Saturday, 17 June 2023

निमित्त वारीचे

निमित्त वारीचे...
डॉ शंतनु अभ्यंकर वाई 

कळस हलणे हा चमत्कार झाला. ज्ञात विज्ञानाच्या विरुद्ध. ह्याचा शहानिशा सहज शक्य आहे. पण तसं कुणालाच नको आहे. असो. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरं.

 बाकी पालखी, वारी आणि त्यात अनुभवायला येणारे आनंद क्षण, चैतन्य क्षण, मोक्ष क्षण, हे सगळे क्षण विलक्षण, ज्याच्या त्याच्या दृष्टीने खरेच असतात.

माझ्यासारख्या नास्तिकाला देखील उत्तम संगीतात रंगून जाणे, नृत्याच्या तालावर बेभान होणे, निसर्गाच्या अदाकारीने पुलकित होणे, रसाळ काव्याने घायाळ होणे... हे होतच असतं.

वारीतही हे होतं. 

सगळे सण-वार, उत्सव म्हणजे अशा तृप्त क्षणांच्या ठिणग्या फेकणारी धगधगती अग्निकुंडे आहेत.

 अशा क्षणांची सहज सोबत मिळते म्हणून लोकं देव, धर्म, कर्मकांड याकडे आकर्षित होतात. ते मूर्ख नसतात. सतत शोषित वगैरे नसतात. काहीसे ऐषीतच असतात. 

असे क्षण अनुभवायचे तर अशा सोहळ्यामध्ये मनापासून सामील व्हायला हवं. मी होऊ शकतो. अगदी मनापासून. मला जमतं. 

मी या सगळ्याकडे *शोले* बघावा तसं बघतो. म्हणजे असं, की *शोले* बघताना जर का तुम्ही सतत असा विचार करत राहिलात, की ठाकूरचे हात खरंतर त्या कुडत्याच्या आत शाबूत आहेत..., तर मग *शोले* बघणं अवघड आहे! म्हणजे तुम्हाला तो दिसेल पण अनुभवता नाही येणार.

 तसंच वारीचं, कैलास लेण्याचं, गंगा लहरी सारख्या सुंदर काव्यचं आहे. मी त्यातल्या कथा, कल्पना,  देवांची आणि आदीकांची, दैवी आणि दानवी शक्तिंची सगळी भुतावळ, तात्पुरती खरी मानूनच या साऱ्याचा आस्वाद घेतो. काम झालं की सोडून देतो.

असे क्षण विलक्षण माझ्यासारखा नास्तिकांना नापास नाहीत, नापसंतही नाहीत. 

फक्त त्यांचा सुसंगत अर्थ लावण्यासाठी कोणत्याही पारलौकिक तत्त्वाला शरण जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही. 
बस् एवढंच.

डॉ शंतनु अभ्यंकर वाई 

🙏🏻☺️

Saturday, 29 April 2023

ताज्या किशोर चे सुंदर मुखपृष्ठ.

किशोर मुखपृष्ठ: एका रसिकमनाची दाद 

डॉ. शंतनू अभ्यंकर 
मुखपृष्ठ: अन्वर हुसेन

किशोरचा मे २०२३ चा अंक हाती पडला.  मुखपृष्ठ नजरेस पडले आणि मी पाहतच राहिलो.
सायकल चालवणाऱ्या दोन मुली आहेत. अंगात वारं भरलेल्या त्या दोन मुली, सायकलवरून सुसाट सुटलेल्या. सायकलही नवी आहे, तिचा लाल रंग तुकड्या तुकड्यानी चमकतो आहे. सायकलला लावलेली फुलं आणि त्या मुलीच्या दोन पोनिटेल्स पिसाट वाऱ्याने मागे उडताहेत. बस्स, सायकलचा सैराट वेग सांगायला एवढंच पुरेसं. पण मनाचा आवेग? तो कसा  चित्रात पकडणार? त्यासाठी अन्वर हुसेन यांच्यासारखा मनकवडा चित्रकारच हवा.  
एक मुलगी कॅरियरवर बसलेली आणि एक जोरात पॅडल मारणारी. नाही, नाही ‘पायंडल हाणणारी’. अहो, गावाकडच्या आहेत त्या. नाहीतर आजूबाजूला इतकी हिरवाई कुठून असायला? मुली अगदी काटकुळया आहेत. अजून अंगाने भरायच्या आहेत. शाळेतल्याच असाव्यात. म्हणजे अर्थातच आडनिड्या वयातल्या आहेत.  अंगाला जेव्हा सायकल फुटते त्या वयातल्या.  सायकलवरून भन्नाट वेगाने गावभर, शिवारभर हुंदडण्याच्या वयातल्या.  
पहा ना, पहिल्या मुलीची मान वर, पाठ ताठ  आणि नजर आभाळावर खिळलेली. नव्याने प्राप्त झालेला नवथर, किशोर तोरा मिरवणारी. मुग्ध किशोरीची युवाकांक्षीणी होतानाची ही देहशोभा. मोठ्या आत्मविश्वासाने ती सायकल चालवते आहे. दुसरी मुलगी तिच्या मागे अलगद  बसलेली. तिचं भिरभिरतं लक्ष आसपासच्या फुलांकडे आणि स्वच्छंदी  फुलपाखरांकडे. पण यातही फुले कुठली आणि फुलपाखरे कुठली हे कळू नये असे नजाकतीचे, धूसर चित्रण. ही चित्रकाराची कारागिरी. त्या लहानगीलाही हे विश्व  नवीनच. आपल्या मोठ्या मैत्रिणी इतक्याच वेगानं तीही या नवलगरीत निघालेली.  
सायकल तर त्या विश्वात निम्मी बुडलेली. तिची चाके नक्कीच जमिनीवर टेकलेली नसणार. तरंगत असणार ती. त्या मुली आणि सायकलच नाही तर त्यांच्या आसपासचं  सगळं विश्व धूसर झालेले. त्यांच्या आसपास शेतांचे रंगीबेरंगी तुकडे. इतके मऊसूत, तलम आणि गुबगुबीत की त्यांची प्रेमळ गोधडी झालेली. हे तुकडेही एकमेकांत मिळून मिसळून गेलेले. बांधाची, कुंपणाची सीमा केंव्हाच पुसून गेलेली.  या असल्या आकारउकार आणि आऊटलाईन नसलेल्या विश्वात त्या मुली शिरल्या आहेत.  त्या पहिल्या मुलीचा लांब फ्रॉक तर जणू पिसापिसांचा बनलेला आहे.  ती मुलगी जणू परीराणीपदाला पोहोचलेली आहे.
ह्या परीराणीच्या सोबतीने आपणही क्षणात त्या जादुई विश्वात शिरतो. हे सामर्थ्य या चित्रकाराचे.  
चित्रकार अन्वर हुसेन आणि संपादक किरण केंद्रे यांचे अभिनंदन आणि आभार. मी कोणी चित्रकार नाही.  चित्रकलेतला जाणकार नाही पण हे चित्र पाहिल्या पाहिल्या मनावर उमटलेले तरंग मी टिपले, एवढेच.

- डॉ. शंतनू अभ्यंकर 

#किशोरमासिक
#बालभारती

Friday, 21 April 2023

एक शहनशाह ने बनवाके हसीं ताजमहल...

