Wednesday, 16 February 2022

शपथ वहा!

शपथ वहा!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. 

डॉक्टर होताना इतकी वर्ष हिप्पॉक्रेट्सची शपथ दिली जायची. नव्या प्रस्तावानुसार आता चरक मुनींच्या नावाने शपथ घ्यावी लागणार आहे. 
 यामुळे काही गोटात अस्वस्थता पसरली आहे.  खरंतर असा बदल होणार हे योग्यच म्हटलं पाहिजे. अशा तऱ्हेने परंपरेचा आणि पूर्वजांच्या गौरवीकरणाचा  समाजाला नेहमीच आनंद आणि अभिमान वाटत असतो.  पण नाव जरी चरकाचे असले  तरी ज्या मूल्यांशी डॉक्टरने निष्ठा वहायच्या आहेत ती मूल्ये  मात्र आधुनिक असावीत असं सुचवावंसं वाटतं. 
मि. हिपोक्रेटेस  आपले  चुलत आजोबा. श्री. चरक मुनी मात्र थेट आजोबा.  हिप्पोक्रेट्स आजोबांची आणि  आपली जानपहचान ब्रिटिशांमार्फत झाली. त्यांनी आणलेले ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान  पसरत गेलं.  हे ज्ञान आत्मसात करण्याच्या पद्धती; म्हणजे कॉलेज, विद्यापीठ, पदवी  आणि पदवीदान समारंभ हे सगळं त्यानीच तर  इथे इंजेक्ट केलं. त्यांना घालवल्यानंतर आपल्या मुळांचा शोध नेकीने सुरू झाला.  तो अजूनही सुरूच आहे.  त्यालाच आलेला हा एक फुटवा. खरंतर कोर्टातले काळे डगले, मिलिटरी बँडची गाणी, सेनेचे युनिफॉर्म-टोप्या-बाजूबंद, लोकसभेत अध्यक्षांचा  ‘द आयेज हॅव इट’चा त्रिवार जप; अशी  सगळी वसाहतवादाची उरलीसुरली चिन्हे आहेत.  हीदेखील जायला हवीत. कालांतराने जातीलच. 
नव्या ज्ञानाच्या प्रकाशात आज  हिप्पोक्रेट्सची कित्येक वचने गैरलागू आहेत. चरकाचीही तीच गत आहे.  त्याला इलाज नाही.  ही मंडळी बुद्धीमान आणि प्रतिभावंत होती  पण त्यांना त्यांच्या काळाच्या मर्यादा होत्याच. प्रामाणिकपणे सांगायचं तर हिप्पोक्रेट्स किंवा चरकापासून अखंड वैज्ञानिक परंपरा अशी काही दाखवता येत नाही. युरोपातही अंधार युग उगवलं होतं आणि आयुरोग्यात प्रगती साधायची, ज्ञाननिर्मिती करण्याची, ‘विज्ञान’ नावाची काहीतरी युक्ती आहे, हा शोध आपल्याला ब्रिटिशांच्या मार्फतच लागला. स्वातंत्र्याच्या सुमारास केवळ ३७  वर्षे असलेले भारतीयांचे  सरासरी आयुर्मान आज ६७ वर्ष झालं आहे.  हे झालं ते आधुनिक विज्ञानाची विज्ञानाची कास धरल्यामुळे. ही किमया हिप्पोक्रेट्सच्या वैद्यकीची नाही आणि चरकाच्याही नाही. त्यामुळे जर शपथच घ्यायची  असेल तर ती विज्ञानाच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या या नावाने घ्यायला हवी.  
अशा संस्कृती-निरपेक्ष, देश-निरपेक्ष, कालसुसंगत शपथांचे पाठ  उपलब्ध आहेत. संपूर्ण पारदर्शकता, पेशंटचा उपचारातील निर्णयांमध्ये सहभाग, पेशंटचे अधिकार, वर्ण-वंश-धर्म-जात-लैंगिकता वगैरे  भेदांना तिलांजली  ही तुलनेने आधुनिक मूल्य त्यात अंतर्भूत आहेत. अशी अकरा मार्गदर्शक सूत्रांची एक यादी आज डॉक्टर होताना नॅशनल मेडिकल कौन्सिलतर्फे दिली जाते आणि ती पाळणे अपेक्षित आहे. वर्ल्ड मेडिकल असोसिएशचा जिनेव्हा पाठ हाही असाच एक नमूना.
कर्मकांडाच्या नावाने कितीही बोटे मोडली तरी त्यातून माणसाची सुटका नाही.  वैद्यकीय क्षेत्रात, पांढरा कोट घालणे, दिवा हातात धरून शपथ वहाणे. पदवीदान समारंभातील त्या मिरवणुका, ते झगे, त्या गोंड्याच्या टोप्या, ते टोप्या उडवणे, त्याचे फोटो जिकडे तिकडे शेयर करणे;  हे सगळं कर्मकांडच  म्हणता येईल. पण  हे अर्थहीन नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, एक एक पायरी चढताना, एक एक उंबरा ओलांडून जाताना, आनंद, अभिनंदन, अभिमान, उत्सव,  जबाबदारीचा स्वीकार हे  सगळं दर्शवणाऱ्या या अर्थपूर्ण सामाजिक कृती आहेत. 
