Wednesday 22 April 2020

केल्याने भाषांतर


केल्याने भाषांतर....
डॉ. शंतनू अभ्यंकर

भाषांतर हा  तसा जोखमीचा खेळ.  कधी   अर्थाचा अनर्थ घडेल हे सांगता येत नाही.
आता हेच बघा ना, मराठीत प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तक म्हणजे डॉ. विलियम केरी लिखित, ‘मराठी भाषेचे व्याकरण’(१८०५). मग लगेचच आलं ‘मराठी  बायबल’ (१८०७). म्हणजे मराठी पुस्तक व्यवहाराला चक्क भाषांतरित पुस्तकानेच सुरवात झाली की. पण हे बायबल वाचलं की सारखं अडखळायला होतं. बायबल आणि मराठी व्याकरण यांचा सांधा काही जुळलेला नाही.   बायबल हा देवाचा शब्द, त्यामुळे त्यात बदल असंभव. त्यामुळे बायबलची भाषांतरे म्हणजे शब्दाला प्रतिशब्द अशा पद्धतीने केलेली. 
त्यामुळे ‘नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. मत्तय 5:10-12
किंवा
 ‘परंतु तुझ्या भावना पुराच्या अनावर व बेबंद लाटांप्रमाणे आहे; तू माझा मुलांमध्ये श्रेष्ठ किंवा सर्वात अधिक महत्वाचा मुलगा होणार नाहीस कारण तू आपल्या बापाच्या एका बायकोपाशी जाऊन निजलास; तू आपल्या बापाच्या अंथरुणाचा आदर करुन मान राखला नाहीस.’ अशी वाक्ये सर्रास आढळतात. ही मायबोली नसून ही तर खास बाय(बल)बोली झाली.  शब्दशः भाषांतर फसतं ते इथे. या भानगडीत  Minister Of External Affairsचं भाषांतर ‘बाहेरच्या भानगडीचा मंत्री’ असंही होऊ शकतं.
भाषा म्हणजे निव्वळ अर्थवाही शब्द नसतात. त्या त्या भाषेबरोबर त्या त्या भाषीकांची, प्रदेशांची संस्कृति येते, श्रद्धा-अंधश्रद्धा येतात, लोककथा आणि पुराणांचे दाखले  येतात. प्रत्यय, क्रियापदांची विशिष्ठ ठेवण  येते आणि बरंच काही येतं. आपण वाचतो आणि वाचलेलं आपल्याला आवडतं, भावतं ते त्यात हे सगळं असतं म्हणून. बँकेच्या लोनची, घराच्या खरेदी-विक्रीची, निरनिराळ्या इंन्स्यूरन्स स्कीमची कागदपत्रही कुठल्यातरी भाषेतच असतात. पण ती इतकी रटाळ असतात की वाचवत नाहीत. बरेचदा तर न वाचताच आपण सही ठोकतो त्यांवर. ललित लेखनाचं असं नसतं आणि म्हणूनच ललित लेखन  भाषांतरायला आणखी कठीण. कोर्टाच्या निकालाचं भाषांतर सहज शक्य आहे. पण तुकारामाच्या अभंगाचं कितीतरी अवघड.
दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्याशिवाय भाषांतर अशक्य. उत्तम भाषांतर जमण्यासाठी दोन्ही भाषांतील काव्यसृष्टीचा व्यासंगही  मला महत्वाचा वाटतो. मुळात कमीत कमी  शब्दात अफाट आशय मांडायची कवितेची शक्ती काही औरच. त्यातही यमक-अनुप्रास साधत, हे केलेलं  असतं.  त्यामुळे कवितेचा अभ्यास असेल तर भाषांतर सरस उतरते असं वाटते.
 दोन्ही संस्कृतींची जाण  नसेल तर तो डोलारा  डळमळीत रहाणार.  त्यातही एका भारतीय भाषेतून, दुसऱ्या  भारतीय भाषेत भाषांतर सोपे.  कारण मुळात भाषांत अंतर कमी, संस्कृति बरीचशी  समान. पण दूरस्थ  भाषेतून आपल्या भाषेत आणणे किंवा उलटे,  अगदी कठीण.
