Tuesday 9 June 2020

हा बाप कोणाचा?

हा बाप कोणाचा?  

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

पंचवीस एक वर्ष  झाली या घटनेला. अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातल्या केनेविक प्रांतात,  कोलंबिया नदीत, २८ जुलै १९९६ला एक कवटी सापडली. ज्याला सापडली त्याला वाटलं हा खुनाचा प्रकार असणार त्यामुळे पोलीस आले. पोलीस विभागाच्या डॉक्टरांनी ती  कवटी तपासली तर त्यांना त्यात काही काळबेरं आढळलं नाही. त्यांना आढळलं की ही कवटी आजची नसून अगदी पुरातन आहे. मग  त्यानी पुरातत्ववाल्यांना  बोलावलं. ते हरखूनच गेले.  त्यानी ती कवटी जिथे सापडली होती तिथे आणखी शोध घेतला आणि जवळपास अख्खा सांगाडा हाती आला त्यांच्या. मग त्या सांगड्याचं  वय, लिंग वगैरे  शोधून काढलं त्यानी. त्यात आढळलं की तब्बल ९००० वर्षापूर्वी निवर्तलेला हा कुणी तरी बाप्या  माणूस होता. हा बाप्या होता, पण तो होता कुणाचा बाप?

अमेरिकेत गोरे युरोपीय आले, त्यांनी काळे गुलाम आणले, हे तर सारे ज्ञात इतिहासात घडलेले. त्याही पूर्वी तिथे माणूस होताच. आजही तिथे मूळ अमेरिकन माणसे आणि समाज आहेत. त्या मूळनिवासींना हटवून तर युरोपीयनांनी तिथे जम बसवला. या अन्यायचं परिमार्जन म्हणून की काय,  कायद्याने या मानव समूहांना काही खास  हक्कही आहेत.

नऊ हजारच काय अगदी तेरा चौदा हजार वर्षापूर्वीपासून अमेरिकेत मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे आहेत, पण त्रोटक. माणूस जर आफ्रिकेत जन्माला आला, तर अमेरिकेत पोहोचला कुठून आणि कधी आणि कसा? एका  बाजूला अटलांटिक आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत महासागर असताना, माणूस अमेरिका खंडात पोहोचलाच कुठून?  हे तर एक गूढ आहे अजून.

अमेरिकेत माणूस आला कुठून, या  प्रश्नाला अनेक संभाव्य उत्तरे आहेत. जेंव्हा हिमयुग होतं तेंव्हा समुद्राच्या बऱ्याच पाण्याचं बर्फ झालं होतं.  ते साठलं होतं दोन्ही ध्रुवांवर. समुद्र खूप खूप आटला होता, खूप खूप मागे सरकला होता. सायबेरियाच्या टोकावरून अलास्कापर्यंत अखंड जमिनीचा सेतु उघडा पडला होता.  (ह्याला म्हणतात बेरींग लँड ब्रिज. आजही नकाशात बेरिंगच्या समुद्रधुनीत असा सेतु असावा अशी बेटांची माळ  दिसते.) त्यावरून  चालत चालत आला असेल का पहिला  माणूस? पण चालत आला तो सायबेरियातून अलास्कात.  सायबेरिया म्हणजे बर्फच बर्फ आणि अलास्का म्हणजेही  बर्फच बर्फ.  म्हणजे आगीतून  फुफाट्यातच  की; किंवा बर्फातून हिमात म्हणूया आपण. अलास्काचे हिमांगण  ओलांडून पुढे (सध्याच्या) अमेरिकेत पोहोचायचं म्हणजे अवघड नाही तर अशक्यच.  

आणखीही एक थिअरी आहे. केल्प मार्गाने तो आला म्हणे. केल्प ही एक समुद्र-वनस्पती आहे. दाट आणि  भक्कम अशी ही  पाणवनस्पती सायबेरिया पासून ते कॅनडा आणि उत्तर अमेरिकेच्या काठाकाठाने प्रचंड प्रमाणात वाढणारी. ह्या वनस्पतीच्या जंगलात हजारो जीव जंतू सुखेनैव विहरत असतात. मासे वगैरे अन्न भरपूर मिळते. जमिनीवरून बर्फाळ प्रदेशातून प्रवास घडला असणं कठीण आहे, तेंव्हा पहिला प्रवास हा होडक्यातून, ह्या जमिनीच्या काठाकाठाने, केल्पच्या आश्रयाने झाला असावा असा एक अंदाज.

जसा  हा माणूस नावाचा प्राणी सायबेरियातून अमेरिकेत पोहोचला असण्याची शक्यता आहे तद्वतच तो युरोपातून  आईसलँडमार्गेही तिथे पोहोचल्याची शक्यता आहे. समुद्र हटल्याने हाही मार्ग शक्य पण बर्फाळ. उत्तर युरोपातील नोर्स टोळ्या ह्या मार्गानी प्रथम इथे धडकल्या असाही एक प्रवाद आहे.

