बागुलबुवा
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र.
९८२२० १०३४९
स्त्री-पुरुष समानतेचा नारा
देत, प्रचंड गाजावाजा करत भरलेली एक आंतरराष्ट्रीय परिषद होती तिथे. ‘डॉक्टरांच्या
नजरेतून समाजातील लिंगभेद’ असा काहीतरी विषय होता माझा. पंचतारांकित थंडीत मी माझं
बोलणं उरकलं, हुकमी टाळ्या घेतल्या आणि उपस्थितांचे अभिवादन स्विकारत, क्षणभराचा
सेलिब्रिटी स्टेट्स सांभाळत मी कॉफीच्या स्टॉलकडे गेलो. पुढचा कार्यक्रम एल.जी.बी.टी.
(समलैंगिक इ.) आणि त्यांचे प्रश्न असा काही तरी होता. माझ्या इंटरेस्टचा अजिबातच
नव्हता. आता मी बनचुका वक्ता झालो आहे. जायचं, बोलायचं आणि सटकायचं असा माझा
खाक्या. इतरांचं ऐकणं अगदी क्वचित, तसाच काही महत्वाचा विषय असेल तर. त्यामुळे सटकण्यापूर्वी
कॉफी घुटकत निवांतपणे चकाट्या पिटायला कोणी भेटतंय का हे मी शोधू लागलो. इतक्यात ऊंच, धिप्पाड, अशी
एक नटवी बाई दमदार पावले टाकत थेट माझ्याकडे आली.
‘आत्ता माझंच प्रेझेन्टेशन
आहे. ऐकायला ये रे. छान आणि महत्वाचं असणार आहे. ये तू नक्की.’ असा दमच दिला तिनी.
ना ओळख ना पाळख, अशी अचानक एकेरीत शिरणारी ही कोण बाई, असा विचार करत मी स्तब्ध
उभा.
‘ओळखलं नाहीस? मी सुद्धा
नसतंच ओळखलं म्हणा, पण स्पीकर्सच्या लिस्टमधे तुझं नाव वाचलं आणि शंका आली, तूच तो
म्हणून. मघाशी तुला बोलताना पाहिलं आणि लगेच ओळखलं.’ माझ्या चेहऱ्यावर भलंमोठ्ठ प्रश्नचिन्ह.
इतक्यात तिनी एक डोळा मोठा केला, एक बारीक केला आणि म्हणाली, ‘बागुलबुवाsss’. मी पुरता चाट पडलोय
हे हेरून ती वाऱ्यासारखी निघून गेली.
गेली ती मला पार शाळेच्या
दिवसात घेऊन गेली. शाळेत असताना आम्ही सारीजणं बाजारातल्या एका फेरीवाल्याला
बागुलबुवाsss, म्हणून चिडवत असू. त्यामुळे ही कोणीतरी शाळेतली होती एवढं निश्चित.
पण कोण? सुकन्या? वृंदा? जानकी? मेहेर? छे! अजिबात आठवत नाही. मी, ती कोण ह्याचा
विचार करायचा नाद सोडून दिला. कॉफी पीत समोरच्या भिंतभर काचेतून बाहेरचं हिरवकंच
दृश्य बघत राहिलो. अचानक त्याठिकाणी गावचा आठवड्याचा बाजार भरला, ऊन तापलं,
माणसांचा गजबजाट सुरु झाला. मी आणि माझा मित्र गुंड्या माना उंचावून बागुलबुवाला
शोधतोय.
बागुलबुवाचं खरं नाव काय
होतं कुणास ठाऊक. बाजारात सगळे त्याला बुवा अशी हाक मारायचे आणि आम्ही, बागुलबुवा.
बागुलबुवा हा सगळ्या पोरांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय होता. त्याच्या डोळ्यांकडे
बघताच तंतरायची आमची. तो दिसायला काही वाईट नव्हता. उलट बराच होता. धट्टाकट्टा.
