Sunday, 9 October 2016

प्रकरण २ पहिला माणूस आला कुठून?

प्रकरण २
पहिला माणूस आला कुठून?
डॉ. रिचर्ड डॉकीन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रीअॅलीटी या पुस्तकातील, ‘हू वॉज द फर्स्ट पर्सन”
या प्रकरणाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई (सातारा) पिन ४१२ ८०३.
मो. क्र. ९८२२० १०३४९

या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात एका प्रश्नाने होते. प्रश्नाचं उत्तर त्या त्या प्रकरणात दिलं आहे,  निदान त्यातल्या त्यात सुयोग्य, विज्ञाननिष्ठ  उत्तर दिलंय. पण सुरवातीला मी मिथक कथांनी, पुराणांनी, दिलेली उत्तरं काय आहेत हे सांगणार आहे. हे अशासाठी की, ही उत्तरं ढंगदार , सुरस (आणि चमत्कारिक) असतात. अनेकांना ती मनोमन पटलेली होती आणि काहींना आजही मान्य असतात.
प्रत्येक मानवी समूहाची आपण आलो कुठून, कसे, हे सांगणारी एक एक कथा आहे. पण गंमत म्हणजे, टोळ्याटोळ्यांच्या कित्येक कथांमधून निव्वळ त्यांच्याच उद्भवाच्या कथा आहेत. ‘बाकीच्या टोळ्या’ त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही जणू.  जेवढं जग त्यांनी पाहिलं तेवढयाचंच अप्रूप त्यांना. बऱ्याच जमातीत ‘माणसं’ मारू नयेत, असा नियम असतो. पण इथे ‘माणसं’ याचा अर्थ ‘आपल्या टोळीतले लोक’. अन्य टोळीवाले ही ‘माणसं’ गणलीच जात नाहीत. तेंव्हा त्यांची हत्या म्हणजे मनुष्यहत्या नव्हेच.
तास्मानियातील आदिवासींची एक  कथा आहे. मोईनी आणि ड्रोमरडीनर या दोन देवांच्या आकाशीय युद्धात मोईनी हरला आणि खाली पडला तो थेट तास्मानियात. आपण जिथे चिरनिद्रा घेणार त्या भूमीला काही वरदान द्यावं ह्या इच्छेनी, त्यानी शेवटच्या घटका मोजता मोजता, घाईघाईत  ‘माणूस’ बनवला. पण ह्या भानगडीत तो गुडघे करायचे विसरला आणि कांगारूसारखी भक्कम शेपूट मात्र देऊन बसला. या बिनगुडघ्याच्या, सपुच्छ माणसाला खाली बसता येईना. त्यानी पुन्हा देवाजीची करुणा भाकली.
सर्वशक्तीमान ड्रोमरडीनर खरंतर विजययात्रेत मश्गुल होता. पण माणसांची हाक ऐकताच तो त्वरित तास्मानियाला आला. त्यानी अवघडलेल्या माणसांच्या शेपट्या कापल्या, गुडघे देऊन त्यांचा खाली बसण्याचा प्रश्न सोडवला....आणि तास्मानियाची प्रजा सुखाने नांदू लागली.
तास्मानियात इतरत्र याच कथेची अन्य काही रूपंही ऐकायला मिळतात. यात आश्चर्य ते कुठलं? शेकोटीभोवती गोष्ट सांगता सांगता ती थोडी थोडी बदलतेच आणि विविध प्रकार निर्माण होतात. अशाच एका कथेनुसार मोईनीनी, पर्लेवार नावाचा माणूस प्रथम आकाशात तयार केला. त्यालाही गुडघे नव्हते आणि शेपूट होतं. त्यालाही बसायचा प्रॉब्लेमच होता. इथेही अखेर कनवाळू ड्रोमरडीनरनी गुडघे दिले, शेपूट कापलं आणि जखम बरी होईपर्यंत तेलंही लावलं. आकाशगंगेच्या काठाकाठानी मग पर्लेवार तास्मानियात आला.
मध्यपूर्वेतील हिब्रू टोळ्यांचा जो देव होता तो (अर्थातच) अन्य टोळ्यांच्या देवांपेक्षा ‘लईच पॉवरबाज’ होता. अनेक नावं होती त्याला. पण यकश्चित माणसांनी त्याचं नाव घेणं म्हणजे अब्रम्हण्यम्. त्यानी वाळूपासून पहिला मानव घडवला, त्याच नाव अॅडम, (म्हणजे हिब्रूत, माणूस). हा दिसायला देवासारखाच होता. मिथककथातील बहुतेक देवदेवता ह्या बहुधा पुरुष, दिसायला माणसासारख्याच पण अतिशक्तीमान आणि  आकाराने अतिप्रचंड असतात. माणसाच्याच सुधारून वाढवलेल्या आवृत्या असतात ह्या.
अॅडम रहायचा सुजलाम् सुफलाम् अशा  नंदनवनात. तिथल्या सगळ्या झाडांची फळं चाखायची मुभा होती त्याला, फक्त ‘ज्ञानवृक्षाचं’ फळ वर्ज्य. वर्ज्य म्हणजे अगदी संपूर्ण वर्ज्य.
काही दिवसातच अॅडम खूप एकटा असल्याचं देवाच्या लक्षात आलं. काही तरी करावं असं त्याच्या मनाने घेतलं. पुढे मोईनी आणि ड्रोमरडीनरच्या कथेसारखी, या कथेची दोन रूपं आढळतात. एकानुसार अॅडमच्या सोबतीला देवानी सर्व प्रकारचे प्राणी बनवले, पण तरीही त्याचा एकलेपणा संपेना. मग देवाच्या लक्षात आलं, ‘अर्रर्र! बाई राहीली!’ मग अॅडमला भूल देऊन, त्यानी त्याला खोलला, त्याची एक बरगडी काढून घेतली आणि पुन्हा शिवून टाकला. त्या बरगडीपासून स्त्री तयार झाली. ऊसाचा डोळा पेरून ऊस उगवावा तसंच की हे. हिचं ‘ईव्ह’ असं बारसं करून, त्यानी ती अॅडमला पत्नी म्हणून नजर केली.
पुढे उद्यानातील एका कपटी, सैतानी सापानी इव्हला त्या ज्ञानाच्या झाडाचं फळ अॅडमला खाऊ घालायला भरीस घातलं. फळ खाताच दोघांनाही ते संपूर्ण नग्न असल्याचं ज्ञान झालं. संकोचून अॅडम आणि इव्हनी उंबराच्या पानांनी योग्य तो भाग झाकला. हे सगळं लक्षात येताच देव भडकला. ज्ञानवृक्षाचं फळ चाखून त्यांना ‘ज्ञान’ प्राप्त झालं, म्हणजेच, मला वाटतं, त्यांनी निरागसता गमावली. देवानी दोघांना नंदनवनातून पृथ्वीवर हाकलून दिलं. इथे त्यांना आणि त्यांच्या पुत्र, पौत्र, प्रपौत्रादी संततीला पिढयांपिढयाचं दुःखीकष्टी आयुष्य वाट्याला येईल असा शाप दिला. आजही देवाज्ञाभंगाची, ‘मूळ पापाची’ ही कथा, अगदी खरी मानणारे अनेक आहेत. भले अॅडम असा कोणी नव्हता हे मान्य असूनही, अॅडमच्या मूळ पापाचे आपण सारे वारस आहोत, याची मनोमन शरम बाळगणारे, अपराधगंड बाळगणारेही अनेक आहेत.
स्कॅण्डीनेव्हीयाच्या दर्यावर्दी नॉर्स व्हायकिंग लोकांचेही ग्रीक आणि रोमन लोकांप्रमाणे अनेक देव होते. ‘ओडीन’ हा देवांचा देव. ह्यालाच ‘वॉटान’ किंवा ‘वॉडेन’ अशी नावं आहेत. ह्यावरून वेडनेस डे (Wednesday, बुधवार) आला. (थर्स डे, Thursday / गुरुवार, हा ‘थॉर’ ह्या वरुण देवावरुन आला. हा आपल्या प्रचंड हातोडयानी गडगडाट घडवतो, म्हणे.)
एके दिवशी पुळणीवर आपल्या देवबंधुंबरोबर फिरता फिरता ओडिनला झाडाची दोन खोडं दिसली.
एका खोडाचा त्यानी केला बाप्या, नाव दिलं ‘आस्क’ आणि दुसऱ्याची बनवली बाई, नाव ठेवलं ‘एम्बला’. मग या देहांमध्ये बरोबरच्या देवबंधूंनी प्राण फुंकले, त्यांना जाणीव दिली, चेहरा दिला आणि वाचा दिली.
खोडापासूनच का? बर्फाचे सुळके किंवा रेतीच्या ढिगापासून का नाही? या प्रश्नाला उत्तर नाही. ह्या कथा कधी रचल्या, कोणी रचल्या, हे सारंच गूढ आहे. कदाचित मूळ कर्त्याला ह्या कथा काल्पनिक आहेत हे ठाऊक   असेल, कदाचित देशो-देशीच्या, प्रदेशो-प्रदेशीच्या अनेक सुपीक डोक्यातून निघालेल्या अनेक कथांचं, मोडून, तोडून, जोडून, केलेलं मिश्रण म्हणजे ह्या कथा असतील. कदाचित मूळ कर्त्यांनी त्या निव्वळ रंजन म्हणून रचल्या असतील आणि मग कालपरत्वे त्यावर सत्याची झिलई चढली असेल.
कथा पौराणिक असो की फेसबुकीय, ऐतिहासिक असो की व्हॉटसॅपिक, गोष्टी रंगतदार असतात. रंगवून, तिखट-मीठ लावून सांगायला मज्जा येतेच येते. पण कधीतरी आपण विचार केला पाहिजे, साक्षात निर्मीतीचं रहस्य भेदण्याचा दावा करणाऱ्या या साऱ्या कथा खऱ्या असतील?
चला तर मग, पहिला ‘माणूस आला कुठून?’, इथूनच सुरुवात करूया, याचं खरंखुरं वैज्ञानिक उत्तर पाहू या.
खरंच, पहिला माणूस आला कुठून?
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ‘पहिला’ असा कुणी माणूस नव्हताच. कारण ज्याला ‘पहिला’ म्हणावं, त्याला आई-बाप असणारच आणि तेही ‘मानव’ असणार! माणसाचंच कशाला, सशांचंही असंच आहे. पहिला ससा, असा कधी नव्हताच. ना होती पहिली मगर, ना होता पहिला चतुर. जन्मलेला प्रत्येक जीव आपापल्या आई-बाबांच्याच प्रजातीचा होता (काही अतिदुर्मिळ अपवाद इथे जमेस धरलेले नाहीत.). आई-बाबांसारखा होता म्हणजे आजी-आजोबांसारखा असणारच, म्हणजे पणजी-पणजोबांसारखाही असणार तो...असं मागे मागे अखंडपणे चालूच!
अखंडपणे? नाही, अखंडपणे नाही. मग? इथे परिस्थिती जरा नीट समजावून घ्यायला हवी. एक प्रयोग करु या. निव्वळ कल्पनेचा खेळ. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्षात हे शक्य नाही कारण मनातल्या मनात, आपण मागेमागे खूप काळ मागे जाणार आहोत. या कल्पनेच्या खेळातून खूप काही शकणार आहोत आपण.
चला तर मग. खालील सूचनांबरहुकूम कल्पनेला सुरुवात.
तुमचा एक फोटो घ्या. त्याच्यावर तुमच्या वडलांचा एक फोटो ठेवा, त्यावर तुमच्या आजोबांचा, त्यावर पणजोबा, मग खापर पणजोबा. तुम्ही काही खापर पणजोबाना भेटला नसाल. मीही नाही भेटलो. पण ह्यातले कुणी शेतीत असतील, कुणी मास्तर, कुणी काही, कुणी काही. प्रत्यक्ष पहिले जरी नसतील तरी जुन्या वेशातले, पिवळे पडलेले त्यांचे फोटो तुम्ही मनात आणू शकता. एकावर एक एकावर एक, रचत चला ते फोटो. फोटोग्राफीच्या शोधाआधीच्या मंडळींचेही फोटो आता रचायला लागा. सोप्पं आहे ते. सगळा कल्पनेचाच तर खेळ.
असे किती खापर-खापर-पणजोबा पकडायचे? साधारण १८५ कोटी!
साधारण?
१८५ कोटी हा काय साधारण आकडा आहे?
१८५ कोटी फोटोंची चळत, कल्पना करणंही अवघड आहे. किती ऊंच होईल हा मनोरा? जर पोस्टकार्डच्या जाडीचा एक फोटो धरला, तर १८५ कोटी फोटो म्हणजे ६७ किलोमीटर ऊंच, न्यूयॉर्कच्या १८० गगनचुंबी इमारती एकावर एक ठेवल्यात जणू. हे फारच ऊंच झालं, चढणार कसं? जाऊ दे, उगाच तो मनोरा पडायचा बिडायचा, तेव्हा त्याला आपण आडवा ठेऊ या. एका टोकाला, तुमच्या जवळ तुमचा फोटो आहे आणि ६७ कि.मी.दूर, तुमच्या १८५ कोटी पिढयांपूर्वीच्या आजोबांचा. ते तुमच्याकडे तिथून किती कौतुकानी पहाताहेत! ते कसे दिसताहेत? म्हातारे? मिचमिच्या डोळ्यांचे, पापण्यांचेही केस पांढरे झालेले? का व्याघ्रांबर नेसून एखाद्या गुहेबाहेर हवा खात उभे? विसरा राव. ते नेमके कसे दिसायचे, हे नाही सांगता येणार. पण जीवाश्म असं सांगतात की  तुमचे १८५ कोटीवे आजोबा हे मासा होते मासा... आणि आजी होती मासीण, म्हणजे मासोळी हो. ती तशी असणारच की. त्या शिवाय का त्यांना पिल्लं झाली? आणि त्या शिवाय का आज तुम्ही इथे आहात?
चला तर मग ह्या ६७ कि.मी. पसरलेल्या लांबलचक अल्बम मधून आपण फोटो चाळून बघुया. प्रत्येक फोटोतली छबी ही पुढच्या मागच्या फोटोंसारखीच आहे. आसपासचे वंशज आणि पूर्वज एकाच प्रजातीचे आहेत. पण तरीही एका टोकाशी तुमचा अवतार आहे आणि दुसऱ्या टोकाशी मत्स्यावतार. माणसापासून माशापर्यंत मधे आहेत, बरेच रोचक पूर्वज. यात काही कपी (Apes) आहेत, काही वानर (Monkeys) आहेत, काही चीचुंद्र्या  आहेत वगैरे वगैरे...! जवळजवळचे सगळे फोटो एकमेकांसारखे पण अंतर वाढलं की फरक वाढलाच. उलटं उलटं चालत गेलं की आपण सावकाशपणे पण निश्चितपणे मत्स्य मुक्कामी पोहोचतो. असं कसं काय हो?
सोपं तर आहे. थेंबे थेंबे तळे साचे. बारीक बारीक बदल बराच काळ होत राहिले की मुळातलं रूप पार बदलतं. लहानपणचं तुमचं रूप, आत्ताचं तुमचं रूप आणि उतारवयातलं रूप बरंच भिन्न असणार. पण काल रात्रीचे तुम्ही आणि आज सकाळचे तुम्ही हे दिसायला सारखेच की दिसणार. बाळ, बालक, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध ह्यातल्या कुठल्याच टप्प्यावर आदल्या दिवशीची अवस्था एकाएकी संपून आपण मोठे होत नाही.
असंच आपल्या काल्पनिक प्रयोगातल्या अल्बमचंही आहे. १८५ कोटी पिढयामधे, छोटे छोटे नकळतसे बदल होत होत आपण माशापाशी पोहोचतो; आणि तिथून सुरवात केली की हळूहळू, अगदी हळूहळू, मत्स्यरूप बदलत बदलत मानवरूप प्राप्त होतं. माशाला मासा होतो, त्याला मासा होतो... पण १८५कोटी पिढयानंतर वंशज म्हणून माशाला तुम्ही लाभता.
सावकाश म्हणजे किती सावकाश होतात हे बदल? हजार वर्ष म्हणजे काहीच नाही. दहा हजार वर्ष हाही काळ कमीच आहे. एवढ्यात फार फार तर ४०० पिढया मागे जाऊ आपण. यातही वरवरचे, किरकोळ फरक वगळता, काही दिव्य फरक दिसणार नाही. कोणीच शंभर टक्के आईच्या किंवा बापाच्या वळणावर जात नाही. इतक्यात बदलाची चाहूल लागणार नाही. दहा हजार वर्षात बदलाची दिशाही लक्षात येणार नाही. केसांच्या जटा आणि फेंदारलेल्या मिशा वगळता, दहा हजार वर्षापूर्वीचे आजोबा दिसायला तुमच्यासारखेच असतील. आजही जगात चार लोकात जितपत फरक दिसतात तितपतच हा फरक असेल.
१ लाख वर्षापूर्वीचे आजोबा? आपले चा ह्जाराव्वे आजोबा, हे कसे असतील? आता मात्र थोडा फरक असेल. ह्यांच्या भुवयाखाली कवटीला बऱ्यापैकी उभार असेल. पहाणारी नजर मात्र हवी. आणखी मागे मागे जाऊ. एक कोटी वर्ष मागे. म्हणजे ५०,००० पिढया. तिथे फोटो असेल आपल्या ‘विजातीय’ आजोबांचा. हे असतील ‘होमो इरेक्टस’ प्रजातीचे (Species). आपण आहोत ‘होमो सेपिअन’. जीवशास्त्र असं शिकवतं की होमो सेपिअन आणि होमो इरेक्टस यांचा संकर होऊ शकत नाही. त्यामुळेच ह्या दोन वेगवेगळ्या प्रजाती समजल्या जातात. झालाच असा विजातीय संकर तर होणारी संतती वांझ असते. गाढव आणि घोडीपासून झालेलं खेचर ही असंच वांझ असतं. (का ? ते पुढे बघू.)
पुन्हा एकदा स्पष्ट करतो, तुम्ही होमो सेपिअन आहात, तुमचे ५०,०००वे आजोबा होमो इरेक्टस होते, पण या वंशसाखळीत कुठेही होमो इरेक्टसचा, एकदम, अचानक होमो सेपिअन झालेला नाही. (‘अय्या, अहो आपल बाळ पाहिलंत का? लक्षात आलं का तुमच्या. ते होमो सेपिअन आहे. आला बाई एकदाचा होमो सेपिअन जन्माला!’, असं कुठलीही होमो इरेक्टस नारी कोणत्याही होमो इरेक्टस नराला म्हणालेली नाही.)
थोडक्यात ‘पहिला मानव कोण?’ या प्रश्नाचं नेमकं उत्तर मुळी असूच शकत नाही. प्रौढ नेमका वृद्ध कधी होतो? याची जशी नेमकी वेळ सांगता येत नाही, तसंच हे. एक कोटी वर्षाच्या आत, पण लाखभर वर्षापूर्वी केव्हातरी आपले पूर्वज आपल्यापेक्षा फार फार वेगळे होते. ते भेटले तरीही, त्यांचा आणि आपल्या पिढीचा संकर शक्य नाही. म्हणजेच ते वेगळ्या प्रजातीचे (Species) होते.
आता होमो इरेक्टसला ‘मानवी’ व्यक्ती म्हणायचं का हा वेगळा प्रश्न आहे. कोणाला काय म्हणायचं हे आपणच ठरवायचं आहे. झेब्र्याला पट्टेरी घोडा म्हणता येईल किंवा मनीमाऊला वाघाची मावशी. मानव, व्यक्ती, बाई, बुवा हे शब्द तुम्ही निव्वळ होमो सेपिअनना लागू करू शकता. पण अर्थात एकाच (वंश)माळेचे मणी असूनही, १८५ कोटीव्या मासा-आजोबांना मात्र कोणी माणूस म्हणणार नाही खास. तुमच्यापासून त्यांच्यापर्यंत पोहोचणारी सलग वंशसाखळी आहे; या साखळीतील प्रत्येक कडी ही तिच्या नजीकच्या प्रजातीचीच आहे, तरीही.

