Wednesday 24 June 2020

माझे म्हणा 'करोनाकरा'

माझे म्हणा ‘करोनाकरा’

डॉ. शंतनु अभ्यंकर

९८२२०१०३४९  

 

करोनाच्या साथीने आम्हाला बरंच काही शिकवले आहे.  घरात ‘निष्काम’ बसायला लावून अंतर्मुख केले आहे. त्याचबरोबर सारे वैद्यक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान; सारी वैद्यकसृष्टीच जणू  पणाला लागली आहे. एकूणच एका अतीसूक्ष्म शत्रूशी दोन हात करता करता त्या शत्रूच्या काही खोडी आता माहिती झाल्या आहेत आणि त्यानुसार शस्त्रास्त्र परजणे चालू आहे. या ज्ञानसंचिताचा हा मागोवा.

 

म्हटलं तर १२५ नॅनोमीटर इतका सूक्ष्म आणि जेमतेम ३० गुणसुत्रांची लड बाळगून असलेला हा सार्स कोव्ह २ नामक  इवलासा जीव. ह्याला  जीव म्हणावं का हा सुद्धा प्रश्नच आहे जीवशास्त्रापुढे. पण  ह्या विषाणूला जणू दहा हात आहेत आणि एकाच वेळी वेगवेगळ्या हाताने तो माणसाच्या वेगवेगळ्या अवयवांवर घाव घालत असतो. ह्याच्या चित्रात जी शिंगं  शिंगं  दिसतात ना  तुम्हाला त्याच्याच मदतीनी हा आपल्या पेशींना चिकटतो. त्यातही एसीई नावाचं द्रव्य असलेल्या पेशी याच्या विशेष लाडक्या. मधुमेहींत तर एसीई जरा जास्तच असतं. म्हणून मधुमेहींवर हा मोहित. हे एसीई असतं फुफ्फुसात, आतडयात आणि रक्त वाहिन्यांत. म्हणूनच  फुफ्फुसे, श्वसन, पचन,  रक्त साकळण्याची क्रिया वगैरेंवर हा मर्मभेदी  हल्ला करतो.  

 

सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट ही की जवळपास ८०% लोकांना ह्या  विषाणूची लागण झाली तरी बाधा होत नाही. हे  लोक आपोआप बरे होतात. उरलेल्या विसातील  जवळपास १७ लोक वाचतात. शंभरी तीन जणं मृत्युमुखी पडतात. थोडक्यात करोना बरा करणारं औषध जरी नसलं तरी ३ वगळता बाकीचे १७   वाचतील असे उपचार मात्र आहेत.   

 

आजाराची सुरुवात तशी आस्ते कदम होते. पांढऱ्या पेशी कमी होतात.  बऱ्याच विषाणूजन्य आजारांचे हे एक लक्षण. मग सीआरपी, फेरिटीन, डी डायमर या दूतांद्वारे शरीरात सूज पसरत असल्याचा सांगावा येतो. सुमारे चौदा दिवसानंतर हा विषाणू शरीरात सापडत देखील नाही. पण त्याच्यामुळे आलेली सूज ही चालूच रहाते. ही सूजच घातक ठरते.  

 

शरीरात कोणताही परका  पदार्थ शिरला,  मग तो एखादा व्हायरस असो, बॅक्टेरिया असो, अथवा मलेरियाचा परोपजीवी असो, त्याचा शरीरात जिथे वास तिथे  आजूबाजूला सूज येते.  सूज म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीने त्या शत्रूविरुद्ध रचलेला चक्रव्यूह.  यामुळे शत्रूचा नायनाट केला जातो पण काही वेळा, करोनासारख्या विषाणूमध्ये, हे गणित चुकतं.  लाभ होण्याऐवजी शरीराची हानी होते. अती  प्रमाणात सूज येते, सर्वदूर सूज येते आणि विषाणू नष्ट होऊनही सूजेवर आपलेच नियंत्रण राहत नाही. आपल्याच प्रतिकारशक्तीचा उलटा  फटका आपल्यालाच बसतो. सेल्फ गोल किंवा सेल्फ व्हीकेट सारखी अवस्था ही. अति–प्रतिकारशक्तीचा प्रताप हा. म्हणजेच प्रतिकारशक्ती ही सुद्धा संतुलित असावी लागते. अति इम्यूनीटीमुळे होणारे शेकडो आजार आहेत. आर्सेनीक अल्बम वगैरे   तथाकथित ‘इम्यून बूस्टर’ तथाकथित आहेत हेच ठीक आहे. नाहीतर आफतच ओढवली असती!!!!   

