Thursday, 14 February 2019

माता न तू वैरीणी

माता न तू वैरीणी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
‘मला नाही तुम्ही आईला सांगा डॉक्टर! (आई कसली वैरीण आहे माझी वैरीण.)’ कंसातलं वाक्यं मनातल्या मानत बोललेलं असतं. पण माझ्या सरावल्या कानांना स्पष्ट ऐकू येतं. 
माझ्या सगळ्या सूचना ऐकून घेऊन समोरची नवप्रसवा विनवत असते, ‘डॉक्टर, आईला सांगा प्लीज.’ तिच्या विनंतीला मान देऊन मी सांगतो सुद्धा. पण हे आई प्रकरण मॅनॅज करणे अवघडच. कितीही सांगा, समजावा, शास्त्रीय माहिती द्या, ह्या आपल्या हेका सोडायला तयार नसतात. तोंडावर हो म्हणतात आणि मग घरी गेल्यावर, जे करायचं तेच करतात. त्या जे काही करतात ते प्रेमभरेच करतात. लेकीची आणि बाळाची आत्यंतिक काळजीच घेत असतात त्या. त्यांच्या हेतूबद्दल माझ्या मनात यकिंचितही किंतु नाही. परंतु सदिच्छेच्या भांडवलावर किती आणि काय काय मारून नेणार? 
भर उन्हाळ्यात निव्वळ प्रसूती झाली म्हणून डोळ्यात बिब्ब्याच काजळ, सर्वांगी तेल चोपडलेल, दोन दोन स्वेटर, हातात ग्लोव्ज, पायात मोजे, कानाला फडकं बांधलेलं अशा अवतारातल्या केवीलवाण्या, घामेघूम बायका वॉर्डात बघितल्या की कीव येते. कानाला बांधणे हे तर या बायकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याशिवाय आपण डिलिव्हर झालोय असं फिलिंगच येत नाही बहुतेक. शिवाय दारे, खिडक्या, एसी, पंखा हे सगळं बंद आणि पाणी मागायचीही चोरी. कारण पाणी म्हणलं की उकळून गार केलेलं, कोंबट, मचूळ पाणी हजर. सेवेसी असलेली मंडळी हौसेहौसेनी थर्मास भरभरून पाणी घेऊन येतात. खरतर पाणी शुद्ध, पिण्यायोग्य असणं महत्वाचं आहे. त्याचं तापमान हा जिच्या तिच्या आवडीचा भाग. हात धुवायला पाय धुवायलासुद्धा गरमागरम पाणी. कारण गार पाण्यात हात घालायचा नाही. ह्या बरोबर शेक-शेगडी, पोटपट्टा अशीही काही पीडातंत्र आणि छळयंत्र आहेत. भर उन्हाळ्यात रुंदच्या रुंद पोटपट्टा कसून वर रसरसते निखारे आणि त्यांचा धूर सहन करणाऱ्या बायका बाळंतपणातून तावून सुलाखून निघतात असंच म्हटलं पाहिजे. घाम फुटत असतो, पट्याखाली खाजत असतं पण नको म्हणायची काय बिशाद! जेंव्हा हे सुखकर असेल तेंव्हा हे सारं वापरायला कोणाचीच ना नाही, पण असह्य उकाड्यातही ह्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे, अनावश्यक आहे. 
गार हवा लागू नये म्हणून इतक्या कडक बंदोबस्ताची काही गरज नसते. आपल्यासारख्या विषुववृत्तीय हवामानात तर नाहीच नाही. तुम्हाला आम्हाला जितका गारवा किंवा उब लागते तितकीच डिलीव्हरीच्या पेशंटलाही लागते. त्यांनी कम्फर्टेबल असणं महत्वाचं. पण लक्षात कोण घेतो? हे असले प्रकार यथासांग केले नाहीत तर आपण आपल्या आईगिरित कमी पडलो असं या बायांच्या आयांना वाटत असतं. येणारी जाणारी प्रत्येक बाई आपल्या वकुबानुसार सूचना करत असते ते वेगळच. त्यातून पूर्वी फक्त प्रत्यक्ष भेटीत सूचना शक्य होत्या. नापसंत सूचना कानाआड करता येत होत्या. आता मोबाईलवरून व्हिडीओ कॉल लावून सूचनांची अंमलबजावणी होत आहे वा नाही ह्याचा पडताळा चालू असतो. ह्या सगळ्या भानगडीत ती नवजात आई मात्र पार गांजून गेलेली असते.
पोटपट्ट्याचा असाच अनाठायी आग्रह चालतो. त्यानी तुम्हाला बरं वाटत असेल, कंबरेला आराम वाटत असेल, तर जरूर वापरा. पण त्याचा जाच वाटत असेल, तर तो न वापरण्यानी काही बिघडत नाही. पोटपट्ट्यांनी म्हणे पोट सुटत नाही. काहीच्या काही! असं असतं तर ढेरपोट्या पुरुषांनी तत्काळ पोटं आत घालवली असती की. प्रसूतीनंतर पोट रहातं ते काय पोटात हवा गेल्यानी नाही. हवा भरून पोट वाढायला पोट म्हणजे काय ट्रकचा टायर आहे? आणि मग असलं पोट सुई टोचून आत गेलं असतं की!! पोट ओघळतं कारण, ‘बाळंतपण मानवलं पाहिजे’ या समजुतीपोटी आया आपल्या बाळंत कन्यांना खा खा खिलवतात. परिणामी वजन वाढतं. शिवाय गरोदरपणी पोटाचे स्नायू इतके ताणले जातात, इतके ताणले जातात, की ते तत्काळ मूळपदावर येउच शकत नाहीत. एखादं इलॅस्टिक अती ताणलं तर ते जसं लेवाळं होतं तसं काहीतरी होतं. स्नायूंची गेलेली ताकद आणि जोम परत मिळवण्यासाठी, व्यायाम हाच उपाय आहे. पैसेवाल्या बायकांसाठी ‘टमि टक’ नावाचं एक ऑपरेशनही आहे. पोटच का, ओघळलेले गाल, स्तन, कुल्ले सगळं काही पुन्हा जिथल्या तिथे उचलून मिळतं. अशा ऑपरेशनला ‘मम्मी मेकओव्हर’ म्हणतात. कृत्रिम कायापालटच हा. झटपट विना-व्यायाम, विना-डाएट, इलाज.
बाळंतीणीच्या खाण्यावर तर हजारो निर्बंध. ह्याचं उल्लंघन केलं तर बाळाला शी होणार, पोटात दुखणार, अशी सतत भीतीची टांगती तलवार. त्यामुळे ह्या बायका मन मारून मुकाट्यानी पानात पडेल ते गिळतात. बहुदा पहिले काही दिवस इतर पदार्थ बंद. फक्त अळणी तूप-भात. मग नंतर मेथीची अळणी भाजी, बिन तिखटामिठाची आमटी असं काहीतरी पानात पडतं. वर तोंडी लावायला ‘पोटभर का जेवली नाहीस?’ असा सवाल आहेच. असलं पथ्य पाणीही पाळायची गरज नसते. आईने भाकरी खाल्ली, गवार खाल्ली, असा अमुक पदार्थ खाल्यामुळे बाळाला तमुक त्रास होतो, असा कोणताही शोध नाही. इतक्या बेचव अन्नाला तोंड देणे कसं शक्य आहे. जर हे अन्न इतकं आवश्यक असेल तर सहानुभूती म्हणून घरच्या सगळ्यांनी बाळंतीणीबरोबर असाच आहार घ्यावा अशी माझी सूचना आहे. पौष्टिक, भरपूर, चौरस आणि चविष्ट जेवण हवं.
बस्स इतकंच.

