Showing posts with label साथ. Show all posts
Showing posts with label साथ. Show all posts

Wednesday, 24 June 2020

माझे म्हणा 'करोनाकरा'

माझे म्हणा ‘करोनाकरा’

डॉ. शंतनु अभ्यंकर

९८२२०१०३४९  

 

करोनाच्या साथीने आम्हाला बरंच काही शिकवले आहे.  घरात ‘निष्काम’ बसायला लावून अंतर्मुख केले आहे. त्याचबरोबर सारे वैद्यक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान; सारी वैद्यकसृष्टीच जणू  पणाला लागली आहे. एकूणच एका अतीसूक्ष्म शत्रूशी दोन हात करता करता त्या शत्रूच्या काही खोडी आता माहिती झाल्या आहेत आणि त्यानुसार शस्त्रास्त्र परजणे चालू आहे. या ज्ञानसंचिताचा हा मागोवा.

 

म्हटलं तर १२५ नॅनोमीटर इतका सूक्ष्म आणि जेमतेम ३० गुणसुत्रांची लड बाळगून असलेला हा सार्स कोव्ह २ नामक  इवलासा जीव. ह्याला  जीव म्हणावं का हा सुद्धा प्रश्नच आहे जीवशास्त्रापुढे. पण  ह्या विषाणूला जणू दहा हात आहेत आणि एकाच वेळी वेगवेगळ्या हाताने तो माणसाच्या वेगवेगळ्या अवयवांवर घाव घालत असतो. ह्याच्या चित्रात जी शिंगं  शिंगं  दिसतात ना  तुम्हाला त्याच्याच मदतीनी हा आपल्या पेशींना चिकटतो. त्यातही एसीई नावाचं द्रव्य असलेल्या पेशी याच्या विशेष लाडक्या. मधुमेहींत तर एसीई जरा जास्तच असतं. म्हणून मधुमेहींवर हा मोहित. हे एसीई असतं फुफ्फुसात, आतडयात आणि रक्त वाहिन्यांत. म्हणूनच  फुफ्फुसे, श्वसन, पचन,  रक्त साकळण्याची क्रिया वगैरेंवर हा मर्मभेदी  हल्ला करतो.  

 

सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट ही की जवळपास ८०% लोकांना ह्या  विषाणूची लागण झाली तरी बाधा होत नाही. हे  लोक आपोआप बरे होतात. उरलेल्या विसातील  जवळपास १७ लोक वाचतात. शंभरी तीन जणं मृत्युमुखी पडतात. थोडक्यात करोना बरा करणारं औषध जरी नसलं तरी ३ वगळता बाकीचे १७   वाचतील असे उपचार मात्र आहेत.   

 

आजाराची सुरुवात तशी आस्ते कदम होते. पांढऱ्या पेशी कमी होतात.  बऱ्याच विषाणूजन्य आजारांचे हे एक लक्षण. मग सीआरपी, फेरिटीन, डी डायमर या दूतांद्वारे शरीरात सूज पसरत असल्याचा सांगावा येतो. सुमारे चौदा दिवसानंतर हा विषाणू शरीरात सापडत देखील नाही. पण त्याच्यामुळे आलेली सूज ही चालूच रहाते. ही सूजच घातक ठरते.  

 

शरीरात कोणताही परका  पदार्थ शिरला,  मग तो एखादा व्हायरस असो, बॅक्टेरिया असो, अथवा मलेरियाचा परोपजीवी असो, त्याचा शरीरात जिथे वास तिथे  आजूबाजूला सूज येते.  सूज म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीने त्या शत्रूविरुद्ध रचलेला चक्रव्यूह.  यामुळे शत्रूचा नायनाट केला जातो पण काही वेळा, करोनासारख्या विषाणूमध्ये, हे गणित चुकतं.  लाभ होण्याऐवजी शरीराची हानी होते. अती  प्रमाणात सूज येते, सर्वदूर सूज येते आणि विषाणू नष्ट होऊनही सूजेवर आपलेच नियंत्रण राहत नाही. आपल्याच प्रतिकारशक्तीचा उलटा  फटका आपल्यालाच बसतो. सेल्फ गोल किंवा सेल्फ व्हीकेट सारखी अवस्था ही. अति–प्रतिकारशक्तीचा प्रताप हा. म्हणजेच प्रतिकारशक्ती ही सुद्धा संतुलित असावी लागते. अति इम्यूनीटीमुळे होणारे शेकडो आजार आहेत. आर्सेनीक अल्बम वगैरे   तथाकथित ‘इम्यून बूस्टर’ तथाकथित आहेत हेच ठीक आहे. नाहीतर आफतच ओढवली असती!!!!   