उंचापुरा आणि तितकाच आडवाही, मोठा पण नीटस चेहरा, लांबच लांब हात... पण त्याच्या
बाबतीत काहीतरी वेगळं होतं खास. काय ते आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. तो म्हणे
मुलं पळवतो, पोत्यातून. तो म्हणे अमावस्येला रात्रभर नदीत उभा रहातो. तो म्हणे आधी
पोतराज होता. मंगळवार, शुक्रवार त्याच्या अंगात देवी येते. त्यामुळे तो म्हणे कुडत्याच्या आत खणाची चोळी घालतो.
त्याचे केस लांब वाढलेले, अस्ताव्यस्त, अगदी मानेच्याही खाली. कधी केसांचा बुचडा.
गळ्यात मोठया मोठया रुद्राक्षमाळा, स्फटीकमाळा, कवड्याच्यामाळा, गंडे-दोरे. मनगटात,
दंडात कडं. एकाच पायात वाळा. कधीतरी सापडला तो कसल्यातरी भानगडीत आणि पोलिसांनी
त्याचा एक वाळा घेतला म्हणे; अशी गावभरची चर्चा होती. कपाळी मोठा टिळा, दाट काळ्या
भुवया; आणि ते डोळे. ते भयंकर होते. एक मोठ्ठा, भेदक नजरेनी आपल्याकडे पहाणारा. दुसराही
मोठ्ठाच पण काही तरी विचित्र होतं त्या डोळ्यात. आम्ही डोळे फाडफाडून त्याच्या
त्या डोळ्याकडे पहायचो. कोणी तरी सांगितलं होतं, त्याचा एक डोळा बकरीचा आहे. पतौडीचाही
एक डोळा बकरीचा आहे आणि याचाही. पण कोणता ते सांगणं आम्हाला कठीण होतं. आम्हाला
म्हणजे त्या वेळी चौथी-पाचवीत असण्याऱ्या गावातल्या सगळ्याच मुलांना. तो भेटला की
आमची शोधक नजर आणि त्याची भेदक नजर यांची गाठभेट ठरलेली. त्याचे ते डोळे हीच
त्याची ओळख झाली. त्याच्याबद्दल बोलताना आम्ही एक डोळा लहान एक मोठा करायचो आणि
म्हणायचो, ‘बाग्गुलबुवाsss!’ बस्स, फिदीफिदी हसायला एवढं कारण पुरेसं होतं की.
स्वच्छ पायजमा आणि लांब ढगळ
कुडता घालून तो बाजारात चौकात उभा असायचा. त्याच्याकडे जायचं कारण म्हणजे त्याच्याकडे
असायचा मोठाच्या मोठा तक्ता. त्याला एक लांब काठी लावलेली. ह्या काठीच्या मदतीनी
तो तक्ता उंचच ऊंच धरायचा. त्यावर आडव्या आडव्या लावलेल्या दोऱ्या आणि त्या दोऱ्यांवर
नवलाईची सारी दुनिया लटकलेली असायची. उंचावर हवेत डोलणारे फुगे, फुग्यांचे पोपट,
बदकं, माकडं, रिंगा आणि काय काय. मग वाऱ्यावर गरागरा फिरणारी रंगीबेरंगी भिरभिरी.
काही सिंगल काही चक्क डबल. मग प्लॅस्टिकचे पोपट, बाहुल्या, मांजरं, कुत्री,
अस्वलं. खालच्या ओळीत गाड्या, बस, डबल डेक्कर, रिक्षा, ट्रक, टमटम. मग खुळखुळे, शिट्या,
भोवरे, गलोल, कॅमेरा, दुर्बीण, बासऱ्या, टिकटिक, रंगीत कागद, झीगाचे दोरे, काठीवर
चढणारं माकड, हातपाय हलवणारा जोकर, पळणारा नाग, पिळदार पट्टीवरून ढकलल्यावर ऊंच
उडणारा पंखा, पिसाच्या टोप्या, पिपाण्या, पिंगण्या, गंडे, दोरे, ताईत, चष्मे,
रंगीत गॉगल, घड्याळ, डमरू, छोटे ढोल, बॉल, पिना, रिबिनी, भातुकलीचा सेट,
डॉक्टर-डॉक्टर खेळायचा सेट, सापशिडी, बुद्धीबळ, चिंचोके, चींचा, आवळे, बोरकूट,
तऱ्हेतऱ्हेच्या जादू... स्वप्नातली खेळण्यांची दुनिया हा हातावर तोलत बाजारभर
हिंडत असायचा. लांबून आधी वाऱ्यावर डोलणारे फुगे दिसायचे. मग गर्दीतून माना वर करत
करत आम्ही त्याचा माग काढत जाणार. घरी हट्ट करून मोठया मुश्कीलीनी मिळवलेले रुपया
दोन रुपये, आमच्या बालमुठीत घट्ट धरून, अखेर त्याच्या अजब दुनियेसमोर उभे ठाकणार.
