Tuesday 1 March 2022

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी. (गोष्ट ३) भुते नाहीत हे पटत का नाही?

 

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी. (गोष्ट ३)

भुते नाहीत हे पटत का नाही?

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

 

भुते नसतात हे आपल्याला का पटत नाही याचे शास्त्रीय कारण  ऐकायला झंप्या आणि भुपी खूपच उत्सुक होते. सकाळी उठल्या उठल्याच त्यांनी आजीच्या मागे टुमणे लावले.

‘आज रविवार, शाळेला सुट्टी, तेंव्हा काय ते तू आत्ताच सांगून टाक. रात्री गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल.’

‘का? रात्री सांगेन ना.’

‘नाही, रात्री आम्हाला एक काम आहे.’ भुपी.

‘काय काम आहे?’ आजी.  

‘रात्री हॉरर सिरियलचा महाएपिसोड आहे. तो बघणार आहे आम्ही!’ झंप्या.  

‘आम्ही बघणार म्हणे! ‘आम्ही’ बघणार म्हणजे, मी बघणार आणि हा उशीत डोकं खुपसून बसणार!’ भुपी.

हे अगदी खर्र होतं. हे असले भीतीदायक पिक्चर, सिरियल  वगैरे लागले की झंप्याची जाम टरकलेली असायची. मग अशावेळी तो पांघरूण  घेऊन, उशीत डोकं लपवून बसत असे. भुपी त्याच्याहून मोठी त्यामुळे जरा शूर होती. मग ती जे काय चालू असेल त्याची रनिंग कॉमेंटरी करायची.

जरा काही भीतीदायक भाग आला की झंप्या म्हणायचा, ‘भुपे, इथून पुढचे मी बघणार नाही. तू सांग!’

भुपी अगदी तिखट मीठ लावून, रसभरीत वर्णन सुरू करायची.

‘आली, मागून आली, तिच्या हातात चाकू आहे..’

झंप्या डोळे मिटून पांघरूणात!

‘लाइट गेले!!’ भुपी.

झंप्या दचकून उशी कवटाळतो.

मग बराच वेळ नुसतीच पानांची सळसळ ऐकू येत रहाते. झंप्याची उत्सुकता ताणली जाते. तो हळूच पांघरूण बाजूला करून डोळे उघडून पाहतो.  इतक्यात रक्त गोठवणारी किंकाळी ऐकू येते आणि झंप्या सशाच्या चपळाईने पांघरूणात गुप्त होतो.

‘तिच्या डोळ्यातून रक्त ठिबकायला लागले आहे!’ भुपी.

झंप्या पार गळाठून गेलेला.

‘ती आता आरशासमोर उभी आहे. आरशात तिला कोण दिसत असेल?’ या प्रश्नाने भुपी मुळातल्या रहस्यात आपली भर घालते.  

‘कोsssण्? झंप्याची पाचावर धारण बसली आहे.

‘तू ओळख.’

‘नाही माहीत, सांग ना.’

‘बघ ना तू.’

झंप्या पांघरूणातून डोके बाहेर काढतो, पण डोळे उघडण्याची त्याची शामत नाही.

‘तूच सांग गं भुपे.’

‘तो, एक डोळा बाहेर आलेला कुरूप, हिडीस, हैवान!!’ भुपी.

झंप्या गप्प.

‘तिने तोंडातून आता सुळे बाहेर काढले आहेत!!!!’

‘बास आता, थोडा वेळ नको सांगू!!’ झंप्या चाचरत विनंती करतो.

दोघे हॉरर बघणार म्हणजे असे काहीतरी चालू असायचे. ही सगळी करमणूक आजीला चुकवायची नव्हती. ती म्हणाली, ‘बरं ठीक आहे मी सांगते भुतं का दिसतात ते.’

‘पण तुला ते कसं कळलं ते आधी सांग.’ झंप्या.

‘मी गेले  होते एका भूत बंगल्यात. तिथल्या मालकानी सांगितलं!’

‘क्काय? तू? भूत बंगल्यात गेली होतीस? कधी? कुठे?’ भुपीला जाम आश्चर्य वाटलं.

‘आम्हाला सांगतेस भुतं नसतात, मग आता भूत बंगला कुठून आला?’ झंप्या.