मूळ  लेखकाच्या समग्र लिखाणाशी, विचार प्रकृतीशी परिचय असल्याशिवाय ते प्रामाणिक होणार नाही. त्यामुळे जे पुस्तक भाषांतरायचे आहे तेवढेच वाचून भागत नाही त्या लेखकाचे इतरही लिखाण वाचलेले असावे लागते. त्याची शैली अगदी गाढ परिचयाची असावी लागते. किती गाढ? इतकी गाढ, की तुम्हाला त्या शैलीचे विडंबनही जमले पाहिजे! कारण विडंबन म्हणजे विदूषकी चाळे नव्हेत. एक उत्कृष्ट निर्मितीला दिलेली ती तितक्याच तोलामोलाची दाद आहे. (वाचा ‘झेंडूची फुले’बद्दल पुलंचे निरीक्षण ) ही तर विरुद्ध भक्ती. तुम्हाला विडंबन जमलं तर त्या लेखकाचे भाषांतर जमलेच म्हणून समजा. 
जशी लेखकाची असते तशी प्रत्येक भाषांतरकाराचीही एक शैली असते. एखाद्या कलाकृतीची एकापेक्षा अधिक भाषांतरे शक्य आहेत आणि ती सर्वच्या सर्व उत्तम असू शकतात. ‘मेघदूता’ची, ‘गीते’ची  अशी कित्येक समश्लोकी भाषांतरे आहेतच की. 
त्यातही मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर करणे हे थोडे सोपे आहे. इंग्लिशचे शब्दसामर्थ्य जबरदस्त आहे. विविध अर्थछटांचे शब्द तिथे आहेत, पारिभाषिक शब्दसंपदा तर विपुल आहे. त्यामुळे मराठीतून इंग्रजीत जाताना, हा शब्द? का तो शब्द? असा प्रश्न पडतो. मात्र इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना शब्द शोधावे किंवा घडवावे लागतात किंवा मूळ इंग्रजी कायम ठेवावे लागतात.  
‘व्हाय इज सेक्स फन?’ या जारेड डायमंड यांच्या पुस्तकाचा मराठी भावानुवाद, ‘संभोग का सुखाचा?’ या नावाने मी  केला  आहे. त्या पुस्तकातील प्रस्तावनेत ह्या शाब्दिक अडचणीबद्दल काही निरीक्षणे मी मांडली आहेत. ती खाली उद्धृत करत आहे.
‘रुपांतर करायला सुरवात केली आणि मग एक मजेदार खेळ सुरु झाला. प्रत्येक शास्त्रीय संज्ञेला मराठी प्रतिशब्द शोधणे, तो क्लिष्ट किंवा फारच अपरिचित असेल तर कंसात इंग्रजी शब्द देणे अश्या युक्त्या करत करत मी निघालो होतो. पण या सर्वात थरारक अनुभव होता तो म्हणजे, मराठी भाषेचे शब्दवैभव माझ्या हळू हळू लक्षात यायला लागले. अपेक्षेपेक्षा  फारच कमी शब्दांना मी अडखळलो. शब्द आहेत पण ते वापरात नसल्याने झपाट्याने विस्मृतीत जात आहेत असेही माझ्या लक्षात आले. माझ्या काही परिचितांना मी कच्चा खर्डा वाचायला दिला तर सर्द, पैस, प्रकृत हे शब्द त्यांना माहितच नव्हते. मी चकित झालो. यातली काही मंडळी तर मराठी माध्यमातून शिकलेली होती. जुगणे (समागम), कोंबडीचा वाढा (एकावेळी दिलेली अंडी), मादी माजावर येणे (बीजधारणा झालेली कामोत्सुक मादी), बैल बडवलेला असणे (वृषण बाद केल्याने वांझ बैल) असे शब्द आता फक्त माझ्या ग्रामीण मित्रांच्याच परिचयाचे आहेत. वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे आणि इंग्रजीकरणामुळे आपण आपली शब्दसंपदा गमावून बसत आहोत याची मन विषण्ण करणारी जाणीव मला पुनःपुन्हा होत राहिली. काही नवीन शब्द घडवावे लागले. उदाहरणार्थ Evolution ला उत्क्रांती हा शब्द सर्वमान्य आहे पण Evolutionaryला काय म्हणावे बरे. दरवेळी उत्क्रांती विषयक, उत्क्रांतीबद्दल असे किती वेळा म्हणणार? मग शब्द बनवला ‘औत्क्रांतिक’. उदास, उद्योग किंवा उपचारचे रूप जसे अनुक्रमे औदासिन्य, औद्योगिक किंवा औपचारिक असे होते, तसे हे औत्क्रांतिक. Arbitrary या शब्दाला मी असाच अडखळलो पण विचार करता करता, लिखाणाच्या ओघात, मला कितीतरी शब्द सुचले. असंबद्ध वाट्टेल ते, काहीच्याकाही, अपघाताने निवडलेला, आगापीछा नसलेला, शेंडाबुडखा नसलेला...असे पाच निरनिराळे शब्द मला त्या त्या संदर्भात योजता आले आणि ते तिथे फिट्ट बसले. Strategy हाही असाच चकवा देणारा शब्द. ह्यालाही व्यूह, धोरण, डाव, कावा, पावित्रा, तऱ्हा असे अनेक पर्यायी शब्द मला सापडत गेले. त्या त्या ठिकाणी ते चपखल बसले. Provider Strategy आणि Showoff Strategy याला तर खाऊपिऊ तऱ्हा आणि भावखाऊ तऱ्हा असे गंमतीशीर प्रतिशब्द सापडले.’
