पॉर्नातुराणाम्....
डॉ. शंतनू अभ्यंकर
प्राचीन भारतीय समाज हा कामभावनेपासून
पळ काढणारा नसावा. उलट तिचे उदात्तीकरण, दैवतीकरण झालेलेच अधिक आढळते. धर्म, अर्थ
आणि मोक्षाबरोबर काम हा सुद्धा पुरुषार्थ मानणारा; ‘ओम
कामदेवाय विद्महे पुष्पवनाय धीमही, तन्न: काम: प्रचोदयात्’, असा कामदेवासाठी
गायत्री मंत्र रचणाराही समाज होता आपला.
तेंव्हा मौज मनोरंजनातून कामभावनेचा उत्सव
मांडणाऱ्या अनेक चित्र, शिल्प, काव्य, नाट्य, नृत्य परंपरा निर्माण झाल्या. याला
पूरक प्रथा, परंपरा, समाजसंस्था उत्क्रांत
झाल्या. त्यात शृंगार होता, शिक्षण होतं, रंजन होतं, शोषणही होतं. यांचा आस्वाद
शिष्टसंमत होता.
पण काळाच्या एका वळणावर मानवी शरीरसंबंधांना पाप मानणारे, आपले
राज्यकर्ते झाले आणि आपला दृष्टीकोन बदलला. सायबाला, त्याच्या व्हिक्टोरियन
मूल्यांच्या चष्म्यातून, आपली शृंगार-संस्कृती कधी विचित्र, कधी मागास, कधी अगदी
विकृतसुद्धा वाटली. जेत्यांनी त्यांचा चष्मा आम्हा जितांच्याही नाकावर चढवला. मग आम्हालाही ती तशीच
दिसो लागली. लैंगिकदृष्ट्या थोड्या सैल, उदार आणि सर्वसमावेशक कल्पना असलेला आपला
समाज झपाट्याने बदलू लागला. सायबामुळे स्त्री शिक्षणाचा पाया घातला गेला, संमती
वयाचा कायदा आला पण त्याच वेळी सायबाने कामभावनेच्या मुळाशी अपराधगंड पेरला
हेही खरे. पण आज पोर्न आणि त्याची भारतातली व्याप्ती पहाता, त्या गंडाला
भारतीयांनी चक्क गंडवला आहे, असंच म्हणता येईल.
युगानुयुगे कामभाव आणि पुनरुत्पादनाबद्दल मानवी
मनात अपार उत्सुकता दाटून आहे. या उत्सुकतेचे उन्मेष अनेक. हेच पहा ना, लैंगिकता फक्त
चरांत भरलेली आहे. अचरांत ती नाही. पण तो
डोंगर, ती टेकडी, ते झाड; किंवा तो समुद्र, ती नदी, ते तळे; अशी भिन्न भिन्न लिंगओळख
देऊन, माणसाने अचरालाही आपल्यासारखेच कल्पिले आहे. इतकेच काय आपल्या पुराणकथांनी
नक्षत्र, ग्रह, तारे, आकाश, पृथ्वी अशा साऱ्यांना स्त्री वा पुरुष अवतारांत
कल्पिले आहे. त्यांना लैंगिक भाव आणि भूक कल्पिली आहे. त्यांची लग्ने लावून त्यांच्यात
रूसवे-फुगवे आणि मनधरण्या कल्पिल्या आहेत, त्यांना रीतसर दिवस घालवून त्यांच्या
डिलीव्हऱ्या कल्पिल्या आहेत. एक नसबंदी वगळता सारे काही कल्पिले आहे.
हे झालं पुराण पात्रांचं. पण मानवी काम भावनेचं
करायचं काय करायचं हा प्रश्न धर्मज्ञ, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांच्या प्रयत्नानेही
पूर्ण उलगडलेला नाही. त्यातच आधुनिक
माध्यमे स्वस्त आणि सार्वत्रिक झाली आणि कामक्रीडा दर्शन अगदी तत्क्षणी शक्य झालं.
