Tuesday, 29 December 2015

राईट टू पी अर्थात शू करण्याचा अधिकार ; तो ही जन्मसिद्ध

राईट टू पी अर्थात शू करण्याचा अधिकार ; तो ही जन्मसिद्ध
डॉ शंतनू अभ्यंकर

पी म्हणजे शू करणे. राईट टू पी म्हणजे शू करण्याचा अधिकार! हा मागितला आहे महानगरातल्या बायकांनी. जाहीरपणे. लाज बीज सोडून, भीड भाड मोडून. करणार काय? प्रश्न अगदी जिव्हाळ्याचा. रोजच्या जगण्यातला.

घराबाहेर पडलं की बायकांना लघवीला जाणं मोठं जिकिरीचं असतं. महिलांसाठी कॉमन टॉयलेट नसणं ही एक मोठीच समस्या आहे आपल्याकडे. बारा-बारा तास, अठरा-अठरा तास घराबाहेर असणाऱ्या महिलांना ही समस्या खूपच भेडसावते. मुंबईत आणि इतर ठिकाणी या विषयी महिलांनी चक्क जाहीर निषेध नोंदवला आहे. घराबाहेर पडल्यावर स्वच्छ आणि सहज उपलब्ध टॉयलेट हवीत, नव्हे हा स्त्रियांचा अधिकारच आहे, असं याचं म्हणणं. किती योग्य आहे ही मागणी, आणि किती साधी. स्वच्छ भारतातचे डिंडिम पिटताना आपण याकडे गांभीर्यानं पहायला हवं.

बाहेर सोय नाही, उघड्यावर बसणं शक्य नाही, अशामुळे कित्येक बायका दिवस दिवस लघवी साठवून धरतात. तशी सवयच लावलेली असते त्यांनी स्वतःला, अगदी लहानपणा पासून. सक्काळी एकदा घराबाहेर पडताना लघवीला जायचं ते थेट घरी परत आल्यावरच पुन्हा जायचं!

या सवयीचे, कोंडमाऱ्याचे शारीरिक दुष्परिणाम या महिलांना भोगायला लागतात. लघवीची इन्फेक्शनस्, पोटदुखी, हसलं खोकलं की कपड्यात थोडीशी लघवी होणं, लघवीच्या तालचक्राबरोबर संडासचंही तालचक्र बिघडणं, एक ना अनेक. पैकी इन्फेक्शन सगळ्यात कॉमन.

आपल्या सगळ्यांच्या युरीनरी ट्रॅकमध्ये रोगजंतू असतातच. फक्त त्यांची लोकसंख्या सातत्यानं अतिशय मर्यादित राखली जाते. कशी?  वारंवार शू केल्यामुळे! म्हणजे होतं असं की ब्लॅडरमध्ये जंतू वाढायला लागतात. आत चांगला अंधार असतो, उबदार असतं; लघवीमधली काही द्रव्य हेच ह्यांचं अन्न, त्यामुळे खाऊही खूप उपलब्ध असतो. यावर जंतू पोसले जातात. वाढतात. अगदी झपाटयानं. पण आपण शू केली की ही सगळी प्रजा बाहेर पडते. शू बरोबर. त्यांचे वाढीचे प्रयत्न गेले पाण्यात! मग थोडे बहुत उरलेले जंतू पुनःश्च हरीओम म्हणून पुन्हा हात पाय पसरायला बघतात.
कल्पना करा तुम्हाला काही कारणानी शूच नाही करता आली...? हे जंतू वाढत रहातील. ब्लॅडर मध्ये चांगला जम बसवतील. त्यातून शू  साठून राहिली की ब्लॅडर फुगतं, त्याच्यातल्या प्रेशर मुळे ब्लॅडरवॉलचा रक्तपुरवठा क्षीण होतो आणि ह्यामुळे जंतुंना आता प्रतीकाराची भीती रहात नाही. रक्तपुरवठा क्षीण झाल्यामुळे या जंतुंविरुध्द प्रतिकारशक्ती नीट काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत युरिनरी इन्फेक्शन न झालं तरच नवल. हे जंतू आता ब्लॅडर मध्ये घर करतात. लघवीला आग, जळजळ, वारंवार लघवीला लागणं असले सगळे प्रकार. कधी कधी तर इन्फेक्शन पार किडनी पर्यंत जातं. ताप, थंडी वगैरे सुरू. शिवाय अशक्तपणा, बराच काळ टिकणारा.

त्यामुळे दर दोन तासांनी बाथरूमला जाऊन येणं महत्वाचं. पण महिला हे टाळतात. बाहेरची स्वच्छतागृह इतकी अस्वच्छ असतात की नुसत्या वासानीच ओकारी येते... आणि पुरुषांसारखा महिलांना आपला कार्यभाग उघड्यावर थोडाच उरकता येतो? अस्वच्छ ठिकाणी जाणं नको म्हणून मग घर येईपर्यंत कळ काढणं सुरु रहातं. ब्लॅडर बसतं फुगून आणि वर समजावल्याप्रमाणे जंतू वाढीला सुरुवात होते. कधी कधी कळ अगदी असह्य होते. मग गडबडीनं असेल त्या स्वच्छतागृहाचा आसरा घेतला जातो. दुसऱ्या दिवशी जळजळ सुरु झाली की आदल्या दिवशीचं अस्वच्छ बाथरूम आठवतं. पण मुळात लघवी खूप वेळ तुंबवून ठेवल्यामुळे जंतुंची लागण झालेलीच असते. ह्यातली मेख अशी आहे की इन्फेक्शन हे अस्वच्छ ठिकाणी लघवी केल्यामुळे होत नाही. इन्फेक्शन हे तर बराच वेळ लघवी तुंबवून ठेवल्यामुळे होतं.