जीवाश्म झाले त्यांचे
हे आपले पुरातन पूर्वज होते कोण आणि कसे हे कळलं कसं आपल्याला? जीवाश्मावरून.
जीवाश्म हे ‘अश्म’ म्हणजे दगडच असतात. मृत प्राण्यांच्या, वनस्पतींच्या आकारात आपोआप ढाळले गेलेले हे दगड. बहुतेक जीव, जीवाश्म न बनताच नष्ट पावतात. जर तुम्हाला जीवाश्म बनायचं असेल तर सुयोग्य अशा मातीत, गाळात तुम्ही मरायला हवं. ह्या गाळाचे खडक (स्तरित खडक) होतील तेव्हा तुम्ही जीवाश्म व्हाल.
म्हणजे? म्हणजे तीन प्रकारचे खडक असतात. अग्निजन्य, स्तरित आणि रूपबदलू. रूप-बदलू म्हणजे आधी ते अग्निजन्य किंवा स्तरीय असतात. मग भूरचनेतल्या दाबामुळे, उष्णतेमुळे  त्यांचं रूप बदलतं. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा तप्त लाव्हारस जेव्हा थंड होतो तेव्हा त्यातून टणक अग्निजन्य खडक साकारतात. ह्या अतिकठीण अशा अग्निजन्य खडकांचीही ऊन, पाउस, वारा वगैरे मुळे, झीज होते. ह्या पासून निर्माण झालेली वाळू, गाळ हा नदीतळी, तळयातळी, समुद्रतळी बसतो. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती’, या न्यायानी थरावर थर साठत जातात आणि वरच्या दाबानी खालचे थर चांगले घट्टमुट्ट होतात. हेच ते एकावर एक स्तर असलेले स्तरिय खडक. पुढे भू-कवचातील हालचालीनुसार हे थर तीरपागडे होतात, उलटे होतात, पालथे होतात. कोटी कोटी वर्षात पिळलेसुध्दा जातात. (पुढे भुकंपाबद्दलच्या दहाव्या प्रकरणात आपण हे पहाणारच आहोत.)
समजा एखादं प्रेत वहात वहात एखाद्या खाडीत गाळात रुतलं, तर प्रेत जाईल सडून, त्या भोवतीचा गाळ नंतर चांगला घट्ट खडक होईल. इतका की त्या प्राण्याचा गाळात उमटलेला छाप, त्या खडकावर वर्षानुवर्ष शाबूत रहातो. हा एक प्रकारचा जीवाश्म. एखाद्या मूर्तीचा साचा असावा तसा. ह्या साच्यात कधी वाळू, माती जाऊन बसतात. मग साच्यातून मूर्ती निघावी तशा प्रकारचे जीवाश्म तयार होतात. हा दुसरा प्रकार. ह्या दोन्ही प्रकारात त्या जीवाचं बाह्य रूप तेवढं दिसतं. कधी कधी त्या प्राण्याच्या शरीरात पाण्यातले क्षार, स्फटिक अगदी चपखल जाऊन बसतात. अशा वेळी त्या प्राण्याची त्रिमिती प्रतिमा, त्याच्या आतल्या अवयवांसह अश्मीभूत होते. असे त्रिमिती जीवाश्म सगळ्यात उत्तम. पृथ्वीनी पोटात घेतलेल्या त्या जीवांचं हे यथार्थ दर्शन घडवतात.
जीवाश्मातल्या किरणोत्सर्गी समस्थानिकांवरून जीवाश्माचं वय शोधता येतं. (समस्थानिकांबद्दल आपण चौथ्या प्रकरणात पहाणारच आहोत.) जीवाश्मातले काही किरणोत्सर्गी अणु हळूहळू रूप बदलत असतात. युरेनियम २३८चा अणु, हळूहळू शिसे २०६ (Lead) ह्या अणूत रुपांतरित होतो. ह्याला असं बदलायला वेळ किती लागतो हे माहीत असेल, तर प्रत्येक जीवाश्म म्हणजे एक घड्याळच की. लंबकाच्या घड्याळाचा शोध लागण्याआधी पाण्याची किंवा वाळूची घड्याळं होती. पाण्यानी भरलेल्या घंगाळात बुडाला भोक असलेलं एक भांडं (घटिकापात्र) ठेवलं जायचं. हळूहळू हे भांडं  भरलं की ते बुडायचं. हे भरून बुडायला जेवढा वेळ लागेल तो म्हणजे एक घटिका. (एखादयाची घटका भरली असं आपण म्हणतो त्यालाही हाच संदर्भ आहे.) मेणबत्ती जळण्याचा वेग माहित असेल, तर किती मेणबत्ती उरली आहे, या वरून ती पेटवून किती वेळ झाला हेही सहज काढता येतं. किरणोत्सर्गी घडयाळं ही अशीच काहीशी असतात. निम्म्या ‘युरेनियम २३८’चं ‘शिशात (Lead)२०६’त रुपांतर व्हायला ४.५ अब्ज (४.५*१०९) वर्ष लागतात. ह्याला युरेनियचं ‘अर्धायू’ (Half Life) म्हणतात. तेव्हा शिसं आणि युरेनियमचं प्रमाण माहित झालं की  खडकाचं/ जीवाश्माचं वय सहज काढता येतं. अर्थात हे रुपांतर सुरु कधी झालं, ही मेणबत्ती पेटली कधी, ह्या घड्याळाचा लंबक हलायला सुरुवात कधी झाली, ह्या खडकात फक्त युरेनियमच होतं, शिसं नव्हतंच हेही माहित हवं.
अग्निजन्य खडकांमध्ये लाव्हारस बाहेर पडतो, थंड व्हायला लागतो, तोच तो क्षण. त्यावेळी शिसे नसतंच, असतं ते युरेनियम. स्तरिय खडकांमध्ये मात्र असा काही क्षण नसतो. पण बहुतेक जीवाश्म तर स्तरिय खडकात असतात. तेव्हा जीवाश्माच्या आसपासचे अग्निजन्य खडक तपासून त्यावर हे सगळं गणित मांडावं लागतं. उदाहरणार्थ एखाद्या जीवाश्माच्या वरच्या थरात १२० कोटी वर्ष जुने आणि खाली १३० कोटी वर्ष पुराणे अग्निजन्य खडक आहेत, तर हा जीव १२० ते १३० कोटी वर्षादरम्यान या भूतलावर अस्तित्वात होता असं म्हणता येईल. या प्रकरणात दिलेला कालक्रम हा अशा अभ्यासानी काढलेला आहे. युगायुगांपूर्वी घडलेल्या घटनांचा काळ अंदाजपंचेच ठरवता येतो. पण इतपत नेमकेपणा या विषयात पुरतो.
युरेनियम २३८ एवढं एकमेव घड्याळ नाहीये. इतर अनेक आहेत आणि वेगवेगळ्या वेगानी चालणारी आहेत. म्हणजे प्रत्येकी फक्त सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा असलेली तीन घडयाळं वापरून, आपण नेमकी वेळ बघावी तसं आहे हे. इथे ४.५ अब्ज वर्षाचा काटा ते ५००० वर्षाचा काटा असलेली घड्याळं आहेत. उदाहरणार्थ, कार्बन १४ चं एक घडयाळ आहे. हाफ लाईफ (अर्धे आयुर्मान, अर्धायू) आहे ५७३० वर्ष. म्हणजे निम्म्या रूपांतराला ५७३० वर्ष लागतात. याचा उपयोग मानवी संस्कृतीच्या पाउलखुणा शोधणाऱ्यांना होतो. वेगवेगळ्या वेगानी चालणाऱ्या घडयाळांमुळे, प्रत्येकानुसार निघालेली वयं एकमेकाला जुळताहेत का हेही बघता येतं. हा एक मोठाच फायदा आहे. आजवर काढलेली सर्वच्या सर्व वयं तंतोतंत जुळली आहेत.
कार्बन १४ च्या घड्याळामागील तत्व युरेनियम पेक्षा जरा वेगळं आहे. इथे खडक नाही तर जीवांचे अवशेष, उदाः लाकडाचा ओंडका, वापरले जातात. युरेनियम पेक्षा हे फार फास्ट चालणारं घड्याळ आहे. पण फास्ट फास्ट म्हटलं तरी, ५७३० वर्ष म्हणजे मानवी आयुष्यापेक्षा कितीतरी मोठा काळ. प्रश्न असा येतो की ४.५ अब्ज किंवा ५७३० वर्ष कोणी जगत नाही. मग ह्या घड्याळांचा वेग मोजला कसा? यासाठी निम्म्या युरेनियमचं रुपांतर व्हायला थांबावं लागत नाही. रूपांतराचा वेग काय आहे हे अल्प काळातही समजतं. एक लक्षांश रुपांतर किंवा एक कोट्यांश रुपांतर, त्यावरून निम्म्या रूपांतराचा वेग काढता येतो.
कालप्रवास
आणखी एक प्रयोग करूया, अर्थात ‘म’तल्या‘म’. (म्हणजे ‘म’ना‘तल्या’ ‘म’नात हो.) चार टाळकी गोळा करून, कालप्रवास यानात बसून, द्या अॅक्सिलेटरवर पाय आणि दहा हजार वर्ष मागे जा. उतरा आता खाली. तुम्ही आत्ताच्या इराक देशी पोहोचला असाल, तर आसपास  तुम्हाला नुकताच शेतीचा शोध लागलेला दिसेल. इराक वगळता अन्यत्र शिकारी, कंदमुळे खाणारी, नागडीउघडी किंवा वल्कलं, कातडी पांघरलेली, अगम्य भाषा बोलणारी,  भटकी माणसं भेटतील. पण जर त्यांना न्हाऊ माखू घालाल, जरा पोशाख बिशाख कराल, तर ती तुमच्यातली सहज गणली जातील. प्रेमात पडाल तर एखाद्या अनौरस अपत्याचे पालकही व्हाल!
आता ह्या टोळीतल्या एकाला, तुमच्या चारशे पिढयापूर्व आज्याला, घ्या बरोबर आणि आणखी दहा हजार वर्ष मागे जा. आठशे पिढयांपूर्वीची मंडळी भेटतील आता. इथे सगळेच भटके असतील, पण दिसायला आपल्यासारखेच असतील. अपत्य संभवही आहेच आहे. इथेही एकाला बरोबर घ्या आणि आणखी दहा हजार वर्ष मागे जा. दरवेळी एक नवा प्रवासी घेत घेत दरवेळी दहा दहा हजार वर्ष मागे मागे जा.
एखादा कोटी वर्ष प्रवास झाला की भेटणारी माणसं अगदी निराळीच दिसायला लागतील. तुमचा त्यांच्याशी विवाहयोग, संततीयोग शक्य  नाही. पण यानातल्या सर्वात ताज्या प्रवाशाशी मात्र त्यांचा विवाहयोग आणि संततीयोग शक्य आहे. कारण सगळ्यात ताजा प्रवासी हा सुमारे कोटीभर वर्ष जुनाच आहे.
मुद्दा मघाचाच आहे. संथपणामुळे लक्षात न येणारे बदल. घड्याळाचा तास काटा फिरतोय हे लवकर लक्षात येत नाही, तसंच हे. दोन उदाहरणं मुद्दामच दिली आहेत. एकतर हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे आणि अनेकांना तो सहजा सहजी पचनी पडत नाही.
चला तर मग. पुन्हा एकदा यानात बसून प्रवास सुरु करुया. मासा आजोबांपर्यंत जायचंय आपल्याला. आता आला सहा कोटी वर्षापूर्वीचा प्रदेश. आफ्रिकेत असाल तर तिथे अडीच लाखावे आजोबा भेटतील. कपी(Apes) कुलातील असतील ते. दिसायला चिंम्पान्झी सारखे पण चिंम्पान्झी नाहीत. आपले आणि चिंम्पान्झींचे जे समान पूर्वज होते, ते हे. आपल्याशीही संकर अशक्य आणि चिंम्पान्झींशी देखील अशक्यच. अर्थात आपल्या यानात, मागच्या ठेसनात, जो पाच कोटी नऊ लाख नव्वद हजार वर्षापूर्वीचा पाहूणा आपण बरोबर घेतलाय, त्याच्यासाठी मात्र हे स्थळ सुयोग्य असेल. कदाचित पाच कोटी नऊ लाख वर्षवाल्यांशी पण ह्यांचं जुळेल पण चार कोटी वर्षवाल्यांशी नाही.
असंच जाऊ पंचवीस कोटी वर्ष मागे. तिथे तुमचे (आणि माझेही) अंदाजे दीडकोटीवे आजी-आजोबा असतील. हे कपी नसतील. त्यांना शेपट्या असतील. दिसायला आजच्या माकडासारखे, पण नात्यानी त्यांना आणि आपल्यालाही तितकेच लांबचे. आपल्यापेक्षा खूप खूप वेगळे. आपल्याशी संकर अशक्यच आणि आजच्या वानरांशीही अशक्य. पण नुकत्याच यानात घेतलेल्या, चोवीस कोटी नऊ लाख नव्वद हजार वर्षवाल्या पाशिंजराशी मात्र यांचं सूत जुळेल. लक्षात घ्या इथे अगदी संथ बदल होतोय. लगतच्या ठेसनांमधल्या पाशींजरात काहीच फरक नाही, पण दूरच्या ठेसनात बराच फरक.
अशीच चालू दे यात्रा. प्रत्येक टप्प्यावर दहा दहा हजार वर्ष मागे मागे, प्रत्येक टप्प्यावर नगण्य बदल. आता आलोय त्रेसष्ठ कोटीच्या घरात. स्वागताला आहेत आपले सातकोटीवे आजी-आजोबा. पाहिलंत, हात हलवून या या म्हणताहेत. हात म्हणावं का पंजा हा प्रश्नच आहे. हे दिसतात लेमूर माकडासारखे, असतात झाडावर. हे आजच्या सर्व मर्कट प्रजातींचे, आजच्या कपींचे आणि आपलेही, मूळ पूर्वज बरं!
आपले जसे ते आजोबा आहेत तसेच, ते आजच्या लेमूर माकडांचेही आजोबा आहेत. आजच्या मर्कट आणि कपिंचेही ते आजोबा आहेत. अर्थात ते वेगळ्या प्रजातीचे असल्याने, आजच्या त्यांच्या कुठल्याच वंशजापासून त्यांना संतती संभव नाही. पण बासष्ठ कोटी नऊ लाख नव्वद हजार वर्षामागच्या आजीशी मात्र संग आणि संतती शक्य आहे. चला यांनाही यानात घेऊन आपण आणखी उलटे जाऊ.
एकशे पाच कोटी वषापूर्वीच्या थांब्यावर, आपले पंचेचाळीस कोटीवे आजोबा असतील. हे तर सर्व आधुनिक प्राणीजगताचे, सगळ्या सस्तन प्राण्यांचे पितामह. फक्त कांगारू आणि तत्सम प्रजाती; बदकतोंड्या प्लॅटीपस आणि तत्सम प्रजाती हे जीव वगळून. रूप मात्र आजच्या, आपल्याला परिचित असलेल्या, सस्तन प्राण्यांशी जेमतेमच जुळेल.
३१० कोटी वर्षापूर्वीच्या आजीला भेटायला थांबूया आता आपण. आजच्या सर्व प्राण्यांची, सरपटणाऱ्या प्राण्यांची; सर्व साप, पाली, कासवं, मगरी, सर्व डायनॉसॉरची, सर्व पक्ष्यांची (पक्षी ही जीवशास्त्रीयदृष्ट्या डायनोसॉरचीच पिल्लावळ) आदीमाता ही. दिसायला आजच्या पालीसारखी. याचा अर्थ, दिसण्याच्या बाबतीत, त्या काळापासून सस्तन प्राणी बरेच बदलले आहेत, पण पाली फारशा बदललेल्या नाहीत. त्या (आजही) आदिमातेवर गेलेल्या दिसतात.
आता माशाचं घर अगदी जवळ आलंय हं. आणखी एकच स्टेशन थांबू. ३४० कोटी वर्षापूर्वीच्या जगात आपल्या १७५ कोटीव्या आजोबांना भेटूया. दिसायला हे त्या पाणसरड्या सारखे आहेत आणि असायला सर्व उभयचर (Amphibians) आणि सर्व भूचर पृष्ठवंशीय (Terestrial vertebrates) प्राण्यांचे बाप के, बाप के, बाप के,...!
आणि आता आलोय ४७० कोटी वर्ष मागे. आपला १८५ कोटीवा मासा आज्जा, त्याच्या जिवलग मासोळीसोबत मजेत पाण्यात सळसळतोय. आणखीही मागे मागे जाता येईल, आणखी आणखी जुने पुराणे पूर्वज भेटतील. जबडेवाले मासे, आणखी मागे बिनजबड्याचे मासे... इथून मागे फार नेमकं सांगणं अवघड आहे. ह्या पूर्वीचे जीवाश्म फारसे नाहीत.

