Thursday, 9 November 2023

जसं वाटतं तसं असतंच का?

 

जसं वाटतं तसं असतंच का?

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

रविवार होता तेंव्हा दुपारीच झंप्या मित्राकडे पीएस् 5  खेळायला म्हणून जरा घराबाहेर पडला. इतर मित्र जमेपर्यंत सायकलला रेलून तो चौकात उभा होता.  इतक्यात जोराचा पाऊस सुरू झाला.  इतक्या जोरात की कडेच्या दुकानाच्या आडोशाला जाई पर्यंत तो पूर्ण भिजला. अर्ध्या मिनिटात धो धो पाऊस. पुढे जाणं शक्यच नाही. तो बिच्चारा घरी परत आला.  पूर्ण भिजला होता.

बघ, मी खेळायला निघालो की पाऊस आलाच.  चांगली मॅच ठरली होती आमची.’ आजी डोकं पुसत होती आणि हा भुणभुण करत होता. 

संध्याकाळी सुद्धा पुन्हा असंच झालं.  त्याला आणि भुपीला आजीने बाजारात पिटाळलं. सगळं सामान घेऊन दोघं  घराकडे यायला निघाले तर पुन्हा  धो धो पाऊस. कसेबसे सामान सांभाळत घरापर्यंत पोहोचले, पण दारातच एका पिशवीचा बंद तुटला.  सामान सगळं  चिखलात सांडलं आणि एकूणच सगळा बट्ट्याबोळ  झाला. वर हे घरात पोहोचतात ना पोहोचतात, तोच बटण बंद व्हावा तसा पाऊस बंद झाला!

अर्थात जेवताना हा विषय झालाच.  दोघेही आजीकडे तक्रार करत म्हणाले की, ‘आम्ही बाहेर पडायचं म्हटलं की पाऊस येतोच.  त्याला बरोब्बर समजतं की आता ही पोरं बाहेर पडणार आहेत.  आता आपण पण ‘पडावं’, नुसतं पडावं नाही, ‘कोसळावं’!’  झंप्या तर खात्रीने सांगू लागला, ‘इंद्रदेव आभाळातून माझ्या हालचालींवर डोळा ठेवून आहे आणि मी  बाहेर पडलो की नेम धरून माझ्या अंगावर पाऊस पाडतो!’  ही सगळी गंमत ऐकून आजी हसायला लागली.

अरे, असं कसं असेल? आपण बाहेर पडतो तेव्हा पाऊस येतो आणि घरात आल्यावर तो थांबतो? आपण घरी आल्यावर, आपापल्या घरातून इतर अनेक लोक बाहेर पडतच असतील.  त्यांना असं वाटत असेल का; की आत्ता आपण बाहेर पडल्यामुळे पाऊस थांबला?’ 

हो की गं आजी.’ झंप्या म्हणाला, ‘हे बाहेर पडले म्हणून पाऊस थांबला असे होत असेल का? जसा पाऊस मला त्रास देतो, तसा न पडून कुणाला मदत करत असेल का? पावसाला असं काही समजत असेल का? पावसाला मन असेल का? बुद्धी असेल का?’

पण आजी, पावसाला मन कसं असेल? पाऊस असला तरी सगळं बंद कुठे होतं?भुपी तावतावाने बोलू लागली.  रस्त्यावर लोकांची वर्दळ होतीच.  लोक येत होती, जात होती.  छत्री, रेनकोट, रिक्षा अशी काय काय मदत घेत होती.  पाऊस थांबल्यावर छत्री मिटवून ठेवत होती.  रेनकोट काढून ठेवत होती.  पुन्हा आला की पुन्हा छत्र्या उभारल्या जात होत्या.  म्हणजे लोकं शक्य तशी कामे करत रहातात आणि  पाऊस आपला पडत राहतो,  त्याच्या त्याच्या लयीत, त्याच्या त्याच्या नियमाने आणि त्याला मन आहे वगैरे, हे सगळं फक्त आपल्याला वाटतं?’

