Sunday 12 November 2023

किल्ला

किल्ला 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.   

शिवाजी हे महाराष्ट्राचंच काय साऱ्या राष्ट्राचं दैवत. पण देशानं महाराजांवर कितीही प्रेम केलं, तरी जे प्रेम महाराष्ट्रातल्या पोरासोरांनी केलं, त्याची सर त्याला कदापी येणार नाही. दिवाळीची सुट्टी लागताच, उण्यापुऱ्या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या, आपल्या राजाच्या गडकोटांच्या, इवल्या इवल्या प्रतिकृती बनवून, मराठी पोरासोरांनी  त्याचे संतत स्फुरणदायी स्मरण करायची, आगळी वेगळी आणि अनन्य परंपरा निर्माण केली आहे. कोणा दिल्लीतल्या कार्ट्यांनी अकबराचा किंवा विजापूरच्या पोरट्यांनी आदिलशहाचा किल्ला केल्याचे ऐकले नाही.  महाराजांचे आणि गडकिल्ल्यांच्या प्रेमाचे, सुट्टी लागलेल्या पोरांच्या आईबापांवर अनंत उपकार आहेत. नाहीतर इतक्या सगळ्या पोरांच्या, इतक्या सगळ्या मोकळ्या वेळाचं करायचं काय, हा प्रश्न आला असता.

माझं किल्ल्याचं वय उलटून कितीयेक संवत्सरे उलटून गेली. तेंव्हा दिवाळीची सुट्टी सुरू व्हायच्या आधी, कितीतरी दिवस किल्ला करण्याचे मनसुबे रचले जायचे. तो काळ मोठा धामधुमीचा असायचा. किल्ल्याची सजावट, त्याची मांडणी, त्याची कमेंट्री, त्याच्या स्पर्धा, त्यातील बक्षीस असं सगळं डोक्यामध्ये सतत चालू असायचं. सहामाही परीक्षा, अभ्यास, फटाके, सुट्टीतील गावाला जाणं  वगैरे असायचं पण मोठ्या मेंदूचा मोठा भाग हा किल्ल्याने व्यापलेला असायचा. 

या किल्ल्यावरून माझी  आणि भावाची सतत भांडणं  व्हायची.  मी सिंहगड करुया म्हटलं की त्याला रायगड करायचा असायचा, मी पुरंदर उभारु या म्हटलं की हा सिंहगडावर जायचा. मावळे आणि मोगल लढले नसतील अशा अटीतटीने आम्ही लढायचो. किल्ला ठरवण्यापासून ते घडवण्यापर्यंत आणि घडवण्यापासून ते मोडण्यापर्यंत, प्रत्येक पायरीला रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असायचा. एके वर्षी तर भांडणं  इतकी टोकाला गेली की रागावून भावानी स्वतंत्र किल्ला केला आणि त्याला नाव दिले, खुन्नस गड. कुठल्याशा नाटकामध्ये म्हणे दोन भावांच्या  वाटण्यांमध्ये सारे काही निम्मे निम्मे वाटले जाते. एक केरसुणी उरते तेंव्हा  केरसुणीचे हिर मोजून निम्मे निम्मे वाटले जातात. त्यात घोळ होतो म्हणून हे भांडण पेशव्यांपर्यंत जातं. भांडण ऐकून पेशवे आश्चर्यचकित होतात. म्हणतात ‘एवढी ईर्षा तुम्ही राजकारणांत दाखवली असतीत तर तुम्हांस पेशवेपद प्राप्त झालें  असतें’.  यावर ते भाऊ म्हणतात, ‘आम्हांस पेशवेपद नको. केरसुणी वाटून हवी.’ 

अर्थात आमच्या सिंहगड, प्रतापगड किंवा रायगडाचा आणि प्रत्यक्षातल्या गडाच्या आकाराचा काही संबंध नसायचा. आमच्याकडे उपलब्ध दगड-गोट्यांवर आणि तरटा-डब्यांवर माती लिंपूनच आमचा किल्ला बनायचा. त्याच्यावर टीव्ही टॉवर ठेवला की सिंहगड, माची केली की प्रतापगड आणि ‘किल्ले रायगड’ अशी पाटी लावली की रायगड,  इतका सोपा मामला होता. पण प्रश्न तत्वाचा होता.