एक शहनशाह ने बनवाके हसीं ताजमहल..... 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
ताजमहाल. शुभ्र संगमरवरातले ते भव्य शिल्प, समोर डोळ्याचे पारणे फेडत असते. ‘इक शहनशाह ने बनवाके हसीं ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है’, हे स्वर मनात रुंजी घालत असतात. मंत्रमुग्ध भावसमाधी आपण अनुभवत असतो. इतके प्रमाणबद्ध, इतके रेखीव, इतके साधे पण स्वर्गीय सौंदर्य समोर निथळत असते. कितीही वेळा अनुभवले तरी मन समाधान पावत नाही अशा कलाकृतीपैकी एक अव्वल कलाकृती ही. 
पण अचानक ही समाधी भंग पावते. सारी शांतता भेदून मनातून कुठून तरी काहीतरी  वर येतं. शांततेवर एक करकरीत ओरखडा उमटतो. मुमताज महल तर आठवतेच पण मग आठवतात मुमताज महल सारख्याच बाळंतपणात मृत्यू पावलेल्या अनेकानेक बायका. मग लक्षात येतं हे मुमताज महलचे स्मारक नाही. ही ‘मोहब्बत की निशानी’ नाही.  हे तर बाळंतपणणात मृत्यू पावलेल्या, माझ्या  आज्जीच्या आजीच्या काकूसारख्या, ज्ञातअज्ञात बायकांचे वृंदावन. माझ्या सारख्या हाडाच्या स्त्रीआरोग्य तज्ञ माणसाला ताज महाल जास्त वेळ सोसत नाही. 
मुमताज महल गेली ती  चौदाव्या बाळंतपणात, बुऱ्हाणपूरला, अडतिसाव्या वर्षी, लग्न झालं होतं एकोणिसाव्या वर्षी. म्हणजे वीस वर्षात चौदा मुलं! चौदाव्या वेळच्या कळा दीड दिवस चालू होत्या म्हणे. शेवटी ती सुटली. मुलगी झाली. ही गौहर आरा बेगम. पण मुमताज महलला रक्तस्त्राव झाला, तो थांबलाच नाही आणि त्यातच ती गेली (१६३१). पुढे २२ वर्षांनी ताजमहाल वगैरे.  
बाळंतपणात होणारा रक्तस्त्राव हे आजही मृत्युचं सर्वात कॉमन कारण आहे. जंतुबाधा (इन्फेक्शन), बाळंतवात (बीपी वाढणे/झटके येणे) आणि असुरक्षित  गर्भपात ही इतर कारणे. 
पैकी इन्फेक्शनची एक कथा माझ्या आज्जीच्या मनात रुतून बसली होती. मी एमडी गायनॅकला प्रवेश घेतला त्याचा आज्जीला कोण आनंद. त्या आनंदाच्या भरात, माझ्या किंचित भ्रमिष्ट आज्जीला, काय काय आठवायला लागलं.  तिच्या आजीच्या काकूची गोष्ट सांगितली तिनी मला. म्हणजे माझ्या खापरपणजीची काकू. ही  काकू घरीच ‘झाली’.  खूप वेळ लागला.  खूप आरडत होती, ओरडत होती; रडत-विव्हळत, कण्हत-कुंथत  होती. बाळाचं डोकं तोंडाशी येऊन थांबलं  होतं. चार सुइणी आणवल्या. बाया जमल्या. हुईना. बापे जमले तरीही हुईना. नेऊन न्यायचे तर दवाखाना पन्नास मैलावर. गावात छकडा एक. त्याचा बैल नेमका बसलेला.  लोकांनी पोट चोळलं. बुक्क्या मारल्या.  लाथा मारल्या.  पोटावरती स्वार होऊन ढकलंल.  पण तरीही आज्जीच्या आजीच्या काकूची काही सुटका होईना.  अखेरीस एका सुइणीने स्वतःचा चुडा फोडला आणि बांगडीच्या काचेच्या धारेने काकूचे अंग कापले. काकू सुटली. पण मुडदा निपजला. कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या मनाने ते मूल, मागच्या अंगणात, वारेसकट पुरून टाकण्यात आलं. गाव पांगला. पुरुष मंडळी आपापल्या कामधंद्याला लागली आणि बायांची पावलं स्वयंपाकघराकडे वळली.  
पण झालेल्या त्रासानं काकू गलीतगात्र झालेली. दुसऱ्या दिवशी तिला किंचित ताप भरला आणि तो थंडीताप रोज वाढत, वाढत, वाढत गेला. कसल्या कसल्या पाल्याची धुरी, कसले कसले लेप, कसलं वाटण, कसलं चाटण असे उपचार सुरू राहिले. उंबऱ्यावरच्या करवंटीतले  गोमूत्र, कडूलिंबाच्या पाल्याने  पायावर शिंपडून, मगच खोलीत प्रवेश सक्त केला गेला. शांतीपाठ, अंगारे धुपारे सुरूच होते.
शेवटी ती तापात बरळायला लागली.  मग चुनाभट्टी लावली गेली. जखमेला  त्याच्या वाफा दिल्या गेल्या. थंडी ताप वाढत गेला. अंगची जखम आता  टरारुन फुगली होती. दिवसेंदिवस ती चिघळतच  गेली.  तीतून बुडबुडे येऊ लागले. तिचा ओंगळ दर्प घरभर पसरला. कोणी जवळ जाणेही अशक्य झाले. बाळंतीण एकटी पडली. त्यात उलट्या आणि हाग-मूत सारे एकाच जागी. तशात एका रात्री पोट हे फुगलं. जखमेतून भराभळा रक्त व्हायला लागलं.  श्वास थांबल्यावरच रक्तस्त्राव थांबला. काकू गेली. 
शेतातच तिच्यावर अग्निसंस्कार केले गेले. काकांनी तिचं वृंदावन बांधलं. पंचक्रोशीतल्या बायबापड्यांनी ते पवित्र ठरवलं. आता तिथे हमरस्ता आहे. ‘काकूचे वृंदावन’ हा आता गजबजलेला बसस्टॉप आहे. समोर मोठा चौक आहे. कोपऱ्यात सरकारी दवाखाना आहे. एक सुसज्ज अॅंम्ब्यूलन्स तिथे सतत सज्ज उभी असते.  
आज्जीचं आणि आज्जीच्या आजीच्या काकूचं, काय मैत्र जुळलं होतं मला माहित नाही.  पण छान मेतकूट असावं. कळत्या-नकळत्या वयात पाहिलेला तो मृत्यू आज्जीच्या मनात कायमचा घर करून बसला असावा. सगळ्याचीच  वानवा, परकोटीची अगतीकता आणि  वैद्य-विदयेच्या अभावी आलेलं हे मरण; अहेवपणी आलं असलं तरी  आजीच्या मनात आयुष्यभर सलत होतं. जाण्यापूर्वी तो सल प्रसूतीतज्ञ व्हायला निघालेल्या नातवाच्या मनात ती जणू आवर्जून रुजवून गेली. ‘क्षणभर श्रावण स्रवला रे; मनातले सल रुजून त्याचा, आता झाला मरवा रे’ असं सांगून मनातल्या सलांचा मरवा होऊ शकतो असं बोरकरांनी सुचवले आहेच. 
एकेकाळी बाळंतपणात मेलेली बाई म्हणजे तिचे ठायी भय आणि भक्ती अशा दोन्ही शक्ती एकवटलेल्या. तिच्या वाट्याला वृंदावन क्वचित. वड किंवा विहीर नित्याचे. अशी बाई हडळ होते आणि वडा-विहीरीशी रहाते म्हणे. हडळ कधी एकदम समोर येत नाही. आधी बांगड्या वाजतात, मग मूल रडल्याचा भास होतो, मग केस जळल्याचा वास येतो; आणि मग ही एखाद्या सुंदरीचे रूप घेऊन येते. पुरुषांना वश करून घेते. देखण्या, भरदार, तरण्याताठया पुरुषाला मोहात पाडते. पुरुषाला मोहात  पाडलं तरच त्यांची शक्ती शाबूत राहते आणि वाढते. नपेक्षा शक्ति गायब! भरपूर सुख देऊन देऊन एकदा का पुरुष पूर्णपणे हीच्या कह्यात आला, की अचानक ती आपलं खरं रूप प्रकट करते. पुरुषाची पूर्ण गोची करते.  आता हाड आणि कातडं झालेलं शरीर, डोळ्यात वेडेपणाची झाक, लांब केस, लाल लुगडं, हिरवा चुडा, मोठ्ठं कुंकू; हा त्यांचा स्टेटसचा फोटो!!  
पुरुष प्रधान संस्कृतीने रचलेल्या ह्या लोककथा; स्त्रीला हडळ जरी बनवली, तरी त्याच्या आड सुप्त पुरुषी इच्छांचे विरेचन कसे वावरते आहे पहा. एकूणच बाईप्रती आदर वगैरे कमीच होता आणि  असतो. पेशंट प्रती आदर, तिच्या भावनांची कदर, तिला काय वाटेल हा विचार, हे जरा कमीच असतं. किंवा नसतंच. कामाचा दबाव असतो हे मान्य, पण अदबीने वागणे हा कामाचाच भाग आहे.  ‘रिस्पेक्टफुल मॅटरनल केअर’, आता आवर्जून शिकवले जाते. याने फरक पडतो. असं वातावरण असेल तर महिलांना आपलेपणा वाटतो, सुरक्षित वाटतं.
असुरक्षित गर्भपात हे मातामृत्यूचे आणखी  एक कारण. गर्भपाताबद्दल भारतीय कायद्यांइतके स्त्रीकेंद्री आणि रुग्णस्नेही कायदे कुठे नसावेत. त्यामुळे असुरक्षित गर्भपात कमी झाले आहेत आणि त्यातून उद्भवणारे मृत्यूही कमी झाले आहेत; पण संपलेले नाहीत.
बाळंतवात (Pregnancy induced hypertension) हा, माता मारणारा आणखी एक महत्वाचा आजार. आपल्या पूर्वजांना हा आजार म्हणून वेगळा ओळखतासुद्धा आला नाही. एकाही भारतीय भाषेत अथवा आयुर्वेदात याला नेमका शब्द नाही. असला ठकडा, दगलबाज आजार आहे हा. मी आपला ‘बाळंतवात’ म्हणतो. यात सूज येते, बीपी वाढते, लघवीवाटे प्रथिनपात होतो; मग वार, किडनी, लिव्हर, सारेच बिघडते. कधी पेशंटला  झटके येतात तर कधी रक्त साकळण्याची क्रिया पार बिघडते. मूल पोसले जात नाही. ते  आधी आतल्याआत हडकते, मग गुदमरते आणि मग मरतेसुद्धा.  कधी कधी सारे एकसाथ बिघडते आणि आईही दगावते.  यावर शेवटचा उपाय एकच. दिवस भरले असोत वा नसोत; प्रसूती! ‘झाल्याने होत आहे रे आधी झालीच पाहिजे’ हा उपचारचा मंत्र. अजूनही आपल्याला ह्या आजाराचे ना कारण माहीत ना त्यावरचे उपाय. म्हणूनच बाई दगावण्यात या ‘बाळंतवाता’चा वाटा मोठा असला तरी सध्या डॉक्टरही काहीसे हतबल आहेत. 
जगातील एक पंचमांश मातामृत्यू भारतात घडतात म्हणे. आपली लोकसंख्या अवाढव्य आहे. त्यात इंडिया आणि भारत असे दोन देश इथे एकत्र नांदत आहेत. त्यामुळे निव्वळ अशा संख्यांना अर्थ कमी. प्रमाण महत्वाचे. दर एक लाख जीवंत जन्माला आलेल्या अर्भकांमागे किती  जन्मदा मृत्यू पावतात हे  लक्षात घ्यायला हवं. 
म्हणूनच सांगतो; गुड न्यूज आहे! 
भारतात माता मृत्यू वेगाने दुर्मिळ होत आहेत. आधीच्या तुलनेत तर भरीव प्रगती आहे. १९९० साली दर लाख प्रसवांपैकी ५५६ बायका मरायच्या! अगदी परवा परवा (२०१४-१६) हा आकडा १३० होता! तेवढी बालके आई विना भिकारी!! आता (२०२०) हा आकडा ९७ पर्यंत उतरलेला आहे. पुढच्या सात वर्षात, २०३० सालापर्यंत, सत्तरच्या आत आणायचाच  असा संकल्प आहे. परदेशांशी तुलना करायची तर, इटली, नॉर्वे पोलंड वगैरेत हे प्रमाण लाखात ५ ते १० एवढे अल्प आहे! लाडक्या अमेरिकेत आणि दोडक्या चीनमध्ये १९ आहे. पण नेपाळ (१८६) बांगलादेश (१७३) आणि पाकिस्तान (१४०) पेक्षा आपण बरेच पुढे आहोत. भले शाब्बास!
ज्या राज्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे नेहमीचीच रड आहे. गरीबी, अज्ञान, निरक्षरता, जात्यंध दृष्टिकोन, अंधश्रद्धा;  डॉक्टर आहेत तर औषधे नाहीत आणि औषधे  आहेत  तर डॉक्टर नाहीत  अशीही परिस्थिती असते. मग उपचार देणे हा प्रधान हेतू न ठरता केस लवकरात लवकर पुढे पाठवणे, वाटेत किंवा वरच्या दवाखान्यात मृत्यू घडला तर त्याची जबाबदारी झटकणे सोपे, अशी वागणूक बळावते. 
पण तरीही हा संकल्प तडीस जाईलच. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधे मुळातच परिस्थिती बिकट होती पण तिथेही हे प्रमाण सातत्याने घसरत आहे. केरळात हे प्रमाण २०२० सालीच  ३०वर आले आहे. म्हणजे २०३० सालचे उद्दिष्ट त्यांनी कितीतरी आधीच ओलांडले आहे. गरोदरपणातील मानसिक आजारांवर आता त्यांनी भर दिला आहे! 
बाळंतपणात बाई दगावते ती निव्वळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने नाही.  तिच्या मरणाला छपन्न हलगर्जीपणे. प्रत्येकच पातळीवरचा हलगर्जीपणा आता कमी झाला आहे. जरा समृद्धी आली, स्त्रियांप्रती जरा सन्मान वाढला, बालविवाह  उतरणीला लागले. वैद्यकीय सेवा सर्वदूर पसरल्या, बायका घरी होण्यापेक्षा वैद्यकीय देखरेखीखाली होऊ लागल्या. रक्तपेढ्या वाढल्या, ‘रक्त द्या’ म्हटल्यावर पळून जाणारे नवरे जावून आता ‘माझे घ्या’ म्हणणारे दहा हात पुढे येतात. मुळात रक्त वाढावे म्हणून उपचार आले, अॅनिमिया (रक्तक्षय) आटोक्यात आला. संततीनियमन समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले, परिणामी बाळंतपणे आधी लांबली आणि मग लवकर थांबली. रक्तस्त्राव थांबवणारी नवीनवी औषधे निघाली; बोळे, टाके, फुगे वगैरे कल्पकतेने वापरुन डॉक्टरांनी रक्तस्राव थांबवण्यासाठी नव्या नव्या युक्त्या शोधल्या. जंतूंशी  सामना करणारी अत्यंत प्रभावी प्रतिजैविके आली.  अॅम्ब्युलंन्स धावू लागल्या, त्या ज्या रस्त्यावर धावणार ते रस्ते सुधारले. मोबाईलसारखी संपर्कसाधने आली, व्हिडिओ कॉलवर सल्ला मसलत नेहमीची झाली. रक्त आणि औषधे ड्रॉनने  पोहोचू लागली.  प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजनेसारख्या योजना आल्या; उपचार, जाणे-येणे, रहाणे-जेवणे सारे विनामूल्य झाले.. आणि सारेच चित्र पालटले. 
आता पुन्हा ताज महाल पाहीन तेंव्हा तिथे मला ‘काकूचे वृंदावन’ दिसणार नाही; ‘मोहब्बत की निशानी’च दिसेल. 


प्रथम प्रसिद्धी
लोकसत्ता
रविवार विशेष
९ एप्रिल २०२३

लोकसत्तेतील शीर्षक 
*आहे, आहे, गुडन्यूज आहे...*

Saturday, 18 February 2023

दुस्तर हा घाट...

 

दुस्तर हा घाट...

डॉ.शंतनु अभ्यंकर, वाई.

 

हा घाट वाई ते पाचगणी. नाव पसरणीचा घाट. तो माझ्या गावच्या वेशीलाच सुरू होतो आणि पाचगणीच्या वेशीशी संपतो. हा अगदी परिचयाचा. तरीही अवज्ञा न झालेला. शेकडो वेळा वर-खाली केलं असेल  मी. डोळे मिटूनसुद्धा मी या घाटातून गाडी चालवीन इतकी ही वाट  माझ्या चाकाखालची. एका ठाय लयीत, एकाच कोनात, डोंगराच्या कडेवरून, मुरकत, गिरकत, लवत, चढत जाणारी ही वळणवाट.

वाट म्हटलं तर रोजचीच. तीच वळणे, तोच रस्ता, तोच कट्टा; मैलाचे तेच दगड आणि मधोमध तोच तुटक पांढरा भस्माचा पट्टा. पण या घाटाने कित्येक साक्षात्कारी क्षण, विलक्षण अनुभूती आणि कायमची स्मृतीलेणी  दिलेली. पायी फिरताना थंड वाऱ्याच्या चवऱ्या ढाळणारा, संथपणे ड्रायव्हिंग करताना कविता सुचवणारा, पावसात निथळताना हिरवेकंच वैभव उधळणारा; मात्र सदैव आपल्याच तंद्रीत चालणारा, हाच तो घाट. 

यातले काही टप्पे, काही खुणा इतकी वर्ष झाली तरी तशाच. घाटाच्या कुशीत शिरतानाची, रस्त्यालगतची, वडा पिंपळाची झाडं. त्यांची खोडं जख्ख म्हातारी. पारंब्यांच्या जटा फुटलेली. पण वडा-पिंपळाला कोवळी पालवी फुटते आणि ते झाड तारुण्याने न्हाऊन निघते. रक्तशामल पालवीतून, चढते उन, डोकावून बघते आणि लाल-गुलाबी, पोपटी-हिरव्या छटांनी ती झाडे माणिक-पाचू मिरवत, मंद वाऱ्यावर  सळसळत, लखलखत रहातात. मोरपिसाऱ्याचे प्रचंड, त्रिमितीत केलेले ब्लो-अप असल्यासारखी दिसतात. पुढे लाललाल फळं आल्यावर तर बहिणाबाईंचे, ‘राघु चोची विसरले’, हे आठवल्याशिवाय पुढे जाणेच अशक्य.      

काही वळणं गेल्यावर पसरणीचा फाटा, मग ‘पहिले वळण’. म्हणजे मोठी अक्कडबाज वेलांटी घेऊन वळणारा रस्ता. वाईकरांचा हा फिरण्याचा एंड पॉइंट. इथे थोडा वेळ बसायचं, चार हातवारे करायचे, त्यालाच व्यायाम म्हणायचं आणि उताराला लागायचं; हा बहुतेकांचा नेम. आणखी चार लाजरीबुजरी  वळसे-वळणं झाली की मग ‘दुसरं वळण’. काही उत्साही वाईकरांचा फिरण्याचा हा एंड पॉईंट. इथेही तसेच. इथे पोहोचून हुश्श करून जरा टेकावं. चांगलं ताठ बसून चार वेळा श्वास घ्यावा, चार वेळा सोडावा. त्यालाच प्राणायाम म्हणावे, जरा डोळे मिटून जग आपल्याकडे पहात नाहीये अशी समजूत करून घ्यावी, त्यालाच समाधी म्हणावे आणि पुन्हा परतीला लागावे.

मग काही वळणं गेल्यावर येतो तो बुवासाहेब. हा या घाटाचा देव. म्हणजे ह्या घाटातल्या गाडीवानांचा देव. दर अमावस्येला त्यांची टेम्पो, टमटमसह गर्दी. गाडीला नारळ, लिंबू-मिरची, हळद-कुंकू, बुवासाहेबाला जंगी पूजा  आणि ‘माल्कानला’ तीर्थ-परसाद. दुसऱ्या दिवशी घाटात कोंबड्यांची पिसं, द्रोण-पत्रावळी आणि काचेचे काही विशिष्ट आकाराचे पोकळ तुकडे!

काही वळणे ओलांडली की, उंच उंच उडणारे सापमार  गरुड दिसायला लागतात. त्या गरुडांशी स्पर्धा करणारे साहस हौशी पॅराग्लायडर्सही, त्या अथांग निळाईत झेपावलेले असतात. त्यांच्या रंगीबेरंगी छत्र्यांचे प्रचंड, टपोर, अर्धफुलोरे त्या काळ्याकरड्या गरुडांना जणू वेडावून दाखवत असतात.  स्टेपी इगल हे रशियन पाहुणेही या पर्यटनस्थळी येतात. टेबललँडच्या कड्याकपारीत त्यांची घरटी आहेत. नेमकी कुठे आहेत ते माझा मित्र सांगायला तयार नाही. हे दिसले म्हणजे ओळखायचं, ‘थापा’ आला. ‘थापा’ हा या घाटातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट.

एक भारदस्त वळण घेऊन इथे रस्ता वळतो आणि पाचगणीच्या  टेबललँडची आकाशरेषा दिसायला लागते.  उतरताना उलटं होतं. गिरकी घेऊन आपण वळण संपवलं की झटक्यात स्लाईड बदलावी तसा, वाईचा प्रदेश दिसू लागतो. गिरगीर गिरक्या घेणाऱ्या कोण्या कथ्थक नृत्यांगनेने समेवर यावं आणि सर्व चरही स्थिर व्हावं तसाच अनुभव हा. एकदा सरत्या श्रावणात याच वळणाच्या, याच समेवर अचानक एक इंद्रधनू माझ्या स्वागताला थांबलं होतं...पाण्यात निथळणारं ते निऑन-वर्खी तोरण मी कितीतरी वेळ निरखत थबकलो होतो. सौंदर्याचे असे अकल्पित दर्शन हा या घाटाचा गुण, विशेषतः या वळणाचा.

रात्री अपरात्री देखील या घाटात बरेचदा प्रवास झालेला. बहुतेकदा काही इमर्जन्सी असते. कोणी बाळंतीण अडलेली असते. दिवसभर थकलेलं शरीर-मन गोळा करून मी पाचगणीला पोहोचतो. त्या चिमुकल्या गावात, सोयी सुविधाही चिमुकल्याच. इमर्जन्सीत तर प्राणांतिक अडचणी. त्यावर प्राणपणाने मात करून, ते पहिले ट्याहां ऐकून, आणखी थकून मी संथ गतीने घाट उतरायला लागतो आणि त्या कथ्थक वळणावर वाईचे खोरे अवचित झगमगताना दिसते. आकाशात नक्षत्रांची रेलचेल असते. अक्षय आकाशगंगा जणू निरव खळाळत असते!! गगन आणि धरा असा भेद मिटून जातो आणि या क्षणासाठी तरी हा प्रवास पुनःपुन्हा घडावा अशी ओढ लागते. 

ह्या वळणावरच्या थाप्याला ‘हॅरीसन फॉली पॉईंट’ असं टुरिस्टी नाव आहे पण आम्हां लोकलांच्या भाषेत, ‘थापा’. घाटाला सोडून अचानक दरीत घुसलेली ही डोंगराची सोंड. शूटिंग, पतंगबाजी, ओलीसुकी पार्टी, कोजागिरी यासाठी ब्येस.

थापा ओलांडून आणखी वर चढलं की येते टुमदार दांडेघर. हे जणू ‘वर’ आणि ‘खाली’ यातील सीमारेषा. इथून पुढे अचानक हवेत थंडावा जाणवतो, इथूनच रिमझिम पावसाच्या सरीवर सरीं होतात, इथेच आसपास गाणारी मैना, छोटे भारद्वाजच जणू अशी, युवराज नामक, (crested bunting) देखणी, डोंगरी पाखरं भेटीला येतात आणि  खाली उतरताना इथूनच पुढे कानाला दडे बसतात. असं काय काय होतं या दांडेघरमध्ये.

मग एक छान वळण लागतं. बायकांना वश करणारे वळण. या वळणावर, निर्मळ जळ झुळझुळा वहाते आहे आणि जवळच झाडीतून डोकावणारे साड्यांच्या दुकानाचे होर्डिंग आहे! खूप मोठे. लक्षवेधी. त्यावरील कर्पुरगौरा बाला आणि त्यांच्या अंगावरील लावण्यसुंदर, अभिरुचीसंपन्न साड्या! बघता क्षणी पसंत पडावी अशी साडी, ‘बघता क्षणी पसंत पडावी’च्या अंगावर असते. उभयतांची दाद एकाच वेळी जाते. पण रस्ता वळलेला असतो. गाडी वेगात असते. वळण वळावेच  लागते. दृश्य अदृश्य होते. हा या घाटाचा अनवट विभ्रम.

थोडं पुढे गेलं रानकेळी आणि रानहळदीच्या गचपणानंतर डावीकडे गुलाबांच्या वेलांची जाळी आहे. पांढऱ्याशुभ्र रानटी गुलाबांचा घमघमाट सुटलेला असतो तिथे. पण पाठोपाठ येतो तो अत्यंत गद्य, मठ्ठ, अरसिक नाका आणि मख्ख चेहऱ्याने येणाऱ्यापुढे हात पसरणारे टोल-भैरव. पण माझी तक्रार नाही. कारण मोठ्या टेचात, ‘लोक्लs ऐss’ असं सांगून गाडी पुढे दामटण्याचे सुख, मला फक्त इथेच.

या नाक्याचा चढ ओलांडला की पाचगणी. इथे स्वर्गलोकीच्या दारी  आल्याचा भास होतो. वर विस्तीर्ण निळे आभाळ, समोर दरी, खोल खाली कृष्णेचा निळानिळा, तुडुंब जलाशय, त्यातून उंच उठलेला कमळगडाचा डोंगर, त्याचे  म्हातारीच्या बोळक्या तोंडाशी नाते सांगणारे कडे, त्याही मागे सह्याद्रीच्या विविधरंगी रांगा, भणाण वारा, खाली शेतांचे रंगीबेरंगी तुकडे, गोधड्या  वाळत घातल्यासारखे. त्यातून वाटा. वाटांच्या संगमावर वाड्यावस्त्यांचे पुंजके. पहाटवेळी सारे धुक्याच्या दुलाईत लपेटलेलं. दिवस वर येतो आणि धुक्याचा पडदा झिरझिरीत होत जातो. अद्भुत असते सारे.

पावसाळा असेल तर इथे वारा, पाऊस, धुके नुसता धिंगाणा घालत असतात. पण इथून सगळ्यात मनोहर दिसतो तो दूरचा पाऊस. पाऊस जवळूनही साजरा आणि दुरूनही. आपण पाचगणीच्या डोंगरावर उभे असतो आणि दूर दरीत कुठेतरी पाऊस रिमझिमत असतो. आकाशातून सूर्याचा स्पॉटलाईट पडलेला असतो. जमिनीचा तेवढाच तुकडा सोनेरी चमकत असतो. शेतातील भाताची हिरवी, पोपटी, सोनेरी, पिवळी आगळी माया नजर तृप्त करत असते. उन्हाच्या कवडशात पावसाचे थेंब हिऱ्यांसारखे चमकत असतात. पण हे अप्राप्य ऐश्वर्य पाहण्यातच मजा असते. हे कुबेराचे धन, ते हातात थोडेच मावणार? ते डोळ्यात आणि चित्तात साठवून घ्यायचे असते.

पण हे पावसाळ्यात. उन्हाळ्यात, ‘वणवे लावू नका’ हा संदेश मनावर न घेतल्याने घाट भुरभूरु जळत असतो. डोंगरललाटीच्या या जिभल्या चाटणाऱ्या ज्वाळा रात्री आपलेच काळीज जाळत जातात. सकाळी पाहावे तो सारा डोंगर काळा ठिक्कर पडलेला. पण  उन्हाळ्यातला घाटातला प्रवास म्हणजे दाहक आणि मोहक दोन्हीही. वाईबाहेर पडतापडता गुलमोहोर, नीलमोहोर आणि बहावे आपापले झुंबरझुबके नाचवत, फुल-सड्याने पायघड्या घालत असतात. घाटात रणरणते उन, कुठे शुष्क पिवळे गवत तर कुठे डोंगरच्या डोंगर वणव्याने कातळकाळे झालेले. पण त्याचवेळी पांगारा आणि पळस लालबुंद फुललेले असतात आणि एखाद्या वळवाने देखील भुईला कोंभ आणि फत्तराला पाझर फुटतो.

उन्हाळ्यात टूरीस्तांच्या गाड्या घाटात घोंगावू लागतात. आम्ही लोकल, तेंव्हा सुट्या आणि लोंग वीकएंडस टाळून आम्ही डोंगर चढणार. पण पूर्वी तर एक पॅटर्नच ठरुन गेला होता. सुट्टीत कोणी ना कोणी  मित्रमंडळी येणार, त्यांच्या आणि आमच्या मुलांचे तत्काळ मेतकूट जमणार, मग ती मुलं या मुलांना बरोबर येण्याचा आग्रह करणार, मग ही मुलं त्यांच्या गाडीत बसून त्यांना पाचगणी-महाबळेश्वर दाखवणार; म्हणजे मुख्यत्वे ‘गेम आर्केड’कुठे आहे, आईस्क्रीम, पिझ्झा, स्ट्रॉबेरी-विथ-क्रीम वगैरे  कुठे खायचं; वगैरे दाखवणार. एकूणच मित्राच्या पैशावर जीवाचं महाबळेश्वर करणार. आमच्या मुलांना कलेक्ट करायला संध्याकाळी आम्ही जाणार आणि मित्राच्याच पैशाने जेऊन रात्री परत. रात्री काहीतरी प्राणीमात्र; कोल्हा, ससा क्वचित बिबट्या असे भेटीला येतात. एकदा तर नुकत्याच कात टाकलेल्या सापानी माझ्या समोरून रस्ता ओलांडला. पाऱ्याची कांती ल्यालेलं  ते जनावर पाऱ्याच्याच वेगाने सळसळत निघून गेलं आणि एक थंड शिरशीरी सर्वांग व्यापून राहिली.

घाटात मनुष्यप्राणीही बरेच भेटतात. टुरिस्टांच्या तरी किती तऱ्हा. रविवारी परतीच्या प्रवाशांच्या गाड्या बेबंद वेगाने घरंगळत उतरतात. यातही एक लक्षात येते. रविवारी सकाळी उठून ब्रेकफास्ट उरकून वेगाने बाहेर पडतात त्या एमएच 1, 2, 3 किंवा 4 नंबरवाल्या गाड्या.  यांना संध्याकाळपर्यंत मुंबई गाठायची  असते. टू डू लिस्ट मधील चार दोन काम साधून सोमवारसाठी सज्ज व्हायचं असतं.  दुपारी चार नंतर मात्र एम एच 12 चा जमाना सुरु. मस्त जेऊन, एक ते चार वामकुक्षी घेऊन, संथपणे चहा वगैरे  पिऊन मग यांच्या स्वाऱ्या निघतात. ऐटबाज गाड्यांतून जाणारी पण खिडकीतून कचरा बाहेर टाकणारी माणसं आता कमी दिसतात. शाळेतच एन्व्हायर्नमेंटचे धडे गिरवलेली पिढी आता चक्रधर झाली आहे. मागच्या आणि पुढच्या पिढीला ती खिडकीतून कचरा बाहेर टाकू देत नाही आणि आता गाड्याही काचबंद असतात म्हणा.

कधी मोठ्या आवाजात गाणी वाजवणारे, टपातून डोकं बाहेर काढणारे लहान; आणि लहान झालेले थोर भेटतात तर कधी भन्नाट आवाजाच्या बुलेट, थरार वेगाने हाणणाऱ्या, लेदरबंद पोशाखातील, हेल्मेटधारी सुपरमेनचा थवा; ‘भावा; इथे आपलीच हवा!!’ असं बजावत सटासट निसटून जातो.  शाळेच्या ट्रिप बरोबर येणारी बससुद्धा शाळेतल्या मुलांसारखी लहान होऊन गेलेली. ही बस रोंरावत नाही तर किलबिलत, भेंड्या खेळत येते. प्रत्येक खिडकीला कुतूहलभरले डोळे फुटलेले असतात. शिवाय कुणालाही बायबाय करणे, वेडावून दाखवणे अशा लाड्या आणि खोड्या सतत चाललेल्या असतात. नकाशातही टिंब न मिळालेल्या, कुठल्या गावाहून आलेल्या ह्या बसमध्ये, बघावं तेव्हा चुणचुणीत पिल्लं हसत खिदळत असतात.

....पण कधी घाटातही हात सोडून सायकल चालवणारी मुलं भुर्रकन जातात आणि मग ते खिन्नतेचं, उदास वळण आठवतं.

एका मित्राचा कोवळा, सायकलवेड्या वयातला मुलगा, भन्नाट वेगाने घाट उतरत आला आणि एका वळणावर आपला आपणच अडखळला, पडला, मेंदूत रक्तस्राव झाला आणि गेला. हे लिहायला लागला तेवढाही वेळ त्याला जायला लागला नसेल. सारेच अकस्मात. त्याचं शरीर अनाघ्रात, पण मेंदू रक्ताच्या थारोळ्यात; असं पोस्ट मॉर्टेममधे दिसलं. असे अपघातही बरेच...एकदा चालत्या एस्टीचं दार उघडलं आणि कुणा फिरणाऱ्याच्या जीवावर बेतलं..., घाटात गाडी दरीत कोसळून इतके जखमी, इतके मृत, त्यांचे अंत्यसंस्कार कृष्णाकाठी घाटावर...., हेही अधून मधून. शेवटी हाही घाट आणि तोही घाट...!  

हा ही दुस्तर आणि तो ही दुस्तर.

तो अटळ.

हा, डोळसपणे ओलांडला तर ‘त्याच्या’कडे बघायची दृष्टी आणि समज देणारा. लचकत मुरडत जाणाऱ्या, घाटातल्या वाटेचा थाट समजावून घेत जायचं ते ह्यासाठीच.

 

 

पूर्वप्रसिद्धी

चतुरंग पुरवणी

लोकसत्ता

  १८ फेब्रुवारी २०२३

 

 

 

 

 

Saturday, 7 January 2023

डार्विन मेल्याचं दुःख नाही पण....!

डार्विन मेल्याचं दु:ख नाही पण ....!
डॉ. शंतनू अभ्यंकर वाई 
(ह्या लेखासाठी जैववैज्ञानिक श्री. असीम चाफळकर, दिल्ली  यांचे विशेष सहाय्य झाले. त्यांचे आभार.)