ठिकाण स्वच्छ असो किंवा अस्वच्छ, वेळोवेळी जंतू बाहेर जाणं महत्वाचं. लघवी न करण्यापेक्षा अस्वच्छ  ठिकाणी केलेली चांगली. यातच स्त्रीयांचे सूख सामावले आहे.

इतक्या प्राथमिक, इतक्या साध्या, इतक्या नेहमीच्या, गरजेच्या गोष्टीसाठी, जाहीर मागणी करावी लागावी ही खूप लाजिरवाणी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. जे बिनबोभाट व्हायचं ते गावभर बोभाटा झाल्यावर तरी होतंय का; ते आता पहायचं.

ह्या आणि अशा इतर लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


Monday, 28 December 2015

दोन घडीचा डाव...


दोन घडीचा डाव...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, सातारा. पिन  ४१२ ८०३; मो. क्र. ९८२२० १०३४९

नाळ पडत आली होती. मी पटकन ते बेंबीशी लोंबणारं वाळकं बोंडूक उपटलं आणि कचऱ्यात दिलं टाकून. बाळाची आई आणि आजी अगदी नाराज झाल्या.
‘ते हवं होतं डागदर’, त्या पुटपुटल्या.
‘कशाला?’
‘पाचवी पुजायला!’
गावाकडे अजूनही चालतो हा प्रकार. बाळ झालं की पाचव्या दिवशी पूजा करायची. हा फार महत्वाचा दिवस. पाचव्या दिवशी सटवाई येते आणि बाळाच्या भाळावर भविष्य लिहून जाते.
जर सटवाई पाचव्या दिवशी भविष्य लिहीते, तर पहिले पाच दिवस काय होतं? उघडच आहे, पहिले पाच दिवस बाळाला  मुळी भविष्यच नसतं! थोडक्यात ही प्रथा अशा एका समाजात निर्माण झाली आहे जिथे पहिले पाच दिवस त्या बाळाचं भविष्य त्या समाजाच्या देवदेवतांना सुद्धा सांगता यायचं नाही. या समाजात नवजात अर्भकं पटापट मरत असणार. या समाजानं मुळी मान्यच केलं होतं की पाचच्या पुढे जगलं, तगलं, तरच ते मूल आपलं, अन्यथा नाही.
बाळाचं नाव ठेवायचं तेही बाराव्या दिवशी. ‘मुलगा झाला तर तुझं नाव ठेवीन रे, गणपतीबाप्पा’, हे नवसासाठी. अडचणीत असताना. एरवी जन्माआधी बाळाच्या नावाचा विचार सुद्धा करायचा नाही. कारण बाळाचं नाव ठेवणं म्हणजे त्याला एक व्यक्तित्व देणं, नातं जोडणं, कुटुंबाचा भाग मानणं. हे सगळं सदा भलतच अनिश्चित. त्यामुळे हे सगळं सावकाश, आस्ते आस्ते, जपून, बारा दिवसानंतर.
अशा समाजात तान्ह्या बाळाचा मृत्यू ही कितीतरी नियमितपणे घडणारी घटना असणार. स्वातंत्र्याच्या दशकात, शेकडा वीस मुलं वर्षाच्या आत मरायची! आज हा दर शेकडा ३ पेक्षा कमी आहे. पूर्वी हा मुळी नियमच होता, अपवाद नाही.  फूल तो गिरते ही है, फल नही गिरने चाहिये, ही म्हण बरंच काही सांगून जाते.
 जन्मल्यानंतर काही काळात होणारे मृत्यू हे बरेचदा कमी वजनामुळे, कमी दिवसामुळे आणि बाळंतपणातील घोटाळ्यामुळे होतात. जंतू बिंतु नंतर. इतक्या झटपट आपला प्रभाव दाखवण्याची संधी जंतूंना मिळत नाही. बाळंतपणासाठीच्या सुविधा पुरवल्या की ह्याच्या आसपास घडणारे मृत्यू टळतात.
मांडीवर आपलंच मेलेलं मूल घेऊन बसलेली, शोक करणारी आई, हे दृष्य अशा समाजात नेहमीचंच, अगदी शाळेतल्या मुलानंही कधी ना कधी तरी पाहिलेलं. ‘राजहंस माझा निजलाही कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात असते ती अशाच समाजात. या कवितेत नुकतंच वैधव्य आलेल्या बाईचं मूलही नुकतंच गेलेलं आहे. ते मांडीवर घेऊन ती ते नेऊपहाणाऱ्यांस बजावते आहे, ‘राजहंस माझा निजला’.
करु नका गलबला अगदी, लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा

वाजवूं नका पाऊल,
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल

मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला

अतिशय करूणरसप्रधान अशी ही कविता आहे. पण कल्पना करा ‘राजहंस माझा निजला’ ही कविता पुन्हा पाठ्यपुस्तकात आली तर त्यातलं कारुण्य आजच्या मुलांनाच काय पण शिक्षकांनाही भावणार नाही. यात कारुण्य कमी आणि भीषणता जास्त आहे असं काही तरी त्याचं मत होईल!
शेतात पेरलेलं उगवेल की नाही हे सांगणं जसं मुष्कील, तसंच हे मानवी बीजही उगवेल की नाही हे सांगणं मुष्कील. मूल तर सोडाच, आई वाचेल का नाही हेही सांगता यायचं नाही. बाळं पटापटा मरायची तशा आयाही पटापटा मरायच्या. १९४७ साली शंभरातल्या दोन आया बाळंतपणात मरायच्या आणि पन्नास एक तरी पुढे महिना दोन महिने अंथरूण धरायच्या. बाळंतरोग नावाचा रोगच होता. तो आता इतिहासजमा झाला जणू. आज हजारात एखादी आई मरते. हा ही दर खूपच जास्त समजला जातो. प्रगत देशात हा लाखात दोन-पाच एवढा आहे.  बाळंतपण म्हणजे दुसरा जन्मच असं म्हणायचे ते काही खोटं नव्हतं. बाळंतीण होणं ही सत्वपरीक्षाच होती. ती उत्तीर्ण होणारीला मान आणि वारंवार उत्तीर्ण होणारीला मरातब मिळणं स्वाभाविकच. बहुप्रसवेचा सन्मान आणि वांझोटीचा धिक्कार ही समाजात उत्क्रांत झालेली भावना आहे. बहुप्रसवा असणं फायद्याचं होतं, बहुप्रसवा असणं धोक्याचंही होतं. बाळंतपण ही जोखीम होती त्या स्त्रीनं घेतलेली. कुटुंबांसाठी, वंशासाठी अशी जीवाची जोखीम घेणारी स्त्री वंदनीय ठरली यात नवल ते काय? जगातल्या सर्व देशात हौतात्म्याचा सन्मान केला जातो. ‘देशासाठी मेलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास’ वगैरे...! देशासाठी प्रसंगी प्राणांचीही आहुती द्यायला या मुळे माणूस उद्युक्त होतो. तसंच काहीसं हे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!’ किंवा ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ वगैरे. मातृत्वाचा इतका पराकोटीचा गौरव, मातृत्वाची जोखीम स्वीकारणारी मनोभूमी तयार करतो. भरपूर संतती असलेली बाई शुभशकुनी आणि अजिबात नसलेली अपशकुनी हे सगळं ओघानंच येतं मग. जिवतीचं चित्रही असंच, बहुप्रसवा स्त्रीचा नितांत गौरव करणारं आणि अप्रसवा, निःसंतानांना हीन लेखणारं. निःसंतान स्त्रीयांना (आणि पुरुषांनाही) जेरीस आणणारे असे कितीतरी वाक्प्रचार, प्रथा, परंपरा सांगाव्यात. अष्टपुत्रा सौभाग्यवती असा आशीर्वाद असो की प्रत्येक अपत्य-शक्य स्त्रीची नारळाने ओटी भरणे असो, वांझोटीच्या नजरेपासून मूल लपवणे असो की निसंतान पुरुषाच्या पौरुषत्वाबद्दलच शंका घेणे असो.
सारी सुखं हात जोडून पुढे उभी असताना गोष्टीतल्या राजाला दुखः मूलबाळ नसल्याचं, त्यातही मुलगा नसल्याचं. बऱ्याच स्तोत्रांच फलित, बऱ्याच व्रतवैकल्यांचा हेतू, बऱ्याच कहाण्यांचं सार एकच, संतती, इच्छित संतती, भरपूर संतती, घराचं नांदतं गाजतं ‘गोकुळ’ होणे.
प्रत्येक बाईला सरासरी पाच-सात मुलं व्हायची. बाळंतीणीची खोली म्हणून एक वेगळी खोलीच असायची प्रत्येक वाडयात. एका कुटुंबात जननक्षम बायका असायच्या ४ ते ५. म्हणजे ३२ वर्षाच्या सरासरी आयुष्यात माणसे सुमारे ३२ जन्म बघायची. लग्न लवकर, मूलही लवकर, त्यामुळे सासू-सुनेची बाळंतपणही एका वेळी व्हायची.
 ३२ जन्म आणि सुमारे तितकेच मृत्यू याची देही याची डोळां बघायची माणसं. यातल्या बहुतेक मरणांची (आणि काही जन्मांची सुद्धा), कारणं अज्ञात, अनाकलनीय.
मृत्यू इतका सातत्यानं जवळ असायचा की वंशवृद्धी हे जीवनध्येय होणं यात नवल ते काय? सरासरी आयुर्मानच मुळी ३२ वर्ष होतं स्वातंत्र्याच्या वेळी. तेच  १९८० साली होतं ४८. आता ६६ वर्ष आहे. अमेरीकेत सध्या आहे ७८ वर्ष.
पुन्हा शेवटचे अंथरूण धरणे ते मरणे, ह्यातलं अंतर अगदी कमी होत तेंव्हा. शामच्या आईची आणि शामची भेट, खरोखरच, नाहीच व्हायची. दुसऱ्या कुणाची ‘आssई’ अशी हाकही भारी दुखःकारी असायची, ते या कोवळ्या वयातल्या आघाता मुळेच.
जखम, जंतू, ताप, खलास! कुठलेतरी कारण...ताप, अती ताप, अति-अति ताप, खलास!! जुलाब, डीहायड्रेशन जुलाब, डीहायड्रेशन, खलास!!! असा सगळा मामला. कुपोषण, अॅनिमिया, शास्त्रीय ज्ञानाचा, उपचारांचा  अभाव ह्या सगळ्याची काळीकुट्ट  चौकट प्रत्येक मरणाला लाभलेली. सर्पदंश, सेप्टिक, साथीचे आजार, यात पटापट माणसं मरून घ्यायची. सकाळी खांदेकरी म्हणून आलेल्यालाच संध्याकाळी कसा खांदा द्यावा लागला याची रसभरीत वर्णनं आपण इतिहासात वाचली आहेत. ‘महीना झाला व्हेन्टीलेटर वर आहेत’, वगैरे भानगड नाही. शेवटच्या आजारपणाचा खर्चही कमी होता तो त्यामुळेच. त्यावेळी तेराव्याच्या जेवणाचा खर्च हा डोईजड होता, आजारपणाचा नाही.