एकदा गड ठरला की, किल्ल्यासाठी माती आणणं हे एक मोठं कौशल्याचं काम होतं. इथं छापलंय तसं ते एका वाक्याचं काम नव्हतं. उलथणं, पत्रा, घमेलं, पोतं, अशी सगळी शिबंदी घेऊन नदीकाठी जावं लागायचं. यातली प्रत्येक वस्तु हस्तगत करायला कावा, कारस्थान करावं लागायचं. उलथणे, घमेलं, पोतं आणि आम्ही, यामध्ये आई आणि आजी अशी  फळी उभी असायची. त्यांच्यातली एरवीची दुफळी यावेळी दिसायची नाही. एखाद दिवशी उलथण्यानं जे काही उलथायचं  असेल ते झाऱ्यानं  उलथावं  ना, घमेल्याऐवजी   परातीत भांडी ठेवावीत आणि माळ्यावरच्या पोत्यातली अडगळ जरा वेळ काढून ठेवली तर बिघडलं कुठे?  पण नाही. अर्थात आम्ही हार मानणारे थोडेच होतो? शिवबाचे मावळे आम्ही, केंव्हाच आम्ही उलथणं  पोत्यात, पोतं घमेल्यात आणि घमेलं  बाहेरच्या दाराआड लपवलेलं  असायचं.

   नुकताच पूर येऊन गेल्यामुळे  नदीकाठी बराच गाळ साठलेला असायचा. अगदी मऊ, छान, लाल रंगाची माती मिळायची. तो गाळ  उलथण्याने खणून, पत्र्याने उकरून, घमेल्याने पोत्यात भरून, घरापर्यंत ओढत नेण्याची ढोर मेहनत केल्यानंतर किल्ल्याची पुढील तयारी.  जुनं गोणपाट, कपडा, मच्छरदाणी असं काहीतरी मिळवावं लागायचं. मग दगड, गोटे, टायर, डबे, काठ्या असं काय काय रचून किल्ल्याचा सांगाडा केला जायचा आणि चिखलाच्या पाण्यात भिजलेलं  ते कापड त्याच्यावरून अंथरलं जायचं. मग लांब उभं राहून हे व्यवस्थित बसलं  आहे ना हे पाहिलं जायचं. साहित्य सगळीकडून झाकलं गेलंय अशी खात्री झाली की आणखी माती अंथरली जायची. घाट रस्ता बनवायला माती लिंपली जायची. बुरूज, महादरवाजा बनायला मोक्याच्या जागा हेरून हेही उभे राहायचे. कुठेतरी कडेकपारीत  वाघाची गुहा आपोआपच तयार व्हायची.  बनियन, चड्डी, किल्ला आणि आम्ही अगदी एकरूप, एकरंग  झालेलो असायचो. किल्ल्यावर हळीव आणि धने पेरून त्या दिवसाची सांगता व्हायची.

हे उगवून येईपर्यंत आमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असायची. पण त्या दोन दिवसांत बेगडाचा दरबार, कार्डपेपरच्या इमारती, कापसाचा धबधबा, आरशाचे तळे, चिपाडाची बैलगाडी, कागदाची  नाव आणि सलाईनचे कारंजे एवढी तरी किमान तयारी करावी लागायची. किल्ल्यासाठी घर बनवणं हा दोन दिवसाचा, पूर्ण वेळाचा आणि हमखास बोटं  कापवणारा कार्यक्रम असायचा. ब्लेडनं  बारीक बारीक कट मारून त्या खिडक्या-दारांना उघडझाप करायला लावणं,  फारच कौशल्याचं होतं.  

एकदा का किल्ल्याला टच-अप करून मनासारखा आकारउकार साधला, हळीव, धने उगवले  की चित्र मांडायला सुरवात. जुन्या चित्रांची टोपली माळ्यावरून खाली यायची. टवके उडालेली, पोपडे पडलेली ती निस्तेज चित्रं मुळीच आवडायची नाहीत. नव्या चित्रांसाठी युक्तिवाद योजावे लागत,  लढाया कराव्या लागत, डावपेच लढावावे लागत, बोरकुट घेण्यासाठी दिलेले पैसे, पोटाला चिमटा घेऊन साठवावे लागत. तेव्हा कुठे पुरेसा चित्र संच जमे.  
हळू हळू  गडावर ठिकठिकाणी मावळे अवतरायचे. तळपत्या तलवारी परजत, बुरुजांवर उभे रहायचे. चौक्या पहारे सांभाळायचे.  तोफकरी आणि मशालजी तोफेला बत्ती द्यायला सदा सज्ज असायचे. एका मैदानात  लढाईचे दृश्य मांडले  जायचे; म्हणजे मांडावंच लागायचं. कारण जुन्या चित्रांतले  मुंडके तुटलेले मावळे, इथे लढाईत कामी आलेले मावळे म्हणून कामी यायचे. प्राणांची शर्थ करत आमचे मावळे मोगलांशी लढताना पाहून अंगावर रोमांच उभे रहायचे. ‘हर हर महादेव’ची गर्जना आणि तलवारींचा खणखणाट तर अगदी स्पष्ट ऐकू यायचा. पुढे वय वाढलं आणि हे ऐकू येईनासं  झालं. तो कान गळून पडला बहुतेक.  