अशी सूज येऊ नये आणि आलीच तर आटोक्यात राहावी  म्हणून हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन,  इंडोमेथॅसिन, डेक्झामेथाझोन, टॉकयूलिझीमॅब   अशी औषधे वापरली जात आहेत.  

 

या विषाणूचे काही गुणधर्म जिवाणू सदृश आहेत, बॅक्टेरियासारखे आहेत, त्यामुळे अझिथ्रोमायसीन सारखे (अँटिबायोटिक) प्रतिजैविक वापरले जाते.

 

या सूजेच्या परिणामी आपल्या शरीरात त्या त्या परकीयाविरुद्ध प्रतीपिंडे (Antibodies) तयार होतात. आजारातून नुकतेच उठलेल्या व्यक्तीत अशी तयार प्रतीपिंडे असतातच असतात. ही अशी रेडिमेड प्रतीपिंडे नव्या आजाऱ्यांना टोचायची आणि आजार रोखायचे ही देखील जुनीच युक्ति आहे. रेबिज, धनुर्वात अशा आजारात अगदी रामबाण ठरलेली ही युक्ति.  करोंनाविरुद्ध हिचे सामर्थ्य अजमावून पहाणे चालू आहे.  

 

या सर्वदूर सुजेबरोबरच प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्स म्हणजे खरं तर रक्तातील काही खास पेशींचे कपटे. यांचा मुख्य उपयोग रक्तवाहिन्यांची सातत्याने दुरुस्ती करण्यासाठी होतो. केशवाहिन्या (Capillaries) अतिशय नाजुक असतात. रोजच्या रोज त्यांना बारीक छिद्रे पडत असतात. ही  सूक्ष्म छिद्रे तातडीने बुजवली नाहीत तर त्या ठिकाणी  आतल्याआत रक्तस्त्राव होत राहतो. इतकेच काय रक्तवाहिन्यांची अंत:त्वचाही  अतिशय हळवी असते.  काही कारणाने, उदा: सूज येऊन, ती  खडबडीत झाली तर ती ताबडतोब गुळगुळीत करावी लागते. हे प्लेटलेट्सच्या गिलाव्याने साधले जाते. जर हे साधले नाही तर  तिथे रक्त साकळून बसते. प्रवाह थांबतो. अशाप्रकारे रक्तप्रवाह कुंठीत होणे कोणत्याही प्रकारे परवडण्यासारखे नसते.  त्यामुळे  प्लेटलेट्स कमी झाल्या की एका बाजूला रक्तस्रावाचा धोका वाढतो आणि त्याच वेळी रक्त ठिकठिकाणी साकळून बसते.

 

रक्त प्रवाहित राखण्याची नैसर्गिक  क्रिया ही अतिशय गुंतागुंतीचे संतुलन साधून असते. तलवारीच्या पात्यावर चालल्यासारखेच आहे हे.  मात्र करोनासारख्या आजारांमध्ये दोन्हीकडचा तोल सांभाळता सांभाळता, आपला जणू दोन्हीकडे तोल जातो आणि पेशंट तलवारीच्या पात्यावरच पडतो.

 

काही पेशंटमध्ये हाडातील मगजावर हा व्हायरस हल्ला चढवतो.  इथे आपल्या रक्तातील विविध पेशी बनत असतात. पेशींच्या कारखान्यावर हल्ला झाल्यामुळे अशा रुग्णात पांढऱ्या पेशी कमी होतात.  प्रतिकारशक्ती डळमळीत होते. अशा पेशंटला इतर इन्फेक्शन्स सहज होतात. हे तर चक्क  एचआयव्हीसारखं  वागणं झालं.  त्यामुळेच एचआयव्ही विरोधी औषधे (उदा: रेमडेसीव्हीर)   वापरून पाहिली जात आहेत. 

