Friday, 14 January 2022

ओव्हेरिअन सिस्ट

 

ओव्हेरिअन सिस्ट

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

भाषेत शब्दांचे  दुर्भिक्ष असेल तर ते त्या भाषिकांना भोवतंच. मराठीतच बघाना, शरीरात कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त  वाढीला ‘गाठ’ असा एकच शब्द वापरला जातो.  मग ती साधी गाठ असो, शंकास्पद असो वा  कॅन्सरची. या संदर्भातले अनेक पारिभाषिक शब्द इंग्लिशमध्ये आहेत.  पण हे ज्ञान, ही विद्या, इंग्रजीतच निर्माण झाल्यामुळे असं आहे. मराठी भाषिक सुरुवातीच्या संशोधनात कुठेच नव्हते त्यामुळे तिथे मराठी शब्द येण्याचा प्रश्नच  येत नाही आणि आता संशोधनात जरी असले, तरी मुळात संशोधनाची भाषाच  इंग्लिश झाल्यामुळे तिथे  मराठी भाषिक असूनही काही उपयोग नाही.

आजचा विषय आहे ओव्हेरिअन सिस्ट. ओव्हरी म्हणजे स्त्रीबीज ग्रंथी आणि सिस्ट याचा अर्थ द्रव भरली गाठ. कुठलीही गाठ म्हटलं की पेशंटच्या काळजात चर्रर्र होतं. ही गाठ कॅन्सरची तर नसेल ना, अशी कुशंका मनात डोकावते. मग गाठ, तिचे प्रकार, त्यांची नावे, त्यांचे अर्थ वगैरे सांगता सांगता डॉक्टरांची बरीच दमछाक होते. तऱ्हेतऱ्हेच्या गाठींसाठी  तऱ्हेतऱ्हेचे शब्द आपल्या भाषेत रुळलेले असते तर हे प्रकरण जरा सोपं गेलं असतं. पण गाठ हा एकच शब्द वापरून सारे अर्थ आणि अनर्थ समजावून सांगणे आणि पेशंटने ते समजावून घेणे,  अवघडच जातं.  तरीही आपण प्रयत्न करून पाहू.

बहुतेक सिस्ट निरुपद्रवी असतात. क्वचित  काही तापदायक ठरतात. ओटीपोटात दुखणे, जडजड  वाटणे, ओढ लागणे अशा काही तक्रारी उद्भवू शकतात. क्वचित  तीव्र वेदना, उलट्या, ताप असंही चित्र दिसतं. स्त्रीबीजग्रंथीना देठं असतात. यातून रक्तवाहिन्या गेलेल्या असतात. गाठींच्या ओझ्याने या देठाला पीळ पडला तर रक्तपुरवठा बंद होतो. तीव्र वेदना सुरू होतात. तातडीने ऑपरेशन करून पीळ  सोडवून गाठ काढावी लागते.

 

फॉलीक्युलर सिस्ट आणि ल्युटीअल सिस्ट

दरमहा स्त्रीबीज तयार होताना स्त्रीबीजग्रंथीमध्ये पाण्याच्या अशा गाठी निर्माण होणं आणि त्या फुटणं  हे स्वाभाविक आहे. सुरवातीला  अनेक बीजे फुगत जातात, मग त्यांची टेंगळे बीजग्रंथीवर दिसायला लागतात. यातले एकच कुठलंतरी बरंच वाढतं. याला म्हणतात फॉलीक्युलर सिस्ट.   हे दोन-अडीच सेंटिमीटर झाल्यावर फुटतं. यातून स्त्रीबीज बाहेर पडतं. उरलेल्या रिकाम्या फुग्यात किंचित रक्तस्त्राव साठून राहू शकतो.  याला म्हणतात ल्युटीअल सिस्ट. या दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत निसर्गतः या गाठी निर्माण होतात आणि लय पावतात क्वचित कधीतरी त्या जात नाहीत. तरीही, वाट पहाणे किंवा काही महिने गोळ्या देणे, यापलीकडे यासाठी विशेष काही करावे लागत नाही.

बरेचदा अन्य काही कारणाने सोनोग्राफी केली जाते आणि त्यात ही ‘गाठ’ असल्याचं वाचून पेशंट अस्वस्थ झालेली असते. पण असल्या गाठींचा त्रास पेशंटपेक्षा डॉक्टरना अधिक होतो. कारण, गाठ म्हणजे कॅन्सर, हे समीकरण  डोक्यात फिट्ट घेऊन आलेल्या पेशंटला, ‘काही विशेष नाही’, हे निदान पटत नाही. उलट प्रॉब्लेम नाही असं सांगणाऱ्या डॉक्टरमध्येच प्रॉब्लेम आहे अशी त्यांना शंका येते. मग गूगल, सेकंड ओपिनिअन वगैरे सोपस्कार पार पडून ही शंका निवळते किंवा चिघळते.  

 

डर्मोइड सिस्ट

ज्यापासून शरीरातील कोणतीही पेशी बनू शकेल अशा सर्व-संभव-पेशी स्त्रीबीजग्रंथीमध्ये  असतात.  या पेशीपासून  कधीकधी गाठी उद्भवतात. यांना म्हणतात डर्मोइड सिस्ट.  या गाठींमध्ये त्वचा, केस, दात, थायरॉईड, अशा कुठल्याही प्रकारचे ओबडधोबड अवयव आढळतात. वैज्ञानिक संशोधन होण्यापूर्वी ह्या गाठीतले  हे अक्राळविक्राळ अवयव पाहून ही काहीतरी सैतानी बाधा आहे असा समज रूढ होता. डर्मोइड सिस्टमधून कॅन्सर क्वचितच होतो पण सिस्ट आकाराने वाढू शकतात, त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे ते काढून टाकणे  केव्हाही चांगले.