एकाच  किल्ल्यावर तीन-तीन शिवाजी महाराज विराजमान असायचे. बालेकिल्यात रयतेची गाऱ्हाणी ऐकायला राजे सिंहासनाधीश्वर आहेत. मसलती चालू आहेत. चवऱ्या ढाळणारे चवऱ्या ढाळत आहेत, अबदागीरी पेलत दोन्हीकडे दोन मावळे उभे आहेत. सर हेन्री ऑक्सेंडेन लवून नजराणा देतो आहे. एकाच्या ढालीवर ‘जय भवानी’ आणि एकाच्या ढालीवर ‘जय शिवाजी’ लिहिलेले, दोन भलेदांडगे, धिप्पाड, आडमाप  मावळे दाराशी पहारा देत आहेत.  त्यांच्या दिमतीला, पाठीवर सॅक सांभाळत मशीन गन घेऊन भारतीय सैनिकांची पलटण  शत्रूवर नजर ठेऊन आहे. त्याचवेळी इकडे माचीवर खानाचा कोथळा ऑलरेडी बाहेर आलेला आहे, छावणीचे तंबू जमीनदोस्त झाले आहेत  आणि जावळीच्या घनदाट अरण्यात घनघोर लढाईला तोंड फुटले आहे.  तिकडे आग्र्याला महाराज आणि बाल संभाजी पेटाऱ्यात बसत आहेत. आम्हाला अगदी शेंबडं पोर समजून, ‘ते आत शिरत आहेत कशावरून?  कशावरून बाहेर पडत नाहीयेत?’, असल्या शंका कृपया विचारू नयेत. ज्या अर्थी मागे आमच्या शोकेसमधला प्लॅस्टिकचा ताजमहाल विराजमान आहे त्या अर्थी  हे स्थळ सरासर आग्राच आहे. आणि आग्र्याला महाराज आणि बाल संभाजी पेटाऱ्यात बसले, उतरले नाहीत; हे तर शेंबडं पोर देखील सांगेल!

किल्ल्यावरची मांडामांड झाली की  किल्ल्याच्या आजूबाजूला वाळू पसरून त्यावर गाव वसवलं जायचं. मग रस्त्यावरती विजेचे खांब, त्यावर ते लाईटच्या माळेने लागलेले दिवे आणि संध्याकाळी ते दिवे उजळताच किल्ल्याची दिसणारी अविट शोभा; मन नुसतं तरंगायला लागायचं. काट्याच्या अणीवरचे हे ओसाड गाव, आम्ही चित्र मांडायला सुरवात करताच गजबजून जायचं. शेतकरी शेत नांगरायला लागायचे.  गवळी दूध घेऊन बाहेर पडायचे. बाजारात भाजीवाले आणि वाल्या, पाट्या-टोपल्या घेऊन बैठक मारायचे. तमासगीर ढोलकी-पेटी सकट ताल धरायचे. मल्ल आखाड्यात घुमायला लागायचे.   शिपाई मऱ्हाठी बाण्याने  ताठ उभे राहायचे, ते न वाकण्यासाठीच. एवढंच नाही तर गावात रस्ते, बागा, हॉस्पिटल, पोस्ट, टॉकीज अशा अनेक इमारती उठायच्या. फटफटया, गाड्या  आणि अॅम्ब्युलन्स लगबगीने धावू लागायच्या. रूळावरून रेल्वे धापापू लागायच्या.  या साऱ्या भाऊगर्दीत कधी  आगीच्या बंबाशेजारी वाघाची गुहा यायची तर कधी गडावर  जिराफांची जोडी चरत असायची. ...आणि तो पाहिलात का? तिथे त्या कोपऱ्यात, वर, वर; चंद्रभूमीवरून टाटा करतोय तो? तो तर नील आर्मस्ट्रॉंग!  काय? इतका लहान कसा? लहान दिसणारच, किती लांब आहे तो. तुम्हाला वाटेल तो तुम्हाला टाटा करतोय. पण नाही, तिकडे पाहिलंत तर त्या कोपऱ्यात; नाही होss  हिंगाची डबी नाहीये टांगली तिथे, तो आपला भारतीय उपग्रह, आर्यभट्ट; आणि तिकडे त्या तिथे पहा. नाही, नाही, उदबत्तीचं नळकांडं काय हो म्हणताय?  ते रॉकेट आहे. 
 
