मी लिहितो तेंव्हा रिमझिम..
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मी लिहितो ते सगळं काम संपल्यावर. रात्री उशिरा. थकल्याक्षणी ताजेतवाने करणारा कश म्हणजे लिखाणाचा. रात्री बाहेर रिमझिम पाऊस निनादत असतो. दवाखान्यातले एकेक विभाग बंद होत जातात. कोपऱ्यातली माझी केबिन तेवढी काजव्यासारखी तेवत असते. ठरलेले गुडबाय, गुडनाईट केबिनमध्येही ऐकू येते, दिल्या-घेतल्या किल्ल्यांचे आवाज, ‘अजून आहेत का सर?’ अशी अस्फुट विचारणा, असं सगळं कानामागे करत मी गाढ लेखनसमाधीत स्थिर होतो. बाहेरचा अंधार किर्र होतो. सारं भवताल जणू मला येऊन बिलगतं, शब्द आणि कल्पनांच्या रिमझिम सरी अलगद मनात उतरतात. काही रूजून येतं आणि समोरच्या कॉम्प्युटरवर पांढऱ्यावर काळं होत रहातं.
हे सारं सुचतं कसं हा सनातन प्रश्न आहे. त्याचं उत्तर देता येईलच असं नाही. प्रतिभावंतांनाही नाही. निर्मितीचा तो दुर्मिळ क्षण कधी येतो, कुठून येतो, कसा गवसतो आणि कसा निसटतो हे सांगणं अवघडच आहे. माझं काम त्या मानानं सोपं. माझं बरचसं लिखाण तांत्रिक. माझ्या व्यवसायावर आधारलेलं. काल्पनिक पात्र निर्माण करून, या कळसूत्री बाहुल्यांना आपल्या तालावर नाचवून, त्यांच्याकरवी मानवी जीवनावर भाष्य करणारी प्रतिभा माझी नव्हे. मी आपला माझ्याच परिघातले, माझेच अनुभव, माझ्याच शब्दात मांडणारा माणूस आहे. जरा चटपटीत भाषेत मी लिहितो, एवढंच. ‘लेखक’ पेक्षा ‘लेखनिक’ म्हणवून घेणे मला जास्त शोभेल; असा लेखनिक की जो स्वतःच स्वतःकडून डिक्टेशन घेतो.
ललित अंगानी वैद्यक विषय समजावून देणे ही माझी स्पेशॅलिटी आहे. बहुतेकदा जे पेशंटशी बोलतो तेच मी लिहितो. त्यामुळे आपोआपच त्यात बोली भाषा, ते शब्द, तो लहेजा येतो. माझा सल्ला समोरच्या चष्म्यातून कसा दिसतो, समोरच्या कानांना कसा ऐकू जातो, हे मला सवयीनी माहीत आहे. मग आपोआपच पेशंटच्या प्रश्न आणि शंकांमार्फत, पेशंटचाही दृष्टीकोन माझ्या लिखाणात डोकावतो. संवादातून अज्ञान, गैरसमज दूर होतात. ‘बुडता हे जन न देखवे डोळा’, अशा भूमिकेतून हे बहुतेक लिखाण झाले आहे.
वैद्यकीचे वाभाडे काढणारे लिखाण बरेच आहे, बरेच लोकप्रियही आहे. हे व्हायलाच हवे. पण माझा तो पिंड नाही. मला वैद्यकीच्या सकारात्मक बाजूबद्दल लिहायला अधिक आवडतं. वाईट डॉक्टर असतात, त्याही पेक्षा वाईट आरोग्य व्यवस्था असतात. त्यांची चिकित्साही आवश्यक आहे. पण जगाच्या इतिहासात आधुनिक वैद्यकीमुळे बरेच भले घडले आहे. त्याचीही नोंद व्हायला हवी. छद्मवैद्यकीवर माझा विशेष राग आहे. होमिओपॅथी हे छद्मविज्ञानाचे अगदी मासलेवाईक उदाहरण. या रागाचे प्रतिबिंब माझ्या लिखाणात ठायी ठायी आढळेल. वाईट बाजूच दाखवायची तर मी ह्या साऱ्यावर तुटून पडतो.