 

आपली फुफ्फुसे हे या विषाणूचे लाडके मैदान.  ताप, खोकला, धाप आणि अंतिमतः प्राणवायूचे चलनवलन बंद होऊन प्राणोत्क्रमण हे सारे या फुफ्फुसातल्या सुजेमुळे घडते. पण करोनाचे वैशिष्ठ्य हे की  यात शरीरातील प्राणवायू कमी कमी होत जातो  मात्र त्या मानाने रक्तातील कार्बन डाय ऑक्साईड फारसा वाढत नाही.  यामुळेच की  काय, पेशंट अगदी सावध आणि दिसायला बरा दिसत असतो पण ऑक्सिजन मात्र चिंताजनकरित्या कमी झालेला  असतो.   अशा अवस्थेला हॅपी हायपॉक्शिया (सुखद घुसमट!!) असं नाव आहे.

 

जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा जणू कडेलोट होतो.  झपाट्याने पेशंट रसातळाला जातो.  त्यामुळे ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, प्लेटलेट,  डीडायमर हे सातत्याने तपासत राहावे लागते. फुफ्फुसातल्या सुजेमुळे सायटोकाईन नावाची द्रव्ये तयार होतात.  सायटोकाईन  वाढल्यामुळे रक्त साकळण्याची क्रिया जलद होते आणि शरीरात बारीक-बारीक रक्तवाहीन्यात सर्वदूर रक्त साकळून राहते.  ज्या  त्या अवयवाला ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे देखील रक्त साकळते. सारे अवयव  जवळ एकाच वेळी गळाठून जातात. आणि पाठोपाठ  येते  ‘सायटोकाईन स्टॉर्म’! सायटोकाईनची   जणू ढगफुटी होते.  एखाद्या वादळात सारे होत्याचे नव्हते व्हावे, तसे फुफुसाचे कार्य थोड्याच कालावधीत पूर्णतः बाधित होऊन जाते.  बहुतेकदा यातच पेशंटचा मृत्यू होतो.

 

पण करोनाच्या कारनाम्यावरच्या लेखाचा हा करुण अंत लवकरच बदलावा लागेल. ही साथ ओसरेल का आणि कधी हे प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. प्रभावी प्रतिबंधक उपाय आणि प्रभावी औषधांचा शोध नेमका कधी लागेल हे अर्थात सांगता येणे शक्य नाही.  पण अनेक साथी  आल्या आणि गेल्या असं  इतिहास सांगतो. त्यातील अनेकांवर प्रभावी लस अथवा औषधं  नव्हती, काहींवर अजूनही नाहीयेत. आजाराच्या साथी बरोबरच भीतीचीही साथ आहे. आधी ही ओसरेल. जगातील बहुतेक प्रजा करोनाचा सामना करून रोगमुक्त होईल. मग हल्ला करायला ताजे भक्ष्य मिळणेच दुरापास्त ठरेल. साथ आटोक्यात येईल. अधून मधून, कुठे कुठे हा जंतू आपले प्रताप दाखवेल.  हे असं इतका वेळ चालू राहील की शेवटी माणसं करोनाकडे एक करूणार्द्र नजर टाकतील, हम साथ साथ है म्हणतील  आणि आपापल्या कामाला  लागतील.

 

नव्या युगाच्या नव्या  तंत्रज्ञानाच्या साथीने माणसाने लढवलेली ही पहिलीच साथ. बिग डेटा,  महाप्रचंड माहिती, आणि त्याचे वेगवान विश्लेषण शक्य झाल्यावर उद्भवलेली, ही पहिलीच साथ. आज हे विश्लेषण आणि विश्लेषणांचे विश्लेषण, क्षणात सर्वांना उपलब्ध होते आहे.  ह्या संगणकाच्या युगात, प्रसिद्धीपूर्वीच शोधनिबंधातली  माहिती आता साऱ्यांना उपलब्ध आहे. कॉपीराईट वगैरे जाऊन आता ‘कॉपी लेफ्ट’, असा प्रकार सुरू झाला आहे.  म्हणजे  इथे कॉपी आहे ज्याला हवी त्याने ती वापरावी. जेनॉमिक्स, ग्लायकॉमिक्स, प्रॉटीओमिक्स अशा अनवट क्षेत्रात धामधूम चालू आहे. नाना देशातले भले बुद्धीचे सागर, ज्ञान मंथनात गुंतले आहेत. या साऱ्या मंथनातून उपचार आणि लसीचे अमृत लवकरच प्राप्त होईल अशी आशा  वाटते ती यामुळेच.   

