शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी
भाग २
भुते आहेत असे का वाटते?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
दुसऱ्या दिवशी कधी एकदा रात्र होते
आणि गूगल आज्जी पुढे गोष्ट सांगते असं झालं होतं दोघांना. आदल्या दिवशी प्रॉमिस
केल्याप्रमाणे ती आज, भुते का दिसतात, ते सांगणार
होती.
सगळे अंथरूणात शिरताच आजीने दिवा बंद केला. पण झंप्या जाम घाबरला. ‘आजी, दिवा असू दे.’ तो ओरडला.
‘का रे?’
‘भूपी अंधाराला घाबरते!’
आजी लागली हसायला. ‘हो का? मग
तीनी सांगितलं की लावीन मी पुन्हा. आता भुतं का दिसतात ते ऐक.’ आज्जी सांगू लागली, ‘भुतं काय जगभर आहेत. जिथे माणसं तिथे भुतं. दोन हजार वर्षापूर्वी भुतांचे उल्लेख आहेत,
दोनशे वर्षापूर्वीचे आहेत, दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि दोन दिवसापूर्वीच भूत
पाहिल्याचं सांगणारी माणसे आहेत! भारतात
आहेत, आशियात आहेत, अमेरिकेत आहेत,
सगळीकडे आहेत.’
‘तेच तर मी म्हणत होतो. इतक्या
सगळ्यांना भुतं दिसतात आणि तू म्हणतेस ती नसतातच. सांग आता, इतक्या सगळ्या
माणसांना भूत दिसतं ते कसं?’ झंप्या तावतावाने
म्हणाला.
‘तूच मला सांग, सूर्य पृथ्वीभोवती
फिरतो हे साऱ्यांना दिसतंच ना?’ आजी शांतपणे म्हणाली. ‘पण ते खरं आहे का? नाही!
म्हणजे खूप जणांना वाटलं म्हणून ते खरं असं नाही म्हणता येणार.’
झंप्या विचारात पडला. ‘मग सांग ना, भुतं का दिसतात?’
‘भूतं आपल्या मनात असतात!’
‘मनात; पण मन कुठे असतं?’ भुपीने
विचारले. ‘आमच्या पुस्तकात हार्ट आहे, स्टमक आहे, बोन्स आहेत पण मन नाही कुठे
दाखवलेलं.’
आजी म्हणाली, ‘अगं मन म्हणजे कुठलाही
अवयव नाही. मेंदूच्या अनेक कामांपैकी काही कामांना मन म्हणतात. विचार करणे,
कल्पना लढवणे, आनंद, दुःख अशा भावना समजणे, आठवण काढणे, अशी अनेक कामे आपला मेंदू करत
असतो. ही कामे म्हणजे मन. मन नावाचा अवयव काही दाखवता येत नाही. जठर, यकृत, आतडी
हे दाखवता येतात ‘पचन’ दाखवता येत नाही. तसंच हे. पण पचनाचे परिणाम आपल्याला दिसतात. म्हणजे आज
भेळ खाल्ली, बिर्याणी खाल्ली, की दुसर्या दिवशी त्याचे परिणाम दुसर्या टोकाने
बाहेर पडतात!’
झंप्या आता खुसुखूसू हसू लागला. हा
मुद्दा त्याला लगेचच पटला. तो म्हणतो कसा,
‘आणि आज्जी, अपचनाचे तर जास्तच परिणाम
दिसतात!’
झंप्याला आता जोरदार हसू फुटलं. ढुस्sss , ढुर्रsss असे आवाज काढून त्यानी मनसोक्त हसून
घेतलं. शेवटी भुपीने टप्पल मारून त्याला
गप्प केलं आणि आजी पुढे सांगू लागली,
‘आत गेलेला पदार्थ आणि बाहेर येणारा
पदार्थ यातील फरक तुम्हाला माहीतच आहे. हे सगळे पचनाचे कार्य. तसेच मनाचे आहे. मन
दिसलं नाही तरी मनाचे कार्य आपण अनुभवू शकतो. मनामुळेच उत्क्रांतीसारख्या किंवा हॅरी पॉटर सारख्या अफाट
कल्पना माणसाला सुचतात.’