‘एकदा इंग्लंडला असताना गेले होते मी.’

‘इंग्लंडला? आमची सुद्धा शनिवारवाड्यात सहल गेली होती. तिथे नारायणराव पेशव्यांचे भूत आहे. ते ‘काका मला वाचवा’ अशा आरोळ्या ठोकत असतं.’ भुपी.  

‘हो! हो! हे मला पण म्हाइते. पण आजी फॉरेनमध्ये भुतं कशी?’ झंप्या.

 ‘आहेत रे बाबांनो. भुते आहेत, भूत बंगले आहेत, भूत बंगल्यांची सैर करता येते. तिकीट काढून!’

‘क्काय? लोकं तिकीट काढून भूत बंगला बघायला जातात?’ भुपी.

‘जातात ना, मी नव्हते का गेले? बरोबर गाईड असतो.’

आता दोघांना हसू अवरेना.

‘भूत बंगल्याला गाईड? आम्ही अजिंठा-वेरूळ बघायला गेलो होतो तिथे होता गाईड.’ भुपी हसत  हसत  म्हणाली.  

‘अरे इंग्लंडमधला गाईड तर माझा मित्रच होता. तो भुतांवर संशोधन करत होता. भूत बंगल्याची थरारक चक्कर झाली की त्यानी भुतांविषयी प्रदर्शन लावलं होतं. ते फिरून बघता बघता भुते का दिसतात हेही तो सांगायचा.    भुतांविषयी खूप माहिती त्याने जमवलेली होती. लोकं भुताच्या कहाण्या सांगत यायचे आणि हा जिथे तिथे जाऊन त्यांचा शहानिशा करायचा.’

‘शहानिशा म्हणजे?’ झंप्या.  

‘म्हणजे तपासून खरंखोटं ते बघायचा.’

‘बघ, मी सांगत होतो, असतात भूतं!’ झंप्या.

‘असं मी कुठे म्हटलं?’

‘अगं तुझा सायंटिस्ट मित्र काय शोधायचा मग?’  

‘तो शोधायचा, पण त्यालाही आजवर भूत सापडलेलं नाहीच्चे. उलट भूत आहे असं आपल्याला का वाटतं, ते त्यानीच तर मला सांगितलं. आणि तेच तर मी तुम्हाला सांगणार आहे.’

‘सांग सांग.’ भुपी.

‘मेंदू कुठे असतो?’ आजीने घसा खाकरत सुरवात केली.

‘डोक्यात.’

‘मन कुठे असतं?’

दोघही जरा बुचकळ्यात पडली पण मग त्यांना आठवलं आणि दोघे एकदम म्हणाले, ‘मेंदूत.’

‘बरोबर, पण निसर्गत: आपण, शरीर आणि मन असा भेद मानणारे प्राणी आहोत. आपले मन आपल्या मेंदूशिवाय शरीराबाहेर, स्वतंत्रपणे राहू शकते अशीच  आपली उपजत समजूत असते. आपण मेलो, शरीर नष्ट झालं, तरीही आपलं मन, या ना  त्या स्वरूपात  कुठेतरी शिल्लक रहातं, असंच आपल्याला वाटत असतं. यातूनच मृत व्यक्तीच्या इच्छा, त्यांची पूर्तता, अशा कल्पना येतात. मृत व्यक्तीशी संपर्क करण्याचे विविध प्रकार जगभर चालतात.’

‘म्हणजे प्लॅंचेट?’ भुपी.   

‘भूत असेल नसेल, पण प्लॅंचेट खोटं असतं ना गं आजी? तो आत्मा येतो मग ते नाणं फिरायला लागतं, आत्मा आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो....?’ झंप्याने विचारले आणि त्याला खुदकन हसू फुटले.

‘काय रे हसायला काय झालं?’ आजी.  

‘एक गंमत आठवली. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगलात शिबिराला गेलो होतो. तिथल्या दादानी प्लॅंचेट करून दाखवलं होतं आम्हाला. त्यानी आईनस्टाईनच्या आत्म्याला बोलावले होते. मग आम्ही खूप प्रश्न विचारले. आमच्या शाळेचे नाव काय? आम्हाला वाघ दिसला आहे का? इंडिया वर्ल्डकप  जिंकेल का? आइनस्टाईनच्या आत्म्याने सगळी उत्तरे बरोब्बर दिली.’