 

 

 

 

 

 

 


Tuesday, 2 June 2020

हम साथ साथ है

हम साथ साथ है. 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

वेगवेगळे विषाणू, जिवाणू; दर काही वर्षांनी एक नवीन साथ, एक नवीन नाव आणि एक नवीन हाहाकार ऐकायला मिळतो.  नवीन नवीन रोगजंतु येतात तरी कुठून? तुम्हाला वाटेल आपला माल खपवण्यासाठी औषध कंपन्याच हे करत असतील. ही  जैविक युद्धातली अस्त्रेच आहेत असंही तुम्हाला वाटू शकेल. कॉलेजमध्ये शिकताना  तर परीक्षेत प्रश्न विचारायला सोयीचं जावं म्हणूनच हे नवे भुंगे निर्माण होतात असं मला वाटायचं!   
पण खरंतर माणूस आणि जंतू असं द्वैत कधी नव्हतंच.  आपण आणि जंतू एकमेकांच्या साथीने उत्क्रांत झालेले आहोत. 
इतिहासपूर्व काळामध्ये माणूस झाडावरून जमिनीवर उतरला. सवानाच्या गवताळ प्रदेशात शिकार करून, भटकत, कंदमुळं  खात जगत राहिला. ह्या वनवासी, भटक्या माणसाच्या वाट्याला काही आजार येतच होते. इतरही प्राण्यांच्या वाट्याला येत होते. तेंव्हा माणसाचा इतर प्राणिमात्रांशी संबंध निव्वळ भक्ष्य किंवा भक्षक एवढाच होता.  पण मग माणूस नावाच्या पशुने एक अ-पाशवी कृत्य केलं.  त्यानी शेतीचा शोध लावला, प्राणी पाळायला सुरुवात केली आणि घोटाळा झाला. कुत्री, गुरं, डुकरं,  गाढवं, घोडे, शेळ्या, मेंढया, कोंबड्यांपासूनचे आजार त्याला जडायला सुरुवात झाली.  पुढे माणसं गाव-खेड्यातून एकत्र  राहायला लागली आणि मग तर ब्रम्हघोटाळाच  झाला. आजारांचा पोतच बदलला.  साथीचे आजार नावाचा नवाच प्रकार सुरु झाला. बहुतेक साथीचे आजार हे मूलतः पाळीव प्राण्यांची देन आहेत.    
सुमारे तीन  हजार वर्षापूर्वी माणूस पंचक्रोशीतून बाहेर पडला.  व्यापार वाढला, लढाया वाढल्या.  माणूस इकडून तिकडे जायला लागला.  कोसो मैल दूर. आता इकडच्या माणसांना झालेले आजार तिकडच्या माणसांना होऊ लागले.  आजार आता खंडभर पसरू लागले. 
मग आला युरोपीय लोकांनी जग धुंडाळण्याचा कालखंड. नवी क्षितिजे माणसाला खुणावत राहिली. साहसी प्रवासी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला लागले.  या लोकांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका असे (त्यांना) अज्ञात खंड शोधून काढले आणि त्यांच्याबरोबर आजारही एका खंडातून दुसऱ्या खंडात पसरू लागले. नवे जग जिंकायला युरोपीय लोकांना ह्या आजारांची नकळत पण  भलतीच मदत झाली. अमेरिकेतील लोकांनी ह्या  युरोपीय जंतूंचा सामना कधी केला नव्हता. अशा जंतूंविरूद्ध त्यांच्यात प्रतिकारशक्ती कुठून येणार?   त्यामुळे पहिल्या युरोपियन वसाहती स्थापन होताच प्लेग, देवी, गोवर अशा साथींनी अमेरिकी मूळनिवासींची पार वाताहात केली. अमेरिकेत वसाहती शक्य झाल्या त्या पोलाद, बंदुका, घोडे आणि युरोपीय तंत्रज्ञानामुळे. पण ह्याबरोबरच नव्या आजारांनी तिथे नरमेध मांडला होता हेही खरं. साथीच्या डकिणीनी तिथली मूळ जनताच फस्त करायला सुरवात केली, तिथली   व्यवस्था जणू बरखास्त करून टाकली आणि युरोपीय प्रवेश सहज झाला. 