वैद्यक विश्वातील विविध शोधगाथा धुंडाळायला मला आवडतं. त्या शोधांमागील नाट्य, त्यातील अफाट उंचीची पण मातीच्या पायाची माणसं, या शोधांचा समाजावर होणारा भलाबुरा परिणाम, या साऱ्याचा वेध घ्यायला मला आवडतं. कोणत्याही औषधोपचारांचे काही आर्थिक मूल्य मोजावेच लागते, पण अनेक सामाजिक मूल्यंही औषधांमुळे ध्वस्त होतात. एचआयव्हीची औषधे आज अगदी फुकट मिळतात. पण औषधे अजिबात नव्हती तेंव्हा, होती पण आवाक्याबाहेर होती तेंव्हा आणि आता स्वस्त आणि सार्वत्रिक झाल्यावर समाजाचं भान आणि देहभान पराकोटीचं बदललेलं आहे. असे समाजिक आणि आर्थिक ताणेबाणे समजावून द्यायला आणि त्या निमित्ताने स्वतः समजावून घ्यायला मला आवडतं.
किंवा, मी रोजच पेशंटना गर्भ निरोधक गोळ्या देत असतो. पण ह्या गोळ्यांपूर्वीचं आयुष्य कसं असेल? गर्भधारणा ही सर्वस्वी कह्यात येण्यापूर्वी सर्वस्वी आंधळी कोशिंबीरच होती. कसं असेल ते जग? लैंगिकतेवरती किती खोल खोल परिणाम झालाय या निरोधनाचा. मग तो विषय माझ्या आणि मी त्या विषयाच्या खनपटी बसतो आणि ‘समाजाच्या वर्मी लागलेली गोळी’ असा लेख जन्माला येतो. खरंतर मी हे न करता नुसत्याच गोळ्या देत राहिलो तरी भागणार असतं. पण यालाच लेखकाची अस्वस्थता वगैरे म्हणत असावेत.
ललित शैलीत मी वैद्यकीय विषयावर लिहितो. यात काही क्लुप्त्या मी जाणीवपूर्वक योजलेल्या असतात. वाचकांनी डोकं चालवत लेख वाचावा अशी माझी इच्छा. मग मी मधूनच शाब्दिक कसरती करतो. त्यातला गर्भितार्थ लक्षात यायला ते वाक्य पुन्हा वाचावे लागते. ‘पोर्नातुराणांम्’ या पोर्नोग्राफीवरील ताज्या लेखांत मी लिहिलंय, ‘स्खलन ही पुरुषाच्या कामपूर्तीची खणखणीत खूण. शिवाय ही घटना एकाच वेळी दृश्य आणि प्रेक्षणीय.’ इथे ‘दृश्य’ आणि ‘प्रेक्षणीय’ ह्यांचे नेमके अर्थ लक्षात आल्याशिवाय यातील गंमत कळतच नाही. पण ते लक्षात येताच कोडे सुटल्याचा आनंद होतो. मधूनच मी मुद्दाम एखादा गावरान शब्द टाकतो. ब्रेख्त जसं प्रेक्षकांना मधूनच धक्के देत नाटकातील अवांतर गोष्टींपेक्षा आशयावर लक्ष द्यायला सांगायचा तसाच हा प्रकार.
ज्या विषयावर मी लिहीतो त्या विषयाशी संबंधित शब्द, विशेषणे मी आवर्जून वापरतो. ही तर पुलंनी वापरलेली बेफाट ट्रिक. ‘काही अप काही डाउन’ या लेखात रेल्वेसंबंधी, ‘माझे पौष्टिक जीवन’मध्ये पोस्ट खात्याशी संबंधित आणि ‘अंगुस्तान विद्यापीठ’ मध्ये शिंप्यांशी निगडीत शब्द त्यांनी वापरले आहेत. यामुळे रस निष्पत्ति, वातावरण निर्मिती, विनोद निर्मिती वगैरे उत्तम साधली जाते.
अनेकांप्रमाणे पुलं माझे आदर्श. अत्यंत प्रासादिक, ओघवती भाषा आणि एकातून एक अशी उमलत जाणारी प्रसंगांची मालिका, ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ठ्ये मला विशेष अनुकरणीय वाटतात. आणखी एक, अतिशय हळुवारपणे पुलं आपल्याला विचार करा, ही योग्य दिशा आहे, असं मार्गदर्शन करत असतात. आपल्या न कळत आपण त्यांची मूल्यं, त्यांचे रासिकत्व अंगी बाणवायला लागतो. त्यांच्यासारखा विचार करायला लागतो. असं आपलं लिखाण असावं, असं मला वाटत आलं आहे. जयंत नारळीकरांची काही व्याख्यानं मी ऐकली होती. अत्यंत सुबोध मराठीत त्यांनी अवकाश विज्ञानातील अतिशय क्लिष्ट संकल्पना, अचंबित करणाऱ्या सहजतेने समजावून सांगितल्या होत्या. त्यांच्यापेक्षा माझं काम खूपच सोपं आहे. आरोग्यविज्ञानाबद्दल सामान्य भाषेत बरीच शब्दसंपदा उपलब्ध आहे. ती तेवढी कौशल्याने वापरायची होती.