किल्ल्यावर अशी शिवकाळ  आणि सद्यकाळ  यांची सरमिसळ सर्वकाळ चालायची. आजही चालते. त्यात काहीच वावगं नाही. बडे बडे चित्रकार नाही का, एकाच वेळी, एकाच चित्रात, एकच माणूस पुढून, दोन्ही साईडने, वरून, खालून आणि मागून दाखवत? तसंच हे. पिकासोनी केलं की ते क्युबीझम होतं तसं पोरांच्या किल्ल्याचं किल्लीझम व्हायला हवं. उगीच लहानांनी केलं म्हणून त्याला छोटं लेखू नये. आम्हांकडे आहेत ती सर्व चित्र, खेळ, गाड्या हे जर मांडायचं असेल तर असं होणारच. त्याला इलाज नाही. भूत, वर्तमान आणि भविष्य यांची अशी सरिअल सरमिसळ करणारे हे विसंगतींचे सोज्वळ शिल्पं, म्हणजे आमचं समूर्त बालपण होतं. 

पण हे उभारताना अनेक गोच्या होत. एकदा रात्री फाटक उघडं राहिलं तर किल्लाभर उगवलेली, धरतीचे मार्दव सांगणारी कोथिंबीरीची लवलव, शेळी येऊन खाऊन गेली. सकाळी पहातो तो किल्ला बोडका! एके रात्री छपरावरच्या टाकीला जोडलेले, उंच उंच उडणारं  आमचं  कारंजं  रात्रभर चालू राहिल्यानं, दुसऱ्या दिवशी किल्ल्यावरची चित्र जागच्या जागी भुईसपाट झालेली. पण या अपघातांना पुरून उरत आमचा किल्ला बनत राहिला. 

एके वर्षी किल्ल्यावर हलता देखावा करण्याची योजना आखली. तानाजी आणि मावळे कड्यावरून चढून जात आहेत असं दृश्य. आम्ही दोरीला नीट बांधून मावळ्यांची माळ तयार केली. प्रेक्षक जमले की किल्ल्याआड बसून माझा भाऊ थरारक आवाजात सिंहगडाचा पोवाडा म्हणायचा, दोरी ओढायचा आणि कड्यावरच्या भोकातून मावळ्यांची माळ अलगद आत ओढून घ्यायचा. सगळे मावळे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एक साथ सरकायचे आणि कोंढाण्यावर पोहोचायचे. पण हे दृश्य पहाणारे सगळे इतके मंत्रमुग्ध व्हायचे, की  सगळे मावळे गड चढताना असे एकदम कसे हलतात, असा प्रश्न कोणीही विचारला नाही. ह्या आमच्या साहसाला चक्क दुसरं बक्षीस मिळालं होतं. 

या यशस्वी प्रयोगानंतर पुढच्या वर्षी आम्ही हलत्या गाड्यांचा देखावा करायचं ठरवलं.  दोरा ओढून गाड्या सरळ रेषेत जाणं शक्य होतं पण त्यात काही मजा वाटेना.  मग असं लक्षात आलं की जिथे गाडी वळवायची आहे त्या ठिकाणी बारीकशी टाचणी चिखलात रोवून ठेवायची. तीच्या भोवती दोरा  घ्यायचा. आता  ती गाडी वळायची आणि पुन्हा धावू  लागायची. थोड्याच  प्रयत्नात आम्हाला ही करामत मात्र जमली. मग आत लाल ‘बल’ ठेवून आम्ही एक घर पेटवले तिथे तातडीने आगीचा बंब धाडला आणि क्षणार्धात ते विझवले  देखील. 