आता तर काय जागतिकीकरण, शहरीकरण हे  मनुष्यप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण झालंय.  त्यामुळे एके ठिकाणी आजाराची ठिणगी पडली की  त्याचा वणवा व्हायला,  जगभर पसरायला, फारसा वेळ लागत नाही.  
युरोपीय लोकांनी आपल्या बरोबर अमेरिकेत आजार नेले असं आपण म्हणतो पण मूलत: अमेरिकेतील लोकांचे आजार युरोपीय लोकांना का बरं  झाले नाहीत? (क्षय आणि उपदंश Syphilis, हे आजार अमेरिकेतले, असं म्हणतात) युरोपीयनांमुळे अमेरिकी उद्ध्वस्त झाले पण मग नव्या प्रदेशात जाऊनही युरोपीय स्वस्थ कसे राहिले? 
ह्याचं उत्तर साथ रोगांच्या वैशिष्ठयपूर्ण जंतू विज्ञानात आहे. आपण पहिले की बरेचसे  साथीचे आजार हे  पाळीव प्राण्यांपासून उद्भवलेले आहेत आणि आख्या होल अमेरिका खंडात पाळीव म्हणावा असा प्राणीच नव्हता!! इन्का, अझ्टेक अशा संस्कृति तिथे नांदत होत्या पण तिथे असणारे प्राणी माणसाळवण्यासारखे नव्हते. ही  एक मोठीच भौगोलिक आणि जीवशास्त्रीय उणीव होती. ही मर्यादाच त्यांना भोवली. अॅण्डीज पर्वतरांगातील  इन्का लोकांनी लामा, अल्पाका वगैरे प्राणी पाळले होते. पण त्यांचा फारसा उपयोग नव्हता. ना  त्यांचा गाडीला जुंपायला उपयोग, ना ओझी वाहायला, ना  शेतीसाठी,  ना  दूधासाठी. लोकर, मांस एवढाच त्याचा उपयोग. त्यामुळे हा प्राणी पाळला तरी, अंगणात गोठा, त्यात कपिला नावाची लामीण, तिला ओवाळणे असला मामला नव्हता. युरोप, आफ्रिका आणि आशियात पाळीव प्राणी हे घरादाराची, संस्कृतीची शान. कोंबड्या, डुकरं, करडं आणि कार्टी अंगणा-परसात एकत्रच चरत असायची. इतक्या घनिष्ठ संबंधामुळेच इकडे साथीचे आजार फोफावले आणि तिकडे ते निर्माणच होऊ शकले नाहीत. 
आजारांच्या या भूगोलात आणखीही बारकावे आहेत. समशीतोष्ण प्रदेशात पाळीव प्राणी जास्त.  घोडे , गाईगुरं, मेंढया, डुकरं   यांची अगदी रेलचेल.  त्यामुळे तिथे पाळीव  प्राण्यांपासूनचे आजार अधिक. ह्या प्रदेशातील महत्वाच्या पंधरा संसर्गजन्य आजारांपैकी आठ (घटसर्प, इनफ्ल्यूएन्जझा ए, गोवर, गालगुंड, डांग्याखोकला, देवी, क्षय आणि रोटाव्हायरस) पाळीव प्राण्यांतून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 
 उष्ण कटिबंधात कीटक बक्कळ. त्यामुळे किटकांपासून पसरणारे आजारी बक्कळ. इथे वानर प्रजातीही  भरपूर त्यामुळे वानर-नर संपर्कातून पसरणारे आजार भरपूर. त्यातही आफ्रिकी आणि आशियाई माकडांशी  आपली जनुकीय जवळीक जास्त. अमेरिकन माकडे याहून दुप्पट जनुकीय अंतरावर. त्यामुळे आशिया-आफ्रिकेत  असा संसर्ग जास्त आणि अमेरिकेत कमी.    