डॉ. अरुण गद्रे एक संवेदनशील, समाजभान असणारे डॉक्टर आणि लेखक म्हणूनही आपणा सर्वांना परिचित आहेत. ते माझे मित्र आहेत. त्यांचे  ‘उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ हे पुस्तक त्यांनीच मला पाठवले. मी ते वाचले आणि वाचून न वाचल्यासारखे करायचे ठरवले! अनुल्लेखाने आला तरी मृत्यू तो मृत्यूच.
 पण या अवैज्ञानिक, छद्मवैज्ञानिक मांडणी करणाऱ्या पुस्तकाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विज्ञान पुस्तकाचा  पुरस्कार जाहीर झाला आहे. हे चूक आहे. आता बोलणे भागच आहे. 
पुस्तकातील २६० पानी युक्तिवाद इथे खोडण्याचा माझा अट्टाहास नाही. त्याची आवश्यकताही नाही.  इथे फक्त पुस्तक अवैज्ञानिक कसे हे दाखवून दिले की पुरे आहे.
मुळात विज्ञानाबाबतच या पुस्तकात खंडीभर शालेय आणि अक्षम्य चुका आहेत. थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या नियमानुसार उत्क्रांती अशक्य असल्याचे सांगत त्यांनी त्या नियमाचा साफ चुकीचा अर्थ लावला आहे. प्रत्येक अमायनो अॅसिडसाठी तीन ऐवजी चार अक्षरी कोड असल्याचे म्हटले आहे. E=mc2 हे समीकरण, E=MC2 (कॅपीटल एम आणि सी) असं छापलं आहे. मानवी शरीरात  अन्ननलिका पुढे आणि श्वासनलिका त्यामागे असल्याचे म्हटले आहे. असे फक्त मस्तानीच्या मानेत शक्य आहे कारण त्याशिवाय तिने गिळलेले पान नितळ मानेतून दिसणार नाही!  
‘इलेक्ट्रॉन आपण पाहू शकत नाही मग जे आपण पाहू शकत नाही ते विज्ञान कसे?’ असले प्रश्न डॉक्टर विचारतात. मग इलेक्ट्रॉन हे एक मॉडेल आहे हे त्याचे उत्तर स्वतःच देतात. मग म्हणतात  की हे मॉडेल तर काल्पनिक आहे. म्हणजेच विज्ञान कल्पनाशक्तीवर अवलंबून असते! आपण समजतो तसं प्रयोगातून निर्माण होत नाही. लिखाणाचा रोख असा की हे सगळं तकलादू आहे. बुद्धीभेद म्हणतात तो हाच. विज्ञान म्हणजे निव्वळ कल्पनेचे पतंग नाही. जी काय कल्पना करून मॉडेल रचलेले असते त्याची वारंवार परीक्षा आणि प्रचिती घेतलेली असते आणि म्हणूनच ते मान्य केलेले असते.
पुढे विज्ञानाचे वर्णन उपरोध, उपहास आणि शुल्लकीकरण करणाऱ्या भाषेत आहे.  ‘चला म्हणजे विज्ञान कुठेतरी कमी पडतं तर!’, ‘जमिनीपासून चार अंगुळे वर चालणारा धर्मराजाच्या विज्ञानाचा रथ जमिनीवर आला म्हणायचा.’ अशी वाक्यरचना येते. विज्ञान अहंकारी, आढ्यताखोर असल्याची हेटाळणीखोर, विज्ञानाचे सैतानीकरण करणारी   भाषा पुस्तकात वारंवार वाचायला मिळते. डार्विनने, पेन, कान्ट, ह्यूम या तत्त्वज्ञांच्या सुरात सूर मिसळून देवाविरुद्ध मांडणी केली, म्हणून तो स्वीकारला गेला, असं म्हणत डॉ. गद्रे डार्विन पक्ष हा सैतानाचा पक्ष आहे, असं हळूच सुचवतात. एकूणच भाषा आणि मांडणी ही शास्त्रीय नाही. एखाद्या धर्मप्रसारक प्रवचनकारासारखी आहे. लेखकाला ह्याची जाणीव आहे. ‘उत्क्रांती विज्ञान वास्तवात फ्रॉड ठरल्यानंतरही उत्क्रांतीचे पुरावे पाठ्यपुस्तकातून काढले जात नाहीत! तेंव्हा मला वाटू लागलेल्या सात्विक संतापाचं रुपांतर माझ्या उपरोधिक शैलीत झालं.’; असं स्पष्टीकरण खुद्द लेखकाने पुस्तकातच दिले आहे. 
अर्थातच सैतानी विज्ञानाशी फारकत घेत, एकेका प्रकरणागणिक, डॉक्टर तर्कहीनतेच्या चढत्या पातळ्या गाठतात. विज्ञान अर्धवट आहे, माझी तेरी थिअरीही  अर्धवट आहे, म्हणून ती विज्ञान आहे! जे जुने ते फेकून देते ते विज्ञान, मी डार्विनला फेकून देतो सबब मी म्हणतो ते विज्ञान! जुन्या काळी सेमेन्वेलीस या शास्त्रज्ञाला विरोध झाला, पण नंतर त्याचेच खरे ठरले; तद्वतच आज मला विरोध होतो आहे म्हणून माझे म्हणणे बरोबर आहे! असं अजब तर्कशास्त्र डॉक्टर इथे मांडतात. 
सजीवांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनातूनच (जनुकीय बदल) सजीवांच्या शरीरात बदल घडतात. यातील प्राप्त परिस्थितीत तगून रहाण्यास सहाय्यभूत ठरतील असे बदल असलेले सजीव तगतात, त्यांच्या पिढ्या फोफावतात. बाकीचे काळाच्या उदरात लुप्त होतात. थोडक्यात सगळा खेळ उत्परिवर्तनावर आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. अशा जनुकीय रचना इतक्या नेमक्या, सुंदर, सुचारू, सुबक आणि सुभग की आहेत असं वाटावं, की ह्या रचना नक्कीच कोणी तरी जाणीवपूर्वक घडल्या आहेत; कोणा बुद्धिमान रचयीत्याने अभिकल्पिलेल्या (Designed by an Intelligent Designer) आहेत. विज्ञान सांगतं हा तर फक्त आभास, अशा रचना आपोआप निर्माण होणे शक्य आहे. 
पण जगणे सुलभ करणारे, सोयीचे उत्परिवर्तन आपोआप होण्यासाठी लागणारा काळ हा पृथ्वीच्याही वयापेक्षा जास्त आहे असे डॉ.गद्र्यांचे गणित आहे. तेंव्हा हा अनाकलनीय वेगाने उद्भवलेला बुद्धिमान अभिकल्प, म्हणजे कोणीतरी  अभिकल्पक असल्याचा, म्हणजेच ‘निर्मिक’ असल्याचा पुरावा आहे असं ते म्हणतात. ‘निर्मिक’ हा शब्द त्यांनी म. जोतीबा फुल्यांकडून घेतला, असंही आवर्जून नमूद आहे.   
डॉ.गद्र्यांचे गणित बरोबर असले तरी निष्कर्ष गलत आहे. एक उदाहरण घेऊ. दरवेळी सरासरी  एक दशकोटी  १०^८ (एकावर आठ शून्य) पुंबीजापैकी एकाचा संयोग होऊन मानवाला मूल होते. प्रत्येक पुंबीज अनन्य जनुके बाळगून असते. तेंव्हा तुम्हाला तुमचीच जनुके मिळाली याची शक्यता एका दशकोटीत एक एवढी झाली. ही जनुके तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळाली, आणि त्यांना तुमच्या आजोबांकडून... ! अर्थातच नेमकी तुमचीच जनुके तुम्हाला संक्रमित होण्याची शक्यता, दर पिढीत एका दशकोटीत एक, अशा घटकाने दुर्मिळ होत जाईल. असे मागे मागे गेल्यास दहाव्या पिढीत तर तुमची जनुके तुम्हाला प्राप्त होण्याची संख्याशास्त्रीय शक्यता जवळपास शून्य आहे असे गणिती उत्तर येईल. पण तुम्ही तर आहात! हे वाचता आहात! आणि तुमची अनन्य जनुकेही आहेत. थोडक्यात तुमचा आत्ता आहे तो संच जुळून येण्याची शक्यता शून्यवत असली तरी कोणता तरी संच जुळून येणारच. तुम्ही आहात म्हणजे यायलाच हवा, नव्हे आलाच आहे!  रमी खेळताना तेरा पाने मिळणार हे फिक्स, कोणती ते नॉट फिक्स्ड.
रहाता राहिला प्रश्न विशिष्ठ जनुकीय क्रमाचा. (पानांचा नेमका संच) मुळात विपुल असलेल्या सजीवांत उत्परिवर्तने प्रचंड प्रमाणात घडतात. उत्परिवर्तने जरी यादृच्छीक असली तरी त्यातली परिस्थितीला अनुरूप असणारीच पुढच्या पिढीत संक्रमित होतात. कालांतराने, सोयीचे क्रम आबादीत आबाद (Become dominant in the population) होतात, गैरसोयीच्या क्रमांचे तण अपोआपच लुप्त होते. येणेप्रमाणे पिढीगणिक अधिकाधिक नेमक्या, सुंदर, सुचारू, सुबक आणि सुभग रचना साकारू लागतात. आपल्याला मात्र भासत राहतं, वाटत रहातं, अरे कोणी जाणूनबुजून, डोकं लढवून, घडवल्याशिवाय असली कारागिरी शक्य नाही. 
डार्विनचा पहिल्या पेशीच्या अगमनाबाबताचा तर्क इथे टवाळी करण्यासाठी वापरला आहे. पण याबाबतची आपली समज आता फार पुढे गेलेली आहे. नुकत्याच जन्मलेल्या पृथ्वीवर जैविक महारेणूंचे (प्रथिने, न्यूक्लीक आम्ले, कर्बोदके इ.) मुलभूत घटक (अमिनो आम्ले, न्यूक्लीओटाइड, सिम्पल शुगर, सिम्पल लिपीड) संपूर्णपणे नैसर्गिकरित्या कसे तयार झाले असतील हे आज आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे.  हे एकमेकांची जोडले जाऊन लडी कशा बनवू शकतात हेही दाखवले गेले आहे. पण यातील गुंतागुंत आणि  कित्येक रिकाम्या जागा पहाता या मागे कोणी बुद्धिमान अभिकल्पक आहे, निर्मिक आहे, असे डॉ. गद्र्यांचे म्हणणे. 