मग आजी म्हणाली, ‘असं तुम्हाला वाटतंय ना? मग नुसतंच तसं वाटतंय का खरंच पाऊस त्रास देतो, हे शोधून काढायची युक्ती तुम्हाला सुचत नाहीये?’

हा प्रश्न विचारताच झंप्याच्या आणि भुपीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.  अरे हो, खरंच की, प्रयोग!’ दोघे एकदम म्हणाले.

पण काय प्रयोग करणार?’ आजी.

आपण  बाहेर कधी पडतो आणि पाऊस कधी पडतो, याच्या नोंदी ठेवायच्या.’

ओके, मग पुढे?’ आजी.

आणि मग तुलना करून बघायची.’ भुपीने डिटेल्स पुरवले.

इतकी सोपी युक्ती. तात्काळ भिंतीवरच्या व्हाईट बोर्डवर भुपीने कॉलम आखायला घेतले. पण मग मात्र झंप्या आणि भुपीला अनेक प्रश्न पडले आणि ते जाम  सोडवता येईनात.

पहीलाच प्रश्न, ‘पाऊस पडतो आहेअशी नोंद करायची तर नेमका किती पाऊस पडायला हवा? नुसतीच भुरभुर असेल तर? मग आजीशी चर्चा आलीच. पण ती तर होती  शास्त्रज्ञ आजी. तिनी काही थेट उत्तर तर दिलं नाहीच उलट तिनी दुसराच प्रश्न विचारला,  आणि बाहेर जाणे नेमके कशाला म्हणायचं? अंगणात जाऊन  वाळत घातलेले कपडे आणणे किंवा माझ्या गाडीला गेट उघडणे,  हे बाहेर जाणे समजायचे का? का शाळेत जाणे, खेळायला जाणे हे म्हणजेच बाहेर जाणे?’

दोघांनी भरपूर चर्चा केली, थोडे भांडलेही. शेवटी त्यांचं असं ठरलं की कामानिमित्त  गेटच्या बाहेर पडले तर त्यालाबाहेर जाणेअसे म्हणावे. तसेच छत्री घ्यावी लागेल इतपत पाऊस, म्हणजेपाऊस  पडतो आहे’; अशा व्याख्या ठरल्या.  थोडक्यात कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा, निरीक्षणे नोंदवायची तर मुळात नीट व्याख्या करायला हवी.

आठवड्याच्या शेवटी त्यांच्या लक्षात आलं की ते दोघे आणि आजी मिळून ७२ वेळा घराबाहेर पडले होते पण पावसाने  त्यांना फक्त ८ वेळ बेसावध  गाठले होते. म्हणजेच आपण खेळायला बाहेर पडल्यावर पाऊस येतो असं नुसतं वाटत होतं; प्रत्यक्षात तसं होत मात्र नव्हतं.  आपले आपण शिकण्याचा, उत्तरे शोधण्याचा आनंद काही औरच.

म्हणजे आजी, जसं वाटतं, तसं असतंच असं नाही!’ झंप्या खुष होत म्हणाला.

‘..आणि जसं असतं, तसं वाटतंच असंही नाही!’ भुपीनी भर घातली. 

म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असं खरोखर आहे. पण तसं वाटत मात्र नाही.’  झंप्याने उदाहरण दिले. आजी हसायला लागली.

‘का गं हसंतेस?’ झंप्या जरा रंगावलाच.

आजी म्हणाली, ‘उदाहरण चुकलं बरं का झंप्या, समजा पृथ्वी स्थिर असती आणि  सूर्य पृथ्वीभोवती फिरत असता, तर आपल्याला काय वेगळं वाटलं असतं? काहीच नाही!! नीट विचार करा दोघंअसं म्हणून, त्यांना नव्या कोड्यात टाकून आजी पुन्हा समोरच्या लॅपटॉपमध्ये गढून गेली. 

 

प्रथम प्रसिद्धी

किशोर

दिवाळी अंक २०२३

 

No comments:

Post a Comment