 आज माणसाला आजारी पाडणारे  जवळपास १४०० रोगजंतू आपल्याला माहीत आहेत. यातील  ६०% जंतू हे मूलतः प्राण्यात वास करून होते आणि त्यांच्या सहवासाने ते माणसात उतरले आहेत. काही रोगजंतू तर इतके माणसाळले आहेत की आता ते त्या त्या मूळ  प्राण्यात आढळतच  नाहीत, फक्त मनुष्यप्राण्यात आढळतात.
फक्त प्राण्यांत ते फक्त माणसांत, अशा संक्रमणाच्या काही  अवस्था असतात. म्हणजे रेबीजसारखा आजार प्राण्यांना होतो. माणसाला अगदी क्वचित होतो. त्यामुळे हा आपला कधीमधी येणारा  पाहुणा.  इबोलाची वेगळीच तऱ्हा. चिंपांझी  आणि गोरीलातला आजार हा. शिकारी मंडळींमार्फत इतरांना लागण होते. काही काळ साथ टिकते आणि मग आपोआप ओसरते. डेंग्यू माकडातून डासात आणि डासातून  माणसात येतो.  मग डासातून माणसांमाणसांत पसरतो. साथीच्या लाटा लाटा येत रहातात. आपल्या कपी बांधवांकडून आलेला एड्ससारखा आजार आपल्या कच्छपी लागला आहे.  तो काही आपली साथ सोडायला तयार नाही.  नरनारींमध्ये एड्स पसरायला आता वानरांची गरज उरली नाही. नरनारीच ते काम परस्पर उरकून टाकतात. 
प्राण्यांतून मनुष्यप्राण्यांत उडी मारणे सूक्ष्मजंतूनादेखील सोपं नाही. अनेक अडथळे पार करून हे जंतू मनुष्यात प्रविष्ट होतात. बरेचसे जंतू हे त्या त्या विशिष्ठ जातीतच (Species) टिकू शकतात. त्यातही जवळच्या जातीतले (Species) जंतू जरा सहज इकडून तिकडे जाऊ शकतात. लांबलांबच्या जातीतले जरा मुश्किलीने. म्हणजे माकडे आपली सख्खी चुलत भावंड.  त्यामुळे मर्कट आणि माणूस असे संसर्ग  खूप. पक्ष्यांत आणि आपल्यात जीवशास्त्रीय अंतर जास्त. त्यामुळे द्विजगणांकडून गणांकडे, अशी लागण क्वचित.  एका जातीतून दुसऱ्या जातीत संसर्ग व्हायचा तर काही खास गुणधर्म असावे लागतात. उदा: प्रथिनांची काही विशिष्ठ रचना.  जंतूंना असे गुणधर्म काही विचारपूर्वक निर्माण करता येत नाहीत. ते आपोआप उत्क्रांत व्हावे लागतात. एकूणच हा सगळा कर्मधर्मसंयोगाचा  मामला आहे. शिवाय माणसांना प्रतिकारशक्ती असते. तिचा मर्मभेद करतात  तेच तगतात. 
संसर्गाचा   आणि आजाराचा   काही विशिष्ठ व्यूह निर्माण झाला असेल, काही अटीशर्ती पाळल्या जात असतील, तरच साथ येते. म्हणजे असं की, जंतूची लागण  होताच तो माणूस जर तात्काळ गतप्राण झाला, तर जंतुंचा  प्रसारही थांबणार. मग साथ कशी पसरणार?  त्यामुळे प्रसाराला अवधी  मिळत असेल, प्रसार सहजसाध्य असेल, रोग्यात  प्रतिकारशक्ती उशिरा, जेमतेम   आणि तात्पुरती तयार होत असेल तर असे जंतू साथीला उत्तम. त्यामुळे पटापट माणसांचा घास घेणाऱ्या आजारांपेक्षा सर्दीचा विषाणू अधिक ‘यशस्वी’ म्हणायचा. बाकी करोना-बिरोना या निकषावर फुटकळ!  सर्दी सगळ्यांना होते पण सर्दीपडशाला कोणी ‘बळी’ पडत नाही. ह्या विरुद्धची प्रतिकारशक्तीही जेमतेम आणि तात्कालिक असते. शिवाय हा विषाणूही आपलं रूप बदलत रहातो. त्यामुळे एकच माणूस अनेकदा ‘सर्दावतो’. कोणत्याही वेळी जगभर सर्दीनी त्रस्त माणसे असतातच असतात. सर्दी झाली तरी माणसं हिंडती फिरती असतात आणि इतरांना लागण होत रहाते. विषाणूही  सतत हिंडता फिरता  रहातो. हा खरा परिवाज्रक!   