जसे सायबेरिया आणि अलास्का हे हिमयुगात ढांगेच्या अंतरावर आले तसेच जपान आणि अमेरिकेदरम्यानही प्रशांत महासागरात अनेक बेटं पाण्यातून वर आली होती.   दक्षिणेकडे सुमात्रा, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी वगैरे   बेटे तर आशिया खंडाशी  एकसंघ झाली होती. आशिया खंडाचा  हा पूर्व किनारा आणि  दक्षिण अमेरिकेचा निमुळता खंडही शक्य कोटीत जवळजवळ आले होते. चालत जरी नाही तरी बोटीनी, बेटाबेटांच्या माळेला धरून धरून    इथूनही सर्व ठिकाणहून  माणसे आली असावीत. ती उतरली अमेरिकेच्या किनारी. इथून ती सर्वदूर पसरली.

अशा अनेक कल्पना आहेत.  शिवाय ह्यातली एकच का,  सर्वच कल्पना बरोबर आहेत अशीही  कल्पना आहेच.

माणूस अमेरिकेत आला. आला तो राहिला, वाढला, चांगला जम बसवला त्यानी. त्यातलाच हा एक पुराणपुरुष. पण ह्याच वंश कोणता? आशियाई? जपानी? पॉलिनेशियन? युरोपीय? न्यूझीलंडकर?  ह्या आदिपुरुषाच्या डीएनए तपासणीत कदाचित ह्या प्रश्नांची उत्तरे मिळणार होती. त्यामुळे ह्याला भलतंच महत्व प्राप्त झालं. शास्त्रज्ञ मंडळीतही मोठी हलचल माजली. हा सांगाडा जपानी आईनू लोकांशी  अथवा पॅसिफिक मधील पॉलीनेशियन वर्णाशी साम्य दर्शवतो असा प्राथमिक अंदाज होता. त्यामुळे त्याचा डीएनए तपासता आला तर साऱ्याचा  खुलासा होणार होता. अमेरिकेच्या मुळनिवासींचे कूळ गवसणार होते. त्यामुळे सांगाड्याच्या तपासणीसाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांचे अर्ज विनंत्या चालू होते.

पण ह्या शोधाची कथा कळताच मूळनिवासी  मंडळी तर हबकून गेली. त्यांनी या तपासणीच्या कल्पनेला कडाडून विरोध सुरू केला. त्यात आणखी एक गोची झाली. असतरू म्हणून नोर्स वंश सांगणारी एक जमात तिथे आहे. हे उतर युरोपीय लोक. ओडिन, थोर वगैरे यांच्या देवता. (वेडनेसडे, थर्सडे नावे या देवतांच्यावरून पडली आहेत)  हा माणूस आमचाच असा त्यांचाही  दावा. युरोपीय, नोर्स,  माणसे इथे आईसलँडमार्गे आल्याचा, हाच तो पुरावा असा त्यांचा आग्रह.   या मंडळींनी त्या अस्थिंवर काही पूजाअर्चा केली. यामुळे ‘याकामा’ मंडळी (आणखी एक मूळ निवासी जमात) दुखावली गेली. आता ह्या पूजेमुळे त्या माणसाच्या आत्म्याला त्याचे शरीर सापडणार नाही तो भटकत राहील. इतकंच काय, जो कोणी या अस्थींमधील अंशही घेईल त्याच्या तो खनपटीला बसेल.  त्या अस्थींत जो कोणी  अनाहूत रस घेईल  त्याला तर तो झपाटून टाकेल. रीतसर दफन न झाल्यास या साऱ्यांचा तो निर्वंश केल्याशिवाय रहाणार नाही, वगैरे वगैरे  त्यांनी सुरू केलं.  प्रकरण चांगलंच रंगू लागलं.   

त्यांच्या मते अमेरिकेत ‘आम्ही’, पक्षी मूळनिवासी, आहोत ते काळाच्या सुरवातीपासून. इकडून तिकडून वगैरे आम्ही आलेलो नाही. हीच आमची पितृभू, हीच आमची मातृभू. हीच  आमची पवित्र भूमी.  आम्ही वगळता इतर सारे उपटसुंभ. आम्ही कुठून आलो वगैरे शोध घ्यायची तुमची इच्छाच मुळी  गैर आहे. आम्ही इथेच जमिनीतून  निपजलो. पुरावा? पुरावा कसला मागता? आमचा इतिहास काही कोणी कुठे लिहून ठेवलेला नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही तो एकमेकाला कथन करत आलो आहोत. ह्या कथा हाच की पुरावा. हा जो कोणी आहे तो आमचाच पूर्वज आहे. त्या अस्थींची रीतसर विल्हेवाट  लावली नाही तर तो प्रेतात्मा तुम्हाआम्हाला  बाधेल. उलट आता त्याच्या सांगाड्यांचा अभ्यास का काय ते करून, तुम्ही त्या पार्थिवाच्या आत्म्याला, अस्थिंच्या  सन्मानाला  आणि आमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवता आहात. असं म्हणत ह्या मंडळींनी आणि त्यांच्या अत्यंत कंठाळी मंडळांनी तपासणीला विरोध सुरू केला. त्यांनी  शब्दाला शब्द वाढवत नेला. प्रकरण तापत गेलं.  आमचे ‘अधिकार’ला आता  मूळनिवासींच्या  ‘विशेषाधिकारां’ची धग आली. पिढ्यानपिढ्या वंचित, शोषित ठरलेल्यांच्या  ‘हक्कां’च्या ठिणगीवर आता  ‘मानवी हक्कां’चे  अंगार फुलले.  असं करत करत शेवटी ‘नाजुक धार्मिक भावना दुखावल्या’ची  तप्तमुद्रा उमटली.