इतक्या सगळ्या रंगीत संगीत दुनियेतलं काय घ्यावं आणि काय नको असं होऊन जाणार मनात.
त्याच डोळा चुकवून, त्याचा डोळा बघण्याचा उद्योगही सुरूच असणार. आजुबाजुला ऊन मी
म्हणत असणार, बाजाराची अखंड कलकल चालू असणार, माणसांचे आणि कांदे, मसाले, मासे,
मिठाई असे कसले कसले वास दरवळत असणार. ग्राहकांशी हुज्जत घालत सगळे दुकानदार जेरीस
आलेले असणार. कुणाच्या पिशवीचा बंद तुटणार, तर कोणी घसरून पडणार. कुणाचं किरकोळ
कारणावरून वाजणार, तर कुणाच्या पाटीतली कोथिंबीर शेळी पळवून नेणार. असा सगळा
जगरहाटाचा गजर चौफेर चालू असणार. पण बागुलबुवाच्या झगमगत्या रंगरसिल्या दुनियेनी
आमची नजरबंदी केलेली.
नुसत्या नजरेनीच आमच्या चिमुरड्या
हृदयाचा थरकाप उडवणारा हा इसम बोलायला लागला की एकदम मधाळ होऊन जाणार. काय ‘हवं
बाळ तुला?’ किनऱ्या आवाजात त्याचा प्रश्न. त्याच्या अवताराच्या मानानी त्याचा आवाज
अगदीच गोड होता. वनराजानी डरकाळी फोडण्यासाठी छाती भरून वारा पिऊन घ्यावा आणि मान
उंचावून जंगल दणाणून सोडणारी डरकाळी फोडावी आणि प्रत्यक्षात त्यातून निव्वळ म्यांsssव
आवाज यावा, तर कसं वाटेल? तसा त्याचा आवाज होता.
मधूनच तो चक्क पुरुषी आवाज
काढायचा. मग काय विचारता, वरातीत बँडपेक्षाही कर्कश्श सुरात द्वंद्वगीत म्हणायला
याला जाम मागणी. लग्नसराईत हा बिझी. एका हातगाडीवर इलेक्ट्रिक ऑर्गन, बॅटरी,
अॅम्प्लीफायर अशी सगळी यंत्रणा. ती गाडी सर्व बाजूनी नटवलेली. मोर, हती, असं काही
तरी डिझाईन. त्याप्रमाणे मयूर ब्रास बँड किंवा गजराज ब्रास बँड असं काही तरी नाव. तिथून
निघालेली वायर मोठया लाऊड स्पीकरपर्यंत लोंबकळत जाणार. हा लाउड स्पीकर एखाद्या
किरकोळ पोरांनी बांबूच्या टोकावर उंचावलेला. वरात सुरु होताच बागुलबुवा ‘हॅलो’ म्हणणार...
आणि काय आश्चर्य, त्या कर्ण्यातून आवाज निघणार, हॅलोs, हॅलोss, हॅलोsss!!!
ही सारी आम्हाला बागुलबुवाचीच करामत वाटणार. वराती मागून, ही मजा बघायला, आमचीही
घोडी निघणार. बाज्यावरची कर्कश्श लयकारी समेवर येताच बागुलबुवा लताच्या आवाजात
सुरु करणार; ‘कोयल बोली’, लगेच कोकिळेचा आवाज ‘कुssहूss’; पुन्हा लता ‘दुनिया डोली’,
पुन्हा कोकिळा ‘कुssहूss’... आणि रफीची ओळ येताच तसाही आवाज काढणार. लता, कोकिळा आणि
रफी अशी एकमुखी जुगलबंदी चालू होणार. बघे खूष. कुणी खुषीनं काही हातावर टेकवणार.
बागुलबुवा खूष. आम्हाला खिशातून आवळे, चींचा असं काढून देणार आणि म्हणणार, ‘पळा रे
पोरांनो, घरी वाट बघत असत्याल’ आणि गुंड्याला म्हणणार, ‘भूक लागली का रे तुला? चल
हाटेलात जाऊ.’
गुंड्यावर त्याची खास माया.
त्याला तो खारखंडेच्या हॉटेलात नेणार, भजी, जिलबी असं काय काय खायला देणार. एकूणच
बागुलबुवा भेटला की गुंड्याची चैन असायची. गुंड्या त्याला घाबरायचाच नाही मुळी. मग
आमचीही हळूहळू भीड चेपली. बाजार भरायच्या आधी तो मारुतीच्या पारावर बसून तयारी
करायचा, तक्ता भरायचा. कधीकधी आम्हीही जायचो मग. त्याला फुगे फुगवून द्यायचे,
सायकलच्या पंपानी हवा भरायची आणि मग तो त्याची चित्र बनवणार. एक फुगा पिरगळला, की
त्याचे दोन टंबू तयार. एक छोटा, एक मोठा. एक तोंड, एक पोट. त्याला लांब काकडी
फुग्याची शेपूट जोडणार. गळयाभोवती आणखी एक काकडी फुगा गोल बांधणार, झालं माकड
तयार. कधी कधी पिपाणीच्या पुंगळ्या, शिट्या, रंगीत कागद, पीसं असा सगळा माल पारावर
पसरून आम्ही त्याच्या देखण्या पिपाण्या बनवत असू. काठ्यांच्या तीकाटण्याला
सायकलच्या टायरची रबरं जोडून गलोल बनवत असू. रबरी खेळण्याच्या बुडाशी शिट्टी बसवत
असू. पोपटात, शेठशेठाणीत, आणि माकडात एकच शिट्टी असते हा शोध मला तिथेच लागला.
हळूहळू बागुलबुवाशी चांगलीच गट्टी जमली. शिडाची बोट मला येत होती पण नांगर होडी,
डबल बोट, तिळगुळाचा डबा, फोटो फ्रेम, हे सगळं बागुलबुवानी शिकवलं. हातात कला होती
त्याच्या. होळीत सोंगाच्या जत्रेसाठी मुखवटे बनवावेत तर बागुलबुवानीच.
पुठ्ठा, सुतळी, दोरा,
कात्री, ब्लेड, सुरी, रिकामी रीळं, डिंक, सरस, झीग, कलाबूत, झिरमिळ्या, चकमक,
पतंगाचे कागद, गोटी कागद, पताका कागद, हात कागद, असल्या जीवनावश्यक गोष्टी
त्याच्या तक्त्यामागच्या पिशवीत असायच्या. आम्हाला त्या पिशवीला हात लावायची सक्त
बंदी होती. गुंड्याला मात्र मुक्तद्वार. त्याला तर तो जादूही शिकवायचा. फुकट.
आम्हाला मात्र जर जादू विकत
घेतली तरच तो ती शिकवायचा. फक्त एकालाच. अर्थात विकत घेणाऱ्या मुलाला. पिंपळाखाली
पारावर, मारुतीच्या देवळामागे गुडघ्यावर बसून आमच्या लेव्हलला येऊन तो ती
शिकवायचा. त्याच्या मांजरीसारख्या ऊंच आवाजात मंत्र पुटपुटून दाखवायचा. आमच्याकडून
म्हणून घ्यायचा. जादू करवून घ्यायचा. अगदी नीट जमेपर्यंत घोटून घ्यायचा. ‘जा आता
तिच्या मारी, चकित करून सोड साऱ्या मित्रांना’, असा आशीर्वाद देत गालगुच्चा
घ्यायचा.
त्यातली विमानाची घोडागाडी
करायची जादू खासच होती. एक काच. एका कागदात मधोमध खिडकी करून तिथे बसवलेली. त्या
कागदावर, उलटया सुलट्या दोन्ही बाजूला
वेगवेगळ्या वाहनांची चित्रं. आधी विमान काचेवर येईल अशी घडी घालायची मग
विरुद्ध बाजूनी काचेतून विमान दाखवायचं. मग विचारायचं, आता कोणतं चित्र काचेत आणू?
समजा घोडागाडी हवीय, तर आता घडी घालताना घोडागाडी काचेवर येईल अशी सुरुवात करून
घडी घालायची. उलगडताना मंत्रबिंत्र म्हणून विरुद्ध बाजूनी उघडायचं. झाली जादू.
जादू नीट शिकली की म्हणायचा,
‘जा, जा मारतीच्या तोंडाचं गुळखोबरं खा जा.’ कोणीतरी मारुतीच्या ओठाला गुळखोबरं
चिकटवून गेलेलं असायचं. आम्ही बिचकायचो. साक्षात भीमरूपी महारुद्राच्या तोंडचा घास
पळवायचा म्हणजे काय. पण बुवा धीर द्यायचा, म्हणायचा, ‘अरे खा तू, मी आत्ताच मंत्र
टाकलाय. मारुतराया काsssही नाही करणार तुला.’ एवढा दिलासा पुरेसा असायचा.
कधी रंगात आला तर, ‘ओ दुनिया के रखवाले, सुन दर्दभरी
मेरी आहें’, हे त्याचं ठरलेलं गाणं. शेवटी टिपेच्या आवाजात ‘भगवाsssन भगवाsssन’
करायला लागला, की आम्ही खो खो हसायला सुरु. मग तो चिडणार. चांगल्या दहा बारा
ठेवणीतल्या शिव्या हासडणार. वातावरण गंभीर.
‘काय रे, खुटाएवडा न्हाईस
आनी मोठया माण्साला ह्स्तूस व्हय? भाड्या, गाता येतंय का सोत्ताला? मला ह्स्तूस?’
आम्ही धूम.
असा हा बागुलबुवा. घरचं
कोणच नव्हतं म्हणे त्याला. कोण म्हणायचं बीडकडचा आहे. इथे जगायला आलाय. कोण
म्हणायचं मुंबईला बिऱ्हाड आहे त्याचं. एकदा जीवाचा धडा करून आम्ही विचारलं त्याला,
‘बुवा, बायको कुठाय तुमची?’
‘अजून केली न्हाई. करणार बी
न्हाई. तिच्यामारी तिच्या, आमाला कोन पोरगी देनार? बारा***चं आमी, योक वेळ नवरा
मिळंल!’ ह्या त्याच्या जोकवर आम्ही सगळे खिदळत सुटणार. मग तोही आमच्याकडे चौकश्या
करणार.
‘आई कुठे झोपते रे?’
‘बाबांजवळ.’
‘... आन् बाबा?’
‘आईजवळ.’
‘आन् तू?’
‘दोघांच्या मधे.’
मग बुवा खिं खिं खिं करून
खिदळणार.
त्याच्या असल्या विचित्र
प्रश्नांमुळे, त्याच्या बद्दलच्या गावगप्पांमुळे तो गूढ आणि भयप्रद वाटायचा आणि
त्याच्या त्या हस्तकलेमुळे, खेळण्यांमुळे तो हवाहवासाही वाटायचा. मुलांना
रमवण्याची हातोटी होती त्याच्याकडे. त्याच्या पोतडीतून कागद कात्री असं भराभरा
बाहेर काढून, मिनटा दोन मिनिटात तो कागदाचा टुमदार बंगला बनवत असे. वर उतरतं
छप्पर, पुढे गॅलरी आणि उघडणाऱ्या दारं खिडक्या. दिवाळीतल्या माझ्या किल्यावरची
सारी घरं श्री बागुलबुवा प्रसन्न असल्यामुळेच शक्य होत.