डी.एन.ए.च सांगून राहिलेत, आपण सारे बहीण भाऊ
आपले पूर्वज दिसायला कसे होते हे सांगायला जीवाश्म नसले तरी, आपल्यासकट सर्व सजीव हे अंती एकमेकाचे भाईबंधच आहेत हे अगदी स्पष्ट आहे आता. या वंशवृक्षात जवळजवळचे कोण (उदाः आपण आणि चिंम्पान्झी किंवा उंदीर आणि घूस), दूरचे नातेवाईक कोण (उदाः आपण आणि कोकीळा किंवा उंदीर आणि मगर), हे सारं स्पष्ट आहे. कसं? याआधी शरीररचनेच्या पद्धतशीर तुलनात्मक अभ्यासानी आणि आताशा डी.एन.ए.च्या पद्धतशीर तुलनात्मक अभ्यासानी.
सजीवांच्या प्रत्येक पेशीत अनुवंशिकता जपणारी गुणसूत्रे (Chromosomes) असतात. गुणसूत्रे म्हणजे घट्ट गुंडाळलेले  डी.एन.ए.चे लांबच लांब रेणू. या रेणूंद्वारे आपल्या शरीराच्या रचनेचं, चलन वलनाचं नियंत्रण केलं जातं. गुणसुत्रांवर चार वेगवेगळी रसायनं (चार वेगवेगळी अक्षरं) एका पुढे एक अशी असतात. ही अक्षरं असतात किंवा नसतात. अर्ध अक्षर अशी भानगड नाही. जोडाक्षर विरहीत अशी ही अक्षरमाला आहे. (म्हणूनच ही भाषा ‘डिजिटल’ आहे.) ही अक्षरं आता आपल्याला वाचता येतात, मोजता येतात. या अक्षरांच्या क्रमात शरीरकार्याचं रहस्य लिहिलेलं असतं.
इंग्रजीत २६ अक्षरं आहेत, तर या भाषेत चार आहेत. A, T, C, G, ही ती चार अक्षरं. Adnene, Thyamin, Cytosin, Guanin ह्या चार न्युक्लिओटाईड गटातील रसायनांची ही इंग्रजी आद्याक्षरं. ह्या चार अक्षरांच्या, म्हणजेच रसायनांच्या माळा गुंफून सारे संदेश दिले जातात. आपण एकापुढे एक काही अक्षरं लिहितो. अक्षरांचे शब्द होतात, शब्दांची वाक्यं आणि अर्थपूर्ण संदेश तयार होतो. तसंच हे. पण याहून महत्वाचं म्हणजे, ही भाषा सर्व सजीव जगतात सारखीच आहे. आजवरच्या प्रत्येक प्राण्यात, वनस्पतीत, बॅक्टेरीयात, प्रत्येक सजीवात ह्याच चार अक्षरांच्या सांकेतिक भाषेत स्वतःच्याच निर्मितीचा नकाशा लपलेला आहे. अगदी प्राथमिक अवस्थेतल्या बॅक्टेरीयातही अक्षरं तीच, शब्द तेच आणि शब्दार्थही तेच. सर्व जीवजंतूत, वनस्पतीत, प्राण्यात, माणसातही अक्षरं तीच, शब्द तेच आणि शब्दार्थही तेच. अर्थात वाक्य वेगळी, संदेश वेगळे, त्यामुळे शरीर आणि त्याचं कार्यही वेगळं वेगळं. अक्षरमालेतून जेव्हां एक विशिष्ठ संदेश दिला जातो तेव्हा गुणसूत्राच्या त्या भागाला जीन असं म्हणतात. उदाहरणार्थ फॉक्स पी २ हा जीन सर्व सस्तन प्राण्यात असतो. म्हणजेच सगळ्या सस्तन प्राण्यांचा मूळपुरुष आणि आदिमाता एकच आहे. २००० अक्षरांचा हा संदेश आहे.
सर्व सस्तन प्राण्यात ही २००० अक्षरे जवळपास जैसे थे आहेत. पण दोन प्रजातीत (उदाः वाघ आणि मांजर) ही २००० अक्षरे किती ‘जैसे थे’ आहेत, ह्यावरून त्या दोन प्रजाती उत्क्रांतीच्या टप्प्यावर एकमेकांच्या किती जवळपास  आहेत, ते ठरवता येतं. उदाः चिम्पान्झी आणि आपल्यात फारच थोडा फरक आहे. फक्त नऊ अक्षरांचा फरक. त्यामुळे आपण जवळचे नातलग. आपण आणि उंदीर यात फरक जास्त आहे. १३९ अक्षरांचा फरक आहे. म्हणून आपण चुलत नात्यातले. दिसायला आपण उंदरासारखे कमी आणि चिंम्पान्झीसारखे जास्त का दिसतो ते हे कळलं ना आता?
चिंम्पान्झी सख्खे, उंदीर चुलत चुलत, म्हणजे चींम्पान्झींचे आणि आपले समान पूर्वज तसे अलीकडचे, उंदरांचे आणि आपले समान पूर्वज मात्र त्याही फार फार पूर्वीचे. आत्ताचे आपण आणि आत्ताचे उंदीरही, त्या आपल्या पूर्वजांसारखे दिसत नाही. इतक्या पिढ्यांमध्ये खूप खूप बदललोय आपण. आत्ताच्या वानरांपेक्षा (Monkeys) आपल्याला चिंम्पान्झी (Apes) जवळचे. पण आपल्याला आणि चिंम्पान्झींना हे ‘वानर’ समान अंतरावरचे बरं. आपले फॉक्स पी २ वानरांच्या (उदाः बबून वानर) फॉक्स पी २ बरोबर जुळवून बघितले तर २३ ते २४ अक्षरांचा फरक दिसतो आणि चिंम्पान्झीचे फॉक्स पी २ वानरांच्या (उदाः बबून वानर) फॉक्स पी २ शी जुळवून बघितले तरीही तेवढाच फरक दिसतो. सगळ कसं फिट्ट बसतंय. आपण आणि चिम्पान्झी, वानरांशी समान नात्यांनी बांधलेलो आहोत याचा हा सज्जड पुरावा.
जाता जाता एक सांगतो, बेडूकराव तर सर्व सस्तन प्राण्यांचे (त्यात आपणही आलो) खूप, खूप, खूप, खूप, लांबचे नातेवाईक. त्यांच्या आणि (आपल्यासकट) सगळ्याच सस्तन प्राण्यांच्या फॉक्स पी २ मध्ये १४० अक्षरांचा फरक आहे. कारण सगळ्यांना ते सारखेच दूरचे. सर्व सस्तनप्राण्यांचा पूर्वज १८० कोटी वर्षापूर्वी होऊन गेला. त्याच्यापासून आपण निपजलो. सर्व सस्तन आणि उभयचर प्राण्यांचा पूर्वज ३४० कोटी वर्षापूर्वीचा. इथून उभयचरांचं बिऱ्हाड वेगळं झालं आणि सस्तन प्राण्यांचं वेगळं झालं. त्यांच्यातला बेटी व्यवहार बंद झाला. तिथून पुढे (प्रथा, परंपरा, कुलधर्म कुलाचार आणि) फॉक्स पी २  बदलत बदलत गेले. फरक वाढत गेला. नातं दुरावत गेलं. आज कुणी बेडकानी सांगितलं की, ‘अहो, तुमचे आणि आमचे आजोबा फार फार पूर्वी एकाच डबक्यातले’, तर आपल्याला किती घाण वाटेल.
फॉक्स पी २ जीन निव्वळ एक उदाहरण मात्र. कोणताही जीन घेतला तरी हेच आढळेल. याच तत्वानुसार माणसा माणसातील नातीही ठरवता येतील. सर्व माणसं एकासारखी एक नसतात. सर्व बबून किंवा सर्व उंदीरही तसे नसतात. व्यक्तीगणिक त्या त्या व्यक्तीच्या जीन्स मध्येही बारीक बारीक फरक असतात.  दोघातील जीन्स किती सारखे यावरून नातं किती जवळचं याचा हिशोब करता येतो आपल्याला. अगदी अक्षरनअक्षर ताडून पहाता येतं. आपण दोघेही ‘माणूस’, तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीन्स मध्ये बरंच साम्य आढळेल. आपल्या दोघांची अक्षरमाला चींम्पान्झीशी जुळवून बघीतली तर हा फरक वाढेल. तुमच्यात आणि तुमच्या आईवडीलांच्या जीनमध्ये साम्य खूप. तुमच्यात आणि तुमच्या सख्ख्या भावंडातही साम्य अधिक. तुमच्या आणि तुमच्या चुलत भावंडात साम्य कमी. नात्यांची ही वीण आता गुणसूत्र तपासून उलगडता येते. ह्या तंत्राचे अनेक उपयोग आहेत. प्रत्येकाचा बोटाचा ठसा जसा वेगळा तसा हा डी.एन.ए.चा ठसा. गुन्हेगाराची ओळख पटवायला अत्यंत उपयुक्त.
निवळ सस्तन प्राण्यात आढळणाऱ्या अशा एखाद्या जीनची तुलना करून त्यांच्या विविध प्रजातीतील (उदा: माणूस, हत्ती, घोडा) नातं शोधता येतं. अक्षर अक्षर जुळवून बघण्याच तंत्र खूपच महत्वाचं ठरतं इथे. इतर काही जीन वापरून आणखी लांब लांबची नाती तपासता येतात. (उदाः जंत आणि पृष्ठवंशीय प्राणी) असच तंत्र वापरून एकाच प्रजातीतील प्रजेची नातीही जोडता येतात. उदाः तुम्ही इंग्लिश असाल तर तुमचे आणि माझे समान पूर्वज काही शतकांपूर्वीचे असतील. तुम्ही तास्मानिया किंवा अमेरिकेचे मूळ निवासी असाल तर लाखो वर्ष मागे जावं लागेल आणि तुम्ही कलहारी वाळवंटातले असाल तर आणखी बरंच बरंच मागे जावं लागेल. पण मूळ सापडेल खचित. कारण मानवाचे अंती गोत्र एक.
पण मानवाचेच का? या पृथ्वीतलावरचे सर्व सजीव; वृक्ष, वल्ली, वनचरे... ही आम्हा सोयरी आहेत हे निश्चित. कारण, अगदी बॅक्टेरियात दिसणारे काही जीन्स आपल्यातही दिसतात. कारण आपली आणि सर्व सजीवांची जेनेटिक अंकलिपीही तीच आहे; तीच अक्षरं, तेच शब्द, त्या शब्दांचे तेच अर्थ. आपल्या वंशवृक्षाच्या शेजारच्या डहाळ्यांवर चिंम्पान्झी आहेत, माकडं आहेत, पक्षी, जंत, सरडे, मासे, गोगलगाई, गुलाब, शेवाळं, भूछत्र, बॅक्टेरिया... आहेत. सारे एकाच माळेचे मणी, एकाच मुळाक्षरांचे धनी. गोत्रच जर काढायचं असेल तर मानवांचेच का? जीवशास्त्र शिकवतं, सजीवांचे अंती गोत्र एक.
कुठल्याही भाकडकथेपेक्षा, पुराणकथेपेक्षा हे कितीतरी उत्तम आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, महन्मधुर आहे... अंगावर शहारा आणणारं आहे... आणि महत्वाचं म्हणजे शंभरटक्के सत्य आहे.
--------------------------------------------------------------------------



Friday, 7 October 2016

प्रकरण १ सत्य कोणतं आणि जादू कुठली? रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील ‘व्हॉट इज रिअॅलिटी? व्हॉट इज मॅजिक?’ या लेखाचा मराठी भावानुवाद.

प्रकरण १
सत्य कोणतं आणि जादू कुठली?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील
‘व्हॉट इज रिअॅलिटी? व्हॉट इज मॅजिक?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.  जि. सातारा. पिन ४१२ ८०३


जे जे आसपास आहे तेवढंच सत्य, ते सगळं वास्तव. सरळ आहे, नाही का? खरंतर नाही. अनेक प्रश्न आहेत. डायनॉसॉरचं काय? ते आत्ता आसपास दिसत नाहीत, एके काळी होते. तारे? इतक्या दूरवरचे तारे की आपल्यापर्यंत त्यांचा प्रकाश पोहोचेपर्यंत ते विझूनही गेले असतील. म्हणजे आपल्याला जेव्हा ते दिसत असतात, तेव्हा ते तिथे नसतातच.
तारे आणि डायनॉसॉरचं जाऊदे. पण आज, आत्ता, इथे, वास्तवाची जाणीव कशी होते आपल्याला? अर्थात डोळे, नाक, त्वचा, कान, जीभ या पंचेन्द्रीयांमुळे... मृग आणि मृगजळ, मृद्गंध आणि कस्तुरी, काटे आणि मखमल, धबाबा कोसळणारा धबधबा आणि दारावरची मंजूळ बेल, साखर आणि मीठ... हे सगळं, सगळं आपल्याला समजतं; ही तो  पंचेंद्रियांची किमया. पण जेवढं पंचेंद्रियांना जाणवतं तेवढंच आहे का हे जग?
दूरदूरच्या प्रचंड आकाशगंगा आपल्याला दिसत नाहीत आणि सूक्ष्मजीवही आपल्याला दिसत नाहीत. नुसत्या नजरेला दिसत नाहीत म्हणून ते नसतात असं थोडंच म्हणतो आपण? दुर्बिणीनी आकाशगंगा आणि सूक्ष्मदर्शकानी बॅक्टेरीया दिसतात की. या उपकरणांच्या मदतीनी आपली नजर अधिक तेज अधिक दूरवर रोखतो आपण. या उपकरणांचं कार्य, सामर्थ्य आणि मर्यादा जाणतो आपण. त्यातून दिसलेली दृष्टीआडची लुभावणी सृष्टी, तारका, सूक्ष्मजीव प्रत्यक्षात आहेत अशी खात्री बाळगतो आपण.
रेडियो लहरी असतात का? दिसत नाहीत, ऐकूही येत नाहीत, पण काही खास यंत्रात, उदाहरणार्थ टेलीव्हिजनमध्ये, ह्यांचं रुपांतर दिसेल अशा चित्रात आणि ऐकू येईल अशा आवाजात केलं जातं. त्यामुळे एरवी जाणवत नसल्या तरी या लहरी असतात हे उमजू शकतो आपण. दुर्बिणी आणि सूक्ष्मदर्शकांसारखंच, रेडीओ आणि टी.व्ही.चं तंत्र आणि विज्ञान आपल्याला माहीत आहे. एरवी न जाणवणाऱ्या लहरी, ही यंत्र आपल्याला जाणवतील अशा रुपात आणतात. तसेच ते रेडीओ टेलीस्कोप आणि एक्सरे टेलीस्कोप. अदृष्य तारे आणि आकाशगंगा आपल्या नजरेत आणतात. दृष्टीआडची सृष्टी दृष्टीपथात आणतात. आपला दृष्टीकोन विस्तारतो.
पुन्हा डायनॉसॉरकडे वळूया. या ग्रहावर त्याचं राज्य होतं म्हणे एके काळी, पण कशावरून? आपण त्यांना न पाहिलं, न ऐकलं, ना त्यांनी कधी आपल्यावर हल्ला केला. त्यांच्या जगात नेणारं कालयंत्र वगैरे काही नाही आपल्याकडे. पण आपल्याकडे जीवाश्म आहेत. ते आपल्याला दिसतात. जीवाश्म म्हणजे गाडलेली मढीच. ती काही हलत नाहीत की बोलत नाहीत. पण हे जीवाश्म तयार कसे होतात ते आपल्याला माहीत आहे. कोट्यवधी वर्षापूर्वी काय घडलं याचा अंदाज आपण करू शकतो. पाणी आणि क्षार मढ्यामध्ये झिरपतात. क्षारांचे स्फटिक होतात आणि संपूर्ण प्राणी त्यातल्या बारकाव्यांसह, आता दगडात चिरस्थायी होतो. जीवाश्म तयार होतो. त्यामुळे आत्ता दिसत नसले तरी डायनॉसॉर होते हे अशा अप्रत्यक्ष पुराव्यांनी समजू शकतं. पण हे पुरावे आपल्याला दिसतात, त्यांना स्पर्श करता येतो; म्हणजे पुन्हा पंचेन्द्रीय आलीच.
एका अर्थी, दुर्बीण हे खरंतर एक कालप्रवासयंत्रच आहे. आपल्याला कोणतीही वस्तू दिसते म्हणजे त्या पासून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो. पण प्रकाशाला यायला वेळ लागतो! समोरच्या मित्राकडे बघताना त्याच्या चेहऱ्याकडून येणारा प्रकाश तुमच्यापर्यंत पोचायला सूक्ष्मसा वेळ लागतो. हा जो काही सूक्ष्मसा वेळ लागतो, तितक्या वेळापूर्वीचा चेहरा तुम्हाला दिसत असतो. आवाजाचा वेग, प्रकाशाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे. म्हणूनच आपल्याला आकाशात आधी फटाक्याचा उजेड दिसतो आणि मग आवाज येतो. नदीवर लांब कुणी धुणं धुवत असेल तर आधी कपडा आपटलेला दिसतो आणि मग आपटल्याचा आवाज येतो.
प्रकाशाचा वेग इतका प्रचंड आहे की सहसा घटना घडल्याक्षणीच आपल्याला दिसलेली असते, असच समजतो आपण. पण लांबलांबच्या ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशाचं काय? सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला आठ मिनिटं लागतात. म्हणजे उद्या सूर्याचा स्फोट झाला तर आपल्याला त्याची बातमी आठ मिनीटं उशीरा कळेल. पण तोपर्यंत आपण संपून जाऊ. सूर्यानंतर आपल्याला जवळचा तारा म्हणजे प्रॉक्सिमा सेंटॉरी. ह्याच्याकडून येणारा उजेड आपल्या पर्यंत पोहोचायला चार वर्ष लागतात (म्हणजेच हा आपल्यापासून चार प्रकाश वर्ष दूर आहे). आज (२०१६) दुर्बिणीतून दिसणारं त्याचं रूप हे २०१२ सालीचं असणार आहे. आपण ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या किनारी रहातो. आकाशगंगा म्हणजे तारकांचे पुंजके. आपल्या सगळ्यात नजीकची आकाशगंगा आहे अॅण्ड्रोमेडा, अडीच कोटी प्रकाश वर्ष दूर! म्हणजे  आज इथून  दिसणारी अॅण्ड्रोमेडाची छबी ही तिची  अडीच कोटी वर्षापूर्वीची अवस्था आहे तर. म्हणजे काळयंत्रात बसून उलटा प्रवास केल्यासारखंच आहे हे. हबल दुर्बिणीतून आपल्याला ‘स्टीफनची पंचकडी’ नावाची, एकमेकांशी टकरा घेणाऱ्या, पाच आकाशगंगांची मालिका दिसते. पावणेतीन कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे ही. आज जे आपल्याला दिसतंय ते तिथे पावणेतीन कोटी वर्षापूर्वी घडलं होतं. तिथे जर कुणी परग्रहवासी असतील आणि जर त्यांच्याकडे शक्तीशाली दुर्बीण असेल आणि आज त्यांनी पृथ्वीकडे पाहिलं तर त्यांनाही आपण नाहीच दिसणार. त्यांना दिसतील पावणेतीन कोटी वर्षापूर्वीचे आपले डायनॉसॉर भाईबंध.
या विश्वात अन्यत्र सजीवसृष्टी असेल का? कुणी कधी न पाहिलेली सृष्टी? परग्रहवासी हे सत्य मानायचं का मग? ठाउक नाही. पण अशा परग्रहावरील सृष्टीच्या काही खाणाखुणा जाणून आहोत आपण. त्यांच्याशी कधी संपर्क आलाच तर आपली पंचेन्द्रीयच सांगतील ते आपल्याला. कदाचित कुणीतरी इथून परग्रहावरच्या जीवांचा वेध घेणारी दुर्बीण बनवेल किंवा रेडीओ टेलिस्कोपमधले संदेश हे निश्चितपणे परग्रहवासियांचेच आहेत हे सिद्ध होईल. आज जेवढं ज्ञात आहे तेवढंच सत्य आणि बाकी सारं मिथ्या असं काही नाही. अद्याप आपल्याला अज्ञात असंही बरंच काही आहे. उद्या त्याचा शोध लागेल. दुर्बीण आणि रेडीओ टेलिस्कोपमुळे आपल्याला इंद्रीयांपल्याडचं जग ज्ञात झालं. नव्या नव्या शोधांमुळे आणखी पलीकडचं ज्ञात होईल.
अणु होतेच, आपल्याला त्यांचा शोध अगदी अलीकडे लागला आणि आपल्या भावी पिढयांना आपल्यापेक्षा अणुबद्दल बरंच काही समजेल. हाच तो विज्ञानानंद. सतत नव्याचा सोस, नव्याचा शोध, नव्याने बोध. याचा अर्थ असा नाही की कोणाच्याही, कुठल्याही, लोणकढया थापेवर आपण विश्वास ठेवावा. कल्पनेला मर्यादा नाहीत. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. प्रत्यक्षात अशक्यकोटीतील अशा कितीतरी गोष्टी कल्पनेत असतात. पऱ्या आणि राक्षस; अप्सरा आणि खवीस...! नव्या कल्पनांबद्दल स्वागतशील असतानाच भोळसटपणे सगळ्यावरच विश्वासून चालणार नाही. काटेकोर पुराव्याबद्दल आग्रही असलं पाहिजे आपण.
मॉडेल (प्रतिमान): कमाल कल्पनाशक्तीची
आपल्या इंद्रियांपल्याडची सृष्टी जाणण्याची शास्त्रज्ञांची एक वेगळीच तऱ्हा आहे. काय असेल याचा अंदाज बांधून एक मॉडेल गृहीत धरलं जातं. अमुक अमुक तऱ्हेची काहीतरी रचना असेल असं समजलं जातं. यावरून अपेक्षित परिणामांचे आडाखे बांधले जातात. थोडं गणित मांडून सदरहू रचनेनुसार काय असण्याची, दिसण्याची, ऐकू येण्याची शक्यता आहे हे ठरवलं जातं. (हे दिसणं, ऐकणं हे थेट इंद्रियांद्वारे असेल वा यंत्राद्वारे असेल.) अखेर जे अपेक्षित आहे तेच घडतंय ना, जसंच्या तसंच घडतंय ना,  हे तपासलं जातं. ‘मॉडेल’ म्हणजे काही दरवेळी पुठ्याचं किंवा लाकडाचंच काही असेल असं नाही. कागदावर केलेली गणिती आकडेमोड ही ही एक मांडलेला अंदाज, म्हणजेच ‘मॉडेल’, असू शकते. आजकाल कॉम्प्यूटरच्या साह्यानी त्रिमिती मॉडेल आपण पडद्यावर पाहू शकतो. या मूळ मॉडेलवरून काही भाकीतं वर्तवली जातात. मग ती तपासली जातात. गरजेप्रमाणे मॉडेलमध्ये बदल केले जातात, सुधारणा केल्या जातात. भाकीतं चुकली तर ते मॉडेल बाद ठरवून नव्या मॉडेलचा शोध सुरु होतो. जर ती बरोबर आली तर आपलं मॉडेल योग्य आहे असं आपण म्हणतो. अधिक काटेकोरपणे बोलायचं, तर आपल मॉडेल योग्य आहे, सत्य परिस्थितीचं यथार्थ दर्शन आहे, असं आपण ‘समजू’ लागतो. सत्याच्या अधिकाधिक निकट पोहोचण्याचा हा प्रयत्न असतो.
एका उदाहरणानी हे अधिक स्पष्ट होईल. अनुवंशिक गुण, जीन्सद्वारे आणि त्यातही हे जीन्स बनलेले असतात त्या डी.एन.ए.च्या रेणूद्वारे वाहून नेले जातात हे आपल्याला माहीत आहे. ह्या डी.एन.ए. बद्दल आपल्याला प्रचंड माहिती आहे. पण हा दिसतो का आपल्याला? नाही. मुळीच नाही. अगदी शक्तीशाली सूक्ष्मदर्शकातूनही नाही. डी.एन.ए. विषयीची सगळी माहिती, ही निव्वळ त्याच्या वेगवेगळ्या रूपांची, वेगवेगळ्या मॉडेलची कल्पना करून, ती मॉडेल तपासून, सुधारून मिळवलेली आहे.
डी.एन.ए. नामक काही भानगड आहे याचा थांगपत्ता नसतानाच आपल्याला जीन्सबद्दल बरंच माहीत झालं होतं. ग्रेगोर मेंडेल ह्या ऑस्ट्रीयातल्या पाद्र्यानी, त्याच्या चर्चच्या आवारातच, वाटाण्याच्या वाणावर बरेच प्रयोग केले. प्रत्येक वाणाची उंची, रंग, अशा नोंदी तो ठेवत गेला. त्यानी कधी जीन्स पाहीले नाहीत. पण त्यांचे परिणाम, रोपाची उंची, वाटाण्याचा रंग हे त्याला दिसत होते. पिढ्यानपिढ्या हे गुणधर्म जीन्समुळे संक्रमित होतात असं त्यानी गृहीत धरलं. (त्यानी जीन्स हा शब्द वापरला नव्हता.) त्यांच्या संक्रमणांच्या नियमांचा अंदाज बांधला आणि  त्यानुसार, पुढील पिढीत बुटक्या झाडांपेक्षा तिप्पट प्रमाणात ऊंच झाडे असतील, असं भाकीत वर्तवलं. तंतोतंत खरं ठरलं की हे भाकीत! मुद्दा हा की मेंडेलसाठी जीन्स हे निव्वळ अंदाज, निव्वळ ठोकताळे होते. जीन्स हा त्याच्या कल्पनेचा खेळ होता, कल्पनेचा शोध होता. डोळ्याला ते दिसत नव्हते, सूक्ष्मदर्शकानीही ते दिसत नव्हते. पण जीन्सचे त्यानी कल्पिलेले गुणधर्म गृहीत धरले तर अनुवंशिक गुणांचं कोडं सुटत होतं. कल्पनेतले जीन्स प्रत्यक्षातल्या गुणधर्माशी ताडून बघता येत होते.  मग पुढे बरंच काही घडलं. फळमाशा आणि अन्य जीवजंतुंवर अभ्यास करून, माणसात ४६ आणि फळमाशीत ८ गुणसूत्र आहेत हे समजलं. गुणसूत्रांचं कार्य समजलं. जीन्सचा क्रम समजला. आणि हा सगळा कार्यक्रम डी.एन.ए.च्या शोधाआधीच पार पडला!!
मुख्यत्वे जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रीक आणि त्यांच्या नंतरच्या अनेक शास्त्रज्ञांमुळे डी.एन.ए.चं कार्य नेमकं कसं चालतं हे आपल्याला ज्ञात आहे. पण डी.एन.ए.ची नेमकं रचना म्हणजे वॅटसन आणि क्रीकच्याही दृष्टीआडची सृष्टीच. डी.एन.ए.च्या रचनेबद्दल विविध कल्पना लढवून त्या पुनःपुन्हा पडताळून पाहूनच ते अंतिम निष्कर्षाला पोहोचले. त्यांनी पुठ्ठ्याची मॉडेलही बनवली होती. विविध रचनांनुसार डी.एन.ए.च्या स्फटिकांची मोजमापं बदलणार होती. रोसालीन फ्रँक्लीन् आणि मॉरीस विल्किन्स यांनी एक्सरेच्या मदतीनी ही मोजमापं घेतली होती. वॅटसन आणि क्रीक यांनी कल्पिलेली दुहेरी गोफाची रचना ही आणि हीच या मोजमापांशी तंतोतंत जुळत होती. सबब हीच रचना असावी हे स्वीकारलं गेलं. एवढच नाही तर या रचनेनुसार मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या नियमांचाही उलगडा होत होता.
सत्याचं ज्ञान आपल्याला तीन प्रकारे होत असतं तर. आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत, आपल्या ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढवून, (उदाः सूक्षदर्शक अथवा दुर्बीण वापरून) आणि मॉडेलच्या आधारे भाकीत, भाकिताची तपासणी, मॉडेल मध्ये बदल, पुन्हा भाकिताची तपासणी... या मार्गांनी. अर्थात कुठलंही मॉडेल तपासण्यासाठी अंतिमतः आपण आपल्या ज्ञानेंद्रियांवरच अवलंबून असतो.
म्हणजे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या इंद्रियगोचर आहे, विज्ञानाच्या मदतीनी समजतं, तेवढंच सत्य असतं काय?  असूया, आनंद, हर्ष, प्रेम हे सगळं झूठ आहे काय?
छे छे भावभावना ह्या देखील अगदी खऱ्याखुऱ्याच असतात, मात्र त्याचं अस्तित्व हे माणसाच्या मेंदूत असतं. माणसाच्या मेंदूत, कुत्र्यांच्या, चिम्पांन्झीच्या, व्हेलच्या अशा अन्य काही प्राणीमात्रांच्या मेंदूत. दगडाला कसल्या आल्या आहेत भावभावना? डोंगराला कसली आली आहे प्रेमभावना? ज्याच्या त्याच्या भावभावना अगदी सच्च्या असतात. पण मेंदू अस्तित्वात येण्यापूर्वी त्या अस्तित्वात नव्हत्या. दूर कुठल्या अज्ञात ग्रहावर कदाचित याहीपेक्षा संपूर्णतः वेगळ्या भावना जागृत असलेली सृष्टी असेल. त्यांचे मेंदूही त्या त्या भावनांशी तादात्म्य पावणारे असतील, कदाचित मेंदू असा काही अवयवच नसेल... वेगळाच काही मामला असेल तिथे...कुणी सांगावं?