जंतू वैशिष्ठ्यांसारखी काही जन वैशिष्ठ्येही आहेत. कुठल्याही जंतूजन्य  आजाराची साथ यायची असेल तर मुळात लोकसंख्या भरपूर हवी आणि ती एकमेकांजवळ राहणारी हवी.  तर ते जंतू इकडून तिकडे पसरतील. काही लाख लोक एकत्र नांदत असतील तरच साथ  पसरते असे गणित आहे. इतके सारे लोक एकत्र नांदू लागले ते शेतीचा शोध लागल्यानंतर. सुमारे दहा ते अकरा हजार वर्षापूर्वी. 
या पूर्वीचे, भटक्यांचे आजार जरा वेगळे होते. एखाद्याला जखम झाली, जखमेत स्ट्रेप्टोकोकस सारख्या जंतुंमुळे  पू झाला, पुढे गळू झाला, तरीही लागण त्या त्या व्यक्तिपुरती मर्यादित रहाते. गळवांची काही साथ  येत नाही.    टोळीपुरत्या  साथीही यायच्या पण त्या महामारी म्हणाव्यात अशा नसायच्या. कशा असणार? कारण मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला आसपास मोठ्या प्रमाणावर माणसेच नसायची.  
शिवाय उपलब्ध माणसेही ‘जंतू-नवखी’ हवीत. म्हणजे असं समजा की रंगपंचमीचा सण आहे. रंग म्हणजे जणू  आजाराची लागण आहे. एकदा कपडे रंगलेल्याला रंग लावायचा नाही असा नियम आहे. कारण एकदा लागण झाली की तात्पुरती प्रतिकारशक्ती तरी येते किंवा तो माणूस तरी  मरतो. अशा खेळात गावात सकाळी जल्लोषात सुरू झालेला सण संध्याकाळपर्यंत संपूनच जाईल. सकाळी गावात सगळेच परीटघडीच्या  स्वच्छ कपड्यात, म्हणजे ‘जंतू-नवखे’ असतील. पण जसजसा दिवस चढत जाईल  तसतसे स्वच्छ कपडेवाले संपत जातील. साथीच्या आजारांचं असंच काहीसं होतं. ठराविक प्रमाणात लोकं जंतू बाधित झाली की उरलेल्या जंतू-नवख्यांना आपोआपच अभय मिळतं. हीच ती बहुचर्चित ‘हर्ड इम्युनिटी’ (संघशक्ती). आता साथ ओसरते. 
ह्याला इतरही करणे असू शकतात. कधीकधी रंग संपतो  म्हणून साथ ओसरते. उदाहरणार्थ दूषित पाण्याचा नळ वापरणेच बंद झाले की जुलाबाच्या  साथीचा  मूळ झराच आटतो. ते असो.  
ही संघशक्ती (हर्ड इम्युनिटी) बऱ्याच काळ टिकते. हळूहळू लोकांचे कपडे स्वच्छ होतात, म्हणजेच त्यांची प्रतिकारशक्ती कमीकमी  होते.  गावात नवे जन्म होतात, नवे लोक येतात; पुनः एकदा जंतू नवख्यांची रेलचेल होते. पुनः एकदा स्वच्छ कपड्यांची  गर्दी वाढते.  पुनः एकदा साथीला पोषक वातावरण निर्माण होते आणि पुनः एकदा पंचमीचा सण येतो. मग पूर्वी लोकं म्हणायची, ‘आला बरं का, मरीआईचा फेरा आला. गावातून गाडा फिरवायला हवा, कोंबडं बकरं कापायला हवं.’  