‘अगं ते सगळं ठीक आहे ग आजी, पण भुतं
का नसतात?’ झंप्या अधीरतेने विचारू लागला.
‘अरे मनाला काही चित्रविचित्र भास
होतात आणि मग लोकांना वाटतं आपल्याला भूत दिसले.’ आजी.
भुपीला हे विशेष पटलं नाही. ती
म्हणाली, ‘माझी एक मैत्रीण हिमालयात ट्रेकला गेली होती. तिथे ती एकटीच मागे
राहिली. पुढच्यांना गाठायला म्हणून ती भराभर चालू लागली. ती चुकून लांबच्या वाटेने जात राहिली. खूप दमली, खूप भूक लागली होती तिला. शेवटी तर तिला
असं वाटायला लागलं की आपल्यामागे मागे कोणी तरी येतंय. मागे वळून पहीलं तर कोणीच
नाही! पण सतत सोबत कोणीतरी आहे असं मात्र तिला जाणवत राहिलं. आता हे भूत नाही तर काय?’
गूगल आजीने दीर्घ श्वास घेतला आणि ती सांगू लागली, ‘हा देखील आपल्या मेंदूचा
खेळ. उंच
पर्वतावर जाणाऱ्या माणसांना असा अनुभव बरेचदा येतो. ध्रुवप्रदेशात जाणारी माणसं, एकेकटी
समुद्रप्रवास करणारी माणसं, इतकंच काय, जीवावर उदार होऊन मॅरेथॉन धावणारी माणसं अशा बऱ्याच जणांना असा खास अनुभव येतो. आपल्या आसपास, आपल्या सोबत कोणीतरी आहे असा अनुभव
आल्याचे ते सांगतात. अती थंडी, थकवा, भीती, झोपेचा अभाव ह्यामुळे असं होतं.
आजूबाजूचं वातावरण अतिशय एकसूरी असेल तरी
असं होतं. हिमालयात तुझ्या मैत्रिणीला नुसता एकच एक, बर्फाचा पांढरा रंग दिसत होता. आपल्या आसपास माणसं असण्याची आपल्याला
सवय असते. त्यामुळे बराच काळ एकांतवास पदरी
आला तर मेंदू आपल्याला आपोआप, आसपास माणसं भासवायला लागतो. आपण पुन्हा माणसात यावं अशी तीव्र इच्छा, अडचणीतल्या
त्या व्यक्तीला होत असते. त्यामुळे माणसं आहेतच हा भास आपला मेंदू
स्वीकारतो. सारं निर्मनुष्य आहे, या प्रत्यक्षातल्या स्थितीवर, ही समजूत मग मात करते.’
‘असेल गं, पण ती मैत्रीण तर सांगत होती की मरतानासुद्धा सगळ्यांना
स्वर्ग दिसतो. काही माणसं मरता मरता वाचतात.
त्यांनी तसं सांगितलेलं आहे. एक शास्त्रज्ञ अशा खूप माणसांना भेटला. त्यानी
पुस्तक पण लिहिले आहे म्हणे.
‘बरोबर आहे. अशी मरता-मरता
वाचलेली माणसे बरेचदा आपण स्वर्गात जाऊन आल्याचे सांगतात. चित्रविचित्र प्रकाश, चेहरे, पारदर्शक माणसं असं
काय काय दिसल्याचे अगदी छातीठोकपणे सांगतात. पण ही माणसे पूर्णवेळ हॉस्पिटलमध्ये असतात, त्यांच्या
अंथरुणातच असतात. तऱ्हेतऱ्हेची यंत्रे, इंजेक्शने,
ऑपरेशन वगैरे उपचार चालू असतात. कशीबशी ती
वाचतात. पण वाचतात म्हणजे काय? मुळात ती
ठार मेलेलीच नसतात. मेंदूत वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी केंद्रे असतात. अर्थातच आजारी झालेला किंवा मार लागलेला मेंदू ज्यावेळी
बरा होत असतो, त्यावेळी मेंदूतील चेहरे ओळखण्याची,
उजेड लक्षात येण्याची, ध्वनि ऐकण्याची अशी केंद्रे वेडीवाकडी उद्दीपित होतात. मग अशी माणसं हे अनुभव
आल्याचे, स्वर्ग दिसल्याचे सांगतात. त्यांचे
अनुभव हे खरेच असतात. ती खोटं बोलत नाहीत.