जो उत्क्रांती सिद्धांत अंधश्रद्धा ठरवायचा आहे, त्याबद्दलच्या   ढोबळ चुकांनी हे पुस्तक भरलेले आहे.  ‘माकडापासून माणूस तयार झाला’,  ‘माणूस चिंपांजीपासून निर्माण झाला’ (आपण माकडाचे वंशज नाही, पण आपले पूर्वज समान आहेत), ‘उत्क्रांतीतून प्रगत जीव निर्माण होतात’ (प्रगत नव्हे तर अनुकूलता साधलेले);  अशी उत्क्रांतीबद्दल प्राथमिक समजही नसल्याचे दर्शवणारी अनेक विधाने पुस्तकात आहेत.  एके ठिकाणी ते ‘अमिबाचे जीवाश्म सापडतात’ असं म्हणतात. अमिबा हा आज अस्तित्वात असलेला एकपेशीय प्राणी आहे.  तो अब्ज वर्षापूर्वी नव्हता. त्यांना एकपेशीय स्ट्रोमलोलाईट्स  (Stromatolites) म्हणायचे असावे. 
डॉ. गद्रे सलग फॉसिल रेकॉर्ड कुठाय असा खडा सवाल करतात. वास्तविक ही अपेक्षाच अवास्तव आहे. फॉसिल रेकॉर्ड म्हणजे काही विमानाची ब्लॅकबॉक्स नाही, की जी सलग आणि सततची माहिती पुरवेल? फॉसिल हे तर अपघाताने  राहिलेले पुरावे. ते विलग आहेत ही त्रुटी नाही. त्यामध्ये विसंगती दाखवता आली, उदाः खडक अश्मयुगीन पण फॉसिल अर्वाचीन प्राण्याचा, तर ती त्रुटी म्हणता येईल.  पण अशी एकही केस आजवर अढळलेली नाही. आणि अर्थातच उत्क्रांतीच्या पुराव्यातील त्रुटी म्हणजे काही निर्मिकाच्या अस्तित्वाचा पुरावा नाही. ‘अ’ हा सिद्धांत आज काही स्पष्टीकरणे देत नसेल तर उद्या ‘आ’ हा सिद्धांत देईल, किंवा ‘ई’ देईल. ‘अ’ नाहीतर ‘निर्मिक’ असे दोनच पर्याय का? 
बॅक्टेरियल फ्लॅजेलाची (बॅक्टेरियाचे शेपूट) रेण्वीय स्तरावरची  गुंतागुंतीची रचना उत्क्रांत होऊच शकत नाही. कारण यातील सारे सुटे भाग आणि कार्ये एक समयावच्छेदेकरून कार्यान्वित व्हावी लागतात. उत्क्रांतीची कार्यप्रणाली हा गुंता निर्णायकरीत्या  सोडवू शकत नाही,  सबब ही निर्मिकाचीच करामत! हा त्याच्याच अस्तित्वाचा पुरावा! अशी आग्रही, भावूक मांडणी डॉक्टर करतात. ती उपासनेला जमलेल्या श्रद्धाळू माना दोलायमान करून जाईलही. पण सत्य हेच की थोडेसे गुगलले की फ्लेजेला, रक्त साकळण्याची क्रीया, डोळा, वगैरे सगळे कसे उत्क्रांत झाले हे आज आपण समजावून घेऊ शकतो.   
 शिवाय रेण्वीय स्तरावरील गोष्टींबद्दल आपण अज्ञानी आहोत; हे ज्ञान तरी डॉ. गद्र्यांना कसे झाले? आजवरच्या शास्त्रीय संशोधनाचा हा परिपाक नाही का? मेंडेल, वॅटसन-क्रीक, रदरफोर्ड, आईनस्टाईन आदी मंडळी अज्ञाताचाच तर शोध घेत होती. त्यांनी जर हे अज्ञान निर्मिकाच्या गळ्यात मारलं असतं, तर डॉ.गद्रे आणि आपण सारेच, आज आहोत त्याच्या कित्येक योजने मागे नसतो काय?  पण जे जे अज्ञात ते ते  निर्मिकाच्या  बुद्धिमान अभिकल्पाचा पुरावा असं  ठोकून द्यायचं त्यांनी ठरवलेले दिसते.  सजीवांत जीव कुठून आला असा मुलभूत प्रश्न डॉक्टर विचारतात आणि निर्मिक हे उत्तर ठोकून देतात. कॉपर टी बसवल्याने मुले  का होत नाहीत? ह्याचे उत्तर ते निर्मिक असे निश्चितच देणार नाहीत! कारण त्याचे निश्चित उत्तर त्यांना माहित आहे. 
एकदा निर्मिक मैदानात उतरवला की अनेक प्रश्नांचा धुरळा उडतो. इतकी गुंतागुंतीची रचना करणारा निर्मिक त्याहूनही गुंतागुंतीचा असायला हवा आणि मग त्या निर्मिकाची निर्मिती कोणी केली? निर्मिकाच्या हद्दीतील गूढे अतिनैसर्गिक. म्हणजे मानवी आकलनाच्या पार आणि ती सदा तशीच रहाणार. सबब तसा प्रयत्न कारणे म्हणजे पापच; हेही मग ओघाने येते. 
निर्मिकाच्या अस्तित्वाचे इथे सुचवलेले पुरावे, ही वैज्ञानिक मांडणी नाही. या संदर्भातले संशोधन आणि त्याचे पुरावे मान्यताप्राप्त वैज्ञानिक नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले नाहीत. यावर, यामागे मोठे कट कारस्थान आहे, मुळात हे मान्यताप्राप्त वैज्ञानिक नियतकालिकातून प्रसिद्ध होऊ दिलेले नाहीत; असा युक्तिवाद केला जातो. या व्यापक कारस्थानाचे आम्ही बळी अशी हाकाटी पिटली जाते. तेच तेच पराभूत युक्तिवाद वारंवार पुढे केले जातात. ते नाकारणाऱ्यांवर हेत्वारोप केले जातात.  
मध्येच एके ठिकाणी डॉ. गद्रे ‘खऱ्या अर्थाने निर्मिकापुढे नतमस्तक होणे’ हे या पुस्तकाचे प्रयोजन असल्याचे सांगतात. ‘निर्मिकाप्रती कृतज्ञ व्हा.’ वगैरे आज्ञार्थी वाक्येही येतात.  ‘जेंव्हा एखादी गोष्ट चमत्काराकडे जाते तेंव्हा ते  विज्ञान उरत नाही एक श्रद्धा म्हणून उरते.’ हेही येते आणि हे उघडपणे प्रचारी पुस्तक असल्याचे स्पष्ट होते. विज्ञानाच्या भाषेत इथे निर्मिकाच्या धर्माचाच प्रचार दिसतो. हे तर छद्मविज्ञान. 
या निर्मिकाबद्दल मात्र डॉक्टर तो त्यांचा शाळेतला सौंगडी असल्यासारखे ठाम दावे करतात. हा अनादी, अनंत, स्वयंभू, अगम्य, निर्गुण असून शिवाय म. फुल्यांचा आहे! निर्मिकाच्या या विश्वात माणसाला मात्र विशेष स्थान आहे.  निर्मिकाने माणसाला मर्यादित प्रमाणात कृती स्वातंत्र्य दिले आहे. तो या विश्वाबाहेर आहे तेंव्हा कुणाही माणसांत निर्मिक नसतो. अहं ब्रह्मास्मी, चराचरात विश्वंभर वगैरे भारतीय संकल्पनांतील हा नव्हे. मग हा कुठला बरं असावा? डॉक्टर सांगतात, ‘माणूस हा निर्मिकाची प्रतिकृती आहे.’ मग बायबलच्या  जेनेसिसमधली ओळ आठवते ‘So God created man in his own image’, आणि लक्षात येतं की हा तर येशू ख्रिस्त आहे! फुले पगडी घातलेला येशू ख्रिस्त!!
पण एकदा ‘निर्मिकाला’ फुले पगडी घातली, की कित्येक आपोआपच मूक होतील ही डॉक्टरांची  अटकळ खरी ठरलेली दिसते. सत्यपालसिंह वगैरे अनेक मंत्र्यांच्या अशास्त्रीय विधानांची उत्साही चिरफाड करणारे मातबर, या येशूच्या कोकराबद्दल गप्प आहेत. का ‘फक्त हिंदूंवर टीका करतो तो पुरोगामी’, ह्या व्याख्येतही तथ्य आहे म्हणायचं?  कदाचित भाजपचे माजी खासदार मा. प्रदीपदादा रावत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने पंचाईत झाली असावी. पण डॉ. गद्रे भाग्यवान की ते ख्रिस्ती आहेत. त्यांचे आडनाव सुचवते त्या धर्माचे जर ते असते, तर जात्यंधांनी त्यांची जात काढून त्यांना पळता भुई थोडी केली असती. 
डॉ. गद्र्यांचे अमेरिकन भाईबंध हे बुद्धिमान अभिकल्पवाले ‘पर्यायी विज्ञान’ जीवशास्त्रात शिकवा अशी मागणी करत आहेत. सुदैवाने आपल्याकडचं वातावरण वेगळं आहे. विज्ञानाप्रती एक प्रकारचा आदर आहे. त्यामुळेच की काय, असल्या अमेरिकन मागण्या भारतीयांना हास्यास्पद वाटतात. हे खूळ जर इथे पसरले तर व्हाट्सअप विद्यापीठातील, ‘दशावतार म्हणजेच उत्क्रांती’ हा  प्रसिद्ध सिद्धांतही शिकवा, अशीही मागणी होऊ शकते. शिवाय कुराणातही जीवोत्पत्तीचा काहीतरी सिद्धांत असेलच. मग तोही शिकवा! असे सगळेच सोकावतील. 
उत्क्रांतीचा सिद्धांत हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. गुरुत्वाकर्षण, अणुरचना, पुंजकीय विज्ञानाइतक्याच ठाम पायावर तो उभा आहे. उद्या हा सिद्धांत बाद करणारा नवा सिद्धांत आलाच तर त्याने आजवर जे ठाऊक आहे त्याचा उलगडा देऊन शिवाय  आज असलेली काही कोडी तरी लीलया सोडवली पाहिजेत. बुद्धिमान अभिकल्प या परीक्षेस उतरत नाही. निर्मिक तर तपासताही येत नाही. जे तपासता येत नाही आणि त्यामुळे नापासता येत नाही (Falsifiability, कार्ल पॉपर) ते विज्ञान कसे म्हणवता येईल? उत्क्रांती सिद्धांताचे तसे नाही. तो उद्या नापासही ठरेल. पुरेसा, सबळ, पर्यायी पुरावा मिळाला की ठरेलच. ठरला तर ठरो बापडा. विज्ञानरीत हीच आहे. पण अज्ञानाच्या क्रूसवेदीवर निर्मिकाची प्राणप्रतिष्ठा करणे आणि अशा पुस्तकाला विज्ञानाचा म. फुल्यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे साक्षात विज्ञानाला क्रुसावर चढवण्यासारखे आहे. ही विज्ञानरीत  निश्चितच नाही. तेंव्हा पुरस्कार गैर आहे. ते काय करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये. देवा (असलास तर) त्यांना क्षमा कर. 
लोकहो, सावधान, डार्विन मेल्याचं दुखः नाही पण गद्रे सोकावतील. 
 