विज्ञान आणि अतिनैसर्गिक शक्ती: तर्क विरुद्ध तर्कदुष्टता.
सत्य आणि सत्याचा शोध हा असा असतो. या पुस्तकातील प्रत्येक विभाग हा एकेका सत्याबद्दल सांगेल, उदाः सूर्य, भूकंप, इंद्रधनुष्य, जैवविविधता. आता नावातल्या दुसऱ्या शब्दाबद्दल, जादू! जादू हा जरा निसरडा शब्द आहे. अतिनैसर्गिक शक्ती म्हणजेही जादू. स्टेजवर जादूगार दाखवतो तीही जादू आणि काव्यात्म अर्थानही जादू/जादूई  वापरला जातोच की. पुस्तकाच्या नावात हाच अर्थ अभिप्रेत आहे.
अतिनैसर्गिक शक्ती आपल्याला मिथककथांमधे, परिकथांमधे भेटतात. पौराणिक आणि धार्मिक कथांमध्येही चमत्कार असतात, पण त्याबद्दल शेवटच्या प्रकरणात बघूया. अल्लाउद्दिनच्या दिवा काय, जादूची  कांडी काय,  हॅरी पॉटरची जादूची शाळा काय; चुंबन घेताच राजपुत्र होणाऱ्या बेडकापासून ते जादूची कांडी फिरवताच लखलखती बग्गी होणाऱ्या भोपळ्यापर्यंत. बालपणापासून या कथा आपली सोबत करताहेत. कल्पनेतल्या या राज्यात फेरफटका मारायला आजही मजा येते. हे सगळं खोटं खोटं आहे, निव्वळ कल्पनाविलास आहे हे माहित असूनही.
स्टेजवरती तर डोळ्यादेखत जादू घडते हो. किंवा असं काही तरी घडवलं जातं की पहाणाऱ्याला वाटावं जादूच झाली! जादूगार (जादुगारीणी का नसतात कोण जाणे) आपल्याला हातोहात बनवतात. चक्क अशक्य काहीतरी करून दाखवतात. प्रत्यक्षात काही तरी भलतंच घडत असतं पण देखावा असा मांडला जातो, की वाटावं कोणा दिव्य शक्तीचंच काम हे.  बोल बोल म्हणता टोपीतून ससा काय येतो, रुमालातून कबूतर काय निघतं! बेडकाचा राजपुत्र होण्याइतकंच हेही अशक्य. एक चलाखी असते यात. आपलेच डोळे आपल्याला फसवतात. अनेक युक्त्या आणि क्लुप्त्या वापरून जादुगार हा नजरबंदीचा खेळ घडवून आणतो.  
काही जादुगार ही सगळी हातचलाखी आहे असं  चक्क सांगूनच टाकतात. जादुगार रघुवीर, पी.सी.सरकार, रँडी किंवा पेन अँड टेलर ही अशी काही नावं. अगदी खुलेपणानी सांगतात. मखलाशी कशी केली ते नाही सांगत. ते तर त्याचं व्यावसायिक गुपित झालं. पण आपल्या अंगी कोणतेही अतिनैसर्गिक, वा दैवी गुण नाहीत हे मात्र आवर्जून सांगतात. इतर काही प्रेक्षकांच्या मनातला अद्भुतानंद, अचंबा, आश्चर्य, तसंच मुरु देतात. जादूचा खेळ म्हणजे निव्वळ चलाखी असंही सांगत नाहीत आणि दैवी शक्तीचा दावाही करत नाहीत.  काही काही मात्र चक्क खोटारडे असतात. जाणूनबुजून आपल्याला काही खास शक्ती प्राप्त आहे असा दावा करतात. नजरेनी चमचे वाकवणे, निव्वळ इच्छेनी घड्याळ थांबवणे वगैरे जादू करतात. मनःशक्तीने जमिनीखालचे तेलाचे साठे आपल्याला ‘दिसतात’ असं सांगून तेल कंपन्यांना ठकवणारेही महाठक आहेत. शोकाकुल नातेवाईकांच्या भावनांशी खेळून  मृतात्म्यांशी संवाद साधणारेही आहेत. असली जादू ही निव्वळ गंमत किंवा करमणूक रहात नाही. यात शोषण येतं. अडल्यानडल्या कडून पैसे उकळणं येतं. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचाच प्रकार हा! यात बरेचसे भोंदू असले तरी  काहींना मनापासून असं वाटतं की ते मृतात्म्यांशी बोलत आहेत.
जादूचा तिसरा अर्थ, काव्यात्म अर्थानी जादू, हा ह्या पुस्तकाच्या नावात अभिप्रेत असलेला अर्थ आहे. स्वर्गीय संगीत आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणतं. आपण म्हणतो काय जादुई स्वर आहेत हे. काळोख्या रात्री आभाळातली चांदण्यांची पखरण दृष्टीस पडताच आपला श्वास रोखला जातो, आपल्याला भूल पडते जणू. सप्तरंगांची उधळण करणारा सूर्यास्त, उत्तुंग हिमालयाची लखलखणारी शिखरं, वळणावर अवचित स्वागताला समोर ठाकलेले  इंद्रधनुष्य, हे सारं काही आपल्याला अशीच जादुई अनुभूती देतं. इथे जादुई म्हणजे अननुभूत, अंगावर शहारा आणणारं, जगण्याचा तो क्षण मोहरून टाकणारं. विज्ञानाच्या आधारे गवसलेलं सत्य हे असंच विलक्षण जादुई असतं, अंगावर शहारा आणणारं असतं, तरल, काव्यात्म असतं; हे दाखवून देण्याचा, या विज्ञानानंदात तुम्हाला शरीक करून घेण्याचा, सामील करून घेण्याचा खेळ मी इथे पानोपानी मांडला आहे.
अतिनैसर्गिक शक्ती आणि अतिनैसर्गिक कल्पना आपल्याला विश्वाचं यथातथ्य ज्ञान कधीच घडवत नाहीत. या बाबतीत ह्या कल्पना अगदीच कुचकामी असतात. कोणत्याही घटनेला कुणी अतिनैसर्गिक कारण जोडलं म्हणजे त्या मागचं कारण समजलेलंच नाही असं खुशाल समजावं. शिवाय एकदा ‘कारण’ चिकटवलं की पुढे योग्य कारणाचा शोधही थांबतो. हा तर मोठाच तोटा आहे. शोध का थांबतो? कारण एकदा एखाद्या गोष्टीमागे ‘अतिनैसर्गिक कारण’ आहे असा शिक्का मारला की साहजिकच ती निसर्ग विज्ञानाच्या कक्षेबाहेर ढकलली जाते. कित्येक अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेली, आजच्या कित्येक सुखांची मूलाधार ठरलेली, चारशे वर्षाची छोटीशी पण देदीप्यमान परंपरा असलेली वैज्ञानिक पद्धती कुचकामी ठरवली जाते. ‘सध्या तर कारण आम्हाला माहीत नाहीच, पण यापुढे कधीच त्याचा उलगडा होऊ शकणार नाही. सबब प्रयत्न व्यर्थ आहेत, करू सुद्धा नकां’, असंच बजावण्यासारखं आहे हे.
विज्ञान ह्याच्या बरोब्बर उलटा मार्ग निवडतं. सर्व काही समजलं नाहीये, हे मुळी मान्यच असतं विज्ञानाला. मग ही जाणीवच जीवाला शोधाची आस लावते. प्रश्न विचारले जातात, नवी नवी मॉडेल्स कल्पिली जातात, तपासली जातात. पावलापावलानी सत्याच्या अधिकाधिक निकट जाण्याचा हा विज्ञानाचा मार्ग. ज्ञात विज्ञानाला अज्ञात, त्या विरोधी काही सापडलं, तर ती एक संधी आहे, एक आव्हान आहे, असं वैज्ञानिक मत मानतं. मग आहे ते  मॉडेल नाकारलं तरी जातं किंवा त्यात योग्य ते बदल केले जातात. अशा किंचित किंचित सुधारणांमुळेच आपण पायरी पायरीने पण निश्चितपणे सत्याच्या नजिक पोहोचतो.
खुनाचा उलगडा करायला एखाद्या गुप्तहेराला पाचारण केलं आणि ह्या आळशी  पठ्ठ्यानं काहीही शोधाशोध न करता, सरळ खून हा अतिनैसर्गिक शक्तीचा प्रताप असल्याचं सांगीतलं, तर? पूर्वी करणी, चेटूक, भूत, प्रेत, आत्मा, शाप, उशाःप, दैवी कोप किंवा कृपा अशी अतीनैसर्गिक कारणं चिकटवलेल्या कितीतरी गोष्टी आज विज्ञानाच्या कह्यात आहेत. विज्ञानाला  याची कारणं तपासता येतात, समजावून देता येतात. विज्ञानाचा सगळा इतिहास, हा मुळी अत्यंत विश्वासार्ह, उलट तपासणीला सदा उपलब्ध, अश्या उलगडयाचाच इतिहास आहे. मग आज जे अज्ञात आहे, ते उद्या ज्ञात होणारच नाही, असं समजण्याचं कारणच काय? ज्वालामुखी, भूकंप, साथीचे रोग या दैवी कोपांची आणि प्रकोपांची कारणं समजलीच ना? तसा अन्यही काजळ कोपऱ्यात विज्ञानाचा उजेड पडेल.
बेडकाची पप्पी घेऊन त्याचा राजपुत्र होत नाही आणि भोपळ्यातून अचानक राजेशाही बग्गी निघत नाही; हे मान्य असतं सगळ्यांना. पण असं का? का नाही होऊ शकत असं? असा कधी विचार केलाय आपण? अनेक पद्धतीनी हे समजावून सांगता येईल पण माझी आवडती पद्धत ही.
बेडूक काय किंवा बग्गी काय, अतिशय गुंतागुंतीची रचना असते त्यांची, कितीतरी छोटे छोटे भाग आणि त्यांची अत्यंत गुंतागुंतीची जोडणी. असं केवळ अपघातानी किंवा जादूची कांडी फिरवून घडू शकतं नाही. बेडूक किंवा बग्गीसारख्या क्लिष्ट रचना घडवणं हे कौशल्याचंच काम. बग्गी बनवायला अनेक सुटे सुटे भाग हवेत. ते नीट एकत्र करायला हवेत. येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. इथे कसबी सुतार हवा, अन्यही कारागीर हवेत. आलामंतर कोलामंतर छू म्हणून बग्गी घडत नाही. चाकं आहेत, बाकं आहेत, दारं आहेत, खिडक्या आहेत, स्प्रिंगा आहेत, गुबगुबीत गादया आहेत आणि या साऱ्याची विशिष्ट रचना आहे. गुंतागुंतीच्या रचनेची फट् म्हणता साधी रचना करता येईल. परिराणीच्या जादूच्या कांडीऐवजी मशाल फिरवताच, बग्गीची पहाता पहाता राख होईल. कशाचीही राख करणं सोप्पं. पण राखेतून किंवा भोपळ्यातून बग्गी, अशक्य. कारण बग्गीची कितीतरी गुंतागुंतीची आणि प्रवासाला साजेशी रचना.
आपण परिराणीचं काम थोडं सोप्पं करूया. तिला भोपळ्या-बिपळ्या ऐवजी बग्गीचे सगळे सुट्टे भाग वापरायची मुभा देऊया. समजा सगळे भाग एका खोक्यात ठेवले आहेत; फळ्या, सळ्या, काचा, फोम, रेक्सीन, मखमल, खिळे, स्क्रू वगैरे. आता ते नीट जुळवण्याऐवजी परीनी ते सगळे एका प्रचंड पोतडीत घालून नुसते गदागदा हलवले तर त्यातून बग्गी बाहेर निघेल का हो? चाकाच्या जागी चाक आणि बाकाच्या जागी बाक येईल? अर्थातच नाही. का? कारण हे वेगवेगळे भाग अनंत प्रकारे जुळवता येतील, हे वापरून अनंत प्रकारचे ढिगारे रचता येतील पण त्यातून बग्गी सोडाच, कोणतीही उपयोगी रचना आपोआप होणे नाही.
ह्या ढिगात क्वचित एखाद्या वेळी काही तरी काहीतरी ओळखीचं डिझाईन दिसेल; पण क्वचित, अगदी  अगदी क्वचित. बहुतेकदा भंगारचा ढीग शोभेल असंच काहीतरी बाहेर निघेल. हे सुटे भाग कोट्यावधी तऱ्हांनी जुळवता येतील आणि कोट्यवधी तऱ्हांनी पुन्हा त्यांचा ढीग बनवता येईल. दरवेळी वेगळाच, एकमेव असा पॅटर्न तयार होईल पण उपयुक्त असा काही पॅटर्न निपजलाच तर तो क्वचित अगदी क्वचितच. हरणाची जोडी, गुलाबाचं रान तुडवत, राजवाड्यावर पार्टीला नेऊ शकेल अशी बग्गी बनणं तर अशक्यच.
असे वेगवेगळे भाग किती तऱ्हांनी एकत्र करता येतील याचं गणित मांडता येत. उदाः बावन्न पत्ते म्हणजे बावन्न वेगवेगळे भाग आहेत असं समजू.
समजा चौघांत पानं वाटली आणि पहातो तो काय माझ्या कसे सगळीच्या सगळी, तेराच्या तेरा, पानं इस्पिकची! आश्चर्यानी थक्क होऊन मी माझी पानं सगळ्यांना मोठ्या कौतुकानी दाखवू लागलो तर, प्रत्येकच जण आपली पानं दाखवायला लागला. एकाला सगळी किलवरची, एकाला सगळी बदामची आणि चौथ्याला चौकटची; अशी वाटणी झाली होती!
ही जादूच नाहीतर काय? जादू असंच वाटेल तुम्हाला. पण गणीतज्ञांनी असं होण्याची शक्यता मोजली आहे. ती दर ५३,६४४,७३७,७६५,४८८,७९२,८३९,२३७,४४०,००० डावात एकदा एवढी नगण्य आहे. कारण तेरा पानं चार जणात, नेमक्या ५३,६४४,७३७,७६५,४८८,७९२,८३९,२३७,४४०,०००च प्रकारे वाटता येतात. म्हणजे एरवीही पत्ते नीट पिसून वाटलेला प्रत्येक डाव हा तसा अनन्यच असतो. कोणताही डाव पुन्हा ‘जस्साच्या तस्सा’ येण्याची शक्यता ही दर ५३,६४४,७३७,७६५,४८८,७९२,८३९,२३७,४४०,०००  डावात एकदा एवढीच असते. पण पानं ‘कशीही’ वाटली गेली असल्यामुळे आपल्याला त्याचं काही अप्रूप नसतं. प्रत्येकाला एकाच प्रकारची पानं वाटली जाणं यात आपल्याला एक संगती दिसते आणि आपल्याला अचंबा वाटतो.
अगदी निर्दयपणे, बेडकाच्या चिंधड्या उडवून राई राई एवढ्या, कोट्यवधी प्रकारे जोडता येतील. पण यात बहुतेकवेळा मासाचा चिखल तयार होईल. नुसता अर्थहीन, आकारहीन मासाचा गोळा. पिसून वाटलेले, कसेही वाटलेले, पत्तेच जणू. ह्यात अगदी मोजक्याच वेळा हा गोळा कशासारखातरी दिसेल, त्यात काही तरी आकार उकार भासेल, पण त्यातून राजपुत्र होणं? असंभव.
बेडकाची पप्पी घेऊन त्याचा राजपुत्र होत नाही आणि भोपळ्यातून अचानक राजेशाही बग्गी निघत नाही. कारण ह्यांचे सुटे भाग अतिशय योजनाबद्ध पद्धतीनी गुंफलेले असतात. अनंत शक्यतांपैकी ही एक, अनन्य अशी शक्यता असते. आपल्या आजूबाजूचा प्रत्येक सजीव, प्रत्येक पशू, प्रत्येक पक्षी, प्रत्येक झाड आणि आपणही आधी अत्यंत साधी रचना असणाऱ्या सजीवांपासून उत्क्रांत झालो आहोत. म्हणजे मग उत्क्रांती म्हणजे जादूचा खेळ किंवा जुगारच आहे एक प्रकारचा? नाही! अजिबात नाही!! हा शुद्ध गैरसमज आहे. सभोवतालची जीवसृष्टी म्हणजे चान्स किंवा लक् किंवा जादू नाही. जादुई मात्र खास आहे. विस्मयकारक तर आहेच आहे.

उत्क्रांतीची संथ जादू.
जादूची कांडी फिरवून, जटील रचना असणाऱ्या एका जीवचं रुपांतर, जटील रचना असणाऱ्या दुसऱ्या जीवामधे होत नाही. मग ही सगळी जटील रचनेची सजीवसृष्टी उद्भवली कशी? बेडूक आणि बटाटा, विंचू आणि वड, राजकन्या आणि भोपळे, तुम्ही-आम्ही, आलो कसे अस्तित्वात?
शतकानुशतके ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर कुणालाच ठाउक नव्हतं. मग त्याबद्दल लोकांनी अनेक सुंदर सुंदर कल्पना लढवल्या, कथा रचल्या. शेवटी एकोणीसाव्या शतकात हे कोडं सोडवलं ते विज्ञानमहर्षी चार्ल्स डार्विननी. अगदी भन्नाट उत्तर दिलं त्यानी कोड्याचं. या प्रकरणाच्या उरलेल्या भागात हे उत्तर काय होतं ते आपण थोडक्यात बघूया.
क्लिष्ट रचना असलेले जीव, आपण म्हणा किंवा बॅक्टेरीया म्हणा, आत्ता आहेत तसे, एका झटक्यात, आहे त्या रुपात, अवतरलेच नाहीत. अत्यंत संथपणे टप्याटप्यानी, मूळ रचनेपासून इवली इवली फारकत घेत घेत आजची रचना घडलेली आहे. कल्पना करा की तुम्हाला लंबूटांग्या बेडूक हवा आहे. तुमच्याकडे असलेल्या विविध बेडकांपैकी तुम्ही एक छानशी पण त्यातल्यात्यात लांब पायवाली जोडी निवडाची. ह्यांना पिल्लं झाली की पिल्लांचे पाय किती लांब आहेत ते बघायचं. पुन्हा एकदा ह्या पिढीतली त्यातल्यात्यात लंबूटांग जोडी घ्यायची आणि त्यांना पिल्लं होऊ द्यायची. लांड्या पायवाल्यांचा यांच्याशी अजिबात संकर होऊ द्यायचा नाही.
पुन्हा एकदा लंबूटांगवाल्यांची अंडी लंबूटांगवालेच फळवतील. त्यातून बेडूकमासे (Tadpoles) निर्माण होतील. त्यांचेही बेडूक होतील. त्यांना पाय फुटतील. पुन्हा एकदा लंबूटांगवाल्यांचा संकर लंबूटांगवाल्यांशी करा.
साधारण दहा पिढ्यांनंतर असं लक्षात येईल की बेडकांच्या पायांची लांबी आता सुरवातीपेक्षा जरा जास्त आहे. पहिल्या पिढीतल्या बेडकांपेक्षा दहाव्या पिढीतले सगळेच बेडूक हे लांब पायाचे आहेत. हे निव्वळ उदाःहरण आहे. कदाचित असं घडायला वीस किंवा जास्त सुद्धा पिढया लागतील, पण शेवटी तुम्ही बेडकाच्या तंगड्या लांबवल्या असतील. आता मोठ्या अभिमानानी तुम्ही जगाला सांगू शकाल की, ‘बघा मी जगावेगळा बेडूक बनवला!’
ना जादुविद्या हवी ना जादूची कांडी. वर सांगितलंय, त्याला म्हणतात ‘सिलेक्टीव्ह ब्रीडिंग’ (निवड करत करत निपज). सगळे बेडूक एकसारखे नसतात आणि पायांची लांबी ही अनुवांशिक असते, आई वडिलांकडून जीन्सद्वारे अपत्याला मिळते. तेव्हा आई बाबा कोण हे दरवेळी निवडून आपण नवाच बेडूक निर्माण केला, नाही का?
सोप्पं आहे ना?
हे तर काहीच नाही, इथे आपण फक्त बेडकांचे लंबुटांग बेडूक केले. पण समजा मुळात बेडूक न वापरता, अन्य कुठल्या प्राण्यापासून बेडूक तयार केला तर? समजा  पाणसरडा (Newt) घेतला. नाव ‘सरडा’ असलं तरी हे अन्य सरड्यांसारखे ‘Reptiles’ (सरीसृप, सरपटणारे प्राणी) नाहीत. हे बेडकांचेच उभयचर (Ambhibians) भाईबंध आहेत. ह्यांचे पाय बेडकापेक्षा लांडे असतात, त्यामुळे हे उड्या मारत नाहीत, चालतात. लांब शेपूट असतं त्यांना आणि शरीर बेडकापेक्षा खूपच निमुळतं आणि लांबोडं असतं. आता पाणसरड्यांपैकी त्यातल्यात्यात बेडकासारखे पाणसरडे घ्यायचे, त्यांच्या पिल्लांमधले पुन्हा त्यातल्यात्यात बेडकासारखे पाणसरडे घ्यायचे. इतरांना प्रजननाला मज्जाव करायचा. असं कोटयानुकोटी वेळा करायचं. दरवेळी निव्वळ लांबपायाचे, आखूड शेपटाचे, जरा जरा बेडकासारखे आई बाबा निवडायचे. दरवेळी निव्वळ त्यांचाच संकर होईल असं बघायचं. होत होत अंतिमतः तुम्ही ‘बेडूक’ निर्माण करू शकता. कुठल्याच पिढीत तुम्हाला नाट्यमय बदल दिसणार नाही. बहुतेक प्रजा आपल्या आई बाबांसारखीच निपजेल. पण काही पिढयांनंतर शेपूट थोडं आखूड असेल आणि पाय थोडे लांब. पाय पुरेसे लांब झाले की एखाद्या पिढीतला पाणसरडा त्या लांबलचक पायांचा उपयोग करून सरपटण्याऐवजी, टुण्णकन् उडी की हो मारेल....!
वरच्या सगळ्या वर्णनात आई कोण, बाबा कोण, हे ठरवणारे आपण होतो. एका विशिष्ट पूर्वनिश्चित दिशेनी हे पिढयांपिढ्यातील बदल व्हावेत म्हणून ती दिशा आपण ठरवली होती. अधिक दाणे देणारी वाणं, अधिक दुभत्या गाई, रोगप्रतिकारकशक्ती असलेली पिकं असं सगळं याच तंत्रानी आपले शेतकरी करतच आलेले आहेत. पिढयांपिढ्या करत आलेले आहेत. डार्विननी मात्र आपल्यासारखा कोणी कर्ता-करविता नसतानाही, निसर्गात हे आपोआप होतं, ही जाण दिली. निसर्गातल्या अनेक घटकांमुळे काही प्रजा ही पुढील पिढी जन्माला घालण्याआधीच मरून जाईल. काही मात्र प्रजनन होईपर्यंत तगून राहील. जे तगतात त्यांचीच गुणवैशिष्ट्ये पुढच्या पिढीत संक्रमित होतात. तगण्यासाठी लागणारे गुणधर्म असतात तेच तेवढे तगतात. पाणसरडे असोत वा बेडूक, साप असोत वा विंचू; जगायला अधिक उपयुक्त अशा गुणांनी युक्त, अशी काही प्रजा असणार. उदाहरणार्थ, काही जीवांना जगण्याच्या स्पर्धेत  लांब पाय उपयुक्त असतात. बेडकांना किड्ंयावर झेपावायला, किड्यांना बेडकापासून निसटायला, चित्त्यांना चितळ पकडायला किंवा चितळांना चित्ता चुकवायला... सबब असे लांबूटांगे जीव हकनाक मरणार नाहीत. जगतील, तगतील, त्यांना संतती होईल. ही अर्थातच लंबूटांग असेल.  पिढ्यानपिढया लांब पायाचे जीन्स संक्रमित होतील. अधिकाधिक प्रजा लंबूटांग असेल. थोडक्यात जे आपण जाणूनबुजून पाणसरड्याच्या बाबतीत केलं, आणि लंबूटांग प्रजा निर्माण झाली, तेच इथे कोणी मुद्दाम न करताही घडून आलेलं आहे. कोणी कसबी कारागीर नसताना, कोणी  कर्ताकरविता नसताना; आपोआप, निसर्गतः, निव्वळ जगण्याच्या स्पर्धेतून, हे घडलं. पुढच्या पिढीत जीन्स संक्रमित करेपर्यंत, जगण्याच्या स्पर्धेत टिकून रहाणं महत्वाचं. ‘जगण्याची स्पर्धा’ हाच तो निवड करणारा, कर्ताकरविता, अदृष्य हात. ह्यालाच म्हणतात ‘नैसर्गिक निवड’.
पुरेश्या पिढयांनंतर पाणसरडयासारख्या पूर्वजांपासून बेडकासारखे वंशज निपजतात. प्रचंड पिढ्यांनंतर माशासारख्या पूर्वजांपासून माकडासारखे वंशज निपजतात. आणखी युगं लोटली की बॅक्टेरीया कुळातल्या  पूर्वजांना, वंशज म्हणून माणूस लाभतो! हे नेमकं अस्सच घडलं असणार. सध्या अस्तित्वात असलेल्या आणि सध्या अस्तित्वात नसलेल्याही प्रत्येक जीवाचा अवतार असाच झाला आहे. पिढ्यांपिढया म्हणजे नेमक्या किती पिढया, हे जरा तुमच्याआमच्या कल्पनेबाहेरचं आहे. हे विश्व हजारो कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. जीवसृष्टी ही सुमारे साडेतीनहजारकोटी वर्षापासूनची आहे. उत्क्रांती घडून येण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे.
डार्विनच्या ह्या कल्पनेला ‘नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती’ असं म्हटलं जातं. आजवर मानवी मनात तरळलेल्या सगळ्यात चमकदार कल्पनांपैकी ही एक. ह्याच्या फलस्वरूप  सजीवसृष्टीचा सारा रूपबंध उलगडला जातो. ह्या महत्वाच्या संकल्पनेकडे आपण पुढे पुन्हापुन्हा येणारच आहोत. सध्या एवढंच लक्षात घेऊ या की उत्क्रांती ही अति संथ आणि प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे. अत्यंत सावकाशपणे ही प्रक्रिया घडत असल्यामुळेच यातून, बेडूक किंवा राजपुत्रासारखे, महा-गुंतागुंतीचे सजीव निर्माण झाले आहेत. बेडकाचा राजपुत्र हा अकस्मात घडणारा बदल आहे आणि म्हणुनच प्रत्यक्षात अशक्य आहे. उत्क्रांती हे रास्त उत्तर आहे, त्याचा पुरावा आहे. मुंगीच्या पावलांनी होणाऱ्या उत्क्रांतीऐवजी कोणा कसबी कारागिरानं एका फटक्यात आजची सजीवसृष्टी निर्माण केली किंवा बेडकापासून जादूनी राजपुत्र तयार होतात, अशा कथा म्हणूनच भाकडकथा ठरतात.
याच कारणास्वव छूमंतर म्हणून भोपळ्याची बग्गी होऊ शकत नाही. बग्ग्या काही बेडकांसारख्या किंवा राजपुत्रांसारख्या,  निसर्गतः उत्क्रांत होत नाहीत. पण विमानं आणि वहानं, कॉम्प्युटर आणि कुऱ्हाड, हे सारं मानवनिर्मित आहे. असा मानव, जो स्वतः उत्क्रांतीचं फलित आहे. माणसाचा तल्लख  मेंदू, त्याचे कसबी हात, हे देखील पाणसरड्याच्या शेपटासारखे किंवा बेडकांच्या पायासारखे, ‘नैसर्गिक निवडीतून  उत्क्रांती’चं फलित  आहेत. उत्क्रांत झालेल्या ह्या अफाट मेंदूतून माणसानी बग्ग्या बनवल्या, गाड्या बनवल्या. रागदारी, घड्याळ आणि वॉशिंगमशीन बनवलं. सूर, सुरा आणि सुरी असं काय काय बनवलं. हयात ना कसली जादू आहे ना हातचलाखी. सारं काही सुसंगतपणे, सुंदरपणे समजत जातं आपल्याला.

पुस्तकात पुढे मी ठायी ठायी दाखवून देणार आहे की विज्ञानाच्या दृष्टीतून  भवतालचं सारं जग जादुई, मायावी,  विस्मयी वाटायला लागतं. पण ही वेगळीच जादू आहे, वेगळीच माया आहे ही. सत्य गवसल्याचा, कार्यकारणभाव समजल्याचा हा विस्मय आहे. ह्या अस्सल जादूपुढे त्या अतिनैसर्गिक भाकडकथा, फुसक्या, फुटकळ आणि बेगडी  ठरतात. विश्वरूपाचं हे सत्यदर्शन, ह्यात अतिनैसर्गिक काही नाही, ह्यात कसली हातचलाखी नाही. हे निव्वळ अद्भुत आहे अद्भुत! हे सत्य अद्भुत आहे!! हे सत्य आहे म्हणूनच अद्भुत आहे!!!