Tuesday, 8 January 2019

आय. व्ही.एफ. चा निर्णय घेताना


टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय घेताना...

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.


आधी या संदर्भातले काही  शब्द स्पष्ट करतो. आय.व्ही.एफ. म्हणजे इन व्हिट्रो फर्टीलायझेशन. म्हणजे शरीराबाहेर फलन घडवून, तयार गर्भ, गर्भपिशवीत सोडायचा असे उपचार. असाच एक शब्द आहे, ए.आर.टी.. ए.आर.टी. म्हणजे असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नीक्स. हा जास्त व्यापक अर्थाने वापरला जातो. पण उगीच शब्दच्छल कशाला, इथे बोली भाषेतला टेस्ट ट्यूब बेबी हा शब्द पुरेसा आहे आणि पुरेसा बोलका आहे.
गंमत म्हणजे, जरी अनेक सेंटरच्या लोगोमध्ये टेस्ट ट्यूबमधून रांगत येणारं बाळ दाखवलं असलं तरी टेस्टट्यूब बेबीच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात टेस्टट्यूब कुठेच वापरली जात नाही! टेस्ट ट्यूब इथे प्रतिकमात्र आहे, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा या साऱ्याचं.
टेस्ट ट्यूब बेबी करा असं सांगितलं की पेशंटच्या मनात पहिला विचार येतो, ‘बापरे, टेस्ट ट्यूब बेबी करून पहाण्यापेक्षा हा डॉक्टरच बदलून पाहू!’ बरेचदा यामागील अवाढव्य खर्च, त्यातील अनिश्चितता भंडावत असते. टेस्ट ट्यूब बेबी करणे अवघड खरंच. डॉक्टर लोकांत एक म्हण आहे, ‘इट इस मोर ऑफ मॅजिक दॅन लॉजिक’.
डॉक्टर सारखीच पेशंटलाही यासाठी प्रचंड आर्थिक, शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक करावी लागते. खूप काही सोसावं लागतं. इतकं करून सारं काही गोड गोड घडेल असं नाही. तेंव्हा अपयश, हताशा, नैराश्य झेलण्याची ताकद असावी लागते. कुटुंबियांची भरभक्कम साथ असावी लागते. हे सगळं जुळवण्यास वेळ लागतो. या जुळवाजुळवीत पेशंटकडून घडणारी घोडचूक म्हणजे निर्णय उशिरा घेणे. जितकं वय वाढेल तितकं यश मिळण्याची शक्यता कमी कमी होत जाते. पस्तिशीच्या पुढे तर गर्भसंभवाची शक्यता  निम्यानी घटते.
प्रत्येक स्त्रीत गर्भावस्थेत असतानाच काही कोटी स्त्रीबीजे तयार होतात आणि नंतर लगेचच त्यातील काही वाळायला  सुरवात होते. ही क्रिया आयुष्यभर चालू रहाते. त्या मुलीचा जन्म होतो, ती लहानाची मोठी होते, तिला पाळी येते. तिच्या पुनरुत्पादक वयापावेतो उरलेल्या ३००,००० बिजांपैकी  सुमारे ४०० बीजे प्रत्यक्षात वापरण्यायोग्य अशी पिकतात. यातील काहींचे फलन होते आणि मुले होतात. बाकीची वाळत रहातात. ठराविक वयानंतर बीजे संपतात आणि पाळी जाते.
या वाळण्यात आणि वाढण्यातही काही संगती आहे. उत्तमोत्तम बीजे असतात ती विशी तिशीच्या दरम्यान वाढतात. नंतर उरतो तो कमअस्सल माल. त्यामुळे उशिरा दिवस राहीले, मग ते नैसर्गिकरित्या असोत व टेस्ट ट्यूब बेबी तंत्राने, त्यात गोच्या होण्याची शक्यता बरीच असते. या उरल्यासुरल्या बिजांमध्ये सदोष गुणसूत्रे फार. इथे विभाजन होताना समसमान वाटा होत नाही आणि असमान वाटणी सुदृढ बीजास धार्जिणी नाही.  म्हणून अशी बीजे जनुकीयदोष बाळगून असतात. त्यामुळे मुळात रहायलाच वेळ लागणे, गर्भपात होणे, सव्यंग संतती होणे असले प्रकार फार. म्हणूनच वेळेत निर्णय महत्वाचा. पण आजकाल अनेक कारणाने लग्नच उशिरा होतात, पुढे जोडपी जननोत्सुक व्हायला आणखी वेळ घेतात आणि मग ह्या स्टेशनवर गाडी पोहोचायला वेळ लागतोच.
अशावेळी बीजांचा शिल्लक स्टॉक किती आहे हे सांगणारी, रक्तातील ए.एम.एच. नामे करून एक तपासणी केली जाते. मासिक पाळीच्या चक्रानुसार या ए.एम.एच.मध्ये बदल होत नाहीत त्यामुळे महिन्याच्या कोणत्याही दिवशी ही तपासणी करता येते. अगदी गर्भनिरोधक गोळ्या चालू असतील तरीही करता येते. अर्थात ही तपासणी म्हणजे मूल होईल की नाही हे सांगणारी भविष्यवाणी नव्हे. उरलेल्या बीजांची प्रत अथवा जनुकीय पत वगैरे यातून कळत नाही. मात्र उपचाराला कितपत प्रतिसाद मिळेल, किती घाई करायला हवी, हे सांगणारी एक दिशादर्शक तपासणी आहे.
याउलट पुरुषांच्या बीजसंख्येत अथवा गुणवत्तेत पंचेचाळीशीनंतर अगदी जेमतेम फरक पडतो.
टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काही जादू नाही. दर वेळी यश मिळेलच असे नाही. यशाचे प्रमाण २५%. अगदी खूप वेळा प्रयत्न केला तर ५०%. ही आकडेवारी बऱ्याच जणांना सीमेवरून परत पाठवते. हा जुगार नकोच अशीच त्यांची मानसिकता होते. पण २५ ते ५०%, ‘इतके यश तुला रग्गड’, हेच खरे.  एरवी धडधाकट जनतेतही मुले होण्याचे प्रमाण आपल्याला वाटते त्यापेक्षा बरेच कमी असते. बीजोत्पत्ती होण्याच्या सुमारास जोडप्याचा एकदा सबंध आला तर दिवस रहाण्याची शक्यता जेमतेम ८% असते. पण एरवी काही फरक पडत नाही, कारण दरवेळी आपल्याला त्यात लाख दीडलाख रुपये घालावे लागत नाहीत!  टेस्टट्यूबवाली जनता तर ‘नॉर्मल’ नसतेच. म्हणून तर ते टेस्ट ट्यूब बेबीसेंटर पर्यंत पोहोचलेले असतात. ह्यांच्यात अर्थातच अशी शक्यता अगदीच अल्पस्वल्प. ज्यांना टेस्ट ट्यूब बेबी हा पर्याय सुचवला जातो, त्यांना उपचार न घेता दिवस रहाण्याची शक्यता जेमतेम १ ते २ %च असते. कित्येकांना ०% एवढी असते. म्हणजे जमलं तर टेस्ट ट्यूबबेबीच्या मार्गानी अन्यथा नाहीच! ह्यापेक्षा टेस्ट ट्यूब बेबी करून २५% ते ५०% यशाची शक्यता म्हणजे त्यांच्या दृष्टीने लय भारी! अर्थात ही सगळी आकडेवारी झाली. अमुक एका जोडप्याला पुढे काय रिझल्ट येईल हे यात सांगता येत नाही. त्या त्या जोडप्यासाठी मूल झालं तर ते १००% यश असतं आणि नाही झालं तर ते १००% अपयश. तेंव्हा यशापयशाची आणि त्यातील आपल्याला लागू असलेल्या विशेष, भल्याबुऱ्या शक्यतांची, घटकांची, पर्यायांची, सविस्तर चर्चा करणे उत्तम. उगाच फार कल्पनेच्या भराऱ्या मारू नयेत. डोकं खांद्यावर आणि पाय जमिनीवर ठेऊन विचार करावा. कुणी यशाची १००% खात्री देत असेल, तर त्याचे/तिचे औषध मुळीच घेऊ नये कारण अशी हमी देणारा/री बनेल आहे हे स्पष्टच आहे.
अपयशाची चिंता आधीच केलेली बरी. असं झालंच तर मुळात टेस्ट ट्यूब बेबीचा आग्रह धरणाऱ्या जोडीदाराला किंवा डॉक्टरला दोष देण्यात काही अर्थ नाही.  निराशा, वैताग, स्वतःला बोल लावणे वगैरे भावनांशी दोन हात करून पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकणं, प्रसंगी अपत्यहीन रहावं लागेल, याचाही मनोमन विचार असणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नांची उत्तर देणारा कोणताही फॉर्म्युला नाही. उपलब्ध पैसा, जोडीदाराचं पाठबळ आणि तुमचा मूल्यविवेक यावर उत्तर ठरणार.
मुलासाठी औषधोपचार घेणाऱ्यांना तीव्र मानसिक आणि भावनिक चढउतार पार करावे लागतात. कधी कधी नात्यातला ओलावा संपतो. समागमही निव्वळ एक कर्मकांड म्हणून उरतो; त्यात ना उत्साह उरतो ना उत्स्फूर्तता. योगापासून संभोगापर्यंत सारं काही, अपत्यप्राप्ती, या एकाच आसाभोवती भोवरत रहातं. अमुक दिवशी गोळ्या घ्या, तमुक  दिवशी ‘जवळ या’, असल्या गद्य, न्यायालयीन फर्मानांनी दुसरं काय होणार?  टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट आणि त्यातील अपयश म्हणजे तर या साऱ्या तणावांची परिसीमा. या साऱ्यातून बाहेर पडायचं तर थोडा शांतपणे विचार करायला शिकायला हवं. आपण शक्य ते उत्तम उपचार घेतले आहेत, प्रामाणिकपणे सर्व पथ्यपाणी पाळले आहे, हे जर  तटस्थपणे विचार करता मान्य असेल, तर भविष्याचा विचार करायची उमेद वाढते. तुमच्या कल्पनेतला आदर्श भविष्यकाळ उजळणार नसेल कदाचित, पण जो काही असेल तो काही काळाकुट्टच असेल असंही नाही. काही अनवट सुखं, त्यातही लपलेली असतीलच की.
स्वप्नातलं मूल सत्यात उतरलं नाही याचं दु:ख असतंच, अगदी प्रत्यक्षातलं मूल गेल्यावर असतं तितकंच तीव्र असतं. या दु:खालाही न्याय द्यायला हवा. खुलेआम शोक करायला हवा. मग कसं हलकं हलकं वाटतं. माझ्या एका पेशंटनी अंगणात एक झाड लावलं, एकीनी ह्या न झालेल्या बाळाच्या स्मृत्यर्थ छान पेंटिंग केलं. ह्या साऱ्याची मदत झाली त्यांना.
....आणि एकदा, ‘हा मार्ग बंद!’, असं मनोमन ठरल्यावर, सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते आपल्या जोडीदाराची सूर जुळवून ठेवणं. तसंही आयुष्यातल्या एका अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून तुम्ही पार झाला आहात. यामुळेच रेशीमबंध कदाचित अधिक गहिरे झाले असतील, किंवा कदाचित नात्यांनी दुसरं टोकही गाठलं असेल, अगदी विशवीशीत झालं असेल सारं. तेंव्हा या आघाडीवर लागेल ती डागडुजी करायला हवी. जेंव्हा आता पुरे असं ठरतं, तेंव्हा अचानक स्वतःसाठी खूप वेळ मिळायला लागतो. दारू सोडलेल्या दारुड्यासारखं, ‘वेळेचं करायचं काय?’ असा प्रश्न पडू शकतो. एका अग्नीदिव्यातून तुम्ही तावून सुलाखून निघालेले असता. स्वतःला अधिक ओळखू लागलेले असता. पुढे काय या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला गवसतं.