पुलं आणि नारळीकर यांच्याप्रमाणे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे प्रसारक म्हणता येतील असे, कार्ल सेगन, रिचर्ड फेनमन, रिचर्ड डॉकिन्स हेही माझे गुरु. यांचे लिखाण वाचून, कार्यक्रम पहात, थक्क होत होत मी परिपक्व झालो. पैकी डॉकिन्स यांचे लिखाण, व्हिडिओ आणि त्यातला आक्रमकपणा मला आवडून गेला. त्यांच्या शैलीच्या मी प्रेमात बुडालो. निव्वळ त्यांना भेटण्यासाठी अमेरिका वारी करून आलो. अशा अनेकांकडून मी मुक्तपणे उचलेगिरी केली आहे. कुणाची शैली तर कुणाची उदाहरणे. अर्थातच साऱ्याला मराठी साज चढवला आहे. हे वाटतं तितकं सोपं नाही. उगाच काढला इंग्लंडच्या राणीचा झगा आणि घातला झाशीच्या राणीला असा हा प्रकार नाही.
या शास्त्रज्ञांकडून मी स्फूर्ति घेतली पण तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय मी फारसे लिहिलेच नसते. माझं अक्षर गचाळ. मी काय लिहिलंय ते थोड्यावेळाने मलाच वाचता येत नाही. त्यामुळे ते लिहून कुणाला टाइप करायला सांगणे अवघड. एका मित्राला मी माझी लिपी वाचायला शिकवली होती. पण तरीही तो इतक्या चुका करायचा की त्या चुका सुधारायला मलाच शेजारी बसावं लागायचं. मला आणि त्याला एकत्रित वेळ काढणं मुश्किल होत गेलं, युनिकोड विस्तारत गेलं, माझ्या टेबलावर आणि मांडीवर कॉम्प्युटर विराजमान झाला, गुगल डॉक्स आलं, व्हॉईस टाईपचंही नावीन्य उरलं नाही आणि माझ्या प्रतिभेला खऱ्या अर्थाने पंख फुटले.
आता मी सुचतील तसे मुद्दे फटाफट टंकून काढतो. मग सुचेल तसा आणि वेळ मिळेल तसा त्यांचा विस्तार करतो. त्या विस्तारीत परिच्छेदांना विविध रंगात, फॉन्टात वगैरे ठेवतो. असे सगळे मुद्दे झाले की मी ह्या रंगीबेरंगी फुलांचा हार करायला बसतो. सुरवात कशी असावी, शेवट कसा, शीर्षक काय, शीर्षकाची आणि लिखाणाची संगती राखली जाते आहे ना, असं सगळं वारंवार तपासत जातो. मग एक एक परिच्छेद ओवायला सुरवात करतो. साधारण क्रम ठरला की एकेका वाक्याकडे वळतो. त्यात एक लय असावी, भाषेचा गोडवा असावा असा माझा प्रयत्न असतो. गद्य लिहीत असलो तरी यमक, अनुप्रास जुळवत असतो मी. मग प्रत्येक परिच्छेदाची पुढच्याशी सांधेजोड तपासली जाते. जरी परिच्छेद वेगवेगळे असले तरी एकातून दुसरा असे ते खळाळत झऱ्यासारखे फुटायला हवेत. वाचक किंवा वाचिका, मधेच सोडून जाता कामा नये. उलट एका ओघापोटी, एका उत्कंठेपोटी, त्यांनी सलग शेवटपर्यंत वाचत जायला हवे. त्यामुळे सुरवात ते शेवट हा प्रवास खड्डे आणि/किंवा स्पीड ब्रेकर विरहित व्हायला हवा.
