मी एक मुंगी, तू
एक मुंगी..
डॉ. शंतनू
अभ्यंकर, वाई.
मुंग्यांचे
विलक्षण अभ्यासक, जणू ‘पिपिलिका (मुंगी) पुरुष’, असे एडवर्ड ओ. विल्सन गेले. रविवारी, सव्वीस तारखेला, वयाच्या ९२व्या वर्षी त्यांचं निधन
झालं. एडवर्ड ओ. विल्सन हे एक जगप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ.
सजीवांची
सामाजिक वर्तणूक आणि उत्क्रांतिवाद यांचं नातं विशद करणारे मूलभूत संशोधन त्यांनी केले. त्यामुळेच त्यांना ‘डार्विनचे निसर्गदत्त वारसदार’
असं बिरूद लावलं जायचं.
यातले बहुतेक संशोधन चक्क मुंग्यांबद्दल होते. शरीरातून विशिष्ट वास सोडून मुंग्या एकमेकींशी संवाद
साधतात, हा त्यांचाच शोध. मुंग्या, त्यांचे
समाज आणि त्याचे अन्य सामाजिक प्राण्यांशी
असलेले नाते त्यांनी उलगडून दाखवले. ‘सामाजिक जीवशास्त्र’ अशी एक नवीनच ज्ञानशाखा यातून
उदयाला आली. अगदी मानवी समाजाची जडणघडण सुद्धा मुंग्यांच्या अभ्यासातून उलगडते हे त्यांनी
दाखवून दिले.
सारे पृष्ठवंशीय प्राणी नष्ट झाले तर जगाचं फारसं काही बिघडणार नाही पण
अपृष्ठवंशीय प्राणी नष्ट झाले तर पृष्ठवंशीय प्राण्यांचे काही खरं नाही; ही समज त्यांनी
दिली.
माणसाच्या शरीररचनेचेच
नाही तर त्याच्या मनाच्या रचनेचे आणि सामाजिक वर्तनाचे उलगडे उत्क्रांतीशास्त्रात
दडलेले आहेत. जगण्याच्या शर्यतीत सबळ तेवढे तगतात हा सिद्धांत प्रसिद्धच आहे. यानुसार प्रत्येक जण, इतर प्रत्येकाचा
शत्रूच ठरतो! प्रत्यक्षात मात्र जो तो फक्त व्यक्तिगत स्वार्थ साधतो आहे, असे वर्तन दिसत नाही. माणसातही नाही आणि अन्य
प्राण्यातही नाही.
आपल्या
लेकराबाळांसाठी जीवाला जीव देणारे प्राणी आहेत. सग्यासोयऱ्यांसाठी सोसणारे आहेत. (जीवशास्त्रातल्या आणि समाजातल्यासुद्धा)
जातीसाठी माती खाणारे आहेत. राणीमाशीच्या सेवेसी आयुष्य वाहून नपुंसकत्व
पत्करणाऱ्या कामकरी मधमाश्या आहेत आणि
जनुकीय वारसदार (पुनरुत्पादन) अशक्य असूनही
समलिंगी संबंध पिढ्यानपिढ्या टिकून आहेत! नेमका कोणता जनुकीय स्वार्थ हे असले
प्रकार उत्क्रांत होऊ देतो?; हा गहन प्रश्न आहे.
स्वतः जगण्यात,
जुगण्यात आणि फळवण्यात जनुकीय स्वार्थ आहेच. यामुळेच जे आहेत ते सारे तगून आहेत (Individual
selection).
पण सग्यासोयऱ्यांना मदत करण्यातही जनुकीय
स्वार्थ आहे. त्यामुळे असे कुटुंबवत्सलही तगून आहेत (Kin selection). समूह
तगावा म्हणून, समष्टीसाठी बलिदान देण्यातही
जनुकीय स्वार्थ आहे. त्यामुळे मोहरा
इरेला पडला तरी समूह तगून रहातो (Group selection) आणि ‘बलिदानाची
जनुकीय परंपरा’ उत्क्रांत होते. नैसर्गिक
निवड ही अशी विविध पातळ्यांवर प्रभाव गाजवत असते.
व्यक्ति का
समष्टी?, हा झगडा जसा माणसाच्या वागणुकीत दिसतो तसा त्याच्या पदरी आलेल्या जनुकीय दानातही दिसतो. तो निसर्गातही दिसतो. इतकंच कशाला, तसा झगडा उत्क्रांती
अभ्यासकांतही दिसतो!! विल्सन समष्टीवाले.