सर्वांना शक्य झालं. कोणीही वंचित नाही. बोर्नव्हीटाचा ग्लास सुटण्यापूर्वीच आता पोर्नव्हीटाचा
ग्लास हाती येतो आणि उच्च शिक्षण चालू होतं.
पोर्न हे सनातन आहे. फक्त माध्यमे बदलली आहेत. अगदी
पूर्वी चित्र-शिल्प हेच माध्यम होतं, मग गद्य, पद्य, नाट्य असे प्रकार आले. पण
तरीही मैथुनाचे इतके उघडेवाघडे आणि थेट दर्शन (सामान्यांना तरी) कल्पनेतच शक्य
होते. कामपटांनी ही कल्पना सत्यात उतरवली.
हैदोस, मुंबईची रात्र अशी मासिके, पिवळ्या कव्हरातल्या
कादंबऱ्या, सी ग्रेडचे सिनेमे, व्हिडिओ पार्लर, भाड्याने व्हिसीआर आणि ब्लु फिल्म
पार्ट्या, सीडी, पेन ड्राईव्ह अशा वाटा
वळणे घेत तमाम मंडळी आता मोबाईलद्वारे, अंगुली-स्पर्शे-मात्रेमान, दर्शनाचा आणि काम(ना)पूर्तीचा लाभ घेत आहेत. आपला हात जगन्नाथ, दुसरं काय. अगदी
फुकट, अगदी सहजी उपलब्धता आणि सोबत गुप्तता मिळते आहे, कुणालाही न कळता कार्यभाग
उरकला जातो आहे, म्हटल्यावर काय होणार?
आमच्या भागातल्या एका संस्थानिकांना
दर्शन-लोलूपतेचा नाद होता. म्हणजे असं की त्यांच्या डोळ्यादेखत कोणीतरी कामक्रीडा
केली, संभोग केला, तरच ह्यांना कामोत्तेजना व्हायची. केवळ त्यासाठी त्यांनी
जवळच्या टेकडीवर एक वेगळा वाडा बांधला होता. तिथे वेळी-अवेळी काही जोडपी जुगवली
जायची आणि हे संस्थानिक मिटक्या मारत, पहात पहात, त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायचे. हे
इतके सर्वज्ञात होते की पत्ते क्लबातही चोरून पाने पहाणाऱ्याला, ‘ए, संस्थानिकगिरी
करू नकोस!’, असं दटावलं जायचं. इंटरनेट आणि मोबाईलच्या आगमनाने आता सारेच
संस्थानिक झाले आहेत.
त्यामुळेच ह्याच्या भल्याबुऱ्या परिणामांचा विचार
करायला हवा. कामपट बघण्याचा फायदा होतो का
तोटा? हा प्रश्न अवघड आहे. पुरावे नि:संदिग्ध आणि स्पष्ट नाहीत. काही तोटे जसे उघड
आहेत तसे काही फायदेही आहेत. पोर्न नेमकं
योग्य की अयोग्य?, हवं की नको?, हवं तर किती प्रमाणात? पोर्नचे रसिक आस्वादक, पोर्न बाधित आणि व्यसनी पोर्नाडे कसे
ओळखावेत? (पोर्नोग्राफीचे व्यसन आणि त्यातून सुटका याची सविस्तर चर्चा करणारा माझा
लेख, ‘मन कामरंगी रंगले ‘माझ्या ब्लॉगवर आहे. त्याची लिंक https://shantanuabhyankar.blogspot.com/2020/05/blog-post.html ) या साऱ्या
प्रश्नांबद्दल अधिक स्पष्टता हवी आहे. शिवाय
बऱ्याच अभ्यासांचा अभ्यास असं दर्शवतो, की इथे वस्तुनिष्ठ अभ्यास कमी आणि
अभ्यासकांनी आपलीच मते पुढे रेटणे जास्त. तेंव्हा
या रसील्या, रंगेल ‘विषया’चा हा बिचकत बिचकत घेतलेला आढावा.
