Friday, 22 September 2023

जगी व्याधी नाही असा कोण आहे?

 

जगी व्याधी नाही असा कोण आहे?

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

 

मी बेल वाजवली. एक सुस्वरूप जोडपं आत आलं. या बसा झालं आणि फाइल टेबलावर सरकवत, हलक्या आवाजात ती म्हणाली ‘आम्हाला हे मूल नकोय. गर्भपात करायचा आहे.’ दोघंही दृष्ट लागण्यासारखे देखणे होते, अगदी सुस्वरूप आणि ऐटबाज होते. कपडे आणि हिऱ्यांचे डेकोरेशन बघता, गडगंजही  असावेत.  

‘का? का नकोय?’

‘ते लंगडं होणार आहे! त्याचे पाय वेडेवाकडे आहेत, फेंगडे आहेत, दोष आहे पायात. असलं वेडंविद्र मूल आम्हाला नकोय.’ फाईल आणखी पुढे ढकलत ती  म्हणाली.

बापरे एकाच वाक्यात त्यांनी त्या  बाळाला लंगडं, फेंगडं,  वेडं आणि विद्रं ठरवलं  होतं. सहसा असं कोणी बोलत नाही. मला काय बोलावं सुचेना. आवाजात अर्जन्सी आणि हालचालीत अधीर असे ते दोघे, मी काहीच बोलत नाही  म्हटल्यावर आपोआपच जरा शांत झाले.

मी फाईलमधील रिपोर्ट पाहू लागलो. त्या बाळाचे एक पाऊल किंचित दुमडलेले होते. आतल्या बाजूला वळले होते.

‘गर्भपात करायचाच आहे का? पण हा दोष तसा विशेष नाहीये.’ मी म्हणालो.

‘पण जो आहे तो दोषच आहे ना?’ त्यांच्यातला तो, ठामपणे, खर्जातल्या दमदार आवाजात म्हणाला. 

‘आता तर पाचवा चालू आहे. आत्ता गर्भपात त्रासदायक ठरू शकतो.’ त्यांना जाणीव असावी म्हणून मी सांगू लागलो.

‘पण आधी कळलं तर आम्ही आधी येणार ना? हा दोष तर पाचव्यातच कळतो.’ मला निरुत्तर करत, पुन्हा तो.

‘पण तुमची पहिलीच खेप आहे, गर्भपाताचा त्रास  आणि दोष तसा सहज बरा होण्यासारखा आहे.’

‘आम्ही गूगल करून आलोय डॉक्टर. आधी प्लास्टर, मग ऑपरेशन मग पुन्हा खास बूट असा सगळा प्रकार आहे. नकोच ते.’ आता तीही तितक्याच ठामपणे सांगू लागली.

‘अहो, पण हे सगळं केल्यावर अगदी नॉर्मल होणार आहे बाळ, काही त्रास होता याचा मागमूसही राहणार नाही.’

सोनोग्राफीची त्रिमिती चित्रही त्यांच्या  सोबत होती. आता त्यांनी, ती बाहेर काढली. त्यात ते इवले पाऊल, त्याचा अनैसर्गिक बाक अगदी स्पष्ट दिसत होता. बाळाचा पाय वाकडा पडणार हे कोणीही सांगावं. त्यासाठी पाय पाळण्यात दिसायचीही गरज नाही.

चित्र दाखवत मी म्हणालो, ‘हेच तर मी म्हणतो आहे. उपचारच  नाही घेतले, तर हा दोष म्हणायचा. पण नीट उपचार तर तुम्ही घेणारच, मग एवढी काळजी कशाला?’

दोघेही त्या चित्रांकडे हतबुद्धसे  बघत होते. ज्या आधुनिक तंत्रज्ञानाने निदान शक्य केले होते त्यानेच निर्माण केलेली ही प्रतिमा मात्र त्या बाळाच्या मुळावर उठली होती. त्या होणाऱ्या आई-बाबाला घाबरवून टाकत होती.   कीव आणि कारुण्याची हलकी छटा माझ्या चर्येवर उतरली असावी.  

‘कित्ती काळजी घेतली आम्ही.’ त्यांच्यातली ती अगदी  तळमळून सांगू लागली, ‘ह्याला सिगरेटसुद्धा  सोडायला लावली मी!’ अपराधी सुरात तिने सांगितले.

 ‘मग चांगलं झालं की. तेवढाच फायदा.’

पण माझा मुद्दा तिनी जणू ऐकलाच नव्हता; ‘सहा महीने शरीरशुद्धीसाठी जात होते मी. शिवाय स्प्राऊटस्, फोलीक अॅसीड,  प्रि-कंसेप्शन योगा, चहा-कॉफी बंद आणि त्यातून हे असं. डॉक्टर, आमचं  मूल आम्हाला शोभेल असं नको का? हे असं अपंग मूल नकोय आम्हाला. आम्हाला परफेक्ट मूल हवंय!’

‘अहो पण इथे कोण परफेक्ट आहे? तुम्ही आहात का?’ मी जरा चढया सुरांत विचारलं; ‘मी आहे का? आत्ता काही टेस्ट केल्या तर कोणते आजार होऊन गेले, कोणते होऊ शकतात अशी कुंडली मांडता  येईल सगळ्यांचीच.’  

‘डॉक्टर काय सांगू तुम्हाला, हे असं कळल्यापासून आसपास सारखी अधू माणसे दिसतात. तीन-चार पायऱ्यांकडेही डोंगराकडे पहावं तसं पहाणारी, गर्दीत मागे मागे मागे पडणारी; परवा एअरपोर्टवर  व्हीलचेअरवरून टॉयलेटच्या दाराशी, हताशपणे झटापट करणारी एक मुलगी  दिसली. म्हणजे, आधीही ही माणसं होतीच की,  पण त्यांच्या अडचणी मला जाणवल्या नव्हत्या. नुसतं म्हणायला दिव्यांग हो, पण तशा सोई सुविधा कुठे आहेत? तुमच्या दवाखान्यातही पायऱ्या चढूनच यावं लागतं.’ तीनी आवंढा गिळला.

‘समजा, हा गर्भ पाडला, मग पुढच्यावेळी सगळं सुरळीत होईल याची खात्री आहे का? पुढच्यावेळी आणखी काहीही असू शकतं, क्वचित काही यापेक्षा गंभीरही!’ आता मात्र ते विचारात पडले.

पुढे बराच वेळ मी त्या दोघांना समजावत होतो. किरकोळ, दुरुस्त होण्याजोग्या व्यंगासाठी टोकाचं पाऊल कशाला? अर्थात  त्यांचीही काही बाजू होती. आणखीही व्यंग असली तर?, शाळेतली चिडवाचिडवी, हिणवणे, आई-बापालाच बोल लावणारे लोक, साध्या टॉयलेटसारख्या सुविधांचा अभाव,  लग्न, पुढच्या पिढीत हे उतरलं तर, अशा चिंता होत्या. निदान या बाळापुरत्या तरी त्या लागू नाहीत अशी मी खात्री दिली. अशा बाळांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची आणि  अशाच  अन्य पेशंट-कुटुंबियांची गाठ घालून देईन असं आश्वस्त केलं. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असंही  बजावलं. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही सांगितलं. अखेर सध्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या बोलीवर ते बाहेर पडले.