Wednesday, 28 September 2016

होस्टेलचे दिवस

होस्टेलचे दिवस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, पिन ४१२ ८०३.
मो. क्र. ९८२२० १०३४९


आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेला माणूस हा आपोआपच हुशार समजला जातो. खरं तर हे विचित्र आहे. ज्ञानप्राप्तीचा कोणताही प्रयत्न न करता निव्वळ चार वेळा मॉन्सून अंगावर बरसला म्हणून आपोआप शहाणपण प्राप्त होत असेल असं वाटत नाही. कारण  डोकं आणि डोळे उघडे नसतील तर पालथ्या घड्यावर पाणी असंच व्हायचं. शिवाय दर पाच सहा वर्षानी एखाददोन वर्ष अवर्षणाची. ही जमेस धरायची का नाही हेही स्पष्ट नाही.
चार पावसाळ्यांचं काही खरं दिसत नाही पण चार होस्टेल ज्यांनी जास्त पाहिली असतील त्यांना मात्र ज्ञानी समजायला प्रत्यवाय नाही. मानवी जीवनव्यवहाराचा अर्क हा होस्टेल मधे राहून आपल्या अंगात अगदी मुरून जातो. इसापनीतीतले सगळे प्राणी इथे वास्तव्याला असतात आणि पंचतंत्राची पाचही तंत्र आत्मसात केल्याशिवाय, इथे जगणे अशक्य. बीगल जहाजातून प्रवास, मग सापडलेल्या प्राण्यांवर संशोधन वगैरे  थापा, डार्विननी आपली पत वाढवी म्हणून ठोकलेल्या आहेत. ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ हे लक्षात यायला एवढं सव्यापसव्य करण्याची काहीएक गरज नव्हती. चार दिवस होस्टेल मधे काढले की हे तत्व आपोआप उमजतं. शाळा कॉलेजमधे असताना डार्विनलाही पोरांनी छळला असेल, त्यातूनच त्याला उत्क्रांतीचा सिद्धांत सुचला असेल, पण चार लोकात हे असं कसं सांगणार? म्हणून मग पुढचं सगळं. अंदर की बात ही आहे!
आयुष्यात मला अगदी भरपूर होस्टेल घडलं आहे. अगदी बॉर्न जरी नाही, तरी  ब्रॉट अप इन होस्टेल, असं म्हणायला हरकत नाही. आधी शाळेचं होस्टेल, मग ज्युनिअर कॉलेजचं होस्टेल, मग मेडिकल कॉलेजचं होस्टेल, मग हॉस्पिटलमधले क्वाटर्स असं करत करत मी जेव्हा पास होऊन घरी पोहोचलो तेंव्हा मी घरच्या पेक्षा जास्त वर्ष घराबाहेर काढली होती. बारा होस्टेलचं पाणी पिऊन आता मी चांगला तैय्यार झालो. होस्टेलच्या अन्नावरच मी वाढलो, चांगला एरंड म्हणावा असा वाढलो. कोणी इक्षुदंड म्हणावं अशी अपेक्षा न करता वाढलो.
शाळेचं होस्टेल हे शेवटी शाळेचं होस्टेल. त्यात दंगा थोडा शिस्त फार. ज्युनिअर कॉलेजचं होस्टेलही तसलंच. इथे दंगामस्ती थोडीफार आणि शिस्त फार थोडी. पण मेडिकल कॉलेजचं होस्टेल म्हणजे मर्मबंधातली ठेव. मुळात कॉलेजला प्रवेश मिळाल्यानं छात्या तट्ट् फुगलेल्या असायच्या, (मुलांच्या सुद्धा) त्यांना टाचणी लावायचं काम ह्या इथे व्हायचं. सारे समान आहेत पण सिनिअर अधिक समान आहेत असा इथला व्यवहार.  
होस्टेल होतं मोठं ऐसपैस. सरकारीच मामला तो. त्यातून हुशार आणि भावी डॉक्टरांसाठीचा मामला. ‘ए’ ते ‘ई’ असे पाच ब्लॉक होते. ह्यांची ह्यांची खास वैशिष्ठ्य होती. डी ब्लॉक सगळ्यात जुना दगडी, दुमजली, सुबक, बैठी इमारत. समोर बाग, कुंपणापलीकडे चहा नाष्टाच्या गाड्या वगैरे. पण इमारत इतकी लांबलचक की एका टोकाला असलेल्या संडास बाथरूमला जायला सायकल वापरणारी मंडळी होती. ‘ई’ ब्लॉक सगळ्यात रोमांचक. ह्याच्या मागून गर्ल्स होस्टेलला जायचा मार्ग, दुतर्फा सतत गच्च फुललेला गुलमोहोर. म्हणजे गुलमोहोर उन्हाळ्यातच फुलायचा पण विद्यार्थ्यांच्या मनस्थितीप्रमाणे ज्याला त्याला तो वेळोवेळी फुललेला दिसायचा. ‘ए’ आणि ‘बी’ ब्लॉक मधे मेस आणि टीव्ही. ‘सी’ ब्लॉक सगळ्यात भारदस्त. हा एक्झामगोइंग मुलांचा ब्लॉक. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता असायची इथे. बाहेरून जाताना कुणी जरा जरी आवाज केला तरी सी ब्लॉक मधून एक ‘शुsssक!’ पुरेसं होतं. इतर ब्लॉक मधली मुलं, कसायाकडे नेल्या जाणाऱ्या बोकडाकडे इतर बोकडांनी बघावं, तशी इथल्या रहिवाशांकडे पहायची. अपार करुणा डोळ्यात दाटलेली असायची. लवकरच आपल्यावरही हीच पाळी येणार आहे याची विषण्ण करणारी जाणीव असायची. ज्युनिअर मुलं लंच टाईमला  वेळात वेळ काढून प्रत्येक रूममधे जावून हवं नको विचारायची. तशी प्रथाच होती. स्टेशनरी पासून बनियन चड्डी पर्यंत जे मागू ते इथे रूमपोच पुरवलं जायचं. धीर दिला जायचा. एक मोठं कुटुंबच तयार व्हायचं.
कॉलेजमधे आम्ही तीघं रूम पार्टनर. पप्या, चिक्या आणि मी. मी वगळता बाकी दोघं होस्टेल या प्रकाराला नवखे. त्यांनी आल्याआल्याच एक भयंकर मोठी भूल केली. दूधाचं रतीब लावलं. आपली पोरं धष्टपुष्ट व्हावीत असं त्यांच्या आईबापांना वाटत होतं. त्यांनी त्यांच्या मते बेस्ट उपाय त्यांना  सुचवला होता. आज्ञाधारकपणे त्यांनी तो अंमलात आणला होता. पण घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था. ते रसरसत्या इलेक्ट्रिकच्या शेगडीवर ठेवलेलं पातेलं, ते दूध उतू जाणं, त्याचा तो खोलीभरून वर कॉरीडॉरभर उरलेला वास. ते काळं ठिक्कर पडलेलं पातेलं. मग ती शेगडी शॉर्ट होणार. मग चिमटा, चमचा, पेन ह्याच्या सहाय्यानी ती शेगडी दुरुस्त होणार, मग पुन्हा लावताच लाल व्हायच्या आतच ती कॉइल पुन्हा तुटणार आणि ही दोघं खजील होणार... हे सर्व भविष्य मला लख्ख दिसत होतं. शिवाय ते दुध उरणार, त्यावर गिळगिळीत साय धरणार. शिवाय संन्याश्याच्या लंगोटीसारखं, दुध म्हटलं की साखर, बोर्नव्हीटा, चहा पावडर, कॉफी पावडर, गाळणं, चिमटा, चमचा, घासणी, व्हीम बार... अब्बब्ब्ब... सगळा संसारच मांडवा लागणार... पुढे पुढे ते दुध नासणार मग त्यात हे साखर घालून खवा म्हणून खाणार किंवा नासलेलं दुध टांगून त्याचा चक्का बिक्का सुद्धा बांधतील अशी मला भीती वाटायला लागली.
शिवाय हे रतीब दोघांत लावलेलं. एकानी चहाची तयारी करायची आणि एकानी चहा, अशी श्रमविभागणी होती. त्यामुळे इकडे दूध उकळलं आणि गाळणं जरी जागेवर नसेल तरी चहा करणारा हा तयारी करणाऱ्याला बोलवायला समोर ग्राउंडवर जायचा! ह्या भानगडीत दुधाला चांगला खरपूस वास लागायचा. कितीही काटेकोर श्रमविभागणी केली तरी काही श्रम शिल्लक रहायचे. किंवा ऐनवेळी नवीनच श्रम निर्माण व्हायचे. त्यामुळे करवडलेली भांडी घासणे, नेमका चहाच्या वेळी टपकल्याने चहात पडलेल्या  मित्राचा कप विसळणे, उतु गेलेले पुसणे, नासलेले कचऱ्यात टाकणे, अशा अनेक जबाबदाऱ्या ह्या ग्रे एरीयात होत्या. ह्याची धास्ती फार.  माझ्या अपेक्षेप्रमाणेच महिनाभरातच या दुधावरून दोघांची चांगलीच जुंपली. लोण्याच्या गोळ्यावरून दोन बोक्यांचं झालं नसेल असं त्यांचं कडाक्याचं भांडण झालं आणि दुध आमच्या खोलीतून हद्दपार झालं ते कायमचंच.
होस्टेल म्हटलं की पहिला विषय डोक्यात येतो, जेवण. चांगली मेस काही मला एकदाही सापडली नाही. इतका बेचव स्वयंपाक इतक्या सातत्यानी करता येणं हेही एक कौशल्यंच आहे की. चुकुनही, एकाही पदार्थाला चव येऊ नये, अंगचा काही स्वाद असेल तर तो नष्ट व्हावा आणि चोथा याच सदरात बसणारा पदार्थ रोज तयार व्हावा यालाही काहीतरी तरी कष्ट पडत असतीलच की. ह्याबद्दल मोनालिसा सत्काराला पात्र आहे. कोण मोनालिसा? तुम्हाला माहित नाही? मोनालिसा हे जेनेटिक नाव आहे. मेस चालवणाऱ्या कोणत्याही बाईला मोनालिसा हेच नाव सार्थ आहे आणि पुरुषांना स्फिंक्स. जगात आणि विशेषतः मेसमधे काहीही होऊ दे, मोनालिसासारखेच ह्या बायकांच्या चेहऱ्यावरचे गूढ हास्य कधी लोपत नाही आणि नर-सिंह स्फिंक्स पुरूषांची दगडी भिवई जरा सुद्धा ढळत नाही.
आमच्या होस्टेललाही एक मोनालिसा होती. म्हणजे तीचं नाव मोनालिसा नव्हतं, तीचं नाव बानूबाई, हिच्याही चेहऱ्यावर गूढ स्मित होतं. तुम्ही काहींही बोला स्मितहास्य फिक्स. पोळ्या करपल्या आहेत सांगा, कच्च्या आहेत सांगा, भाजी संपली कशी विचारा, किंवा ‘केळ्याच्या कोशिंबिरीत हिरव्या मिरच्या कोणाच्या तीर्थरूपांनी तरी घातल्या होत्या का?’ असा सवाल करा; उत्तर एकच; स्मितहास्य! एकदा भर आंब्याच्या सीझनमधे रविवारी स्वीटडिश म्हणून आमरस असणार असल्याची पाटी हिनी लावली. खरंतर उगीच आशा लावू नाही म्हणतात, पाप लागतं. पण हिनी लावली बुवा पाटी. दुसऱ्या दिवशी वखवखलेले आम्ही इष्टमित्रांसह वेळेआधीच मेसमधे दाखल. पण आमरस म्हणून वाटीत चक्क आंब्याच्या वासाचा, पिवळ्या रंगाचा, फ्रुटीसदृश, पातळ, पांचट द्राव पडला. भडका उडाला होस्टेलमधे. पण मोनालिसा शांत होती. काsssही बोलली नाही. फक्त स्मितहास्य. भाज्या तर कुठून शोधून आणायची देव (सुद्धा न) जाणे. त्या लगद्याचं डी.एन.ए. अनॅलिसीस करायला एकदा एकजण घेऊन गेला होता म्हणतात. कॉलेजमधे डी.एन.ए. अनॅलिसीसचं मशीन नवीनंच आलं होतं. पण ह्या पहिल्याच धक्यानी ते मशीन जे बिघडलं ते आजतागायत मोडलेलंच आहे.
मेसच्या अन्नाला तोंड देणं ही मोठीच परीक्षा त्यामुळे कोणाच्याही घरून डबा येणं म्हणजे तर पर्वणीच. घरून डबा घेऊन कोण येतो यावर दबा धरूनच असायची मंडळी. अशा  मित्राला गुळाला मुंगळे चिकटावेत त्या वेगानी मित्रसंपदा लाभत असे. खाऊ संपताच हे मुंगळेही त्याच वेगानी गायब होत असत. एकदा मित्राला रिक्षातून उतरवून घेतला, पण त्याचा खाऊचा डबा रिक्षातच राहिला. मोठ्या हिकमतीनी त्या रिक्षाचा पाठलाग करून तो डबा हस्तगत केला. त्या रिक्षावाल्याला आधी वाटलं की दागिन्यांचा डबा वगैरे आहे की काय. पण तो होता फोडणीच्या पोळीचा डबा. रिक्षावाल्याला होस्टेल घडलं नसल्यामुळे तो आमच्याकडे बावळटासारखं पहात होता. म्हणजे आम्ही बावळट आहोत असं समजून. आम्हीही त्याच्याकडे तो किती बावळट आहे, अशा नजरेनी पाहून घेतलं आणि तिथून काढता पाय घातला. डबा दागिन्यांचा असता तर काही तरी बक्षिसी तरी मिळाली असती. ती हुकल्याची खुदाई खिन्नता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
होस्टेलच्या कदान्नाला ज्यांनी तोंड दिलं त्यांना घरच्या अन्नाची गोडी वेगळी सांगायला नको. घरची कडबाकुट्टी सुद्धा अमृतातेही पैजा जिंके, अशी लागते मग. ज्या बायकांना स्वयंपाक जमत नाही अशांनी आपापल्या नवऱ्यांना काही दिवस होस्टेलमधे घालावं. नवरोबा घरी परत येताच सुगरण सर्टिफिकेट ग्यारेन्टीशीर मिळेल. तोच पोळी भाजीचा घास आता ते मिटक्या मारत खातील.
कॉलेजचंच होस्टेल ते, व्यसने किम् दरिद्रता, अशी इथे परिस्थिती. कसं कुणास ठाऊक; घरचे संस्कार म्हणा, आधीच्या होस्टेलचे संस्कार म्हणा किंवा संगतीचा परिणाम म्हणा, पण त्या मार्गाला कधी प्रशस्त वाटलंच नाही.  पण एकदा होळीचा दिवस होता. होस्टेल हे सुपीक कल्पनांचं माहेरघर. कुणाच्यातरी डोक्यातून आयडिया निघाली, भांग घेतली पाहिजे. या क्षेत्रातलं अनुभवी कोणीच नाही. मग अपोलो टॉकीजच्या पानवाल्याकडे भांग मिळते अशी गुप्त वार्ता आली. दोन जण मोटरसायकलवर भांगेसाठी रवाना झाले आणि जिलबी आणायला दोन जणं गेली. अर्थात भांगेच्या मोहिमेवर मावळे रवाना झाल्याचं अन्य मावळ्यांना कळायला वेळ लागला नाही. बघताबघता रूमवर पाचाचे पंधराजण झाले. ती बहुचर्चित गोळी आली सुद्धा. हा एक तीळ आम्ही पंधरा जणांत वाटून खाल्ला. अर्थातच काही फरक पडला नाही. काही म्हणजे काहीही झालं नाही. ना हलकं हलकं वाटलं, ना डोकं जड झालं, ना रडू आलं ना हसू. आमचंच हसं होण्याची मात्र वेळ आली. बहुधा वाट्याला आलेला भांगेचा डोस अगदीच कमी होता. शेवटी भांग खाल्ल्यावर नेमकं काय होतं हे आमच्यातल्या काही बहाद्दरांनी चक्क टॉक्सीकॉलॉजीचं पुस्तक काढून नीट वाचून घेतलं. मग मात्र त्यांना ताबडतोब भांग चढली आणि पुस्तकातल्यासारखं सगळं त्यांना व्हायला लागलं.
आयुष्यात अनेक होस्टेल घडली पण सर्वांच्यात समान अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे संडासबाथरूमची रचना. हे एका टोकाला असतात. अनेक असतात. तुटकी दारं, गळके नळ, फुटक्या फरशा, तिरकी बेसिन्स असा सगळा मामला. दोन संडासामध्ये भींती असतात त्या पूर्ण छताला कधीच टेकलेल्या नसतात. ह्यामुळे वायूविजनास मदत तर होतेच शिवाय एकाच ट्यूबचा उजेड सर्व संडासात पोहोचतो आणि कोणी वाजवी पेक्षा जास्त वेळ संडासाराधना करायला लागल्यास वरून गार पाणी फेकायची नामी सोय होते.
शिवाय आतली चित्रकला हाही एका स्वतंत्र निबंधाचा विषय आहे. आतल्या अभिव्यक्तीला विषय आणि आशय पुरवणारी फिरती वाचनालयं ही देखील सर्व होस्टेलमध्ये असतातच असतात. त्यांच्यातील रद्दीतून निवडून निवडून आणलेले डेबोनेर, प्लेबॉय, हैदोस आणि तत्सम मासिकांचे दुर्मिळ अंक आणि अमूल्य असा  ग्रंथसंग्रह, त्यांचं प्राणपणानं केलेलं जतन, संवर्धन, संशोधन, अभ्यास, पुनर्विलोकन हे कौतुकास पात्र आहे. तरुण मुलांनी स्वयंस्फुर्तीनी चालवलेली ही वाचनालयं. मुलांचा व्यासंग आणि त्यास लाभलेला उदार लोकाश्रय हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासाला असलेला ग्रेज अॅनॅटॉमीचा रुक्ष आणि राक्षसी ग्रंथ एकाबाजूला आणि  तीच अॅनॅटॉमी सुंदर करून दाखवणारा फिरत्या ग्रंथालयातला एखादा दुर्मिळ अंक एकाबाजूला. कुठे श्यामभट्टाची तट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत, असा प्रकार. ह्याच्या आठवणीनी अजूनही रोमांच उभे रहातात. एखाद्या क्रांतीची तयारी असावी अशा थाटात गुप्तपणे इथे देवघेव चालते. उघड्यावर हे अंक ठेऊन चालत नाहीत. त्यांना लगेच पाय फुटतात. ठेवताना ते सहसा गादीखाली ठेवावे लागतात.
काहींचे पालक फार भोचक असतात. रूमवर आल्यावर ते सहज म्हणून गादी उचलून बघतात. त्यांच्या तारुण्याची भूतं त्यांना तिथून वेडावून दाखवतात. मग हे खवळतात. ‘आम्ही रक्ताचं पाणी करून तुला लहानाचा मोठा केला...’ वगैरे लेक्चरबाजी सुरु होते. कॉटखालील मासिक, हा लहानाचं मोठं होण्याचाच अपरिहार्य परिणाम आहे हे मात्र लक्षात घेतलं जात नाही. यावर उपाय म्हणून रूमपार्टनरच्या गादीखाली मासिकं ठेवावीत, तर तोही नेमका हाच उपाय योजतो. त्यामुळे आपल्या गादीखाली मासिक येतंच. एकुणात योजना बारगळते. पण मित्राच्या गादीखाली डोकावल्याचा  फायदा असा होतो की आपले गेल्या आठवडयात हरवलेले सॉक्स तिथे सापडतात.
अशा अनेक वस्तू होस्टेलवर हरवतात आणि सापडतात. पूर्ण केलेली जर्नल सहसा परीक्षेच्या आदल्या दिवशी हरवतात. परफ्युम, आफ्टरशेव्ह, डीओ हे पार्टनरच्या कपाटात सापडतात. रूमची किल्ली आणि तीचं हरवणं हाही एक भलताच मनोरंजक प्रकार असतो. आधी सर्व पार्टनरकडे स्वतःची किल्ली असते. मग एकाची आणि पाठोपाठच दुसऱ्याची हरवते. मग शिल्लक किल्ली दाराच्या चौकटीवर, जिन्याच्या सापटीत अशी विशिष्ठ ठिकाणी ठेवण्यात येते. हळूहळू हे गुपित सगळ्यांना कळतं. पण तोपर्यंत एकूणच कुलूप ह्या प्रकाराबद्दल मनात उदासभाव निर्माण झालेला असतो. ‘तुम क्या लाये थे जो साथ लेकर जाओगे...?’ वगैरे गीतासार इथे प्रत्यक्ष प्रत्ययातून आपोआप आचरणात येतं. शिवाय झटका मारताच उघडणारी, लाथ घालताच उघडणारी, स्पर्श करताच उघडणारी, अशी विविध कुलुपं होस्टेलवर उपलब्ध असतात. ‘खुल जा सिमसिम’ म्हणताच माझ्या रूमचं कुलूप निघतं असंही एक मित्र सांगायचा.
कुलुपाला लागलेल्या चीठ्ठ्याही खास असायच्या. ‘सामानासकट येऊन गेलो. बराच वेळ बाहेर तिष्ठत उभा होतो.’ अशी चिठ्ठी ठेऊन माझा मित्र गेला. यावर पुढे तीन दिवस आम्ही हसत होतो. अर्थाचा अनर्थ करण्यात होस्टेल पटाईत असतं. अशाच एका दुर्मिळ मित्राला, ‘तुला भेटायच्या इच्छेचं आता महत्वाकांक्षेत रुपांतर झालं आहे.’ अशी चिठ्ठी मीही ठेऊन आलो होतो. एक मित्र डबा रूमबाहेर ठेवायचं विसरायचा. शेवटी डबेवालीकडचे डबे संपले. तिनी चिठ्ठी ठेवली, ‘आज जर डबे बाहेर ठेवले नाहीत  तर उद्या पातेल्यातून जेवण आणून ठेवावं लागेल.’
‘पॅरासाईट्स’ ही इथली खास जमात. ‘पॅरासाईट्स’ म्हणजे परोपजीवी, दुसऱ्याच्या जीवावर जगणारे. पण होस्टेलमधले हे ‘पॅरासाईट्स’ असे शोषक नसायचे. होस्टेलमधली पोरं आणि ‘पॅरासाईट्स’ याचं गाढ मैत्र जुळलेलं असायचं. बरेचदा अन्न, वस्त्र, मुलींबाबत सल्ला, मोटरसायकल वगैरे हे ‘पॅरासाईट्स’च पुरवायचे. ही मंडळी होस्टेलची अधिकृत रहिवासी नसायची पण होस्टेलमधे पडीक असायची. ह्यात गावातच रहाणारी, पण गावात घर असल्यामुळे आपल्याला होस्टेलची ‘ऐष’ नाही असं वाटणारी मुलं असायची. मग रात्रभर गप्पा मारण्याच्या थ्रिलसाठी, एकत्र रहायच्या थ्रिलसाठी, घरी मिनत्या करून ती वस्तीला येत. त्यांना एकाच रात्रीत होस्टेल लाइफचं पुरेसं थ्रिल मिळायची व्यवस्था केली जात असे. जेमतेम बारा तासाच्या थ्रिलनंतर ही मंडळी पुन्हा घराच्या आश्रयाला जात. होस्टेलला रहाणं हे सोप नाही, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे, हे त्यांना लगेच उमजत असे. काहींना ह्या थ्रिलची चटकच लागे. घरच्यापेक्षा इथेच बरे, अशा भावनेनी ही मग होस्टेलवरच मुक्कामी असत. काही सिनिअर असत. काही (सांगता न येणाऱ्या) कारणांनी यांना होस्टेल मिळत नसे. मग मित्र प्रेमापोटी यांना उदार आश्रय दिला जात असे.
खरेखुरे ‘पॅरासाईट्स’ही होतेच की होस्टेलला. डास, पिसवा, उवा आणि ढेकुण! ढेकणांच्या तर अनंत आठवणी आहेत. ह्या सहचराशिवाय होस्टेल अशी कल्पनाच करता येत नाही. कॉटच्या फटीतून, गादीच्या शिवणीतून, टेबल खुर्चीच्या सापटीसापटीतून ह्यांची प्रजा राज्य करत होती. उगाच डोळ्याला डोळा लागून आमच्या अभ्यासाचा बोऱ्या वाजू नये याची हे काळजी वहात होते. मती क्लांत होऊन जर्रा पुस्तकावर डोकं टेकवून झोपायचीही सोय नसायची कारण यांची प्रजा पुस्तकाच्या बायडींगमधेही लपलेली. तिथून येऊन आपले डोळे खाड्कन उघडणारच. स्वतः रात्र रात्र जागून वर आम्हाला निद्रानाश जडावा यासाठी घोर तपच आरंभलं होतं त्या ढेकणांनी. जीन पँण्ट भेदून मांडीला चावा घेण्याची क्षमता होती, यांच्या कणखर जबड्यांमधे. त्यामुळे खुर्चीत बसताना आधी खाली पेपर ठेवायचा आणि त्यावर बसायचं. कसं कुणास ठाउक पण  जीन पँण्ट भेदणारे हे मत्कुण पेपरमधून मात्र आरपार चावू शकायचे नाहीत. कागदाचा इतका चांगला उपयोग लहानपणानंतर आत्ताच करायला मिळाला. ढेकूण रक्त पितात, बस्स एवढंच, त्यांच्यापासून आपल्याला (किंवा आपल्यापासून त्यांना) कोणताही आजार होत नाही. होत असता तर त्याच आजारानी तेंव्हाच मेलो असतो आम्ही. होस्टेलची गादी ही काही दिवसानंतर  आपोआप गुबगुबीत लागायला लागली की ओळखावं, गादीखाली हमखास ढेकणाची आणखी एक गादी तयार झाली आहे. चिन्यांच्यापेक्षा अधिक वेगानी यांची प्रजा वाढते.
ढेकणांविरुद्ध युद्धासाठी रविवार राखीव असायचा. मग अनेक उपचार केले जायचे. एकेक ढेकुण चुनचुनके मारणे हा पहिला उपाय. ढेकुण मारला की एक विशिष्ठ वास येतो. तो वास आजही नाकात आहे. होस्टेल म्हटलं की आजही नाकात दरवळतो. हा वास आला की अन्य ढेकणांना संकटाची पूर्वसूचना मिळते म्हणे. ते मग आणखी खोल सांदीफटीत शिरतात. मग कॉट उन्हात ठेवायची, उकळत्या पाण्यानी धुवायची, कॉटला कागद गुंडाळून कॉट जाळायची. पण ढेकुण जमात महा चिवट. ‘नैन् छींदन्ती शस्त्राणि नैन् दहती पावकः’ हा त्यांचा बाणा. हे सगळं करून वर  तऱ्हेतऱ्हेचे फवारे मारा, पावडरी लावा, मलमं फासा, खडूनी लक्ष्मणरेषा आखा,  हे आपले जिथल्या तिथे. ह्या सगळ्याला पुरून उरत ढेकुण. उलट ढेकूण वॉर लढून अगदी थकायला व्हायचं. त्या रात्री गाढ, शांत झोप लागायची. आम्ही घोर निद्रेत असतां, ढेकुण आपले चरायला मोकळे सुटायचे.
पण परीक्षा जवळ आली की ढेकूणही आमची एकाग्रता भेदू शकत नसत. दर दीड वर्षानी परीक्षा. त्यामुळे आमच्यासारखे दीडशहाणे वर्षभर निव्वळ ट्रीप, ट्रेक, नाटकं, लायनी मारणे वगैरे जीवनावश्यक गोष्टींकडे लक्ष पुरवायचे. शेवटचे सहा महिने, दिवसरात्र खुर्चीला चिकटून, ढुंगणावरी फोडू येईपर्यंत अभ्यास. खऱ्या अभ्यासकाला ढेकणांची काय तमा? पण ह्या भानगडीत नापास होण्याची चित्तथरारक भीती सदैव सावलीसारखी बरोबर असायची. पप्याचं तसं नाही. तो आमच्यातला, त्यातल्या त्यात, गुड बॉय. त्याला रोज अंघोळ करणे, पैशाची गरज नसतानाही घरी खुशालीचे पत्र टाकणे, रात्री नऊलाच झोपणे अशाही काही विचित्र सवयी होत्या. तो बिचारा वह्यांना कव्हर बिव्हर घालायचा, सुवाच्य अक्षरात त्यावर नावं घालायचा, जर्नल वेळेवर कम्प्लीट करायचा, रोज वेळेवर ठराविक अभ्यास करायचा. पण नियमित अभ्यासामुळे त्याच्या आत्मविश्वासाचा वेलू गगनावरी वगैरे चढायचा असं मात्र समजू नका. इतकं करूनही परीक्षेच्या आधी हा धाय मोकलून रडायचा. अच्चा बच्चाच्या गोष्टीतल्यासारखे मग आम्ही दोघं त्याची समजूत घालायचो. आमचा बहुमूल्य वेळ वाया घालवून घातलेली ही समजूत किती अनाठायी होती हे रिझल्ट लागताच  सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होत असे. कारण बहुतेकदा धोधो रडलेला पप्या चांगला धोधो मार्कानी पास आणि आम्ही समजूत घालणारे दोघं काठावर पास असा रिझल्ट  असायचा. पप्याला  आता मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायच्या आणि आम्ही दुखःसागरात गटांगळ्या खात असायचो. अर्थात एकट्यानीच चांगले मार्क मिळवण्याच्या त्याच्या ह्या खोडीबद्दल त्यानी आमचा एकदोनवेळा मारही खाल्ला आहे.
आता होस्टेल सुटूनही वीस पंचवीस वर्ष झाली. पप्या, चिक्या आणि मी वेळोवेळी भेटत असतो. आमच्या ‘पॅरासाईट्स’ मित्रांनाही या गेटटूगेदरला आमंत्रण असतंच असतं. होस्टेलमधल्या सुखदुखांची उजळणी होते. जुनी भांडणही उकरून काढली जातात. पण काय होतं कुणास ठाऊक. ह्या उकराउकरीतूनही फक्त आठवणींचा सुगंध तेवढा दरवळत रहातो.

