लेखकाचे
मनोगत
मुमूर्षू
मराठी आणि क्यूटरस
डॉ. शंतनु
अभ्यंकर, वाई.
‘क्यूटरस’चं
भाषांतर करायला मी होकार दिला आणि मराठीच्या मरणाला आता आपणच कारणीभूत ठरतो की काय
असं मला वाटू लागलं. बहुत दिन जाहले मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे असे ऐकतो. मात्र
अजून काही म्हातारी मेलेली नाही. दिसामासांनी तिला मांस चढत आहे असेही नाही आणि दिसामासांनी
तिचे मांस झडत आहे असेही नाही. मी आपला
गरीब बिचारा, माझ्यापुरता मराठी प्रेमी होतो आणि आहेही. मी लिहितो सहसा वैद्यकीय विषयांवर आणि मग न चुकता मराठी
प्रतिशब्दांचा वापर करत लिहितो. तेवढीच
आपली माय मराठीची सेवा. मात्र क्यूटेरसच्या घुटक्याने माय मराठीने शेवटचा आचका दिला तर? हे पातक माझ्या
माथी कशाला? मी आपला ‘क्यूटेरस’ची प्रत अनिमिष का काय म्हणतात तसल्या नेत्रांनी
पुन्हा पुन्हा पहात राहिलो.
‘क्यूटरस’
हे डॉ. तनया नरेंद्र उर्फ डॉ. क्युटेरस हीचं गाजत असलेलं पुस्तक. पुस्तकातली
भाषा ही कॉलेजमधली, थेट कॉलेजकट्ट्यावरची; त्याहीपेक्षा बॉईज हॉस्टेलच्या खोल्यांमधली ही भाषा. कदाचित लेडीज होस्टेलच्या खोल्यांमधीलही असेल. स्त्री
पुरुष समानता जशी जीव धरू लागली आहे तशी मुलांची आणि मुलींची भाषा एकजीव होऊ लागली
आहे. त्यामुळे
मुली काही वेगळ्या भाषेत आणि वेगळं बोलत असतील असं मला वाटत नाही. ही भाषा अतिशय थेट, मोकळीढाकळी, शिव्या आणि
कमरेखालच्या अवयवांच्या उल्लेखाने भरलेली.
अर्थात हे
सगळे इंग्लिशमध्ये होतं. त्यामुळे ते चालून जात होतं, उलट वाचायला गोड वाटत होतं. मनातल्या मनात यातील काही वाक्यांचा मी अनुवाद
केला. मराठीत ते वाक्-प्रयोग इतके खटकत होते की विचारायची सोय नाही. फक्, शीट,
बॉलस् यासारखे शब्द भाषांतरीत करायचे म्हटलं तर मामला तितका सीधा राहात नाही. एक तर यांचे
मराठी प्रतिशब्द आपल्या बोलण्यात नाहीत आणि वैद्यक-विज्ञान लिहिण्यात तर नाहीतच नाहीत.
त्यात ठिकठिकाणी
व्याकरणाचे पार बारा वाजले होते. ‘मी
सांगितलं त्याला, खुद का बिझनेस माइंड कर ना!’ अशा सारखी वचने होती. त्याच बरोबर
हिन्दी शब्दांची मुक्त सरमिसळ इथे होती. मराठीची प्रमुख मारेकरी इंग्रजी नव्हे तर
हिन्दी असणार आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे हिन्दीबद्दल मला विशेष राग. आता
ह्या भाषांतराच्या निमित्ताने ह्या साऱ्या शब्दांचं, व्याकरणाचं भरताड मराठीत आणून
मी काय साधणार होतो? आधीच मराठीवर चहूबाजूने आक्रमणे होत असताना हे असलं काही करून
आपण नेमकी भाषेची सेवा करतो आहोत की घात करतो आहोत, असा प्रामाणिक प्रश्न मला
पडला. ही भाषा फार शुद्ध करून, सोवळी करून घेण्यातही अजिबात अर्थ नव्हता. असं करणं
म्हणजे ‘चंपा’ची ‘सिंधू’ केल्यासारखं झालं असतं. (आणि भाषा वेगळ्या अर्थानी सोवळी
झालीच असती!)
मग मी विचार
केला, असली भाषा वापरुन डॉ. तनयानी इंग्रजीचं नुकसान केलंय का? जगभरातील बोलीतील
शब्द रिचवून आज इंग्रजीची १५-२० रुपे जगभर
प्रचलित आहेत. हे चांगले का वाईट? मग
हॉस्टेलमधल्या खोल्यांतील मराठीचे एक रूप
कागदावर उतरवले तर बिघडलं कुठे? मग
अशी भाषा वापरणाऱ्यांसाठी त्याच भाषेत विज्ञान सांगितलं तर बिघडलं कुठे? याने मराठी भाषा झाली तर पुष्टच होईल.
भाषा
प्रवाही असते. गाहा सत्तसईतील भाषा किंवा ज्ञानेश्वरीतील
भाषा ही मराठीच आहे पण ती समजावून घ्यावी
लागते. आपल्या आसपासची भाषा आपल्याला
आपलीशी वाटते. वाचवायची तर ती वाचवायची अशी आपली धारणा असते. आपलं आयुष्य किती?,
भाषेचं किती?; फार तर या भाषा वाचवण्याच्या भानगडीत आपल्या आसपासची भाषा आहे तशी ठेवण्याचे प्रयत्न
आपण करू; पण त्याला अर्थ किती? तुम्ही कितीही आपटा, उद्याची भाषा तर वेगळीच असणार
आहे. शब्द वेगळे, वाक्प्रचार वेगळे, आजच्या शब्दांचेही अर्थ वेगळे, व्याकरण वेगळे;
हे तर होणारच. तेंव्हा भाषा वाचवण्याचं ओझं मी जरा खाली ठेवलं आणि मला हुश्श झालं.
भाषा ही
विषयाला न्याय देणारी असावी लागते. इथली भाषा
ही एखाद्या डॉक्टरच्या लेखणीत अजिबातच शोभेशी नाही.
शीलवंत, मर्यादशील अशी ती नाही. डॉ.
विठ्ठल प्रभू, डॉ. लीना मोहाडीकर, डॉ. शशांक सामक प्रभृतींनी लैंगिकतेबद्दलच
लिहिले आहे, पण असे नाही. पण जो संदेश या
लिखाणातून पोहोचतो तो या भाषेमुळे थेट तरुणाईच्या हृदयाला भिडतो. लेखिकेचे
इंस्टाग्रामवर १.८ कोटी फॉलोअर्स आहेत आणि त्यापेक्षा कितीतरी पट व्ह्यूज आहेत. एका आधुनिक माध्यमाचा अतिशय चपखल वापर करत
आपल्याला जो हवा तो मुद्दा हृदयापर्यंत पोहोचवण्याची किमया डॉ. क्युटरसला साधलेली
आहे. मग निव्वळ भाषेमुळे आपण याकडे पाहून ‘नाक
मुरडोफाय’ करायचं काय?
ती जे
सांगते ते वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय बिनचुक आहे. त्याच वेळी कॉलेजच्या पुस्तकांमध्ये नसते
आणि कदाचित कदापी असणार नाही अशी अतिशय
प्रॅक्टिकल माहिती ती देत जाते. कंडोमचे प्रकार किती?, बाह्यांगावरचे केस म्हणजे, झ्याटं काढायची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे पाठ्यपुस्तकातही नसतात. पण हेच तर प्रश्न आजच्या
मुलामुलींच्या मनात असतात. सहनही होत नाही, सांगताही येत नाही आणि विचारताही येत
नाही अशा सामाजिक माहोलमधे या थेट प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं तरुणाईच्याच खट्याळ आणि नाठाळ भाषेत इथे दिली आहेत.
लेखिकेची वृत्ती
आक्रमक आहे. तुम्ही स्त्रियांच्या बाह्यांगाला
‘पुसी’ आणि स्तनांना ‘बॉल्स’ म्हणता ना? मग
मीच तसं म्हणते, म्हणजे प्रश्नच मिटला; असं म्हणून डोळा घालत, वरती चावट विनोद करत
ज्ञान आणि रंजन एकाच वेळी पोचवण्याचा हा खेळ चालतो. अधोभाषेतले हे शब्द स्वत: आणि
स्वतःबद्दलही वापरून लेखिका ती भाषा वापरणाऱ्यांना जणू प्रत्युत्तर देते, आव्हान
देते. तुम्ही ‘पुसी’, ‘बॉल्स’
म्हणताय ना मग मीही म्हणते, मी लाजत नाही. ओशाळत नाही. मी का
लाजावं? आता मी तीच भाषा वापरली म्हणून तुम्ही संकोचू नका.
नंगे को खुदा भी डरता है, असा हा अॅटीट्यूड आहे. काही वेळेला ही रांगडी भाषा
उगाचच पांघरलेले संकोचाचे बुरखे फाडायला उपयुक्त ठरते. आपल्याकडचा लैंगिकतेबद्दलचा
आचार म्हणजे ढोंगाचे एकावर एक सात बुरखे
पांघरल्यासारखे आहे. ही भाषा वापरुन ती मेसेज मात्र अत्यंत पुरोगामी, आधुनिक देते. हायमेन ही कौमार्य-खूण नाही, असं ठासून सांगते.
स्त्रियांच्या अवयवयांना धर्माने पापाचे आगर ठरवलंय, याबद्दल त्वेषाने बोलते, पुरुषप्रधान
संस्कृती विरोधात एल्गार पुकारते. तिचं म्हणणं पटतं, तेंव्हा
भाषा दुर्लक्षित होते.
असल्या
भाषेतलं हे मूळ इंग्रजी पुस्तक तडाखेबंद
खपते आहे. पेंग्वीनसारख्या मातबर प्रकाशनसंस्थेनं काढलेलं आहे.
भाषांतर
करायचं ठरल्यावर रीतसर इतर अडचणी लक्षात येऊ लागल्या. काही श्लेष हे भाषांतर न
करता येणार येण्यासारखे असतात. ते तर सोडून द्यावे लागणार हे उघडच होतं. काही
वाक्प्रचार मराठीत नाहीत तर काही
वाक्प्रचार इंग्रजीत नाहीत. उदाहरणार्थ इंग्रजांच्या गोट्या कधी कपाळात जात नाहीत!
त्यामुळे हा वाक्प्रचार इंग्रजी बुकात
नाही. डॉ. तनया ह्या वाक्प्रचारापासून वंचित राहिलेली आहे. पण भाषांतरकाराला अशा
जागा दिसतात. आता काय करावे? समर्पक स्थळी तो वापरावा की मुळात नाही म्हणून सोडून द्यावा?
अशी सारी
प्रश्नपत्रिका तयार करून मी सरळ डॉ. तनयाला फोन लावला. मी कोण काय वगैरे सांगितल्यावर मी पहिला प्रश्न
केला, ‘या भाषांतराच्या बाबतीत तुझी माझ्याकडून किमान अपेक्षा काय आहे?’ आणि
झटक्यात उत्तर आलं, ‘भाषेतली गंमत घालवू नका!’ मग ‘गोट्या कपाळात’चाही प्रश्न
विचारला. त्यालाही खुली परवानगी मिळाली. हे बरं झालं. तो तो लेखक/लेखिका
महाराष्ट्रात जन्माला येऊन इथेच लहानाची मोठी झाली, तर त्यांनी हेच पुस्तक कसं
लिहिलं असतं, असा विचार करून मी भाषांतर करत असतो. हे त्याला साजेसच झालं.
मग मात्र मी
सुटलोच.
‘यानंतर
मीझोप्रोस्टॉल हे लिंबू (पण टिंबू नाही असे) औषध दिले जाते यांनी युटेरस
लिंबासारखे पिळले जाते.’ अशी वाक्यं मी बेलाशक रचू लागलो. मग ‘Don’t
get excited’चं, ‘उगाच उडू नका’ झालं. ‘A new kind of light
sabre if you will’चं ‘लिंगशलाका जिंदाबाद’ झालं. ‘Hormonal
roller coaster’चं झोपाळ्यावाचून झुलणे झाले. ‘You will be
walking around like an inflamed angry asshole’चं, ‘त्या टेरी
शेकलेल्या कोल्होबासारखे तुम्ही चालू लागाल’ झालं. ‘Questionable research
says’ला, ‘जावईशोध आहे’ असा खास मराठी शब्द मी
वापरला. मराठी भाषेचा लहेजा आपोआपच डोकावू लागला.
काही ठिकाणी पर्याय सापडलेच नाहीत ‘a
fuckton of spinach’ला, ‘गाडाभर पालक’ म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता.
‘बेस्ट, बिगेस्ट आणि हुशारेस्ट विद्यार्थी’ असं लिहिण्यात मला काही
वावगं वाटेनसं झालं. सॅली राइड आणि काही दिवसांच्या
अंतराळ सफरीसाठी तीला नासाने पुरवलेले शंभर टॅंपून, ‘फ्रेंडस्’ मालिका असले संदर्भ मराठी वाचकांना लागणार नाहीत.
त्याबद्दल तिथेच खुलासेवार लिहिले. लेखिकेने वाचकांचे लिंग कधी स्त्री तर कधी पुरूष
गृहीत धरले आहे. इंग्रजीमध्ये याने फारसा
फरक पडत नाही मात्र मराठीत पडतो. बहुतेक
ठिकाणी वाचक ही एक स्त्री आहे असं गृहीत धरून मी लिखाण केलं आहे. मराठीतील
उभयलिंगी शब्दांचा अभाव हीही एक अडचण जाणवली. ‘पार्टनर’म्हणजे
तो किंवा ती. या शब्दाचे ‘जोडीदार’ असं
भाषांतर करावं तर तो फक्त ‘तो’ होतो, जोडीदारीण असं करावं तर मग ती फक्त ‘ती’ होते, जोडीदार किंवा जोडीदारीण असं म्हणावं तर ते वकिलांनी केलेलं भाषांतर
वाटतं.
अशा
अडचणींचा सामना करत हे भाषांतर पूर्ण केले आहे. हे करताना माझे मराठी प्रेम मधूनच
उसळी मारून वर यायचे. मग अगदी तावातावाने अवघड, अनवट असे अस्सल मराठी शब्दप्रयोग
मी पेरलेले आहेत. कमरेखालचे चटकदार साहित्य वाचताय ना, मग मानेवरचा भागही वापरा.
असो, अशा
रीतीने सिद्ध झालेली ही कलाकृती वाचकांच्या हाती सुपूर्द करताना मला आनंद होतो
आहे. मधुश्री प्रकाशनचा सर्वेसर्वा, माझा मित्र शरद अष्टेकर, संपादक प्रणव सखदेव
आणि सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.