इतकं सगळं घडणार तर त्याला स्टोरी हवीच. मग लाईट्स,   बॅकग्राऊंड म्युझिक आणि  कॅमेन्ट्रीसकट आम्ही एक अॅक्शनपॅक्ड शोच तयार केला. आता प्रेक्षकांना किल्ल्याचा 360 डिग्री का काय म्हणतात, तो अनुभव येऊ लागला. घडायचं ते असं.... कोंबडा आरवतो. (खरंतर भावाला कुत्र्यांच्या भांडणाचा आवाज चांगला जमतो पण ते पुढे घेतलं आहे.)  खानाचा कोथळा बाहेर काढून, आग्ऱ्याहून सुटून महाराज दरबारात गाऱ्हाणी ऐकत बसले  आहेत.  शाळेच्या दारातील बस ट्रिपला जाते. एका  मुलाचे बाबा ट्रक घेऊन  मंडईत येतात.  वाघ म्हणजे माझा भाऊ, डरकाळी फोडतो. कुस्ती जिंकलेल्या मल्लाला गदा बक्षीस मिळते. एका घराला आग लागते. आगीचा बंब येतो. आग विझते. या निमित्त राधाकृष्णाच्या  देवळात भजन चालू आहे. रेल्वेची वेळ झाल्याने ती सुटते. रॉकेटची वेळ झाल्याने ते उडते. इतक्यात  रात्र होते. दिवे लागतात. किल्ला उजळून निघतो. दरबार अजून सुरूच आहे. (पहा, प्रजाहित दक्ष महाराज असे रात्रंदिवस कामात असायचे. मुलांनो तुम्हीही तसेच व्हा.) शाळेची ट्रिप परत येते. लोकं झोपतात. सारे दिवे बंद. रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या  भांडणाचे बेफाट आवाज. शेपूट घालून पळून जाणाऱ्या कुत्र्याच्या कूं कूं कूं च्या आवाजात शो समाप्त. टाळ्या. 

पण याही वर्षी दुसरंच बक्षीस!!! हे तर बिल्कुल  दुरुस्त नाही झाले. आमचे प्रतिस्पर्धी किल्लेदार आमच्यापेक्षा खूपच लहान पण त्यांचा किल्ला आमच्यापेक्षा मोठा कसा? अगदी  आखीव रेखीव, देखणा,  प्रमाणबद्ध?  चित्रं सुद्धा भरपूर.  हे सगळं  इतकं छान साधलेलं  की ही दस्तुरखुद्द त्यांची करामत नाही हे अगदी स्पष्टच  होतं. ह्या गनिमाचे बाबा त्यांना चोरून मदत करतात ही गुप्त वार्ता  आख्ख्या आळीला माहित होती. पण ते दोन छोटे गनिम, ते  लेकाचे हे कबूल करायला तयार नव्हते. त्यांचे हे उद्योग बंद दाराआड, कडेकोट बंदोबस्तात, वाड्याच्या दाराला अडसर लावून, दिंडी दरवाजा  आणि झापासुद्धा बंद करून चालत. मराठी मुलूखाला लागलेला फंद फितुरीचा शाप अजूनही सुटला नाही म्हणायचा. त्यामुळे आम्हां अन्य किल्लेदारांना मान खाली घालून जगावं  लागत होतं. आग्र्याच्या दरबारात मागे उभं केल्यासारखाच  हा अपमान होता. बालपणी मान खाली घालून आम्ही तो सहन केला आणि मोठेपणी तो अपमानच  वाटेनासा झाला. 

मान अपमान काहीही असो, कसं कोणास ठाऊक किल्ल्याचं  कौतुक  दोन-चार दिवसांच्या वर टिकायचं नाही.  किल्ला करायची घाई तसा तो उधळायची सुद्धा घाई. मग तो किल्ला उधळून कसा लावायचा याचे बेत  मनात शिजायला लागायचे. वाघाच्या गुहेत बॉम्ब बसवणे ही  सर्वात लोकप्रिय युक्ती होती. ‘खेळ मांडीलेला सारा पुन्हा उधळाया सजे, आपणच निर्मिलेले आपणच मोडू धजे’, अशी जिप्सी वृत्ती किल्ल्यानं आमच्या अंगी भिनवली. चार दिवसाची नवलाई ओसरेपर्यंत किल्लाही मलूल झालेला असे. हिरवळ पार झोपलेली, चित्र धूळ माखलेली, घरं मेकलेली  आणि आम्हाला, ट्रिप, नवी  खेळणी, नवे कपडे, अशी नवी नवी आकर्षणं.  मग एके दिवशी त्या किल्ल्यावरचा जीवच उडायचा; पण दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याच उत्कटतेने पुन्हा  जडायचा. 