‘होsss, खरंच?’  भुपीने विचारले.

‘हो, पण शेवटी जरा गोची झाली. त्या शिबिरात एक खूप स्मार्ट मुलगी होती. तीनी  आईनस्टाईनच्या आत्म्याला आईनस्टाईनचीच  जन्मतारीख विचारली. ती काही आत्म्याला सांगता आली नाही. मग त्या मुलीचं आणि दादाचं जोरात भांडण झालं. ती म्हणत होती तूच ते नाणं पाहिजे तसं हलवतो आहेस. ज्या प्रश्नांची उत्तरे तुला माहीत नाहीत, ती आत्म्यालाही येत नाहीत! असले भांडले ना ते दोघे, खूप मज्जा आली.’

ही गोष्ट ऐकून आजीला आणि भुपीला खूप हसू आले.

आजी म्हणाली, ‘शरीराशिवाय आपलं मन वेगळे  कुठेतरी अस्तित्वात असतं असंच समजून चालतो आपण.  भुतंखेतं  असतात ही गोष्ट म्हणूनच आपल्याला सहज पटते. मन आणि शरीर एकत्रच असू शकतात; भिन्न भिन्न नाही, हे समजावून घ्यावे लागते. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, हे जसं आपल्याला नीट समजावून घ्यावं लागतं, तसंच हे आहे. गेलेल्या प्रिय व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटत असतो.  त्यातून ती आसपास आहेच, ही भावना मेंदू चटकन स्वीकारतो. मग जरा बरं वाटतं. दुख: जरा हलकं होतं. आपल्या माणसाशी संपर्क होतोय हे खूप सुखद असतं.  मग अशा लोकांना भुते नसतात हे कसे पटेल? पण आत्म्याशी बोलतो वगैरे सांगून लोकांच्या हळव्या मनाचा गैरफायदा घेतात काही जण. अरे, काय सांगू तुम्हाला, तुमचा आजोबा गेला  ना, तरी पुढे महीनाभर  त्याची पावले वाजल्याचा भास व्हायचा मला! मधूनच तो  हाक मारतो  आहे असं वाटायचं.’

‘बापरे, मग तू काय केलंस?

‘काय करणार हे फक्त भास आहेत अशी मनाची समजूत घातली. आजोबा आता नाही हे स्वीकारायला हवं, असं बजावत राहिले स्वतःला.’

आजीचे हे बोलणे ऐकून दोघेही जरा गप्प झाले. वातावरण जरा तंग झालं. आजोबांच्या आठवाने आजीलाही जरा भरून आलं.

 ‘आजी एक प्रश्न होता. विचारू?’ भुपी जरा चाचरत म्हणाली.

 ‘काय गं विचारणार होतीस, विचार.’ आजी म्हणाली.  बरेच दिवस आपल्या मनात घोळत असलेला प्रश्न आजीला विचारावा का नाही असा भुपीला प्रश्न पडला होता. मनाचा हिय्या करून भुपीनी प्रश्न केला, ‘आजी, आपण मेल्यावर आपलं  काय होतं?’ भुपी. 

‘काय होणार?, आपलं शरीर नष्ट होतं.’

‘आणि मेंदू?’ भुपी.

‘त्याचं काय वेगळं व्हायचंय? जे बाकी अवयवाचं होतं तेच  मेंदुचं  होतं. तो नष्ट होतो.’

‘आणि मनाचं काय होतं?’ भुपी.

‘मी सांगितलं ना तुम्हाला, मन म्हणजे मेंदूची कार्ये. जे बाकी अवयवांच्या कार्याचं होतं तेच मेंदूच्या कार्याचं होतं. पचन थांबतं, रक्ताभिसरण थांबतं, तसं मनही थांबतं. त्यातले विचार, इच्छा, भावभावना सारे संपून जाते.’

‘पण मग भुतं नसतात तर तो तुझा  मित्र लोकांना भूतबंगल्यात काय दाखवायचा?’ भुपी.

