Friday 26 June 2020

गोळी बिळी; औषध बिवषध

गोळी बिळी; औषध बिवषध
डॉ. शंतनू अभ्यंकर

कोणतेही औषधी गुणधर्म नसलेली द्रव्ये, उदाः पिठाच्या गोळ्या किंवा पाण्याची इंजेक्शने, ‘औषध’ म्हणून दिली, तरी माणसांना बरं वाटतं! हे सत्य आहे. आपण औषध घेतोय ही भावनाच मनाला, शरीराला उभारी देते. अशा औषधी-गुण-मुक्त द्रव्याला प्लासिबो म्हणतात आणि प्लासिबोनी बरं वाटण्याला प्लासिबो परिणाम. तुम्ही ‘गोळी’ द्या नाहीतर ‘बिळी’ द्या काहींना काही प्रमाणात तरी बरं वाटतच. अर्रे व्वा!! बिळी! मस्त शब्द सापडला की प्लासिबोला. औषधाची ती गोळी आणि बिन औषधाची ती बिळी! याच चालीवर ‘औषध’ आणि ‘बिवषध’, ‘शस्त्रक्रिया’-‘बिस्त्रक्रिया’ असेही शब्द वापरता येतील. या लेखापुरते तरी मी आता हे शब्द ह्याच संदर्भात वापरीन हं.

जसा सकारात्मक परिणाम दिसतो, बरे वाटेल या अपेक्षेने बिळी घेतली तर बरं वाटतं, तसंच नकारात्मक परिणामही दिसतो. याला म्हणतात नोसिबो परिणाम. आता काहीतरी बिनसणार, असं मनानी घेतलं की काहीतरी बिनसतेच. साईड इफेक्ट पासून जपून हां, असं सूचित केलं की काय काय व्हायला लागतं. मळमळेल हां, असं म्हटलं की मळमळतं; चक्कर येईल हां, असं म्हटल की चक्कर सुद्धा येते.

नवीन औषधांची चाचणी करताना, प्लासिबो परिणाम ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते. औषध दिलंय, बरंही वाटतंय, पण ते औषधामुळे की निव्वळ औषध दिल्याच्या कृतीमुळे? एखाद्याला औषध दिल्यानंतर बरं वाटलं याचा अर्थ ते त्या औषधामुळे वाटलं असा होत नाही. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडू शकते. अन्य कोणत्यातरी घटकांनी बरे वाटलेले असू शकते आणि त्याचे आयते श्रेय औषधाला जातंय असंही होऊ शकते. हे आणि असे सर्व प्रभाव दूर केल्यावरच औषधाचा प्रताप काय ते लख्खपणे दिसू शकते. म्हणूनच उत्तम चाचण्यात एका गटाला औषध आणि दुसऱ्या गटाला रस-रंग-रूप-गंध अगदी औषधासम असलेले बिवषध (प्लासिबो औषध) दिलं जातं. औषधवाल्यांना बिवषधवाल्यांपेक्षा ‘बर्रर्रच बरं’ वाटलं, संख्याशास्त्रीयदृष्ट्या लक्षणीय फरक पडला, तर ते औषध खरं.