 

सिस्टअॅडीनोमा

सिस्टअॅडीनोमा या प्रकारच्या गाठीत चिकट पाणीदार  द्रव भरलेला असतो. यातूनही कॅन्सर क्वचितच होतो. पण कधी या आकाराने  प्रचंड वाढलेल्या दिसतात.  आदिवासी, दुर्गम भागात राहणाऱ्या महिला वर्षानुवर्ष अशा गाठी पोटात बाळगून असतात. पोट चांगलं, नऊ काय, नव्वद महिन्याचे  असल्यासारखं फुगलेलं असतं. अतिशय किरकोळ शरीरयष्टीची बाई आणि टम्म फुगलेलं पोट. बाईला गाठ आहे का गाठीला बाई फुटली आहे असा प्रश्न पडावा, असं चित्र असतं. कधीतरी वैद्यकीय सेवेची आणि त्यांची गाठ पडते. मोठ्या हिकमतीनी गाठ काढली जाते. त्या परात  भरून उतू जाणाऱ्या, १२-१५ किलो वजनाच्या गरगरीत गाठीसोबत डॉक्टरचमूचं  फोटो सेशन पार पडतं.

खरंतर वर्षानुवर्ष गाठ पोटात बाळगण्याचा अनवस्था प्रसंग ओढवणे, हे व्यवस्थेची दुरवस्था दर्शवत असतं. दुरवस्था ही खरी बातमी असते. पण पेपरात मात्र पराक्रमी डॉक्टरांचा आणि गाठीच्या शिकारीचा फोटो झळकतो.

 

एन्डोमेट्रीओमा

गर्भपिशवीच्या अस्तराच्या पेशी कधीकधी बीजग्रंथीपाशी  वाढतात.  मासिक पाळीच्या वेळी तिथे रक्तस्त्राव सुद्धा होतो. मग ही रक्ताची पुटकुळी वाढत वाढत जाते. हळूहळू चांगली मोठी गाठ निर्माण होऊ शकते. यातलं रक्त अगदी काळं काळं पडलेलं असतं. डार्क  चॉकलेटइतकं काळं. म्हणून याला म्हणतात चॉकलेट् सिस्ट. या प्रकारच्या गाठी कधी कधी आतल्याआत  फुटतात आणि तीव्र वेदना घेऊन पेशंट दवाखान्यात येते.

 

सिस्टसाठी तपासणी आणि निदान

शारीरिक तपासणी, प्रेग्नेंसी टेस्ट, सोनोग्राफी आणि गरज पडल्यास लाप्रोस्कॉपी करावी लागते. कॅन्सरची शक्यता लक्षात घेऊन सीए१२१ ही तपासणी करतात. यातून निदान होत नाही पण शंका किती घ्यावी याचा काही अंदाज येतो.

 

उपचार

कोणत्या प्रकारची गाठ आहे यावर उपचार अवलंबून आहेत.  काहीही न करणे, म्हणजे  ‘तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे’, हासुद्धा उपचार ठरू शकतो कारण वर सांगितल्याप्रमाणे यातल्या काही गाठी कालांतरानी आपोआपच विरून जातात.

बरेचदा गर्भनिरोधक गोळ्या काही महिन्यांसाठी दिल्या जातात.

आकाराने मोठ्या असलेल्या, वाढत चाललेल्या, शंकास्पद दिसणाऱ्या, अशा प्रकारच्या गाठी थेट ऑपरेशननीच काढाव्यात असा सल्ला दिला जातो.  फक्त गाठ; किंवा स्त्रीबीजग्रंथी आणि गाठ; किंवा गाठ, बीजग्रंथी आणि पिशवी असं सगळंच काढावे लागू शकते.

काहीही झालं, डोळ्याला कितीही  साधी वाटली तरी काढलेली प्रत्येक गाठ ही  तपासून घेतलीच पाहिजे (Histopathology). पण बरेचदा पैसे वाचवण्याच्या भानगडीत; दिसायला सगळं चांगलं दिसतंय  ना? तुम्हाला काही वाटत नाही ना? मग कशाला उगीच तपासायचं? असा युक्तिवाद केला जातो. हा घातक ठरू शकतो. शरीरातून काढलेला प्रत्येक अवयव/तुकडा हा सूक्ष्मदर्शकाखाली तपासला गेलाच पाहिजे.

ह्या तपासणीत त्या गाठीच्या स्वरूपाचं अंतिम निदान होतं. पुढील उपचारांची स्पष्ट दिशा मिळते.

 

प्रतिबंध 

गर्भनिरोधक गोळ्यांनी काही प्रकारच्या गाठी टळतात पण  गाठी अजिबातच होऊ नयेत असे कोणतेच प्रतिबंधक  उपचार नाहीत.

 

नियमित तपासणी

पोटात चांगली ऐसपैस जागा असते.  त्यामुळे गाठी चांगल्या मोठ्या झाल्याशिवाय सहसा काहीच लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे वार्षिक शारीरिक तपासणीत सोनोग्राफी करून एकदा बीजग्रंथींची हालहवाल विचारून घेणे चांगले.

No comments:

Post a Comment