म्हाताऱ्याच खुब्याचं हाड मोडलं की पुढे १५ दिवसात खेळ आटोपायचा. अशी माणसं हाड मोडल्यानं मरायची नाहीत.  पण अंथरुणाला खिळल्याने, छातीत जंतुसंसर्ग होऊन, न्यूमोनियानं मरायची. आता सांध्याच्या ऑपरेशन मुळे सांधा सांधला जातो पण त्याहून महत्वाचं म्हणजे माणूस तत्काळ स्वतःच्या पायावर उभा रहातो. एकदम ‘पंगुम् लंघयते गिरिम्’ असंच होऊन जातं. मरण टळतं ते सांधा बदलल्यामुळे नाही तर माणूस हिंडता झाल्याने. अंथरुणाला खिळण्याची बात नस्से आणि खिळलंच कोणी अंथरुणाला की त्याची यथास्थित काळजी  घेण्याचं शास्त्र भलतंच विकसित झालंय.
जगणं मरणं हे आता एका श्वासाचं अंतर नाही राहीलं. मधे व्हेन्टिलेटर आहे, डायलेसिस आहे, अँन्गिओग्राफ़ी/प्लास्टी आहे, पेसमेकर आहे, केमो/रेडीओ आहे. थकल्या भागल्या अवयवांसाठी अनेकानेक आधार आहेत. क्वचित हे तापकारक होतं. मरण बरं पण उपचार नको असं होतं, नाही असं नाही, पण बहुतेकदा हे उपचार तापहारकच ठरतात.
आरोग्याची व्याख्याच मुळी अशी आहे की, ‘सामाजिक आणि आर्थिक दृष्टया उत्पादक काम करणारी कोणतीही व्यक्ती’ ही आरोग्यसंपन्न समजली पाहिजे. आधुनिक वैद्यकीच्या साथीनं जगणारे बहुतेक जण या व्याख्येनुसार आरोग्यसंपन्न ठरतात.
आजच्या पिढीला जननसोहळा आणि मरणसोहळा कमीतकमी अनुभवाला येतो. ‘आजकाल आयुष्यात अनिश्चितता वाढली आहे. सकाळी घराबाहेर गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल याची शाश्वती नसते’, वगैरे बोललं जातं, पण आकडेवारी वेगळंच दाखवते. कमावत्या वयात, उमेदीच्या वयात एखाद्याचा मृत्यू होणही अघटीतच. पण हेही आता आणखी कमी वेळा घडतं. हार्ट अॅटक, अपघात वगैरे जालीम शत्रू जमेस धरूनही आकडेवारी हेच दर्शवते की कमावत्या वयात माणसं कमी दगावतात. आयुर्मान वाढलं याचा अर्थ संध्याकाळी माणसं सुरक्षित घरी पोहोचण्याचं प्रमाण वाढलं असाच होतो. आणि आयुर्मान काही थोडंथोडकं नाही चांगलं दुपटीहून अधिक वाढलं आहे.
वाढल्या आयुर्मानाचे काही कल्पनेबाहेरचे परिणाम आहेत. उदाः नियमित पाळी किंवा ट्रॅव्ह्लवाल्यांची तेजी!  नियमित पाळी ही वाढत्या आयुर्मानाची, उशिरा लग्नाची, कुटुंब नियोजनाची देन आहे. शतकभरापूर्वी नियमित पाळी हा प्रकार नव्हता. आपल्या खापरपणजीची कहाणी आठवा. बहुतेकदा लग्न हे पाळी यायच्या आधीच झालेलं. पाळी आली रे आली की सासरी रवानगी. लगेच गरोदरपण, की पाळी बंद. लगेच बाळाला पाजायला, की पाळी बंद. हे होई तोवर पुन्हा दिवस, पुन्हा पाळी बंद; पुन्हा अंगावर पाजणे, पुन्हा पाळी बंद; पुन्हा दिवस, पुन्हा अंगावर पाजणे... असं आपले चालूच. म्हणजे नियमित पाळी ही भानगडच नाही. शेवटी पाळी तरी जायची नाहीतर पणजी तरी जायची! पण पाळी आधी पणजीच जाण्याची शक्यता जास्त.
म्हणजे निसर्गावस्थेत नियमित पाळी ही ‘अनैसर्गिक’ गोष्ट आहे. पाळी बंद होऊन पुढे जगणं हे ही ‘अनैसर्गिक’ आहे. रानटी अवस्थेत असं होत नाही. १९४७ साली सरासरी आयुष्य ३२ वर्ष त्यामुळे पाळी न येणारी बाई अगदी क्वचित दिसायची. मुळात असायचीच नाही आणि असली तर जराजर्जर झाल्यामुळे बहुदा घरात घरात असल्यामुळे दिसायची तर नाहीच नाही. आज भारतात पाळी येणाऱ्या महिलांपेक्षा न येणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
त्या काळी साठी शांत हा उत्सवचा दिवस, आणि  सहस्रचंद्रदर्शन म्हणजे महोत्सव. आता मुळी रिटायरमेंटच वयच साठ. म्हणजे मालकाला खात्री आहे की साठी होईपर्यंत हा माणूस पगार देण्याइतपत काम नक्की करू शकेल. वाढत्या आरोग्यपूर्ण आयुष्याचा हा परिणाम. साठी झाली की माणसं खुशीत असतात. दुसरी इनिंग सुरु झाली म्हणतात. मजेत लांब लांब ट्रीपला जातात. ट्रॅव्ह्ल वाले चांगलेच गबर होतात. ‘माझा प्रवास’ वाले गोडसे गुरुजी यात्रेला बाहेर पडले तर घरी कोण हलकल्लोळ माजला. काशीयात्रा म्हणजे सगळी निरवानिरव करूनच करायची यात्रा होती. आता युरोप, सिंगापूरच्या ट्रिपा पत्ते खेळता खेळता ठरतात आणि कोपऱ्यावरच्या न्हाव्याकडे जावं इतक्या सहजतेने लोक जाऊन येतात.