हे  प्रकार आता वाढत चालले आहेत. सोनोग्राफीमुळे,  अनेक व्यंग, मूल पोटात असतानाच समजतात. त्यातील काही दुखणी  सरळ सरळ जीवघेणी असतात. मुलाचे डोकेच तयार झालेले  नाही. कवटी, छाती किंवा पोट उघडे  असून सारे अवयव बाहेर डोकावत आहेत वगैरे. इथे गर्भपातच हिताचा. निर्णय सोपा. यातले काही जीवघेणे आजार मुळी उशीराच लक्षात येतात. उशीराही गर्भपाताचा हक्क मिळावा म्हणून बराच झगडा द्यावा लागला. अखेर तो हक्क मिळाला आहे.

दोन टोकाच्या केसेसमधे परीस्थिती बरी असते; पेशंटला गर्भपाताला प्रवृत्त किंवा परावृत्त करणे एवढेच काम असते.  पण काही मधलेअधलेही आजार असतात. उदा: कमरेचा मणका उघडा असणे. यात ऑपरेशन करून  मूल नीट चालू शकेल का?  हा तर प्रश्न असतोच पण शी-शूवर नियंत्रण, मेंदूची नीट वाढ, असेही अनेक प्रश्न असतात. सोनोग्राफीनेही ते अनुत्तरित रहातात. काही आजारांत मुलाची काळजी हे पूर्ण वेळचे काम ठरू शकते. सतत सेवेकरी लागू शकतात. कोणाच्या तरी, म्हणजे बहुदा आईच्याच, करिअरला ब्रेक लागू शकतो. कधी  अनेक ऑपरेशने लागू शकतात. ती कमी अधिक यशस्वी  ठरू शकतात. काही उपचार त्या कुटुंबाच्या ऐपतीबाहेर असतील तर असून नसल्यासारखेच.    या साऱ्याचा मानसिक आणि आर्थिक ताण काहींना झेपतो, काहींना नाही.  म्हणूनच ज्या त्या जोडप्याने घेतलेला निर्णय ज्या त्या वेळी बरोबरच असतो. त्यांनी त्याचे वैषम्य किंवा गंड बाळगो नये.

मात्र कित्येकदा अत्यंत छोटंसच काही व्यंग असतं. छोट्याशा उपचारांनी, शस्त्रक्रियेनी किंवा कालांतराने भरून येणारं असतं आणि गर्भपात करून द्या अशी मागणी येते. पर्फेक्शनचं खूळ कोणतीही तडजोड स्वीकारायला तयार नसतं. ज्यांना परवडतं ते तर निव्वळ पायाला सहा बोटं आहेत म्हणूनही गर्भपात करा म्हणतात! मग शब्दात पकडण्याचा खेळ सुरू होतो,

प्रश्न येतो, ‘एक दोष दिसतोय याचा अर्थ न दिसणारे अन्यही असू शकतात, हो ना?’

‘असू शकतात.’ डॉक्टर.

‘मग नको हे मूल.’

पण एकही दोष न दिसताही कित्येक दोष असू शकतातच की. जगी व्याधी नाही असा कोण आहे? असे फुसक्या कारणाने केलेले गर्भपात म्हणजे कायद्याचा गैरवापर आहे. देवानं दिलेलं लेकरू समजून,  जसं असेल तसं निमूट स्वीकारणारे बरे म्हणायचे.  अपंगत्वाबद्दल समाजाने अधिक सहनशील आणि स्वागतशील असायला हवं. गर्भपात हे एक जीव संपवणेच आहे. समाज आणि कायदा मात्र त्या दृष्टीने याकडे बघत नाहीत.

एरवीही क्वचितच कुणा डॉक्टरच्या किंवा पेशंटच्या मनात केल्या कृत्याबद्दल अपराधभाव असतो. डॉक्टर, पेशंट, समाज सगळ्यांचीच मानसिकता लोकसंख्या स्फोटाच्या भयछायेत घडलेली आहे. तेंव्हा लोकांची संख्या कमी करणारा  प्रत्येक उपाय, म्हणून गर्भपातही, आपण वंद्य मानला आहे. खास अपवाद म्हणून वापर अपेक्षित असताना तो आम झाला आहे. चार चॉकलेटं मटकवावीत इतक्या सहजतेने बायका गर्भपाताच्या गोळ्या मटकावत असतात.  

ओठ फाटलेला असणे, हृदयाला अत्यंत छोटे छिद्र असणे, नाळेत दोनच्या ऐवजी एकच रक्तवाहिनी असणे.., बाळ घडण्यातल्या अशा अनेक  त्रुटी सोनोग्राफीत दिसतात. त्या दिसतात म्हटल्यावर नोंदल्या जातात. नोंदल्याच आहेत म्हटल्यावर पेशंटला सांगितल्या जातात आणि मग ‘आत्ताच्या आत्ता गर्भपात करा’ पासून ‘तुम्ही सांगताय ना डॉक्टर, मग ठीक आहे,’  पर्यंत प्रतिक्रिया उमटतात.

सोनोग्राफीत न ओळखता  येणाऱ्या व्याधी, जन्मल्यानंतरच कळणाऱ्या गोष्टी याबद्दल या परफेक्शनिस्टांचे काय म्हणणे असते? नजीकच्या भविष्यात बाळाला अमुक वयात तमुक आजार होईल, ते पाच किंवा पंचवीस वर्षच जगेल, असेही  ज्योतिष शक्य आहे; मग अशा बाळांना जन्म द्यायचा की नाही?  

अर्थात हे भविष्यात, इतका पुढचा विचार कोणी करत नाही. होणाऱ्या आईबापाला तात्काळ येणाऱ्या अडचणींच्या पायऱ्या दिसत असतात आणि  वर्तमानात, माझ्याही  दवाखान्याला, चारच का असेनात, पायऱ्या आहेतच की.

 

 

प्रथम प्रसिद्धी

लोकसत्ता

चतुरंग पुरवणी

२३.९.२०२३

  

 

 

Saturday, 19 August 2023

वेस

ही वाईतली वेस

फोटो काढलाय मित्रवर्य डॉ. प्रशांत रसाळ यानी, बाकी कवित्व माझे ☺️


त्या वेशीच्या अवतीभवती
गजबजलेले गाव

जीर्ण वेशीवर मुळी धरोनी
पिंपळ करतो घाव 

त्या वेशीवर भगवा झेंडा 
फडके पण डौलाने 

वाई वैभव जुने सांगतो, 
फडकत नव वाऱ्याने

Friday, 18 August 2023

प्रिय बाबांना

काही दिवसापूर्वी मला हे निनावी पत्र मिळालं.
लिहिणारी मुलगी माझी वाचक, फॉलोअर, फॅन वगैरे आहे म्हणे. 
घरी पाठवलेल्या पत्राची प्रत तिने मला पाठवली.
वाचून मी विचारात पडलो.
यावर लेखही लिहिणार होतो.
पण पत्रातली तळमळ लेखात उतरेना.
म्हणून हे मूळ पत्र. 



