्हणतो कसा, ‘माझे दोन शर्ट वरच्या कपाटात राहिलेत, ते घ्यायचेत मला.’  
सारे गप्प. साऱ्या कुटुंबावर तात्काळ शोककळा पसरली. इतका जमवून आणलेला बेत  फिस्कटणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. एकदा  गेलेला अमल्या परत कसला येतोय? तो जाणार तो  वरच्या खोलीतून, पत्र्यावरून, पलीकडच्या गल्लीतून,   थेट गुत्त्यावर. हे नाटक तर  आधी कितीतरी वेळा  घडलं होतं. सगळे माझ्याकडे बघू लागले. मला काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्याला मी म्हटलं,  ‘जा! आण, माझा  विश्वास आहे तुझ्यावर.’ अमल्या गेला. पण खरोखरच शर्ट घेऊन परत आला. रीतसर केंद्रात दाखल झाला. परत  आला तो सुधारून आला. अल्कोहोलिक अॅनॉनिमसच्या स्थानिक मीटिंगला  जाऊ लागला. दारूपासून लांब राहू लागला. श्रावणाच्या कहाणीत शेवटी जसं सगळं सुफळ संपूर्ण होतं ना, तसं झालं त्याचं.
आज मिसळीवर ताव मारून झाल्यावर,  मी पाकीट त्याच्याकडे दिलं. त्यांनी ते उघडलं. एकदा त्याच्या पैशाच्या ड्रॅावरवरुन  ओवाळलं.  ड्रॅावरमधल्या बचाकभर नोटा घेऊन माझ्या पाकिटात कोंबून मला परत दिलं. मग अचानक गळ्यात पडून तो रडायला लागला. उमाळ्याचा पहिला  भर  ओसरल्यावर तो म्हणाला, ‘डॉक्टर, आज माझा ‘बड्डे’ आहे.’
‘आज कसा  रे?’
‘आज मी व्यसनमुक्त  होऊन एक वर्ष झालं. हा माझ्या पुनर्जन्मच की, तुमच्यामुळे मिळालेला. त्यादिवशी मी शर्ट घेऊन परत येईन असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण तुम्ही म्हणालात ‘विश्वास आहे तुझ्यावर’; बस्स डॉक्टर तुमच्या त्या एका शब्दाखातर मी परत आलो आणि शेवटी त्या व्यसनातून सुटलो.’
माझ्या छोटा मित्र आज कितीतरी मोठा झाला होता.
  


2 comments:

  1. मस्तच डॉक्टर साहेब!!☺️

    ReplyDelete
  2. Is he there in Wai,i want learn to play
    Dhol

    ReplyDelete