पोर्नला कोणी शिक्षणाचे साधन म्हणो न म्हणो, पण त्यातून शिक्षण घडत असतं हे खरंच
आहे. शाळा कॉलेजमध्ये पाठ्यपुस्तकांतून, वयानुरूप, शास्त्रशुद्ध, लैंगिकता शिक्षण द्या म्हटलं की
सारे दचकतात. त्यामुळे लैंगिकतेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळणे दुरापास्त आहे आणि
पोर्न मिळणे अगदी सोपे. बहुसंख्य मुलामुलींना शरीराच्या अंगप्रत्यंगाचे दर्शन, कामूकता, समागम वगैरेची
पहिली ओळख, आता पोर्नमधून होते.
शाळा-कॉलेजमध्ये दारूचा पहीला घोट, सिगरेटचा
पहीला कश आणि पोर्नची पहिली क्लिप, साधारण एकसाथच मुलांच्या भावजीवनात प्रवेश
करतात. मुलं (आणि मुलीही) अगदी लहान वयात आणि भरपूर कामपट बघतात असं एक अभ्यास सांगतो. थोर तर पोरांच्याही
पुढे आहेत. 50% बायका आणि 75% पुरुष कामपट पहातात म्हणे. हे आकडे पोर्न-दर्शन घेतल्याचे मान्य करणाऱ्यांचे आहेत. बाकी झाकली मूठ सव्वा
लाखाची.
पुरुष ज्या कारणे पोर्न बघतात त्याकारणे बायकाही
बघतात. ‘पोर्नहब’, ही जगभरातल्या सर्वाधिक
कामूकांचा, सर्वाधिक काळ मुक्काम असणारी साईट. इथे 35% गिऱ्हाइक बायकांचं आहे. काही
निव्वळ उत्सुकतेपोटी बघतात. त्यातल्या काही किळस
वाटून हा मार्ग टाळतात. काही कामोत्सुकतेपोटी बघतात. काही त्यातून काही तंत्र शिकायला बघतात. पीडन
कामक्रीडा चवीने पाहणाऱ्या बायकासुद्धा बऱ्याच आहेत. बऱ्याचजणी
शैय्याक्रीडेची लज्जत वाढावी,
म्हणून शैय्यासोबती बरोबर बघतात. हस्तमैथुन वगैरे एकल कामक्रीडांत कल्पनाविलासाला मदत म्हणून हे कामी येते. त्यामुळे
दर्शनार्थींपैकी 30% एकेएकट्याच दर्शनाचा लाभ घेतात.
अनेक समव्यावसायिकांशी बोलताना असं जाणवलं की आता
कामपट दर्शनाने नातेसंबंध बिघडल्याची,
कामसमस्या उद्भवल्याची उदाहरणे सर्रास आढळतात. लैंगिक विकृती, बाल लैंगिक शोषण,
पीडन सौख्य, जबरी संभोग, अत्याचार असं नको तेही सारं इथं दिसतं. मग ते पाहून पाहून आधी मन निर्ढावतं आणि
मग शरीर धजावतं. हे झाले क्वचित पण गंभीर प्रश्न, किरकोळ तर कितीतरी.
हेच पहा ना, कोणे
एके काळी लिंगदौर्बल्य हा प्रॉब्लेम वयस्क लोकांचा समजला जायचा. मात्र आता, चाळीशीपूर्वी
अशी तक्रार दिसते. स्थौल्य, बैठी जीवनशैली, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार,
धूम्रपान अशी इतर काहीच कारणे दिसत नाही.
तेंव्हा पोर्न-अजीर्ण झाल्यानेच हे असणार. हीच नाही तर इतरही कामसमस्या आता वाढत्या
प्रमाणात आढळून येतात. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा. कुणाची गाडी ढकल
स्टार्ट, तर कुणाची स्टार्टच होत नाही; कुणाला इंधन पुरत नाही तर कुणाची गाडी मुळी ईप्सित स्थळी
पोहोचतच नाही. आजकाल लोकं तक्रारी
सांगतातही अधिक मोकळेपणानी.
बरेचदा मंडळी
आणि त्यांची मंडळी पोर्नमधले पाहून आपले अंथरूण पसरू पाहतात. स्वतःकडून आणि/किंवा
जोडीदारांकडून भलभलत्या अपेक्षा बाळगू लागतात. अपेक्षाच अवास्तव असल्यामुळे
त्यांची पूर्ती अशक्यच असते. गोष्ट तशी साधीच. पूर्वी चार लोकांत शोभून
दिसण्याएवढं सौन्दर्य पुरायचं. पण आता? पोर्नच्या पडद्यावरच्या त्रैलोक्यसुंदऱ्या आणि
मदनावतार पहाता, आपण चार जणा/णीत सोडा, हजारांत देखणे/णी असलो तरी तरी
‘त्यांच्या’पेक्षा कमीच! कामपटातून
लिंगाचा अवास्तव आकार, संभोगाचा अवास्तव कालावधी, पुष्ट मांड्या, उभार स्तन असं सगळं दाखवतात,
ते पाहून असूया, खंत, तुलना आणि त्यातून येणारे गंड हे काम समस्यांचे एक महत्वाचे
कारण आहे.
आपण ‘त्यांच्या’सारखे
दिसत नाही, ‘त्यांच्या’सारखे ‘करू’ शकत नाही, जोडीदार सगळ्या काम-कसरतीत, सगळ्या
विकार विलसितांत, सगळ्या काम-विभ्रमात, सगळ्या मैथुन मौजेत साथ देत नाही. पडद्यावरची मज्जा पलंगावर अनुभवास येत नाही. कचकड्याच्या
जगातल्या कसलेल्या कलावंतांचे, कमावलेले कामकौशल्य सत्य आहे; हाच मुळी पहीला
गैरसमज आणि ते सहजसाध्य आहे हा दुसरा. लिंगोत्थानक गोळ्या, इंजेक्शने, कॅमेरा अॅगल्स, कट्स आणि सफाईदार
संकलन या साऱ्याची पुण्याई त्यामागे असते. पण
कामातुरांना याचे भान कुठले?
तेंव्हा प्रत्यक्षातल्या
शिळ्या संभोगापेक्षा हा पोर्नरूपी काम मार्ग, उत्कट, झटपट आणि खात्रीचा ठरतो. अती कामपट
सेवनाने काम-निरसता वाढीस लागते, कामेच्छा
आटते, असेही काही (वादग्रस्त) अभ्यास सांगतात. मग बिच्चारे समस्याग्रस्त, वर्तमानपत्रातल्या समस्यापूर्तीवाल्या ताईंना पत्र लिहितात किंवा
फिरस्त्या लिंगवैदूंकडचे औषध घेतात.
पण पोर्नचे फायदेही असतात बरं.
कामपट
निर्मितीच्या मूळ हेतूंत हे होतं का नाही ठाऊक नाही पण पोर्नने
कामजीवनाबद्दल जाणीव जागृती वाढली आहे. मानवी बाह्यांग विविध आकारात, प्रकारात,
रंगात आणि ढंगात असू शकतात, नव्हे असतात, हे ज्ञान पोर्ननेच सार्वजनिक झाले आहे.
एरवी इतक्या विविध गुप्तांगांचे उघड उघड दर्शन; डॉक्टर, वेश्या आणि वेश्यागमनी
यांच्याच भाग्यात होते. मानवी शरीररचनेबाबत अंतिम शब्द समजल्या जाणाऱ्या ‘ग्रेज
अनॅटमी’ या ग्रंथराजातील चित्रे अत्यंत एकरंगी, एकढंगी आणि एकसूरी आहेत. शरीररचना शास्त्र,
जसे पोर्नने तळागाळात नेले, त्याचे सार्वजनिकीकरण, लोकशाहीकरण केले; तसे ‘ग्रेज
अनॅटमी’ला बापजन्मात शक्य झाले नसते.
कामपटांना नजरा सरावलेल्या असल्याने पोल डान्स, बेली
डान्स वगैरे उत्तान नृत्यप्रकार आता
व्यायाम-प्रकार म्हणून मान्यता पावलेले आहेत. पोल डान्ससाठीचा पोल आता जीममध्येही
असतो आणि ‘बेली डान्स क्लासेस नियर मी’ सर्चताच अगदी जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा स्क्रीनवर
डझनावारी नावे उमटतात.