प्रिय बाबांना,
सा. न. वि. वि.
मी तुम्हाला सावध करायला आणि दादूला वाचवायला हे पत्र लिहिते आहे. घरातला कोणीतरी डॉक्टर असावा ही तुमची इच्छा, तिची झाली महत्त्वाकांक्षा; मग तुम्ही ती माझ्यावर लादलीत! खरं तर आपण कोणावर काही लादतोय हे त्यावेळी तुम्हालाही कळलं नव्हतं आणि मलाही. त्यामुळे तुम्हाला माफ. आणि खरं सांगायचं तर माझं विशेष असं नुकसान सुद्धा झालं नाही, निदान अजून तरी नाही. माझं भलं झालंय असं वाटून आता तुम्हाला पुन्हा लालसा होते आहे.
पण आता दादाच्या वेळी ही चूक पुन्हा करू नका. मला घातलेत तसे पर्यायी वैद्यकीच्या कुठल्याही कॉलेजला त्याला घालू नका. त्याला मार्क कमी आहेत, त्याला चांगल्या प्रस्थापित वैद्यकीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणार नाही. पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर करू देत. नसेल करायचा तर वैद्यकीचा नाद सोडून अन्य पर्याय निवडू दे, पण या वाटेला, चुकून सुद्धा त्याला या वाटेला, पाठवू नका. तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. डॉक्टर, इंजिनियर सोडून पुष्कळ पर्याय आहेत आता.
आपला करियर ऑप्शन चुकला हे इथले बहुसंख्य सिनीयर विद्यार्थी मान्य करतात, अर्थात खाजगीत. पर्यायी वैद्यकीचा पर्याय किती चांगला आहे, हे आमच्या कॉलेजच्या प्राचार्यानीच, तुम्हाला अगदी घरी येऊन पटवून दिलं आहे, हे मला माहीत आहे. त्यांना विद्यार्थी गटवावे लागतात! त्यांना टार्गेट गाठायचे आहे, बाबा. त्यांना दादूच्या रूपाने आणखी एक सीट हवी आहे. या सगळ्या मागचे इकॉनॉमिक्स समजावून घ्यायला पाहिजे. माझी तर आता इंटर्नशिप संपत आली. पण बाहेर पडलेल्या सिनीयर्सची अवस्था मी बघते. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. सरकारी नोकरीत संधी अगदी तुरळक. दुय्यम नोकरी किंवा जेमतेम प्रॅक्टिस असे दोनच पर्याय उरतात शेवटी. निव्वळ ‘पर्यायी’ प्रॅक्टिसवर भरवसा नाहीच ठेवता येत. 99.99% लोकांना अॅलोपॅथीची कास तर धरावीच लागते. अगा जे शिकलेची नाही, त्याची प्रॅक्टिस करिसी काही, अशी अवस्था होतेच होते. तुटपुंजे ज्ञान आणि कायद्याची भीती, यातून वाट काढत प्रॅक्टिस अशी किती चालणार? आजकाल पेशंटही अती चौकस झाले आहेत. जी ती गोष्ट गुगल करतात, वेडेवाकडे प्रश्न विचारतात, शब्दात पकडतात, उक्ती आणि कृतीतून थोडे थोडे अपमान सुद्धा करतात. मला नाही वाटत, हे सारं दादूने जन्मभर सोसावं.
डिग्रीनंतर इथे फारसे काही शिकायचीही संधी नाही. शिकायचे काय तर तीच कुचकामी विद्या. डिग्रीचे पोकळ भेंडोळे ठेवायला, पदव्युत्तर पदवीचे एक आणखी एक मोठ्ठे पोकळ नळकांडे. नावापुढे मारे एमडी गायनॅक लिहितील पण पर्यायींना वैद्यकीय गर्भपात किंवा सोनोग्राफीची परवानगी नाही. सध्या सोनोग्राफीशिवाय या क्षेत्रात पानही हलत नाही. कशी प्रॅक्टिस करणार? काही जणांना सर्जरी वगैरे शिकायला मिळते पण त्या बरोबर आधुनिक औषधे वापरण्याला लाल-पिवळा कंदील. कोणती वापरू शकतो, कोणती नाही, सगळाच धूसर कारभार. फट म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याच्या जमान्यात आहोत आपण. किती टेंशन येईल दादूला, अशी सतत टांगती तलवार घेऊन प्रॅक्टिस करायची तर. बरं, परदेशी जाईल म्हटलं तरी या डिग्र्यांना तिथे किंमत शून्य.
एरवीसुद्धा सतत दुय्यम वागणूक मिळते बाबा. समाजच काय पण सरकारही सतत पाणउतारा करते; म्हणून सारखे अर्ज, विनंत्या, मोर्चे चालू असतात इथे. पर्यायी आणि प्रस्थापित समतुल्य नाहीत, सबब सारखे पगार वगैरेची अपेक्षा नको, असं तर सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. तुम्ही नाही, पण काहींच्या घरचेसुद्धा धड बोलत नाहीत. या साऱ्यांचं तरी काय चुकलं म्हणा? म्हणायचं चल तुला पायलट करतो आणि शिकवायचं कागदी विमान उडवायला; अशातलं शिक्षण आहे हे. दादूला हे पटायचं नाही. दादू हुशार आहे. चार दोन मार्कांनी हुकली अॅडमिशन म्हणून काय झालं. किती वाचन आहे त्याचं. बोलतो कसला भारी. क्विझ किती सहज जिंकतो. त्याची बौद्धिक उपासमार होईल या वातावरणात. न्यूनगंड निर्माण होईल त्याला. इथे हास्यास्पद, कालबाह्य सिद्धांत शिकावे लागतात. इथे कोणत्याच औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता आकडेवारीने सिद्ध नाही. राजा विवस्त्र असतानाही त्याच्या भरजरी कपड्यांची तारीफ करावी लागते इथे. तो बिचारा प्रामाणिक आहे. त्याला नको इथे.
मला सांगा, पर्यायी वैद्यक भारी आहे, श्रेष्ठ आहे, प्रस्थापित वैद्यकीला जर ‘पर्याय’ आहे तर या पर्यायी वैद्यक संस्था, संघटनांना ब्रिज कोर्सची मागणी का करावी लागते? हे विचित्र नाही वाटत तुम्हाला? शिवाय हा पूल ‘पर्यायी’पासून प्रस्थापित विद्येकडे हवा आहे. मग हा पूल एकेरी वाहतुकीचा का? उलट दिशेने, या दिव्य विद्यांकडे कोणीच का फिरकत नाही? तशी मागणी कोणीच का करत नाही? आणि जर का या पर्यायी विद्या त्यांचे ठेकेदार सांगतात तशा स्वयंभू आहेत, यच्चयावत व्याधी सहज दूर करणाऱ्या आहेत, प्राचीन आणि म्हणून स्वयंसिद्ध आहेत; तर मग एका दिव्य पद्धतीकडून दुसऱ्या दिव्य पद्धतीकडे जाणारे ब्रिज कोर्स का नसावेत? अशी मागणी का होत नाही? कारण स्पष्ट आहे बाबा, कारण हे सगळे पर्यायी एकाच माळेचे मणी आहेत. तितकेच अवैज्ञानिक आणि पोकळ; तितकेच छद्म आणि भोंगळ. मग नागड्या घरी उघडं जाऊन काय फायदा? म्हणून सगळ्यांना ब्रिज कोर्स हवाय तो आधुनिक वैद्यकीच्या दिशेने जाणारा.
बाबा, इथल्या शरीर रचनेच्या, शरीर कार्याच्या कल्पनाच काल्पनिक आहेत. त्याला ना आगा ना पिछा, ना शेंडा ना बुडखा, ना व्याख्या ना काही, मग या संकल्पनांवर उभारलेला व्याधी-शास्त्राचा आणि उपचार-शास्त्राचा डोलारा हा हवेतला मनोरा ठरतो. हे असलं शास्त्र, आरोग्यविज्ञान म्हणून आमच्या माथी मारलं जात आहे. इथे येणारी सारी मुलं-मुली परिस्थितीशरण आहेत. तडजोड केलेली आहेत. मनानं खचलेली आहेत. दुय्यम, तिय्यम किंवा अखेरचा पर्याय म्हणून नाईलाजाने इथे वळली आहेत. काही आई बाबांची इच्छा म्हणून आणि प्रस्थापित वैद्यक कॉलेजची फी परवडत नाही म्हणून, इथे आहेत. आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलेलंच असतं, बाबा, फक्त चार लोकांत तसं उघडपणे बोलणं त्यांना कधीच शक्य होणार नाही. आमच्या शास्त्रात काही दम नाही असं उघडपणे सांगणार तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार, नाही का? दादुला ह्या मृगजळामागे नका तांगडू.
आणि मला तुम्ही इथे का घातलं हे का मला ओळखता येत नाही? एक तर मी मुलगी. नावामागे डॉ.चा टिळा लागला की माझ्यापेक्षा अधिक शिकलेला डॉक्टर, नवरा म्हणून मिळण्याची हमी. हा तुमचा साधा सरळ हिशोब आणि जातीतली मिळाली, शिवाय ती डॉक्टर, हा नवऱ्याचा साधा सरळ हिशोब. हे सगळं तुम्हाला दिसत होतं म्हणून मी इथे. माझ्या वर्गात 90 टक्के मुली आहेत. त्या देखील याच कारणाने येतात. मुलगे बिचारे इथे कोपऱ्यात बसतात आणि अंध:कारमय भविष्याची चिंता करतात. काही ना काही तरी जोडधंदे केल्याशिवाय भागत नाही त्यांचं. खरच सांगते, त्यांना लग्नासाठी स्थळ मिळणेसुद्धा अवघड जातं.
आपण वाट चुकलो हे माझ्या लक्षात आलं आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून, मनोमनी आपली पात्रता निव्वळ बारावी पास एवढी आहे हे जाणून अन्य पर्याय मी शोधणार आहे. जर्नालिजम, एमपीएससी, युपीएससी, असं काहीही. मीच का, इथे आलेले आम्ही सर्वच विद्यार्थी फसवले गेलेलो आहोत. आम्ही अभ्यासक्रम-ग्रस्त आहोत. तसं कोणी म्हणत नसलं, तरी ब्रिज कोर्स हा तर सरळसरळ पुनर्वसनाचा प्रयत्न आहे. आलो होतो विज्ञान शिकायला पण कुडमुडे डॉक्टर होऊन आम्ही बाहेर पडणार आहोत. चार लोकांत सांगायची देखील चोरी असणार आहे. आयुष्यभर तोंड दाबून बुक्क्यांचा मार. दादू मानी आहे, संवेदनशील आहे, तर्कनिष्ठ आणि विज्ञान-प्रेमी आहे. हे असले जिणं दादूच्या वाट्याला यायला नकोय मला. म्हणून सांगते मी बाबा, त्याला या वाटेला ढकलू नका.
बाकी पर्यायी पद्धती खऱ्या-खोट्या-छद्म वगैरे काहीही ठरू दे, आज तरी व्यवसाय म्हणून पर्यायीचा पर्याय टाळणे योग्य एवढेच माझे सांगणे.
तुमची ताई
आणि
त्या दादूची ताईटली