खरंतर डीएनए टेस्ट करणे हा ह्या साऱ्यावर उपाय. हाच तर शास्त्रज्ञांचा आग्रह.  पण धार्मिक भावनांच्या नावाखाली  हीच मुळी  करू नका असा यांचा दुराग्रह. कारण आम्ही काही इथून तिथून आलेलो नाही. आम्ही या मातीची पैदाईश असा युक्तिवाद.

 

एकदा धार्मिक भावना  दुखावल्या म्हटलं की प्रश्नच मिटला. यावर एक रामबाण उपाय होता. पुरातत्ववेत्त्यांनीसुद्धा जुनी मढी हा आमचा देव आहे असं सांगायला हवं होतं.  मिळतील तिथून, मिळतील तितकी मढी  उकरून काढणे हा आमचा धर्म आहे असं सांगायला हवं होतं. ह्या मढयांचे डीएनए तपासणे ही तर आमची धर्माज्ञा आहे असंही सांगायला हवं होतं. म्हणजे मग  ही चाचणी न करण्याने  हळव्या  धार्मिक भावना दुखावतात हे लगेच सगळ्यांना पटलं असतं. म्हणजे त्यांच्याही बाजूने काही साधू आणि काही संधीसाधू उभे राहिले असते.  पण त्यांनी असं काही केलं नाही. त्यांच्याही नाजुक शास्त्रीय भावना दुखावल्या गेल्या होत्याच. पण नाजुक धार्मिक भावनांच्या पुढे नाजुक शास्त्रीय भावनांची पत्रास कुणाला?  

शेवटी शास्त्रज्ञ विरुद्ध मूळनिवासी असं हे प्रकरण कोर्टात गेलं. कायद्यानुसार ह्या सांगाड्याची मालकी कुणाची असा वाद निर्माण झाला. मूळनिवासींचं म्हणणं  असं की आमच्या भागात सापडलेला हा सांगाडा  आमच्याच कुणा पूर्वजाचा असणार. त्यावर आमचाच हक्क आहे.

२००२साली कोर्टाचा हुकूम आला, सांगाड्याची तपासणी करायला परवानगी मिळाली. मूळनिवासींच्या हक्कांवर गदा आल्याची वावटळ उठली पण लगेचच शमली. कोर्टानी  मुळी बजावलंच  होतं, ‘सांगाडा ९००० वर्षापूर्वीचा  आहे. आज ह्याला आपला पूर्वज म्हणवणारे त्याचे थेट जनुकीय अथवा सांस्कृतिक   वंशज आहेत वा  नाहीत हे सांगताच येत नाही. आपल्याला ९००० वर्षापूर्वीच्या या कालखंडाबद्दल पुरेशी माहिती नाही.  तेंव्हा तपासणी करणे योग्यच राहील.’

प्रथम तपासणीत डीएनए  मिळवणं शक्यच झालं नाही पण  आणखी बरीच नवी माहिती पुढे आली. तो कुलपुरुष काही तिथे नुसता मरून पडला नव्हता.  त्याचा रीतसर दफनविधी झाल्याची चिन्हे होती. तो मुख्यत्वे मासेखाऊ होता. भटक्या होता.  अलास्काला येणंजाणं होतं त्याचं.   त्याचे गुडघे  दुखत असावेत,  कारण ते झिजले होते. डोक्यालाही दोन ठिकाणी खोक पडलेली असावी. एकूणच लढवैय्या होता  तो.  नुसताच नर नाही तर नरवीर  होता.

अखेर २०१५ साली काही शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्या माणसाची डीएनए तपासणी करता  आली. हा माणूस सध्याच्याच मूळनिवासींचा कोणी पूर्वज होता हे निसांदिग्धपणे सिद्ध झालं. तो सांगाडा रीतसर स्थानिक निवासींच्या ताब्यात देण्यात आला. त्यावर त्यांच्या चालीरितीनुसार अंत्यसंस्कार करून त्यांनी त्याला कायमचा  गाडून टाकला. दुखावलेल्या धार्मिक भावना आता सुखावल्या.

पण डीएनए तपासणीसाठी जो तुकडा वापरला गेला तो गेलाच. तो तेवढा भाग नसल्याने, तो आत्मा आता अतृप्त राहील, त्या तुकड्यात रस घेतलेल्या साऱ्यांच्या राशीला लागेल, हे ओघानेच आले. ह्यात त्या तुकड्यावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ जसे आहेत तसे त्या तुकड्याबद्दल उत्सुकता असणारे, ही कथा वाचत इथवर पोहोचलेले, वाचकही त्या आत्म्याच्या टप्यात आहेत, हे  लक्षात असो द्यावे!!!

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment