Friday 24 November 2023

स्वप्नं पडतं म्हणजे होतं काय?

 

स्वप्नं पडतं म्हणजे होतं काय?

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

 

‘आजी स्वप्न म्हणजे काय गं? खरंच आपण बुडतो किंवा जंगलात हरवलेले असतो का? पण जागे झाल्यावर तर आपण परत आपल्या घरातच तर असतो.’ आज भुपीनं विषयाला तोंड फोडलं.

रोज हे असंच चालायचं. पोरं काहीतरी प्रश्न काढायची आणि त्यांची शास्त्रज्ञ असलेली आजी,   म्हणजे पोरांच्या भाषेत गुगल आजी उत्तरे द्यायची. तिला सगळी उत्तरे येतात म्हणून ती गुगल आजी.

‘स्वप्न म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं  किंवा ऐकू येतं  ते. ते इतके खऱ्यासारखं  भासतं  की जागं झाल्यावर क्षणभर आपल्यालाच प्रश्न पडतो, आपण खरंच या जगात आहोत, का स्वप्नातलं जग खरं होतं? झोपेत आपल्याला काय काय दिसतं किंवा ऐकू येतं. जागं झाल्यावर यातलं सगळंच आपल्याला  आठवत नाही. झोपेतले जेवढे  विचार आणि कल्पना जागेपाणी आठवतील ते म्हणजे स्वप्न. अर्थात दिवसाढवळ्या, वर्गात बसल्याबसल्या, जागेपाणी स्वप्न बघणारे असतातच की.’

भुपीला हे अगदी पटलं आणि हसू आलं. ‘हो आजी, स्वप्नात बहुदा काहीतरी दिसतं किंवा ऐकू येतं. स्वप्नात चव किंवा वास सहसा नसतात.’

‘पण आजी, शास्त्रज्ञ स्वप्नांचा अभ्यास कसा करतात?’ झंप्या.

‘हे बघ, रेम झोपेतून उठताच स्वप्ने आठवण्याची शक्यता जास्त...’ आजी सांगू लागली.

‘पण रेम झोप म्हंजे?’ झंप्या.

‘हो, सांगते ना. झोपेत काही वेळ आपली बुबुळे स्थिर असतात तर काही वेळ ती  खूप हालत असतात.’  

‘पापण्यांच्या आत ती हलत असतात?’ 

‘हो.’  

‘म्हणजे पापण्या बंद आणि बुबुळे इकडे तिकडे वळतात?’

‘हो, वळतात नाही अगदी गरागरा फिरत असतात ती. याला म्हणतात झोपेची रॅपिड आय मुव्हमेन्ट (REM) अवस्था. म्हणजेच रेम अवस्था. बुबुळांच्या अशा हालचाली होत नसतील, तर ती झोपेची नॉन रेम (NON REM)  अवस्था.’

‘ओहहो!’

‘तर मी काय सांगत होते, रेम झोपेत जास्त स्वप्न पडतात आणि रेम  झोपेतून उठताच स्वप्ने आठवण्याची शक्यता जास्त.  मग लोकं झोपतात तेंव्हा शास्त्रज्ञ जागे रहातात. झोपेलेल्यांच्या  डोळ्याची बुबुळे फिरायला लागली की रेम झोपेचा अंमल सुरू झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. मग त्या माणसाला उठवून ते काय स्वप्न पडली? स्वप्नात राणीचा बाग दिसला का? वगैरे विचारत सुटतात.’  

‘पण हे असं करायला शास्त्रज्ञ काय घरोघर फिरतात?’ झंप्या.

‘नाही रे’, आजी हसत हसत म्हणाली, ‘काही विद्यार्थी, कार्यकर्ते, स्वयंसेवक लोकांना लॅबोरेटरीत बोलावून हे प्रयोग होतात.’

‘म्हणजे लॅबोरेटरीत  झोपायला कॉट असते?’