एकदा ऐन दिवाळीचे दिवस
होते. शाळेला सुट्टी त्यामुळे आम्ही किल्ला करण्यात मग्न. किल्यावर माती थापता थापता
अचानक कोणीतरी मागे आहे असं वाटलं. बघतो तर काय? बागुलबुवा. रुंद हसत त्यानी
किल्याचं कौतुक केलं आणि पिशवीतून एक सुबक शिवाजी काढला. बरोब्बर किल्यावर ठेऊन दुरून
न्याहळत राहिला. तो शिवाजी किल्याच्या मापाला अगदी फिट्ट बसत होता. अगदी ऐटबाज आणि
देखणा होता तो. आमची बाकीची चित्रं त्याच्यापुढे आता अगदी मातीचे ठोकळे वाटायला
लागली. बागुलबुवानी स्वतःच घडवला होता तो, गुंड्यासाठी. पण गुंड्या अचानक परगावी गेल्यामुळे तो आमच्या
वाट्याला आला होता. आम्हाला शिवाजी आवडलाय म्हटल्यावर बुवाही खुशीत आला. भराभर
त्यानी किल्याभोवती रस्ते आखून दिले. आमच्या ओबडधोबड तट-बुरुजांवर ब्रशचा जादुई
हात फिरवून अगदी खऱ्यासारखे करून दिले. वाघाची गुहा करून दिली. एका बशीत पाणी ठेऊन
त्याचं तळं बनवून दिलन आणि गुंड्या गावाहून कधी येणार? शाळा कधी सुरु? अशी चौकशी
करून तो निघूनही गेला.
शाळेबद्दल त्याला अपार
उत्सुकता.
‘काय शिकीवत्यात रं तिथं?’
‘इतिहास, भूगोल, गणित,
भाषा...’ मी.
‘श्या द्यायला शिकीवत्यात
का? त्ये महत्वाचं हाये.’
‘नाय बुवा.’
‘न्हायी? हात तुच्या **ला.’
‘तर्री शिव्या येतात की
मला.’ माझी फुशारकी.
‘ आंग आश्शी!, चल, पाठोपाठ
पाच शिव्या हाण बगू सणसणीत, तुला पाच पैशे देतो.’
मग काय, पाचच्या जागी दहा
शिव्या पाठोपाठ हासडल्या की मी. स्वकमाईचे पाच पैसे म्हणजे केवढा आनंद तो. शाळेत
बाईंना दाखवायला म्हणून ते नाणं मी जपलं होतं पण ही कमाई काय केल्यामुळे झाली हे
सांगावं लागेल म्हणून तो नाद मी सोडून दिला. बुवाकडूनच त्या पाच पैशाचं मी बोरकूट
घेऊन खाल्लं.
यत्तामागून यत्ता गेल्या.
बागुलबुवाच्या खेळण्यांपेक्षा आता आम्ही मोठे झालो. आता बागुलबुवाचं ना भय उरलं ना
कौतुक. अशीच एकदा शाळेला सुट्टी होती. पण ती सुट्टी वेगळीच होती. त्या सुट्टीत गुंड्या
दहावीत जाणार म्हणून त्याच्या बापानं त्याला ‘फुलप्यांट’ घेतली होती. त्या सुट्टीत
वर्गातल्याच शकिलाची बारात आमच्या घरावरून गेली होती. त्या सुट्टीत नदीत पोहताना
मी पहिल्यांदा चड्डी घातली होती आणि त्याच सुट्टीत बुडाला पहिल्यांदा सायकल फुटली
होती. त्या सुट्टीत आम्हाला गाव हुंदडायचा
नाद लागला होता. त्या सुट्टीत कुठले कुठले गल्ली बोळ, कधीही न ढुंढाळलेल्या वाटा,
न पाहिलेल्या वड्या वस्त्या आम्ही पालथ्या घातल्या होत्या. त्या सुट्टीत आमचं विश्व
अचानक विस्तारलं होतं.
एकदा तर पार ओढ्या काठावरून
गावाबाहेर पडलो आणि शेताच्या वाटेनी वेडावाकडा वळसा घालून एका फुफाट्याच्या
रस्त्याला सायकल घातली, तर एक प्रचंड पडकी दगडी भिंत आणि मोडकी वेसच समोर उभी ठाकलेली.
रणरणती दुपार होती. सर्वत्र स्तब्ध शांतता होती. पान सुद्धा हलत नव्हतं.
