Wednesday, 29 November 2023

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची भाषा

 

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची भाषा

 

लेखक डॉ. शंतनु अभ्यंकर

 

 

डॉ. नरेन्द्र दाभोलकर  यांची मुख्य ओळख लेखक म्हणून नाही तर ‘अंनिस’चे संस्थापक, संवर्धक म्हणून आहे. या साऱ्या प्रवासात पक्की होत गेलेली वैचारिक बैठक, ‘अंनिस’ चळवळीतले जमिनीवरचे अनुभव आणि नंतर  ‘साधना’चे संपादक म्हणून त्यांनी विविध विषयांवर लिहिलं आहे. त्यांनी ललित लेखन जरी केलं नसलं तरी असं वैचारिक लेखन मात्र भरपूर आहे आणि ते लालित्यपूर्ण आहे. 

 

 

साधना हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचसाप्ताहिक.  ते खरंतर एक मतपत्र आहे.  एका विशिष्ट विचाराला वाहिलेल्या मंडळींनी चालवलेलं ते साप्ताहिक आहे. त्याला थोर परंपरा आहे.  सुरुवात 15 ऑगस्ट 1948 रोजी पूज्य साने गुरुजींनी केली आणि ना. ग. गोरे, वसंत बापट, ग.प्र.  प्रधान अशांसारखे अनेक दिग्गज या साप्ताहिकाला संपादक म्हणून लाभले.  त्यांच्याच परंपरेत डॉक्टरांनी याच संपादकपद, 1 मे 98 पासून त्यांच्या दुर्दैवी हत्येपर्यंत भूषवलं.  

 

एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला सदैव सावध असावं लागतं.  साप्ताहिकांत्या सप्ताहात घडणाऱ्या घटनांवर टिपण्णी असावी लागते पण त्याचबरोबर वर्तमानपत्राच्या संपादकासारखी पुढच्या 24 तासांची भ्रांत त्याच्यापुढे नसते.  किंचित उसंत असते.  त्यामुळे साप्ताहिकांमधून येणारा मजकूर आधीक ऐसपैस आणि सखोल विचार करून लिहिलेला असतो. ही उसंत, ही फुरसत डॉक्टरांनी पुरेपूर वापरलेली दिसते. साधनातील लिखाण त्यांच्या चौफेर जाणिवांच दर्शन घडवतं.

 

साधनाचं संपादकत्व स्वीकारण्यापूर्वी डॉक्टर दहा वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीच काम महाराष्ट्रभर पसरवण्यात आणि उभकरण्यात व्यग्र होते.  यातून झालेल्या जनदर्शनाचा, सामाजिक कृतज्ञता निधी, वगैरे उपक्रमातून जोडलेल्या माणसांचा, असा सारा अनुभव डॉक्टरांच्या लेखणीतून झिरपत होता. विषयांचं नुसतं वैविध्य बघितलं तर याची आपल्याला थोडीफार कल्पना येते. त्यांनी प्रासंगिक लिखाण केलआहे, राजकीय आणि  सामाजिक चळवळीं बद्दल लिहिलं आहे,  धर्म, जातवास्तव यावर लिहिले आहे, अंधश्रद्धा, पर्यावरण अशा अनेक विषयांवर लिहीलं आहे.  

 

मतपत्रांमध्ये वैचारिक एकारलेपण असतं पण हे टाळण्याचा डॉक्टरांनी कसोशीने प्रयत्न केला आहे.  ‘दलपतसिंग येती गावा’या नाटकावर 1 मे चा अंक आणि ‘मला प्रभावित करणार सिनेमा’ या विषयावर 15 ऑगस्ट चा अंक काढण्याचे धाडस आणि धडाडी त्यांच्या अंग होती. नियतकालिकाचे नेतृत्व कालसुसंगत असावे लागते. ते तर त्यांनी केलेच पण  बदल आणि भिन्न प्रवृत्तींना खुले दार ठेवतानाच, आपला प्रवाह गढूळणार नाही याची दक्षता घेत डॉक्टर लिहीत राहिलेले दिसतात.

 

 

 डॉक्टरांचे भाषण जसे श्रोत्यांना विचारप्रवृत्त आणि कृती-प्रवण करणारे असायचे तसेच त्यांचे लेखनही होते. गोष्टी रंगवून सांगणार किंवा चकित करणार माहिती देणारं असं हे लिखाण नाही. हे त्यांना जमलं नसतं असं नाही पण ते त्यांनी टाळलं.  म्हणजे त्यांचे लिखाण केवळ उपदेशपर आणि रटाळ होतं असं नाही. त्यांच्यातला धडाडीचा खेळाडू आणि रसिक साहित्यिक  हा त्यांच्या लिखाणातून वेळोवेळी डोकावूअसतो.  शीर्षकांसाठी समर्पक काव्यपंक्ती, लिखाणात  खटकेबाज संवाद, सवाल आणि त्यांना हजर जवाब, चिमटे आणि प्रहार, उपहास आणि उपरोध अशी भाषेची सर्व शस्त्र वापरून त्यांनी आपल्या लिखाण सजवलेलं दिसतं. निळू फुलेंवरच्या मृत्यूलेखात त्यांच्या प्रामाणिक, निरलस,  अभिनिवेशरहित जगण्याचा उल्लेख करताना, ‘तुका म्हणे रा, आहे मूळचाची खरा’, हा चरण ते वापरतात.

 

लिहिण्याच्या ओघात नवे नवे शब्द डॉक्टरांचा लिखाणात सापडतात.  ‘भांडवलप्रचर शेतकरी’ म्हणजे भाषा संस्कृतप्रचुर असते तसे हे;  ‘भांडवल प्रचुर शेतकरी’.  तसंच  ‘सज्जनशक्तीचे मौन’ असाही एक शब्द त्यांनी वापरलेला आहे अर्थ स्पष्टच आहे. त्यांच्या एका पुस्तकांचं नावंच मुळी ‘अंधश्रद्धा विनाशाय’ असं आहे. किती अर्थपूर्ण, आणि  आपल्या संस्कृतीत मूळ धरलेल अस हे नाव आहे.

 

समायोजित लिहितानाच आपला मुद्दा सोडायचा नाही हा आग्रही त्यांच्या लिखाणात दिसतो. ही तारेवरची कसरत त्यांना सहज जमत असे.  डॉ. दाभोलकर  हे सत्य साईबाबांचे विरोधक. त्यांचा मृत्यू झाल्यावर डॉक्टरांनी जो लेख लिहिला, तो संयमित, संयत, पण समर्थ लेखणीचा उत्तम नमूना ठरावा.  सत्य साईबाबा ही निव्वळ व्यक्ती नसून एक संस्था होती आणि या त्या व्यक्तीविरुद्ध नाही तर त्या संस्थेविरुद्ध डॉक्टरांचा लढा होता. अशावेळी गेलेल्या व्यक्तीचे अवमूल्य किंवा अपमान होणार नाही, इतकच काय तर तिच्या भक्तांच्या हळव्या भावनांनाही धक्का लागणार नाही अशा नजातीन हा लेख उतरला आहे.

 

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ लोकांना वेड्यात काढायची चळवळ कधीच नव्हती.  तसा अभिनिवेश कोणीही अंगी बाळगू नये म्हणून डॉक्टर सदैव दक्ष होते.  त्यांच्या लिखाणातूनही त्यांनी ही दक्षता सतत घेतलेली आहे.  त्यामुळेच गणेशमूर्तींचे विसर्जन असो, पर्यावरण सुसंगत होळी असो, प्रदूषणरहित दिवाळी असो, की जटा निर्मूलनासारखा उपक्रम असो; या साऱ्याबद्दल विस्तृतपणे लिहिताना डॉक्टरांची भूमिका कोणी जेष्ठान आपल्या कुटुंबीयांना समजावून सांगावं अशीच आहे.  कार्यकर्त्यांनी कार्य करतानाच त्यांच वैचारिक मांडही तितकiच भक्कम असाव म्हणून त्याने बरंच लिखाण केलं आहे.  त्यामुळे प्रत्येक बारकावा स्पष्ट करत, उकलून दाखवत, वैज्ञानिक नेमकेपणान त्यांचे शब्द येतात. अंधश्रद्ध मनुष्य हा स्वतःहून खड्ड्यात पडतो, मूर्ख असतो असं नसून; आसपासच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक शक्तींमुळे तो तसा बनतो. तो जसा फसवला जात असतो तसाच तो स्वतःलाही फसवत असतो. हे सारं लक्षात घेऊन डॉक्टर लिहितात, ‘त्याला उपहासाची नाही तर सहानुभूतीची गरज आहे’.

 

 

‘भ्रम आणि निरास’ हे त्यांचे पहिलंच पुस्तक चांगलंच गाजलं.  मग आलं ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’.  या लोकांच्या मनात या विषयाबद्दल सतत डोकावणाऱ्या प्रश्नांची उत्तर होती आणि ‘अंधश्रद्धा विनाशाय’ या तिसऱ्या पुस्तकात प्रत्यक्ष चळवळीचे अनुभव डॉक्टरांनी सांगितले आहेत.  

पण त्यांचं ‘तिमिरातून तेजाकडे’ हे मला सर्वोत्कृष्ट लिखाण वाटतं. त्यांच्या लिखाणाची सारी वैशिष्ठ्ये इथे दिसतात. या पुस्तकांत पहिला भाग अंधश्रद्धांशी निर्मूलनाशी  संबंधित थेट बाबीबद्दल आहे.  दुसऱ्या भागामध्ये बुवाबाजीच्या संदर्भातले आणि अन्य संदर्भातल्या प्रत्यक्ष लढ्यांची माहिती आहे आणि त्यातला जो अखेरचा भाग आहे तो वाचनीय तर आहेच पण अतिशय अभ्यासनीआहे,  मननीय आहे, चिंतनीय आहे. देव, धर्म नीती, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा बाबतीत जसे प्रत्येक धर्मांचं निरनिराळ म्हणणं आहे,  त्याप्रमाणे निरनिराळ्या विज्ञानवाद्यांचं,  विवेकवाद्यांचं,  बुद्धीप्रामाण्यवाद्यांच सुद्धा देव, धर्म नीती, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा बाबतीत निरनिराळं म्हणणं आहे. याबद्दल लिहिताना  आपल्या पूर्वसूरींच्या मताचं सार त्यांनी सांगितलं  आहेच आणि चळवळीच्या अनुभवावरून आणि स्वतःच्या चिंतनातून याबाबतीत काही मांडणी केली आहे. सारभूत असे लिहिण्या डॉक्टरांचा हात कोणी धरू शकत नाही असं आवर्जून म्हणावसं वाटतं.  जे सांगायला कित्येक विद्वानांनी आपल्या ग्रंथाची शेकडो पाने खर्च केल ते सारं काही  डॉक्टर काही परिच्छेदांमध्ये उरतात.

 

एके ठिकाणी ते म्हणतात, ‘सुशिक्षित व्यक्ती आणि विज्ञानाच्या अभ्यासक व्यक्तीही अंधश्रद्धेला बळी कशा पडतात याचे उत्तर असं की, स्वतःच्या भौतिक स्वार्थापुरता व अभ्यासापुरता शास्त्रीय विचार पद्धतीचा वापर केला की मग व्यक्तीचा प्रवास पारंपारिकतेकडे होतो.

 अतिशय सौम्य भाषेमध्ये पण ठामपणे डॉक्टर मुद्दे मांडत जातात. आता अशा  त्या माणसाच्या, म्हणजे ‘स्वतःच्या भौतिक स्वार्थापुरता व अभ्यासापुरता शास्त्रीय विचार पद्धतीचा वापर’  करणाऱ्या माणसाच्या  दृष्टिकोनातून हे चित्र कस दिसतं,  याच वर्णन लगेच पुढच्या वाक्यात येतं. फक्त आपला दृष्टिकोन मांडून डॉक्टरांची लेखणी  थांबत नाही.

1.    आजूबाजूच्या सर्व समाजाला मान्य असलेल्या ते वर्तन असतं

2.    या सर्वांच्या प्रभावातून मानसिक गुलामगिरी निर्माण होते

3.    ही गुलामगिरी अधिक घातक असते.

4.    राजकीय व आर्थिक गुलामगिरीतील शोषण स्पष्ट असते

5.    त्याविरुद्ध प्रबोधन व संघर्ष होऊ शकतो

6.    अगदी नेमकं याच्या उलट मानसिक गुलामगिरीबद्दल असतं

7.    ही गुलामगिरी स्वीकारणाऱ्यांना ती सोयीची व सुखकारक वाटते

 

 अशा पद्धतीने डॉक्टरांचा युक्तिवाद पायरी पायरीने चढत जातो.  तुम्ही पहिल्या वाक्याशी सहमत झालात,  तर दुसर वाक्य हे त्याचतार्कीक परिणीती म्हणून येत असल्यामुळे दुसरंही वाक्य मान्य कराव लागतं.  तिसर वाक्य हे दुसऱ्याची तार्किक परिणीती असतं,  त्यामुळे तेही मान्य कराव लागतं.  अशा पद्धतीने आपण डॉक्टरांचे विचार आत्मसात करत जातो. पुढे त्यांच्या लेखनातील आणखी एक वैशिष्ठ्य बघू या, ते लिहितात..

 त्यामुळे त्या गुलामगिरीचे समर्थन संरक्षण संवर्धन आणि उदातीकरण केले जाते. त्याला सम्यक स्वतंत्र विचार, निर्भयमानस व खंबीर कृती हे तिन्ही लागतात. आणि नैतिकतेचा भान तर लागतच लागतं’    

म्हणजे काय केलं जातं, यासाठी डॉक्टर एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चार विशेषण वापरतात.  हे त्यांच्या भाषेचे एक वैशिष्ट्य आहे. अनेकदा त्यांनी अशी एकाहून अधिक विशेषणं वापरली  आहेत. आपण शांतपणे विचार केला तर या प्रत्येक विशेषणाला एक अर्थ आहे, अर्थाची एक सूक्ष्म छटा आहे आणि त्यामुळे त्यांची मांडणी ही अत्यंत नेमकी, आणि टोकदार झाली आहे, अस आपल्याला आढळतं. इथे बघा.  गुलामगिरीचे ‘समर्थन-संरक्षण-संवर्धन आणि उदात्तीकरण’  केलं जातं.  समर्थन म्हणजे संरक्षण नाही; आणि संरक्षण म्हणजे संवर्धन नाही  आणि संवर्धन म्हणजे उदात्तीकरण नाही. या चारही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पुढे डॉक्टर असे म्हणतात की; ‘त्याला सम्यक स्वतंत्र विचार, निर्भय मानस व खंबीर कृती हे तिन्ही लागतात’.  पुन्हा एकदा काय लागतं? तर या  तीन गोष्टी.  त्यांनी सांगितले की विचार लागतो, मानस म्हणजे मन लागतं आणि कृती लागते आणि या प्रत्येकाला पुन्हा एकदा त्यांनी विशेषण लावलेलं आहे.  विचार कसे हवे? तर सम्यक आणि स्वतंत्र. मन निर्भय हवं आणि कृती खंबीर हवी.  आणि अखेरीस ते म्हणतात की,

 नैतिकतेचा भान तर ‘लागतच लागतं’  म्हणजे या तीन गोष्टी लागतात आणि नैतिकतेचे भान मात्र लागतच लागतं,  आवश्यकच आहे,  हे ठासून मांडण्यासाठी डॉक्टरांनी भाषेचा कसा प्रभावीपणे वापर केला आहे ते पहा.

मला नेहमी असं वाटतं की भाषेवर पकड असेल तरच माणूस आपले विचार, कल्पना, युक्तिवाद पुढे प्रभावीपणे मांडू शकेल. डॉक्टरांच्या यशात त्यांच्या भाषेचाही मोठा वाटा आहे.  

 

 

पूर्व प्रसारण

सातारा आकाशवाणी