‘असा प्रयोग असेल तेंव्हा मागवतात. त्याशिवाय प्रयोग कसा करणार? सकाळी उठल्यावर विचारण्यात काही मतलब नसतो कारण स्वप्नांची आठवण फार काळ टिकत नाही.  स्वप्नांचे प्रमाण आणि त्यात काय दिसतं  हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं  असतं. त्यातही मोठ्यांपेक्षा मुलांना स्वप्न पडतातही जास्त आणि आठवतातही जास्त.’

‘हे मस्त आहे, मला जर प्रयोगाला बोलावलं तर लॅबमधल्या बेडवर झोपायला मी नक्की जाईन.’ झंप्या. 

‘पण स्वप्नं पडतातच का?’ नाही पडली तर?’ भुपी.

‘आपल्या शरीरातल्या  अवयवांना जसं  काही ना काही कार्य आहे, तसंच ते स्वप्नांनाही असणार, असा अंदाज आहे. नेमके काम काय हे अजून समजलेलं  नाही. वारंवार गाडीचा अॅक्सीडेंट स्वप्नात दिसणारा माणूस सावधपणे गाडी चालवतो. भीतीची स्वप्ने पडल्यामुळे भीती मरायला मदत होते; असं म्हणतात. पण स्वप्नांचा प्रमुख  संबंध आठवणी साठवण्याशी आहे.’

‘म्हणजे?’ भुपी.

‘म्हणजे आधी  आपल्या आठवणी तात्पुरत्या म्हणून साठवलेल्या असतात. एखादी गोष्ट दीर्घकाळ आठवणीत ठेवायची असेल, तर तिची स्मृति मेंदूच्या विविध भागात पाठवली आणि साठवली  जाते. झोपेत असताना ह्या आठवणी वारंवार उगाळल्या जातात. एखादी कविता किंवा पाढे पाठ होण्यासाठी आपण जसे ते पुन्हा पुन्हा म्हणतो तसाच हा प्रकार. घटनांची उजळणी आणि त्या आठवणीत पक्क्या करण्याचं काम आपण झोपेत असताना  जोमात सुरू असतं. या उजळणीचा भाग म्हणून आपल्याला स्वप्नं पडतात.’

म्हणूनच म्हणतात, मनी वसे ते स्वप्नी दिसे.’ भुपी.

पण काही वेळेला नॉर्मल स्वप्नं पडतात आणि काही वेळेला अगदी विचित्र, असं का?

‘कारण  आठवणींची साठवण नॉनरेम झोपेत विशेष होते. रेम झोपेत स्वप्न पडतात तशी ती नॉनरेम झोपेतही पडतात आणि या झोपेतल्या स्वप्नातली माणसं आणि अनुभव  सामान्य, ताज्या अनुभवातले  असतात. रेम झोपेत मात्र ह्या स्मृति एकमेकांत इतक्या  गुंततात की चित्रविचित्र स्वप्न पडतात.’

‘हो, हो, एकदम चित्रविचित्र जगाची स्वप्न पडतात मला. त्यात काहीही होत असतं. एकदा मी एका महाकाय डायनॉसोरच्या पाठीवर बसून चाललो होतो.  थोड्यावेळाने तो मला म्हणाला आता मी दमलो.  आता तू मला पाठीवर घे!!’ इतका घाबरलो होतो मी.

झंप्या डायनॉसोरला पाठीवर घेऊन चालला आहे हे ह्या कल्पनेनेच सारे हसू लागले.

‘काही वेळ तर स्वप्न पडतंय असं जाणवतं आपल्याला,’ आजी पुढे सांगू लागली, ‘अर्धवट झोप अर्धवट जाग असं. याला म्हणतात ल्युसिड ड्रीम. काहींना वारंवार अशी निम्नशुषुम्नावस्थेत स्वप्नं पडतात.’

‘क्काय आजी काय म्हणलीस? पुन्हा म्हण. निंम काय?’