Sunday, 23 July 2023

मंगला नारळीकर श्रद्धांजली लेख

मंगलाताई नारळीकर गेल्या.

अगदी काही वर्षांचीच आमची ओळख. देख तर एकदाच. त्या डॉ.जयंतरावांबरोबर वाईला आल्या होत्या. मी त्यांना उत्साहाने माझी पुस्तकं दिली. निव्वळ सत्कृत्य भावनेने. पण लिखाण आवडल्याचं आवर्जून कळवलं त्यांनी.

नंतर फक्त पत्र-भेट. पण इतक्या थोडक्या कालावधीत, आदरणीय सौ. मंगलाताई नारळीकर यांस कृ.शी.सा.न.वि.वि. पासून, माय डियर मंगलमावशी पर्यंत मायने बदलत गेले. ह्याचे श्रेय त्यांचे.

दबक्या ओळखीच्या सुरवातीच्या दिवसांत त्यांचं एक पत्र आलं, थोडं दम भरणारं, दडपून टाकणारं पण प्रेमळ.

डॉ. शंतनु अभ्यंकर यांना नमस्कार,
तुमचे ‘ किशोर ‘ मध्ये प्रसिद्ध झालेले लेख कल्याणी अभ्यंकर गाडगीळ हिच्याकडून आले. तिने त्या लेखांच्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली.  
वास्तविक आपला परिचय आहे, तुम्ही वाईमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी येऊन भेटलात, तुमची पुस्तके दिलीत. ती आवडल्याचे देखील तुम्हाला कळवले होते. मग तुम्ही कल्याणीला मध्यस्थ का घेतलं? थोडक्यात, JVN is slightly irritated.
आता या लेखांबद्दल काय अपेक्षा आहे, ते तुम्हीच कळवा. JVN सहसा प्रस्तावना लिहित नाहीत.
आपली,
मंगला नारळीकर.

मी चपापलो. मी त्यांना उभयतांना अप्राप्य समजत होतो आणि ते मला आप्त. मग पत्रोत्तर लिहिणे आलेच..

आदरणीय मंगलाताई नारळीकर यांस,
कृ. शी. सा. न. वि. वि.  
सर्वप्रथम झाल्या प्रकाराबद्दल मी सपशेल माफी मागतो.
आपला परिचय आहे आणि माझ्या लिखाणाबद्दलचे आपले अभिप्राय मला पोहोचले आहेत.
म्हणूनच आपल्याला आणि सरांना प्रस्तावनेची विनंती करावी असा विचार माझ्या मनात आला.
एकीकडे ज्यांच्याकडून मी लेखन, वाचन, भाषण वगैरे बाबत स्फूर्ति घेतली, मराठी-प्रेम शिकलो,  त्यांच्याकडून  प्रस्तावना मिळण्याची शक्यता मला खुणावत होती पण  अशा गोष्टींविषयीची सरांची  उदासीनताही मी ऐकून होतो. पण त्याचवेळी  मुलांपर्यंत निव्वळ विज्ञान नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवणारे हे लिखाण तुम्हालाही महत्वाचे वाटेल असं सतत वाटत होतं.  
अशा द्विधा मनस्थितीत असल्याने मी कल्याणी गाडगीळ यांच्यामार्फत चाचपणी करायची ठरवली.
आपला अनमान म्हणून नाही पण आपल्याप्रती  असलेल्या आदरापोटी थेट विनंती मला करणे मला धाडसाचे वाटले. बस इतकेच.
झाली गुस्ताखी माफ करून, आपण उभयतां  या पुस्तकातील विचारांचे महत्व विशद करणारी प्रस्तावना दिलीत तर या उपक्रमाला आणखी उभारी मिळेल.  
डॉ. शंतनू अभ्यंकर

उलट मेली मेल आली…

डॉ शंतनु अभ्यंकर यांना नमस्कार,
JVN ना मी त्यांची प्रतिक्रिया विचारली, त्यांनी सांगितली, मी लिहून काढली. माझीही प्रतिक्रिया कळवत आहे. सोबत दोन्ही जोडत आहे.
तुमचे लेख  वाचायला, समजायला  सोपे, रसाळ भाषेत , पटणारी उदाहरणे देणारे आहेत. तुम्ही हे विज्ञानप्रसाराचे किंवा खरे तर विवेकी विचार शिकवणारे काम चालू ठेवावे.
आपली ,
मंगला नारळीकर.

मग परस्परांचे लिखाण वाचत गेलो, परस्परांना कळवत गेलो.  

सप्रेम नमस्कार,
‘ लोकसत्ता चतुरंग ‘ मधील आपला लेख आवडला, पटला पण त्याहूनही भावला तो त्यातील सौम्य भाषा वाचून.  
अतिशय अनाग्रहीपणे आपले मुद्दे मांडतानाही इथे ते अतिशय ठामपणे मांडले गेले आहेत.
आपल्या लिखाणातून खूप काही शिकायला मिळालं.
आपला नम्र
डॉ शंतनु अभ्यंकर वाई  

पुढे  १८ डिसेंबर च्या ‘ लोकसत्ता लोकरंग' मधला माझा लेख (असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठे?) आवडल्याचं कळवताना त्यांनी लिहिलं…

चार्वाक, जैन तत्त्वज्ञान, बुद्धाचा निरीश्वरवाद यावर आपल्याकडे फारशी माहिती नसते. ती व्हायला हवी.
आपल्या किंवा खरे तर कोणत्याही देशाच्या संस्कृतीमध्ये धर्माचा औदुम्बर जळात पाय सोडून बसलेला दिसतो. बहुतेक देशात, विविध काळात, देवकल्पना आवश्यक वाटली होती व ती बरीच फोफावली. तिच्या आधाराने
नीतीनियम समाजात दृढ करण्याचा प्रयत्न झाला. याची कारणे शोधून त्यांचे समाधान असत्य आणि अन्याय याचा अवलंब न करता , अन्यथा करता येईल का याचा अभ्यास हवा. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या भारतात हे साध्य व्हावे.
मंजना.

त्यांची भूमिका अतिशय सौम्य आणि समजूतदार होती. धर्म आणि संस्कृतीचे हे दाट मिश्रण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. एका पत्रात त्या लिहितात…

…आपली संस्कृती एवढी जुनी, टिकून राहिली, ती जुन्या काळाच्या मानाने प्रगत असू शकेल. पण आता, ज्ञानात प्रचंड भर पडली आहे. सत्याधारित  विज्ञान व विवेक , दोन्हींचा उपयोग करून आपले सामाजिक व धार्मिक नियम बनवायला हवेत. स्वातंत्र्य आणि समता सर्वाना उपलब्ध असणे या आदर्शाकडे जायला हवे.
लोकांना सण, उत्सव, समारंभ साजरे करायाल, मौज मजा करायला आवडते. त्यासाठी धार्मिक प्रतिमांचा आधार थोडासा असायला हरकत नाही. पण ती प्रतीके आहेत, खरोखर आपल्या सृष्टीवर त्यांचा काही अंमल नाही, हे मान्य करायला हवे. एखाद्या देव किंवा देवी चा उत्सव करण्यापेक्षा ऋतुकालानुरूप निसर्गाचे पूजन करणे योग्य वाटते.
जगातल्या जवळपास सगळ्या संस्कृती कोणता तरी देव मानून त्याच्या आधाराने सामाजिक नियम बनवून समाज बांधणी करत आल्या. त्यावरून मोठ्या समाजासाठी लोकांना देव या कल्पनेचा आधार, कदाचित धाक दाखवण्यासाठी लागतो असे दिसते. तो आधार असत्य गोष्टींचा नाही ना, जास्तीत जास्त लोकांना न्याय देणारा आहे ना हे वारंवार तपासायला हवे.
देवाचा आधार निराशेच्या काळात माणसाला आश्वासन, आशा, देण्यासाठी उपयोगी दिसतो. जसे लहान मूल आपले दु:ख किंवा अडचण आई वडिलांच्या पुढे मांडले की मदत मिळणार असे आश्वासन मिळवते, तसा प्रयत्न मोठी माणसे करतात. प्रत्येक वेळी आई वडील मागणी मान्य करतातच असे नाही, हेही मुलाला अनुभवाने कळते. तरी आपला भार देवावर टाकून थोडे मानसिक समाधान मिळतेच. म्हणून देवाला रिटायर करण्याऐवजी, त्याच्या मर्यादा समजावून घेणे आणि निसर्ग नियमांच्या विरुद्ध न जाता, कोणावर अन्याय न करता , देवाचा आधार घेणे मान्य असावे.
आपल्या पुराणग्रंथांतील सगळीच विधाने सत्य आणि ग्राह्य नसतात. अतिशयोक्तीचा भरपूर वापर केलेला असतो. आपण नीरक्षीर विवेक करून चांगलं, हितकारक तेवढं उचलावं, हे मी शिकले.  
तत्वज्ञान फार झाले. पण समविचारी माणसांशी बोलणे आनंददायी असते.
मंगला नारळीकर

मग अचानक बातमी कळली. त्यांनाही लंग कॅन्सरने गाठलं होतं. आम्ही दोघे समानशील तर होतोच आता समान व्याधीबाधितही झालो. एक वेगळच नातं झालं तयार. सुमारे ४०वर्षापूर्वी त्यांना ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासलं होतं. ऑपरेशन- केमो – रेडिएशनने त्यांना बरं वाटलं पण ३५ वर्षांनी हे दुखणं पुन्हा उपटलं. त्यातूनही त्या बऱ्या झाल्या आणि मग आता लंग कॅन्सर.