पण ते त्यांच्यापुरते खरे असतात. हे अनुभव म्हणजे मेंदूने निर्माण केलेले भास मात्र. या आभासी विश्वात सारे काही खरोखरच घडल्यासारखी
भावना असते. प्रत्यक्षात तसं काही घडलेलंच नसतं.’
‘मेंदूला इजा झाली, डोळ्याला इजा
झाली तरीदेखील तऱ्हेतऱ्हेचे भास होतात. माणसांच्या
चेहेऱ्यांच्या जागी चित्रविचित्र अवयव दिसतात, कार्टून्स दिसतात, काहीही दिसते.’
‘जेव्हा असे भास होतात तेव्हा शास्त्रज्ञांनी मेंदूचे फोटो काढलेले
आहेत. त्यात कायकाय बदल होतात याचा अभ्यास
नेकीने जारी आहे.’
‘नेकीने जारी आहे म्हणजे?’ झंप्या
‘प्रामाणिकपणे सुरू आहे.’ आजी झंप्याकडे कौतुकाने पहात उद्गारली. झंप्याचा हा गुण तिला फार प्रिय होता. काहीही
अडलं की तो थेट प्रश्न विचारून लगेच शंकासमाधान करून घ्यायचा. आजी पुढे सांगू
लागली, ‘मेंदूच्या कोणत्या भागात इजा झाली की कोणते भास होतात हे आता आपल्याला माहिती होऊ लागलं
आहे’
‘पण मग आजी, मेंदूचे ते भाग कृत्रिमरित्या उद्दिपित केले तरीही भुते,
स्वर्ग वगैरे दिसायला हवेत?’ भुपी.
‘होतात नं. अॅट्रोपीन नावाचे औषध
आहे. ते घेतलं की आपण तरंगतोय, उडतोय असे
भास होतात. किटामीन म्हणून औषध आहे. या औषधाने देखील आपला देह जागेवर आहे आणि आपण
मात्र त्यापासून दूर भटकत आहोत असे भास होतात. अंफीटामीन म्हणून औषध आहेत. यांनी जुन्या जुन्या आठवणी जाग्या होतात आपण
अगदी लहान झालो आहोत असं वाटायला लागतं.’
‘आज्जी हे खूपच विचित्र आहे गं. मी उदया माझ्या मैत्रिणींना हे शास्त्रीय कारण सांगितलं
ना, तर त्यांना हे मुळीच पटणार नाही.’ भुपी.
‘हो आणि भूत पाहिलेले माझे
तीन मित्र आहेत. ते तर मला वेड्यात काढतील.’ झंप्या
‘अगदी बरोबर. नाहीच पटणार. ह्यालाही शास्त्रीय कारण आहे!’
‘क्काय? शास्त्रीय कारण? यालाही शास्त्रीय कारण आहे?’ भुपी.
‘हो आहे.’, आजी ठामपणे म्हणाली.
‘पण ते कोणते, ते आता उदया सांगीन. झोपा आता.’
आजीने आज नेमके काय सांगितले ह्यावर विचार
करत आणि उद्या कोणते गुपित उलगडणार ह्याची
कल्पना करत, दोघे झोपी गेले.
प्रथम प्रसिद्धी
किशोर मासिक
फेब्रुवारी २०२२
No comments:
Post a Comment