अशी सूज येऊ नये आणि आलीच तर आटोक्यात राहावी  म्हणून हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन,  इंडोमेथॅसिन, डेक्झामेथाझोन, टॉकयूलिझीमॅब   अशी औषधे वापरली जात आहेत.  

 

या विषाणूचे काही गुणधर्म जिवाणू सदृश आहेत, बॅक्टेरियासारखे आहेत, त्यामुळे अझिथ्रोमायसीन सारखे (अँटिबायोटिक) प्रतिजैविक वापरले जाते.

 

या सूजेच्या परिणामी आपल्या शरीरात त्या त्या परकीयाविरुद्ध प्रतीपिंडे (Antibodies) तयार होतात. आजारातून नुकतेच उठलेल्या व्यक्तीत अशी तयार प्रतीपिंडे असतातच असतात. ही अशी रेडिमेड प्रतीपिंडे नव्या आजाऱ्यांना टोचायची आणि आजार रोखायचे ही देखील जुनीच युक्ति आहे. रेबिज, धनुर्वात अशा आजारात अगदी रामबाण ठरलेली ही युक्ति.  करोंनाविरुद्ध हिचे सामर्थ्य अजमावून पहाणे चालू आहे.  

 

या सर्वदूर सुजेबरोबरच प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्स म्हणजे खरं तर रक्तातील काही खास पेशींचे कपटे. यांचा मुख्य उपयोग रक्तवाहिन्यांची सातत्याने दुरुस्ती करण्यासाठी होतो. केशवाहिन्या (Capillaries) अतिशय नाजुक असतात. रोजच्या रोज त्यांना बारीक छिद्रे पडत असतात. ही  सूक्ष्म छिद्रे तातडीने बुजवली नाहीत तर त्या ठिकाणी  आतल्याआत रक्तस्त्राव होत राहतो. इतकेच काय रक्तवाहिन्यांची अंत:त्वचाही  अतिशय हळवी असते.  काही कारणाने, उदा: सूज येऊन, ती  खडबडीत झाली तर ती ताबडतोब गुळगुळीत करावी लागते. हे प्लेटलेट्सच्या गिलाव्याने साधले जाते. जर हे साधले नाही तर  तिथे रक्त साकळून बसते. प्रवाह थांबतो. अशाप्रकारे रक्तप्रवाह कुंठीत होणे कोणत्याही प्रकारे परवडण्यासारखे नसते.  त्यामुळे  प्लेटलेट्स कमी झाल्या की एका बाजूला रक्तस्रावाचा धोका वाढतो आणि त्याच वेळी रक्त ठिकठिकाणी साकळून बसते.

 

रक्त प्रवाहित राखण्याची नैसर्गिक  क्रिया ही अतिशय गुंतागुंतीचे संतुलन साधून असते. तलवारीच्या पात्यावर चालल्यासारखेच आहे हे.  मात्र करोनासारख्या आजारांमध्ये दोन्हीकडचा तोल सांभाळता सांभाळता, आपला जणू दोन्हीकडे तोल जातो आणि पेशंट तलवारीच्या पात्यावरच पडतो.

 

काही पेशंटमध्ये हाडातील मगजावर हा व्हायरस हल्ला चढवतो.  इथे आपल्या रक्तातील विविध पेशी बनत असतात. पेशींच्या कारखान्यावर हल्ला झाल्यामुळे अशा रुग्णात पांढऱ्या पेशी कमी होतात.  प्रतिकारशक्ती डळमळीत होते. अशा पेशंटला इतर इन्फेक्शन्स सहज होतात. हे तर चक्क  एचआयव्हीसारखं  वागणं झालं.  त्यामुळेच एचआयव्ही विरोधी औषधे (उदा: रेमडेसीव्हीर)   वापरून पाहिली जात आहेत. 