मग मी मोठा झालो. माझ्याच  मुलांच्या मिषाने, मुलांच्यात मूल होऊन मी किल्ला करू लागलो. पुढे  मुलांनाही  पंख फुटले आणि किल्ला थांबलाच. पण आजही दिवाळी आली की माझे हात शिवशिवायला लागतात. कोणी चिखलानं माखलेली पोरं किल्ला करताना दिसली की, ‘मला घेता का तुमच्यात?’, असे शब्द मोठ्या कष्टानं गिळावे लागतात. मग रस्त्यातून चालताना किल्ले करणाऱ्या मुलांना सल्ले दे, दिसेल तो किल्ला ‘कोंबड्यापासून ते कुत्र्यापर्यंत’ बघ, किल्ला स्पर्धेला परीक्षक म्हणून जा असं करत मी हौस भागवत असतो. हर एक किल्लेदाराला, दांत ओठ खाऊन, मुठी आवळून गडकिल्ल्यांच्या  गोष्टी सांगत असतो. पण कृष्ण लाख गीता सांगेल ऐकणारे अर्जुन मिळायला हवेत ना. परवा शिवाजीची गोष्ट ऐकून शेजारचं  पोरगं म्हणालं, ‘अंकल  चिल, ह्यापेक्षा गेमिंग  नर्व्हव्रॅकिंग आहे.’ 

मी भडकलो, ‘लेका   नर्व्हव्रॅकिंगचं स्पेलिंग सांग आधी.  नर्व्हव्रॅकिंग म्हणजे एकझॅक्टली  काय रे?’ पोरगं घुटमळलं. इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यामुळे असेल, त्याचं इंग्लीश ‘मिडियम’च होतं! 

आता आपणच किल्ला करायचा  असं ठरवून मी  तावातावानी घरी आलो. माळ्यावरून ती चित्रांची टोपली काढली. तूटफूट वजा जाता त्यात आता दोन महाराज, तीन     मावळे, दोन मोगल आणि एक वाघ तेवढे उरले होते. घरी मी   किल्ला करणार असे जाहीर केले.  स्वकीय फिदीफिदी  हसायला लागले. अर्थातच मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही.  शेवटी स्वराज्याच्या आड येणाऱ्या  स्वकीयांचा बीमोड करावाच लागतो. आता इतक्या थोड्या वेळात चिखल, तरट, हळीव-वाला किल्ला होणे शक्य नव्हते. तेवढी जागाही  नव्हती आणि वेळही नव्हता.   पण मी  बधलो नाही. मी इरेला पेटलो होतो. घरातल्या घरात मी टी-पॉयवर चित्र मांडली. दोन महाराज, तीन   मावळे, दोन मोगल आणि एक वाघ!

स्वकीय म्हणाले, ‘ही चित्रं आहेत तेवढी बास. नवीन अडगळ नको. ही सुद्धा कसली विटकी आहेत. यंदाची तुझी हौस झाली की बागेत टाकून  देऊ.’

स्व‍कीयांचे हे तापल्या तेलासारखे बोल माझ्या कानी  येताच, हजार इंगळ्या डसाव्या अशा वेदना माझ्या काळजात उमटल्या. परंतु, ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप’ या वचनाची आणि पुरंदरच्या तहाची याद करत मी म्हणालो. ‘चालेल, चित्रं शिल्लक आहेत तंवर किल्ला. टोपलीतली चित्रं संपली की किल्ला बंद.’ 

त्याच संध्याकाळी मी गुपचुप, भरपूर चित्रं आणली आणि  टोपली चित्रांनी भरून माळ्यावर ठेवून दिली. आता माझा किल्ला अभेद्य झाला होता. ही मोहीम फत्ते होताच सहज महाराजांकडे नजर गेली. पहातो तो काय; टी-पॉयवरून, तीन   मावळे, दोन मोगल, एक वाघ आणि दोन्ही महाराज माझ्याकडे बेहद् कौतुकाने पहात  होते. माझा गनिमी कावा त्यांना भलताच पसंत पडला होता. मी त्यांना लवून त्रिवार मुजरा केला. त्यांच्या डोळ्यादेखत  मी माझं स्व-राज्य स्थापन केलं  होतं.  

प्रथम प्रसिद्धी 
युगांतर 
दिवाळी अंक २०२३

No comments:

Post a Comment