‘नि म्न शु षु म्ना व स्था!’

‘किती अवघड शब्द गं. कुठून येतं हे तुला? निंम@#$%स्था.’  कसाबसा उच्चार करत भुपीची गाडी शेवटी ‘स्था’च्या स्थानकावर येऊन ठेपली.

‘नि म्न शु षु म्ना व स्था, म्हण रे झंप्या.’

झंप्याच्या डोळ्यात खट्याळपणा तरळला आणि तो म्हणाला, ‘नाही बुवा, जिभेला गाठ बसेल असं वाटतंय!’

सगळे हसले. आजी म्हणाली , ‘अरे निम्न म्हणजे इथे अपूर्ण किंवा अर्धवट. इथे शुषुम्ना म्हणजे झोप. आणि अवस्था, म्हणजे अर्धवट-झोपेची-अवस्था. अशा अवस्थेतल्या स्वप्नात सहसा, आपल्याला जे हवं असतं ते आपण करत असतो. म्हणजे भरपूर आइसक्रीम खाणं  किंवा फायटर विमान चालवणं , असं काहीही.’  

‘छ्या, मला तर अगदी घाबरवून टाकणारी स्वप्न पडतात. इतकी भीती वाटते... आणि तो माझा मित्र आहे ना, प्रतिक, त्याला तर तो रेल्वेस्टेशनवर हरवला आहे असं स्वप्नं पडतं, रोज!’ झंप्या.   

‘पण का होतं असं? नेहमी नेहमी छान स्वप्न का नाही पडत गं आजी?’ भुपी.  

‘छान पडतात ती तरी का पडतात, हे कुठे ठाऊक आहे आपल्याला? पण खूप थकलेल्या, चिंतेत असलेल्या माणसांना भीतीदायक स्वप्न पडतात म्हणे.’

‘अगं, मनी  वसे ते स्वप्नी दिसे.’ भुपी

‘हो ना. मनातल्या काही कल्पना, आठवणी आपल्याला माहीत असतात. पण आपल्या नकळतही  अनेक कल्पना, भावना आणि आठवणी आपल्या मनात साठत जातच असतात. स्वप्न म्हणजे ह्या अबोध, आपल्याला न समजणाऱ्या मनाचे खेळ आहेत, असंही म्हणतात.’ आजी.   

‘आजी, तू सारखं असंही म्हणतात, तसंही म्हणतात असं काय सांगत्येस?  पण मग नक्की खरं काय आहे?’ भुपी जरा वैतागून म्हणाली.

‘नक्की काय खरं आहे ते आपल्याला अजून माहीत नाहीये!’

‘तुला? आणि माहीत नाही? सायंटिस्टना तर सगळं माहीत असतं. आणि त्यातून तु तर आमची गुगल आजी आहेस!’ झंप्या.

आजी हसली. ‘हो, सगळं माहीत असतं म्हणजे आपल्याला काय काय माहीत नाही, हेही शास्त्रज्ञांना माहीत असणार. बरोबर ना? स्वप्नांबद्दल आपल्याला माहीत नाही असं बरंच काही आहे.’

झंप्या जरा बुचकळ्यात पडला, पण त्याने पुढचा प्रश्न डागला, ‘पहाटेची स्वप्नं खरी होतात. हे खरं आहे? आणि स्वप्नात काहींना भविष्य दिसतं. हो की नाही?’  

‘अरे, अशा अनेक कल्पना होत्या आणि आहेत. लोकांना वाटायचं स्वप्न म्हणजे देवानी पाठवलेले गूढ संदेश आहेत. काही लोकांना वाटायचं, हे देवांनी नाही तर दानवांनी पाठवलेले गूढ संदेश आहेत. स्वप्नफल सांगणारे अनेक ग्रंथ आहेत.’

‘स्वप्नफल म्हणजे?’ भुपी.

‘म्हणजे स्वप्नाचा अर्थ सांगणारे.’