Thursday, 20 December 2018

जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता


जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. (सातारा)

अंनिसच्या उपक्रमानिमित्त खास टिपण.


जोडीदाराची विवेकी निवड करताना इतर सर्व बाबींप्रमाणे शारीरिक संबंध आणि त्या बद्दलची एकमेकांची मते, कल, आवड-निवड हे माहित असेल तर विवेक राबवणं सोपं जाईल नाही का? पण हे मुळी माहितंच नसतं आणि माहीत होणंही शक्य नसतं. अशी सत्य माहिती हवी असेल तर एकच मार्ग आहे लग्नाआधीच काही काळ प्रत्यक्ष प्रचीती घेणे! अर्थात हा मार्ग मान्य होणे शक्य नाही. ओशो रजनीश यांनी अशी ‘ट्रायल’ विवाहाची कल्पना मांडली आहे, असो. अव्यवहार्य कल्पनांची इतकी चर्चा पुरे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सेक्ससाठी दोन मांड्यांमधील  अवयव हवेतच पण काम क्रीडा ही दोन मांड्यामधल्या अवयवांच्या जोरावर केली जाणारी क्रिया नसून, दोन कानांच्यामधल्या अवयव तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आपला मेंदू. मेंदू हा सगळ्यात महत्वाचा काम अवयव आहे. तुमचा तुमच्या लैंगिकतेकडे तुमच्या जोडीदाराच्या लैंगिकतेकडे पहाण्याचा दृष्टीकोन महत्वाचा.
स्त्री पुरुषांच्या कामभावनेमध्ये अनेक फरक आहेत पण कळीचा फरक हा की, स्त्री ही प्रत्यक्ष संभोगापेक्षा  प्रेम भावनेला अधिक भुलते तर पुरुषाचे सारे लक्ष संभोगावर केंद्रित असते. ‘नाही प्रेमभावना तर नाही संभोग’ हे जणू स्त्रीचे ब्रीदवाक्य असते तर, ‘नाही संभोग तर नाही प्रेमभावना’, हे पुरुषाचे.
प्रथम रात्री संभोग झालाच पाहिजे आणि तो  आनंददायीही असलाच पाहिजे असा कित्येकांचा गैराग्रह असतो, नव्हे तसे आपोआपच होत असतं असाच गैरसमज असतो. असं काही नसतं. पहिली रात्र ही सिनेमा, नाटकात, काव्यात वर्णन करतात तशी गुलाबी गुलाबी असतेच असं नाही. किंबहुना बहुदा नसतेच. लग्नसमारंभाचा शारीरिक मानसिक ताण आणि थकवा, नव्यानेच झालेली ओळख आणि ‘देख’, एखाद्या पूर्णतः परक्या व्यक्तीसमोर विवस्त्र होण्याचा संकोच, शरीराबद्दल घोर अज्ञान आणि गैरसमज, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचे सद्हेतूने दिलेले पण निव्वळ स्व-ज्ञानाधारित सल्ले, असे सगळे घटक एकत्र आल्यावर दुसरे काय होणार? खरंतर लग्नाआधीच मानवी शरीर, शरीरसंबंध आणि पुनरुत्पादनाची क्रिया याबद्दल किमान  माहिती असणे, ती मिळवणे गरजेचे आहे. आपल्याकडे अशी माहिती फक्त पोर्न व्हिडीओ बघून प्राप्त झालेली असते. बॉलीवूडचा सिनेमा बघून, त्यानुसार स्वतःचा संसार बेतण्याइतकंच हे मूर्खपणाचं आहे.
शरीरसंबंध जमणे आणि त्याचा आनंद उपभोगता येणं हे एक कला आहे, एक कौशल्य आहे आणि इतर कलाकौशल्यांसारखेच हे ही शिकावे लागते. थोडा वेळ लागतो, चुका  होतात. पहिल्याच प्रयत्नात सगळं जमेलच असे नाही, जमले तरी ते उत्तम आणि अत्युत्कृष्ट असेलच असे नाही. तेंव्हा असं जरी झाले तरी खट्टू होण्याचं कारण नाही. कामक्रीडा हा एक खेळ आहे. तुम्ही नव्याने टेबलटेनिस खेळायला गेलात तर पहिल्याच दिवशी तुम्हाला कदाचित सर्व्हिससुद्धा जमणार नाही.
एखादी भाषा शिकावी तसं हे. आधी मूळाक्षरं, मग जोडाक्षर विरहीत शब्द, मग अवघड शब्द, मग वाक्य... त्या भाषेत खंडकाव्य लिहायचं म्हणाल तर बराच पल्ला गाठावा लागतो. तसंच हे आहे. पहिल्याच रात्री, पहिल्याच प्रयत्नात, लिंगाचा योनीमार्गात प्रवेश झालाच पाहिजे; अमुक इतका वेळ संभोग चाललाच पाहिजे अशा पूर्वनिश्चित निकषांनुसार आपण वागायला बघतो. स्वतःच ठरवलेल्या अनावश्यक मापदंडावर स्वतःला जोखत बसतो. मग काय गोची झालीच म्हणून समजा. संभोग म्हणजे काही एव्हरेस्टवर चढाई नाही की तुम्ही शिखरावर झेंडा गाडलात तरच जिंकलात, अन्यथा आख्खी मोहीम फुका!  आपणच ठरवलेली उदिष्टे साध्य करता आली नाहीत की विषाद दाटून येतो. नैराश्य, चिडचिड, भांडण हे ठरलेले. उलट असा काही गोल, काही एंडपॉईंट ठरवणेच मुळी गैर आहे. नव्यानं रुजू पहाणारं हे नातं, त्याला आपल्या गतीनी वाढू द्यावं, बहरू द्यावं. कोणतीही खास अपेक्षा न ठेवता, समान पातळीवर येऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद देणे-घेणे शिकायचे आहे, असा विद्यार्थी-भाव जागृत ठेवावा. बाकी आपोआप जमून जाते. त्यातून नाहीच जमले तर मग वैद्यकीय सल्ला घ्यावा. सार्वजनिक मुताऱ्यातून मिरवणाऱ्या, जाहिरातबाज, लिंगवैदूंची मदत मुळीच घेऊ नये.
सेक्सचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करता येईल याही शोधात बरीच मंडळी असतात. कामसौख्य जास्तीजास्त वेळ मिळावं अशी अपेक्षा काही गैर नाही. ताकद वाढवण्यासाठीची बक्कळ औषधे बाजारात आहेत, त्यांचे कर्ते आणि विक्रेते, बक्कळ पैसे मिळवून आहेत;  पण त्यातील एकही औषध सिद्ध झालेले नाही. शक्तीची आणि सुखाची अशी गुटिका मुळी नाहीच्चे; जरी त्या बाटल्यांवर अबलख घोड्याचे चित्र छापले असले तरी. तेंव्हा स्टॅमिना वाढवण्यासाठी एरवी जे आपण करू तेच करणे गरजेचे आहे. निर्व्यसनी असणे, नियमित व्यायाम करणे, योग्य आहार, उल्हसित चित्तवृत्ती हेच कामसुखाचे रहस्य आहे. पोर्नोग्रोफिक फिल्ममध्ये अर्धा-अर्धा तास चालत असले तरी प्रत्यक्षात मानवी संबंध अगदी अल्प काळ टिकतात. ‘लवकर वीर्यपतन होतं’ ही तक्रार ग्राह्य धरायची तर ‘लवकर’ची शास्त्रीय व्याख्या म्हणजे एक मिनिटाच्याही आत वीर्यपतन होणे!! याहून अधिक काळ संभोग समाधी टिकत असेल तर तो संभोग दैवी नसला तरी मानवी खचितच आहे. उगीच खंतावण्यात अर्थ नाही.
सेक्सच्या बाबतीत मुलांनीच पुढाकार घ्यावा, सर्व काही ‘करावं’ अशी अपेक्षा असते. मुळात मुलांत कामेच्छा जास्त असते आणि मुलींचा निव्वळ सहनशील सहभाग असतो, अशीही प्रचलित समजून आहे. हे ही सत्य नव्हे. पुरुषप्रधान व्यवस्थेत या बाबतीत पुढाकार घेणारी, मोकळेपणाने इच्छा, अनिच्छा, व्यक्त करणारी मुलगी ही फारच फॉरवर्ड, ज्यादा, किंवा चवचाल वगैरेही समजली जाते. लिंग संबंधात सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे संवादाचा अभाव. आपल्याला काय हवंहवंसं वाटतं, काय नकोसं वाटतं हे पती पत्नींनी एकमेकाला अगदी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे सांगायला हवं. कामक्रीडेदरम्यान एरवी नकोसे वाटणारे स्पर्श, दर्प, वेदना हवीहवीशी वाटू लागते, सुखाची ठरू लागते. हे प्रत्येकाच्या बाबतीत, प्रत्येक वेळी  वैविध्यपूर्ण असते. हे जोडीदाराला ‘कळवणे’ म्हणूनच आवश्यक ठरते.
एखाद्या मुलीचे व मुलाचे पूर्वी शरीरसंबंध झाले होते अथवा  नाही हे समजण्याचा कोणताही खात्रीचा मार्ग नाही. त्या व्यक्तीचा शब्द आणि तुमचा विश्वास, बस्स एवढंच. जशी आर्थिक अथवा इतर व्यवहारात फसवणूक होऊ शकते तशी ती लैंगिक व्यवहारातही होऊ शकते. कोणी समलिंगी असूनही घरच्यांच्या दबावापोटी लग्न करतात आणि मग दोघांचीही आयुष्य उध्वस्त होतात. कोणी एकनिष्ठतेचा आव आणतात आणि हा केवळ आव असल्याचं उशिरा लक्षात येतं...किती प्रकार वर्णावेत? प्रेमविवाह असेल, पूर्व-परिचयातून लग्न ठरले असेल, तर हे प्रकार घडण्याची शक्यता कमी, पण शून्य नाहीच. यावर काही प्रतिबंधक उपायही नाही. ‘जोडीदाराची विवेकी निवड’सारख्या उपक्रमातून या प्रश्नांची चर्चा होते, या प्रश्नांची  जाणीव होते, एकमेकांची मते, स्वभाव ‘चहा-कांदेपोहे’ प्रकारापेक्षा जरा अधिक कळतात; त्यामुळे अशा सारखे उपक्रम निकडीचे ठरतात.
थोडक्यात काय, अशा प्रश्नासाठी औषधाची मात्रा शोधण्यापेक्षा माहितीची मात्रा लागू पडते. माहिती मिळण्याचे उत्तम स्रोत म्हणजे, डॉ. विठ्ठल प्रभू यांची पुस्तके. ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाचा मी आवर्जून उल्लेख करीन. युट्यूबवर माझा चॅनेल आहे. युट्यूबवर जाऊन नुसतं ‘Shantanu Abhyankar’  असं टाईप केलं की हा चॅनेल उघडेल. यात एकूणच लैंगिकतेविषयक ३०-३५ व्हिडीओ आहेत. त्यात मी वेळोवेळी भरही घालत असतो. प्रश्न विचारल्यास उत्तरही देत असतो. हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. शेअर करा. योग्य माहिती पोहोचवण्यास मदत करा. पाच महिन्यात याला पाच कोटीहून अधिक हिट्स मिळाले आहेत. हे मी अभिमानाने सांगत नाहीये. उलट या परिस्थितीने मला अस्वस्थ वाटतं. एकूणच आरोग्य व्यवस्थेकडून तरुणांच्या कुतूहलाची योग्य, शास्त्रीय उत्तरे देण्याची किती प्रचंड निकड आहे आणि त्याकडे किती प्रचंड दुर्लक्ष होतंय हेच या आकडेवारीतून स्पष्ट होतंय.