लहानपणापासून नीतीमत्तेचे कडक डोस पाजल्यामुळे, काहींच्या कामवृत्ती उल्हसित होऊच शकत नाही. सतत
मनात किळस, घृणा, पापभावनाच येते. अशी
तीव्र पापभावना पोर्नमुळे उतरणीला लागू शकते. यांना कामपट दर्शनाने चांगला फायदा होऊ शकतो. जगात असंही
चालतं हा धडा मिळतो; लवकरच ते, जग असंच चालतं, या निष्कर्षाला येतात.
निसर्गाने माणसाला शिस्न आणि योनी एवढे दोनच काम
अवयव दिलेले नसून या दोहोंचा संपर्क, एवढाच एकच आनंद मार्ग नाही; ही जाणीव पोर्नने दिलेली आहे. पोर्नमुळे विविध कामासने पाहायला मिळतात.
मग करून पहावीशी वाटतात, मदन क्रीडेत वैविध्य येतं. आपल्या काम-कौशल्यांचा परीघ
विस्तारतो. अन्य जनही असे काही करत आहेत हे पाहून आत्मविश्वास वाढतो. धाडस वाढते. सायकल
जशी हाताने चालवता येते, उलटे बसून, तिरके बसून, हात सोडून वगैरे चालवता येते
किंवा थोडीशी कल्पनाशक्ती वापरुन आइसक्रीम जसे वेगवेगळी आसने करत करत खाता येईल;
तसंच हे. अर्थातच मूळ कृतीतील आनंद वाढेलच
असं नाही. सायकलवरून तोल जाऊन धडपडण्याची किंवा आइसक्रीम सांडण्याचीच शक्यता
जास्त.
कित्येक
लग्न व्यवहारांत मैथुन घडले तरी मिथुन संवाद नसतो. हवे-नको, आवडते-नावडते हे
खुलेपणाने सांगणे प्रशस्त समजले जात नाही. कामपट दर्शनाने नात्यातील मोकळेपणा वाढतो, भीड चेपते, धीट
संवाद शक्य होतो आणि यातून शृंगार फुलायला
मदत होते. जन्म सावित्री आणि जन्म सत्यवानांच्या नात्यातील तोचतोचपणा निघून जातो.
त्याच त्या अळणी कार्यक्रमाला चटकदार फोडणी मिळते.
कामपट दर्शनाने
दिव्यांगांच्या कामजीवनात लक्षणीय फरक पडू शकतो. त्यांच्या कुचंबणेची फारशी जाणीव
कुणाला नसते. त्यांच्या ‘अशा’ शारीर गरजांची चर्चासुद्धा होत नाही. पण
त्यांच्यासाठी, अंथरूणाला खिळून असणाऱ्यांसाठी, एकाकी व्यक्तींसाठी, प्रदीर्घ
दुरावा सोसणाऱ्यांसाठी, कामपट हे वरदान ठरू शकतात.
गैर-दृष्टिकोनातून पोर्नमुळे कामेच्छा कमी होते
तशी बरेचदा पोर्नची साथ असेल तर कामेच्छा वाढते देखील. एरवी फक्त रात्रीच्या शोसाठी
लागणाऱ्या पिक्चरचे आता मॅटीनी शो सुद्धा चालू होतात. भांडण, अबोला यावर सुद्धा कामपट
गुणकारी आहे. तुझं माझं जमेना आणि पोर्नशिवाय
भागेना, अशीही जोडपी आढळतात.