जीवन ऐसे नाव असणारा हा दोन घडीचा डाव आता चांगला चार घडीचा झाला आहे. बदलत्या जीवनशैली बरोबर मरणशैलीही बदलली आहे. उगीच पूर्वीच्या काळी असं नव्हतं असं म्हणून कुढण्यात काय अर्थ आहे? पूर्वीच्या काळी असं नव्हतंच. तो काळ गेला आता आरोग्यपूर्ण, दीर्घायुष्याची वेळ आली आहे.

Monday, 14 December 2015

गर्भ आणि त्याचा निःपात

गर्भ आणि त्याचा निःपात
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. ४१२ ८०३
मोबाईल: ९८२२० १०३४९

नुकत्याच आलेल्या बातमी नुसार, रॉबर्ट डिअर नावाच्या एका अमेरिकन माणसानं, तिथल्या कॉलोरॅडो राज्यातल्या, ‘प्लॅण्ड  पेरेंटहुड’ संस्थेच्या गर्भपात केंद्रावर हल्ला केला. त्यात दोन माणसं आणि एक पोलीस ऑफीसर मारले गेले. इतर अनेक जखमी झाले. तासाभराच्या धुमश्चक्रीनंतर रॉबर्ट डिअरला अटक करण्यात आली. हल्यामागचं कारण असं आहे की कोणाही स्त्रीने गर्भपात करून घेणं ह्या डिअर सायबांना मान्य नव्हतं. हे धर्म संमत नाही म्हणून.
आपल्याकडे गर्भपात विधीसंमत आहे. पण अमेरिकेमध्ये मात्र सरसकट असं नाही. उलट गर्भपाताला पाठींबा आणि विरोध हा तिथे अत्यंत भावनिक आणि चक्क निवडणूकीचा मुद्दा आहे. जगातील अत्यंत प्रगत देशातही असे धर्ममार्तंड आहेत. त्यांचे कट्टर अनुयायीही आहेत. हा ही दहशतवादच आहे. अगदी अमेरिकन कायद्यातील व्याख्येनुसार सुद्धा! अमेरिकन माध्यमं त्याला तसं लेबल लावत नसली तरीही.
  यापूर्वी आयर्लंड या कट्टर कॅथॉलिक देशात वेळेवर गर्भपात न केल्यामुळे एका भारतीय डॉक्टरचा मृत्यू ओढवला. हे मूल तिला हवं होतं पण परिस्थितीच अशी उद्भवली की तिचाच जीव धोक्यात आला. गर्भपात न केल्यास ही मरणार हे दिसत असून सुध्दा, कायद्यावर बोट ठेऊन तिला गर्भपात नाकारण्यात आला. जिवंतपणी गर्भहत्येचं पातक करून, ख्रिस्तवासी झाल्यावरच्या  नरकयातना कोणाला नको होत्या. जित्या जागत्या बाईच्या जीवापुढे तिच्या पोटातला गोळा महत्वाचा ठरला.  शेवटी दोघंही देवाघरी गेले! बाईचा जीव धोक्यात असेल तेव्हातरी अॅबॉर्शनला  परवानगी दया अशी याचना तिथल्या स्त्रिया करत होत्या. शेवटी, ‘आमच्या शरीराची आणि आरोग्याची एवढी काळजी वाटते ना तुम्हाला, मग आम्ही आमच्या पाळीच्या तारखाही सरकारला कळवतो’, असं म्हणून तिथल्या स्त्रियांनी, ट्वीटर वरून, आपल्या पाळीच्या तारखा थेट पंतप्रधानांना कळवायला सुरुवात केली!  हा अगदी आंतरराष्ट्रीय मामला झाल्यावर तिथल्या सरकारनं नुकताच कायदा थोडासा(च) सैल केला आहे.
‘प्रो लाईफ’ हा पश्चिमी देशातला गर्भपात विरोधी कंपू. गर्भालाही जीव असतो, स्वतंत्र अस्तित्व असतं, त्याचा रक्तगट, जनुकीय रंगरूप आईपेक्षा वेगळं असतं. मग त्याला मारायचा अधिकार अन्य कुणाला कसा? हा यांचा प्रश्न.
‘प्रो चॉइस’ हा गर्भपाताचा पर्याय असावा असं सांगणारा  गट. यांचं म्हणणं असं की जन्म झाल्या शिवाय, किमान आईवेगळं अस्तित्व शक्य झाल्या शिवाय गर्भ हा स्वतंत्र व्यक्ती होऊच शकत नाही. सर्वस्वी परपोषित,परावलंबी अशा गर्भाला स्वतंत्र व्यक्ती मानणं हा पराकोटीचा ताणलेला युक्तीवाद आहे. ह्या न्यायानी, पुरुष/स्त्री बीज वगैरेचाही स्वतंत्र अस्तित्व म्हणून विचार करता येईल; कारण जैवशास्त्रीय दृष्टया यातील पेशी आपल्या पेक्षा ‘वेगळ्या’ असतात. एवढंच कशाला शरीरातील प्रत्येक पेशी ही ‘जिवंत’च असते. रक्ताचा नमुना घेऊनही त्यातल्या पेशी डॉक्टर मारतच असतात! जिवंत पेशींचा जगण्याचा हक्क मान्य करायचा तर, एखाद्याचं अपेंडिक्स काढणंही चुकीचंच म्हणायचं काय?