हा सारा अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला होता. ते वाचताच मी उत्तर लिहिले…

सविनय नमस्कार,
एका समानधर्मा,  विज्ञानवादी, विदूषीचे लखलखीत विचार वाचून भरून पावलो.
विचारांचे हे माणिक-मोती, त्यांची प्रभा माझ्यासकट अनेकांना मार्गदर्शक ठरेल.
मी 58 वर्षाचा आहे आणि नुकतेच मलाही लंग कॅन्सरने गाठलं आहे. उपचार चालू आहेत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम अनुभवतो आहे. पण या प्रवासात हा लेख उभारी देणारा आहे.
डॉ शंतनु अभ्यंकर, वाई  

केवळ मलाच नाही तर त्यांच्या अनेक सुहृदांना हा लेख मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला होता. अशाच एकीची, त्यांच्यासारख्याच ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त मैत्रिणीची प्रतिक्रिया देखील त्यांनी शेअर केली होती…

मंगल,
तुझ्यासारखी प्रगल्भ मैत्रीण माझ्या आयुष्यात आली याचा मला पूर्वीपासून, अगदी बालपणापासून अतिशय अभिमान वाटत आलेला आहेच, पण आज तुझं हे मोकळं मनोगत वाचून तो शतपटीने वाढला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आज तू आणि मी एकाच बोटीतून प्रवास करत असताना आपापल्या परीने या दुर्धर रोगाला कशा सामोऱ्या जात आहोत याची मनोमन तुलना करून मनाशी काहीएक दृढ निश्चय करायला तू मला मदत केली आहेस आणि प्रेरणाही दिली आहेस हेच आहे.
तू या गंभीर आजाराशी बराच काळ सामना दिलास. त्या मानाने माझी साडेसात वर्षं म्हणजे कमीच म्हणायला हवीत, पण वेदना आणि उपचार यांत काहीही फरक नाही. तीच ऑपरेशन्स ( रॅडिकल मॅस्टेक्टॉमी ), तीच ॲग्रेसिव्ह कीमोथेरपी, तेच रेडिएशन, तीच पॅलिएटिव्ह केअर – सगळं सगळं तेच आणि तसंच. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुझा आणि माझा या सगळ्याकडे पाहण्याचा एकसारखाच दृष्टिकोन.
मुख्य म्हणजे आपण खुल्या दिलाने या वस्तुस्थितीचा स्वीकार केलेला आहे. खरंच, तू मला खूपच आधार दिला आहेस. अशीच प्रसन्न राहा आणि मलाही प्रसन्न राहायला मदत कर.
तुझी मैत्रीण

मग फोन पत्र चालू होते. एकदा, कशा आहात?ला उत्तर म्हणून त्यांनी पॅलीएटिव्ह केअरवर  असल्याच कळवलं.

प्रिय शंतनु,
तू बरा आहेस आणि पुन्हा कामही सुरू केले आहेस हे वाचून बरं वाटलं. शाब्बास रे.
मी आता पॅलीएटिव्ह स्वाधीन झाले आहे. अशक्त आहे, मधुन मधुन ओ टू लागतो. सतत मदतीला माणूस लागतो. पण माझी तक्रार नाही उलट मिळणाऱ्या मदतीबद्दल मी कृतज्ञ आहे. ३७वर्ष कॅन्सरची सोबत असताना, आता ऐशीव्या वर्षी अधिक हाव धरू नये.
एक सल्ला मात्र देते.. धक्कादायक  
विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी विधानांनी लोकांना दचकवण्यापेक्षा त्यांना तसा विचार करायला शिकवणं, जास्त महत्त्वाचं आहे.
मंगला  

कीबोर्डवरच्या बोटांची वृद्ध, प्रेमळ, अशक्त पण अनुभवसमृद्ध थरथर मला स्क्रीनवर वाचतानाही जाणवत होती. मी उत्तर टाईपलं…

मंगल मावशीस,
सा. न.
…आयुष्यात खूप खूप पूर्वीच आपण भेटलो असतो तर…
शंतनु

Saturday, 15 July 2023

‘बाईपण भारी देवा’ पण भारीच की देवा!

‘बाईपण भारी देवा’ पण भारीच की देवा!
डॉ. शंतनू अभ्यंकर , वाई.  