मुंग्या आणि
माणसे मोठ्या हिकमतीने अतिशय गुंतागुंतीच्या सहजीवी समाजरचना उभारतात. या अशा प्राण्यांनी आधी वारुळे, पोळी
आणि घरे बांधली. मग त्याच्या व्यवस्थापनासाठी श्रमविभागणी आली आणि त्यातून
गुंतगुंतीची समजरचना उभी राहिली. भूतलावर
जेमतेम दोन डझन प्राण्यांत अशी समाजरचना उत्क्रांतली आहे. पैकी माणसाचा पृथ्वी-विजय तर दिसतोच आहे पण
मुंग्याही काही कमी नाहीत. एका पारड्यात मुंग्या घातल्या आणि दुसऱ्यात इतर सर्व कीटक घातले, तरी मुंग्यांचेच पारडे जड
ठरेल, इतक्या सर्वव्यापी आहेत त्या.
विल्सन सांगायचे,
दैवी म्हणावं असं तंत्रज्ञान पण मध्ययुगीन संस्थात्मक रचना आणि अश्मयुगीन भावभावना
घेऊन आपण जगतो आहोत. हीच आजची मानववंशाची गोची
आहे. वर्णभेद, समस्तांना
ग्रासणाऱ्या पर्यावरणसंहारासारख्या विषयावर असहकार, इतकेच काय पण धर्मसंस्थेचा
अविचल पगडा; ही सारी ह्या गोचीची लक्षणे आहेत. नीट पर्याय निवडले तरच मानववंशाला भविष्य आहे. लोकसंख्या नियंत्रण,
परिसंस्था संवर्धन आणि पर्यावरण सुसंगत रहाणी
हे ते उत्तम पर्याय.
व्यक्ति का
समष्टी या जनुकीय झगड्यातून माणसाचे वर्तन घडते. स्वार्थ, परोपकार, इज्जत,
कर्तव्य, हौतात्म्य अशी वर्तन-वैशिष्ठ्ये; भाषा, कला, धर्म अशा मानव्य-विद्या
इतकेच काय साक्षात संस्कृतीचा मूळचाची झरा, आहे जनुकीय खरा; अशी त्यांची मांडणी
आहे. जनुके आणि संस्कृती एकमेकांचे बोट धरून उत्क्रांत झाली आहेत.
म्हणूनच
माणसाच्या कर्तृत्वाचे मोजमाप करायचे झाले तर ते तंत्रज्ञानाने नव्हे तर चित्र,
शिल्प, संगीत, साहित्य, तत्वज्ञान अशा मानव्यविद्यांच्या
‘सुसंस्कृत’ मापाने करावे लागेल; असं त्यांचे मत. परग्रहवासीयांना आपल्या विज्ञानाचे मुळीच कौतुक
असणार नाही. कारण ते आपल्यापर्यंत पोहोचले याचाच अर्थ ते कितीतरी प्रगत असणार.
त्यांना कौतुक असेल ते मानवाच्या कलाविष्काराचे. या विद्या हाच मानवजातीचा खरा
चेहरा होय.
ते नुसतेच वाचीवीर
नव्हते तर कृतिशील होते. अनेक जैववैविध्य
संवर्धन संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. धर्माचरण आप-परभाव जागवत असते पण त्याच वेळी
करुणा, परोपकार आणि सहकार्यही घट्ट करत असते.
तेंव्हा विज्ञान आणि धर्मकल्पना यांची सांगड घालून जैविक वारशाचे जतन आणि संवर्धन
करता येईल, असा विचार त्यांनी The Creation: An Appeal To
Save Life On Earth
(2006) या आपल्या पुस्तकातून
मांडला.
जनसामान्यांना आपल्या
क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यातल्या दोन पुस्तकांना, On Human
Nature (1979) आणि The Ants (1991) यांना, मानाचा पुलित्झर पुरस्कार देखील मिळाला. Letters to a
Young Scientist हे
त्यांचं पुस्तक अनेक भावी वैज्ञानिकांना स्फूर्तिदायी आणि मार्गदर्शक ठरले आहे.
म्हणूनच मुंगीचे
महाभारत अभ्यासणाऱ्या आणि ‘मी एक मुंगी तू एक मुंगी’, ही मर्ढेकरांची प्रतिमा जणू
शास्त्रशुद्धरित्या सिद्ध करणाऱ्या ह्या वैज्ञानिकाला भावपूर्ण आदरांजली.
No comments:
Post a Comment