शिवाय नकोसं असताना राहिलेलं मूल, हे मूल म्हणून कितीही गोंडस असलं, तरी त्या कुटुंब साठी ती न पेलणारी जबाबदारीच असते. विवाहपूर्व संबंधातून, विवाहबाह्य संबंधातून, बलात्कारातून निपजलेली संतती असेल तर त्या आईला आयुष्यभर हे भोवतं. नव्यानं आयुष्य सुरु करताना ही मुलं मोठाच अडसर ठरतात. अशी मुलं पोसायची जबाबदारी शेवटी समाजावर येऊन पडते. या अनाथ पण अश्राप मुलांना सुजाण पालकत्व पुरवणं ही मोठी जोखीम असते. ही झेपली नाही तर बाल गुन्हेगारी, व्यसनीपणा असे प्रश्न निर्माण होतात.
लुळी, पांगळी, मरणासन्न आजारांनी ग्रस्त संतती, जन्माला येणार आहे हे जर आधी कळू शकतं, तर मग अशी संतती जन्माला न घालण्याचा अधिकार त्या त्या स्त्रीला/कुटुंबाला असलाच पाहिजे. अशी संतती जन्माला घालणं आणि पुढे लालन, पालन, पोषण करणं ही त्या आई-बापाला आणि कुटुंबाला विनाकारणच शिक्षा आहे. उलट हा जन्मानंतर रोज थोडा थोडा होणारा गर्भपातच आहे.  तेव्हा गर्भपाताचा पर्याय हा उपलब्ध असायला हवा. म्हणून हे प्रो चॉईस!
प्रो लाईफवाले म्हणतात; ‘कुठला जीव काय दैव घेऊन जन्माला येईल हे कुणी सांगावं? बेथोवेन, हा पाश्चात्य संगीताचा बेताज बादशहा, हा त्याच्या आई-बापाचा पाचवा मुलगा होता! घ्या!! म्हणजे जर गर्भपाताचा पर्याय बेथोवेनच्या मातापित्यास उपलब्ध असता तर आपण एका अभिजात संगीतकाराला मुकलो असतो!’
यावर प्रो चॉइसवाल्यांचं, तोडीसतोड उत्तर असं की ‘त्या’ रात्री ‘त्या’ माता पित्यांनी ‘ती’ क्रीया करण्याचा ‘तो’ निर्णय घेतला म्हणूनच बेथोवेन शक्य झाला. म्हणजे एखाद्या दिवशी संभोग न करणं म्हणजे देखील बेथोवेनला जनन नाकारणंच नव्हे काय? आता याला काय उत्तर आहे?  हिटलर हा देखील त्याच्या पितरांचा चौथा मुलगा होता. पाचवेपणाचा सांगीतिक कर्तृत्वाशी जसा काडीचाही संबंध नाही तसाच चौथेपणाचा अपत्याच्या क्रौर्याशी नाही.  थोडक्यात संभाव्य बेथोवेनला जीवानिशी  मारल्याचा आरोप पोकळ आणि बिनबुडाचा आहे.
गर्भपातबंदी ही दारूबंदी सारखी असते. ती अमलात आणणं महाकर्मकठीण. उलट अशा परिस्थितीत असा मामला चोरीचा बनतो आणि हळूहळू बोंबलत उरकावा लागतो. सगळ्याच बेकायदा सेवांप्रमाणे मग याचेही दर चढे रहातात. पिळवणूक, शोषण आणि असुरक्षित गर्भपात वाढत जातात. यातच काही बायका मरतात. आयर्लंड आणि अमेरिकेमध्ये असे परिणाम दिसतात.
गर्भपाताचा भारतीय कायदा त्यामानानं अतिशय सुटसुटीत आणि व्यवहार्य आहे. आपल्याकडे स्त्रियांच्या आरोग्यासाठी तो वरदान ठरला आहे.
यानुसार पाचव्या महिन्यापर्यंत गर्भपात करता येतो. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भातील दोष ओळखता येतात आणि गर्भपाताचा निर्णय पाचव्यानंतरही घ्यायची वेळ येते. अशा परिस्थितीत कायद्यात गर्भपाताची मुभा नाही. तीही मिळावी अशी मागणी आहे. त्यावर विचारही चालू आहे. तंत्रज्ञानानुसार कायदाही बदलेल ही अपेक्षा.