हाताशी भारीभारी अँटिबायोटिक आली  लशी आल्या आणि मरीआईचा गाडा अडगळीत गेला.  देवी निर्मूलनातले आश्वस्त करणारे अनुभव लक्षात घेत काही काळ  असं वाटून गेलं की आता रोगजंतूंमुळे होणारे आजार हे इतिहासजमा होणार. निदान साथीचे आजार तरी आटोक्यात आणता येतील. पण अर्थातच असं काही झालं नाही. उलट हे आजार माणसाच्या पाचवीलाच पूजले आहेत, हे कायमचे आपल्या साथीला आहेत, ही जाणीव पक्की झाली.  
शिवाय मनुष्य जातीत हाहाकार माजवण्यासाठी दरवेळी काही प्राण्यातून मनुष्यप्राण्यात संक्रमण  होण्याची गरज नाही.  आपले नेहमीचे रोगजंतू नेहमीच्या प्रतिजैविकांना दाद देईनासे झाले की आपल्याला तापदायक ठरतात. जंतू कितीतरी वेगाने बदलत राहतात. अशा बदललेल्या  जंतूंच्याही साथी येतात.   उदा: टी.बी.सारखा आजार आता नेहमीच्या औषधांना दाद देत नाही. अशा निर्ढावलेल्या टीबीची साथ आहे सध्या.  त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करायला आपल्याला देखील सातत्याने नवनवीन शस्त्रास्त्र निर्माण करावी लागतात. अशा रेझीस्टंट जंतूंना मारतील अशी प्रतिजैविके सतत  तयार करावी लागतात. हे काम इतकं खार्चिक,  इतकं बेभरवशाचं आणि इतकं किचकट आहे की नवी नवी प्रतिजैविके शोधण्यात औषध कंपन्यासुद्धा फारसा रस घेत नाहीत. गुंतवणूक आणि नफा याचं  गणित किफायतशीर नाही असं त्यांचं म्हणंणं. 
इवले इवले जीव हे. माणसाचं जिणं   हराम करून टाकतात. ल्युएनहोएक ह्या वलंदेजाने (डच माणुस) पहिल्यांदा हे जीव सूक्ष्म दर्शकाखाली बघितले.  रॉयल सोसायटीला १६७७ साली त्यानी ह्या प्राणुल्यांचं  वर्णन कळवलं. हो, त्यानी प्राणुले असाच शब्द वापरला होता. त्यानी लिहिले होते, अॅनिमिक्युलस् (Animicules). पण सुरवातीला त्याच्यावर कुण्णाचा म्हणजे कुण्णाचाच विश्वास बसला नाही. सूक्ष्मदर्शकाखालील हे अधोविश्व अविश्वसनीयच होतं. पाण्यात जीव, सांडपाण्यात जीव, विष्ठेत जीव आणि वीर्यातही  जीव.   त्याच्या  थोडाच काळ आधी (१६०९) गॅलिलिओने आपली दुर्बिण ऊर्ध्व दिशेला रोखली होती. ग्रहमालेचं केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे हे स्पष्ट झालं होतं. सारं आकाश जणू माणसाच्या कवेत आलं होतं. सूक्ष्म पिंडांपासून ब्रम्हांडापर्यंतचा हा अनुभव युरोपातल्या  धीमंतांना अस्वस्थ करत होता. 
आजही कितीही सूक्ष्मत शिरलो तरी हे सूक्ष्मजीव आपल्याला अचंबित केल्याशिवाय रहात  नाहीत. एकेक प्राणी म्हणजे खरंतर एकेक प्राणीसृष्टी  असते! ज्या त्या प्राण्याच्या अंगाखांद्यावर असंख्य ‘मैत्र जिवांचे’ वस्तीला असतात.  गाय काय किंवा गोरीला काय, घोडा काय अथवा अथवा माणूस काय; या साऱ्यांच्या त्वचेवर, नाकातोंडात, श्वासात, मलमूत्रात असंख्य जिवाणू/विषाणू/परोपजीवी सुखेनैव रहात असतात. एकेका प्रजातीशी तादात्म्य पावलेलं हे सहजीवन असतं. इतकंच कशाला पण प्रत्येक प्राण्याने, प्रत्येक माणसानेसुद्धा, एकमेवाद्वितीय  अशी सूक्ष्मसृष्टी अंतर्बाह्य पांघरलेली असते. त्यामुळे एखाद्या जंतुमुळे आली साथ तरी त्यांचा दुस्वास करायचं कारण नाही. हे आपले साथीच आहेत. 

प्रथम प्रसिद्धी
महा अनुभव मासिक
लॉक डाऊन विशेषांक
जून 2020