फायद्यांची अशी
कितीही मोठी यादी करून या कामपटांची कितीही तरफदारी केली तरी; बहुदा पुरुषांनी, सहसा
पुरुषांसाठी बनवलेल्या ह्या फिल्म्स. पोर्न हा प्रकारच मुळी पुरुषप्रधान. बायकांना
आणि त्यांच्या आत्मसन्मानाला लोळवणारा, त्यांच्या भावनांना य:कश्चितही किंमत न
देणारा. त्यामुळे बऱ्याच स्त्रीवाद्यांचा याला विरोध. पण
कामभाव हा स्वाभाविक आणि आवश्यक गुण आहे. त्याचा कोणी विरुप बाजार मांडतंय म्हणून
कामभावाची निर्भत्सना कशासाठी? उलट त्याचा जबाबदार उत्सव मांडायला हवा. शिवाय
कामभावना काय फक्त पुरुषांनाच असतात? स्त्रियांनाही असतात. त्यांनाही ह्यात आनंद
आहेच. आज कामपट ही तर लैंगिकतेची आघाडीची
शाळा झाली आहे. कामिनी मनीच्या कामभावाबद्दलचे गैरसमज इथेच तर रुजतात. म्हणूनच
नुसता निषेध करण्यापेक्षा पर्याय देणे केंव्हाही उचित. हा पर्याय म्हणजे, स्त्री-वादी पोर्न!
हे म्हणजे, नीतिमत्ता सांभाळून महिलांनी निर्मिलेले,
दिग्दर्शिलेले पोर्न. नीतीमत्ता म्हणजे
कलाकारांच्या आरोग्याची काळजी, कंडोमचा वापर, संमती वयाचे पालन इत्यादी. इथे
कलाकारांच्या आवडीनिवडी आदरपूर्वक विचारात घेतल्या जातात. कोणता कामप्रकार, कोणते
काम-चाळे किंवा कोणते काम-खेळणे चालेल,
आवडेल, रुचेल वगैरे विचारून त्यांच्या कलाकलाने घेतलं जातं. मग दिग्दर्शिकेला नेमकं
काय काम रहातं कुणास ठाऊक!
नेहमीच्या
पोर्नमध्ये वीर्यपतनाला, स्खलनाला, अग्रस्थान आहे. स्त्रीच्या कामपूर्तीला इथे
दुय्यम स्थान दिलेले असते. स्त्रीवादी पोर्नमध्ये मात्र स्त्री-कामपूर्तीला
न्याय्य स्थान दिले जाते. पण
काहींच्या मते दुय्यम वागणूक हा मुद्दा दुय्यम आहे. स्खलन ही पुरुषाच्या
कामपूर्तीची खणखणीत खूण. शिवाय ही घटना एकाच वेळी दृश्य आणि प्रेक्षणीय.
कामपूर्तीची अशी निजखूण स्त्रियांमध्ये नाही, ही मुख्य अडचण आहे.
हे म्हणजे स्त्रियांचे वस्तुकरण थांबवणारे पोर्न.
फेमीनिस्ट पोर्नात एरवीचं सगळं आहेच
पण यातील पात्र गप्पा मारतात, खळखळून हसतात, एकमेकांचे कुणीतरी असतात. इथले चाळे बाईच्या
कलाकलाने चालतात. इथे कामक्रीडा निव्वळ दोन मांड्यांमधील अवयवांत सीमित दाखवत
नाहीत. स्पर्शसुख आणि शरीर-मर्दन याचाही पुरेपूर वापर असतो. मुख-मैथुनातही एकतर्फी
शोषण न दाखवता बरोब्बर समप्रमाण राखलेले असते!! स्त्री-वादी पोर्न म्हणजे,
सर्व वंश, वर्ण, लिंगभाव (LGBTQ) समावेशक पोर्न.
अर्थात यातील कित्येक गोष्टी प्रस्थापित पोर्नमध्येही असतातच. अगदी यथेच्छ असतात. रसवैविध्याशिवाय
सरस कामरस निर्मिती कुठली?
हे महिला स्पेशल पोर्न पाहणार कोण? जर
मार्केटच नसेल तर हे स्त्रीवादी
कामपट चालणार कसे? नाहीच ते चालत. कारण पोर्नचे
बहुसंख्य ग्राहक पुरुष, तेही पुरुषी पुरुष. कामपट पाहताना समानता वगैरे मुद्दे अगदीच अस्थानी. पुरुषांना कोणतेही पोर्न प्रिय आहे तर महिलांना फेमीनिस्ट अधिक प्यारे, असे
सांगणारे अभ्यास आहेत पण सध्यातरी, बायकांनीसुद्धा या प्रकाराला फार
हिरीरीने उचलून धरलेले नाही.