‘मग, कळतो का स्वप्नांचा अर्थ? पुढे काय होईल हे खरंच सांगता येतं?’

‘नाही. स्वप्नात पुढे काय होणार वगैरे कळत नाही.’

‘असं कसं? काही वेळेला होतात की स्वप्न खरी. त्या प्रतिकला मोबाईल हरवल्याचं स्वप्नं पडलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा मोबाईल हरवला. आता बोल आजी.’ झंप्या.

‘अरे पण इतके दिवस स्टेशनवर हरवल्याचं स्वप्न पडूनही तो कुठे अजून हरवलाय? स्वप्न पडायला आणि मोबाईल हरवायला एक गाठ पडली म्हणून तेवढं एकच स्वप्न तुम्ही लक्षात घेताय. खरी न ठरलेली बाकीची स्वप्नं, त्यांचं काय? तु म्हणालास तसं काही वेळेला स्वप्नं खरी होतात  आणि आपल्याला स्वप्नांत पुढचं दिसतं असं वाटायला लागतं. पण बरेचदा स्वप्नातलं प्रत्यक्षात घडत नाही, हे मात्र आपण लक्षात घेत नाही. ’

‘खरंच की!’ झंप्या.

‘पण त्या केकुले नावाच्या शास्त्रज्ञाला तर स्वप्नात बेंझिनच्या रेणूची रचना दिसली होती, हो ना?’ भुपी.

‘हो, पण म्हणजे तो काही चमत्कार नाही. त्याला भविष्य दिसलं असं नाही.  झोपेत मेंदूचे कारभार सुरूच असतात. अत्यंत किचकट कोड्यांची, गणितांची, कूट प्रश्नांची उत्तरे झोपेत सुचल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखादी झकास रेम डुलकी झाली तर कोडी पटकन सुटतात म्हणे. तो त्या कोड्याचा विचार करत झोपला आणि त्याला तसं स्वप्नं पडलं आणि उठल्यावर त्याच्या ते लक्षातही राहिलं. भावनांचा तीव्रतम  खेळ असेल तर स्वप्न चांगलीच लक्षात राहतात. सहाजिकच आहे हे. जागेपणी नाही का, ज्या दिवशी आपण कुत्र्याचं   पिल्लू घरी आणतो तो दिवस चांगला लक्षात रहातो. तसंच स्वप्नांचं आहे.’

‘आजी, कुत्र्‍यांना किंवा बाकी प्राण्यांना स्वप्न पडत असतील का गं?’ झंप्या.

‘अंsss,’ आजी जरा विचारात पडली. मग म्हणाली, ‘सगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये रेम झोप आहेच. त्यातही डॉल्फिन्सना अगदी कमी. तेंव्हा ते फारशी स्वप्नं पहात नसावेत. अर्माडीलो, ओप्पोसम ह्या प्राण्यांना चांगली लांबलचक रेम झोप लागते. म्हणजे हे सगळ्यात झोपाळू प्राणी, सगळ्यात स्वप्नाळू असावेत. कुत्री, मांजरं, उंदीर, माकडं, हत्ती हे सुद्धा स्वप्न पहात असावेत.’

‘म्हणजे हत्तीच्या स्वप्नांत माकड आणि माकडाच्या स्वप्नांत हत्ती येत असणार!’ असं म्हणत खो खो हसत झंप्या लोळू लागला.

‘आणि उंदराच्या स्वप्नात मांजर आलं तर उंदीर दचकून जागे होत असणार.’ या कल्पनेनी भुपीही हसू लागली.’

‘झोपा पाहू आता, आज रात्री तुमच्या स्वप्नात काय आलं ते उदया नक्की सांगा मला.’ असं म्हणत आजीने आजीने लाईट बंद केला.

 

‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’ या आगामी पुस्तकातून

प्रथम प्रसिद्धी

वयम्

दिवाळी अंक २०२३

No comments:

Post a Comment