किशोर मुखपृष्ठ: एका रसिकमनाची दाद
डॉ. शंतनू अभ्यंकर
मुखपृष्ठ: अन्वर हुसेन
किशोरचा मे २०२३ चा अंक हाती पडला. मुखपृष्ठ नजरेस पडले आणि मी पाहतच राहिलो.
सायकल चालवणाऱ्या दोन मुली आहेत. अंगात वारं भरलेल्या त्या दोन मुली, सायकलवरून सुसाट सुटलेल्या. सायकलही नवी आहे, तिचा लाल रंग तुकड्या तुकड्यानी चमकतो आहे. सायकलला लावलेली फुलं आणि त्या मुलीच्या दोन पोनिटेल्स पिसाट वाऱ्याने मागे उडताहेत. बस्स, सायकलचा सैराट वेग सांगायला एवढंच पुरेसं. पण मनाचा आवेग? तो कसा चित्रात पकडणार? त्यासाठी अन्वर हुसेन यांच्यासारखा मनकवडा चित्रकारच हवा.
एक मुलगी कॅरियरवर बसलेली आणि एक जोरात पॅडल मारणारी. नाही, नाही ‘पायंडल हाणणारी’. अहो, गावाकडच्या आहेत त्या. नाहीतर आजूबाजूला इतकी हिरवाई कुठून असायला? मुली अगदी काटकुळया आहेत. अजून अंगाने भरायच्या आहेत. शाळेतल्याच असाव्यात. म्हणजे अर्थातच आडनिड्या वयातल्या आहेत. अंगाला जेव्हा सायकल फुटते त्या वयातल्या. सायकलवरून भन्नाट वेगाने गावभर, शिवारभर हुंदडण्याच्या वयातल्या.
पहा ना, पहिल्या मुलीची मान वर, पाठ ताठ आणि नजर आभाळावर खिळलेली. नव्याने प्राप्त झालेला नवथर, किशोर तोरा मिरवणारी. मुग्ध किशोरीची युवाकांक्षीणी होतानाची ही देहशोभा. मोठ्या आत्मविश्वासाने ती सायकल चालवते आहे. दुसरी मुलगी तिच्या मागे अलगद बसलेली. तिचं भिरभिरतं लक्ष आसपासच्या फुलांकडे आणि स्वच्छंदी फुलपाखरांकडे. पण यातही फुले कुठली आणि फुलपाखरे कुठली हे कळू नये असे नजाकतीचे, धूसर चित्रण. ही चित्रकाराची कारागिरी. त्या लहानगीलाही हे विश्व नवीनच. आपल्या मोठ्या मैत्रिणी इतक्याच वेगानं तीही या नवलगरीत निघालेली.
सायकल तर त्या विश्वात निम्मी बुडलेली. तिची चाके नक्कीच जमिनीवर टेकलेली नसणार. तरंगत असणार ती. त्या मुली आणि सायकलच नाही तर त्यांच्या आसपासचं सगळं विश्व धूसर झालेले. त्यांच्या आसपास शेतांचे रंगीबेरंगी तुकडे. इतके मऊसूत, तलम आणि गुबगुबीत की त्यांची प्रेमळ गोधडी झालेली. हे तुकडेही एकमेकांत मिळून मिसळून गेलेले. बांधाची, कुंपणाची सीमा केंव्हाच पुसून गेलेली. या असल्या आकारउकार आणि आऊटलाईन नसलेल्या विश्वात त्या मुली शिरल्या आहेत. त्या पहिल्या मुलीचा लांब फ्रॉक तर जणू पिसापिसांचा बनलेला आहे. ती मुलगी जणू परीराणीपदाला पोहोचलेली आहे.
ह्या परीराणीच्या सोबतीने आपणही क्षणात त्या जादुई विश्वात शिरतो. हे सामर्थ्य या चित्रकाराचे.
चित्रकार अन्वर हुसेन आणि संपादक किरण केंद्रे यांचे अभिनंदन आणि आभार. मी कोणी चित्रकार नाही. चित्रकलेतला जाणकार नाही पण हे चित्र पाहिल्या पाहिल्या मनावर उमटलेले तरंग मी टिपले, एवढेच.
- डॉ. शंतनू अभ्यंकर
#किशोरमासिक
खूप छान आणि मार्मिक रसग्रहण 👍👍
ReplyDeleteखूप छान रसग्रहण. अगदी पटले मनाला.
ReplyDelete