अंगावरून जास्त जाणे
डॉ. शंतनू
अभ्यंकर
पाळीच्या वेळेला
नेमका किती स्त्राव होतो हे काही नेमकेपणाने मोजता येत नाही त्यामुळे जो स्त्राव त्रासदायक
वाटतो तो अति प्रमाणात समजणे अशी ढोबळ व्याख्या मनाशी धरायला हरकत नाही. शेवटी पाळी येणे हे जर का नैसर्गिक, प्रकृत, म्हणजे आरोग्याचे लक्षण
असेल; तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तिचा अडथळा ठरता कामा नये. वेदनेमुळे किंवा अति
रक्तस्त्रावामुळे जर तुमच्या कामात अडथळा येत असेल, तर काही न काहीतरी तपासणी आणि उपचार
करण्याची निश्चितच गरज आहे.
तासातासाला घडी बदलावी
लागणे, आठवड्याभरापेक्षा जास्त दिवस अंगावरून जाणे, पॅड बदलायला रात्री उठावे लागणे, दोन सायकल्समध्ये जातच राहणे
आणि अंगातलं रक्त कमी झाल्यामुळे, दम लागणे, निरुत्साह वाटणे ही सगळी त्रास सूचक
लक्षणे.
नियमितपणे पाळी येते
त्या वेळेला होर्मोन्सच्या छत्राखाली अस्तर योग्य पद्धतीने वाढतं आणि ठराविक कालावधीनंतर
एकसाथ सगळं अस्तर बाहेर पडून जातं. अस्तर संपूर्णपणे तयार होणं आणि संपूर्णपणे बाहेर
पडणं महत्वाचं आहे. तरच मोजक्या दिवसांमध्ये ब्लीडींग थांबतं. पण समजा होर्मोन्समध्ये असंतुलन असेल तर एकीकडचे
अस्तर पडेपर्यंत दुसरीकडं निर्माण होत राहतं आणि मग ते पडेपर्यंत पुन्हा पहिल्या ठिकाणी
नव्याने अस्तर निर्माण होतं आणि मग खूप प्रमाणात आणि खूप दिवस रक्तस्त्राव होत राहतो.
काही वेळेला स्त्रीबीज
निर्माण होत नाही किंवा उशिरा निर्माण होते आणि मग अतिरिक्त, जाडच्या जाड अस्तर तयार
होतं. परिणामी पाळीच्या वेळेला खूप रक्तस्राव
होतो.
तांबी बसवली असेल, गर्भपिशवीला फायब्रॉइच्या गाठी असतील,
किंवा आत मोड यावेत अशा गाठी आल्या असतील
(Polyp), पिशवीचे अस्तर खोलवर गर्भपिशवीत शिरून
तिथे बारीक गाठी झाल्या असतील (Adenomyosis) तरीही जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.
कधी कधी प्रेग्नन्सी राहिलेली समजलेलंच नसतं आणि त्यातून उद्भवलेला रक्तस्त्राव
पेशंट, ‘पाळीचं जास्त जातंय’ या सदरात
घालतात. कॅन्सर ही तर एक सर्वज्ञात कुशंका आहेच. कधी कधी रक्त साकळण्यात त्रुटी, अतिरक्तस्त्रावाच्या रूपाने आपलं अस्तित्व प्रथम
दाखवून देतात.
हृद्यविकारासाठी रक्त पातळ होण्याची औषधे चालू असणे किंवा ब्रेस्ट कॅन्सरसाठीची काही औषधे चालू असतील
तरीही अतिरक्तस्त्राव संभवतो. अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात.
निदान होण्यासाठी
वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. शरीरांतर्गत तपासणी, पॅप स्मिअर, सोनोग्राफी, दुर्बिणीतून
तपासणी, क्युरेटिंग अशा तपासण्यांचा वापर करून नेमके निदान केलं जातं.
उपचारांसाठी अनेक
पर्याय उपलब्ध आहेत. वय आणि इतर बाबी लक्षात घेऊन सुयोग्य उपचार ठरवले जातात. ब्लीडिंग
कमी व्हायच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या, एलएनजी आययुएस, क्युरेटिंग, पिशवी
काढून टाकणे असे काही पर्याय आहेत.