 

आपली फुफ्फुसे हे या विषाणूचे लाडके मैदान.  ताप, खोकला, धाप आणि अंतिमतः प्राणवायूचे चलनवलन बंद होऊन प्राणोत्क्रमण हे सारे या फुफ्फुसातल्या सुजेमुळे घडते. पण करोनाचे वैशिष्ठ्य हे की  यात शरीरातील प्राणवायू कमी कमी होत जातो  मात्र त्या मानाने रक्तातील कार्बन डाय ऑक्साईड फारसा वाढत नाही.  यामुळेच की  काय, पेशंट अगदी सावध आणि दिसायला बरा दिसत असतो पण ऑक्सिजन मात्र चिंताजनकरित्या कमी झालेला  असतो.   अशा अवस्थेला हॅपी हायपॉक्शिया (सुखद घुसमट!!) असं नाव आहे.

 

जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा जणू कडेलोट होतो.  झपाट्याने पेशंट रसातळाला जातो.  त्यामुळे ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, प्लेटलेट,  डीडायमर हे सातत्याने तपासत राहावे लागते. फुफ्फुसातल्या सुजेमुळे सायटोकाईन नावाची द्रव्ये तयार होतात.  सायटोकाईन  वाढल्यामुळे रक्त साकळण्याची क्रिया जलद होते आणि शरीरात बारीक-बारीक रक्तवाहीन्यात सर्वदूर रक्त साकळून राहते.  ज्या  त्या अवयवाला ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे देखील रक्त साकळते. सारे अवयव  जवळ एकाच वेळी गळाठून जातात. आणि पाठोपाठ  येते  ‘सायटोकाईन स्टॉर्म’! सायटोकाईनची   जणू ढगफुटी होते.  एखाद्या वादळात सारे होत्याचे नव्हते व्हावे, तसे फुफुसाचे कार्य थोड्याच कालावधीत पूर्णतः बाधित होऊन जाते.  बहुतेकदा यातच पेशंटचा मृत्यू होतो.

 

पण करोनाच्या कारनाम्यावरच्या लेखाचा हा करुण अंत लवकरच बदलावा लागेल. ही साथ ओसरेल का आणि कधी हे प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. प्रभावी प्रतिबंधक उपाय आणि प्रभावी औषधांचा शोध नेमका कधी लागेल हे अर्थात सांगता येणे शक्य नाही.  पण अनेक साथी  आल्या आणि गेल्या असं  इतिहास सांगतो. त्यातील अनेकांवर प्रभावी लस अथवा औषधं  नव्हती, काहींवर अजूनही नाहीयेत. आजाराच्या साथी बरोबरच भीतीचीही साथ आहे. आधी ही ओसरेल. जगातील बहुतेक प्रजा करोनाचा सामना करून रोगमुक्त होईल. मग हल्ला करायला ताजे भक्ष्य मिळणेच दुरापास्त ठरेल. साथ आटोक्यात येईल. अधून मधून, कुठे कुठे हा जंतू आपले प्रताप दाखवेल.  हे असं इतका वेळ चालू राहील की शेवटी माणसं करोनाकडे एक करूणार्द्र नजर टाकतील, हम साथ साथ है म्हणतील  आणि आपापल्या कामाला  लागतील.

 

नव्या युगाच्या नव्या  तंत्रज्ञानाच्या साथीने माणसाने लढवलेली ही पहिलीच साथ. बिग डेटा,  महाप्रचंड माहिती, आणि त्याचे वेगवान विश्लेषण शक्य झाल्यावर उद्भवलेली, ही पहिलीच साथ. आज हे विश्लेषण आणि विश्लेषणांचे विश्लेषण, क्षणात सर्वांना उपलब्ध होते आहे.  ह्या संगणकाच्या युगात, प्रसिद्धीपूर्वीच शोधनिबंधातली  माहिती आता साऱ्यांना उपलब्ध आहे. कॉपीराईट वगैरे जाऊन आता ‘कॉपी लेफ्ट’, असा प्रकार सुरू झाला आहे.  म्हणजे  इथे कॉपी आहे ज्याला हवी त्याने ती वापरावी. जेनॉमिक्स, ग्लायकॉमिक्स, प्रॉटीओमिक्स अशा अनवट क्षेत्रात धामधूम चालू आहे. नाना देशातले भले बुद्धीचे सागर, ज्ञान मंथनात गुंतले आहेत. या साऱ्या मंथनातून उपचार आणि लसीचे अमृत लवकरच प्राप्त होईल अशी आशा  वाटते ती यामुळेच.   

 

 

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment