शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी भाग १
झंप्या, भुपी आणि गूगल आज्जी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
हॅलो दोस्त मंडळी,
हा झंप्या आणि ही, त्याची बहीण भुपी. दोघे शाळेत आहेत भुपी मोठी आहे. आहे सातवीत. झंप्या छोटा. तो आहे पाचवीत.
झंप्या आहे मोठा लाघवी आणि तरतरीत. त्याचे मोठ्ठे मोठ्ठे, डोळे तर सतत कुतुहलाने इकडे तिकडे बघत असतात. मोठ्या डोळ्यांसाठीच झंप्या फेमस आहे.
भुपी तशी इतर चार मुलींसारखी आहे. पण तिचे केस खूप लांब आहेत. ती लांब वेण्यांसाठी फेमस आहे. पण एरवी शांत आणि मितभाषी का काय म्हणतात तशी भुपी, झंप्याशी भांडताना एकदम वाघ आहे. सॉरी वाघीण आहे!
एकमेकाना चिडवणे हा दोघांचा मुख्य टाइमपास आहे आणि फावल्या वेळात काहीतरी खटाटोप करून बघणे हा उप-टाइमपास. आता हेच बघा ना, येणाऱ्या जाणाऱ्या कोणाही पाहुण्याने झंप्याला विचारले, ‘तू मोठा झाल्यावर काय होणार?’
यावर झंप्याचं वर्षानुवर्ष ठरलेले उत्तर आहे, ‘मी भुपीपेक्षा उंच होणार!!’
वर्षानुवर्ष हे उत्तर ऐकताच भुपी त्याला वेडावून दाखवते आणि दारामागे दोघांच्या उंचीच्या रेषा काढलेल्या आहेत त्याची आठवण करून देते.
दारामागे दोघे अगदी लहान असल्यापासूनच्या खुणा आहेत. दर दोन तीन महिन्यांनी दोघांचा ऊंची मोजण्याचा कार्यक्रम असतो. झंप्या, सध्या तब्बल सात सेंटीमीटरनी बुटका आहे. पण ते सध्या. झंप्याच्या भाषेत सांगायचं तर, ‘आगे आगे देखो होता है क्या!’
झंप्या बावळट असून त्याला यडा बनवणे कुणालाही शक्य आहे असा भुपीचा ठाम विश्वास आहे. तर भुपी चक्रम असून, आपणच हुशार आहोत असा झंप्याचा घट्ट समज आहे. एकदा असाच दोघांचा वाद झाला. शेवटी झंप्यानी भुपीला विचारलं, ‘सीनियर म्हणजे काय?’
‘मोठा!’
‘बरोबर, मग आता सांग तू दुसरीत होतीस तेंव्हा मी कितवीत होतो?
‘सीनियरला!’
‘बघ म्हणजे तू दुसरीत आणि मी सीनियरला!’ सीनियर, म्हणजे जणू कॉलेज असल्यासारखा आव आणत, झंप्या म्हणाला.
असं काही झालं की भुपी चिडते. त्याला जरा बदडते. पूर्वी बिचारा सारखा मार खायचा. पण आता त्याची पॉवर वाढली आहे. आता तो मार खात नाही. पूर्वी हा मार खायचा आणि भुपीनी ह्याचा फटका चुकवला, तर रडत रडत, ‘ती भुपी बघ ना, मला तिला मारू देत नाहीय्ये!’ अशी आजीकडे तक्रार करायचा.
आजी म्हणजे गूगल आजी. ही आजी या दोघांची अतिशय लाडकी आणि ही दोघं आजीची लाडकी. आईबाबा गावाकडे असतात. ही दोघं इथे शहरात रहातात. आजीबरोबर. शिक्षणासाठी. तिघांचं मेतकूट अगदी छान जमतं.
या दोघांना लाडाच्या वेगवेगळ्या नावानं हाका मारणं हा जणू आजीचा छंदच. भुपीला ती कधी पिल्लू म्हणते, कधी मनी म्हणते, कधी माऊ म्हणते तर कधी मनीमाऊचं पिल्लू म्हणते आणि झंप्याला चॉम्स, चॉकी, लाडू, बंब्या अशी अनेक नावं आहेत. मुळात झंप्या आणि भुपी हीसुद्धा लाडाचीच नावे आहेत. झकासचं झालंय झंप्या आणि भुदेवीचं झालंय भुपी.
खरंतर वर्गातल्या मित्रमैत्रीणींसमोर असल्या नावानं हाक मारणं दोघांना आता आवडत नाही. पण आजीला कोण सांगणार? झंप्यानी खूपच डोळे वाटरले तर आजी त्याला झकासराव म्हणते!
पण आजीचीच गेम आजीवर उलटवायची म्हणून दोघांनी मिळून आजीला, गूगल आजी, असं नाव ठेवलं आहे,!! पण ह्याला कारण आहे बरं. आजी एकदम स्मार्ट आहे. अगदी गूगल इतकी स्मार्ट. तिला वाट्टेल ते विचारा, तिच्याकडे उत्तर असतंच. गणित, विज्ञान, व्याकरण असं काहीही विचारलं तरी ती उत्तर देतेच. अगदी बरोबर उत्तर देते. देणारच. ती शास्त्रज्ञ होती. डॉक्टर होती पण नंतर माणसाच्या गुणसुत्रांवर तिनी खूप संशोधन केले होते. त्यासाठी ती जग फिरली होती. तिच्या लॅबमध्ये तिनी माकडे पाळली होती. त्यातल्या माकडांची नावे होती, चॉम्स, चॉकी, लाडू आणि बंब्या! आणि माकडीणींची नावे होती, मनी, माऊ आणि पिल्लू!!
आजही ती रोज काहीतरी वाचत असते. इंटरनेटवर बसत असते. तिच्या परदेशी मित्रांचे फोन येतात तिला. त्यांच्याशी फाडफाड इंग्लिश बोलते ती. इंग्लिशमधून जोक मारते आणि स्वतःही खोखो हसते.
जोकची तर आजीला भारी आवड. आजी फनी आहे. अगदी तूफान फनी. आता कालचंच बघा ना. झोपताना झंप्यानी आजीकडे गोष्टीसाठी हट्ट धरला. साधीसुधी नाही, भुताची गोष्ट हवी असा हट्ट धरला. मग आजीनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.
‘एक होतं भूत. एकदा त्याच्या मुलाची, म्हणजे बेबी भुताची बर्थडे पार्टी होती!’
बेबी भुताची बर्थडे पार्टी!! ह्या कल्पनेनीच झंप्याला इतकं हसू आलं की तो हसता हसता कॉटवरुन खाली पडला. कसला आवाज झाला म्हणून भुपी बघायला आली. भुताची बर्थडे पार्टी म्हटल्यावर तीही हसायला लागली.
आजी पुढे सांगू लागली, ‘थोड्याच वेळात सगळी भुतावळ जमली. माळरानावरची हडळ आली. तिनी केक आणला होता. पिपळावरचा मुंज्या पावभाजी घेऊन आला. पाण्यातली आसरा कोल्ड्रिंक घेऊन आली. पिशाच्च, वेताळ, सैतान, संमंध आणि खवीस असे एकाच गाडीतून आले. ब्रम्हराक्षसाची स्कूटर पंक्चर झाली म्हणून हाकामारी जाऊन त्याला आपल्याबरोबर घेऊन आली. बर्थ डे पार्टीत सगळ्यांनी हीsss धम्माल केली. भूतंच ती, त्यांनी भरपूर धुडगूस घातला. वेताळानी, राजा विक्रमादित्याची गोष्ट सांगितली. सैतानानी, देवादिकांच्या गोष्टी सांगून सगळ्यांना घाबरवून सोडलं. अगदी पाचावर धारण बसली सगळ्यांची. पिशाच्च, सैतान, संमंध आणि खवीस ह्यांचा हिपहॉप डान्स तर बेफाट झाला.’ आजीनी अगदी रंगवून रंगवून वर्णन केलं.
दोघेही आता पेंगुळले होते. आजी म्हणाली, ‘शेवटी सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला. पण त्यात जरा गोचीच झाली.’
‘काय झालं?’, भुपी.
अगं फोटो मुळी कोराच आला. कोण्णीच नव्हतं त्यात.’
‘का बरं?’ भुपी.
‘अगं कसं असणार? भुतं मुळी नसतातच ना! मग फोटोत तरी कुठून येणार?’
आजीचे हे लॉजिक ऐकून दोघेही गार झाली. भुपी तर फिदीफिदी हसायला लागली. काय बोलावं हे कोणालाच सुचेना.
‘शेवटी खूप दुपार झाली म्हणून सगळे आपापल्या घरी गेले! झोपा बरं आता.’ आजीनी गोष्ट आवरती घेतली.
झंप्या चमकला.
‘दुपार झाली? म्हणजे पार्टी संध्याकाळी नव्हती?’ झंप्या.
‘भुतांना कुठला संध्याकाळी वेळ? रात्री तर सगळी भुतं बिझी! त्यामुळे त्यांच्या बर्थ डे पार्ट्या सगळ्या पहाटे!!’ आजी.
झंप्या आता पुरता बुचकळ्यात पडला होता. शेवटी म्हणाला,
‘काहीतरीच हां तुझं. भुताची गोष्ट तर सांगते मग म्हणते भुतं नसतात. मी सांगतो भुतं असतात. कित्ती लोकांना दिसल्येत. आमच्या शाळेत तर भूत पाहिलेली तीन मुलं आहेत.’
‘काही ठिकाणी तर भूत बंगले असतात. काही लोकं प्लॅंचेट करतात. ते कसं करतात मग?’ भुपी तावातावाने म्हणाली.
‘करू देत. भुतं नसतात, पण काही जणांना ती आहेत असं वाटतं. त्याची कारणे आहेत. सांगीन मी उदया. झोपा बरं!’
उद्या आजी काय सांगणार याचा विचार करत दोघं गाढ झोपून गेली.
पूर्वप्रसिद्धी
किशोर
जानेवारी २०२१