पूर्व प्रसिद्धी
लोकसत्ता
रविवार लोकरंग पुरवणी
दि. ८.१.२३

Tuesday, 27 December 2022

सर्व पॅथी समभावाचा अविष्कार

सर्व-पॅथी-समभावाचा आविष्कार 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

डॉक्टरांची कमतरता आणि भारतीयांची तोळामासा तबियत, अशा दोन्ही बिमारींवर शर्तीली दवा म्हणून आधुनिक आणि ‘आयुष’ अशी एकत्रित, जहाल मात्रा योजायचे सरकारने ठरवले आहे. नव्या धोरणानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात वगैरे, आधुनिक अधिक ‘आयुष’ अशी संयुक्त उपचार केंद्रे असणार आहेत. पण या बेरजेच्या औषध-कारणाने रुग्णहीत साधणार आहे का?  
इथे पॅथीपॅथीचे डॉक्टर एकाच रुग्णावर संगनमताने उपचार करतील! ह्या असल्या प्रकाराचा काही पूर्वानुभव आहे का? दोन पॅथी उपचाराने दुप्पट फायदा होतो का? असे अभ्यास झाले आहेत का? त्यातून काय साध्य झाले? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. असं केल्यामुळे दोन्हीकडील उत्तम तेवढे आपल्या पदरात पडेल; आपोआपच आपण सुवर्णमध्याला पोहोचू, अशी भावना आहे. पण दरवेळी सुवर्ण हे मध्यावरच असेल असं नाही. ते एका टोकालाही असू शकतं. 
यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. 
‘आयुष’ या निव्वळ पारंपरिक पद्धती नव्हेत, निव्वळ पूरकही नव्हेत तर पर्यायी उपचार पद्धती आहेत. ‘आयुष’वाल्यांचा असा पक्का दावा आहे. पर्यायी पद्धती म्हणजे नुसत्या वेगळ्या नावाची औषध देणाऱ्या पद्धती नव्हेत तर संपूर्ण शरीररचना, कार्य, आजारांची उत्पत्ती, स्थिती आणि लय, उपचार, त्यांचा प्रभाव आणि त्यांची परिणीती याबाबत त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे. निव्वळ कल्प किंवा साबूदाण्यासारख्या गोळ्या किंवा शरबत-ए-आजम म्हणजे ‘आयुष’ नाही. प्रत्येक ‘आयुष’ पद्धती म्हणजे जगण्याकडे बघण्याचा एक सर्वांगीण, परिपूर्ण, दैवी विचार आहे. तेंव्हा त्यांच्या क्षमतांबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मग आता त्यांची सांगड आधुनिक वैद्यकीशी का बरं घालायची आहे? असा असंगाशी संग केल्याने हे सारे तेज निष्प्रभ वगैरे होणार नाही का? खरंतर अशा संगतीने स्व-सामर्थ्याचा गंड कुरवाळला जाईल, एवढेच. अर्थात, कुणी सांगावे, नाठाळ अलॉपॅथीला वठणीवर आणायचा अंतस्थ हेतु असू शकेल.  
पण अलॉपॅथीला दूषणे देतच यातील बहुतेकांचा व्यावसायिक डोलारा उभा आहे. अलॉपॅथीमुळे जगणे नरकासमान झाले असल्याचे सांगणाऱ्या जाहिरातीही एका औषधकंपनीनी दिल्या होत्या. कंपनीचे जाऊ द्या, अलॉपॅथीशी सलगी करणाऱ्या होमिओ डॉक्टरास ‘कुलुंगी कुत्रा’ (Mongreal) म्हणावे अशी अधिकृत शिफारस आहे. होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमातील मूळ ग्रंथात आहे. मग आता संयुक्त दवाखान्यात कोणी, कुणाला, काय म्हणावे बरे? 
शिवाय ‘आयुष’मध्येच भेदाभेद आहेत. ‘आयुष’ म्हणजे आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी; अशी, आधुनिक वैद्यकी वगळता ‘इतर सर्वांची’ वळलेली मोळी आहे. मायजम्स, व्हायटल फोर्स, डायनामायझेशन वगैरे होमिओपॅथीची खासियत आहे; अल् अनसीर, अल् अखलात, अल् मिजाज वगैरे सप्तघटक युनानीची मिरास आहे; दोष, प्राण, धातू वगैरे आयुर्वेदाच्या संहितांत सांगितले आहे. पण या संकल्पनांच्या व्याख्या आणि व्याप्ती अस्पष्ट आहे. एका पॅथीचा मेळ दुसरीशी नाही. एवढेच नाही तर, काहींना जंतूशास्त्र अमान्य आहे, काहींना पुनर्जन्म मान्य आहे, काहींना प्राचीनत्व हाच पुरेसा पुरावा वाटतो तर काहींच्या प्रवर्तकाला साक्षात देवाचा मान आहे. हे सगळं खरं का खोटं?, रास्त का गैर?, वैज्ञानिक का छद्मवैज्ञानिक?; हे मुद्देच नाहीत. जे आहे ते जनतेच्या तंदुरुस्तीसाठी दुरुस्त आहे, हे गृहीत आहे. 
या विभिन्न दृष्टीकोनांचा मेळ अलॉपॅथीशी कसा घालणार? कोणत्याही बड्या इस्पितळात अनेक डॉक्टर एकाच पेशंटची तपासणी करतात. पण हे सारे त्या देहाच्या चलनवलनाबाबत समान समजूत बाळगून असतात. त्यांच्या चिकित्सेमध्ये अर्थातच एक सुसूत्रता असते. त्याचं काय? उदा: कविळीकडे पहाण्याचा प्रत्येक पॅथीचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. युनानी पद्धतीनुसार कावीळ खिलत-ए-सफरा किंवा सौदाच्या प्रादुर्भावाने होते तर आधुनिक वैद्यकीनुसार रक्त-दोष, लिव्हर-दोष अशी कारणे असू शकतात. संयुक्त-क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णाच्या तपासण्या कोण, का आणि कोणत्या प्रकारच्या करणार? दोन तज्ञांचे मतभेद झाले तर काय? यात पेशंटच्या मताला किंमत किती? कोणाचे औषध द्यायचे हे कसे ठरवणार? 
शेवटी कोणतं औषध घ्यायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या व्यक्ती-स्वातंत्र्यात आम्ही ढवळाढवळ केलेली नाही. आम्ही पर्याय उपलब्ध करून देतो आहोत, असा युक्तिवाद सरकार करू शकेल. 
पण आम्ही ‘आयुष’-ज्ञान मंडित असलो तरी येनकेन प्रकारेन आम्हाला आधुनिक औषधे वापरण्याची मुभा द्यावी अशी ‘आयुष’ संघटनांची उरफाटी पण रितसर मागणी आहे. विद्यमान सरकारने ही मागणी मान्य करण्याचा चंग बांधला आहे. याला प्रामाण्य पुरवण्यासाठी की काय, आता ‘आयुष’ अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्त्र आणि एमबीबीएस अभ्यासक्रमात ‘आयुष’ घुसवले गेले आहे. नीम हकीम तयार करणाऱ्या या निर्णयापाठोपाठ ही संयुक्त दवाखाने काढण्याची मखलाशी करण्यात येत आहे. सर्व-पॅथी-समभावाचा हा लोकशाही आविष्कार आहे. 
बॉलीवूड मसालापटात प्रत्येक धर्माचं एकेक पात्र असावं, तसं हे आहे. तितकेच बेगडी, तितकेच दिखाऊ आणि तितकेच प्रभावहीन.    

प्रथम प्रसिद्धी
दैनिक लोकमत
28 डिसेंबर 2022

Saturday, 17 December 2022

असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठे?

असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
‘बोल रे बोल! तू नास्तिक आहेस का?’, असा प्रश्न विचारत जेंव्हा जल्पकांच्या झुंडी एखाद्या राजकीय नेत्याच्या मागे लागतात तेंव्हा आम्हां नास्तिकांना चार्वाकापासूनचे पूर्वज आठवतात. ‘होय, आहे मी नास्तिक.’ असं म्हणण्याची सोय, चार्वाक, जैन आणि बुद्ध परंपरा सांगणाऱ्या आपल्या देशात ओसरत चालली आहे. राजकारण धुरंधरांना आणि समाजधुरीणांना ती तशी नव्हतीच. पण सामान्यांची तरी राहावी, म्हणून की काय, आज पुण्यात ब्राइट्सतर्फे नास्तिक मेळावा होत आहे. या निमित्त ‘आम्हाला समजावून घ्या’ एवढेच नास्तिकांचे मागणे आहे.
आस्तिक-नास्तिक हा वाद सनातन आहे. ‘विज्ञान आणि अध्यात्म हे आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत’, असं कंठरवाने सांगणारा, आणि श्रोत्यांतील दोन्ही पक्षांच्या टाळ्या घेणारा, एक वर्ग असतो. ह्यांचा उत्साह लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाच्या वरताण असतो. धर्म आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे खरंच. पण त्या समान महत्त्वाच्या, समान आवाक्याच्या, समतुल्य वकुबाने सृष्टीचा अर्थ लावणाऱ्या आहेत, असे कावेबाज गृहीतक यामागे आहे. उभय पक्षांनी आपापली क्षेत्रे राखावीत असं ठरलं तरी प्रत्यक्षात धर्मशास्त्र, आपली मर्यादा सोडून, सतत सृष्टीची रीती (पाप वाढल्याने कोव्हिड आला), नीती (गरोदरपणी ग्रहण पाळावे )वगैरेबाबत चोंबडेपणा करत असते.
धर्मक्षेत्राने कुरुक्षेत्रावर आक्रमण केल्याची तर कितीतरी उदाहरणे आहेत. धर्म प्रसारासाठी तलवार हाती धरा, खुशाल नरसंहार करा, असे मुळी कनवाळू देवाचे स्पष्ट आदेशच आहेत. ते आदेश शिरसावंद्य मानणारेही आहेत. नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरु असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही. ‘होताय नास्तिक का उपटू डोळे?, काढू नखे? आणि करू तुमची खांडोळी?’ अशा आविर्भावात कोण्या नास्तिकाने मतप्रसार केल्याची इतिहासात नोंद नाही. पोलपॉट, स्टॅलिन वगैरें नास्तिकांनी अत्याचार केले, पण त्यामागे नास्तिकत्वाचा प्रचार हे कारण नव्हते. तेंव्हा हिंसेच्या एका महत्वाच्या सार्वत्रिक, सर्वव्यापी प्रेरणेपासून नास्तिक दूर आहेत. तरीही नास्तिक नापसंत आहेत.
नास्तिक मंडळी एकूणच जगापासून दूर आणि जगण्यापासून फटकून वागणारी, रागीट, भावनाशून्य, कोरडी वगैरे असतात अशी जनभावना आहे. वास्तविक इतर जनतेत जे स्वभावदोष आढळतात तेच कमीअधिक प्रमाणात नास्तिकांत आढळतात. खरंतर आसपासच्या बहुसंख्य, आग्रही आस्तिक समाजात, नास्तिकांची कुचंबणाच होत असते. घरगुती अथवा सार्वजनिक धार्मिक कार्यात त्यांना बरेचदा मन मारून सामील व्हावे लागते. पण लक्षात कोण घेतो.
नास्तिक आढयतेखोर आणि उर्मट असतात असाही अपसमज दिसतो. बहुतेकदा भांडण हे धर्माला काही कळतं का नाही यावर होतं. धर्माचे राहू द्या. शाळेत दोन मुलींत भूगोलाबद्दल भांडण आहे असं समजा. आता मला सांगा, ज्ञानाच्या या शाखेत, ‘मला सर्व सत्य समजले आहे, सर्व ज्ञान झाले आहे’ असं म्हणणारी उद्दाम; का ‘मला सर्व समजलेले नाही’ असं म्हणणारी? अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यन्त अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे? विज्ञान असं मानतं की अंतिम सत्य अशी काही भानगड नसते. आसपासच्या सृष्टीचे सत्यतर ज्ञान करून घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे विज्ञान. हयात अहंकार कुठे आला. हा तर विनम्रभाव आहे. नास्तिक उर्मट वाटतात कारण ते लोकांच्या श्रद्धा निर्वेधपणे स्वीकारत नाहीत. अर्थातच नि:शंक मनाने जिथे लीनमात्र व्हायचे अशा श्रद्धास्थानाबद्दल थोडीशी शंका देखील ज्वालाग्राही ठरते. पण कालच्या कित्येक श्रद्धा या आजच्या अंधश्रद्धा आहेत आणि ही जाणीव ही सतत शंका आणि प्रश्न विचारण्याचा परिपाक आहे.
नास्तिक अरसिक, भावनाशून्य आणि कोरडे असतात असाही एक समज आहे. हा तर सगळ्यात हास्यास्पद गैरसमज. आज रोजी महाराष्ट्रातले सर्वात प्रसिद्ध नास्तिक म्हणजे पु. ल. देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू. आता यांच्या रासिकतेची आणि सर्जनशीलतेची तरफदारी करणारा मी कोण? काव्य-शास्त्र-विनोदाचा आस्वाद घेण्यात नास्तिक अजिबात कमी पडत नाहीत. ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात’, यातील सखीचे हात हाडामासांचेच आहेत, पण ते चांदण्याचे भासतात आणि विकता विकता त्यांनी बाजारात विकायला आणलेला सूर्य, तो ‘तो’ नव्हे हे नास्तिकांनाही कळतं. मोहक आणि दाहक असे भाव त्यांनाही जाणवतात. शेवटी शब्दार्थ किंवा लक्ष्यार्थ, कधी लक्षात घ्यायचा याचंही (भाषा)शास्त्र असतंय ते! तेवढं नास्तिकांना कळतं.
नास्तिकांना नितीमूल्यांची चाड नसते असाही एक गोड गैरसमज आहे. नास्तिकता दुराचार शिकवत नाही. नास्तिकता हाच दुराचार अशी बहुतेक धर्मात मांडणी असते ती गोष्ट वेगळी. तशी ती परधर्म हा दुराचार अशीही असते. पण नास्तिकांची नीतीमूल्ये सदसद्विवेकातून आणि कायद्यातून येतात. आस्तिक नाव धर्मग्रंथाचे घेतात पण त्यातील सोयीचा तेवढाच भाग आत्मसात करतात. बारकाईने विचार केला तर असं लक्षात येईल की तंतोतंत आपापल्या धर्मग्रंथानुसार जगणे कोणालाच शक्य नाही आणि त्यातील ग्राह्य तत्वे उमगण्यासाठी आणि आचरण्यासाठी धर्मग्रंथांची आवश्यकता नाही. विद्यमान नीतीमूल्ये थेट धर्मग्रंथातून आलेली नसतात. धर्मग्रंथ जणू एक प्रचंड शोरूम आहे आणि कालमान-समाज-प्रकृतीनुसार सारे समाज त्यातून हवे ते वेचून घेत असतात.
नास्तिकांना जगणे निरर्थक, हेतूशून्य वाटत असते अशीही आस्तिक भावना आहे. या विश्वाचा ना कोणी निर्माता आहे ना त्राता. सभोवतीचा हा सारा खेळ कोण्या विशिष्ठ हेतूने आहे असंही नाही. नास्तिकांची अशी रोखठोक भूमिका असते; हे खरं. पण ‘को हम्?’ ‘या असण्याचा हेतु काय?’ असे सुंदर प्रश्न मानवी मनाला पडतातच. ‘हीच्यहाइकर्स गाईड टु द गॅलॅक्सी’ मधे दोन आंतर-आकाशगंगीय तत्वज्ञ, ‘डीप थॉट’ नावाच्या महासंगणकापुढे काही प्रश्न ठेवतात.
‘मी कोण? माझ्या आयुष्याचा हेतु काय? मी उदया उठून कामाला नाही गेलो तर या ब्रह्मांडात काय असा फरक पडणार आहे?’
साडे सात मिलियन वर्ष विचार करून ‘डीप थॉट’ आज उत्तर देणार असतो. त्या दोघांचे वंशज श्वास रोखून उत्तर ऐकायला सज्ज असतात.. आणि शांत धीरगंभीर आवाजात उत्तर येतं,
‘बेचाळीस!’
‘बेचाळीस? हे काय उत्तर आहे?’
‘बे-चा-ळी-स!!!’
‘साडे सात कोटी वर्षांनी उत्तर काय दिलं, तर म्हणे बेचाळीस! बेचाळीस म्हणजे काय समजायचे आम्ही?’
‘मला असं वाटतं,’ महासंगणक शांतपणे उत्तरला, ‘मुळात प्रश्न काय आहे हेच तुम्हाला समजलेले नाहीये. एकदा प्रश्न नीट समजला की उत्तरही समजेल. पण उत्तर बरोब्बर आहे, बेचाळीस!!’
गोष्टीचा मथितार्थ एवढाच की या प्रश्नाकडे आपल्याला दोन दृष्टीने बघता येते. एकतर असल्या प्रश्नांचीच निरर्थक म्हणून वासलात लावून टाकायची. मग बेचाळीस हे उत्तरही तितकेच निरर्थक, आणि म्हणून बरोब्बर म्हणता येईल!
पण हा ‘को हम्?’चा अनाहत नाद असा पाठलाग सोडणारा नाही. म्हणूनच हे जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी आपले आपणच काही करणे भाग आहे हे नास्तिकांना पटलेले असते. सृष्टीला वा जीवनाला देवाने लपवलेला काही गूढ अर्थ आहे, असं नाही. आपण देऊ तोच आयुष्याचा अर्थ आणि रंग. तगणे आणि प्रसवणे ह्या प्राथमिक जैविक प्रेरणा तर आहेतच पण जगणे कृतार्थ करणाऱ्या इतरही कितीयेक प्रेरणा आहेत. नास्तिक अशा प्रेरणांचा शोध सतत, स्वयंस्फूर्तीने, आणि स्वयंप्रज्ञेने घेत असतात. मुळात या सृष्टीचे काही नियम का आहेत? निर्जीव रसायनांतून सजीव, जाणता जीव कसा निर्माण होतो? ह्या अथांग सृष्टीचा वाटणारा विस्मय आणि असा विस्मय आपल्याला वाटतो ह्याचा विस्मय; ही काही उदाहरणे मात्र. या साऱ्याची संगती लावताना नास्तिक देवाला जमेस धरत नाहीत. अज्ञाताचा आणि गूढाचा आनंदसंग आणि चिकित्सा त्यांना मान्य आहे; पण अज्ञाताची आणि गूढाची उपासना त्यांना अमान्य आहे.
धर्मांच्या मते सृष्टी ही नैसर्गिक आणि अतिनैसर्गिक अशी विभागली गेलेली आहे. आसपासची सृष्टी बिनमहत्वाची/माया असून पारलौकिक जग हेच अंतिम सत्य आहे आणि लौकिक तसेच पारलौकिक जगाचे ज्ञान होण्याचा मार्ग म्हणजे धर्मग्रंथ. आश्चर्य म्हणजे प्रत्येक धर्माचे ज्ञान भिन्न भिन्न आहे. अंतिम सत्यही भिन्न आहे, पापपुण्याच्या कल्पना, स्वर्ग-नरकातील शिक्षा आणि सुखेही भिन्न भिन्न आहेत. एकाचा मेळ दुसऱ्याशी नाही. वर हे सर्व देवानेच लिहून ठेवले आहे म्हणे. जर फुटकळ थापाच ऐकून घ्यायच्या असतील तर मग जगातल्या प्रत्येक सूक्ष्मकणावर एक एक परीराणी बसली आहे आणि ती त्या सूक्ष्मकणाची हालचाल नियंत्रित करते आहे आणि इतर सर्व परीराण्यांशी तिचा सातत्यपूर्ण संपर्क चालू आहे आणि या सगळ्या परीराण्या एकमेकींशी संवाद साधत या सृष्टीची रचना आणि तोल सांभाळत आहेत; असं गृहीत धरल्याने तरी काय फरक पडतो? धर्म आणि धर्मग्रंथ आपल्याला असल्या भाकडकथांवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवतात.
याउलट नास्तिक विचाराचे अनेक फायदे आहेत.
ही सृष्टी देवाने निर्माण केली आहे या भ्रमात राहण्यापेक्षा, सृष्टीची उत्पत्ती-स्थिती-लय आदी विभ्रम समजावून घेण्यासाठी डोकं वापरण्याची आच निर्माण होते.
एकदा तनाने पंचतत्वात विलीन झाल्यावर आपण मनाने आत्म्याने वगैरे शिल्लक राहत नाही अशी खात्री असल्यामुळे पुढच्या जन्माची तयारी किंवा मागच्या जन्मीचे उतराई असला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे पुण्यसंचय आणि पापक्षय याचीही क्षिति नाही. बराच वेळ, पैसा, दगदग आणि तगमग आपोआपच वाचते.
आयुष्याचं जे काय बरंवाईट करायचंय, जे निर्णय घ्यायचे, त्याला नास्तिक मंडळी स्वतःला जबाबदार समजतात. आयुष्याच्या सारीपटावर मनाजोगे दान पडावे अशी नास्तिकांचीही इच्छा असतेच की. परिस्थिती आणि अनेकानेक ज्ञातअज्ञात, परिहार्य आणि अपरिहार्य घटक त्यांच्याही जीवनावर प्रभाव टाकतच असतात. पण त्यासाठी कोणत्याही परातत्वाची प्रार्थना करायला ते उद्युक्त होत नाहीत. देवाला, देवस्थानाला वा प्रतिनिधींना; दान देत; जणू लाच, अडत, हुंडी, वचनचिठ्ठी, तारण, दलाली, गहाणखत असले व्यवहार करत देवावर हवाला ठेवून नास्तिक स्वतःचे नुकसान करून घेत नाहीत.
खरंतर आपला देव वगळता जगातल्या इतर देवांवर आपली श्रद्धा नसतेच. म्हणजे अल्लाच्या बाबतीत हिंदू माणूस नास्तिक असतो आणि इन्का लोकांच्या देवाचा भारतातल्या सिरियन ख्रिश्चनांस पत्ता नसतो. इन्कांच्या देवाला तरी यांचा पत्ता आहे का ते त्यालाच ठाऊक! ‘इतर सर्व देवांवर आपण का बरं विश्वास ठेवत नाही?’ असा विचार केला, की संस्कार, संस्कृती, सामाजिक दबाव असे घटक लक्षात येऊ लागतात. धर्म आणि धर्मग्रंथातील वैय्यर्थ जाणवायला लागते. सार्वजनिक धर्मपालनाच्या कर्णकटू कोलहलाबद्दल उदासी दाटून येते. आपल्या देवावर आपण का विश्वास ठेवावा, असा प्रश्न पडू लागतो. नास्तिकतेकडे प्रस्थान ठेवले जाते.
पण एकवेळ देव आणि धर्म नाकारता येईल, पण संस्कृती? ती कशी नाकारणार? आणि का नाकारावी? रिचर्ड डॉकिन्ससारखे काही, आपण ‘ख्रिश्चन नास्तिक’ असल्याचे सांगतात. समाजधारणा, सामाजिक अभिसरण, संस्कृती, भाषा, रूढी-परंपरा अशा साऱ्यावर धर्माचा गोड काळीमा झाकोळलेला असतो. मानवी संस्कृतीच्या जळात पाय सोडून बसलेला हा असला देवा-धर्माचा औदुंबर; त्याच्या पानाफांद्यातून खाली ऊनसावली जाळी विणत असते. त्यातील धर्माची कृष्ण छाया वगळून विवेकाचे, बुद्धीप्रामाण्याचे आलोकपान म्हणजे नास्तिक्य.
तेंव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठे? बरी असतात ही मंडळी.
डॉ शंतनु अभ्यंकर वाई
E-mail
shantanusabhyankar@hotmail.com
Please note the s between my name and family name 

प्रथम प्रसिद्धी
लोकसत्ता
लोकरंग पुरवणी
१८.१२.२०२२