पण हे बिन-औषधी औषध काम तरी कसे करते? विचारांचा प्रभाव मेंदूतील विविध स्रावावर पडतो; (उदाः मॉर्फिनसारखी द्रव्य (ओपिऑइड्स) झरू लागतात;) सहनशक्तीत, प्रतिकारशक्तीत काही बदल होतात आणि आजार उतरणीला लागतो; असा ढोबळ कार्यकारणभाव सांगता येईल. पण याचा अर्थ बिवषधामुळे कँन्सर बरा होतो किंवा कोलेस्टेरॉल कमी होते किंवा चमत्कार घडतात असे मात्र नाही. प्लासिबो परिणाम म्हणजे चमत्कार नाही फार तर ह्याला चमत्कारिक परिणाम म्हणता येईल. तुम्हाला बरं ‘वाटतं’ पण तुम्ही बरे ‘होता’ असं नाही. वेदना सुसह्य होते, झोप लागते, थकवा, मळमळ वगैरे कमी भासते; इतकंच. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे आणि बरेचसे रुग्ण यांच्या दर्शनमात्रेमान, प्रसन्नवदने, उल्हसित होत्साते घरी परतायचे. हा सुद्धा प्लसिबो परिणाम. आणि बिळीच कशाला, नुसतं दवाखान्यात जाणे, गर्दीत नंबर येणे, एका पांढऱ्या कोटातल्या पोक्त माणसाने साग्रसंगीत तपासणे, लायनीत उभे राहून त्या रंगीबेरंगी गोळ्या पदरात पाडून घेणे आणि मग त्या उपाशी, तुपाशी, अशा सांगितल्याबरहुकूम खाणे, हे कर्मकांडही प्लासिबो परिणामाचेच रूप. वेदनाशामक इंजेक्शन, ‘आता मी कळ थांबायचं इंजेक्शन देतेय हं’, असं सांगून सवरून शुभ्रवस्त्रावृता ‘नर्स’नी दिले तर कमी डोस लागतो आणि आपोआप मशीनने सोडले तर जास्त! डोळ्यादेखत जर कुणाला कशानी बरं वाटलं, उदाः शेजारच्याचं इंजेक्शनने दुखायचं थांबलं, तर रुग्णालाही त्याच कृतीने बरं वाटतं. दिलेल्या गोळ्या प्लासिबो आहेत असं स्पष्ट सांगूनही गोळ्या लागू पडल्याचे पेशंट सांगतात याचा अर्थ काय? गोळीत औषध नाहीये पण गोळी घेण्याच्या कृतीत ते आहे.

कसा घडतो हा परिणाम? ह्या बिवषधानी बऱ्याच जणांना कोड्यात टाकलं आहे. बिवषध दिलं की बरं वाटतं, अगदी नाडीचा वेग कमी होणे वगैरे परिणामही दिसतात. पण काही मर्यादेतच. याला अनेक कारणे आहेत. काही साधीशी आणि बरीचशी गुंतागुंतीची.

मुळात पुरेसा त्रास झाला की माणूस औषध घ्यायच्या भानगडीत पडतो. तेंव्हा कित्येक किरकोळ आजार हे काही कालावधीनंतर, औषध घ्या अथवा नका घेऊ, आपोआप बरे होणारच असतात. पण श्रेय औषध बिवषध किंवा उपचार बिपचार पळवतात.

आता आपल्याला औषध दिलंय, सबब आता बरे वाटणार बरंका, असं मनाला बजावलं की आपोआपच, बऱ्याची चिन्ह सापडायला लागतात. (‘आर्थिक फटका बसेल’ असं भविष्य वाचून दिवसभर फटक्याची वाट पहावी तद्वतच हे)

गोळीनी बरं वाटतं ह्या पूर्वानुभवातून मेंदू ‘शिकतो’. पाव्हलोव्हचा एक प्रसिद्ध प्रयोग आहे. कुत्र्याला अन्न देताना दर वेळी घंटा वाजवली तर काही दिवसांनी निव्वळ घंटेच्या आवाजानी कुत्र्याला लाळ सुटते; अन्न समोर नसलं तरीही. अशा रीतीने प्रतिक्षिप्त क्रियाही पढवता येतात हे पाव्हलोव्हने दाखवून दिले. म्हणूनच गोळी घेऊन बरं वाटतं हे एकदा मनात बसलं की गोळी ऐवजी बिळी देऊनही काम भागतं!! अर्थात गोळी ती गोळी आणि बिळी ती बिळी. बिळीचा परिणाम सातत्यपूर्ण आणि समतुल्य नसतो. तो लगेचच उणावतो. बरेचदा पेशंटला फक्त आराम ‘वाटतो’ प्रत्यक्षात फरक पडलेला नसतो. एका अभ्यासात दम्याच्या गोळीवाल्या आणि बिळीवाल्या पेशंटला सारखंच बरं वाटलं पण प्रत्यक्षात नेमके मोजमाप करता गोळीवाल्यांचे श्वसन कितीतरी सुलभ होत होतं.