Thursday, 10 December 2015

बाई मी निगेटीव्ह गं निगेटीव्ह...!

बाई मी निगेटीव्ह गं निगेटीव्ह...!
डॉ.शंतनू अभ्यंकर.  मो.क्र. ९८२२० १०३४९
आजकाल बरेच पालक लग्नाआधीच डॉक्टरी सल्ला घ्यायला येतात. ह्यात एक प्रश्न हमखास असतो, ‘डॉक्टर, मुला-मुलीचा ब्लड ग्रुप एकच आहे, काही प्रॉब्लेम नाही ना?’
ब्लडग्रुपचा आणि वैवाहिक सौख्याचा; पुढे मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नाही. आई बापाचा ब्लडग्रुप एक असला काय किंवा वेगळा वेगळा असला काय सगळं सारखंच. उलट त्यातल्या त्यात एक असलेला बरा; उद्या एकाला रक्ताची गरज लागली तर दुसऱ्याचं काढून भरता येईल! पण हा प्रश्न येतो खास. काही ज्योतिषीही ‘एक नाड आहे, तेव्हा आता ब्लडग्रुप बघा’, असा शहाजोगपणाचा सल्ला देतात. या नाड या प्रकरणाचा आणि ब्लडग्रुपचा अर्थाअर्थी संबंध आजवर तरी कोणी सिद्ध केल्याचं माझ्या माहितीत नाही. या सल्ल्या मुळे ज्योतिषी मॉडर्न आणि वैज्ञानिक  ठरतो, बस्स!
 त्यातून जर मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर मग विचारूच नका.
मुलीचा ब्लड ग्रुप निगेटीव्ह असणं हा अधुनिक पत्रिकेतला मंगळ आहे जणू. पण पारंपारिक पत्रिकेतल्या मंगळाइतकाच हाही निरुपद्रवी आहे. पुरेशी दक्षता घेतल्यास हा मंगळ आपण निष्प्रभ करू शकतो. मंगळाच्या मुलीचं लग्न जसं अवघड होऊन बसतं तसंच हे. निगेटीव्ह ब्लड ग्रुप म्हणजे काहीतरी वाईट असतं एवढीच माहिती सर्वसामान्यांना असते. खरं सांगायचं तर वाटतो तितका हा निगेटीव्ह पणा वाईट किंवा धोकादायक नाही. मंगळा इतक्याच ह्याही बाबतीतील श्रद्धा या  अंधश्रद्धाच आहेत.
मुळात निगेटीव्ह हा शब्द नकारात्मक नाहीये. काहीतरी वाईट आहे असा अर्थ अभिप्रेत नाही. निव्वळ एरवी दिसणारी काही प्रथिनं (antigens) ह्या लोकांच्या रेड ब्लड सेल्स वर नसतात एवढंच.
यातला मुख्य तोटा म्हणजे या व्यक्तींना कधी काळी रक्त भरायची गरज पडली तर ब्लडग्रुप रेअर असल्या मुळे रक्त सहजासहजी मिळत नाही. हा तोटा अर्थात स्त्री पुरुष अशा दोघांना लागू आहे. दुसरा तोटा असा की गर्भाचा ब्लडग्रुप जर पॉसिटीव्ह असेल तर आईच्या शरीरात त्या सेल्स विरुद्ध रासायनिक अस्त्र तयार होतात आणि ही त्या गर्भाच्या रेड सेल्स विरुद्ध लढा पुकारतात. त्यात गर्भाच्या रेड सेल्स मरतात, गर्भाला अॅनिमिया होतो , कावीळ होते...!
पण इतकं सगळं असूनही निगेटिव्ह रक्तगट हा लग्नात अडथळा ठरू नये असं मी म्हणतो कारण....
बाळाला होणारा हा आजार तिसऱ्या चौथ्या खेपेस होतो; आजकाल इतकी मुलं कुणी होऊ देत नाही. त्यामुळे ह्या आजाराचं प्रमाण बरंच घटलं आहे.
हा होऊ नये म्हणून प्रभावी लस, अँटी डी चे इंजेक्शन, उपलब्ध आहे. अँटी डी चे हे इंजेक्शन डिलिव्हरी नंतर ७२ तासात द्यायला हवं. हे सगळ्यांना माहीत असतं आणि हे इंजेक्शन आवर्जून दिलंही जातं पण त्या आधीही गरोदरपणातच, सातव्या महिन्यात,  हे घ्यायला हवं. पण बहुतेक वेळा हे विसरलं जातं, डॉक्टरांकडूनच! डिलिव्हरीच नाही तर प्रीटर्म डिलिव्हरी, गर्भपात होणे/करणे, एक्टॉपिक असं काहीही झालं तरी हे इंजेक्शन घेतलंच पाहिजे.
पोटातल्या बाळाच्या आजाराची तीव्रता किती? बाळाच्या अंगात रक्त किती कमी? कावीळ किती? ह्याचं निदान आता गर्भातच होऊ शकतं, अगदी गर्भाला रक्त भरण्यापर्यंत उपचार करता येतात. बाळ जन्माला यायच्या आधीच हे होऊन जातं.
इतकं सगळं करून जन्मतः झालाच बाळाला त्रास तर त्यावरही प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.
थोडक्यात बाकी सगळं जुळत असेल तर निव्वळ निगेटिव्ह ब्लड ग्रुपला घाबरू नये.

लग्नाआधी ब्लडग्रुप बघू नये तर बघावं तरी काय? पारंपारिक पत्रिकेसारखी आधुनिक, वैज्ञानिक पत्रिका नाही का मांडता येणार? येईल... पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

हायमेनोप्लास्टी:- गेलेले हायमेन आणि कौमार्य परत मिळवा!

