लेखांक ९ वा
एल निनो माहात्म्य
आपल्याला हा एल निनो मॉन्सूनपुरताच माहीत असला तरी जागतिक हवामानावर
निरतिशय प्रभाव टाकणारा हा महत्वाचा घटक
आहे. हवामानातील तीव्र बदलामुळे खाणे-पिणे-रहाणे-जगणे यावर तीव्र परिणाम होतात. या
बाबतीत असंतोष पसरला की हे नियंत्रित करणाऱ्या संस्था अप्रिय ठरतात. थोडक्यात
राज्यकर्त्यांचं कर्तेपण धोक्यात येतं. जगभरातील अनेक राजकीय उलथापालथींना एल निनोची पार्श्वभूमी आहे.
चीनला अतीशय पुरातन परंपरा लाभली आहे आणि आज या देशाला आलेल्या उभरत्या, नवथर महत्वामुळे
त्याच्या इतिहासाबद्दल आता जगभर संशोधन आणि
चिंतन (खरंतर ‘चीनतन्’) सुरू आहे. अनेक नवीन पैलू आता लक्षात येऊ लागले आहेत. चीनच्या बखरींमध्ये गेल्या ३००० वर्षांचा
इतिहास आहे. ज्या ज्या वेळी एखाद्या घराण्याचा अस्त होऊन नव्या राज्यकर्त्यांचा
उदय झाला आहे तेंव्हा तेंव्हा हवामानातील उलथापालथही दिसून येते. गेल्या ११ शतकांत
पाच वेळा साम्राज्य धुळीस मिळवली गेली आणि या पाच पैकी चार वेळा ह्या बदलाला पूर, दुष्काळ, साथी, उपासमार या साऱ्याची स्पष्ट
पार्श्वभूमी आहेच आहे. इसवी सन पूर्व शांग (इसपू११००), झोहू (इसपू ४५०) आणि हान (इसपू
२२०) घराण्यांचा घास घ्यायला हवामानही जबाबदार होतेच. हे पूर्वीचे संदर्भ असोत वा
अलीकडील टँग (इस९०७), मिंग (इस १६४४) वगैरे घराण्यांचा अस्त असो, एल निनोमुळे
अशक्त झालेला उन्हाळी मॉन्सून हा एक समान धागा आढळतो.
हा एल निनो १७८० ते १७९० च्या दशकात विशेष भरात होता. अठराव्या
शतकातील शेवटच्या दोन दशकांत तर बरंच काही घडले. आईसलँड आणि जपानमध्ये मोठे
ज्वालामुखी भडकले (१७८३). त्या झाकोळाने तिथली पीकं गेली. मेक्सिको, द. आफ्रिका,
कॅरिबियन बेटे आणि द. आशियात ठिकठिकाणी दुष्काळ पडले. वातावरण बदलामुळे डासांचे क्षेत्र वाढले. अमेरिकेच्या तत्कालीन
राजधानीत, फिलाडेल्फियात एडिस इजिप्ती (हे
डासाचे नाव आहे) पिवळा ताप घेऊन, घोंघावत येऊन पोहोचले(१७९३). १७००० केसेस झाल्या,
त्यातली १/३ लोकं मेली. लिव्हर बाद होऊन अंग पिवळं पडून, किडनी बाद होऊन, रक्त ओकत
माणसं मेली. फिलाडेल्फिया खरंतर बऱ्याच उत्तरेला, कर्कवृत्ताच्याही वर, डासांच्या
राज्याबाहेर. पण कॅरिबियन बेटांशी व्यापारी संपर्क होताच. तिथे डास आणि पिवळा ताप
दोन्ही होते. त्याच सुमारास हैती बेटांवरील गुलामांनी बंड
केले आणि तेथील शासक फ्रेंच,
आता निर्वासित होऊन फिलाडेल्फियाला आले.
आले तेही डास आणि पिवळा ताप घेऊनच आले.
शेवटी एकदाचा नोव्हेंबर उजाडला, थंडीचा
कडाका सुरू झाला, डास मेले आणि फिलाडेल्फियावासी सुटले. अमेरिकेतल्या या
नंतरच्याही नऊ पैकी सात साथी एल निनोचं
बोट धरून आल्या-गेल्या हे विशेष.
एकूणच समृद्ध राष्ट्रातून आता भूकबळी ऐवजी संसर्गजन्य आजार अधिक
बळी घेत होते. आता इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेन सारखी राष्ट्र दुष्काळापासून आपला
बचाव करू शकत होती. व्यापार वाढला होता, सामाजिक सुरक्षितता अधिक मजबूत होती,
दुरून अन्न आयात होण्याची शक्यता होती, वसाहतींतून समृद्धी बरसत होती. वाढत्या
बकाल शहरांतून आता साथी पसरत होत्या. उपासमार, कदान्न, कुपोषण वगैरेंऐवजी
डिसेंट्री, फ्ल्यू, गोवर, देवी, टायफस ह्या मारेकऱ्यांना आता बरकत आली. अठराव्या
शतकातील युरोपात दर चार मृत्यूमागे एक बळी टीबीच्या खात्यावर जमा होता.
अठरावे सरून पृथ्वीला इसवी सनाचे
एकोणीसावे शतक लागले तोवर लघु हिमयुग आटोपले होते. पण त्याच सुमारास
इंडोनेशियातील सुंबावा बेटावरील, टंबोरा ज्वालामुखी धडाडला. सुमारे १५ चौ.की.मी.
एवढा ऐवज त्यांनी आकाशात ४० कीमी उंच फेकला. ह्या झाकोळाचा परिणामही युरोप, आग्नेय
अमेरिका आणि कॅनेडाच्या किनारपट्टीवरही दिसला. यामुळे १८१६ साली युरोपात उन्हाळा
आलाच नाही. आपल्याला जसा मॉन्सून आवश्यक आणि प्रिय तसा युरोपला समर. असा समर-प्रसंग
आल्याशिवाय जीवनचक्र चालू रहाणे कठीण. ह्या दरम्यान इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम
वगैरेत अन्न टंचाईमुळे लूटमार, चोरीमारी, दंगेधोपे सर्रास होत असत. साथीला टायफस
आणि रीलॅप्सींग फिवरच्या साथी होत्याच. युरोपप्रमाणेच सहाराच्या दक्षिणेतील
देशांतही दुष्काळ पडले. एक फायदा मात्र झाला. त्सेत्से माशांमुळे पसरणारा स्लिपींग
सिकनेस आता आपोआपच आटोक्यात आला.
एकुणात एल निनो आणि त्याचे महात्म्य अगाध आहे.
प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
हवामान अवधान
३१.०५.२०२४