थोडक्यात प्लासिबो इफेक्ट हा गूढरम्य का काय म्हणतात तसा आहे. काया आणि मन यांच्या सीमारेषेवरचा प्रकार आहे हा. अशी सारी बिवषधे तात्कालिक आणि मर्यादित का असेना, पण सुपरिणाम घडवतात ते यामुळेच. बिवषधाबरोबरच मंत्रतंत्र, गंडेदोरे, अंगारेधुपारे, कर्मकांड असा समसमा संयोग असणाऱ्या अनेकानेक उपचारपद्धती आब राखून आहेत, पेशंटच्या मनात घर करून आहेत, ‘मला तर बुवा चांगला गुण आला’ असे फॅन फॉलॉइंग बाळगून आहेत, ते यामुळेच. अंधविश्वास, अंधश्रद्धा, छद्मउपचार वगैरेला (अन्य) माणसं कशी काय बुवा बळी पडतात?, ह्या प्रश्नाचे थोडेसे उत्तर इथे आहे.

या प्लासिबो परिणामातही तऱ्हा आहेत. खोटेखोटे ऑपरेशन करणे बेस्ट आहे म्हणे! हो, असे प्रयोग केले आहेत काहींनी! त्या खालोखाल सुई टोचण्याचा नंबर. ग्रामीण भागात ‘सुई’ने बरे वाटते ही अंधश्रद्धा दिसते पण ती अंधही नव्हे आणि श्रद्धाही नव्हे. हा तो बिनजेक्शन परिणाम. मग गोळ्यांचा नंबर, पण त्याही कॅपश्युलच्या हं. त्यातून त्या रंगीबेरंगी असतील, मोठ्या असतील, महाग असतील आणि दिवसातून बरेचदा घ्यायच्या असतील तर आणखी छान. औषध देता देता, ‘आता छान बरं वाटेल हं’, असा आशीर्वाद पुटपुटला तर लई भारीच.

जसं बिवषध, तशा बिस्त्रक्रिया सुद्धा केल्या आहेत लोकांनी. म्हणजे झालं असं की, इंटर्नल मॅमेरी आर्टरी नावची एक रक्तवाहिनी फासळ्यांमधून छेद घेऊन सहज बांधता येते. असं केल्यानी हृदयाचा रक्तपुरवठा वाढेल अशी अटकळ. मग केलं असं लोकांनी, आणि ९०% लोकांना फरक पडला! पण ह्या सगळ्या डॉक्टर मंडळीत काही शंकासूर निघाले. त्यांनी काय केलं; छातीवर छेद घेतले पण रक्तवाहिनी वगैरे बांधलीबिंधली नाही. छेद घेतले आणि शिवले! गंमत म्हणजे यांच्याही ९०% पेशंटना बरं वाटलं!! थोडक्यात ती शत्रक्रिया म्हणजे निव्वळ कर्मकांड ठरली. नुसती बिस्त्रक्रिया! हे लक्षात येताच तो प्रकार बंदच झाला. पण अर्थात असे प्रयोग करायचे तर त्यात बरेच नैतिक प्रश्न गुंतलेले असतात आणि आदर्श असा मार्ग नसतोच. तोंड झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड.