लेख कॉम्प्युटरवर टाईपण्याचा मला आणखी एक फायदा होतो. एखादा शब्द लेखात किती वेळा आला आहे ह्याचा सर्च घेता येतो. मग मी शक्यतो द्विरुक्ती टाळतो. पर्यायी शब्द वापरतो. अगदी शब्दकोशातून पाहून देखील हे काम उरकतो. ‘बाई आणि बाटली’ मध्ये दारूसाठी मी आठ समानार्थी शब्द वापरले होते आणि बुटकीसाठी ‘सांग दर्पणा कशी मी दिसते?’ मध्ये नऊ शब्द. या शब्द सामर्थ्याबरोबरच म्हणी वाक्प्रचार, कविता, गाण्याच्या ओळी आणि भाषिक चमत्कृतींचा मी सढळ वापर करतो. उदाहरणार्थ, ‘बाळाचे पाऊल वाकडे पडणार आहे का हे आता सोनोग्राफीतच दिसते, ते कळण्यासाठी पाय पाळण्यात दिसायचीही गरज नाही.’ (जगी व्याधी नाही असा कोण आहे?). किंवा ‘या वळणावर, निर्मळ जळ झुळझुळा वहाते आहे आणि जवळच झाडीतून डोकावणारे साड्यांच्या दुकानाचे होर्डिंग आहे! खूप मोठे. लक्षवेधी. त्यावरील कर्पुरगौरा बाला आणि त्यांच्या अंगावरील लावण्यसुंदर, अभिरुचीसंपन्न साड्या! बघता क्षणी पसंत पडावी अशी साडी, ‘बघता क्षणी पसंत पडावी’च्या अंगावर असते.’ (दुस्तर हा घाट https://shantanuabhyankar.blogspot.com/.../02/blog-post.html). हे वाचताच ‘लावण्यसुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया निर्मळ जळ वाहे झुळझुळा, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा’, या शंकराच्या आरतीतील ओळी आपोआप वाचकांच्या मनात उमटतात. ह्या पद्य पार्श्वभूमीवर, गद्य अधिकच उठावदार दिसते. कविता मी खूप वाचतो. कवितेत असतो तसा क्रियापदांचा आणि विशेषणांचा अनवट वापर करायला मला आवडतं. उदाहरणार्थ, ‘माझ्या तापाच्या निदानासाठी वेगवेगळ्या पेशालिस्टांना मला नजर करण्यात आलं’. (आपुले मरण पाहिले म्यां डोळा https://shantanuabhyankar.blogspot.com/.../blog-post_98.html) किंवा ‘माझ्या डॉक्टरलेल्या नजरेने मी तिला निदानून टाकलं.’ (सांग दर्पणा कशी मी दिसते?).
मुद्दा तात्कालिक असला तरी लेखन अधिक काळ टिकणारे असावे अशीही माझी इच्छा. आपल्याकडे माता मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे हयाबद्दल लिहिताना मी संबंधित आकडेवारी जेमतेम एका परिच्छेदात आटोपली. मात्र बाळंतपण हा काय भयानक प्रकार होता हे आजीच्या आजीच्या काकूची कथा सांगत समजावलं. मुमताज महल तीच्या चौदाव्या बाळंतपणात दगावली होती सबब ताजमहाल म्हणजे बाळंतपणात दगावलेल्या बायकांचं वृंदावन वाटतं मला, असं एक धक्कादायक विधान केलं. बाळंतपणात वारलेली बाई हडळ होते या लोकप्रवादाचाही उल्लेख केला. हडळीभोवतीच्या कथांत पुरुषी मन कसं दिसतं, यावरही टिपण्णी केली. (एक शहनशाहने बनवाके हंसी ताजमहाल https://shantanuabhyankar.blogspot.com/.../blog-post_8.html) असल्या उल्लेखांनी आणि संदर्भांनी लेखाचं आयुर्मान वाढतं. नुसतीच आकडेवारी दिली असती तर लिखाण रुक्ष, अल्पायुषी आणि वरवरचं झालं असतं.
