निमित्त वारीचे...
डॉ शंतनु अभ्यंकर वाई
कळस हलणे हा चमत्कार झाला. ज्ञात विज्ञानाच्या विरुद्ध. ह्याचा शहानिशा सहज शक्य आहे. पण तसं कुणालाच नको आहे. असो. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरं.
बाकी पालखी, वारी आणि त्यात अनुभवायला येणारे आनंद क्षण, चैतन्य क्षण, मोक्ष क्षण, हे सगळे क्षण विलक्षण, ज्याच्या त्याच्या दृष्टीने खरेच असतात.
माझ्यासारख्या नास्तिकाला देखील उत्तम संगीतात रंगून जाणे, नृत्याच्या तालावर बेभान होणे, निसर्गाच्या अदाकारीने पुलकित होणे, रसाळ काव्याने घायाळ होणे... हे होतच असतं.
वारीतही हे होतं.
सगळे सण-वार, उत्सव म्हणजे अशा तृप्त क्षणांच्या ठिणग्या फेकणारी धगधगती अग्निकुंडे आहेत.
अशा क्षणांची सहज सोबत मिळते म्हणून लोकं देव, धर्म, कर्मकांड याकडे आकर्षित होतात. ते मूर्ख नसतात. सतत शोषित वगैरे नसतात. काहीसे ऐषीतच असतात.
असे क्षण अनुभवायचे तर अशा सोहळ्यामध्ये मनापासून सामील व्हायला हवं. मी होऊ शकतो. अगदी मनापासून. मला जमतं.
मी या सगळ्याकडे *शोले* बघावा तसं बघतो. म्हणजे असं, की *शोले* बघताना जर का तुम्ही सतत असा विचार करत राहिलात, की ठाकूरचे हात खरंतर त्या कुडत्याच्या आत शाबूत आहेत..., तर मग *शोले* बघणं अवघड आहे! म्हणजे तुम्हाला तो दिसेल पण अनुभवता नाही येणार.
तसंच वारीचं, कैलास लेण्याचं, गंगा लहरी सारख्या सुंदर काव्यचं आहे. मी त्यातल्या कथा, कल्पना, देवांची आणि आदीकांची, दैवी आणि दानवी शक्तिंची सगळी भुतावळ, तात्पुरती खरी मानूनच या साऱ्याचा आस्वाद घेतो. काम झालं की सोडून देतो.
असे क्षण विलक्षण माझ्यासारखा नास्तिकांना नापास नाहीत, नापसंतही नाहीत.
फक्त त्यांचा सुसंगत अर्थ लावण्यासाठी कोणत्याही पारलौकिक तत्त्वाला शरण जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही.
बस् एवढंच.
डॉ शंतनु अभ्यंकर वाई
🙏🏻☺️
No comments:
Post a Comment