माझं बाळ नॉर्मल आहे का हो
डॉक्टर?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई,
मो. क्र. ९८२२० १०३४९
सोनोग्राफी करताना हा
प्रश्न नेहमीचाच. अगदी स्वभाविक. निरागसपणे विचारलेला. पण डॉक्टरची महा-गोची
करणारा. कारण ‘नॉर्मल’ म्हणायचं कशाला हा एक यक्षप्रश्नच आहे. पेशंटच्या मनातला
नॉर्मलचा अर्थ आणि डॉक्टरच्या भाषेतला नॉर्मलचा अर्थ यांचा अर्थाअर्थी काहीही
संबंध नसतो!! डॉक्टरच्या भाषेत नॉर्मल याचा अर्थ त्या त्या तपासणीच्या मर्यादेत
जेवढं समजतं, तेवढंच नॉर्मल आहे असा होतो. पेशंटच्या मनातला अर्थ मात्र, ‘आत्ता तर
तर सगळं काही ठणठणीत आहेच, पण या पुढेही हे असंच असणार आहे!’ असा काही तरी असतो. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, छाप हा अर्थ पुढे अनेक
अनर्थांना जन्म देतो.
लोकांना असं वाटतं की
सोनोग्राफीत सगळं सगळं दिसतं. असं काही नसतं. अनेक गोष्टी सोनोग्राफीत दिसत नाहीत.
सुरवातीला सगळेच अवयव
अति-बारीक असतात त्यामुळे काहीच दिसत नाही. मग बाळाचं हृदय लुकलुकताना दिसतं. जीव
रुजतोय याची ही पहिलीवाहिली आश्वासक खुण. मग मेंदू, लघवीची पिशवी असं काय काय
दिसायला लागतं. कारण इथे ‘पाणी’ असतं. ज्या अवयवात ‘पाणी’ भरलेलं असतं अशा जागा
आधी दिसतात. मेंदूत पाण्यानी भरलेली पोकळी असते, मूत्राशयात लघवी असते, म्हणून हे
अवयव सहज दिसतात. इतरही अवयव असतात पण ते दिसत नाहीत. अवतीभोवती पाणी असलेलं बाळही
छान दिसतं. सोनोग्राफी म्हणजे प्रतिध्वनींनी बनलेली प्रतिमा. अन्य प्रतिध्वनींच्या
‘पार्श्वकल्लोळा’वर ज्या भागाचा
प्रतिध्वनी उठून दिसतो तो तो भाग आपल्याला दिसतो. बाळ पाण्यात तरंगत असतं.
पाण्याच्या प्रतिध्वनीच्या पार्श्वकल्लोळावर बाळाचे प्रतिध्वनी अगदी उठून दिसतात.
बाळाची बाह्यरेषा अगदी छान दिसते. कित्येक डॉक्टरांच्या फायलींवर अशी चित्र आज
विराजमान आहेत. पण बाळाच्या आतले अवयव हे बहुतेकदा एकाच तऱ्हेचे प्रतिध्वनी देतात.
त्यामुळे आतले अवयव दिसणं अवघड. त्यातही वर उल्लेखल्या प्रमाणे मेंदू, मूत्राशय
वगैरे सहज दिसतात.
बाळाच्या भोवती पाणी असेल
तर बाळाचा सोनोग्राफीय अभ्यास सोपा. नसेल तर फार फार अवघड. आईचं वजन जास्त असेल,
पोटावर चरबी खूप असेल, पहिला सीझरचा वगैरे काही व्रण असेल, जुळं, तीळं असेल, मशीन
अत्याधुनिक नसेल, तर सोनोग्राफीत अडचणी फार. शिवाय सगळं सगळं बघायला वेळही बराच
लागतो. सोनोग्राफीतलं दिसणं न दिसणं हे असं अनेक घटकांवर अवलंबून आहे. बहुतेकदा
त्या त्या अवयवाची रचना दिसते, पण त्या त्या अवयवाचं कार्य समजत नाही. सोनोग्राफीत
फुफ्फुस आहे हे दिसेल पण बाळाला श्वास घेता येईल का? ऑक्सिजन आणि कार्बन
डायऑक्साईडची अदलाबदल होईल का? ते नाही दिसणार. मेंदू दिसतो, पण अक्कल नाही दिसत.
डोळे दिसतात, पण नजर नाही दिसत. आतडी दिसतात, पण पचन होईल का हे सांगता येत नाही. फुफ्फुस,
आतडी अशा अवयवांना पोटात काहीच काम नसतं. आईकडूनच या अवयवांची कामं होत असतात.
लिव्हर, किडनी इत्यादी काम करतात, पण पूर्ण क्षमतेने नाही. त्यांच्याही कार्याची
पूर्णांशाने पारख, ही जन्मल्यानंतरच होते. जन्मजात हृदयविकार हा देखील असाच एक
त्रासदायक प्रकार. याचं निदान बरेचदा पाचव्या महिन्याच्या पुढेच शक्य होतं.
छातीच्या पिंजऱ्यातला हा पक्षी, तो ही सतत फडफडणारा... याची नीटस तपासणी व्हावी
कशी? इथं उडत्या पाखराची पिसं मोजणारेच हवेत. बाळांचं वजन हाही असाच गुंतागुंतीचा
मामला. बाळाची वाढीची अंगभूत क्षमता आणि उपलब्ध पोषण याचं मिश्रण म्हणजे बाळांचं
वजन. ते पुरेसं भरेल वा नाही हे आधी कसं सांगणार? पण वजन कमी आहे असं सांगितलं की
हमखास विचारणा होते, ‘आधी कळलं नाही का?’
प्रसूतीपूर्व
सोनोग्राफीच्या अशा अनेकानेक मर्यादा आहेत.
प्रत्येक तपासणीच्या
मर्यादा प्रत्येक पेशंटला समजावून सांगणं शक्यच नसतं, आवश्यक मात्र असतं. हे
समजावून सांगायचं तर शरीरशास्त्राचं काही किमान ज्ञान आधी अपेक्षित असेल, मग पुढे
येईल ती अतिशय क्लिष्ट भाषा, किचकट जर-तरनी मढलेली विधानं आणि धोक्याची अनेक वळणं.
परिपूर्णपणे ही माहिती द्यायची तर दोन तीन पानांचा ऐवज होईल, तो अति पातळ कागदावर,
अति छोट्या टायपात छापावा लागेल. मग कर्जाच्या किंवा इंटरनेटच्या फॉर्मवर जसा ‘आय
अॅग्री’ असा एक चौकोन असतो तसा चौकोन छापून त्याच्या खाली सही घ्यावी लागेल.
अर्थात हे असं केलं, की कोणी ते वाचायच्या फंदात पडणार नाही. निव्वळ उपचार म्हणून
सही केली जाईल, आपण बँकेच्या, इंन्स्यूरन्सच्या, जागेच्या खरेदी-विक्रीच्या,
फॉर्मवर करतो तशी. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. डॉक्टरबद्दलचा वाढता
अविश्वास आणि ‘आधी कळलं नाही का?’ हा नवा आजार लक्षात घेता लवकरच असे फॉर्म
पावलोपावली भरून घेतले जातील असं दिसतं.
नीट विचार केला तर लक्षात
येईल की, ‘बाळ नॉर्मल आहे का?’ हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर
एकच आहे; ‘सांगता येत नाही!’ बाळ हा एक सतत विकसित होत जाणारा, वाढणारा, नवेनवे
गुण निर्माण होणारा जीव आहे. ज्या स्थितीत आपण ते तपासतो त्याबद्दल आज काहीतरी
सांगता येईल पण उद्या काय घडेल, याची भविष्यवाणी नाही करता येणार. उदाहरणार्थ बाळ
पोटात असताना भोवतालचं पाणी पितं. ते पाणी त्याच्या पोटातून पुढे पुढे सरकतं,
आतड्यात पोहोचतं. ह्या पाण्यामुळे आतड्याची वाढ होते. पुढे हा पाण्याचा, त्यातील
पेशींचा लगदा आणखी पुढे सरकतो. मोठ्या आतड्याची वाढ होते. बाळाची आतडी ही अशा पद्धतीनी
तयार होतात. हे सर्व व्हायला अगदी नववा महिना उजाडतो. बाळाची आतडी, त्यांची हालचाल
असं सगळं सुरवातीला दिसलं तरीही पुढे तो लगदा पोहोचेल का त्यांची वाढ होईल का? याबद्दल
आपण सुरवातीलाच काहीही सांगू शकत नाही.
त्यामुळे बाळ नॉर्मल आहे का
नाही, हे सांगता येत नाही. हा प्रश्नच चुकीचा आहे. चुकीचा प्रश्न विचारला की
उत्तरही निरुपयोगी मिळणार. आपण आता प्रश्न बदलून विचारू आणि उत्तर मिळतंय का ते बघू.
‘माझ्या बाळामधे दोष असण्याची अवाजवी शक्यता आहे का?’, हा प्रश्न शहाण्यासारखा
आहे.
ह्यात बाळात दोष असण्याची ‘वाजवी’
शक्यता गृहीत धरली आहे. हे महत्वाचं आहे. आपण काहीही कृती केली तरी काही तरी गोची होण्याची
शक्यता असतेच. घरातून बाहेर पडताना पाय घसरून पडण्याची शक्यता आहे का?, असा प्रश्न
विचारला तर उत्तर होकारार्थीच येतं. कारण अशी शक्यता शून्य कधीच असू शकत नाही.
नवजन्माचंही असंच आहे. सुमारे २% बाळांना गंभीर व्याधी (उदाः हृदयविकार) आणि २%
बाळांना किरकोळ स्वरूपाच्या जन्मजात व्याधी (एखादं बोटं जादा असणं) असतात. सोनोग्राफीत
बाळ ‘नॉर्मल’ आहे असं सांगितलं जातं तेंव्हा त्याचा अर्थ, ‘बाळात दोष असण्याची
अवाजवी शक्यता नाही’ एवढाच असतो. वाजवी शक्यता ही गृहीतच आहे.
वरील विवेचन सोनोग्राफी
संदर्भात असलं तरी सर्व तपासण्या उपचार-प्रणालींना ते लागू आहे. प्रत्येकाच्या
मर्यादा आहेत, त्या समजावून घेणं इष्टं आहे पण अवघड आहे. ‘आधी कळलं नाही का?’ ही भूमिका
सोपी आहे आणि सोयीस्कर आहे. एकूणच तनमनाचा थांग कधीच गाठता येणार नाही हे मान्य
करतानाच वैद्यकशास्त्राचा प्रयत्न धोका कमी करण्याचा असतो, तो शून्य कधीच होऊ शकत
नाही.
“ज्ञानमार्गी ही बुद्धी सदा
राहो, शल्यकर्मी कौशल्य प्राप्त होवो
थांग नाही तन-मनाच्या
तळाचा, थिटे सारे पण यत्न सदा राहो.”
हे वैद्यक विश्वाचं
प्रेरणागीत आहे.
पूर्वप्रसिद्धी दिव्य मराठी
२०/०६/२०१७. या आणि अशाच इतर लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा <shantanuabhyankar.blogspot.in>