हायमेनोप्लास्टी

गेलेले हायमेन आणि कौमार्य परत मिळवा!
डॉ.शंतनू अभ्यंकर. फोन ९८२२० १०३४९

हायमेन हा योनीवर पातळ पापुद्र्यासारखा पडदा. हा कौमार्याचं प्रतीक मानला गेलाय. मानला गेलाय असं म्हणायचं कारण म्हणजे प्रत्यक्षात हायमेनवरून कौमार्यपरीक्षा ही अगदीच बेभरवशाची असते. मैदानी खेळ, मर्दानी खेळ (उदाः घोडेस्वारी) वगैरेंमुळेही हायमेन फाटलेलं असू शकतं आणि काही वेळा शरीर संबंध येऊनही ते फाटत नाही. पण पारंपारिक समजूत अगदी उलट आहे.
पुरुषांसाठी नाही का एखादी कौमार्य परीक्षा? आहे की! म्हणजे असू शकते. पुरुषांच्या लिंगावरील एक बारीक त्वचेची तार ही प्रथम संभोगावेळी तुटते. पण हे तर हायमेन पेक्षा कितीतरी  बेभरवशाचं, त्या मुळे ह्याची जास्त चर्चाच होत नाही. शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीला योनीशुचिता मानवते, शिस्न सुचिता बाधते, असा खाक्या.
थोडक्यात एखादी व्यक्ती संभोग-शून्य आहे वा नाही हे खात्रीने सांगता येत नाही! तिचा शब्द आणि तुमचा विश्वास हाच पुरावा.
लग्नानंतर पहिल्या रात्री संभोग केल्यावर योनीमार्गातून रक्तस्त्राव झाला तर ती स्त्री कुमारिका होती असं समजलं जातं. कित्येक समाजात रक्त लागलेलं बेडशीट, कपडे कुटुंबाला सादर करावे लागतात. ह्यात स्त्री कुमारिका होती हे जसं बघायचं असतं तसंच तो पुरुषही नपुंसक नाही, ही ही खात्री करून घ्यायची असते. ना विज्ञान, ना डॉक्टर, ना समुपदेशन; न कळत्या वयात झालेलं लग्न, या सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून समाजानं हे असले मापदंड योजलेले. मुलगा मुलगी दोघंही टीनअेजर असायचे त्या काळी कुटुंबियांचा हा भोचकपणा चाल्लोन जायचा. पण आता दोघही चांगले पंचविशीचे वगैरे असताना ह्या प्रथेला अर्थ उरत नाही. पण त्या प्रथेचं ओझं आपण अजून वागवत आहोत.  
शिक्षणामुळे परिस्थिती  पालटली. लग्न उशिरा उशिरा व्हायला लागली. शारीरिक वाढ झालेली, लैंगिक भूक लागलेली. ही भागवायची समाजमान्य सोय मात्र नाही. लहान वयात लग्न व्हायची तेंव्हा मुलगा/मुलगे वयात येताच लैंगिक शमनाची सोय घरातच उपलब्ध होती. आता तसं नाही. त्यातून मुलामुलींना एकत्र येण्याच्या, रहाण्याच्या अनेक संधी. मैत्रीचं रुपांतर शारीरिक जवळकीत कधी होतं हे कळत सुद्धा नाही. पण हे नातं काही कारणानं लग्नात रुपांतरीत होऊ शकत नाही. मग पहिल्या रात्रीच्या कौमार्यतपासणीचं टेन्शन येतं. तपासलंच उद्या नवऱ्यानी, तर उगीच घोळ नको. म्हणून मग हायमेनोप्लास्टीची मागणी केली जाते.
पण हे असलं काही मेडिकल कॉलेजात शिकवत नाहीत. सीझर, नसबंद्या, क्युरेटींग वगैरे शिकवतात. ज्येष्ठांचा सल्ला घेऊन आणि थोडी कल्पना शक्ती आणि कौशल्य वापरूनच ही शस्त्रक्रिया शिकली  जाते आणि केली जाते.
नुकताच जर कौमार्यभंग झाला असेल तर ही शस्त्रक्रिया सोपी जाते. हायमेनचे उरलेले तुकडे एकमेकाशी पुन्हा शिवले जातात. अगदी बारीsssक कशिदा काम करावं लागतं. जर ही मुलगी शरीर संबंधांना सरावलेली असेल तर योनीमार्गाच्या तोंडाची अंतःत्वचा वापरून जरा कष्टपूर्वक हा पडदा विणला जातो.
एका वैद्यकीय परिषदेमध्ये यावर घमासान चर्चा झडली. “आपण कुमारी नसताना तसं भासवणं हा खोटेपणा आहे.” एक अगदी तरूण फॅशनेबल फिरंगी पेहरावातली मुलगी हे बोलत होती,  “ह्याला डॉक्टरनी मदत करायची म्हणजे एखाद्या गुन्हयाला खतपाणी घातल्या सारखंच आहे. हे अनैतिक आहे. समाजातल्या अनैतिकतेला आपण मदत केल्यासारखं आहे. जे नाही ते आहे असं दाखवण्यासाठी आपण आपलं शल्यकौशल्य का खर्च करावं? केवळ पैसे उकळता येतात म्हणून?”  
यावर काहीजण म्हणाले, ‘विवाहपूर्व संबंध ठेवणं, ते लपवणं हा सर्व त्या स्त्रीचा खासगी मामला आहे, तिच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे, तो तिनी सोडवायचा आहे. आमची भूमिका नीती निरपेक्ष आहे. तीचं वागणं मला पटतं का नाही, नीतीनुसार आहे का नाही, हा मुद्दा नसून तिच्या अडचणीतून तिला सोडवण्यासाठी मी माझं वैद्यकीय ज्ञान वापरतो आहे. हे तर आपण रोजच करतो. यात काही चूक नाही. उद्या एखाद्या मुलीचा लग्नाआधीच गर्भपात करायचा असेल तर तुम्ही तो बिनबोभाट करताच नं? मग हायमेनोप्लास्टीलाच हरकत का?’
“अहो पण ह्यात फसवणूक आहे, त्या सासरच्या कुटुंबाची. ती कुमारी नाहीये. निव्वळ आपल्या शस्त्रक्रियेमुळे ती कुमारी आहे असं भासवलं जाईल. जे नाही ते आहे असं दाखवायला आपण का मदत करायची?” पुन्हा तरुणी. आता आणखी चढ्या सुरात.
यावर वक्त्यांनी दिलेलं उत्तर बेफाट होतं, “ऑपरेशनने तिरळेपणा घालवता येतो, चष्म्याचा नंबर घालवता येतो, मॅमोप्लास्टी मुळे स्तन उभार होतात; याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ह्या सगळ्या सर्जरीज, जे नाही ते आहे असं भासवणाऱ्याच आहेत.” थोडा पॉज घेऊन ते म्हणाले, “इतकंच काय, पावडर, लिपस्टिक, ऊंच टाचेच्या चपला हे सुद्धा सगळं जे नाही ते आहे असं दाखवण्याच्या प्रयत्नाचाच भाग आहे?” यावर मस्कारा, आयशॅडो, रूज आणि पावडर भिजवत,    थरथरत्या लिपस्टिकनी, टॉकटॉक बूट वाजवत  ती बाहेर पडली.