लेखाचा शेवटही जमून यावा लागतो. तो शेवटचा पंच परफेक्ट बसायला हवा. डॉ. अरुण गद्रे यांच्या डार्विनविषयक छद्म वैज्ञानिक पुस्तकाचा मी चांगलाच समाचार घेतला होता (https://shantanuabhyankar.blogspot.com/.../01/blog-post.html) आणि लेखाचा शेवट ‘डार्विन मेल्याचं दुख: नाही, पण गद्रे सोकावतात’, या वाक्याने केला. ह्याला भरपूर लाईकस् मिळाले. रामदेव बाबांच्या आधुनिक वैद्यकीची नालस्ती करणाऱ्या जाहिरातींचा प्रतिवाद करणारा जो लेख मी लिहिला त्याचा शेवट होता, ‘असे भडक, आक्रमक आणि छातीठोक दावे, त्यावर कफनीचे कवच आणि रुद्राक्षाची कुंडले! मग पॅथीचा पंथ बनतो. रुग्णाईत भक्त होतात. धन्वंतरींच्या हाती आता जलौका आणि अमृतकुंभ नव्हे तर त्रिशूल आणि हलाहल दिसायला लागते. अफूची गोळी हीच ज्यांचा धर्म आहे अशांनी धर्माची अफूगोळी व्यवसायात घोळली की चढणारी नशा औरच. अशा नशेत विज्ञान आणि विवेकाचा बळी जाणार हे ठरलेले. हे वेळीच रोखायला हवे. तरच ‘आम्ही भारताचे लोक’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खरे पाइक ठरू. (पतंजलीची जाहिरात आणि आम्ही भारताचे लोक https://shantanuabhyankar.blogspot.com/.../blog-post_12.html)
नास्तिकता, पर्यायी वैद्यकीचा पागलपणा, यावरही मी लिखाण केले आहे पण सावध शब्दरचनेमुळे मी जल्पकांपासून वाचलो आहे. असं केलं नाही तर मूळ मुद्दा रहातो बाजूला आणि भलत्याच विषयाकडे चर्चा भरकटते. पतंजलीच्या जाहिराती विरुद्ध लेख हा त्या जाहिराती विरुद्ध होता. तो सहजच आयुर्वेद विरोधी ठरवता आला असता. तसं होऊ नये म्हणून मग, ‘अशा प्रचारामुळे आयुर्वेदाचे तरी भले होते काय? तर नाही. बहुसंख्य वैद्य या साऱ्या प्रकारावर नाखुषच आहेत. प्रचार आणि प्रसार होतो तो औषध कंपनीचा. काही शक्यता उरी बाळगून असलेल्या प्राचीन औषध परंपरेचे फक्त हंसे आणि थिल्लरीकरण होते.’ या वाक्यांचे चिलखत आधीच पांघरायचे. त्याचा फायदा होतो. शब्द काळजीपूर्वक योजायचे. ‘काही शक्यता उरी बाळगून..’, म्हणजे अजूनही त्या शक्यताच आहेत हे स्पष्ट आहे.
विज्ञानाचा नुसताच विस्मय नाही तर विचार व्यूह, त्यातील प्रोसेस वाचकांप्रति, विशेषतः बाल वाचकांपर्यंत, पोहोचवणे मला अगत्याचे वाटते. त्यातूनच लहान मुलांसाठी लिहिणे झाले. ‘मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे’ आणि ‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’ (आगामी), (लोकवाङमय प्रकाशन मुंबई) ही मलाच आवडलेली माझी दोन पुस्तकं.
मोठा होताना माझं एक बोट ‘किशोर’ मासिकाने धरलं होतं. चौथीत असताना मी ‘किशोर’चा वाचक झालो आणि आजही आहे. त्यातील सुरेश मथुरे यांच्या ‘विज्ञानाचे वाटाडे’, ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ आणि वसंत शिरवाडकर यांच्या ‘असे हे विलक्षण जग’ अशा लेखमालांनी माझं चिमुकलं विश्व मोठं केलं. कॉलेजमध्ये गेलो आणि लोकविज्ञान संघटनेच्या बुद्धिवंत, प्रतिभावंत आणि लोकविलक्षण चळवळ्या मंडळीत मी आपोआप सामील झालो. विज्ञानवादी विचारांचं बीज इथे रूजलं आणि अंनिसच्या संगतीत फोफावलं. ‘किशोर’मधल्या शास्त्रज्ञांच्या कथा वाचून मीही शास्त्रज्ञ व्हायचं ठरवलं होतं. पण जगातले बहुतेक महत्वाचे शोध आधीच कुणीतरी लावले आहेत, असा शोध मला लवकरच लागला आणि मी तो नाद सोडून दिला! विज्ञानात भर घालण्याचे कार्य माझ्याकडून झालेलं नाही पण, ‘विज्ञानाचा अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथी’, असं म्हणण्याचा धीर लोकविज्ञान संघटना आणि अंनिसच्या जोरावर मी गोळा केला आहे.