शास्त्रीय लिखाणाचा मराठीत  भावानुवाद करताना आणखी एक अडचण येते.  आपल्या संस्कृतीतली, भाषेतली, अध्यात्मिक रूपकं, संत वचनं, देवधर्माच्या कल्पनेनुसार आलेल्या म्हणी, वाक्प्रचार हे वापरावेत तरी मुश्कील आणि न वापरावेत तरी मुश्कील अशी अवस्था अनेकदा  येते. रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रीयालिटि’चा ‘जादुई वास्तव’ हा भावानुवाद केला तेंव्हा ही दुविधा  अनुभवली. मग प्रस्तावनेत मी याचा खास उल्लेख केला.
‘विज्ञान सांगतं की ‘मानवाचे अंती गोत्र एक’, एवढंच नाही तर सजीवांचे अंती गोत्र एक.’ पण हे वाचताच काही (सुजाण) वाचकांनी प्रश्न केला, ‘बघा हं, म्हणजे ते गोत्रंबित्रं  म्हणतात त्याला वैज्ञानिक पाया आहेच की!’ खरं तर ‘मानवाचे अंती गोत्र एक’ ही ओळ विंदा करंदीकरांची. त्याचा आधी संदर्भ देऊन मगच मी ‘सजीवांचे अंती गोत्र एक’, अशी मल्लीनाथी केली, पण गैरसमज व्हायचा तो झालाच. ‘मत्स्यावतार’ ह्या शब्दानीही अशीच  माझी विकेट घेतली. उत्साही वाचकांना मत्स्यावतारात परमेश्वराचा प्रथमावतार अनुस्यूत आहे असं वाटू शकतं. पण मला अभिप्रेत अर्थ आहे, आपले मत्स्य रूपातील पूर्वज. बस्स् एवढाच! हा गुंता सहजी सुटणारा नाही. त्यामुळे असे शब्दप्रयोग वापरावेत का नाहीत हा एक मोठाच संभ्रम ठरला. ह्या शब्दांचा मला अभिप्रेत असलेला अर्थ आणि  वाचकांच्या मनातला अर्थ, यात फार अंतर पडून चालणार नाही, तसं परवडण्यासारखं नाही. असे शब्द, वाक्प्रचार वापरावेत, तर अर्थाचा अनर्थ होण्याची चिंता. न वापरावेत, तर भाषेची लय बिघडते. भाषेचा लहेजा मार खातो. वाचनीयता कमी होते. एकूणच वाचताना ‘गंमत’ येत नाही. हे लिखाण खुमासदार, ललित निबंध न होता, कंटाळवाणा, बोजड प्रबंध होण्याची भीती मला सतावू लागते. इकडे आड आणि तिकडे विहीर. शेवटी अगदी अत्यावश्यक तिथेच असे काही शब्द वापरावेत अशी मी मनाशी खुणगाठ बांधली. पण तरीही दरवेळी स्वताःच्या मनातला अर्थ सांगायला लेखक तिथे असू शकत नाही. अशा शब्द, संकल्पनांची फोड करताना वाचकांनी पुस्तकाचा एकूण सूर, संदर्भ हाही विचारात घ्यायला हवा असं मला सुचवावंसं वाटतं. म्हणजे अशा गफलती कमी होतील.’