Monday, 17 December 2018

ऐकावं ते नवलच!


ऐकावे ते नवलच
डॉ. शंतनू अभ्यंकर

‘तान्ह्या बाळाला ऐकू येतं का हो?’
‘येतं की! नाही का जर्राsss मोठा आवाज झाला की ते दचकतं?’
हे उत्तर चुकीचे आहे. आणि ‘तान्ह्या बाळाला ऐकू येतं का हो?’ हा प्रश्न  भोंगळ आहे म्हणून उत्तर चुकीचे मिळाले आहे. आपण नेमका प्रश्न विचारला पाहिजे. तो असा की, सगळ्याच तान्ह्या बाळांना ऐकू येतं का? १००%? का जन्मजात श्रवणदोष असतो? असू शकतो?
उत्तर आहे, काहींना श्रवणदोष, जन्मजात बहिरेपणा, असू शकतो. सुमारे हजारेक बाळांत श्रवणदोषवाली आठदहा बाळं निघतात.  पण ही आठदहा म्हणजे कोणती हे निव्वळ बाळाकडे बघून ओळखता येत नाही. अनुवंशिक आजार, सी.एम.व्ही.  इन्फेक्शन, प्रसूती दरम्यान मूल गुदमरणे, तान्हेपणी तीव्र स्वरुपाची कावीळ, मेनिंजयटीस, कमी दिवसाची बाळे, आईने अनवधानाने घेतलेली काही औषधे, कान फुटणे, कानाला इजा... अशा कशाकशानी तान्हेपणीच बहिरेपणा उद्भवण्याची शक्यता जास्त.  पण यांना शक्यता जास्त म्हणजे बाकीचे यातून सुटले असे नाही. त्यांना बहिरेपणाची शक्यता कमी, पण शून्य नाही. त्यामुळे तपासणी सगळ्यांचीच व्हायला हवी. निव्वळ अति जोखमीच्या,  निवडक बाळांसाठी तपासणी करत बसलं, तर सुमारे ४०% जन्मजात कर्णबधीर मुलं या तपासणीला मुकतील. म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची तपासणी करायलाच हवी.
का करायला हवी? कारण नाही केली तर जन्मजात बहिरेपणा लक्षात यायला दीड ते दोन वर्ष लागतात. आपलं छकुलं चांगलंच  आहे असा ठाम विश्वास असतो प्रत्येकाला. त्यात काहीतरी न्यून आहे असा विचारसुद्धा नकोसा वाटतो. त्यामुळे,
‘बाळ अजीबात दचकत नाहीये.’
‘कितीही मोठ्ठा आवाज झाला तरी झोप चाळवत नाही याची.’
अशी वाक्यं कानाआड केली जातात. ‘डॉक्टरला दाखवा’ असं सांगणारा व्हिलन ठरतो. अप्रिय आणि क्लेशदायक वास्तवाचा स्विकार नकोसा वाटत असतो. पण ही नकारघंटा आत्मघातकी ठरते. कारण एवढ्या दिवसात बाळाच्या मेंदूत ब्रोकाज एरिया म्हणून जो भाग असतो त्याची वाढ पूर्ण होते. ह्या एरियात आवाजाचा अर्थ लावला जातो, ऐकलेल्या आवाजाची  नक्कल करायची सवय इथे लागते. आपण बोलतो, भाषा शिकतो ते या भागामुळे. पण या भागावर जर आवाजच पोहोचला नाही तर ही क्षमता मुळी निर्माणच होऊ शकत नाही. मूल ऐकू शकत नाही सबब बोलूही शकत नाही. जन्मतः बधीर मुलं, ही मुकीही असतात ते यामुळेच.
एकदा वय वाढल्यावर, ब्रोकाज एरियाची वाढ पूर्ण झाल्यावर, मूक (बधीर) मुलाला बोलायला शिकवणे किती अवघड असते हे मी सांगायला हवं असं नाही. अशा मुलांच्या पालकांच्या  अनेक कथा तुमच्या वाचनात असतील. मूकम् करोति वाचालं, हे पंगुं लंघयते गिरीम् इतकच कठीण.
श्रवण नाही तर वाणी नाही, वाणी नाही तर भाषा नाही, भाषा नाही तर संभाषण नाही, संभाषण नाही तर सामाजिक विकास नाही आणि बौद्धिक विकासही नाही असं दुष्टचक्र चालू होतं. मुळात श्रवणदोष हे एक अदृश्य अपंगत्व आहे. त्यामुळे त्याचं गांभीर्य एरवीही आपल्या लक्षात येत नाही. कोणी पांगळा, थोटा, आंधळा दिसला तर आपोआपच सहानुभूतीचा, मदतीचा हात पुढे होतो. पण बहिरेपणा उघडपणे दिसत नसल्यामुळे पटकन सहानुभूती  किंवा मदत मिळत नाही. उलट अशी माणसं बरेचदा कुचेष्टेची धनी होतात, सिनेमा नाटकात विनोदाच्या जागा यांच्या! (खरंतर पांढऱ्या काठीसारखी काहीतरी सहज नजरेस येईल अशी खूण अशा व्यक्तींनी वापरली पाहिजे.)   
जन्मतः बहिरेपणासाठी तपासणी असते. जन्मतः तिसऱ्या दिवसाच्या आसपास करायची असते. ओएई तिचं नाव. ओएई म्हणजे ओटो अकॉस्टिक एमिशन टेस्ट. अक्षरशः दहा मिनिटाचे काम. इथे इयरफोन सारखी एक बारकी गुंडी बाळाच्या कानाशी लावली जाते. यातून कानात काही ध्वनीलहरी सोडल्या जातात. परिणामी निर्माण होणाऱ्या अंतरकर्णातील विद्युतलहरी या यंत्राद्वारे मोजल्या जातात. साद-प्रतिसादाचा हा खेळ आपल्याला ऐकण्याबद्दल काही सांगून जातो.
सादाला प्रतिसाद मिळाला नाही तर त्याचा अर्थ आतलं सर्किट ड्यामेज आहे असा होतो. पण ही खात्रीची तपासणी नव्हे. ही चाचपणी (Screening Test). मग पुढील तपासणी करावी लागते ही जास्त गुंतागुंतीची, जास्त खर्चिक, पण खात्रीची. पण अर्थात अगदी क्वचित करावी लागणारी. याला म्हणतात बेरा (BERA. Brain Stem Evoked Responce Audiometry).
सहा महिन्याच्या आत नेमके निदान होऊन उपचार सुरु व्हायला हवेत तरच जास्तीजास्त फायदा मिळतो. तान्ह्या मुलातही श्रवणयंत्र बसवता येतं. आई-बाप पुरेसे जागरूक आणि चिकाटीचे असतील तर वाचादोष टाळता येतो. जागरूकता आणि चिकाटी महत्वाची खरीच. कारण श्रवणदोष हा नाही म्हटलं तरी दुर्लक्षितच रहातो, कमीपणाचा मानला जातो. मोठी माणसंसुद्धा चष्मा कौतुकानी मिरवतील पण श्रवणयंत्र घालयाची त्यांना लाज वाटते. थोरांची ही कथा तर पोरांचं (म्हणजे त्यांच्या आईबापांचं) विचारायलाच नको. आता आधुनिक उपचारही उपलब्ध आहेत. कॉक्लीअर इम्प्लांटसारखे उपचार खूप खर्चिक आहेत पण आयुष्यभरच्या पंगुत्वापेक्षा स्वस्तच म्हणायचे. शिवाय निरनिराळ्या सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अगदी मोफत उपचारही होऊ शकतात. पण हे झालं पुढचं. मुळात जन्मतः तपासणीच केली जात नाही. अशा तपासणीची माहितीच नसते. माहिती असली तर तशी सोयच नसते. सोय असली तर तपासण्याची वृत्ती नसते. 

हे झालं बाळाला ऐकू येतय व नाही याच्या तपासणीबद्दल. अर्थात बाळाला ऐकू आलं याचा अर्थ ते तुमचं ऐकेलच असं नाही हं. ते तुमच्या आज्ञेत राहील का नाही हे ओळखणारी तपासणी अजून निघायची आहे.




Tuesday, 4 December 2018

स्तनपान बालकांचा अग्रहक्क.