येता जाता आजही होस्टेल खुणावतं, पण आत गेलं की सगळच अनोळखी आणि परकं परकं वाटायला लागतं. कोणे एके काळी दिवसाचे चोवीसही तास इथे काढलेले होते, ह्याच इमारतीनी आपल्याला आश्रय दिला, खाऊ-पिऊची सोय केली, इच्छा असेल तरच न्हाऊ-माखू घातलं, कॉलेजची फुलपाखरी वर्षं इथेच तर बागडण्यात गेली. असं सगळं वाटलं तरीही ते धागे पुन्हा जुळत नाहीत. आता आपण वाढलेलो असतो, मोठे झालेलो असतो, कोणीतरी कर्तृत्ववान वगैरे झालेलो असतो. पण होस्टेलला त्याचं मुळीच कौतुक नसतं. ती इमारत आता माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. उलट फर्रsss फर्रsss आवाज करत येणाऱ्या मोबाइक्स, त्यावरची मोठ्या मोठ्या आवाजात  बोलणारी, एकमेकाला मनसोक्त शिव्या घालत हाका मारणारी मुलं, त्यांच्या बरोबरच्या फटाकड्या पोरी, अशा सगळ्या रंगीबेरंगी जत्रेकडे होस्टेल मोठया कौतुकानी बघत असतं. मायेने या पोरांना कुशीत घेत असतं. लाडिकपणे त्यांची चौकशी करत  असतं. मग मी तिथे थांबतच नाही. सावत्र आईनी झिडकारलेल्या मुलासारखा गपगुमान घरी येतो. होस्टेल आता माझं राहीलेलं नसतं आणि मीही होस्टेलचा राहिलेलो नसतो.