भाषांतर, रूपांतर, भावानुवाद असे शब्द वापरले जातात. खरंतर प्रत्येक अनुवाद हा भावानुवादच हवा. मूळ भाव जैसे थे ठेऊन निव्वळ भाषेची वसने तेवढी बदललेली. पण काही वेळा  मूळ  भाव तसाच ठेऊन भाषा आणि  संस्कृतीचाही साज बदलला जातो.  सर्जनशील प्रतिभावंतच हे करू जाणे. मराठीतील अशा प्रयोगाचं सर्वज्ञात उदाहरण म्हणजे ‘ती फुलराणी’.  या बाबतीत ‘ती फुलराणी’ची अरूण  आठल्ये यांनी लिहिलेली प्रस्तावना अभ्यासण्यासारखी आहे. ‘ती फुलराणी’ म्हणजे  अनुवाद नव्हे तर  अनुसर्जन आहे असे त्यांचे म्हणणे. भाषा तर  बदलली  आहेच पण मूळ इंग्रजी सुटाबूटाला अस्सल मराठीचा साज-पेहराव असा काही बेमालूमरित्या चढवलेला आहे की मूळ सुटाचे कापड सोडा, त्याचे सूतही दृष्टीस पडत नाही.

भाषांतर करायचं तर मूळ पुस्तक अर्थातच खूपच बारकाईने वाचावे, अभ्यासावे लागते. प्रस्तावनेपासून उपसंहारापर्यंत सगळं.  इथे तुमचा  कस लागतो.  लिखाणातील कित्येक संदर्भ आपण मनातल्या मनातल्या गृहीत धरलेले असतात. त्याबद्दलची पुरेशी स्पष्टता एक सामान्य वाचक म्हणून आपल्याला नसते, आवश्यकही नसते. पण भाषांतर करायचं तर असे कच्चे दुवे राहून चालत नाही. मूळ शब्दाशी आणि शब्दाच्या मुळाशी भिडावं लागतं. प्रसंगी भरपूर संदर्भ शोधावे लागतात. ज्या काळातील लेखन आहे, त्या काळातील, त्या त्या शब्दांचा अर्थ समजावून घ्यावा लागतो.  प्रतिशब्द शोधायला ऑनलाइन कोश, शब्दकोश इत्यादीची खूप खूप मदत होते. ऑनलाइन शब्द कोशात ‘डिसअॅम्बीग्यूएशन’ अशी एक सोय असते. त्या शब्दाचे वेगवेगळ्या संदर्भातील अर्थ इथे दिसतात. उदाहरणार्थ ‘बेंटले’, हे गाडीचे नाव आहे हे तुम्हाला कदाचित माहीत असेल पण ह्या नावाची गावे, गल्ल्या, विद्यापीठ, स्टेशन, शाळा, माणसं, ललित वाङमयातील प्रसिद्ध पात्र आणि इतरही बरंच काही आहे. भाषांतर करायचं तर हे असं सगळं तपासूनच घ्यावं लागतं. किंडल  किंवा प्ले-बुक आवृत्तीचा हा एक फायदा असतो. एखादा शब्द अडला तर निव्वळ स्पर्श करण्याचा अवकाश, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला सामोरा  येतो. इतकेच काय पण त्याबद्दलचे आंतरजालावरचे, विकीपीडियातले संदर्भदुवे हात जोडून उभे असतात. ह्यामुळे विचक्षण वाचकांचे आणि विशेषतः भाषांतरकारांचे काम अगदी सुलभ होते. छापील पुस्तकाइतकेच ई-पुस्तक उपयोगी ठरते. तेंव्हा अशा दोन्ही आवृत्त्या साथीला असणे उत्तम.
तुमचे तुम्ही कॉम्प्युटरवर थेट टाइप करत असाल तर फारच उत्तम. कारण मग त्यात सहजपणे बदल करता  येतात. आधी वाक्य, मग त्यातही काही शब्द पुढेमागे, मग अख्खा परिच्छेद, मग भाषेची लय साधण्याकरता वाक्यांचा क्रम किंवा सांधेजुळणी बदलणे. म्हणी, वाक्प्रचार  वगैरेंचा वापर हे सगळं वारंवार करून बघता येतं. सगळ्यात सौष्ठवपूर्ण, सुबक, सर्वांगसुंदर अशी रचना प्रयत्नसाध्य असते. हे प्रयत्न हस्तलिखितात करणं अवघड आणि कंटाळवाणे असतं. त्यामुळे थेट टंकलेखन तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे.  
शेवटी भाषांतर हा निसरडाच प्रकार आहे. असं म्हणतात की भाषांतर म्हणजे हातमोजा  घालून प्रेयसीच्या गालावरून हात फिरवण्यासारखं आहे,  कितीही प्रयत्न  केला तरी काही तरी रहातंच.  




No comments:

Post a Comment