‘बाईपण भारी देवा’ गाजतो आहे. 
आधी बायको जाऊन आली. मग मी गेलो. वाजत-गाजत सादर झालेल्या आणि वाजल्या-गाजल्यामुळे  मी गेलेल्या; इतक्या सिनेमांनी,  माझी इतकी दारुण निराशा, इतक्या वारंवार  केली आहे, की ही खबरदारी मी घेतोच. सिनेमा वाईट आहे हे कळायला तो एकदा तरी पहायला हवा, अशी बायकोची ठाम समजूत. त्यामुळे गनिमाच्या गोटातून  माहिती काढण्यासाठी हे धोरण उपयुक्त ठरते. आल्या आल्या बायकोने डिक्लेअर  केलं, ‘भारीच आहे सिनेमा. थिएटर हाऊसफुल्ल होतं. पण सगळ्या बायकाच होत्या.’ शत-प्रतिशत बायका म्हटल्यावर मी हादरलो. म्हटलं, ‘माहेरची साडी’ छाप होता की काय?’ ‘नाही रे, तू बघच.’ शिवाय फेबू, व्हाटसॅपवर चर्चा होत्याच. स्त्रीप्रधान, बायकांवरच्या अन्यायाला वाचा फोडणारा, बायकांच्या बाजूचा... पण म्हणूनच पुरुषांनी बघावा असा!  
मग बघीतला. बाहेर गटागटाने येणाऱ्या बायका, अगदी नटूनथटून; साड्या, नथी अगदी झकपक. इतक्या सगळ्या बायकांवर आपण इतके दिवस इतका  अन्याय करत होतो असं वाटून मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी आपला तिकीट गच्च मुठीत धरून अंग चोरून होतो. माझी उपस्थिती लक्षात आली तर काय घ्या? पण कोणीही माझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. आपल्याच धुंदीत, हसत खेळत, सगळ्या आत शिरल्या आणि काहींनी तर पॉपकॉर्नवाल्यासमोर मंगळागौरीच्या गाण्यावर फेर धरला. मग थिएटरमधला जल्लोष. कुजबूज, खसखस, हशे, उसासे, चुकचुक, टाळ्या आणि चक्क शिट्यासुद्धा. 
अनेक अनपेक्षित गोष्टी करण्यात चित्रपटाचं यश आहे. ‘बाईपण भारी देवा’ ह्या नावापासून सुरवात. ‘लहानपण दे गा देवा’, हा मूळ चरण, ही मूळ मागणी. पण इथे काही मागितले वगैरे नाहीये. थेट बाईपण भारी देवा, असं देवालाच ठासून सांगितलं आहे. 
इथे हीरो नाही. मात्र सहा सशक्त अभिनेत्रींची, सशक्त फौज इथे उभी आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि  शिल्पा नवलकर; अशा  साऱ्यांचा सहजसुंदर वावर, जणू ती ती पात्र जिवंत झाली असावीत. 
सख्खी आई वि. सासूआई असा दोन विहीणी विहीणींत  हा सामना रंगणार असं वाटत असतानाच हा धोपट मार्ग सोडून कथा  बिकट वाटेची वहिवाट करते.  
ज्या मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने ह्या सहा भगिनी, सह–भगिनी होतात त्या स्पर्धेचा निकाल, बक्षीस समारंभ वगैरे काहीही आपल्याला दिसत नाही. ह्यांचा खेळ मात्र ठसक्यात आणि दणक्यात होतो. वयोमान आणि आकारमान लक्षात घेता हे त्यांच्या इतकेच कॅमेऱ्याचेही कसब.  
इतकी फिट्ट सिच्युएशन असूनही इथे मंगळागौरीची पूजा नाही. नसणारच.  कारण मंगळागौरीच्या मूळ कथेतल्या वैश्य पत्नीला आंबे खाल्याने मुलगा होतो,  तो अल्पायुषी ठरेल असा शाप असतो,  अपघातानेच त्याची पत्नी झालेल्या मुलीच्या व्रताने शाप  त्याला भोवत नाही आणि तिचं वैधव्य टळतं! ह्या कहाणीतला कोणताही प्रश्न ह्या सहा जणींचा नाही. त्यातले तोडगेही ह्यांच्या पचनी पडणारे नाहीत.  इथे मंगळागौरीचे खेळ हा एक क्रीडाप्रकार आहे. असो, चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, हेच खरं.   
काहीशा नाखुषीने आणि नाईलाजाने ह्या सहा सहोदरा एकत्र येतात. आतापावेतो या बहिणाबाईंत चांगलीच बहीणबंदकी माजलेली असते. पण हळू हळू नादुरुस्त नाती दुरुस्त केली जातात, दुरुस्त नाती तंदुरुस्त केली जातात आणि  दुरुस्तीपार नाती तोडून टाकली जातात. यात भेद करायला शिकवणारा विवेक, सामुहिक शहाणपणातून जागवला जातो. यासाठी योजलेले कथांश, पेरलेले नाट्यमय प्रसंग आणि खटकेबाज संवाद दाद घेऊन जातात.    प्रत्यक्ष स्पर्धेतील हारजीत काहीही असली तरी जिंकलेल्या असतात, एकीमेकींसाठी  सखी-संवादिनी झालेल्या, ह्या  सहाजणी आणि जिंकलेलेले असतात लेखक-दिग्दर्शक. 
प्रत्येक दृश्य चढत चढत जाणारं, एका उत्कर्ष बिंदुला पोहोचणारं. करूण, आश्चर्य, उपहास, हास्य अशा रसांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारं. त्यांची गुंफणही अशी की एकातून दुसरं सहज उमलणारं, भावनांची लपाछपी साधणारं. हा तंत्रनिपुण दिग्दर्शक मधूनच वर्तमान पात्रांबरोबर प्रेक्षकांनाही भूतकाळाची सफर घडवून आणतो. ही युक्ती अगदी परिणामकारक ठरते. प्रत्येक दृष्यातून आणि दृष्य-चौकटीतून हा गडी आपल्याला काही सुचवत जातो. तो काही सांगत नाही, कोणताही आव आणत नाही, फक्त सुचवत जातो. 
खाष्ट सासू, सोशीक सून किंवा अंथरुणातून मेकअपसकट उठल्या उठल्या, ‘च्या शिजवायच्या’ ऐवजी  कुटील कारस्थाने शिजवणाऱ्या लोकोत्तर स्त्रिया इथे नाहीत.  पण सवतीला ऊंची मेकअप बॉक्स देता देता, ‘सांभाळ, हे सौंदर्य  क्षणिक आहे’, असं सुचवणाऱ्या बायका, नाकर्त्या नवऱ्याचं कर्ज फेडायला कंबर कसणाऱ्या बायका, दशकानुदशके मनात अढी बाळगणाऱ्या, कुढणाऱ्या बायका, स्वतःसाठी ब्रा घेताना अवघडणाऱ्या बायका आणि बहिणीने आधार दिला की लगेच माप देणाऱ्या बायका मात्र आहेत. पुरुषाचीही विविध रुपे येतात. काही रगेल, काही रंगेल, काही रांगडे तर काही पुचाट. इथे पुरुषगिरी गाजवणारे सासरे आहेत, त्यापुढे नांगी टाकणारे मुलगे आहेत, मनाने खचलेल्या बायकोला समर्थ साथ देणारे आहेत आणि मिठ्ठास कोल्हापुरी बोलणारेही आहेत.  
‘केसरी’च्या ‘माय फेअर लेडी’, या फक्त महिलांसाठीच्या ट्रीपसारखा वाटला हा सिनेमा. बायकांची मनोकामना पूर्ण करणारा, त्यांनाही नकळत त्यांच्या क्षमता दाखवणारा, गुरुगिरी न करता गुरुमंत्र देणारा, त्यांनाही न जाणवलेला भवताल आरास करून मांडणारा. 
मात्र उत्तमाच्या ह्या अस्सल अदाकारीत माझ्यासारख्या डॉक्टरला  जाम खटकलेली गोष्ट म्हणजे, फायब्रॉईडचे निमित्त होऊन एकीला इमर्जन्सी हिस्ट्रेक्टॉमी करावी लागते, ही. आधीच (माझ्यासारख्या) कोणा चांगल्या डॉक्टरला दाखवलं असतं तर ही चूक टळली असती. पात्राची पिशवी तातडीने काढून टाकण्याचा प्रसंग, पुन्हा कोणा सिने-दिग्दर्शकावर ओढवलाच, तर प्रसूती-पश्चात-रक्तस्राव, कोरिओकार्सीनोमा, सर्व्हायकल प्रेग्नन्सी, सेप्टिक अबॉरशन असे काही मातबर पर्याय मी आत्ताच नमूद करून ठेवतो. फायब्रॉईड, ही तशी बिच्चारी आणि निरुपद्रवी गाठ. सुमारे १०% महिलांमध्ये ह्या गाठी आढळतात. तक्रार असतेच असे नाही. हिच्यासाठी बरेचदा शस्त्रक्रिया लागते पण तातडीच्या शस्त्रक्रियेचा प्रसंग विरळाच. हा सगळा प्रकार अवास्तव वाटतोच पण प्रेक्षकातल्या महिला आपापल्या फायब्रॉईडबद्दल  गैरसमज घेऊन बाहेर पडतात त्याचे काय? 
एवढा एक अनिष्ट परिणाम वगळला तर ह्या बाई-पटाचे इष्ट परिणाम भरपूर आहेत. आता पैठण्या, दागिने ह्यांच्या फ्याशनी येतील. आता नथी आणि नाचगाणी जनमान्य होतील. वाढदिवसाचा ‘हॅपी बड्डे’  आणि डोहाळ जेवणाचा ‘बेबी शॉवर’ झालेल्या जमान्यात, येत्या श्रावणात, आता मंगळागौर हेप ठरेल.