स्तनपान बालकांचा अग्रहक्क.
डॉ. शंतनू अभ्यंकर
भारतीय समाजाला स्तनपानाचं महत्व पटवून सांगण्याची काही गरज नाही. अनेक बॉलीवूड स्टारांनी आपपली अतिमानवी करतूद ही, पैदा होतेही मां का दूध पिल्यामुळे असल्याचं साफ सांगून टाकलेलं आहे. ते असो, पण अतिमानवी जरी नाही तरी मानवी शक्ती मात्र आईच्या दुधातून प्राप्त होते यात अजिबात अतिशयोक्ती नाही. बाळाची जोमदार, सुदृढ वाढ, त्याची प्रतिकारशक्ती, त्याची बुद्धी, मानसिक आणि भावनिक वाढ इतकंच नाही तर मोठेपणी उद्भवणारे दमा, अॅलर्जी, रक्तदाब या सारखे आजार हे स्तनपानामुळे होत नाहीत हे ही  आता स्पष्ट आहे.
    तेव्हा स्तनपानाला आणि तेही वरचे काहीही न देता, फक्त आणि फक्त अंगावरचे दूध, जास्तीजास्त काळ देण्याला पर्याय नाही.
स्तनाची रचना
          दूध स्त्रवणाऱ्या पेशींचा समूह, पेशी समूहाभोवती स्नायुंच्या पेशी आणि स्तन्य स्तनाग्रापर्यंत आणणाऱ्या १५ ते २० वाहिन्या अशी स्तनाची रचना असते. अगदी स्तनाग्रापर्यंत पोहचण्यापूर्वी या दुग्धवाहिन्या जरा फुगीर बनतात. स्तनाग्राच्या काळ्या भागाखाली हा फुगीर भाग असतो. स्तनाग्रात आणि त्याभोवतीच्या काळ्या भागात भरपूर नसा (Nerves) असतात. त्यामुळे स्तनाग्राला झालेल्या हलक्याश्या स्पर्शाचीही आपल्याला जाणीव होते. स्तनाग्राभोवती बारीक ‘पुरळ’ आलेलं असते. हे ‘पुरळ’ म्हणजे तेल स्त्रवणाऱ्या ग्रंथी होत. यामुळे स्तनाग्र मऊ आणि लवचिक राहतात.
          ही दुग्धनिर्मिती व्यवस्था सर्व स्त्रियांमध्ये सारख्याच प्रमाणात असते. स्तनांचा आकार कमी जास्त असतो, तो यांच्यामधील मेदाच्या प्रमाणामुळे. म्हणजेच स्तनांच्या आकार-उकाराचा आणि यशस्वी स्तनपानाचा अर्थाअर्थी संबंध नाही.
          स्तनपानाच्या क्रियेमुळे मातेच्या शरीरात प्रोलॅक्टीन नावाचे संप्रेरक स्त्रवते. बाळ लुचू लागले की, स्तनाग्रापासून मेंदूला प्रोलॅक्टीन सोडण्याबद्दल संदेश जातात आणि मग मेंदूच्या तळाशी असलेल्या पिट्युटरी ग्रंथीतून हे झरू लागते. बाळांनी पिवून पिवून स्तन रिक्त झाले किंवा रात्री-अपरात्री बाळाला पाजलं की प्रोलॅक्टीन आणखी जोरात येतं. दिवसभरात कितीदा आणि किती जोशात बाळ पितं यावर दूध तयार होणं अवलंबून असतं. म्हणूनच कुणाला जुळी असतील तर आपोआपच बराच वेळ आणि दिवसरात्र पाजत रहावं लागतं; आणि दोन्ही बाळांना पुरेल एवढं दुध निश्चित तयार होतं. भरपूर दूध येण्यासाठी बाळाला अधिक वेळा, अधिक काळ आणि विशेषतः रात्री अंगावर घेणं आवश्यक आहे. दूध पिळून काढलं तरी प्रोलॅक्टीनचा प्रवाह वाढू लागतो. (म्हणूनच अंगावरचं दूध बंद करायचं असेल तर दूध पिळून काढून ते ‘संपत’ नाही, उलट जास्त तयार होतं. बाळाला न पाजणे हाच त्यावर उपाय.)
          बाळाला वरचं काहीही दिलं (अगदी एखादा-दुसऱ्यावेळी जरी बाटलीनी पाजलं) तरी बाळ कमी ओढतं आणि प्रोलॅक्टीन कमी होवून दूध आटतं. पाणी, साखरेचे पाणी, मध, कसली कसली चाटणं, काढे, ग्राईप वॉटर, अनेकविध टॉनिके आणि नवजात शिशु आहार वगैरे मुळेही हाच परिणाम होतो. जर काही कारणांनी स्तनांना इजा होवून ते दुखत, ठणकत असतील तरी दूध कमी येतं.
         प्रोलॅक्टीन प्रमाणेच ऑक्सिटोसिन हे संप्रेरकही स्तनपानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. बाळ पिऊ लागताच मेंदूच्या तळातील पिट्युटरी ग्रंथीतून हेही स्त्रवते. ऑक्सिटोसिनमुळे स्तनातील दुग्धपेशीभोवतीच्या स्नायूपेशी आकुंचन पावतात आणि दूध स्तनाग्रातून सहजी बाहेर पडू लागते. यालाच पान्हा फुटणे असं म्हणतात. बाळ पिऊ लागताच स्तनात आवळल्यासारखं होतं आणि पान्हा फुटण्याच्या या प्रक्रियेमुळेच दुध येतं. बाळ पितं ते नुसतं बाळाच्या ओढण्यामुळे नाही तर आईच्या ‘सोडण्यामुळे’ सुध्दा. कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी वेळात बाळाला पूर्ण आहार मिळण्यासाठी या दोन्ही क्रिया आवश्यक आहेत.
        आई जर चिंतीत असेल, तिला लाज वाटत असेल अथवा स्तनपानाबाबत नकारात्मक भावना असेल तर या सोडण्याच्या क्रियेत बाधा येते.
        नीट दुग्धपान करता यावं म्हणून निसर्गानंच बाळाला काही अभिजात हालचाली बहाल केल्या आहेत. ‘शोधणे’, ‘ओढणे’ आणि ‘गिळणे’ या त्या तीन हालचाली होत. बाळाच्या तोंडाला आणि गालाला स्तनाग्राचा स्पर्श होताच बाळ त्या दिशेला मान वळवून; ‘आ’ करून शोधाशोध सुरु करते. स्तनाग्र सापडताच ‘चोखण्याची’ हालचाल सुरु करते आणि काही घशात पडतच गिळण्याची क्रिया प्रतिक्षिप्तपणे होत जाते.