पण फेमीनिस्ट पोर्न
पुरूषांबद्दलही सहानुभूती बाळगून आहे. स्त्री मुक्तीची
चळवळ ही पुरुष मुक्तीची चळवळ देखील आहे. मार्केटच्या तंत्राने चालणाऱ्या ह्या इंडस्ट्रीत
काळ्या किंवा आशियाई पुरुषांनाही बरंच काही भोगावं लागतं. पाश्च्यात्य पोर्नमध्ये
(आणि आपल्याकडे तेच सार्वत्रिक
आहे) लठ्ठ ढुंगणाच्या, घेरदार, काळ्या बायांना जसं फक्त लो-बजेटवाल्या कामपटात काम
मिळतं, तसं आशियाई पुरुष बरेचदा नंपुसक आणि बायले दाखवलेले असतात.
केनी स्टाइल्स नावाचा एक नरोत्तम, पोर्न सुपरस्टार आहे. ‘असल्या’
इंडस्ट्रीत चांगला प्रसिद्ध आहे. पाश्चिमात्य कामपटांचा हा पहीला स्ट्रेट, आशियाई, काळा, कामपट-पटू. यातले
‘ऑस्कर’ मिळालेला. म्हणून याचे कौतुक. आपल्या
‘सुपरमॅन स्टॅमिना’ नावाच्या फिल्ममध्ये तो आपल्या गादीवरील स्टॅमिनाचे रहस्य
सांगीन म्हणतो. पण सुरवात करतो, त्याला कसा शीघ्रपतनाचा त्रास होता ते सांगून. त्यावर
केलेली मात, एक आशियाई म्हणून केला गेलेला भेदभाव आणि अखेरीस कामपट स्टार म्हणून त्याला मिळालेले यश. स्टारच्या ठाशीव इमेजमधून बाहेर पडून तो काही सांगू पाहतो.
एकाच वेळी तो हतवीर्यही भासतो आणि वीर्यवानही. कामपट-पटूने शीघ्रपतनाची जाहीर कबुली
देणे, म्हणजे बॉलीवूड नटीने कोड हे आपल्या
गोरेपणाचे रहस्य आहे, अशी कबुली दिल्यासारखे आहे. पण ते तो करतो. अशा अनवट वाटेने
जाणारे कामपट असायला हवेत असं फेमीनिस्ट
पोर्नवाल्यांचे म्हणणे.
जसं सिनेमा पहाणे सरसकट चांगले वा वाईट नसते तसंच
कामपट पाहणे चांगले अथवा वाईट असे शिक्के नाही मारता येत. पोर्न पाहून फक्त
नुकसानच होतं किंवा नाहीच होत असे युक्तिवाद म्हणजे निव्वळ वितंडवाद. शेवटी पोर्न
हे यथार्थ दर्शन नाही हे उघडच आहे. बॉलीवूड सिनेमा पाहून कोणी संसार बेतू लागला तर
कसं व्हायचं? तारतम्य हवेच. हा
नीरक्षीरविवेक नाही कारण लैंगिकता शिक्षणाचा अभाव. त्यामुळे पोर्नचाच प्रभाव.
एकेकाळी रेडियोने ‘ऐकणे’ आणि सिनेमा-टीव्हीने ‘पहाणे’ जनसामान्यांच्या आवाक्यात आणले. आज मोबाईल
आणि इंटरनेटने मैथुन मौजेचे जणू अक्षयपात्रच हाती दिले.
हे नवेच हस्त-मैथुन.
पोर्नातूर समाजाने या मंथनातून बाहेर पडणारे हलाहल पचवले तरच नंतर अमृत कुंभ रिचवता येईल. तेंव्हा पोर्नातूर
समाजाच्या पचनशक्तीला शुभेच्छा!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
shantanusabhyankar@hotmail.com
👍
ReplyDelete