होमिओपॅथी म्हणजे शुद्ध प्लासिबो परिणाम असा निष्कर्ष भल्याभल्यांनी काढला आहे. मी ही! पण होमिओवाल्यांचे म्हणणे असे की प्राण्यांवर सुद्धा होमिओ औषधांचा परिणाम होतो. सबब प्लासिबो परिणाम हा आरोप झूठ आहे. पण प्राण्यांतसुद्धा प्लासिबो परिणाम दिसतो असं विज्ञान सागतं. पाव्हलोव्हच्या प्रयोगाचा उल्लेख वर आलाच आहे. मालकांच्या मूडनुसार पाळीव प्राण्यांचे मूड बदलतात हा तर नेहमीचाच अनुभव. प्रेम, माया, ममता याची प्राण्यांना जाणीव असते. तेंव्हा मायेनी बिवषध दिलं तरी त्यांना बरं वाटतं. त्यांच्या मालकांना तरी तसं वाटतं किंवा निदान मालकांना तरी बरं वाटतं!!

जर बिवषध घेऊन बरं वाटत असेल तर द्या ना बिवषध, त्यासाठी एवढा थयथयाट कशासाठी असाही प्रश्न कोणी विचारेल. पण मुळात याचा परिणाम जेमतेम असतो, पीडाहारक असला तरी रोग संहारक नसतो. डॉक्टर आणि पेशंटचे नातं प्रामाणिक आणि पारदर्शी असणंच उत्तम. तेंव्हा निव्वळ कर्मकांड आणि बिवषध यांच्या मर्यादा जाणून असलेलें बरे. कारण या बिवषधाच्या नावाखाली भोंदुगिरी फोफावायला वेळ लागणार नाही. कर्मकांडाचा परिणाम होतो म्हटल्यावर बिवषध आणि त्याबरोबर कर्मकांड हे कॉम्बिनेशन बेस्ट ठरते. विंचवाचं विष मंत्रांनी उतरवण्याचे कर्मकांड तुम्ही कधी पाहिले नसेल. (पहायचं असेल आणि करमणूकही हवी असेल, तर मधुमती पिक्चर मधील ‘ओsss बिछुवा’ हे गाणं युट्यूबवर बघा.) मांत्रिकाचे डोळे, हावभाव, धुनी आणि इतर सर्व प्रकारांमुळे विंचू चक्क उतरतो! पण अर्थात जर जहाल विष असेल तर असल्या छाछुगिरीने, अयोग्य उपचारापायी प्राणही जातात. म्हणूनच तर जादूटोणा कायद्याखाली सर्पविष उतरवण्याचा दावा हा गुन्हा आहे. नुसतेच बिवषधाने भागत असते तर औषधाची गरजच पडली नसती की.

याचा व्यत्यांस म्हणजे गुणकारी गुटिका पण नो कर्मकांड. बड्या दवाखान्यातून हे असं चालतं. अत्यंत परिणामकारक उपचार पण भावनाशून्य वातावरण. पेशंटचा कोंडमारा होतो अशाने. डॉक्टर आमच्याशी बोलतच नाहीत, काय चाललंय ते काही कळतंच नाही, ह्या नेहमीच्या तक्रारी. असे पेशंट मग बड्या दवाखान्यात औषधोपचार घेतात आणि ‘पर्यायी, पारंपरिक व पूरक उपचार पद्धती’ नामे मशहूर असणाऱ्यांकडे बिवषधोपचार घेतात. प्रसंगी औषधोपचार आणि बिवषधोपचार. अशा दोन्ही टोकांमध्ये ते हेलकावे खात रहातात. आराम पडला तर त्याचं श्रेय बिवषधोपचाराला देतात आणि अपश्रेय औषधाच्या माथी मारतात. 'औषधानी भीक नको पण कुत्रा आवर, अशी गत झाली हो आणि काय सांगू बिवषधाच्या एकाच गुटीकेने पुन्हा तारुण्य प्राप्त झाले!!!'.. अशी बिवषधाची भलावण करत राहतात.

थोडक्यात काय औषधही जाणणं महत्वाचं आणि बिवषधही. तुकारामाच्या चालीवर सांगायचं तर डॉक्टरांच्या लेखी प्लासिबो म्हणजे; ‘आहे औषध अशी वदवावी वाणी, नाही ऐसे मनी अनुभवावे.’

डॉ. शंतनू अभ्यंकर
9822010349

No comments:

Post a Comment