त्यामुळेच ‘किशोर’मध्ये लिहीण्याचा प्रस्ताव आला, तेंव्हा या छापील स्नेह्याविषयीच्या अपार कृतज्ञतेपोटी मी होकार भरला. विज्ञान विषयक लिहायचे हे ठरलेलेच होते. प्रश्न काय लिहायचे हा होता. आतडे बावीस फुट लांब असते किंवा कातडे सात थरांचे बनलेले असते; आपल्याला आठ मिनिटांपूर्वीचा सूर्य दिसत असतो किंवा माठ सछिद्र असल्याने पाणी गार होते; असलं काही मला लिहायचं नव्हतं. विज्ञानाचा हा सगळा विस्मय, हा सगळा शोध, याचा प्रवास कसा असतो?, हे सगळं कळलं कसं?, आणि ज्यांना कळलं त्यांचा का कळलं?, जेंव्हा कळलं तेंव्हाच का कळलं?, आधी का नाही? साऱ्या संशोधनामागची वैचारिक बैठक काय असते?, चिकित्सक विचार किंवा वैज्ञानिक पद्धती म्हणजे नेमकं काय? याबद्दल मला लिहावसं वाटलं. मुलांसाठी आणि मराठीत याविषयी विशेष काही आढळत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ व्हायचं झालं तर विचार कसा करायचा?, विज्ञान नावाची युक्ती आपल्याला नेमकं काय शिकवते?, वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय? हे सांगणारी लेखमाला लिहायची असं मी ठरवलं.
अशी चिकित्सक विचारपद्धती सर्व क्षेत्रात लागू पडते. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांनी हे लिखाण वाचून खूप नेमका मुद्दा मांडला. त्यांच्या मते, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा; तुम्ही निम्मे कवी आणि निम्मे वैज्ञानिक असाल तर खूप खूप पुढे जाता!! कवीसारख्याच स्वैर, उच्छृंखल, बेलगाम कल्पना विज्ञानालाही आवश्यक आहेत. सजीवांचं आजचे रूप हे मूळ रूपाबरहुकूम नाही; ते अंतिमही नाही. माणसासकट सारे सजीव उत्क्रांत होतात. उत्क्रांतीची ही स्वैर, उच्छृंखल, बेलगाम पण क्रांतिकारी कल्पना! याच कल्पनेची वीज, वैज्ञानिक पद्धतीच्या मुशीत ढाळली की त्या दामिनीची सळसळ उत्क्रांतीचा वैज्ञानिक सिद्धांत होऊन समूर्त उभी रहाते. तेंव्हा स्पेस-रेस असो वा घोड्यांची रेस असो, अभ्यास युद्धाचा असो वा बुद्धाचा, इतिहास खोदायचा असो वा खोडायचा असो; चिकित्सक विचार करण्याची सवय असेल, तुम्ही निम्मे कवी आणि निम्मे शास्त्रज्ञ असाल तर इतरांच्या कित्येक योजने पुढे असता.
विज्ञान नावाच्या विचार पद्धतीचा शोध लागल्यापासून मानव समाजाची प्रत्येक निकषावर प्रगतीच होते आहे. कोव्हिड, युक्रेन-युद्ध वगैरे पहाता हे विधान धाडसी वाटेल. पण हे मी म्हणत नाहीये. स्टीफन पिंकर, युव्हाल हरारी सारख्या अभ्यासकांचे हे पुरावाधिष्ठित विधान आहे. गेल्या हजार वर्षाची आकडेवारी पहिली तर असं लक्षात येईल की आज उपासमारीने जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे अतिपोषणाने मरतात. युद्धात जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे आत्महत्या करतात आणि साथीत जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे वृद्धापकाळाने मरतात. कोव्हिड, युक्रेन-युद्ध वगैरे ह्या प्रगतीच्या आलेखातील उतार आहेत. ते तात्पुरते ठरायचे असतील, हा आलेख सतत चढता रहायला हवा असेल, तर विज्ञान, विवेक, मानवता, आणि उदारमतवादाला पर्याय नाही. माझे लिखाण म्हणजे प्रगतीच्या ह्या चाकांना वंगण घालण्याचा एक खारीचा प्रयत्न आहे.
कधीतरी उत्तररात्री हा प्रयत्न तडीस जातो. नवा लेख पूर्ण होतो. बाहेरची रिमझिम आता थांबलेली असते पण मनात साफल्य-धारा धो धो बरसू लागतात. त्या कैफातच मी घरी निघतो. सहज वरती पाहतो तो काय, मेघांत अडकली किरणे तो चंद्र सोडवत असतो.
प्रथम प्रसिद्धी
शब्द मल्हार
दिवाळी अंक २०२३
SHANTANUABHYANKAR.BLOGSPOT.COM
👍
ReplyDelete