‘भीती दाखवायचा! एका बाजूने आत शिरलं की अंधाऱ्या  बोळाबोळातून त्या प्रचंड बंगल्याची सैर असायची. चित्रविचित्र आवाज, चेहरे, अंगावर पडणारे हाडांचे सापळे, अचानक असं काय काय होत होतं तिथे?’

झंप्या जरा घाबरायला लागला. ‘तुला भीती वाटली का गं आजी?’

‘वाटली की, पण मजा आली. त्या बंगल्यात झालेल्या आठ खुनांची गोष्ट ऐकत आपण पुढे पुढे जायचं. हळू हळू तुम्हीच ते खून केलेत असंच  सिद्ध होतं! मग एक चेटकीण येऊन आपल्याला पाताळात चल म्हणते.’

‘आली मग चेटकीण?’ झंप्या.  

‘आली की.’

‘बाप रे!’ झंप्या.

‘बापरे बीपरे काही नाही रे, एक भयानक चेटकीण आली आणि चहा घ्यायला चल म्हणाली! मी आवाजावरून लगेच ओळखलं, तो माझा मित्रच चेटकिणीचा वेश करून आला होता. खूप मजा आली.

‘एकदा म्हणतेस भुतं नसतात, एकदा म्हणतेस मजा आली? असं कसं होईल?’ भुपी.

‘अगं, वाघ सिंह बोलतात का? पण इसापाच्या आणि  पंचतंत्रातल्या कथा खूपच आवडतात आपल्याला. तसंच हे. अगं भुतं नसतात, पण भुताच्या गोष्टी खूपच इंटरेस्टिंग असतात. मजा येतेच. मग त्या मित्राबरोबर मस्त चहा घेतला  मी. भुतं  नसतात हे आपल्याला का पटत  नाही हे त्यानी छान समजावून सांगितलं.’

‘काय सांगितलं?’ भुपी.

‘थोडीशी ढुश्शी दिली की आपलं मन त्याच दिशेनी काम करायला लागतं. ही मानवी मनाची खासियत आहे. भूत दिसेल अशी मनाला सूचना मिळाली की भुतं  दिसायला लागतात. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात काही हलेल म्हटलं की काहीतरी हलल्या सारखं वाटतंच.  जिन्यावर पैंजण वाजतील म्हटलं की पैंजण ऐकू येतात. पण उडायची सोय असताना मुळात ही भुतं जिन्यावरून का येजा करतील?  ‘काका मला वाचवा’, असं अस्पष्ट ऐकू येईल  म्हटले, की तशी कुजबूज कानी येते. असे अनेक प्रयोग केले आहेत अय्यरनी.’

‘कोण अय्यर? भुपी.

‘अगं माझा मित्र गं, चेटकीण झालेला.’

‘पण तो तर इंग्लिश आहे ना?’ झंप्या.

‘हो, आता इंग्लिश.  पण मूळचा त्रिवेंद्रमचा आहे.’  

‘तो सांगत होता, शंका घेणाऱ्यांना सहसा भूत दिसत नाही. फक्त तसा विश्वास असेल तरच भूत दिसतं, ह्याचंही कारण हेच आहे. आणखी एक कारण सांगितलं अय्यरनी. काही अस्पष्ट दिसलं की त्यातून ओळखीचा आकार जुळवण्याची  माणसाच्या मनाला सवयच आहे. म्हणजे बघा हं, ढगांच्या आकारात माणूस, राक्षस, रथ, विमान असं काहीतरी शोधतोच आपण.’ 

‘हो, ना, भुपीनी  पोळी केली तर कधी भारताचा नकाशा दिसतो तर कधी महाराष्ट्राचा.’ झंप्याने भुपीला चिडवण्याची संधी साधली.

पण झंप्याकडे दुर्लक्ष करत आजी सांगत राहिली, ‘त्यामुळे अंधारात, काही हललं, दिसलं, ऐकू आलं,  की लगेच आपण त्यात माणसाचा आकार, पावलांचा आवाज असं काहीतरी शोधतो. अगदी आदिमानवापासूनची सवय आहे ही.’

‘पण आदिमानवाची सवय तुला कशी कळली?’ झंप्या.

‘सांगते. आपले पूर्वज कुठे रहायचे?’

‘आफ्रिकेच्या जंगलात.’ भुपी.

‘बरोबर. तिथे वावरताना गवतात काही  खसफसलं, काही ठिपकेरी दिसलं, तर ते लगेच शंका घ्यायचे, बिबट्या तर नसेल? बिबट्या क्वचितच असतो. वाऱ्यानी गवत हललेलं असण्याची शक्यता जास्त.’

‘मग?’ झंप्या.

‘मग काय, शंकेखोर होते ते सावधपणे लांबून जायचे. पण शंका न घेणारे होते ते आपले बिनधास्त जायचे.’  

‘मग?’ झंप्या.

‘मग कधी कधी बिबट्या त्यांना खाऊन टाकायचा! अशाप्रमाणे वर्षानुवर्ष होत राहिलं. मग यामुळे  झालं काय की, आसपास सतत आकार शोधणारी, शंकेखोर, सावध माणसं जास्त जगली. त्यांची प्रजा वाढली. त्यांची मुलेही अर्थात सतत आकार शोधणारी, शंकेखोर, सावध निपजली.   आपण सगळी माणसे म्हणजे अशा  आकार शोधणाऱ्या पूर्वजांची पिल्लावळ आहोत. जंगल सोडून इतकी वर्ष लोटली, पण मेंदू अजून तस्साच आहे. मेंदू अजूनही तस्साच विचार करतो. म्हणून आसपास काही ना काही आकार शोधत रहाण्याची आपल्या मेंदूला आदिम सवय आहे. मग अंधाऱ्या जागी लांबवर काही हललं की भुताचा भास होतो, पाण्यात आसरा सळसळताना दिसतात, अमावस्येच्या रात्री जंगलातून मिट्ट काळोख असताना, फांदी जरी मोडली तरी काळीज लक्कन चमकतं.’

‘ओके, म्हणजे मेंदूतच लोच्या आहे, हे भुते दिसण्याचे शास्त्रीय कारण आहे तर.’ भुपी.

‘हो, आणखीही आहेत. अय्यर सांगत होता, त्या भूत बंगल्यात फिरण्यासाठी सगळे अंधारे बोळ ठेवले आहेत त्यानी. कारण  दूरवरचं स्वच्छ, स्पष्ट दिसत असेल तेंव्हा भुते दिसत नाहीत.  कारण तेंव्हा आकार नीट दिसत असतात. आसपास लपायला, पळायला जागा असेल तर भुतं दिसत नाहीत. कारण अशा वेळी मन जरा आश्वस्त असतं.’ 

‘आश्वस्त म्हणजे?’ झंप्या.

‘म्हणजे वेळ पडल्यास इथून सटकता येईल अशी मनोमन खात्री असते. अरे, गांजाबिंजा ओढला तरी काही चित्रविचित्र भास होतात. मग भुतंच काय, अप्सरा सुद्धा दिसतात.’

‘गांजाबिंजा म्हणजे?’ झंप्या.

‘गांजा म्हणजे स्ट्रॉंग सिगरेट असते एक प्रकारची!’  भुपीने माहिती पुरवली. ‘आणि बिंजा म्हणजे झंप्या-बिंप्या मधल्या बिंप्यासारखं.  त्याला अर्थ काही नाही. एक बोलायची पद्धत.’

‘कधी कधी आपण अर्धवट झोपेत असलो तरी आपल्याला काही भास होतात. कोणीतरी आपल्या अंगावर बसलं आहे, गळा दाबत आहे, पण आपण थोडेही हलू शकत नाही असं अगदी प्रामाणिकपणे वाटतं. ह्याला स्लीप पॅरॅलिसिस म्हणतात.   शिवाय एकट्यालाच कोणी दिसणे, आवाज ऐकू येणे, असले भास म्हणजे  खरंतर चक्क मेंदूवर परिणाम झाल्याचं, वेडाचं,  लक्षण असू शकतं.’

‘बाप रे!’

‘अंगात येणे वगैरे प्रकार सुद्धा मानसिक आजाराची लक्षणे आहेत. भूतबित अंगात येत नाही. अशा लोकांना खरंतर खूप त्रास होत असतो. त्यांना नीट औषधपाण्याची गरज असते.  पण ती निरर्थक बडबड करतात, चित्रविचित्र चाळे  करतात, त्यांना कसले कसले भास होत असतात; त्यामुळे  लोकांना वाटतं त्यांना भुतानी झपाटलंय. मग त्यावर काय काय अघोरी उपाय केले जातात. मारहाण करणे, झाडाला बांधून ठेवणे, लिंबू उतरवणे, दर्ग्याला, पिराला  सोडून देणे.. असं काय काय करतात लोकं.’

‘असं करतात? पण का? डॉक्टरकडे का नाही जात?’ भुपी.

‘पहिले कारण म्हणजे त्यांचा भुतावर ठाम विश्वास असतो आणि  त्यामुळे हा मानसिक आजार आहे हेच त्यांना माहीत नसतं.  आणि दुसरं म्हणजे अशा आजारांवर उपचार करणारे डॉक्टरच आसपास नसतात. असे डॉक्टर फार कमी आहेत. मग  लोकं तरी काय करणार? जे त्यांना योग्य वाटतं ते करतात.  पण यातून हाल होतात गं त्या पेशंटचे.’  

‘अय्यर तर आणखी काय काय सांगत होता;  काजवे अंधारात चमकतात, तशी अंधारात चमकणारी बुरशी असते. ती झाडांवर वाढते. त्यामुळे जंगलात दूरवर हलणारा उजेड दिसतो. लोकांना वाटतं, वेताळ पेटते पलिते घेऊन नाचतो आहे.’

‘बापरे.’ झंप्या.

‘आपल्याला ऐकू येतच नाहीत असे आवाज असतात.’

‘मला माहीते, पोलिसांच्या कुत्र्यांसाठी असतात अशा खास शिट्या. त्या माणसांना ऐकू जात नाहीत पण कुत्र्यांना ऐकू जातात.’ झंप्या. 

‘अगदी बरोबर, असे आवाज ऐकू जरी आले नाहीत तरी त्यांचा आपल्या मनावर परिणाम होतो. अय्यर सांगत होता, एका खोलीत लोकांना विनाकारण खूप अस्वस्थ आणि भयभीत वाटायचं. अर्थात सगळेच तिथे भूत असल्याचे समजायला लागले. पण अय्यरनी बरोब्बर शोध लावला. तिथे जुना पंखा  होता.  तो फिरताना, त्यातून अ-श्राव्य, म्हणजे माणसाला ऐकू न येणारे आवाज निघत होते आणि त्यामुळे तिथे सगळ्यांना अस्वस्थ वाटत असे. वाघ आपल्याकडे पाहून गुरगुरतो ना, तेंव्हा तो  असे अ-श्राव्य आवाजही काढत असतो.  त्यामुळे भीतीने आपण  आधीच अर्धमेले होतो आणि वाघाचे निम्मे काम होते!’

‘हा! हा! हा!’ झंप्याला अगदी मनमुराद हसू आलं.

‘इतकं हसायला काय झालं रे?’ आजी

‘अगं आजी, तू म्हणालीस,  आपण  अर्धमेले होतो आणि वाघाचे निम्मे काम होते!! हे ऐकून हसू आलं मला.’

‘म्हणजे जोक कळला वाटतं तुला.’ भुपीने  झंप्याला चिमटा काढला आणि पुढे म्हणाली, ‘ते अय्यर सर  आता काय करतात? अजूनही भुते शोधताहेत का ते?’ भुपी.

‘पण एकतरी भूत सापडलंच असेल की त्या अय्यर आजोबांना.’ झंप्या.

‘नाही ना, एकही नाही आणि एकदाही नाही. त्यांनाही नाही आणि जगभर शोधणाऱ्या कुणालाही नाही. आत्तापर्यंत शोधलेल्या सर्व घटना बिन-भुताच्या आणि बिनबुडाच्या  निघाल्या. आपल्याकडे तर भूत दाखवणाऱ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  इनाम जाहीर केले आहे. एकवीस लाख रुपये!’

‘एकवीस लाख!’ दोघे आश्चर्य चकित झाली.

‘अजून तरी ते एकवीस  लाख रुपये जैसे थे आहेत.’  

 

 

प्रथम प्रसिद्धी

किशोर मासिक

मार्च २०२२

 

 

 

No comments:

Post a Comment