दूध पिताना बाळ स्तनाग्र आणि भोवतीचा काळा भाग चांगला तोंडात आत ओढून घेते. इतका की ब्लालच्या तोंडात स्त्नाग्राची एक लांबोडकी नळी तयार होते. हिच्या टोकातून येणाऱ्या दुधाच्या धारा थेट बाळाच्या घशात पडतात. जीभेची पुढेमागे हालचाल करत, टाळं आणि जीभ यांच्यामध्ये स्तनाग्र पिळून पिळून बाळ दूध ओढून घेते. हे सारं व्यवस्थित होण्यासाठी बाळाला योग्य रीतीने अंगावर घेणं महत्वाचं आहे. यासाठी आईनं अगदी आरामात, पाठीला किंचित बाक काढून बसायला हवे. (अपवादात्मक परिस्थितीत झोपूनही पाजता येतं) बाळानं टोकापाशीचा काळा भाग पूर्णतः तोंडात धरला पाहिजे आणि तरीही श्वासासाठी बाळाचं नाक मोकळं रहायला हवं.
स्तनपान म्हणजे मायलेकरांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना. यासाठी अगदी गरोदरपणातचं तयारी करणं महत्वाचं आहे. उदा. स्तनांची बोंडं काही वेळा आत ओढलेली असतात, ती हलकेच चोळून बाहेर ओढणं महत्वाचं आहे. बाळ जन्मतःच त्याला अर्ध्या तासाच्या आत पाजावं असं आधुनिक प्रसुतीशास्त्र सांगतं. हे शक्य नसेल तर निदान १२ तासाच्या आत तरी पाजावंच. कारण पहिल्या १२ तासाच्या दुधात जास्तीत जास्त जंतुविनाशक प्रतिपिंडे असतात.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतील तर बाळाला आईच्या कुशीतच विसावू देणं उत्तम. पाश्चात्यांचं आंधळं अनुकरण करणारी काही पंचतारांकित इस्पितळं तान्हुल्यांना खास विभागात ठेवतात आणि प्रसंगोपात स्तनपानासाठी आईजवळ देतात. हे सर्वस्वी अयोग्य आहे. सुदैवानं ही पद्धत आता लोप पावत आहे. कारण पाश्चात्यांनी आपलं डोळस अनुकरण करून बाळ बाळंतीणीजवळ ठेवायला सुरुवात केली आहे.
        काही संशोधकांनी स्तनपानाची वेळापत्रकंही तयार केली होती. पण काळ-वेळ पाळेल ते बाळ कसलं? कालांतराने ही वेळापत्रकही मोडीत निघाली. ‘बाळाला हवं तेव्हा पाजावं, हवं तेवढं पाजावं आणि त्याला हवं तेवढा वेळ पाजावं’ हाच निसर्गनियम आहे आणि तोच आपण पाळला पाहिजे. सुरुवातीला तान्ही बाळंही थोडा त्रास देवून बघतात, सारखं पिण्यापासून ते पिणं सोडण्यापर्यंत खोड्या काढतात. पण सुमारे २ आठवड्यात व्यवस्थित बस्तान बसतं. वेळाही थोड्याबहुत ठरून जातात. २४ तासात सुमारे ८ ते १२ वेळा अंगावर घेतलं तरी पुरतं. मोठ्यांप्रमाणे तान्ह्यांनाही स्वभाव असतो. दारुड्यांसारखंच बाळांचंही असतं. काही बाळं गटागट पितात तर काही घुटके घेत घेत.  तेव्हा बाळ आपणहून दूर होईपर्यंत पाजणं महत्वाचं.
पण काहीवेळा बाळाला अर्धवट दूर करावं लागतं. याचंही विशिष्ट तंत्र आहे. बाळ पीत असताना त्याला ओढून दूर करू नये. तर स्तनाच्या बाजूनी हलकेच आपली करंगळी बाळाच्या तोंडात सरकवावी. बाळाच्या तोंडात हवा शिरली की त्यानं दिलेली ओढ नाहीशी होते, आणि बाळाला सहज दूर करता येतं. बाळ ओढून दूर केलं तर स्तनाग्रांना इजा पोहचते.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतात तेव्हा हे सगळं सहज जुळून येतं. पण काही वेळा एखादं कुणी आजारी पडतं आणि सारं चित्रं पालटतं. कमी वजनाची, कमी दिवसाची मुलं नीट ओढू शकत नाहीत. आईला नागीण, एड्स किंवा हिपॅटायटीस बी वगैरेची लागण असेल तर बाळालाही लागण होवू शकते. अशावेळी तज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. तान्हेपणीच ज्यांना मातृवियोग सहन करावा लागतो. त्यांच्यासाठी ‘ओली दाई’ ठेवण्याची पद्धत असते. एड्सच्या या जमान्यात स्तनपानामुळे बाळाला काही आजार होण्याची शक्यता लक्षात घेवून आता रक्तपेढ्यांसारखी, दुग्धपेढ्यांची कल्पना प्रत्यक्षात येऊ पहात आहे.
योग्य स्थितीत स्तनपान करणारं बाळ कसं ओळखावं?
योग्य स्थितीत स्तनपान करणाऱ्या बाळानं
१.             मोठा ‘आ’ वासलेला असतो.
२.             त्याचा खालचा ओठ बाहेर दुमडलेला असतो.
३.             हनुवटी स्तनाला टेकलेली असते.
४.             गाल चांगले फुगीर दिसतात.
५.             स्तनाचा काळा भाग जवळ जवळ दिसत नाही.
६.             बाळ प्यायचं थांबत आणि पुन्हा पिऊ लागतं.
७.             बाळाचा घुटके घेण्याचा आवाज येतो.
८.             हा सारा कार्यक्रम शांत चित्तानं चाललेला असतो.
९.             आईला दुखणं, खुपणं वगैरे काहीही त्रास जाणवत नाही.
बाळ पित नसेल तर...............
१.             बाळ आजारी नाही याची खात्री करा.
२.             दिवसा अगर रात्री बाळ रडताच लगेच अंगावर घ्या.
३.             बाळ पिता पिता झोपल्यास त्याला कानामागे गुदगुल्या करून हलकेच जागं करा.
४.             अंगावरच्या शिवाय ‘वरचं’ काही देवू नका.