एलएनजी आययुएस (LNG
IUS) हे नाव आहे एका गोळीचं. ही तांबीसारखी गर्भपिशवीच्या आत बसवली जाते. सुमारे
पाच ते सात वर्ष तिथे हळूहळू औषध पाझरत रहाते. याने पिशवीचे अस्तर पातळ राहते आणि रक्तस्त्राव
कमी होतो. जिथे काम तिथेच औषध पोहोचत असल्याने शरीरावर इतरत्र दुष्परिणाम संभवत
नाहीत. सुमारे ८०% पेशंटमध्ये उत्तम
परिणाम दिसतो.
क्युरेटींग,
शास्त्रीय नाव डायलेटेशन आणि क्युरेटाज,
म्हणजे पेशंटच्या भाषेत ‘कुरटेशन’. ही सर्वात
कॉमन तपासणी आणि/किंवा उपचार. यांनी तीन गोष्टी साधतात. क्युरेटिंग केल्याने ब्लिडींग
लगेच थांबते, अस्तराचा तुकडा तपासायला मिळतो.
त्यामुळे नेमक्या काय कारणाने बिल्डींग होत होतं, हे समजतं. नवीन येणारे अस्तर हे
एकसाथ निर्माण होते आणि एकसाथ गळून पडते. म्हणूनच बरेचदा क्युरेटिंग हाच उपचार सुद्धा
ठरतो.
ब्लीडिंग होतं ते
अस्तरातून. त्यामुळे हे अस्तर नष्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग डॉक्टरांनी चोखाळून बघितले
आहेत. अस्तर खरवडून काढणे (क्युरेटींग), खरवडून
काढता काढता लाईटचा शेक देऊन मुळापासून जाळून
टाकणे, गर्भपिशवीत फुगा फुगवून त्यात गरम पाणी सोडून अस्तर नष्ट करणे वगैरे. मूळ
करणानुसार यातील काही वेळोवेळी सुचवले जातात.
आपल्याकडे सर्रास
वापरला जाणारा उपचार म्हणजे पिशवी काढून टाकणे. प्रत्येक वेळी हा आदर्श उपचार असतोच
असं नाही पण प्राप्त परिस्थितीमध्ये अन्य पर्याय स्वीकारणं पेशंटला आणि डॉक्टरनाही
जड जातं. पिशवी काढणे हा कायमस्वरूपी इलाज
समजला जातो. पिशवी न काढता केलेल्या उपचारांतील
अनिश्चितता, वारंवार दवाखान्यात जाणे, पुन्हा
पुन्हा होणारा खर्च, हे गरीब पेशंटला मानवत नाही. परवडत तर नाहीच नाही. ही सगळी परवड टाळण्यासाठी मग पिशवी काढण्याचा,
एक घाव दोन तुकडे छापाचा, निर्णय घेतला जातो.
स्त्रीचे काम
म्हणजे फक्त मुले काढणे, असा दृष्टीकोन असेल तर पिशवी म्हणजे निव्वळ
गर्भनिर्मितीचा अवयव उरतो. मग तेवढे काम झाले की पिशवी म्हणजे फक्त पाळी आणि कटकटी.
मग उडवून टाकली पिशवी तर हरकत काय? हा अनिष्ट
दृष्टीकोन बरीच अरिष्ट घेऊन येतो.
अवेळी आणि
अनावश्यक ऑपरेशन करण्याचे अनेक तोटे आहेत. एका ओळीत सांगायचं तर याने म्हातारपण
लवकर येतं. हाडे ठिसूळ होणे, ब्लडप्रेशर, हृदयविकार वगैरे मागे लागतात. ऑपरेशन
झाल्या झाल्या लगेच काही हे होत
नाही. त्यामुळे या गोष्टींशी ऑपरेशनचा
संबंध जोडला जात नाही एवढंच.
अनावश्यक असताना
पिशवी काढण्याची ऑपरेशन टाळायची असतील, तर पर्यायी उपचारात पेशंटचाही समजूतदार आणि
सक्रीय सहभाग असायला हवा. तोपर्यंत ते शक्य नाही.
No comments:
Post a Comment