प्रश्न आहे धर्मनिरपेक्ष देशांत धर्मनिरपेक्ष कर्मकांडे निर्माण करण्याचा. ब्रिटिश  प्रथा, परंपरा आणि कर्मकांड  यांचे एक बरं आहे. ह्यांना ‘हिंदू’ असं लेबल लावता  येत नाही. त्यामुळे आपोआपच सेक्युलर ठरतात, जास्त स्वीकारार्ह  ठरतात. त्या मानाने इथल्या मातीत उगवलेली कोणतीही कृती सहजच ‘हिंदू’ आणि म्हणून विकृती ठरवता येते. चरक आणि त्याची संहीता, भले ती आता  कितीही अशास्त्रीय ठरो, आपला वारसा आहे. हा आपल्या देशाने नाही जपायचा तर कोणी? तसे चरक आजोबा पाक आणि बांगलादेशालाही प्यार हवेत पण तिथे तर हे अशक्य आहे. मग आपली जबाबदारी मोठीच आहे म्हणायचे. 
असा काही प्रस्ताव आहे म्हटल्यावर त्याबद्दल आत्ताच चर्चा सुरू झाली आहे.  नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या वेबसाईटवर मला त्याचे डिटेल्स सापडले नाहीत. पण सोशल मीडियावर काही शक्यता  फिरताहेत.  बरोबरीने भगवेकरण, संघाचा हात वगैरे नेहमीचे तळतळाटही फिरताहेत.  काहीं नमुन्यांत ‘द्विज’  असा शब्द आहे आणि कोणी त्याचा जातीय  अर्थ काढू नये म्हणून, चांदणी टाकून, तळटीपेमध्ये त्याचा खुलासाही  आहे. या शपथेत नेमके काय असणार आहे त्याचा थांगपत्ता मला तरी लागलेला नाही.  पण काहीही माहीत नसताना चर्वीतचर्वण  करणे हाच तर सोशल मिडीयाचा फंडा आहे. 
काही वैद्यांच्या मते,  चरक शपथ वगैरे काही घेतल्याचे त्यांना आठवतही  नाहीये. मूळ संहितेत शपथ वगैरे काही प्रकारच नाहीये. डॉक्टरच्या आणि पेशंटच्याही  नीतिमत्तेबद्दल, बरीच वचने या लिखाणामध्ये इतस्ततः विखुरलेली आहेत. उदा: ‘मैत्री कारूण्यं आर्तेषु शक्ये प्रितीः उपेक्षणं । प्रकृतिस्थेषु भुतेषु वैद्यवृत्तिः चतुर्विधा ।। (च. सू. 9/26)’ वैद्य मैत्रभावी, कारुण्यमूर्ती, साध्य आजाराबद्दल आस्था असणारा आणि असाध्य रोग्यांत भावनीक गुंतवणूक टाळणारा असावा; अशा वैद्यवृत्ती सांगितल्या आहेत.  अशी वचने एकत्र करून शपथवजा मजकूर तयार केलेला दिसतो; असंही  काहींनी सांगितलं. थोडक्यात एका कर्मकांडासाठी सुसंगत वचने वेचण्यात आलेली आहेत. हरकत नाही. हिप्पॉक्रेट्सच्या शपथेतही कालौघात बरेच बदल झालेले आहेत.  मुळात अपोलो, हायजिया, पॅनॅशिया वगैरे ग्रीक पंचायतानाला नमन करून सुरू होणारी शपथ,  काही पाठभेदात नुसतेच ‘हे देवा’ असं म्हणून सुरू होते, तर काहींत सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सुरू होते. मूळ शपथेत गर्भपाताला आणि दयामरणाला स्पष्ट नकार होता.  नव्या रूपात हा पुरेसा अस्पष्ट किंवा पार नष्ट  करण्यात आला आहे! 
हिप्पॉक्रेट्स असेलही पाश्चिमात्य. पण सामान्यपणे ‘अॅलॉपॅथी’ म्हणवले जाणारे आधुनिक वैद्यक, हे ना पाश्चिमात्य आहे पौर्वात्य. हे तर दशदिशांतील देशादेशांतून, इतिहासातून  आणि संस्कृतींतून   उगवलेल्या; अनेक कल्पनांच्या, युक्त्या-प्रयुक्त्यांच्या, औषधोपचारांच्या, शल्यतंत्रांच्या आणि कौशल्यांच्या मंथनातून निघालेले नवनीत आहे.  आणि हेच त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. सुरवातीला पाश्चिमात्य संस्कृतीत आणि प्रामुख्याने  ख्रिश्चन जनांत आधुनिक वैद्यकीने उचल खाल्ली हे निश्चित, पण आज हे शास्त्र  कोणा एका दिशेला, देशाला, धर्माला किंवा संस्कृतीला बांधील नाही. ह्याला ‘वेस्टर्न फॅड’ म्हणून हिणवणारे, ह्या ज्ञानातील देशा-परदेशातील भारतीयांच्या योगदानाचा उपमर्द करत असतात. 
शेवटी ‘हिप्पोक्रेट्सच्या-शप्पथ’ म्हटलं काय किंवा ‘चरका-शप्पथ’ म्हटलं काय; ती शपथ काय सांगते आणि  किती तळमळीने पाळली  जाते, हा कळीचा मुद्दा आहे. नाव हे परांपरेशी नाते सांगण्यासाठी आणि गाभा हा आधुनिकतेशी नाते सांगण्यासाठी असावा एवढीच अपेक्षा. 

प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
16 फेब्रुवारी 2022

No comments:

Post a Comment