वेशीकडेच्या पिंपळावर निळ्या हिरव्या माशा जोरात गुंगुं करत पिंगा घालत होत्या आणि
पिंपळाच्या ढोलीत एक पिंगळा थेट आमच्याकडेच बघत होता. हा कोणता वेगळा गाव म्हणून
चौकशी करायला आम्ही वेशीलगतच्या पडक्या वाड्याच्या तोंडाशी थांबलो. पहातो तर काय
आत गुंड्या! तिथल्या मोडक्या बाजेवर एका बाईशेजारी तो अगदी खेटून बसला होता. ती
बाई जरा जास्तच नटली होती. आम्ही बघतच राहिलो. हा इथे काय करतोय? गुंड्याचं घर तर
पेठेत आहे. गुंड्याला आम्ही हाक मारणार इतक्यात त्या बाईनी आमच्याकडे वळून बघितलं.
ती नजर! तो डोळा!! आम्ही शहारलो. ती बाई नव्हतीच. बाईच्या वेशातला बागुलबुवाच होता
तो. आम्हाला पहाताच दोघं आतल्या खोलीत पळाले. दार लावून घेता घेता दाराआडचा तो खेळण्यांचा तक्ता दारातच धाडकन
कोसळला. ते दार लागलंच नाही. खेळण्यांची दुनिया मात्र तक्त्यावरून निखळून
अस्ताव्यस्त विखरून पडली. क्षणमात्र भीतीची शिरशिरी अंगभर पसरली, आम्ही सायकलवर
टांग टाकली आणि जीव खाऊन पँडल मारत बाणासारखे जात राहिलो, जात राहिलो.
त्यानंतर गावात ना कधी बागुलबुवा
दिसला ना गुंड्या. चार दिवस चर्चा झाली आणि गावात पुन्हा एकदा सगळं यथासांग सुरु
राहीलं. इतक्या वर्षात बागुलबुवाही मला कधी भेटला नाही आणि गुंड्याही नाही.
‘मी गुंड्या!!!’ खणखणीत
आवाजानी मी भानावर आलो. दचकून आसपास बघितलं.
‘आला नाहीस आत? दणदणीत
स्पीच दिलं मी. एव्हरीवन माईटी इम्प्रेस्ड!!’ तीच ती मघाचची बाई. मी काही बोलणार
इतक्यात ती स्वतःहूनच म्हणाली,
‘मी, मीच गुंड्या!’
‘तू??? गुंड्या???’
आश्चर्य आणि अविश्वासाचा
पहिला भर ओसरल्यावर सारे खुलासे झाले. गावातून परांगदा झाल्यावर दोघं मुंबईला आले.
इथे समानधर्मा, समानशील लोक भेटले. आहे त्या स्वरूपात स्वतःचा संपूर्ण स्विकार
हळूहळू शक्य झाला. बागुलबुवाला बॉलीवूडमधे मेकअपचं काम मिळालं. हातातलं कसब उपयोगी
आलं. अनेक खस्ता खात गुंड्या त्याच्या हाताखालीच शिकला. आता तोही कामं घेतो. गुंड्याला
आता खूप मान आहे म्हणे तिथे. तो गुडियारानी म्हणून प्रसिद्ध आहे. नुसतीच गुडियारानी
नाही, गुडियारानी‘जी’ आहे तो आता. उरलेल्या
वेळात बागुलबुवा आणि गुडीयारानी समलैगीकांच्या संघटनेचं काम करतात. आजही
ह्या पंचतारांकित आंतरराष्ट्रीय परिषदेपुढे आपली व्यथा मांडायला ती आली होती.
बागुलबुवाही मजेत आहे
म्हणे. मालाडला रूम घेतली आहे. गाणंही शिकला आहे. रोज रात्री बारमधे गायलाही जातो.
कांजीवरम् साडीतला त्याचा फोटो गुंड्यानी मोबाईलमधे दाखवला. काय देखणा दिसत होता
तो... लावण्यवती! चेहऱ्यावर तर वयाचा मागमूस नव्हता. मेकअपची किमया. ह्या मेकअपनी
आणखी एक किमया साधली होती. बागुलबुवाचा तो भीतीदायक डोळा आता अगदी नीट झाला होता.
स्वतःच्याच कौशल्यानी
बागुलबुवानी स्वतःचा डोळा तर सुधारला होता, आता तो आणि गुडियारानी जगाचा दृष्टीकोन
बदलू पहात होते.