पूर्व प्रसिद्धी
चतुरा
लोकसत्ता पुरवणी
शनिवार १५.७.२३

Saturday, 17 June 2023

निमित्त वारीचे

निमित्त वारीचे...
डॉ शंतनु अभ्यंकर वाई 

कळस हलणे हा चमत्कार झाला. ज्ञात विज्ञानाच्या विरुद्ध. ह्याचा शहानिशा सहज शक्य आहे. पण तसं कुणालाच नको आहे. असो. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरं.

 बाकी पालखी, वारी आणि त्यात अनुभवायला येणारे आनंद क्षण, चैतन्य क्षण, मोक्ष क्षण, हे सगळे क्षण विलक्षण, ज्याच्या त्याच्या दृष्टीने खरेच असतात.

माझ्यासारख्या नास्तिकाला देखील उत्तम संगीतात रंगून जाणे, नृत्याच्या तालावर बेभान होणे, निसर्गाच्या अदाकारीने पुलकित होणे, रसाळ काव्याने घायाळ होणे... हे होतच असतं.

वारीतही हे होतं. 

सगळे सण-वार, उत्सव म्हणजे अशा तृप्त क्षणांच्या ठिणग्या फेकणारी धगधगती अग्निकुंडे आहेत.

 अशा क्षणांची सहज सोबत मिळते म्हणून लोकं देव, धर्म, कर्मकांड याकडे आकर्षित होतात. ते मूर्ख नसतात. सतत शोषित वगैरे नसतात. काहीसे ऐषीतच असतात. 

असे क्षण अनुभवायचे तर अशा सोहळ्यामध्ये मनापासून सामील व्हायला हवं. मी होऊ शकतो. अगदी मनापासून. मला जमतं. 

मी या सगळ्याकडे *शोले* बघावा तसं बघतो. म्हणजे असं, की *शोले* बघताना जर का तुम्ही सतत असा विचार करत राहिलात, की ठाकूरचे हात खरंतर त्या कुडत्याच्या आत शाबूत आहेत..., तर मग *शोले* बघणं अवघड आहे! म्हणजे तुम्हाला तो दिसेल पण अनुभवता नाही येणार.

 तसंच वारीचं, कैलास लेण्याचं, गंगा लहरी सारख्या सुंदर काव्यचं आहे. मी त्यातल्या कथा, कल्पना,  देवांची आणि आदीकांची, दैवी आणि दानवी शक्तिंची सगळी भुतावळ, तात्पुरती खरी मानूनच या साऱ्याचा आस्वाद घेतो. काम झालं की सोडून देतो.

असे क्षण विलक्षण माझ्यासारखा नास्तिकांना नापास नाहीत, नापसंतही नाहीत. 

फक्त त्यांचा सुसंगत अर्थ लावण्यासाठी कोणत्याही पारलौकिक तत्त्वाला शरण जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही. 
बस् एवढंच.

डॉ शंतनु अभ्यंकर वाई 

🙏🏻☺️

Saturday, 29 April 2023

ताज्या किशोर चे सुंदर मुखपृष्ठ.

किशोर मुखपृष्ठ: एका रसिकमनाची दाद 

डॉ. शंतनू अभ्यंकर 
मुखपृष्ठ: अन्वर हुसेन

किशोरचा मे २०२३ चा अंक हाती पडला.  मुखपृष्ठ नजरेस पडले आणि मी पाहतच राहिलो.
सायकल चालवणाऱ्या दोन मुली आहेत. अंगात वारं भरलेल्या त्या दोन मुली, सायकलवरून सुसाट सुटलेल्या. सायकलही नवी आहे, तिचा लाल रंग तुकड्या तुकड्यानी चमकतो आहे. सायकलला लावलेली फुलं आणि त्या मुलीच्या दोन पोनिटेल्स पिसाट वाऱ्याने मागे उडताहेत. बस्स, सायकलचा सैराट वेग सांगायला एवढंच पुरेसं. पण मनाचा आवेग? तो कसा  चित्रात पकडणार? त्यासाठी अन्वर हुसेन यांच्यासारखा मनकवडा चित्रकारच हवा.  
एक मुलगी कॅरियरवर बसलेली आणि एक जोरात पॅडल मारणारी. नाही, नाही ‘पायंडल हाणणारी’. अहो, गावाकडच्या आहेत त्या. नाहीतर आजूबाजूला इतकी हिरवाई कुठून असायला? मुली अगदी काटकुळया आहेत. अजून अंगाने भरायच्या आहेत. शाळेतल्याच असाव्यात. म्हणजे अर्थातच आडनिड्या वयातल्या आहेत.  अंगाला जेव्हा सायकल फुटते त्या वयातल्या.  सायकलवरून भन्नाट वेगाने गावभर, शिवारभर हुंदडण्याच्या वयातल्या.  
पहा ना, पहिल्या मुलीची मान वर, पाठ ताठ  आणि नजर आभाळावर खिळलेली. नव्याने प्राप्त झालेला नवथर, किशोर तोरा मिरवणारी. मुग्ध किशोरीची युवाकांक्षीणी होतानाची ही देहशोभा. मोठ्या आत्मविश्वासाने ती सायकल चालवते आहे. दुसरी मुलगी तिच्या मागे अलगद  बसलेली. तिचं भिरभिरतं लक्ष आसपासच्या फुलांकडे आणि स्वच्छंदी  फुलपाखरांकडे. पण यातही फुले कुठली आणि फुलपाखरे कुठली हे कळू नये असे नजाकतीचे, धूसर चित्रण. ही चित्रकाराची कारागिरी. त्या लहानगीलाही हे विश्व  नवीनच. आपल्या मोठ्या मैत्रिणी इतक्याच वेगानं तीही या नवलगरीत निघालेली.  
सायकल तर त्या विश्वात निम्मी बुडलेली. तिची चाके नक्कीच जमिनीवर टेकलेली नसणार. तरंगत असणार ती. त्या मुली आणि सायकलच नाही तर त्यांच्या आसपासचं  सगळं विश्व धूसर झालेले. त्यांच्या आसपास शेतांचे रंगीबेरंगी तुकडे. इतके मऊसूत, तलम आणि गुबगुबीत की त्यांची प्रेमळ गोधडी झालेली. हे तुकडेही एकमेकांत मिळून मिसळून गेलेले. बांधाची, कुंपणाची सीमा केंव्हाच पुसून गेलेली.  या असल्या आकारउकार आणि आऊटलाईन नसलेल्या विश्वात त्या मुली शिरल्या आहेत.  त्या पहिल्या मुलीचा लांब फ्रॉक तर जणू पिसापिसांचा बनलेला आहे.  ती मुलगी जणू परीराणीपदाला पोहोचलेली आहे.
ह्या परीराणीच्या सोबतीने आपणही क्षणात त्या जादुई विश्वात शिरतो. हे सामर्थ्य या चित्रकाराचे.  
चित्रकार अन्वर हुसेन आणि संपादक किरण केंद्रे यांचे अभिनंदन आणि आभार. मी कोणी चित्रकार नाही.  चित्रकलेतला जाणकार नाही पण हे चित्र पाहिल्या पाहिल्या मनावर उमटलेले तरंग मी टिपले, एवढेच.

- डॉ. शंतनू अभ्यंकर 

#किशोरमासिक
#बालभारती