बाळ वारंवार पीत असेल तर...........
      तासाभरापेक्षाही लवकर लवकर बाळाला घ्यावं लागतं असेल तर बहुदा प्रत्येकवेळी बाळाला पोटभर दूध ओढता येत नसावं. बाळाला एका वेळी एक बाजू रिकामी होईपर्यंत त्याच बाजूला पाजणे महत्वाचे आहे. जे दूध येते त्यात सुरवातीच्या दुधात पाणी अधिक असते. त्यामुळे आधी बाळाची ठाण तेवढी भागते. नंतरच्या दुधात अन्न असते. त्याने भूक भागते. जर बाळाला थोडावेळ एका बाजूला आनिनात्र थोडावेळ दुसऱ्या बाजूला पाजलं तर बाळ सुरुवातीला येणारं ‘तहान दूध’ पीतं मात्र नंतर येणार ‘भूक दूध’ पीतच नाही. ते लगेच ठणाणा करायला लागतं. मग आईच्या आहाराला किंवा दृष्ट लाग्ण्याला बोल लावले जातात. यासाठी.......
१.             बाळाला अंगावर पाजण्याचं योग्य तंत्र समजावून घ्या.
२.             एक बाजू पूर्ण रिक्त झाल्यावर मगच दुसऱ्या बाजूला घ्या.
३.             बाळाने आपणहून सोडेपर्यंत त्याला पाजत रहा.
नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत अपुरी रजा ही एक अडचण असू शकते. अशांनी..........
१.             शक्य तर सहा महिने पर्यंत रजा घ्यावी.
२.             शक्यतितके दिवस निव्वळ स्तनपान द्यावं.
३.             चौथ्या महिन्यानंतर ‘वरचा’ आहार सुरु करावा.
४.             कामावर रुजू झाल्यावर –
                                                                                                   i.          अगदी घराबाहेर पडण्यापूर्वी.
                                                                                                 ii.           घरी परत आल्या आल्या.
                                                                                               iii.           रात्री झोपण्यापूर्वी.
                                                                                               iv.          अधून मधून रात्रीही स्तनपान द्यावं.
५.          सुट्टीच्या दिवशी मुलाला जास्त वेळा घ्यावं.
६.          आई नसताना बाळाला पाजण्यासाठी अंगावरचं दूध पिळून काढून ठेवता येतं. बाहेर ठेवल्यास ८ तास आणि फ्रीजमध्ये २४ तासांपर्यंत हे टिकतं. मात्र हे पाजताना बोंडलं, वाटी, चमचा पूर्णतः निर्जंतुक हवा. बाटली वापरू नये. बाळाला निरसं दुधचं पाजावं. दूध गरम करू नये अथवा उकळू नये.